आपल्या हिंदुस्थानात उत्सवांना कमी नाही. हिंदुस्तानात भाषा, प्रांत, जाती, धर्म, वेशभूषा, अन्नपदार्थ यात विविधता असली तरी त्यातून एकता साधणारे असे अनेक सण आहेत जे पूर्ण हिंदुस्थानभरच काय पण जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू माणूस गेला आहे तिथे ते सण साजरे होतात. हिंदुस्थनातील त्या त्या राज्यांचे काही वेगवेगळे सण असतात. तसे
त्या त्या राज्यातील काही जिल्ह्यांचे जातीनिहाय, ऋतू निहाय वेगवेगळे सण असतात. एवढेच काय एकेका गावाचे सुद्धा त्यांच्या श्रद्धेप्रमाणे परंपरेप्रमाणे चालत आलेले आगळे वेगळे सण असतात आणि त्या त्या गावात ते आनंदाने सण साजरे होत असतात. त्यामुळे हिंदुस्थान हा सण उत्सवांतून आनंद देणारा, जगण्याची ऊर्जा देणारा, जगण्याला सौंदर्य देणारा असा एकमेव देश आहे असे म्हणायला हरकत नाही.
हिंदुस्थानातील सण हे पुराण कालापासून सुरू झालेले आहेत तसे त्या त्या काळापासून त्यात नव्याने भर पडत आलेली आहे. उदाहरणार्थ ऋषीपंचमी हा सण ज्या काळात ऋषी वावरत होते तेव्हापासून चालत आलेला आहे. गावगाड्यात गणाला महत्त्व आल्यानंतर व त्यात गणेशाचे स्थान निश्चित झाल्यानंतर गणेशोत्सव हा सण सुरू झाला असावा. गुढीपाडवा हा रामायणापासून सुरू झाला असावा तसेच सिमोलंघन हा सण महाभारतातील पांडवांपासून सुरू झालेला असावा. पुढे कधीतरी गावागावात ग्रामदैवतांची स्थापना झाली आणि त्या त्या गावातील ग्रामस्थांना आनंद देणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या. बैसाखी, बैलपोळा असे सण हे शेतीशी निगडित आहेत तर नागपंचमी, हिरवी भाजी, वरूण पूजा, जांगळ देवपूजा हे निसर्गाशी व शेतीशी निगडित असलेले सण सुरू झाले. या प्रत्येक क्षणाबरोबर त्या सणाच्या निर्मितीच्या आणि वैशिष्ट्य सांगणाऱ्या कथा अथवा दंतकथा प्रसारित झाल्या. त्यावर लोकांनी श्रद्धा अर्पण केल्या. काळानुरूप काहींना अंधश्रद्धा म्हणत असले तरी त्या त्या काळासाठी समाज जीवनात एकसूत्रता, नियमितता आणि आनंद देणाऱ्या या गोष्टी होत्या तशाच त्या आवश्यक होत्या हे विसरून चालणार नाही.
काळ जसा पुढे पुढे जात राहिला तेव्हा त्या त्या काळात समाजात आदर्श निर्माण करून देणारे, समाजाला दिशा देणारे, समाज रक्षण करताना कर्तृत्व गाजवणारे वीर पुरुष किंवा वीरांगणा यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी तसेच त्यांचे चरित्र पुढच्या पिढीपुढे ठेवून आपल्या समाजात अशी कर्तुत्ववान माणसं निर्माण व्हावी हा हेतू ठेवून त्या त्या वीरांच्या महापुरुषांच्या जयंत्या किंवा त्यांच्यासाठीचे विशेष दिन साजरे होऊ लागले. त्यांचे पुढे सणात रूपांतर झाले.
एखादी चांगली गोष्ट समाजाने स्वीकारावी व वाईट गोष्टी पासून समाजाने दूर जावे यासाठी पाप पुण्य या संकल्पनांची जोड प्रत्येक सणाला देण्यात आली आहे. दिवाळीचे अभ्यंग स्नान हे पहाटेच व्हायला हवे हे मनावर ठसवताना त्यादिवशी कावळ्यांचा आवाज येण्यापूर्वी आंघोळ करणे गरजेचे आहे अन्यथा ते स्नान फलदायी होत नाही हे मनावर बिंबवण्यात आले. त्या पाठीमागे सकाळचे स्नानाला महत्त्व देण्यात आले आहे.आपल्याकडे पितृपंधरवडा हा सुद्धा एक सण म्हणूनच साजरा केला जातो त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांची आठवण काढणे, त्यांना तृप्त करणे ही श्रद्धा आहे. त्यानिमित्ताने आपली वंशावळ पाठ होते या वंशावळीतील कर्तृत्ववान माणसांची ओळख होते, त्यांच्या आठवणीचा जागर होतो, त्यावेळेला जेवणावळीच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या घरी येतात. त्याचबरोबर कावळ्यांना घास देणे( ज्याला कागावळ म्हणतात) गाईला नैवेद्य देणे यातून भूतदयेचा संस्कार जोपासला जातो. आणि म्हणूनच काळ बदलला तरी माणूस आपल्या पूर्वजांना विसरण्याची चूक करायला तयार नाही अर्थात सण हे प्रत्येक काळासाठी, पिढीसाठी आवश्यक ठरत आहेत.
एकेकाळी हिंदुस्तानभर अनेक राजांच्या सत्ता होत्या. कोणी जनतेला त्रास दिला तर कोणी जनतेचे भलं पाहिलं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राज्यकारभार करत होता. त्यांच्या आठवणी इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात. कुणाची आठवण काढताना आदराने मान झुकते तर कुणाची आठवण करताना त्याबद्दल नकारात्मक बोलले जाते. ज्या राजानी कालगणनेचा आदर करून आपल्या चांगल्या राज्यकारभाराला सुरुवात केली तो दिवस आपण वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करत असतो. असे अनेक राजे होऊन गेले त्यामुळे हिंदुस्थानात अनेक जमातींचे काल गणण्याचे दिवस वेगवेगळे आहेत. व्यवहारात ख्रिस्ती कालगणनेला महत्त्व असले तरी शक कालगणनेनुसार हिंदुस्थानातील सण उत्सव साजरे करतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजांच्या राज्याभिषेकापासून सुरू झालेली कालगणना हे आजही तेवढ्याच अभिमानाने व आदराने महाराष्ट्रीय जनता मिरवत आहे.
दीडशे वर्ष आपला हिंदुस्तान इंग्रजांच्या साम्राज्यात खितपत पडला होता. या गुलामगिरीच्या बेड्या तोडून या देशावरती जनतेचे राज्य आणण्याकरता अनेक उठाव झाले, लढाया झाल्या, चळवळी झाल्या. कुणी फासावर गेले, कुणी रणांगणात मारले गेले, कुणाला गोळी मारली गेली तर कुणाला आयुष्यभर कारागृहात कितपत पडावे लागले. मात्र या सर्वांच्या प्रयत्नातून १९४७ च्या १५ ऑगस्ट ला आपला देश स्वतंत्र झाला. भरत टोळी पासून वेगवेगळ्या साम्राज्यापर्यंत पोहोचलेल्या अनेक राजघराण्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये राज्यकारभार केला. त्यांचे बरे वाईट अनुभव पाहता राजा आणि प्रजा ही संकल्पना नव्या काळात अनावश्यक वाटू लागली आणि लोकांनीच निवडून दिलेल्या लोकांनी लोकांवरती राज्य करावे अशा प्रकारची नवीन संकल्पना रूढ होऊ लागली. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच लोकशाहीच्या संकल्पनेतून देशाचा राज्यकारभार करायचा यावर शिक्कामोर्तब होऊन या राज्यकारभाराला दिशा देण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीचे काम झाले. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना देशाने स्वीकारली. निवडणुका हा त्यातील महत्त्वाचा भाग असल्याने निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी २५ ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ अशा मोठ्या कालावधीत लोकसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या. या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने सुरू झाल्या.
देशाचा राज्य कारभार चालवण्यासाठी आवश्यक ते वय पार पडलेला, समाजसेवेची आवड असलेला समाजसेवक, लोककल्याणाचा विचार करणारा विचारवंत,देशासाठी त्याग करणारा देशभक्त, देशाच्या भविष्यातील विचार करणारा धुरीण, चारित्र्यसंपन्न असा उमेदवार निवडून द्यावा हा निवडणुकीचा हेतू असतो. एका तऱ्हेने आपल्या विभागाचा असा एक प्रतिनिधी निवडून द्यायचा, निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्यातून एकाला प्रमुख करायचे, वेगवेगळ्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या कामांची खाती द्यायची आणि त्यांनी देशाची सत्ता चालवायची. त्याचबरोबर ज्यांना सत्ता चालवण्याची संधी मिळणार नाही अर्थात ज्यांना बहुमत मिळणार नाही त्यानी सत्ता चालवणाऱ्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवण्याचे, त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचे काम करावे अर्थात विरोधक म्हणून काम करावे अशी एकंदरीत लोकशाहीची संकल्पना आहे. त्यामुळे मतदारांंनी पुढील पाच वर्षे निश्चिंतपणे आपल्या व आपल्या देशाच्या विकासाची फळे चाखायची असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा आपण आपला प्रतिनिधी निवडतो याचा अर्थ आपणच ते प्रतिनिधीत्व करत आहोत याचा आनंद मतदात्याला असायला हवा म्हणूनच या निवडणुकांकडे एक आनंदोत्सव म्हणून पाहायला हवे. किंबहुना तो आनंदोत्सव म्हणून साजरा करायला हवा.
मात्र लोकशाहीत सुद्धा एक ट्विस्ट आहे हे लोकशाही जशी पुढे पुढे जाते आहे तसे तसे ते अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. कधी कधी तर या निवडणुकांच्या मधून आनंदापेक्षा दुःख, क्रोर्य, लबाडपणा याचाच प्रत्यय बघायला मिळतो. त्यावेळेला मतदारांचा भ्रमनिराश होत असतो. लोकशाहीवरचा विश्वास उडेल की काय अशी भीती वाटत असते.
असे असले तरी मतदारांनी तरी आपली सदसद विवेक बुद्धी नेहमीच जागरूक ठेऊन मतदान प्रक्रियेत प्रामाणिकपणे भाग घेतला पाहिजे तरच ही लोकशाही मजबूत होईल.प्रत्येक काळरात्री नंतर एक सूर्य उगवत असतो. एखादा सूर्य हा आपल्या विचारांना अधिक मजबूत करेल अशी आशा करून आपण निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकशाहीच्या आनंदोत्सवात सहभागी होऊया.
ती निवडणूक लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, जिल्हा परिषदेचे असेल किंवा तालुका पंचायत समिती असेल. एखाद्या ग्रामपंचायतीची असेल किंवा एखाद्या संस्थेची. त्या निवडणुकीतून पुढील पाच वर्षासाठी आपल्याला एक राजा (प्रमुख)आणि त्याचे मंत्रीगण निवडायचे असतात. ते एक पवित्र कार्य आहे.या निवडणुकांकडे आपला पारंपारिक पण आधुनिक सण म्हणूनच पहावे. आपण पारंपारिक सण साजरी करताना जी पावित्र्याची भावना आपल्या मनात असते तीच भावना इथेही असावी. सण साजरे करताना आपण नवीन वेष धारण करतो- पारंपारिक वेशभूषा करतो. सुगंधी द्रव्य वापरत असतो. त्यामुळे एक आल्हाददायक वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण होते. आपलं यातून भलं होणार आहे, सर्वांना सुख मिळणार आहे ही सुप्त भावना मनात वावरत असते. अगदी तेच वातावरण आपण निवडणुकीच्या व मतदानाच्या वेळी निर्माण करावे. आपला सण आपण आपल्या ऐपतीप्रमाणे करत असतो मात्र कुणाच्या उपकाराने किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवून साजरा करत नाही तसंच निवडणूकीत सुद्धा
कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा न ठेवता आपला स्वाभिमान जपत लोकशाहीला हे गरिमा प्राप्त करून देऊया हीच अपेक्षा! धन्यवाद!
सुभाष लाड
९८६९१०५७३४ं