सह्याद्रीच्या पायथ्याशी सह्याद्रीला खेटूनच वसलेल्या कुरंग गावचे उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तोरसकर यांच्या मातोश्रींचं नुकतंच त्यांच्या वयाच्या ८७ व्य वर्षी दुःखद निधन झालं. शिमग्याच्या निमित्ताने मी गावाकडे असल्यामुळे मला ती वार्ता तात्काळ करू शकले नाही. मी मुंबईला आल्यानंतर गणेश चव्हाण आणि रमेश काटकर हे काही कामानिमित्ताने माझ्याकडे आले असता त्यांच्याकडून प्रकाश पुरस्कारांची आई निवर्तल्याचे कळले. दोन दिवसांपूर्वी माझ्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असल्यामुळे माझ्या बाहेर फिरण्यावरती निर्बंध आले असल्याने संध्याकाळची वेळ साधून गणेश चव्हाण यांच्याबरोबर आम्ही जोगेश्वरीला पोहोचलो. रमेश काटकर यांचे कार्यालय अंधेरीला जवळच असल्याने तेही तिथे येऊन पोहोचलो.
जोगेश्वरी पूर्वेला मजासवाडी भागातील गुंफा रोडवर शंकर मेस्त्री चाळीतील एका प्रशस्त खोलीत प्रकाश तोरस्कर यांचे कुटुंब राहते.याच चाळीत अजुनही एक खोली असल्याचे त्यांच्याकडून कळल्याने माझ्या भूवया वरती गेल्या आणि मी त्यांना बोलतं केलं. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई हातात आणण्याचे कसब असते असे नाही.त्यामुळे मुंबईत हयात घालवूनही अनेकांना आपल्या मालकीचा निवारा करता आलेला नाही.इथे तर १९५४ सालात प्रकाश यांचे वडील रामचंद्र तोरस्कर यांनी स्वतःची खोली घेतली आणि मुलगा कर्ता झाल्यानंतर त्यांने आपल्या हिंमतीवर आणखी एक खोली घेतली.आज तो भाग चांगल्या सुविधा युक्त असलातरी १९५४ सालात तो भाग म्हणजे आदिवासी पाड्यासारखा होता.त्या काळात तो मुंबईबाहेरचा प्रदेश होता.
मुंबई महानगरपालिकेची स्थापना १८६५ मध्ये झाली आणि आर्थर क्रॉफर्ड ( क्राॅफर्ड मार्केट ही त्यांची आठवण करून देते )यांना पहिले महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीे. सुरुवातीला महानगरपालिका गिरगाव रोडच्या शेवटी असलेल्या एका साध्या इमारतीत होती. १८७० मध्ये ती एस्प्लानेड येथील वॉटसन हॉटेल आणि ससून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट दरम्यानच्या इमारतीत हलवण्यात आली, जिथे सध्या आर्मी अँड नेव्ही इमारत आहे.सर फिरोजशहा मेहता यांनी मुंबई महानगर पालिकेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. १८७२ मध्ये त्यांनी बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार केला, ज्यामुळे त्यांना "बॉम्बे म्युनिसिपालिटीचे जनक" म्हटले जाते. १८८८ मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्टने १८७२ च्या अधिनियमाची जागा घेतली. मुंबई महानगरपालिकेचा जन्म झाला. त्यावेळेला मुंबई ही पूर्वेकडे शिव या गावापर्यंत तर पश्चिमेकडे माहीम या भागापर्यंत सीमित होती.
मुंबईतील वस्ती वाढत असताना दिसते त्याला कारण इथे रोजगार उत्पन्न करणार्या कापड गिरण्या तयार झाल्या.७ जुलै १८५४ रोजी मध्ये ताडदेव येथे बाॅम्बे स्पिनिंग ॲण्ड विव्हिंग मिल कावसजी नानाभाई दावर या उद्योगपतीने सुरू केली पुढे १९०० पर्यंत यांची संख्या १२५ पर्यंत पोहोचली.लालबाग,परळ,लोअर परळ या भागात सगळीकडे गिरण्यांच्या चिमण्या धूर सोडताना आणि कामगारांना प्रवेश देणारे भोंगे वाजवतांनां दिसत होत्या.एकेका मिल मध्ये हजारोंनी कामगार काम करीत होते त्यामुळे या भागाला गिरण गाव म्हणत होते.कोकणातल्या गाव खेड्यातल्या हाताशी आलेल्या तरुणांना या गिरण्यांचेच आकर्षण होते.तसेच कुरंग गावचे रामचंद्र तोरस्कर कुणाच्या तरी सोबतीने राजापूरच्या खाडीतून व मुसाकाजी बंदरातून मुंबैस आले.
एवढ्याशा मुंबईत दरदिवशी हजारोंनी येणाऱ्या बाहेरील लोकांना रोजगार मिळत होता पण राहण्यासाठी जागा कमी पडू लागली आणि आज जसे मुंबईतील मराठी माणूस कल्याण कर्जत आणि विरार पर्यंत पोहोचला तसा तसा मुंबईतला कामगार निवारा शोधत इकडे वांद्रे आणि तिकडे कुर्ल्याच्या दिशेने जाऊ लागला.१९०० च्या दरम्यान मुंबई बाहेर पडण्याची सुरुवात झाली आणि ठाणे जिल्ह्यातील साष्टी बेटावरील वांद्रे, अंधेरी, घाटकोपर कुर्ला या भागात बर्यापैकी वस्ती झाली.वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, मालाड, गोरेगाव, बोरिवली आणि घाटकोपर यांसारख्या भागांचा विकास १९२० ते १९३० च्या दशकात 'उपनगरे' (Suburbs) म्हणून होऊ लागला होता. १९३० च्या दशकापर्यंत या भागांमध्ये नगरपालिका स्थापन झाल्या होत्या. ( राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे प्रथम अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव चव्हाण हे कुर्ला नगरपालिकेमध्ये सुप्रीटेंडेंट या पदावरती होते पुढे ज्यावेळेला कुर्ला नगरपालिका मुंबईला जोडली गेली त्यावेळेला त्यांना मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्यात आले )१९५० मध्ये, मुंबई शहराची हद्द वाढवून त्यामध्ये उपनगरीय नगरपालिका आणि साष्टी (Salsette) बेटावरील काही गावांचा समावेश करून 'बृहन्मुंबई महानगरपालिका' (Greater Bombay Municipal Corporation) स्थापन करण्यात आली. १९५७ मध्ये अंधेरी आणि बोरिवली तालुके पूर्णपणे महापालिकेच्या अखत्यारीत आले.आणि मुंबईची बृहन्मुंबई असे नामकरण झाले.
याच दरम्यान जोगेश्वरी येथे आलेल्या रामचंद्र तोरसकर यांनी मोकळ्या जागेवर झोपडी उभारली आणि सोबत गावच्या घरच्या परसदारी झाडे लावतात तशी सुंदर बागही तयार केली.पण त्यावेळच्या गावगुंडांनी त्या टेकडीवर जमेल तशा झोपड्या बांधल्या आणि त्यांची बाग गेली. आज तिथे इमारत होत आहेत त्यामुळे आता त्या नगराचा नक्शाही बदलेल.
स्व.राम़चंद्र तोरस्कर एकत्रित शेतकरी कुटुंबात जन्मले.शेती हाच आपला खरा व्यवसाय असल्याने लहानपणापासून ते शेती करीत होते.खाणारी तोंडे जास्त आणि राबणारे हात कमी असतात तेव्हा शेती बरोबर कुणी तरी मुंबईत नोकरी करुन गावाला पैसे पाठवावे हा कोकणचा शिरस्ता तोपर्यंत पक्का झालेला असल्याने तरुण वयातच त्यांनी मुंबईचा खडतर प्रवास केला. मुंबईत गिरणी नोकरी करुन मुंबईत जम बसवला पण वाडवडिलांकडून आलेली जमीन आपण कसवली पाहिजे म्हणून पत्नी आणि मुलांना गावातच ठेवले. त्यामुळे प्रकाश यांचे प्राथमिक शिक्षण कुरंग येथे व माध्यमिक शिक्षण कोंडगे गावात झाले.
मुंबईत येऊन त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करून इंटेरियर डेकोरशन चा व्यवसाय सुरू केला.त्या व्यवसायात जम बसल्यावर पाठच्या भावाचा विचार करून या व्यवसायाला जोड म्हणून ट्रॅव्हल कंपनी सुरू केली.हा हा म्हणता त्याही व्यवसायात प्रगती होत असताना प्रिय बंधूंचे अपघाती निधन झाले. पण दु:ख करून व्यवसाय चालवता येणार नव्हता आणि सिटी बॅकेचे इंटेरियरचे काम वेगवेगळ्या राज्यात करणे कठीण झाल्याने ट्रॅव्हल च्या व्यवसाय चालवणे गरजेचे झाल्याने पुन्हा नव्याने काम सुरू केले.पण कोरोनाच्या महामारीने कंबरडेच मोडले.चारचाकीसहीत बस असा चाळीस गाड्या आणि शंभराच्या आसपास कर्मचारी एवढा मोठा व्याप झपकन जाग्यावर बसला. वर्षभर एकाच ठिकाणी ठेवलेल्या गाड्या कुणी विकतही घेईंना त्यामुळे गाड्या भंगारात विकून आणि जवळचा पैसा पुढे करून बॅंकाची देणी भागवली.पण पुढे काय हा प्रश्न होताच.आतल्या रस्त्याला लागून असलेला एक गाळा भाड्याने घेतला आणि कोकणात मिळणारी फळे आणि फळ प्रक्रियेतून तयार केलेले पदार्थ विकायला सुरुवात केली.
शेतीत आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मातोश्री सत्त्याऐंशी वर्षे निरोगीपणे जगल्या.शिमग्याची पालखी शिंपणं पडून देव देवळात शांतपणे विराजमान झाले. प्रकाश मुंबईत आले आणि मातोश्रींनी चालता बोलता अखेरचा श्वास घेतला.मरणाला काहीतरी कारण लागत तसा हृदयविकाराचा तिव्र झटका आला.उपचारालाही वेळ दिला नाही.त्याचा सल लागून राहिला.
वहिनींनी दिलेला चहा घेऊन बाहेर पडलो.सोबत प्रकाशही बाहेर पडले." आता आला आहात तर दुकान ही बघून चला " असे म्हणाले म्हणून दुकानात आलो.इंजिनिअर होऊन नोकरी करणारा त्यांचा मुलगा मानस घरी आल्यावर दुकानात बसतो हे प्रत्यक्ष पाहिले आणि मला कौतुक वाटलं.फारसं शिक्षण नसतानाही वडिलांच्या व्यवसायात मदत करायला आजच्या तरुणाईला लाज वाटते.कष्टाचं काम असेल तर घरचा पोरगा भैय्याला कामाला बोलावेल पण आपण हात लावणार नाही हे मराठी माणसाचं दु:ख आहे.म्हणुनच रत्नागिरी आंब्यांच्या बागेत काम करणाऱ्या नेपाळी लोकांची संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे.मी मनापासून मानसचे कौतक केले. हा मुलगा भविष्यात गडगंज पैसा कमवेल याबद्दल मला शंका नाही.
दुकानात कच्च्या काजू बीया आहेत. त्या रिंगणे ,कोंडगे, कुरंग ,आरगाव, परुळे अशा गावातून मुंबईला येतात. या काजू बिया दोनशे रुपये किलो या भावाने येथे विकल्या जातात. जवळची कुठे मागणी असेल तर ते घरपोचही करतात. प्रकाश तोरस्कर यांनी स्वतःचा व्यवसाय उभारताना आपल्या मातीतल्या माणसांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी केलेला हा जुमला त्यांचे आपल्या माय भूमीवर किती प्रेम आहे हेच दाखवतो. विशेषता कोकणी माणसाला रविवारच्या मांसाहारी जेवणानंतर सोलकढी आवडीने पिण्याची सवय आहे. यांच्या दुकानात ताजी ताजी रुचकर सोलकढी बनवून दिली जाते. कोकणी माणसाने कोकणी माणसाला हात द्यायला हवा. प्रकाश पुरस्कार आणि कोकणातल्या मातीतला माल मुंबईत आणलाआहे. मुंबईतल्या कोकणी माणसाने प्रकाश तोरस्करांच्या दुकानातला माल आपल्या घरी आणून कोकण भूमी वरचे प्रेम सिद्ध करावे यासाठीच डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन केलेले असल्याने मला मोबाईल जास्त वेळ बघण्याचा मज्जाव असतानाही कच्च्या काजू बियांचा मौसम संपण्या अगोदरच ( प्रकाश तोरस्करांना याबद्दल काहीच माहिती नाही ) त्यांची प्रसिद्धी करावी म्हणून हा मी केलेला अट्टाहास. संकटांचा सामना करूनही न डगमगणारा, कोरोना काळातही बँकांची देणी वेळेतच देऊन आपली पत सांभाळणाऱ्या आणि निष्ठेने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रकाश तोरस्कर यांना सलाम करावा या हेतूने हा अक्षर प्रपंच.
चला हाताला हात देऊया l कोकणी माणसाला रोजगारात पुढे आणूया Il
आपला
सुभाष लाड. अध्यक्ष राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई.
No comments:
Post a Comment