Sunday, July 28, 2024

पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे -जनी जनार्दन- ! -*

पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे -जनी जनार्दन- ! -* 

हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२ पर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास आहे. कोकणातल्या गुहागर पट्ट्यातील बोलीभाषेचा ठेवा यात आहे.

सुभाष लाड

Home » पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे ‘जनी जनार्दन’ !
मुक्त संवाद
पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे ‘जनी जनार्दन’ !
by टीम इये मराठीचिये नगरीJuly 25, 2024033
SHARE00
हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२ पर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास आहे. कोकणातल्या गुहागर पट्ट्यातील बोलीभाषेचा ठेवा यात आहे.

सुभाष लाड

स्व. डॉ. तात्यासाहेब नातू यांचे जीवन चरित्र असणारे ‘जनी जनार्दन’ नावाचे पुस्तक घेऊन पोस्टमन मुंबईच्या घरी आला तेव्हा मी गावी, कोकणात जाण्याची तयारी करीत होतो. नेहमीप्रमाणे प्रवासात वाचण्यासाठीची पुस्तके अगोदरच बॅगेत भरली होती. ‘जनी जनार्दन’ सोबत घ्यावे असा विचार होता. परंतु पुस्तकाचा आकार पाहून मी विचारात पडलो. उत्सुकता म्हणून ‘जनी जनार्दन’चे आवरण काढून त्याला मोकळा श्वास देऊ केला. तब्बल सातशे आठ पानांचे आणि इंग्रजी पुस्तकांना वापरण्यात येणारा वजनाने हलका पण दर्जेदार कागद वापरलेला असल्याने ते सहज हाताळू शकू याची खात्री झाली.

मुखपृष्ठावर स्व. तात्या नातू यांचे रेखाटलेले चित्र प्रत्यक्ष छायाचित्र वाटावे इतके हुबेहुब असल्याने कोणाची कलाकृती आहे हे पाहण्याची इच्छा अनावर झाली. नामनिर्देश पानावर पाहिलं तेव्हा लक्षात आलं, कोल्हापूरच्या स्व. जे. बी. सुतार यांच्या या मूळचित्राला ‘चैताली नाचणेकर’ यांनी साज चढविला होता. पुस्तकाचे लेखक धीरज वाटेकर हे पर्यटन-पर्यावरणप्रेमी म्हणून आजवर माहिती होते. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी विपुल लेखन केले आहे. विविध विषयांवरची त्यांची आठ पुस्तके प्रकाशित असून काही सन्मानही त्यांना मिळाले आहेत.

खरंतर त्यादिवशी तातडीने मला पुस्तक वाचायचे नव्हते. परंतु आवडीचे लेखक, मुखपृष्ठाने घातलेली भुरळ त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना असल्याने सुरूवातीची काही पाने चाळण्याची तीव्र इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून पुस्तक उघडून बसलोच ! तसे प्रस्तावनेत कुणी वाईट लिहित नसले तरी लिखाणातली आढ्यता किंवा मोकळेपणा यावरून प्रस्तावनेचा रोख समजून येतो. किमान पुस्तक का वाचावे ? याकरिता प्रस्तावनाकारांनी काही ठळक मुद्दे मांडलेले असतात, त्यावरून वाचक पुढे कसे जायचे ते ठरवित असतो. गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा जगजाहिर आहे. त्यांना स्वर्गीय तात्यांचा मिळालेला सहवास लिहिताना त्यांनी, लेखकानेही चरित्रनायकाला न्याय मिळवून दिल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मी प्रस्तावना संपवून लेखकाच्या मनोगताकडे वळलो. स्वर्गीय तात्यांचे ‘देवमाणूस’पण मोठे आहेच, पण त्यांनी विंचूदंशावरील औषधाकरीता हाफकिन इन्स्टिट्यूट आणि सरकार यांचेकडे केलेला पाठपुरावा हा मला अधिक मोलाचा वाटतो. कारण सगळेच डॉक्टर बाजारात येणाऱ्या औषधांचा वापर करून आपला व्यवसाय करतात. परंतु कोकणातला एक डॉक्टर चक्क औषध निर्मितीसाठी जिद्द आणि चिकाटी बरोबर स्वत:ची पदरमोडही करतो, हे कौतुकास्पद आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टरकी कशी असावी? याचा आदर्शपाठच तात्यांनी घालून दिला आहे. त्यामुळे लेखकाचे मनोगतही साचेबंद न राहता ते पुस्तक पुढे वाचण्यास प्रवृत्त करते.


लेखक इतिहासाचा जातिवंत अभ्यासक आहे. इतिहासाचा अभ्यासक हा जनावरांवरच्या गोचिडासारखा असतो. जोपर्यत त्याचे पूर्ण पोट भरत नाही तोपर्यंत तो पडत नाही. तसा इतिहास अभ्यासक विषयाच्या मुळापर्यंत जाऊन पूर्ण संदर्भ मिळाल्याचे समाधान होत नाही तोपर्यंत तो विषयाला चिकटून असतो. तो संदर्भाने, अभ्यासाने परिपूर्ण होतो तेव्हाच तो आपले भाष्य करतो. जनी जनार्दनमध्ये हाताळलेला प्रत्येक विषय हा त्या निकषावर खरा उतरलेला आहे. इथे दंतकथांना किंवा ऐकीव माहितीवर असं काहीही नाही आहे. तात्यासाहेब जसे जगले तसे मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चरित्रातील ती गावे, त्यात्या वाटा, त्यात्या गावातील आणि वाटेवरील वैशिष्ट्ये वाचताना वाचकाला आपण तिथे आहोत असे जाणवत राहाते. पुस्तकातील प्रसंग जीवंत असून आता प्रत्यक्ष घडताहेत असे वाटते. त्यामुळे एक डॉक्टर, ‘अनेक रूग्णांना मदत करत असतो’ हे लिहिताना मागच्या रूग्णाच्या वेळी केलेले वर्णन पुन्हा कुठे द्विरुक्तीचा ठपका घेत नाही. म्हणून हे चरित्र प्रवाही झाले आहे.

चरित्रनायकाचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षात तो डॉक्टरकीचे शिक्षण घ्यायला मुंबईत जातो. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होतात तेव्हा तो गळ्यात स्टेथॅस्कोप घालून डोंगरदऱ्यातील मैलोनमैल पायवाटा तुडवत रूग्ण तपासायला गावोगाव फिरतो. गीतेतल्या शिकवणीप्रमाणे कोणत्याही फळाची आशा न बाळगता रूग्णसेवेबरोबरच बालपणी घडलेल्या शिकवणुकीमुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडून राहत सामाजिक व शैक्षणिक सुधारणात सर्वस्व वाहून काम करतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे त्याला जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी मिळते. हे सर्व लिहिताना लेखकाने त्या त्या काळातील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचे केलेले वर्णन त्या काळाकडे घेऊन जाते. राजकारणात आल्यानंतर मला लोकांची कामे करण्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ही भावना चरित्रनायक सतत जागृत ठेवून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नि:स्पृहपणे कामच करीत राहतो. चांगल्या माणसालाही काही दिव्ये पार पाडावी लागतात. कधी अपमान तर कधी पराभव पत्करावा लागतो. विजयाचा उन्माद नाही तसे पराभवातही खचून जाणे नाही. कोणाला दोष देणे नाही ही संतप्रवृत्ती किर्तनात सहज सांगता येते. पण प्रत्यक्ष जगताना मनावर किती ताबा ठेवावा लागत असेल ते माणूस नाही तर ‘देवमाणूस’च जाणे!

हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२ पर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास आहे. कोकणातल्या गुहागर पट्ट्यातील बोलीभाषेचा ठेवा यात आहे. लोकशाहीतल्या लोकप्रतिनिधींनी तसेच पक्षाच्या किंवा संस्थांच्या कार्यकर्त्याने कसे वागले पाहिजे? याचा आदर्श वस्तुपाठ यात आहे. एका कुटुंबाची परंपरा पुढच्या पिढीने पुढे कशी न्यायची असते, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.

सुभाष लाड
( ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजक आणि राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष)

पुस्तकाचे नाव – ‘जनी जनार्दन’
लेखक – धीरज वाटेकर
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
एकूण पृष्ठसंख्या – 708
पुस्तकाची किंमत – 1299 Rs.

पुस्तकासाठी संपर्क – विश्वकर्मा
वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून
https://iyemarathichiyenagari.com/jani-janardhan-book-by-dheeraj-vatekar/ 

*ताज्या अपडेट मिळण्यासाठी Follow the इये मराठीचिये नगरी WhatsApp:*
https://chat.whatsapp.com/JsWNWp6lxLDE3wCe8j62BN

*इये मराठीचिये नगरी फेसबुक पेजला लाईक करा*
https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari

Sunday, July 21, 2024

खडकावरला अंकूर

      
       आज गुरुपौर्णिमा ! या दिवसानिमित्त मी माझ्या गुरुजनांना भेटण्याचे व त्यांना नमस्कार करण्याचे ठरवले होते परंतु गेले दोन-तीन दिवस मुंबईमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यामुळे तो कार्यक्रम काय होऊ शकला नाही. 
         माझे पहिलीपासून ते चौथीपर्यंत चे शिक्षक ज्यांनी मला त्यानंतर सुद्धा माझ्या शिक्षणासाठी मदत केली ते माझे फापे गुरुजी दोन वर्षांपूर्वी सोडून गेले. माझे माध्यमिक शिक्षणातील मुख्याध्यापक व मराठी हिंदीचे शिक्षक एम आर ढेकळे सर गेल्यावर्षीच निवर्तले. त्या अगोदर काही दिवस डावरे सर ही निघून गेले. या सर्वांच्या मी संपर्कात होतो शक्य होईल त्यावेळेला निपाणीला जाऊन डावरे सर ढेकळे सरांना भेटायचो.
         फापे गुरुजींचं गाव आडवली माझ्या रिंगणे गावापासून दूर असले तरी लांजा पासून जवळ असल्याने  गावी गेल्यानंतर एखादी फेरी  फापे गुरुजींच्याकडे असायची. फापे गुरुजींनी माझ्या आयुष्यातल्या अनेक पायऱ्यांवर मला शाब्दिक आधार दिल्याने ते माझे गुरुजी अधिक पालक म्हणून मला जास्त जवळचे वाटायचे. ते जाण्याच्या अगोदर एक वर्ष मी त्यांच्याच घरी जाऊन गुरुपौर्णिमेचा साग्र संगीत कार्यक्रम आयोजित केला मला फार बरे वाटले. त्यांच्या मुलींनी आणि आडवली गावच्या ग्रामस्थांनी, तेथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगले योगदान दिले. मी त्यांचा नेहमीच ऋणी आहे.
       मी गावाकडचे शिक्षण पूर्ण करून मुंबईला आल्यानंतर क्षात्र कुलोत्पन्न मराठा समाज अध्यापक विद्यालय परेल अर्थात शिरोडकर  कॉलेजला डीएड साठी प्रवेश घेतला. या कॉलेजने भरपूर काही दिले. शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या कलांचा आस्वाद लुटण्याची संधी मिळाली. एक वेगळाच आत्मविश्वास या कॉलेजने दिल्याने माझ्या शिक्षकी पेशात या कॉलेजचे महत्त्वाचं योगदान आहे असं मी मानतो. या कॉलेजचे चिटणीस सर जे चित्रकला शिकवायचे त्यांनी माझं फळ्यावरचे लेखन पाहून मला इलेमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी तयारी करून घेतली. मी या परीक्षांमध्ये अनुक्रमे ए+ आणि बी+ अशा श्रेणी मिळवल्या. परिस्थितीमुळे मला चित्रकलेमध्ये काही करता आले नाही परंतु माझ्या एकूण आयुष्यात चित्रकलेने रंग भरले. तो आत्मविश्वास मला चिटणीस सरांकडून मिळाला. प्राचार्य अ.ना.जोशी, शिरोडकर सर, गावडे सर, खरे मॅडम, जाधव मॅडम, झांट्ये मॅडम, ओटवणेकर मॅडम याचबरोबर व्ही. व्ही. पाटील सर आणि बोराडे सर ही सर्व मंडळी लक्षात राहिली.
        कॉलेज सुटल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात मी अनेक शिक्षकांशी भेटत होतो .मात्र त्यानंतर कामाच्या धगडग्यात या भेटी कमी होत गेल्या मात्र व्ही.व्ही. पाटील सर यांच्या विठ्ठलवाडीतल्या शाळेमुळे माझा त्यांच्याशी संपर्क कायमचा राहिला. माझा एक जिवलग मित्र बाळा चव्हाण हा वासिंद येथे राहत असल्याने वासिंदलाच राहणारे बोराडे सर हे संपर्कात राहिले. बोराडे सर तर माझ्या घरगुती कार्यक्रमातही सहभागी होत आले आहेत. 
         बोराडे सरांची सध्याची शारीरिक स्थिती ही बिकट आहे. त्यांना ऐकण्याचा तसेच चालण्याचाही त्रास होतो. मात्र पाटील सर आजही आपल्या शाळेच्या दैनंदिन कारभारात लक्ष देत असतात. आज संध्याकाळी मी त्यांना आणि बोराडे सरांना फोन केला  आणि त्यांना नमस्कार केला. बोराडे सरांच्या बद्दलची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केले त्या पुस्तकासाठी मी प्रस्तावना लिहिली ती प्रस्तावना मी आपल्यासमोर वाचायला देत आहे, शक्य झाल्यास सरांचे पुस्तक मागून घ्या आणि सरांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वतःला घडवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वाचण्यासारखा आहे.
*********
   माझ्या प्राथमिक शिक्षणापासून पुढील सर्व पायऱ्यांवरील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांशी संपर्क ठेवताना कधी भ्रमणध्वनीवरून बोलणे किंवा प्रत्यक्ष भेटण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणत्याही वयात आई-वडिलांसमोर जाताना आपण लहानच असतो ही भावना जशी घट्ट असते तसेच शिक्षकांच्याही समोर जाताना आपण आजही त्यांचे विद्यार्थी आहोत ही भावना सुखद आणि आनंददायी असते. त्या एका क्षणासाठी मी माझ्या अनेक शिक्षकांच्या साठी वेळ काढून त्यांच्या सहवासात जात असतो. ते शिक्षक जेव्हा आठवणीने माझी चौकशी करतात तेव्हा मला मोहरून गेल्यासारखे वाटते. 
            परेल येथील क्षा.म.स. अध्यापक विद्यालयाचे व्ही.व्ही. पाटील सर आणि बोराडे सर हे माझे शिक्षक , माझे प्रशंसकही असल्याने मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आस्तेवाईकपणे चौकशी करीत असतात. पाटील सर सेवानिवृत्तीनंतर त्यानीच सुरू केलेल्या विठ्ठलवाडी येथील शाळेत व्यस्त असताना शाळेच्या कार्यक्रमात मला पाहुणा म्हणून बोलावतात तेव्हा त्यांच्यात आईचं ममत्व आढळतं म्हणूनच तर त्यांचं बोलावणं आलं की मी आत्मीयतेन  पळतो. तसंच काहीसं बोराडे सरांच्या बाबतीतही असल्यानं माझे मित्र वासिंदला राहणारे बाळा चव्हाण यांच्याकडे जायचो तेव्हा वासिंदच्या पश्चिमेला बोराडे सरांकडे वाकडी वाट करायचो पुढे त्यांनी पूर्वेलाच मेडिकल स्टोअर्स सुरू केल्यावर ते वाटेवरच भेटायचे. 
            सहा महिन्यांपूर्वी सरांचा मला फोन आला. त्यांच्या आवाजातला उत्साह कमी झाल्यासारखा वाटत होतं." सुभाष मी पुस्तक प्रकाशित करतोय त्याची प्रस्तावना तू लिहावीस असं मला वाटतं, मी ते छापखान्यात दिले पण माझ्याकडे मूळ प्रत आहे. मला आता प्रवास झेपत नाही तेव्हा तू इथे येऊन वाचलंस तर बरं होईल."
    .      स्वतःच पुस्तक प्रकाशित होणं यातला आनंद आणि त्यात पहिल्याच पुस्तकाचा आनंद म्हणजे बऱ्याच वर्षांनी आणि नवसाने गर्भधारणा झालेल्या बाईला होणाऱ्या आनंदासारखा असतो याची मला जाणीव असल्याने सरांच्या आनंदासाठी " मी येतो एक दिवस वेळ काढून" असं सांगितलं. 
        मी सरांकडे गेलो तेव्हा त्यांचे शरीर थकल्यासारखे वाटत होते. तसं पाहिलं तर ८६ च्या वयात आजकाल इतकं निरोगी जीवन म्हणजे कौतुकाचीच बाब आहे म्हणा. सरांची ठेंगणी शरीर एसटी आणि व्यायामाच्या सवयीन आलेला काटकपणा यामुळे काल-परवापर्यंत साठीच्या आसपास असल्यासारखे दिसणारे सर या वेळेला मात्र पुरुष वाटले गप्पागोष्टी करत चहापान झाले नव्याने काही केलेलं लहान मुलांना इतरांना दाखवण्यातला जो आनंद असतो तसाच काहीसा भाव चेहऱ्यावर आणून सरांनी पुस्तकाचं हस्तलिखित माझ्या हातात ठेवलं मला समोर मोडी लिपीतला दस्तऐवज असल्यासारखंच वाटलं काही पान चाळली घोटी मोखाडा मुंबई वासिंद हा प्रवास अधिक विस्तारलेला असणार याची जाणीव झाली सर एखाद्या उपक्रमाचा वृत्तांत आणि उपक्रमातल्या अनुभूतीसहित केलेलं वर्णन यात फरक असतो हे तर तुमचं आत्मवृत्त असेल तर त्यात वाक्यरचने बरोबर ते प्रवाही करण्यासाठी त्यावर संस्कार करणे गरजेचे आहे एखाद्या जाणकार लेखकाचे सहकार्य घ्यावे लागेल. 
      मी माझ्या पद्धतीने लिहिले तू काय तो बदल कर त्याला प्रस्तावना लिही आणि लवकर प्रकाशित करायचे आहे हे लक्षात ठेव. 
      मी अडचणीत सापडलो होतो पण काहीतरी करू असे ठामपणे सांगितले प्रकाशकाचा नंबर घेऊन त्याला पीडीएफ मला पाठवून द्यायला सांगून मी निघून आलो बरेच दिवस झाले तरी माझ्या हातात काही न आल्यामुळे मी काही करू शकलो नाही पुस्तकाचे साहित्य माझ्या हातात आल्यावर सरांच्या हातात पुस्तक पडले पाहिजे हे एकच महत्त्वाचे काम समजून एका रात्रीत जेवढे शक्य झाले तेवढ्या शुद्धलेखन दुरुस्त्या केल्या त्याचे जवळजवळ ऐसे ऐंशी फोटोग्राफ्स काढून पाठवले काही तोंडी सूचना दिल्या सोबत प्रस्तावना पाठवतो असंही सांगितलं. 
       आज-काल सरकारी फायदा मिळवण्यासाठीच जातीच्या प्रमाणपत्राची मागणी आणि मतांचा बाजार मांडणारे राजकारण याशिवाय कोणी एकमेकाला जात विचारत नाही आणि कुणाचं अडतही नाही त्यामुळे सरांची जात त्यांची हा प्रश्न सरांच्या कडे शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पडलेला नव्हता मला तर आज कळले की सर लोहार समाजाचे आहेत पण त्यामुळे माझी भूवरी सुद्धा खालीवर झाली नाही.
        सरांचे बालपण आई-वडिलांना सोडून रयत शिक्षण संस्थेच्या वस्तीगृहात गेल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जगण्यावर आहे पण वस्तीगृहातल्या मुलात भावंडांचे प्रेम आणि शिक्षकांत मायेचा ओलावा जेवढा मिळाला तेवढ्यावरच कुटुंब म्हणजे काय असते याचे संस्कार त्यांच्यावर झाले जगण्याचा परिघही तेवढाच मर्यादित राहिला त्यामुळे त्यांच्या लिखाणात कुटुंबातील व्यक्तीसाठी एखादं पान देऊन ते मोकळे झाले बालवयात वस्तीगृहातील मुलाने ज्या मुलाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवले तेच त्यांच्या आयुष्यात कामास आलेले दिसतात ज्या वस्तीग्रहाने त्यांना दुनियेत वावरण्यासाठी प्रकाश वाटा दिल्या त्याच वस्तीग्रहणे त्यांची चूक पदरात घेऊन त्यांच्या मर्जीने जगण्यास सताड दार उघड उघडून दिले नाही तर ते तिथेच राहून आपल्या वाट्याला आलेल्या वरिष्ठांच्या असुयांचे तीक्ष्णबाण टोचून घेत दिवस काढावे लागले असते. 
       सरांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचा मूळ गाव मोखाडा जन्म नाशिक मधल्या घोटी मधला लेखकाला लहान वयात हा आदिवासी बहुल भाग कसा होता याबाबत विस्तृत लिहिता आले असते पण या मातीने त्यांना तिथेच जास्त वेळ रांगो दिले नाही तर तिच्याबद्दलचे ममत्व कसे असावे शिकवण्याची ताकद नसल्यामुळे वस्तीगृहात प्रवेश मिळवण्यासाठी मुलांचा सांभाळ करायला कोणी नाही असे वडिलांनी सांगणे म्हणजे मुल आईशिवाय पोरके आहे हे सांगताना वडिलांचे काळीज हल्ले नसेल का? लेखकाच्या बालमनावर ओरखडा पडला नसेल का पण लेखक साहित्य लेखनापासून कोसो मैल दूर असल्याने ते प्रसंग रंगवण्याची जागा होती हे त्यांच्या गावीच नव्हते. 
      एक मात्र आहे पुस्तकात रयत शिक्षण संस्थेची बरीच माहिती मिळते शिक्षक या नात्याने कोणकोणते उपक्रम राबविले कुठे कुठे सहली काढिल्या यांची संख्या कळते त्यांच्या लोकल प्रवासातील मित्रांच्या सोबतीने सेवानिवृत्तीनंतर देश विदेशात कुठे कुठे फिरले याचा पाढा वाचायला मिळतो जगण्याचा आनंद कसा घ्यावा हेही त्यातून कळते. 
        लेखकाला शेवटी जगण्याच्या आनंदात किमान आपली पत्नी तरी असावी याची जाणीव होऊन काही सहली पत्नीसोबत केल्याचा उल्लेख करतात तर आईची पंच्यात्तरी व वडिलांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न करून मुलांनी व्यक्त केलेली आई वडिलांच्या बाबतीतील कृतज्ञता सुसंस्कारी परिवार सर्वांच्या आजरास पात्र ठरला आहे तीच मुले वडिलांचे पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत यावरून खडकावरचा अंकुर स्वतःच्या हिमतीवर वृक्ष झाला आणि मुलांच्या रूपाने सुगंधित फुले मिळवू लागला आहे हे पुस्तक आपणास आवडेल अशी खात्री बाळगतो.

सुभाष लाड

Wednesday, July 10, 2024

संकटातही संधी शोधणारा महायोद्धा !

         युद्ध केवळ रणांगणावरच खेळले जाते असे नाही तर माणसाचं आयुष्य हे सुद्धा एक रणांगण आहे. या रणांगणावरही क्षणाक्षणाला छोटी मोठी युद्धे लढावी लागतात. जो या युद्धांकडे पाठ फिरवून पळू लागतो तो जीवन जगण्यासाठी लायक असत नाही तर या छोट्या मोठ्या संकटांना छातीवर झेलून त्यांच्याशी युक्तीने-शक्तीने दोन हात करत त्यांना परतवून लावतात. त्यात ते स्वतः विजयी होतात पण त्या विजयातूनही अनेकांना संघर्षात जमिनीवर पाय रोवून कसे लढावे याचे धडे देतात, त्यातून जगण्याची नवीन आशा पल्लवीत करण्याची हिम्मत देतात ती माणसे इतरांसाठी महायोद्धे ठरतात. असे अनेक महायोद्धे आपल्या आजूबाजूला असतात परंतु आपण आपल्या स्वतःभोवती टाकून घेतलेल्या वलया बाहेर डोकावून बघत नाही. मग आपल्याला अशा योद्धांची माहिती कशी मिळणार? वास्तविक ज्यांच्या परिघात अशी वेगवेगळी अनुभव संपन्न माणसं असतात तीच माणसं आपलं आणि समाजाचे जीवन फुलवतात.' मागच्यास ठेच पुढचा शहाणा ' ही म्हण अशावेळी सार्थ होते.
         मी मुंबईला पहिला आलो तो १९७७ ला. ठाण्याच्या एसटी स्थानकात आमचा प्रवास संपला. तिथून मी रेल्वेने सायनला आलो. कोंडग्यातील बळीराम बारस्कर हे  त्या वेळेला सोबत होते. त्यांचे वास्तव्य मुंबईतच असल्याने त्यांना मुंबईची सर्व माहिती होती. त्यानंतर अनेक वेळा ठाण्यामध्ये जाण्याचा राहण्याचा प्रसंग आला परंतु मी ज्या वेळेला ' ध्येयसाधना ' हे पुस्तक वाचलं तेव्हापासून ठाणे हे माझं आहे, ठाण्याच्या विकासात माझ्या मातीतल्या माणसाचा मोठा हातभार आहे याचा मला अभिमान वाटत आलेला आहे.
 ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर रिक्षा थांबा असून शेकडो रिक्षा तिथे रांगेने सेवा देण्यासाठी उभ्या असतात. मी सुद्धा रांगेत उभा राहिलेला आहे आता मात्र मला ठाण्यातली रिक्षा दिसली की, आठवतं ते १९६८ चे वर्ष. याच वर्षी ठाण्यामध्ये प्रथमत:च दहा रिक्षांना परमिट देण्याची ठाणे आर. टी. ओ. ची योजना निघाली. तोपर्यंत आज जिथे रिक्षा उभ्या राहतात त्या ठिकाणी टांग्यांची गर्दी असायची.रेल्वेतली चांगल्या पगाराची व सन्मानाची नोकरी असूनही आपण स्वतंत्र व्यवसाय करावा या विचाराने पछाडलेले श्री.वामन अनंत प्रभूदेसाई यांनी ते परमिट मिळवले. भांडुप मध्ये  आज जिथे ड्रीम मॉल बंद अवस्थेत आहे त्या जागी ए.पी.आय कंपनी होती. त्यामध्ये तीन चाकी रिक्षांची निर्मिती व्हायची.  त्या कंपनीचे मुख्य वितरक मि.दादाजी धाकजी आणि कंपनी.हे गिरगावात ऑपेरा हाऊस जवळ होते. कंपनीतून मिळणाऱ्या इंजिनाच्या सांगाड्याला सुसज्ज रिक्षाचे स्वरूप देण्याचे काम पुण्यामध्ये होत असे. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा पुण्यालाच उपलब्ध होते.रिक्षाची किंमत त्यावेळी ६५०० रु. होती.रेल्वेची सतरा वर्षांची नोकरी सोडल्यानंतर  ग्रॅच्युइटी, भविष्य निधी  मिळून मिळालेल्या नऊ हजारातून देणी देऊन सहा हजार रुपये शिल्लक होते. प्रत्यक्ष रिक्षा रस्त्यावर येईपर्यंत अनेक समस्यांतून प्रवास करावा लागला परंतु संकटाला संधीच्या रुपात पाहणारे प्रभूदेसाई आपल्या ध्येय निश्चितीपासून दूर जात नाहीत किंवा त्यांच्या मनाची स्थिती ढळू देत नाहीत हे व्यवसायात उतरु पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे.
         ठाण्यात प्रवासी ऑटोरिक्षा प्रथम आणणाऱ्या प्रभूदेसाईनी मालवाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा सुद्धा ठाण्यात प्रथम आणली. तसे मोटारगाडी ही धक्का मारूनच चालवावी लागते असा समज असलेल्या प्रभूदेसाईंनी वीस वर्षाची जुनी गाडी घेऊन परमिट काढण्यासाठी आरटीओ चा रस्ता धरला. आपल्याला एखाद्या क्षेत्रातील ज्ञान नाही याचं व्यंग बाळगून न बसता ते ज्ञान मिळवून त्या क्षेत्रात पुढे जाण्याची हिंमत ठेवणारे प्रभुदेसाई यांनी  पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या चार चाकी प्रवासासाठी वापरल्या, टेम्पो घेतले एवढेच काय तर रेल्वेच्या माल उचलणाऱ्या क्लिअरिंग क्षेत्रात दहा पंधरा ट्रक लावून एक चांगला व्यवसायिक म्हणून जम बसविला.
         मुंबईला चुलत मामांच्या आसऱ्याने दादर येथे वास्तव्य करताना वामनरावांना गॅलरीतल्या सार्वजनिक संडास बाथरूमच्या ओट्यावरती पथारी टाकून रात्र काढावी लागत होती. पुढे ठाण्याला आल्यानंतर भाड्यांच्या खोल्यात राहून त्यांनी दिवस काढले. रेल्वेतली महिना १२०० रुपयाची नोकरी करून काटकसर करून जमलेल्या पैशातून कदाचित त्यांना दहा बाय दहाची खोली घेता आली असती परंतु वामन प्रभुदेसाई यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाच्या जोरावर १९८० मध्ये ठाण्यातल्या धोबी आळीत दोन हजार दोनशे स्क्वेअर फुटाचे स्वतःच्या मालकीचे घर बांधलं.
          देशातल्या पहिल्या पाच मध्ये गणल्या जाणाऱ्या सहकारी बँकांमध्ये ठाणे जनता सहकारी बँकेचा नंबर आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा राज्यातून१४१ शाखांमध्ये विस्तारलेल्या या सहकारी बँकेच्या संस्थापक सदस्यांमध्ये वामनराव प्रभूदेसाई हे अग्रभागी होते. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेला सुरुवातीपासून काही अलिखित नियम करून तिचा कारभार नेहमीच पारदर्शी राहील असा प्रयत्न केला गेला. संचालक मंडळाने कर्मचारी पदे भरताना केवळ गुणवत्ता हा आधार धरूनच भरती करावी, संचालकाने आपण बँकेचे मालक नसून विश्वस्त आहोत असा विचारून काम करणे आवश्यक आहे हे नियम काटेकोरपणे पाळले गेले त्यामुळे या बँकेचा लवकरच नावलौकिक निर्माण झाला.आपल्याल कोणते तरी पद मिळाले पाहिजे म्हणून वामनरावांनी कधीही  काम केले नाही.तसेच संचालक पदाच्या शर्यतीमध्येही ते कधीच नव्हते. त्याबाबत "कुठलेही पद सर्वमान्य भूमिकेतून मिळाले तर त्याची उंची वाढते. हव्यासातून मिळवलेले पद फार काळ टिकत नाही शिवाय अनेकांशी शत्रुत्व पत्करावे लागते आणि तो पिंड माझा नाही पदाची अपेक्षा न करता काम करण्यात मला जास्त आनंद मिळतो." हे विचार वामनरावांचे होते.  कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या वामनरावांना १९८१ पासून पुढील १३ वर्ष  संचालक पद आणि अध्यक्षपद ही भूषवायला मिळाले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्या बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला पाहिजे हे वामनरावांचे स्वप्न होते. मात्र एकतीस कोटींची ठेव असलेल्या या बँकेला ५० कोटी पर्यंत ठेवी वाढवणे आवश्यक होतं. उपक्रम हाती घेतल्यापासून पुढील नऊ महिन्यात बँकेच्या ठेवी ५५ कोटी मध्ये पर्यंत नेण्याचं काम सर्वांच्या मदतीने करण्यात आलं. त्यासाठी पुढाकार घेतला तो वामनराव प्रभुदेसाई यांनी. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असा शिक्का आपल्यावर लागू नये म्हणून प्रभूदेसाई यांनी स्वतःच कोटी मध्ये ठेवी आणण्यावर भर दिला. १९९० ला ठाणे जनता सहकारी बँकेला शेड्युल्ड बँक म्हणून दर्जा  मिळाला.केवळ मॅट्रिक पर्यंत शिक्षण असलेल्या वामनरावांची बँकेतील कामगिरी कौतुकास्पद नाही काय?
( उत्तन येथील केशव सृष्टीचे विहंगम दृश्य)

        एखाद्या संस्थेचे अध्यक्ष पद भूषवताना त्या पदाला गरिमा प्राप्त करून देण्यासाठी त्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याचा वस्तूपाठ वामनराव प्रभूदेसाई यांनी उत्तन येथील केशवसृष्टीचं अध्यक्षपद भुषवल्यानंतर त्या ठिकाणी केलेल्या कामातून दाखवून दिला आहे. एखादा विकासात्मक उपक्रम राबवायचा ठरवल्यास त्याची सुरुवात आपल्याच खिशात हात घालून करावी लागते तेव्हाच अनेक दाते पुढे येतात याचा चांगला अनुभव वामनरावांच्या गाठीशी असल्यामुळे त्यांनी लाखो रुपये केशवसृष्टीच्या विकासासाठी खर्च केलेले दिसून येते. त्याचबरोबर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देताना वेळ, काळ आणि धन हे खर्च करावे लागते हे त्यांच्याच संकल्पनेतून सुरू झालेल्या मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या कामातून त्यांनी दाखवले. त्यांच्याकडे असलेल्या संघटनचातुर्यामुळे अल्पावधीतच मध्य रेल्वे कर्मचारी संघ हा राष्ट्रव्यापी होऊन त्या संघाचे जनरल सेक्रेटरी होण्याचा मान सुद्धा वामनराव प्रभूदेसाईंना मिळाला. 
         सतत कार्यमग्न राहणारी व्यक्ती कधी रिकामी राहू शकत नाही. त्याचे रिकामेपण हे वेगळा कामाचे चिंतन असू शकते. वामनरावांनी पाणी शुद्ध करणाऱ्या पावडरची निर्मिती केली. त्या पावडरचा व्यापार एअर इंडियात होत होता. शिजवलेले अन्न पदार्थ गरम राहण्यासाठी भांड्याखाली सतत जळत असणारी ब्ल्यू फेमची निर्मिती  केली. त्याचा व्यापार ताजमहाल सारख्या बड्या हॉटेलमध्ये केला जात होता.अशातच तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी स्त्रियांचे होणारे कष्ट कमी करावे यासाठी पितांबरीची निर्मिती झाली. ही पावडर उपयुक्त आहे हे अनेक लोकांच्याकडून टेस्ट करून आले. परंतु ती पावडर कोणी दुकानदार आपल्या दुकानात ठेवू इच्छित नव्हता पण म्हणून वामनराव हताश झाले नाहीत. विक्रीसाठीच्या नवनवीन कल्पना राबवून अल्पावधीतच मुंबई पुण्यासारख्या शहरात त्यांनी  पितांबरी ला विश्वसनीय ब्रॅन्ड बनविला. वामनरावांच्या सगळ्याच उद्योगात त्यांच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य होते. त्यांची धडपड त्यांचा मुलगाही पाहत होता. १९८३ ला त्यांचा मुलगा पदवीधर झाला. त्यालाही एखादी नोकरी चांगली मिळाली असती परंतु व्यवसाय करण्याचे संस्कार घराण्यातून आलेले असल्याने त्यांनीही वडिलांच्या उद्योगात सहभागी होण्याचे ठरवले. विशेषत: पितांबरीची जबाबदारी स्वीकारली.त्यांनी पितांबरीला व्यावसायिक बैठक मिळवून देतानाच प्रसार माध्यमांचा खुबीने उपयोग करीत ती सर्वश्रुत केली.वामनरावांनी या उद्योगातून स्वतः निवृत्ती घेताना २००१ साली पितांबरीची वार्षिक उलाढाल तीन कोटीची होती. त्यांच्या मुलाने ती लवकरच तीस कोटीवर नेऊन ठेवली याचा आनंद व्यक्त करताना वामन रावांनी आपल्या मुलाचं कौतुक करताना तो केवळ सक्षम नाही तर कर्तबगारही आहे हे प्रांजळपणे मान्य केले. एखादा बाप आपल्या मुलाबद्दल मी समाधानी आहे हे उद्गार काढतो त्या वेळेला तो खऱ्या अर्थाने सुखी असतो, आनंदी असतो. 
( एकेकाळी कोकणातील शिक्षण पंढरी असलेले राजापूर हायस्कूल)
           राजापुरातल्या तळवडे गावी स्वातंत्र्यपूर्वकालात जन्मलेले वामनराव इयत्ता चौथी पर्यंत गावात शिकले. पुढील शिक्षणासाठी त्यांना राजापुरात जावं लागले. तिथेच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या शाखांमध्ये राष्ट्र प्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या चौदाव्या वर्षी राजापूर ते पुणे व्हाया कोल्हापूर असा एकट्याने प्रवास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला त्यांनी हजेरी लावली. राजापुरात मॅट्रिकची परीक्षा देऊन ते मुंबईत आपल्या मोठ्या भावाकडे आले. कोकणातील माणूस मुंबईत येतो तो चाकरमानी होण्यासाठीच. परंतु वामनरावांना नोकरी करणारा चाकरमानी बनायचं नव्हतं तर एक व्यावसायिक उद्योगपती बनायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. जे ध्येय मनाशी बाळगले होते त्या ध्येयाकडे जाण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करीत राहिले. वडिलांकडून घेतलेले कष्टाचे संस्कार त्यांना स्वतःचे जीवन घडवताना उपयोगी आलेच परंतु ते संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास सुद्धा ते यशस्वी ठरले. ज्या मातीत आपण जन्मास आलो त्या मातीचे ऋण कधीही फेडू शकत नाही परंतु ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला त्या मातीत जाऊन त्या मातीशी एकरूप होण्याची संधी सोडायची नाही या विचाराने भारावलेले वामनराव शेवटचा श्वास घेईपर्यंत  प्रत्येक वर्षी गावातल्या दत्त जयंतीच्या उत्सवात उपस्थित राहिले. आनंद देत घेत राहिले. तोच संस्कार आज
 त्यांच्या मुलाकडे अर्थात मा. रविंद्रजी वामनराव प्रभूदेसाई यांच्याकडे आलेला आहे. पितांबरी हा उद्योग केवळ भारतातच नाही तर जगातल्या सतरा देशांमध्ये पसरलेला आहे त्या वटवृक्षाची फळे हजारो कुटुंबे चाखताहेत. अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांना आज त्यांचा हातभार मिळतो आहे. 
( तळवडे येथील श्री दत्त मंदिर, इथे पाच दिवस उत्सव असतो.)
        आज कोकण भकास होत असताना, कोकणातील घरे बंद होत असताना, कोकणातील तरुणाने उद्योजक बनलं पाहिजे, व्यावसायिक बनलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे. हे कसं शक्य आहे ? याचे उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर  आपल्याच मातीतल्या, आपल्या मातीवरती प्रेम करणाऱ्या व यशस्वी उद्योजक म्हणून लौकिक प्राप्त झालेल्या स्व.श्री. वामनराव अनंत प्रभूदेसाई यांचे ध्येय साधना हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तकाचे शब्दांकन सौ.श्वेता गानू यांचं असून सुश्रेय प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे..
        मला जिंकायचं आहे या ध्येयाने पछाडलेला वीर योद्धा रणांगणावर उभा राहतो, त्यावेळेला चारही दिशेने होणाऱ्या माऱ्याचा त्याला तेवढ्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने  सामना करायचा असतो. एक समर्थ उद्योजक म्हणून उभे राहताना असेच बरे वाईट प्रसंगांना सामोरे जातांना आपली इच्छाशक्ती तसूभरही ढळू न देता तसेच चार पैसे हातात आले म्हणून आनंदाच्या भरात उधळून न लावता त्याचे योग्य नियोजन करावे लागते.आपला व्यवसाय अधिक पुढे कसा वाढेल याचे आडाखे बांधून उद्योजकांना पुढे जायचं असतं. वामनरावांचे ' ध्येयसाधना ' हे पुस्तक तरुण उद्योजकांना त्यांच्या ध्येयाप्रती वाटचाल करण्यासाठी  दीप होऊन प्रकाश देईल याची खात्री वाटते.
धन्यवाद.


सुभाष लाड 
अध्यक्ष 
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
(याच इमारतीत वामनरावांनी सतरा वर्षे सेवा केली व इथेच मध्य रेल्वे कर्मचारी संघाची स्थापना केली.)
( तळवडे येथील लाकडी बनावटीच्या दत्त मंदिराचा आतील भाग )
()