Wednesday, October 30, 2024

शुभ दीपावली !

नमस्कार !
        ही दिवाळी आपणास सुखाची समृद्धीची जावो ही मनापासून शुभेच्छा !
         मी आपल्या सहवासात आहे, आपल्या संपर्कात आहे याचा मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. हा आनंद मला सदोदित मिळत राहावा यासाठी आपणही आनंदीत असणे आवश्यक आहे. परमेश्वर आपणास आनंदित ठेवो. आपल्या परिवाराकडून,आपल्या मित्रमंडळी कडून, आपल्या हितचिंतकांकडून आपल्याला नेहमीच प्रेम मिळत राहो. त्या सुखाचा त्या आनंदाचा आपल्याला निखळ उपभोग घेता यावा यासाठी आपल्याला आरोग्य मिळो, आपल्याला आयुष्य मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. 
आपला 
सुभाष लाड
३१.१०.२०२४

         

Friday, October 25, 2024

मोडी दर्पण रजिस्टर पार्सलने घरी येणार !

        मोडी दर्पण दिवाळी अंक गेली अनेक वर्षे  पोस्टाने 
बुक पोस्ट या माध्यमातून येत होता. तो वेळेवर मिळत नसल्याची तक्रार बऱ्याच वेळेला येत असे. त्याचे आवरण मोकळे असल्याने तो मधल्या मध्ये काढून कुणीतरी घेतही असे. अनेक वेळेला अंक पुन्हा पाठवण्याची वेळ यायची. हा सगळा अनुभव लक्षात घेता या वेळेला आम्ही दिवाळी अंक हा रजिस्टर पार्सलने पाठविणार आहोत.त्यामुळे तो वेळेवर मिळेल याची खात्री वाटते. जर त्याला विलंब होत असेल तर आपण माध्यम द्वारे तो नेमका कुठपर्यंत आला आहे याचा शोध घेता येईल. 
            ज्या लोकांनी नोंदणी केली आहे त्याने व्हाट्सअप वर पावती पाठवली आहे मात्र अनेक लोकांचे पत्ते आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. कृपया आपण आपले पत्ते वेळेत 9869105734  या व्हाट्सअप वर पाठवून द्यावे जेणेकरून आम्हाला वेळेत अंक पाठवता येतील.
           यावर्षीचा दिवाळी अंक आपल्या संग्रहात ठेवण्यासारखा आहे त्यामुळे तो आपल्या आजूबाजूच्या वाचनालयांनी खरेदी करावा यासाठी आग्रह धरा किंवा आपण त्यांना भेट द्यावा तसेच आपल्या नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट द्यावा त्यामुळे मोडी लिपीचा प्रसार होईलच त्याचबरोबर आमच्या कोकणची समृद्ध संस्कृती अनेकांना जाणून घेण्याची संधी मिळेल.


सुभाष लाड 
संपादक 
मोडीदर्पण 

Wednesday, October 23, 2024

मित्र मंडळी सह उपस्थित राहावे !

नमस्कार ,
       आपला मोडी दर्पण दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी सज्ज आहे मात्र आपल्या उपस्थितीतच तो वाचकांच्या भेटीसाठी मार्गक्रमण करील. तेवढ्यासाठीच तर प्रकाशन समारंभाचे आयोजन. 
       या प्रकाशन समारंभाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत काही  क्षण व्यतीत करण्याची  आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यास मिळणार आहे. 
       कथालेखन स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ असल्याने त्यांनी उपस्थित राहायचे आहेच त्याचबरोबर बरोबर सहभागी स्पर्धकांनीही हा आनंद घ्यायचा आहे.
          हे वर्ष राज्यकर्त्या साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी जयंतीचे वर्ष असल्याने त्यांच्या प्रति आदरांजली वाहण्याकरिता मा. अभयराजे जगताप यांचे छोटे खाणी व्याख्यान आयोजित केलेले आहे.
          मोडीच्या प्रसार प्रचाराचे कार्य करणारे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी झपाटलेले लोक आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मोडी दर्पण कडून मोडी लिपी मित्र मंडळाकडून मोडीरत्न पुरस्कार दिला जातो यावर्षीचा  मान कोल्हापूर येथील मूळ संगणकात मोडी फॉन्ट बसवून तांत्रिक युगातही मोडीला स्थान देणारे नवीनकुमार माळी यांच्याकडे जात आहे.
        अशा या भरगच्च कार्यक्रमात आपण आपल्या मित्रमंडळी सह उपस्थित राहावे यासाठी आम्ही आपणास आवाहन करीत आहोत. 

सुभाष लाड 
संपादक 
मोडी दर्पण

कोकणच्या मातीचा गंध दरवळणारा दिवाळी अंक .......

प्रकाशन स्थळ:- 
पवई  इंग्लिश हायस्कूल पवई , 
आयआयटी मेन गेट समोर , 
पवई,मुंबई ४०००७६
        
  महाराष्ट्राच्या संस्कृतीतील दिवाळी अंक महाराष्ट्राचे वेगळेपण जाणून देत असतो. दिवाळी म्हटलं कि दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची नवलाई , नवीन कपड्यांची खरेदी, आणि घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे परंपरेने चालत आलेले मेनू हे सर्व डोळ्यांसमोर येते परंतु परंतु त्याही पलीकडे जाऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा म्हणजे दिवाळी अंक. एकट्या महाराष्ट्रात पाचशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. मराठी मुलखातला साक्षर माणूस आपण कोण कोणते दिवाळी अंक वाचले याची रसभरीत वर्णन करीत दिवाळी साजरी करत असतो. याच मांदियाळीत गेले काही वर्ष मोडी दर्पण जाऊन बसलेला आहे. गेल्या पाच वर्षात तर या मोडी दर्पण ने वाचकांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या आहेत.
           शिवकालीन मोडी लिपी ही आता केवळ इतिहास संशोधकांच्या करिताच राहिली नसून या लिपीने अनेक चित्रकारांना वेड लावले आहे, जो जो स्वतःला शिवप्रेमी समजतो तो शिवरायांचे कर्तुत्व ज्या लिपीने जतन करून ठेवली आहे त्या लिपीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जगातल्या कोणत्याही भाषेत शिघ्रलिपी नव्हती त्या काळात मराठीला शीघ्रलिपीची गरज पडावी इतका व्यस्त राज्यकारभार मराठी मुलखात चालावा याचं आश्चर्य मिश्रीत कौतुक नव्या पिढीला आहे. म्हणूनच काळाच्या पडद्याआड जावू पाहणाऱ्या मोडी लिपीला चक्क घराघरात पोहोचवण्याचं काम मोडी दर्पण करतो आहे.
        गेल्या पाच वर्षातले मोडी दर्पण आपण पाहिले तर प्रत्येक दिवाळी अंक हे वेगवेगळे विषय घेऊन आलेला आहे त्याचबरोबर त्या त्या क्षेत्रातल्या उत्तमोत्तम  साहित्यिकांचे विचारधन वाचण्याची संधी देत असतो. कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश असला तरी त्या प्रदेशाला ज्या प्रमाणात प्रसिद्धी मिळायला हवी होती ही मिळाली नाही त्यामुळे कोकणातला ज्ञानाचा खजिना सुद्धा वाचकांच्या पासून दूर राहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी या प्रदेशात कातळ शिल्पांचा शोध लागला त्यामुळे कोकण फार काही लाख वर्षांपूर्वी वसलेला आहे हे आपल्याला कळून चुकले. कोकणातल्या आज सुकत चाललेल्या नद्या काही वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत बोटी वाहून नेत होत्या यांची आज दंतकथा होऊन गेलेली आहे. या आणि अशा अनेक विषयांची माहिती मिळवायची असेल तर नवनवीन साहित्यिक, संशोधक आपल्याच मातीत तयार व्हायला हवेत. मोडी दर्पण दिवाळी अंक हा त्या दिशेने काम करतो आहे.
         यावर्षीच्या दिवाळी अंकात लुप्त होऊ पाहणाऱ्या बोलीभाषांचा मागोवा घेण्यात आला आहे तसंच ज्या तलावांनी इथल्या काही घडामोडी पाहिल्या आहेत त्या कोकणातल्या तलावांनाही बोलतं केलेलं आहे. अशा काही विविध विषयांवर लिहिणारे लेखक आणि काव्य करणारे बरेचसे कवी या मातीतील आहेत. म्हणूनच आम्ही म्हणतो कोकणच्या मातीतील दरवळ असणारा मोडी दर्पण आहे. 
        येत्या रविवारी याचे दिमाखदार प्रकाशन आहे. मान्यवर मंडळी या समयी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर कोकणच्या मातीतील  दिवाळी मेनू इथे तिथे उपलब्ध होणार आहेत. आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आम्ही आपणास आवाहन करीत आहोत.
सुभाष लाड 
संपादक 
 मोडी दर्पण 

( विशेष सूचना- प्रकाशन स्थळे मोडी दर्पण दिवाळी अंक खरेदी करणाऱ्यास मोती साबण मोफत दिला जाईल. )
       
   

        

Friday, October 18, 2024

दिवाळी बाजारात उद्योजक तरुणी !


        गेले दोन-तीन दिवस माझे मित्र बाळा चव्हाण मला फोन करून " माझी मुलगी दादरला स्टॉल लावणार आहे तेव्हा तू ही तिकडे यायचं " असं सांगत होता. सध्या मोडी दर्पण दिवाळी अंकाच्या कामामुळे मी दिवसभर प्रेस मध्ये असल्याने ठाण्याहून दादरला तिकडे पोहोचणे कठीण होते.पण  चितूची कलाकारी बघण्याचीही  ओढ होती.बाळाची   मुलगी माधवी सरफरे पण आम्ही तिला लहानपणीच्या चितू या नावानेच बोलत असतो. दोन मुलं आणि स्वतः नवरा बायको असं चौकोनी कुटुंब आनंदात आहे. नवऱ्याचाही ( मंगेश )उद्योग धंदा उत्तम चालला आहे त्याच्यामुळे तो बराच काळ बाहेर असल्याने माधवीने स्वतःला गुंतवण्यासाठी नृत्याचे प्रशिक्षण घेतले. हस्त कौशल्यातून विविध वस्तू बनवतांना बऱ्याच वस्तू तयार झाल्या. आणि मग आपण त्या बाजारात ठेवून किमान आपला गेलेला खर्च तरी काढावा तसेच आपली कलाकारी दाखवावी असं तिला वाटलं. दादरला वनिता समाजाच्या बाजूला श्रीमती अक्षता तेंडुलकर यांच्या सौजन्याने दिवाळी बाजार आयोजित केला गेला त्यामध्ये माधवीने ही एक कक्ष आरक्षित केला आहे.

            मी जरा उशिरानेच रात्री आठ वा.दिवाळी बाजारात पोचलो. सजावट पाहताच आत्ताच दिवाळी सुरू झाले आहे की काय असे वाटू लागले. मी आणि बाळा असे मनसोक्त बाजारात फिरलो. खरेदी हा काय आपला प्रांत नाही त्यामुळे आपल्या बायकोला इथे आणायला हवं होतं हे जाणवलं पण हरकत नाही अजून चार दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत हा दिवाळी बाजार असणार आहे त्यामुळे माझ्या घरातून पत्नी सून मुलगी सगळेच या बाजाराला भेट देतील कारण माधवी हे आमच्या कुटुंबाशी जोडलेली आहेच पण या बाजारात काय काय मिळेल हे मी जेव्हा त्यांना सांगेन तेव्हा सगळेच इकडे येऊ पाहतील याची मला खात्री आहे. पण आजची भेट लक्षात राहावी म्हणून मी माधवी कडून फक्त रांगोळीचे रंग भरून दरवाजात ठेवावे असे नक्षीदार गोल मी खरेदी केले.
            पुढे अनेक वैशिष्ट्य असलेले विक्री कक्ष आहेत. त्यात स्त्रियांचे फॅशनेबल कपडे त्यांची सौंदर्य आभूषणे, खवल्यांसाठीचे वेगवेगळे पदार्थ असलेले कक्षही इथे आहे त. मी मात्र थांबलो गोवऱ्या खतमिश्रित माती आणि त्याचबरोबर तुपाच्या ठेवलेल्या भरण्या पाहून माहिती घेण्याच्या दृष्टीने का स्टॉल वरती गेलो. तू तर आमच्याकडे नाशिक मधल्या घोटी वरून गवळी लोक घेऊन येतात ते दाणेदार व रुचकर असते. आम्हाला बघताच त्या तरुणींनं हसतमुख स्वागत केले. हे तुप नील गाईच्या दुधापासून बनवलेले आहे आणि विशेषता या नील गाई आमच्या गोठ्यात आहेत त्यांचे केवळ नैसर्गिकरित्या पोषण केले जाते. मुंबईत राहणारी तरुणी आमच्या गायीच्या गोठ्यातील दुधापासून बनवले जाते हे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला तो हा केवळ जाहिरातीचा भाग असावा असं वाटतं आणि म्हणून कुतूहलापोटी आपला हा गोठा आहे कुठे असे मी विचारताच. त्या तरुणीने कोरोना काळापासूनची हकीकत सांगायला सुरुवात केली. 

            तिचं नाव भक्ती कांदळगावकर, सिंधुदुर्गातल्या कांदळ गावातील हे रहिवासी पण सुखवस्तीसाठी रायगड जिल्ह्यातल्या तळा या गावा शेजारच्या वानस्ते या गावात स्थाईक झालेले. नवरा बायको दोघेही मुंबईला चांगल्या ठिकाणी कामाला. कोरोनाने अनेकांना कैक महिने घरी बसवले तर अनेकांना मुंबई सोडायला लावले.
          भक्ती आपल्या नवऱ्यासह आपल्या वारस्थे ते गावी जातात. परमेश्वरांना आपल्याला एक वेगळी संधी निर्माण करून दिली आहे असं त्यांना वाटतं आणि ते आपल्या जमिनीचा फायदा करून घेण्यासाठी नील गाई खरेदी करतात. सुसज्ज वाडा आणि गाईंसाठी हिरवं कुरण निर्माण होते म्हणजे नव्या उद्योगाला सुरुवात होते पुढच्या काही महिन्यात कष्टांची सवय होते आणि त्याचबरोबर घरात पैसा येऊ लागतो मग त्या व्यवसायाचं आवडीत रूपांतर होऊन जातं. एचडीएफसी मधली चांगल्या पगाराची नोकरी सोडून भक्ती कांदळगावकर आज या नव्या उद्योगात आनंद उपभोगत आहेत. नाही तरी पैशांपेक्षा जगण्यात समाधानच फार महत्त्वाचे असते नाही का ?
           आमच्या घरात लहान बाळ असल्याने आपण एक वेगळी वस्तू बाळासाठी व तिच्या आईसाठी ( ग्रीष्मा )  घेऊन जावी या हेतूने मी एक छोटी तुपाची बरणी खरेदी केली. अर्थात नेहमीच्या गाई म्हशींच्या तुपापेक्षा या तुपाची किंमत जास्त आहे मात्र त्या तुपाची ताकद आणि सुगंध तितकाच जास्तीचा आहे याची जाणीव होते.
           पुढच्या एकाच कक्षात तेलाच्या बाटल्या भरलेल्या पाहिल्या. जवळ जाताच गोगटे नावाच्या मुलांनं माझ्या हाती एक पत्रक दिलं आणि हे सर्व तेल लाकडी घरगुती घाण्यावरती तयार करण्यात आलेले आहे असे सांगितले. मला केरळची आठवण झाली मी ज्या ज्या वेळेला केरळला जातो त्या त्या वेळेला घरच्या घाण्यावर बनवलेलं खोबरेल तेल मी घेऊन येतो. आज  तेल मला मुंबईत मिळतंय याचा आनंद झाला.  वेगवेगळ्या जाहिराती करून रासायनिक प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे तेल आपल्याला खावे लागते त्याला इलाज नाही. पण अशा प्रासंगिक समयी तरी आपण नैसर्गिक रित्या तयार करण्यात आलेले तेल घ्यायला हवे. मी तिथून एक बाटली घेतली आणि माधवी सोबत या दिवाळी बाजारात सहभागी झालेल्या अनेक उद्योजक तरुणींना शुभेच्छा देऊन निरोप घेतला. विशेषता या तरुणींना घरूनही चांगला पाठिंबा मिळत आहे याचे कौतुक वाटले. बऱ्याच दिवसांनी बाळा भेटला असल्यामुळे आम्ही समोरच फुटपाथ वर असलेल्या कॉफीच्या दुकानातून गरम गरम काॅफीचा आस्वाद घेतला. मी उबेर मध्ये बसलो. काही क्षणभर का होईना पण मी आज आनंदी होतो तो आनंद इतरांनाही द्यावा म्हणूनच हा लेखन प्रपंच केला. 
           दादरला जाणे झाले तर शिवाजी पार्कच्या पलीकडे वनिता समाज च्या बाजूला असलेल्या दिवाळी बाजाराला भेट द्या. उद्योगात उतरणाऱ्या तरुणींना प्रोत्साहन द्या. 
         हा दिवाळी बाजार १७ ऑक्टोबर २० ऑक्टोबर या दरम्यान दिवसभर आहे

सुभाष लाड 
संपादक 
मोडी दर्पण 
१७/१०/२०२४


Friday, October 11, 2024

मोडीदर्पण दिवाळी अंक नोंदणी सुरू

नमस्कार मंडळी, 
        आपणा सर्वांचा आवडता दिवाळी सण अगदीच तोंडावर आलेला आहे. घराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि संसारासाठी लागणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपण सगळे व्यग्र असणार आहात. येणाऱ्या दिवाळीला आपण सगळेजण सामोरे जाताना गोड गोड पदार्थांची, फराळाची  मेजवानी असणारच. आज-काल घरी पदार्थ करण्याची मौज काहींना नकोशी झाली आहे तर काही ना वेळ नसल्यामुळे तो आनंद आपण घेऊ शकत नाही याचा खेदही आहे.तरीही आपण घरगुती बनवलेले पदार्थ विकत घेऊन दिवाळीचा गोडवा चाखणार आहोत. तरीही दिवाळी वैचारिक व्हावी यासाठी गेले अनेक वर्षे मोडी लिपी मित्र मंडळ ' मोडीदर्पण ' हा दिवाळी अंक प्रकाशित करीत असते. यावर्षी पंधरावा दिवाळी अंक आपल्या घरी येण्यासाठी उत्सुक आहे. 
           गेली अनेक वर्ष मोडीदर्पण हा केवळ मोडी लिपी शिकणाऱ्यासाठी आहेच तसा तो  मोडी लिपी शिकलेल्या जाणकार लोकांसाठी मोडी लिपीतले विविध विषयातले कागदपत्र आम्ही सादर करीत असतो. हे वर्ष पुण्यशील अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती चे वर्ष असल्यामुळे त्यांच्या कामगिरी वरती प्रकाश टाकणारे मोडीतील व देवनागरीतील लेखांमुळे हा अंक संग्राह्य ठरणार आहे.कोकणचं वैभव, कोकणची समृद्धी विविध विषयातून मांडताना यावर्षी कोकणातील बोलीभाषांचा परिचय करून  देणारे अनेक लेख आपल्याला वाचायला मिळतील. कोकणातील तलावे सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण स्थान मिळवून आहेत त्या तलावांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न या अंकामध्ये आहे. आपल्याकडच्या नवोदित साहित्यिकांना मोडी दर्पण दिवाळी अंकात स्थान देण्यासाठी यावर्षी ग्रामीण कथा स्पर्धेचा आयोजन केलेलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून निवडक तीन कथांना व काही उत्तेजनार्थ कथांना या अंकात स्थान देण्यात आलेलं आहे. काही नामवंत कवींच्या कविता आपल्याला आनंद देतील.  तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार अच्युत पालव गेली अनेक वर्षे मोडीदर्पणचे  मुखपृष्ठ  साकारीत असतात.
त्यामुळे अंकाला विलोभनीयता प्राप्त झाली आहे. चित्रकार सुनील वागळे यांच्या रेखाचित्रांमुळे आतील साहित्य वाचनाची ओढ निर्माण करील. एकंदरीत संपूर्ण अंक हा दर्जेदार झालेला आहे हे आपण अंक आपल्या हाती पडताच बोलाल याची खात्री वाटते. 
             अंकाची किंमत रुपये २५० आहे मात्र याच किंमतीत हा दिवाळी अंक आम्ही आपणास घरपोच करणार आहोत. सोबत क्यू आर कोड दिलेला आहेच. याद्वारे अंकाची किंमत भरून आपला पोस्टाचा पत्ता पिन कोड सहित आपण खालील व्हाॅटसअपवर पाठवून दिलात तर योग्य वेळेत आपल्याकडे अंक पोहोचवता येईल. विजय हटकर- +918806635017  
गणेश चव्हाण- 09323431092
 विराज चव्हाण - +91 99 87 954937
सुनील कदम - 94046 06882
 विजय बाराथे - +91 80 07 075366