Thursday, October 16, 2025

सुलेखनकार पद्मश्रीअच्युत पालवांना ऐकायला जाऊ या !



नमस्कार !

        आपण मोडी परिवाराशी जोडलेले आहात. कुणी लेखक आहे, कुणी कवी आहे, कोणी मोडी अभ्यासक आहे तर कोणी इतिहासकार आहे. कुणी देणगीदार आहे कोणी जाहिरातदार आहे. कोणी हितचिंतक आहे तर कोणी वाचक आहे. कुणीतरी मोडी परिवारातील मित्रांचे मित्र आहे असा हा मोठा परिवार आहे. त्यातील कुणी गेल्या ३५ वर्षापासून जोडले आहे तर कोणी गेल्या सहा वर्षात जोडले आहे. प्रत्येक वर्षी हा कारवा वाढत चाललेला आहे आणि म्हणून मी प्रथमच आपणा सर्वांना मोडी परिवारात जोडल्याबद्दल धन्यवाद देतो आणि येत्या दिवाळीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.

        मित्रहो, यावर्षीचा सोळावा दिवाळी अंक शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर पश्चिमेतील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील धुरु सभागृहामध्ये प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन समारंभ नेहमीपेक्षा काहीसा वेगळा आहे. कारण गेली अनेक वर्ष मोडी दर्पण दिवाळी अंकाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ सजविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युतजी पालव यांना यावर्षी भारत सरकारने ' पद्म श्री ' पुरस्कार देऊन गौरवित केले. गेली ३३ वर्षे ते मोडी परिवाराशी जोडलेले आहेत.

 त्यामुळे त्यांना मिळालेला भारत सरकारचा 'पद्म श्री' पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या मोडी परिवारातर्फे त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी या प्रकाशन समारंभाचे औचित्य साधण्यात आलेले आहे. लालबागच्या चाळीत जन्मलेला हा कोकणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून सुद्धा निगर्वीपणे जमिनीवर येऊन आमच्यासारख्या साध्या माणसांमध्ये साधा माणूस म्हणून वावरतो ही एक कौतुकाची बाब आहे. या माणसाचा जीवनपट तर पुढच्या पिढीला आदर्श असणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आपण या समयी आयोजित केलेला आहे. मुलाखत घेणारे पण कलाक्षेत्रातील दिग्गज आहेत. चित्रकार लेखक कवी विजयराज बोधनकर आणि कला अभ्यासक निकिता भागवत या अच्युत पालव यांना बोलते करणार आहेत.


         प्रकाशन समारंभ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ता चे माजी प्रमुख संपादक तसेच माजी खासदार सन्माननीय कुमारजी केतकर हे उपस्थित राहणार आहेत. अर्थात त्यांचेही विचार ऐकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे.

असा हा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात दादर येथे ठेवला आहे. दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु ट्रस्टच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झाले आहे. सभागृह वातानुकूलित असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ते आरामदायी ठरणार आहे. कार्यक्रम आटोपशीर असणार आहे. दूरवरून आलेल्या लोकांना घरी वेळेत जाण्याची चिंता करण्याची गरज नाही. कार्यक्रमानंतर दादर परळ भागात प्रसिद्ध असलेल्या मयूर कॅटर्रसच्या जेवणाचा आस्वाद घेऊन आपण लगेचच पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या व मध्य उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे कडे जाऊ शकता.

विशेष म्हणजे याचवेळी कोकणातून प्रसिद्ध होणाऱ्या 'कोकण मीडिया' साप्ताहिकाचा कोकणातील खाद्य संस्कृतीवर प्रकाश टाकणारा कोकण मीडिया हा दिवाळी अंक प्रकाशित होणार असल्यामुळे तोही अंक आपल्याला उपलब्ध असेल. कोकणातील गृहिणींचे अर्थात बचत गटात काम करणाऱ्या महिलांनी बनवलेला साजूक तुपातला दिवाळीचा फराळ 'कोकण अमृत' या संस्थेतर्फे इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

         मोडी परिवाराशी जोडलेल्या सर्व आमच्या बंधू-भगिनींना आमची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करूया. आपला मोडी परिवार आता मोठ्ठा झाला आहे हे दाखवून देऊया.

आपला

सुभाष लाड

संपादक

मोडी दर्पण


No comments:

Post a Comment