आपल्या कोकणवाशीयांचा आवडता सण गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणात गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी झाली आहे. गेल्या वीस वर्षात आपल्या चाकरमान्यांच्या दारात चार चाकी वाहने गर्दी करू लागली आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा हम रस्ता गणपतीपूर्वी चार दिवस आणि गणपती विसर्जनानंतरचे चार दिवस वाहनांनी भरून जातो. मात्र महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर या वाहनानी आपला मार्ग मुंबई पुणे रस्त्यावर वळवला तो पुढे मुंबई गोवा हम रस्ता नव्याने बनवण्याच्या नावाखाली गेली 14 वर्षे रखडलेला असल्यामुळे आज सुद्धा ही वाहने मुंबई पुणे मार्गेच येतील. आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन प्रवास सुखाचा करावा ही विनंती.
मुंबई- पुण्यातील किंवा अन्य शहरांमध्ये असणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठीच्या गाड्यांचे आरक्षण केले असेलच. काहीजण लोकप्रतिनिधीने पाठवलेल्या गाड्यातून प्रवास करतील तर काहीजण आयत्यावेळी सुद्धा सार्वजनिक वाहनांमधून गर्दी करून येतीलच. गणपती सणासाठी काय काय घेऊन जायचं याच्या याद्या करत आहेत. काही लोक तर सर्व वस्तू खरेदी करून बोजा बांधून तयार राहिलेले आहेत. या सर्वांना येत्या गणपती उत्सवाच्या माझ्या मनापासून भरभरून शुभेच्छा !
मित्रांनो आपल्या कोकणातील गावं माणसाविना ओस पडू लागलेली आहेत हे माझं वाक्य अतिशयोक्ती वाटेल तरीही मी पुन्हा ते धाडसाने म्हणेन कारण आज प्रत्येक गावामध्ये निम्म्यापेक्षा जास्त घरे हे बंद अवस्थेत आहेत. उघड्या असलेल्या घरांमध्ये वयोवृद्ध राहत आहेत आणि अगदी अल्प प्रमाणात तरुणाई राहत आहे. याचा परिणाम शाळा कॉलेजांवर झालेलाच आहे. अगदीच कमी पटाच्या शाळा आज ना उद्या बंद पडतील अशी अवस्था आहे. भारमान नाही म्हणून गाव खेड्यात जाणाऱ्या एसट्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. निसर्ग संपन्न कोकणातील ही अवस्था चिंतेची आहे. एका गावात घरांची संख्या 300 च्या वर आहे मात्र या सर्व घरांत केवळ बत्तीस माणसं राहतात ही वस्तुस्थिती किती अस्वस्थ करणारी आहे. हे चित्र काही प्रमाणात का होईना आपल्याला बदलायला हवंय म्हणून गणपती उत्सवाला जाणाऱ्या सर्व चाकरमान्यांना मी विनंती करीत आहे.
ज्या गावांमध्ये आजही काही किराणामालांची दुकाने सुरू असतील तर ती उद्या काही वर्षाने सुद्धा ती सुरू राहावीत आणि आपण गावी जाऊ त्या वेळेला आपल्याला हव्या असलेल्या किराणा वस्तू घराजवळ मिळाव्यात अशी जर इच्छा असेल तर आपण गणपती उत्सवाकरीता गावाला जाताना बोजा बांधताना दहा वेळा विचार करा. मी माझ्या बोज्यामध्ये घेतलेली वस्तू ही गावातल्या दुकानदाराकडे मिळते का ? जर ती मिळत असेल तर ती आपण मुंबई मधून किंवा ज्या शहरातून तुम्ही निघणार आहात तिथल्या दुकानातून घेऊन गावाला येऊ नये.ज्या ज्या वस्तू आपल्या गावच्या दुकानात सहज उपलब्ध होत आहेत त्या आपण गावाकडे येऊनच खरेदी करायच्या आहेत. जर आपण अगदीच गणपती उत्सवाच्या तोंडावर येणार असाल व दुकानदाराकडे जाऊन माल खरेदी करण्यास वेळ नसेल तर आपण त्या दुकानदाराला फोनवरून संपर्क साधून आपली यादी त्याच्याकडे पाठवा. त्याला सांगा माझ्या या वस्तू बांधून ठेव आणि ज्या दिवशी मी गावाला येणार आहे त्यावेळेला त्या माझ्या घरी पोहोचत्या कर किंवा ते दुकान आपल्या वाटेवरच असेल तर थोडा वेळ तिथे थांबून तुमच्या बांधलेल्या वस्तू सोबत घेऊन आपण आपल्या घरी जावे. हे का सांगतोय ! एक तर हे दुकान चालवणारे ते वयस्कर असतील किंवा तरुण असेल त्यांनी मुंबई पुण्याला न जाता याच गावामध्ये दुकान व्यवसाय सुरू केला किंवा सुरू असलेला पुढे चालू ठेवला. त्यामुळेच आपल्याला नित्याच्या लागणाऱ्या वस्तू आपल्या घराजवळ मिळत आहेत. उद्या त्या दुकानदाराची योग्य ती विक्री झाली नाही तर त्याला आवश्यक तो फायदा मिळणार नाही त्यामुळे त्याला आपले दुकान बंद करावे लागेल. जर का ते दुकान बंद झालं तर एवढ्या एवढ्याशा गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पाच पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागेल .आज असलेली सुविधा उद्याही हवी असेल तर निदान आपण उत्सवांपुरता का होईना मग तो गणपती उत्सव असेल, दिवाळी सण असेल, दसरा असेल, शिमगा असेल किंवा उन्हाळी सुट्टीत आपण गावाकडे जात असाल त्या त्या वेळेला आपल्या घरात दैनंदिन जेवणा खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपण गावच्या दुकानातून खरेदी कराव्यात ही माझीआपणांस कळकळीची विनंती आहे.
आपल्या गावाकडच्या दुकानात कोणत्याही वस्तू महाग मिळतात असं आपण म्हणाल याची मला जाणीव आहे. पण मित्रांनो आपल्या गावाकडचा दुकानदार आपल्या गावात वस्ती किती आहे, आपल्याकडे किती माल खपणार आहे याचा अंदाज करून तेवढाच माल तो घेऊन येत असतो. त्याला दहा किलोला जेवढा प्रवास खर्च द्यावा लागतो तेवढाच 50 किलो ला द्यावा लागतो मात्र तो जेव्हा 50 किलो माल घेऊन येतो तेव्हा त्याला विक्री करताना जास्त रक्कम आकारण्याची गरज पडत नाही परंतु तो दहा किलो आणतो त्या वेळेला त्याला विक्री वरती काही रक्कम अधिक घ्यावी लागते हे व्यवहारातलं गणित आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि महाग तरी किती असतं जर शहरातल्या दुकानात 30 रुपये किलो तांदूळ असेल तर तो गावातल्या दुकानात दोन किंवा तीन रुपये जास्त घेत असतो. पाच किलो तांदूळ घेण्यासाठी आपण जवळच्या शहरात जातो त्यावेळेला किमान जाऊन येऊन पन्नास ते शंभर रुपये प्रवास खर्च आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर आपण आपल्या नेहमीच्या दुकानदाराला त्याच्या फायद्यापासून वंचित केलेले असते हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हेही लक्षात घ्यायला हवी की गावचा दुकानदार हा आपला नातेवाईक किंवा शेजारी किंवा गाव बंधू असतो. आपला पैसा गावातल्या दुकानदाराला मिळतो त्यावेळेला आपल्या दुकानदाराला आपल्याबद्दल प्रेम निर्माण होतं. काही ठिकाणी चाकरमानी आला म्हणून आपल्या दुकानातील वस्तू आवाच्या सव्वा भाव लावून विकणारे दुकानदार असतील तर त्यांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा आपली गिऱ्हाईके वाढवण्याच्या दृष्टीने कोकणातील घरे पुन्हा उघडण्याच्या दृष्टीने कोकणातील घरातील माणसं गावातल्या घरातच राहावी या दृष्टीने आपल्या दुकानातील मालाच्या किमती या किफायतशीर असतील याची काळजी घ्यावी. एखादा दुकानदार जेव्हा असा लुटण्याचा व्यवहार करतो त्यावेळेला सर्वच दुकानदारांवरती त्याचा फटका पडतो याची नोंद घ्यावी.
आपल्या गावाकडच्या दुकानात एखादी वस्तू मिळत नसेल तर ती गावाजवळच्या शहरातून आणायला हरकत नाही मात्र ती मुंबई पुण्यातूनच आणावी असा हट्ट धरता कामा नये. आपला पैसा हा गावात किंवा कोकणातच राहील याची आपण काळजी घ्यायला हवी. उद्या आपला कोकण समृद्ध झालेला पाहायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच नको का करायला.
गावाकडचा गणपती उत्सव हा खरोखरच आनंददायी आणि उत्साहवर्धक असतो. एक तर गावात सगळीकडे हिरवाई असते. त्या हिरवाईवर सोनतळ, तेरडा अशा रानफुलांनी त्यावर नक्षीकाम केलेले असते. नद्या भरभरून वाहत असतात वातावरणात गारवा असतो आणि त्याच वेळेला या वातावरणात मंगलमयता आणण्याचं काम गणपती बाप्पाच्या आगमनाने होत असते. ती पूजाअर्च्या, त्या आरत्या, रात्रभर जागून केलेली भजने, महिलांच्या फुगड्या याचा आनंद
अवर्णनीय असतो. जो यात न्हाऊन निघाला त्याला स्वर्ग सुखाचा आनंद मिळालाच म्हणून समजा. आणि म्हणून जे अनेक वर्ष गावाकडे फिरकले नाहीत. त्यांनाही मी विनंती करतो की एक वेळ या गणपती उत्सवात येऊन जा. हा आनंद अनुभवा. तुम्ही पुन्हा पुन्हा गावाकडे आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो.
येताना आवश्यक तेवढे कपडे आणि औषधे घ्या बाकी सगळं गावच्या दुकानातून मिळेल आणि हो सर्वांना विनंती गणपतीतून गावच्या दुकानदाराची उधारी केली असेल तर यायच्या अगोदर देऊन मोकळे व्हा. जर का अगदीच आपलं पाकीट रिकामं झालं असेल तर त्याला भेटून मी मुंबईला गेल्यावरती पाठवून देईन असं आस्वस्थ करा आणि त्याप्रमाणे त्या दुकानदाराची उधारी वेळेतच पूर्ण करा. आपण व्यवहार चोख ठेवलात तर एक माणूस आपल्या संग्रहात वाढेल. आपल्या प्रसंगी धावून येईल या जमेच्या बाजूचा ही विचार करायला हवा.
गणपती बाप्पा मोरया ll
चाकरमान्यांनो गावाला या ll
सुभाष लाड
९८६९१०५७३४.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
👏🏿👏🏿 मुंबई गोवा रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी 👏🏿👏🏿
आपण मुंबईवरून पुणे एक्सप्रेस ने खालापूर टोल नाक्याजवळ बाहेर पडून पाली मार्गे वाकड या ठिकाणी बाहेर पडावे व मुंबई गोवा मार्गावरून प्रवास करावा.
किंवा
मुंबई पुणे एक्सप्रेस ने खालापूर टोल नाक्याजवळ बाहेर पडून पालीच्या गणपती जवळून डाव्या बाजूकडून निजामपूर मार्गे जाणारा रस्ता हा माणगावच्या पुढे ढोल घर येथे मुंबई गोव्या रस्त्याला मिळतो स्थानिकांच्या मदतीने तुम्हाला या रस्त्याची माहिती मिळेल त्यामुळे तुम्हाला इंदापूर माणगावची गर्दी व रस्ता टाळता येईल.
तसेच
संगमेश्वर ते पाली हा रस्ता खराब असल्यामुळे आपण संगमेश्वर डेपो जवळून डाव्या बाजूला देवरुख साखरपा मार्गे वाटूळ पर्यंत छान रस्ता आहे त्याचाही आपण उपयोग करू शकता.
निसर्ग छायाचित्रे आताची आहेत.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
अभिप्राय
लेखक- जयवंत मांजरेकर
*सर नमस्कार* 🌹🙏
*कोकणात गणपती ऊत्सवाकरता आपल्या गावी येणार्या चाकरमान्याना आपण केलेल्या सुचना रास्त आणि वास्तववादी आहेत. सर्वानी सुरक्षित यावे आणि मुंबईला परत सुरक्षित पोचावे याची आपल्याला असलेली काळजी आणि तळमळ यातून दिसून येते. आपली नाळ या कोकणच्या मातीशी घट्ट जुळलेली आहे. कोकणातील या गावांवर आणि मातीवर असलेले आपले निस्सीम प्रेम, श्रद्धा आणि भक्ती सर्वकाही पदोपदी दिसून येते. दुर्गम गड किल्यांवर, रानावनात आणि घनदाट अरण्यात भटकंती करुन तेथील पौराणिक, ऐतिहासिक स्थळांची माहिती मजसारख्या इतिहासप्रेमीना आपण वेळोवेळी करुन देत असता त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.* *आपल्या लेखणीला सलाम. ही लेखणी उत्तरोत्तर अशीच बहरत जावो हीच सदिच्छा.* *माझ्या " मुक्काम पोष्ट खोरनिनको " या आगामी कथासंग्रहाची प्रस्तावना आपण लिहीणार अहात. लेखन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एक दोन महीन्यात मी आपल्या भेटीला येईन. धन्यवाद. 🙏*
*विनीत*
*जयवंत माजलकर*