मी परत परत फोन केल्यानंतर त्यांनी एकदाचा उचलला.
" इस्पितळात आहे.अर्ध्या तासाने मी काॅल करतो." असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
मी थोडा काळजीत पडलो तसे मी फोन कशासाठी करीत आहे हे ही मी विसरलो. ते इस्पितळातच असल्याने पुन्हा फोन करू शकत नव्हतो आणि त्यांच्याकडून येणाऱ्या फोन शिवाय मला माहिती मिळणं शक्य नव्हतं. मात्र दोन तासाने त्यांचा फोन आला तेव्हा कळलं की त्यांची गावाकडे असणारी काकी आजारी आहे. तिचं जवळचं असं कोणी नसल्याने सर्व जबाबदारी हेच पार पडत होते. आज सकाळी गावावरून फोन आला. 'काकी जास्त आजारी आहे.'
मग ते गाडी घेऊन शिपोशीला गेले. काकीची प्रकृती अगदीच नाजूक असल्याचे पाहून रत्नागिरीत चांगल्या इस्पितळात हलवण्याशिवाय पर्याय नाही असे वाटल्याने त्यांनी काकीला गाडीत बसविले आणि ते रत्नागिरीत आले.तिच्या सर्व तपासण्या करून तिला इस्पितळात भरती करुनच मग त्यांनी निवांतपणे फोन केला.
ते एक उपक्रमशील आदर्श शिक्षक आहेत. मंडणगड, लांजा करून आणि आता रत्नागिरी जवळच्या जिल्हा परिषद शाळा नाचणे या शाळेत कार्यरत आहेत.ते प्रामाणिकपणे सेवा करतात.ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. एवढ्यावरच त्यांचा परिचय थांबवला तरीही ते चांगले शिक्षक आहेत हे लक्षात येईल.परंतु विद्यार्थ्यां बरोबर पालकांसाठी,शिक्षकांसाठी,समाजासाठीही त्यांचे तेवढेच लक्षणीय योगदान आहे म्हणूनच उभ्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे. फक्त दीपक नागवेकर एवढं नाव उच्चारलेत तरी समोरचा माणूस म्हणतो " ते नागवेकर सर ना !अहो लाख माणूस ! "
आपण ज्यांची ओळख सांगतो त्या व्यक्तीबद्दल असं काही आपल्या समोरचा माणूस बोलतो की आपलीही काॅलर ताठ होऊन जाते. नागवेकर सरांबद्दल असा अनेक ठिकाणी मला अनुभव आलाच पण गेली दहा बारा वर्षे ते राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने किंवा संघाच्या विविध उपक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात वावरताना लाख मोलाचा माणूस काय असतो हे प्रत्यक्ष पाहात आलोय.
आज-काल सरकारी शाळांच्या बाबत आणि विशेषतः मराठी शाळांच्या बाबत उगाचच काहीतरी गैरसमज पसरवण्याचे काम चाललेले आहे. एकाद दुसऱ्या पाटी टाकणाऱ्या शिक्षकामुळे सर्वच शिक्षक असे असतात असा समज करून घेण्यात आलेला आहे. मराठी माध्यमाचे शिक्षण हे मुलाचं भविष्य तारुण नेणार नाही अशी हाकाटी पेटवली जाते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर तसेच एमपीएससीच्या परीक्षा देऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या नोकरी करणारे लोकही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्यास नाक मुरडतात याचे आम्हाला आश्चर्य वाटते. त्यामुळे प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम करणाऱ्या शिक्षकांत नाराजी पसरते. परंतु दीपक नागवेकरांसारखा शिक्षक याला उत्तर देत बसत नाही किंवा स्वतः खचून जात नाही. तर त्याचे उत्तर तो आपल्या कामाने देत असतो. हे आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिले आहे.
नाचणे येथील प्राथमिक शाळेत दाखल झाल्यानंतर सुशिक्षित व चांगल्या हुद्द्यांवर काम करणाऱ्या पालकांची मुले आपल्या शाळेत आपसूक आली पाहिजेत या हेतूने त्यांनी राबवलेले उपक्रम हे सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. मे महिन्याची सुट्टी पडल्यानंतर पालक आपल्या मुलांना कुठेतरी फिरण्याचा बेत आखतात. पण नागवेकर सरांच्या शाळेतील पालक सुट्टी पडण्याच्या अगोदर नागवेकर सरांना समर कॅम्प कधी सुरू होणार, कधी संपणार आहे असे विचारून पुढचे बेत आखतात. समर कॅम्प चार-पाच दिवसांचा असेल परंतु त्या शिबिरात आपल्या मुलाने सहभागी व्हायला हवं असा आग्रह पालक धरतात. आणि ज्या मुलांनी मागचे शिबिर अनुभवलेले असते ती मुलं "मलाही या शिबिरात यायचं आहे" असं आग्रहाने नागवेकर सरांना सांगतात.बरं हे शिबिर त्यांच्या शाळेतल्या मुलांच्यासाठी मर्यादित असतं असंही नाही तर ज्या मुलांना आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे असं वाटतं त्या मुलांनाही या शिबिरात सहभागी करून घेतलं जातं. तसेच या शिबिराचा लाभ केवळ मुलं घेत नाहीत तर त्यांच्याबरोबर आलेले पालकही सुट्टी काढून या शिबिराला पूर्ण वेळ बसत असतात हे मी जेव्हा पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. गेली तीन चार वर्ष माझे तिथे जाणे आपसूक होते. यावर्षी तर आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार- लेखक - कवी विजयराज बोधनकर यांनी या शिबिराला हजेरी लावली आणि मुलांच्या समोर सहज चित्र कसं काढतात त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दिले.असे विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार या शिबिराला ते बोलावतात. दीपक नागवेकरांचा शब्द पाळणारी ही मंडळी आनंदाने सहभागी होतात. शाळेच्या बाजूला असलेले भव्य सभागृह मुलांनी आणि पालकांनी ओसंडून जाते. इथे गाणी गायली जातात, इथे योगा, व्यायाम केला जातो, इथे नृत्य केले जाते, येथे अभिनय केला जातो, इथे खेळ खेळले जातात, येथे बौद्धिक होते आणि विशेष म्हणजे येथे मुलांचा आत्मविश्वास दुणावला जातो. इथे तन्मयतेने होणारी बालक्रिडा पाहून पालकांचाही त्यांच्या बालपणीचा सुखद अनुभव जागृत होतो.
. (सरांचे आनंदी आईवडील)
मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस हा सर्वांनाच हवा हवासा वाटतो असं म्हणणं धाडसाचं वाटेल. कारण मे महिन्याची सुट्टी संपू नये आणि शाळा कधी सुरू होऊ नये असं आमच्या पिढीला वाटत होतं. तसं अनेक शाळेतल्या मुलांनाही वाटत असणार पण नाचणे येथील जिल्हा परिषदेची शाळेतली मुलं शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात कारण दीपक नागवेकरांच्या सारखेच शाळेतले सर्व शिक्षक शाळेचा पहिला दिवस मुलाला अविस्मरणीय वाटेल अशा प्रकारचे आयोजन करीत असतात. नवीन गणवेशात सजून नटून आलेली ही मुलं कधी घोडा गाडीत बसतात तर कधी घोड्यावर मांड टाकून वीर योद्ध्यासारखे आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी आम्ही जात आहोत अशा थाटात वाजत गाजत लोक वस्तीतून मिरवत शाळेत येतात. हे दृश्य बघायला पालक सोबत असतातच परंतु रस्त्याच्या दुतर्फा लोकही गर्दी करतात.
ही शाळा वर्षभर विविध उपक्रम राबवते. हसत खेळत शिक्षण देते. मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा ध्यास घेऊन काम करते. म्हणूनच या शाळेचा पट वाढतच जात असलेला आपल्याला बघायला मिळतो. जे जिल्हा परिषदेच्या शाळेला नावे ठेवतात त्यांनी एक दिवस या शाळेकडे वाट वाकडी करावी. सहज एखाद्या विद्यार्थ्याला विचारावे. सहजच एखाद्या पालकाचा आदमास घ्यावा. विद्यार्थी म्हणेल मला माझी शाळा आवडते आणि पालक म्हणेल मी माझ्या पाल्याच्या भविष्यासाठी मी आता निश्चिंत आहे.
शिक्षण म्हणजे पुस्तकातील उतारा वाचून, पाठ करून परीक्षेत लिहून प्रमाणपत्र मिळवणं नव्हे. शिक्षण म्हणजे चार भिंतीतल्या अध्ययन अध्यापना व्यतिरिक्त विविध संस्कार देण्याची, माणूस घडवण्याची एक अखंड प्रक्रिया असते. त्याचे अनुभव वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांच्या पर्यंत पोचवायचे असतात. हे सर्व नागवेकरसरांच्या शाळेत घडत असते. म्हणूनच या शाळेला येथील सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, समाजातील अनेक मान्यवर, विचारवंत, कलाकार सहकार्याचा हात पुढे करत असतात. आम्ही ज्यावेळेला नागवेकर सरांचे कौतुक करतो त्यावेळेला त्यांच्यासोबत असलेली वरील उल्लेखलेली मंडळी, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि कर्मचारी सुद्धा त्या कौतुकास पात्र आहेत.
शिक्षक पेशात येण्यासाठी डी.एड;बी.एड; किंवा एम.एड हे पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक असते. परंतु शिक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी त्याला स्वतःचा शैक्षणिक दर्जा वाढवत राहणे त्याचबरोबर बदलत्या जगाप्रमाणे बदलत्या जगाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असते. याबाबतीत दीपक नागवेकर सर हे सर्वकाल विद्यार्थी असलेले दिसतात. डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेल्या अठ्ठावीस वर्षात त्यांनी स्वतःला नवनीत ठेवताना बाह्य परीक्षा देऊन बी.एड. पूर्ण केले. डी.एस.एम; सी.पी.सी. टी. परीक्षा उत्तीर्ण झाले. इतिहास विषयात व मराठी विषयात असे दोन वेळा एम. ए. झाले. एवढेच काय तर जी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी अनेक वर्ष प्रयत्न करतात त्या सेट व नेट या दोन्ही पदव्या मराठी विषय घेऊन सरांनी आपल्या शिरपेच्यात रोवल्या आहेत.
हा ज्ञानाचा भुकेला शिक्षक प्रचंड वाचन करीत असतो. त्याचबरोबर कविता आणि ललित लेख आजच्या आघाडीच्या वृत्तपत्रात लिहून अनेक वाचकांची भूक भागवीत असतो. त्यांचा एक काव्यसंग्रह आणि दोन ललित लेख संग्रह प्रकाशित झालेले आहेत. केल्याने पर्यटन या सुभाषितांना प्रमाण मानून सुट्टीचा फायदा घेत देशभरच्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.
दीपक नागवेकर सर हे कुटुंब वत्सल आहेत. वृद्ध आई-वडील नेहमीच आनंदी राहावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. पोस्ट खात्यातून सेवानिवृत्त झालेले त्यांचे वडील गप्पिस्ट आहेत.अनेक गावातून सेवा करण्याचा त्यांचा अनुभव म्हणजे एक ज्ञानदालन आहे. त्यांना बोलते करा तुम्ही ज्ञान समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. सरांचा माणसं जोडण्याचा स्वभाव, आई-वडिलांची आपलेपणाने स्वागत करण्याची वृत्ती, पाहुण्यांची सेवा करण्याची मुलांची विनम्रता, पाहुण्याचं समाधान हे चविष्ट पदार्थांनी पोट भरल्यानंतरच होतं या जाणिवेतून नागवेकर सरांच्या पत्नीचा ( सौ.नागवेकर या माध्यमिक शिक्षिका आहेत.)चहा - नाश्ता किंवा जेवणासाठीचा आग्रह हे सगळं पाहिलं की आपण माणूसपण जपणाऱ्या एका आदर्श आनंदी कुटुंबात आलो आहोत याची जाणीव होते. मग त्यांच्या निराधार काकीसाठीच काय तर समाजातील कोणत्याही असहाय व्यक्तिसाठी धावणाऱ्या या कुटुंबासाठी आपल्या हृदयातील एक कप्पा राखून ठेवला जातो.
नागवेकर सर नेहमीच कृतज्ञभाव जपत आले आहेत. ज्या शाळेत त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालं त्या न्या.वै.वि.आठल्ये विद्यालयाच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या माजी विद्यार्थी संघात सक्रिय राहून येथील विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. शिपोशी गावच्या जी. अण्णा आठल्ये वाचनालय, साई युवक मंडळात ते सक्रिय आहेत. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही दोन तालुक्यांच्या विकासासाठी झटणारी एक शिखर संस्था असून या संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, काव्य संमेलन, शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांत यांचे मोठे योगदान असते. तर शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र व्यापी शिक्षक संघटनेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन गाव, तालुका आणि जिल्हा अशा सर्व स्तरावर लिलया वावरणारे दीपक नागवेकर यांना घरचा आहेर द्यावा या हेतूने त्यांनी नुकतीच वयाची पन्नासावी पार करतांना कुटुंबातील सर्वांनी एकत्रित येऊन त्यांचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला त्यामुळे घर,गाव, तालुका आणि जिल्हा या चारही स्तरावर त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे. त्यांचा हाच पन्नासावा वाढदिवस औक्षण ,भोजन, भाषण एवढा मर्यादित नसून तर तो सामाजिक संदेश देणारा आहे. नागवेकर सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी वृक्षमित्र अमर खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटूळ - दाभोळे रस्त्यावरती वड पिंपळाची पन्नास झाडे लावली आहेत. आपल्याजवळ आलेल्या माणसाला प्रेम देण्याचा नागवेकर सरांचा संदेश ही झाडे प्रवाशांना सावली देऊन देणार आहेत.
शिपोशी गावचे सुपुत्र व आदर्श शिक्षक श्री. दीपक नागवेकर यांना आमच्या भरभरून शुभेच्छा !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
🍁🍁🍁🍁🍁🍁 🍁🍁🍁🍁🍁
अभिप्राय
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌺 विठ्ठल कुसाळे , मुंबई
नागवेकर सरांच्या कार्याविषयी मी जपून ठेवलेला मौलिक ठेवा!.....
🌺प्रा. विकास पाटील,पाचला,
कोकणच्या रत्नभूमीतील हिरे शोधून त्यावरती पैलू पाडण्याचे आपले कार्य अविरत सुरू आहे. घडलेल्या, घडविणाऱ्या, घडणाऱ्या माणसांना ओळख देण्याचे काम आपल्या लेखणीतून अविरत सुरू आहे. ' आमच्या मातीतल्या माणसांना आम्हीच मोठे करणार ' हे ब्रीद आपल्या कृतीतून सदैव साध्य होताना दिसते आहे. सर आपणासारख्या परिसामुळे आमच्यासारखे लोखंड ही सोने होऊ पाहत आहे. आपला सहवास, सानिध्य आणि आपली कृती निश्चितच बळ देणारी आहे. आपले सारे ब्लॉग आपल्या शब्दप्रभुत्वाची साक्ष देतानाच रत्नागिरीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाची उंची दाखवणारे आहेत.
🌺 ***अस्मिता मांडवकर, मुंबई.
श्री सुभाषजी लाड सर आपण खुप छान लेख लिहिला आहात आज एक आदर्श उच्च शिक्षित शिक्षकाचे ध्येयवादी सेवाभावी विचार विनिमय वाचयला मिळाले ज्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आदरणीय शिक्षक श्री दिपक नागवेकर सर यांना पुढिल वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा 🙏🙏💐💐👌👌
🌺 शाहीर मधुकर खामकर, शिपोशी
*वा,, नागवेकर सर्वांबद्दल खूप छान माहिती, एक ध्येयवादी, सेवाभावी व्यक्तिमत्त्व*
*ज्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आदरणीय शिक्षक , श्री दिपक नागवेकर सर यांना भरभरून शुभेच्छा*
🌺 हरेश जाधव, माजी सरपंच, शिपोशी
लाड सर आमचे दिपक सर एक मौलीक हिरा आहेत . आमच्या गावची शान आहे .
🌹💐🌺🌹💐🌺🌹💐🌺🌹🌺