Saturday, May 31, 2025

हा सिनेमा बघायलाच हवा !🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

       सरलेल्या दिवसांच्या आठवणी पुन्हा जगता येत नाहीत पण पुस्तक रूपाने , चित्राद्वारे किंवा सिनेमाद्वारे त्या आठवणी जाग्या होतात. ते पुस्तक ते चित्र किंवा तो सिनेमा तेवढ्याच ताकदीचा असेल तर आपण त्या ठिकाणी आहोत याचा भास होतो तो मनाला आनंद देणारा असतो.

असंच काहीतरी एप्रिल मे ९९ हा सिनेमा पाहून अनुभवायला मिळालं.

         कोकणचा किनारा, कोकणच्या नारळी आणि कोकणातील स्मरणात राहणारी विविध वैशिष्ट्य जपून जगलेली माणसं पुन्हा डोळ्यांसमोर आली की आपल्या आनंदाला पारावर राहात नाही. हा आनंद देण्याचे काम' एप्रिल मे ९९' हा सिनेमा शत प्रतिशत करतो.

       ही सिनेमा ची जाहिरात नाही. कोकणातल्या कलाकारांनी एक उत्तम कलाकृती सादर केलेली असताना आपण त्याचा प्रचार करू नये हे मनाला पटत नव्हते म्हणूनच हा लेखप्रपंच. 

    बंद घरांचा आजार कोकणात बळावत चाललेला असताना साठ सत्तरच्या दशकात जन्मलेल्या पिढीला मुला माणसांनी गुराढोरानी भरलेली घरे पुन्हा पाहता येतील की नाही याबाबत शंका वाटते. म्हणून त्या पिढीने हा सिनेमा जरूर पहावा. त्या पिढीचं बालपण कसं गेलं हे कथन करून पुढच्या पिढीला सांगत बसण्यापेक्षा पुढच्या पिढीला घेऊनच हा सिनेमा बघावा.

        एकत्रित कुटुंबात राहताना माणूस बनून कसं राहावं, समाजात कसं वागावं याचा संस्कार आपसूकच पुढच्या पिढीकडे जात होता.म्हणूनच  घर समाज गाव होतं खेळतं वाटत होतं. सुबह का भुला शाम को लौट के आता था.

       तसं पाहिलं तर किशोर वयातल्या मुलांच्या भावभावनांचे सुंदर चित्रण पाहताना कधी खळखळून हसू येतं तर कधी अलगद डोळे ओले होतात.ते सगळे आपल्या आयुष्यातील आहेत असं वाटतं ते क्षण माझ्या कोकणातच म्हणतात याचा आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.

        अवघ्या गावा वरती आईच्या मायेने प्रेम करणाऱ्या भटीन काकूने केलेला उपदेश ऐकायला या सिनेमाचं तिकिट काढाच.

       समुद्रात घुसलेल्या खडकाच्या सरीवर बसून अर्ध्या वाटेवर सोडून गेलेल्या आपल्या आईला हाक मारणाऱ्या जाईची बघायला, अस्सल कोकणी उनाड मुलांचं कुठेही तडमडणं कसं निरागस असतं हे पाहायला एकटं नाही तर सर्व कुटुंबासहीत या.

हा सिनेमा पडदवरच बघणे आवश्यक आहे. म्हणून लवकर घाई करा. जवळच्या सिनेमागृहाचं तिकिट आरक्षित करा.

       सर्व  यशस्वी कलाकारांसह सर्व टिमचं मनापासून कौतुक

सुभाष लाड

माझ्या नातवंडांनीही सिनेमाचा आनंद घेतला.

          

Tuesday, May 27, 2025

छोट्या रेयांशने समुद्र कवेत घेतला ! 🏊‍♀️. 🏊‍♀️🏊‍♀️🏊‍♀️🚩🏊‍♀️🏊‍♀️🏊‍♀️. 🏊‍♀️


         छपाईच्या कामाच्या निमित्ताने वरचेवर मला ठाण्याला जावे लागते. ठाण्यातील कोठावळे प्रेसच्या जवळच सुहास खामकरांचे घर असल्यामुळे दुपारच्या वेळी बऱ्याचदा विश्रांतीसाठी त्यांच्या घरी जात असतो. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांतदादा खामकर यांचे हे कनिष्ठ बंधू. यांना सुद्धा सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये ठाणे विभागाचे हे काम सांभाळतात. एक दिवस सुहास खामकर म्हणाले," दादा मुंबईला आले आहेत, काल तुमची त्यांनी आठवण काढली होती."

"अरे व्वा, भेटूया आपण त्यांना. तशी बरेच दिवस आमची भेट झालेली नाही."

     तिथून पाच मिनिटांवर दादा राहतात हे सांगितल्यामुळे आपण त्यांना भेटायला जाऊ या असा मी म्हणालो आणि निघालोही त्यांना भेटायला. दादांच्या घरी जाणे म्हणजे आदर सत्काराच्या एका पर्वणीस सामोरे जायचे असते हे गावाकडच्या अनेक भेटीतून मी अनुभवले होते. मुंबईत त्यांना मी आज प्रथमच त्यांच्या घरी भेटत होतो. त्यांच्या शिरस्त्या प्रमाणे दादांनी आमचे स्वागत केले.  आपल्या घरच्या माणसांची ओळख करून दिली. आपल्या छोट्याशा गोंडस नातवाची ओळख करताना " हा रेयांश ,आता तो स्विमिंग पूल ला चाललेला आहे. त्याला पुढच्या आठवड्यात थायलंड स्पर्धेसाठी जायचं असल्याने त्याची जोरदार तयारी चालली आहे."असे सांगितले.

 

 

       सहाव्या वर्षातला रेयांश जिल्हा नवे राज्य नव्हे तर देश ओलांडून तो परदेशात चाललेला आहे. पोहण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी. भारताचे प्रतिनिधित्व तोच करणार होता हे ऐकून मी तर अवाक झालो. माझ्या डोळ्यांसमोर सातवी आठवीपर्यंतच्या मुलांचं दप्तर आपल्या पाठीवर घेऊन शाळेपर्यंत जाणारे पालक दिसू लागले. आपल्या मुलाला कोणताही त्रास होऊ नये याची आपण अनावश्यक काळजी घेत असल्याचं कौतुक दाखवणारे पालक एकीकडे आणि दुसरीकडे अथांग समुद्रात एक छोटासा मुलगा मोठ्या हिंमतीने आणि आत्मविश्वासाने एकटाच पोहतो आहे आणि दूर काठावर आपला मुलगा  समुद्राला कवेत घेऊन सुखरूपपणे किनाऱ्यावरती येणार आहे असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेले पालक किनाऱ्यावर त्याची वाट पाहत उभे असलेले मला दिसले. निरागस वयातल्या रेयांशचे मी भरभरून कौतुक केलेच त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजाबाईचं काळीज घेऊन जन्मास आलेल्या रेयांशच्या आई-वडिलांना मी सलाम केला. मुलं रांगू लागतात तेव्हा तो डावा आहे की उजवा आहे हे जसे कळून येते तसेच त्याला काय खेळायला आवडते हे सुद्धा लक्षात येते. मुलांच्या आवडीच्या क्षेत्राप्रमाणे त्यांना तशा अनुभूती निर्माण करून देणे, संधी निर्माण करून देणे हे तर खरे पालकांचे कर्तव्य आहे मात्र आजकालचे पालक स्वतःची स्वप्न मुलांच्यावर लादताना ' मला या मुलाला डॉक्टर करायचे आहे, मला या मुलाला इंजिनियर करायचे आहे' असे स्वतःच ठरवतात आणि त्याप्रमाणेच त्याला वाढवतात. तसे पाहिले तर पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त एखाद्या कलेत आपल्या मुलाला पारंगत करावे असे कुणाला वाटत नाही. ज्या क्षेत्रातून पैसा मिळेल तेच क्षेत्र आपल्या मुलांनी निवडावे असा पालकांचा हट्ट असतो. म्हणूनच ऑलिंपिक सारख्या क्षेत्रात लोकसंख्येने मोठा असलेला भारत देश पिछाडीवर असलेला दिसतो. रेयांशच्या पालकांनी लहानग्या रेयांशला टबातल्या पाण्यात रमताना पाहून, त्याची पाण्याशी असलेली दोस्ती पाहून त्याला त्याचे क्षेत्र मिळवून दिले. ठाण्यातल्या तरण तलावावर त्याने अधीराज्य प्रस्थापित केले. रेयांशने अल्पावधीतच छोट्या छोट्या स्पर्धा पार करत राष्ट्रीय पातळीवरचा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू म्हणून स्वत:चे नाव नोंदवले ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे. थायलंडच्या तयारीसाठी रेयांशला भरपूर सरावा करावा लागत असल्याने त्याचे वडील त्याला घेऊन गेले. माझ्या समोरून मात्र एक योद्धा पुढच्या युद्धाच्या सरावासाठी जातोय असा भास झाला.

     थायलंडमध्ये सहा वर्षीय रेयांशने भारताचा तिरंगा फडकवला.आता त्याला मोठ्या मैदानातील लढाईचा अनुभव घ्यायचा होता. ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावात स्टार फिश ( फाउंडेशन) स्विमिंग क्लब कडून रेयांश सराव करीत असतो. जलतरणपटू कैलास आखाडे हे त्याचे मार्गदर्शक आहेत.  वयाच्या सातव्या वर्षात पदार्पण करताना  त्यांनी रेयांशला अरबी समुद्रात उतरण्यासाठी त्याच्यात निर्माण केलेला आत्मविश्वास कौतुकास्पद आहे.नुकताच पंधरा किमीच्या पोहण्याच्या शर्यतीत त्यांने भाग घेतला. सिंधुदुर्गातल्या विजयदुर्ग सागरी किल्ल्याच्या किनाऱ्यावरील खोल समुद्रात आयोजित केलेल्या या स्पर्धेत  छोट्या रेयांशने सहजच अरबी सागराला कवेत घेतले.हे अंतर त्यांने तीन तास दहा मिनिटात पार करुन तो प्रथम आला.सुवर्णपदक मिळवून आणखी एक मानाचा तुरा त्याने आपल्या शिरपेच्यात खोवला. त्याच्या या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

( विशाल समुद्रात स्वतःला झोकून देऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला जलतरणपटू रेयांशचा फोटो)

 त्याच्या या कामगिरीचे कौतुक स्थानिक वर्तमानपत्रानी भरभरून केले. त्या बातमीत त्याचा उल्लेख करताना लांजा तालुक्यातील आरगावचा सुपुत्र रेयांश असे लिहिल्याने कोकण भूमीचा अभिमान असलेल्या प्रत्येकाचा ऊर भरून आला. सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले. सह्याद्रीच्या पायथ्याजवळ असलेल्या आरगावचे नाव यापुढेही भारताच्या नकाशात अधिक ठळकपणे दिसेल अशी कामगिरी रेयांश कडून होईल याची खात्री वाटते.

 

   ( गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवृत्तीवेतनातील पैसा खर्च करणारे थोर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा खामकर आपल्या नातवाच्या पराक्रमाने प्रफुल्लित झालेले )   

           रेयांशचे आजोबा श्री चंद्रकांत दादा खामकर हे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे एक सक्रिय ज्येष्ठ सदस्य आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये नावलौकिक आहे. गाव खेड्यातल्या गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलत असतात. आपल्या निवृत्तीच्या वेतनातील अर्धा अधिक भाग लोकोउपयोगी कामासाठी वापरणारा असा सामाजिक कार्यकर्ता दुर्मिळ आहे. संघाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये योगदान देणारे दादा खामकर येथील ग्रामस्थांची सरकारी कचेऱ्यातील कामे करण्यासाठी, सरकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी स्वतःची पदरमोड करून मदत करीत असतात. त्याच संस्कारात वाढलेले त्यांचे कुटुंबीय सुद्धा सेवाभावी वृत्तीने जगत असतात. त्यांचा मुलगा दीपक आणि सून सानिका उच्च विद्या विभूषित असून आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारचे संस्कार द्यावेत याचा आदर्श त्यांनी रेयांशच्य माध्यमातून जगासमोर ठेवला आहे. मुलांना शालेय शिक्षण देणे आवश्यकच आहे मात्र त्याचबरोबर मुलांच्या अंगी एखादी कला असेल तर त्यांचं जगणं अधिक समृद्ध होऊ शकेल. जगण्यातला आनंद अधिक मोठा असेल. छोट्या रेयांश बरोबर त्याचे पालक सुद्धा समाजासाठी आदर्श आहेत. रेयांशने आपल्याबरोबर आपल्या गावाचे, देशाचे नाव रोशन करावे यासाठी मनापासून शुभेच्छा !

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

    

     

   

अभिप्राय -------------------💐💐💐💐💐💐💐💐💐💐-💐💐-💐💐

   

१)🙏श्री.चंद्रकांतदादा खामकर यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम.चि.रेयांशचे कौतुक करावे तेवढे थोडेच.त्याच्या ध्वजाची उंच पताका अशीच फडकत राहो.ही मनापासून शुभेच्छा.💐  

सुप्रिया मोरे,गुहागर, मुंबई 


२)पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. रेयांश गर्व आहे, तू असलेल्या आरगांवचा, अभिनंदन💐💐💐💐👍👍👍👍

भिकाजी स.पेडणेकर, रिंगणे, मुंबई 


३)रेयांशचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.💐💐💐

रमेश तुपे, नाशिक 


४)छोट्या पण निडर रेयांश ला लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

तसेच त्याच्या माता - पित्याना सलाम !  🙏

अं.ना.रसनकुटे,विरार


५)मोठी झेप  घेतली आहे अभिनंदन ! आईवडिलांचे पण खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

आशा सुरेश हांडे, जुन्नर, मुंबई 


६)रेयांश व माता पिता...गुरू यांचे...अभिनंदन....!🚩🙏🛕🌹

धैर्यधर पाटील,पेण, मुंबई 


७)सर, आपण शोधक पत्रकार आहात, आपणा कडून आम्हास आपल्याच परिसरातील विविध विषयाचे व होतकरू लोकांची ओळख मिळते. धन्यवाद. 🙏🙏

विनोद साळुंके,कोर्ले, मुंबई 


८)छोटा पण मोठा जलतरणपटू रेयांश , त्याचे बाबा दीपक, आई सानिका, आजोबा चंद्रकांत व संपूर्ण खामकर कुटुंब यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छाही!

जय कोकण‌!जय महाराष्ट्र! ‌‌जय भारत! जय तिरंगा!

- पुष्पा कोल्हे, जळगाव, मुंबई 


९)खूपच लहान वयात चमकदार कामगिरी करतोय. भविष्यात आॅलिम्पिक  मध्ये भारताचे नाव नक्कीच गाजवेल. 

खूप खूप शुभेच्छा! खरंच पालक म्हणून मुलांमधील गुण हेरून योग्य मार्गदर्शन योग्य वेळी झाले तर ते मूल चमकदार कामगिरी नक्की करू शकतं याचं रेयांश  उत्तम उदाहरण आहे.

रेयांशला खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा!🌹🌹🌹🌹👍👏👏👏🍫

स्नेहल आयरे, रिंगणे, मुंबई 


१०)खूप प्रेरणादायक

रेयांशच खूप खूप अभिनंदन💐✨

विनय गुणे, रत्नागिरी 

११)हार्दिक अभिनंदन पुढील वाट चालीस शुभेच्छा 💐💐👌👌

अशोक भोसले, सातारा 

Wednesday, May 21, 2025

'स्वराज्य रवी' लवकरच रंगभूमीवर येणार🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


         

नाटककार ला.कृ.आयरे यांची जयंती पवई येथे साजरी

         मराठी रंगभूमीचा जेव्हा पडता काळ होता त्या काळात गिरणगावच्या कामगार रंगभूमी वरती स्वस्तिक नाट्य मंदिर या नाट्यसंस्थेकडून सादर होणाऱ्या नाटकांना मराठी प्रेक्षक मोठी गर्दी करत होता. गणेशोत्सव, शिवजयंती अशा मराठ मोळ्या सार्वजनिक उत्सवात या कंपनीच्या नाटकांना मोठी मागणी असायची.या कंपनीचे मालक,नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वच पातळीवर ज्यांचा लिलया संचार होता ते होते नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे उर्फ ला.कृ.आयरे.

         कोकणातल्या लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र ला.कृ.आयरे यांच बालपण व शिक्षण याच गावात झालं. रिंगणे गाव म्हणजे नाट्यपंढरीच. गावात राम नवमीच्या व हनुमान जयंतीच्या उत्सवात नाटक हे ठरलेलेच.गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बालवयात ल्या ला.कृ.ना नाटकांचे वेड लागले.गुराकडे जाताना एखादं नाटकांचे पुस्तक वाचणं, त्यातील संवाद पाठ करणे हा त्याला छंदच जडला.पुढे ते मुंबईत आपल्या चुलत्यांकडे आले. लालबागच्या परिसरातील कोकणी माणसांच्या वस्तीत त्यांच्या नाट्यकलेला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळेच वयाच्या अठराव्या वर्षी फिर्याद नावाचे नाट्यकृती लिहिली.हे नाटक १९४९ ला रंगभूमीवर अवतरले.या नाटकाला गिरणगावाने डोक्यावर घेतले आणि रिंगणे गावच्या या सुपुत्राला नाटककार ही उपाधी प्राप्त झाली.

        पुढे त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि रंगभूमीवर आणली.पण त्यांनी स्व:त्याचीच स्वस्तिक नाट्य मंदिर ही संस्था स्थापन केल्याने महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात त्यांना दौरे करता आले.समाजाला भेडसावणारे विषय नाटकांतून मांडणाऱ्या ला.कृ.आयरे यांना कोकणातच नाही तर सांगली सातारा सोडा नागपूर पर्यंत त्यांची नाटके सादर होऊ लागली.एवढंच नव्हे मद्रास म्हैसूर प्रांतातही त्यांची ख्याती गेली.त्याकाळातील वर्तमानपत्रांबरोबर अनेक नियतकालिकांमध्ये ला.कृ.च्या बद्दल रकानेच्या रकाने लिहून येऊ लागले.त्यांच्या नाटकांच्या उज्ज्वल यशामुळे त्यांना कामगार रंगभूमीवरचा शेक्सपिअर म्हणू लागले.मराठी रंगभूमीवरील दिग्गज म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते मामा वरेरकर, आचार्य अत्रे हे त्यांच्या नाटकाच्या खेळाला येऊन बसत.

नाटककार ला.कृ.आयरे यांची आज १०७ वी जयंती मुंबई येथील पवई मध्ये सुभाष लाड यांच्या घरी मोठ्या थाटामाटात साजरी झाली.यावेळी लेखक सुरेश हांडे, दिग्दर्शक प्रकाश लाड, अभिनेता संजय मांडवकर, प्रदीप रेवाळे,युवा दिग्दर्शक अनिरुद्ध पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.


        नाटककार ला.कृ.आयरे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर  महालक्ष्मी कलामंचकडून (जो ऐतिहासिक नाटके सादर करुन शिव इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारी नाट्य संस्था) ला.कृ.आयरे यांच्या स्वराज्य रवी या ऐतिहासिक नाट्य संहितेचे पूजन केले . येत्या आक्टोबर मध्ये हे नाटक रंगभूमीवर येईल असे संजय मांडवकर यांनी जाहीर केले.सुभाष लाड यांनी नाटककार ला.कृ.आयरे यांच्या आठवणी जागवून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

सुभाष लाड

९८६९१०५७३४

   

   



Sunday, May 11, 2025

श्री धनी केदारलिंग मंदिर जिर्णोध्दार ! 🚩. 🚩🚩🚩🚩🚩🚩. 🚩

         
           कोकणातील प्रत्येक गावाचे एक आराध्य दैवत असतं. त्या दैवताला जेव्हा स्थान दिलेले असते ग्रामदैवत उद्या गावाला पूजनीय असते. गावाची रखवाली करणे तसेच गावातल्या  आबालवृद्धांच्या आरोग्याची त्यांच्या समृद्धीची सुखाची शांतीची काळजी घेण्याचे काम ग्रामदैवत करत असते अशी कोकणी माणसाची ठाम श्रद्धा आहे त्यामुळे देऊळ अधिक आकर्षक बनवणे या देवांचे सण उत्सव अधिक रंगतदारपणे साजरे करून देवाच्या प्रति आदर व्यक्त करण्यास कोकणी माणूस फार उत्सुक असतो. रिंगणे गावाचे श्री धनी केदारलिंग हे आराध्य दैवत असून त्याचे देऊळ प्राचीन काळापासून आहे. यापूर्वी लाकूड कामातून व मातीच्या कौलाने सजवलेले देऊळ होते. त्या मंदिराच्या खाबांपैकी एक खांब हा निगडी चा होता असे जुने लोक सांगायचे. १९९९ साली त्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्यावेळेला हे खांब जिर्ण झाल्याने काढून टाकण्यात आले.
यावर्षी पुन्हा २५ वर्षांनी
जिर्णोद्धार  करण्यात आला. दिनांक १२ मे १४ मे २०२५ या कालावधीमध्ये नवीन मंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ असून त्या निमित्ताने रिंगणे गावचे सुपुत्र सुभाष केशव हांदे यांनी गावातील देवळे व त्यांचे उत्सव यांची माहिती देणारा   लेख.व सुभाष लाड यांनी श्री धनी केदारलिंग या ग्रामदेवताच्या वर्षभरातील उत्सव परंपरेबाबत घेतलेला आढावा कोकण मिडियाने प्रसिद्ध केलेले लेख.


Friday, May 9, 2025

कोकणात पुन्हा एकदा ' वीर शिवाजी '       

कोकणात पुन्हा एकदा ' वीर शिवाजी '

         दोन वर्षांपासून राजापूर आणि लांजा या तालुक्यातील दमदार खेळ करणाऱ्या मुंबईतील महालक्ष्मी कला मंचला पुन्हा एकदा 'वीर शिवाजी ' नाटक सादर करण्याची संधी मिळाली आहे. लांजातील आसगे गावात तर वीर शिवाजी आणि वीर रत्न बाजीप्रभू या दोन्ही नाटकांचे खेळ आयोजित करण्यात आले आहेत.

          आदर्श समाज रचना आणि आदर्श नागरिक घडवायचे असल्यास रामायण, महाभारत आणि शिवशाहीचा अभ्यास होणार गरजेचे आहे. राम कृष्णांच्या कथा ऐकून छत्रपती शिवाजी राजे घडले. छत्रपतींचा इतिहास ऐकून राणी लक्ष्मीबाई सारख्या वीरांगना रणांगणात शत्रूशी लढता लढता अमर झाल्या.अशाच अनेक नररत्नांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फाशीचा दोर गळ्यात अडकवला, कोणी छाती वरती गोळ्या झेलल्या तर कुणी कारावासातच अंतिम श्वास घेतला. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्य चांगला घडवायचा असल्यास आपला जाज्वल्य भूतकाळ त्यांच्यापुढे मांडणे गरजेचे आहे.


          शिवतेजाने भारावलेली कोकणातली तरुण चाकरमानी कलाकार मंडळी आपला मराठ्यांचा इतिहास लोकांच्या समोर मांडण्यासाठी शिवशाहीतील विविध विषयांवरची नाटके सादर करीत असतात. या हौशी कलाकारांनी केलेली नाटके व्यवसायिक नाटकाच्या तोडीस तोड असतात त्यामुळेच गोव्यामध्ये या नाटकाचे सलग आठ खेळ तिथल्या खेडोपाड्यामध्ये आयोजित केले गेले.

यावर्षी १०मे २०२५ रोजी रात्री लांजातील वेरळ गावात वीर शिवाजी हे नाटक आहे. ११मे ला रात्री ८ वा.आसगे गावी वीर रत्न बाजीप्रभू ,१२मे रात्री ८ वा रत्नागिरीतील वीर सावरकर नाट्यगृहामध्ये वीर शिवाजी,तर १३ मे रोजी रात्री ८ वा. वीर शिवाजी या नाटकाचा प्रयोग आसगे गावातच आहे.

आपण आपल्या कुटुंबासमवेत या नाटकांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.

सुभाष लाड

९८६९१०५७३४

Friday, May 2, 2025

मी आपला अत्यंत आभारी आहे !


नमस्कार !


जीवनातील तुम्ही सहप्रवासी

स्वर्ण जणु ते बावनकशी

महाग कधी तर स्वस्त त्यापरी

राग लोभ कधी रुसवा असूनी  

मित्रता संकटी असे भरोशी

जन्मदिनी मज आठवणीने

दिल्या शुभेच्छा ज्या ममतेने

त्यास्तव अपुला कृतज्ञ आहे

याद करा मज कधीही कुठेही

सदा सेवेशी तत्पर आहे.

आपला

सुभाष लाड

२ मे २०२५

६४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने