प्रकाशन स्थळ:-
पवई इंग्लिश हायस्कूल पवई ,
आयआयटी मेन गेट समोर ,
पवई,मुंबई ४०००७६
महाराष्ट्राच्या संस्कृतीतील दिवाळी अंक महाराष्ट्राचे वेगळेपण जाणून देत असतो. दिवाळी म्हटलं कि दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची नवलाई , नवीन कपड्यांची खरेदी, आणि घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे परंपरेने चालत आलेले मेनू हे सर्व डोळ्यांसमोर येते परंतु परंतु त्याही पलीकडे जाऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा म्हणजे दिवाळी अंक. एकट्या महाराष्ट्रात पाचशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. मराठी मुलखातला साक्षर माणूस आपण कोण कोणते दिवाळी अंक वाचले याची रसभरीत वर्णन करीत दिवाळी साजरी करत असतो. याच मांदियाळीत गेले काही वर्ष मोडी दर्पण जाऊन बसलेला आहे. गेल्या पाच वर्षात तर या मोडी दर्पण ने वाचकांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या आहेत.
शिवकालीन मोडी लिपी ही आता केवळ इतिहास संशोधकांच्या करिताच राहिली नसून या लिपीने अनेक चित्रकारांना वेड लावले आहे, जो जो स्वतःला शिवप्रेमी समजतो तो शिवरायांचे कर्तुत्व ज्या लिपीने जतन करून ठेवली आहे त्या लिपीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जगातल्या कोणत्याही भाषेत शिघ्रलिपी नव्हती त्या काळात मराठीला शीघ्रलिपीची गरज पडावी इतका व्यस्त राज्यकारभार मराठी मुलखात चालावा याचं आश्चर्य मिश्रीत कौतुक नव्या पिढीला आहे. म्हणूनच काळाच्या पडद्याआड जावू पाहणाऱ्या मोडी लिपीला चक्क घराघरात पोहोचवण्याचं काम मोडी दर्पण करतो आहे.
गेल्या पाच वर्षातले मोडी दर्पण आपण पाहिले तर प्रत्येक दिवाळी अंक हे वेगवेगळे विषय घेऊन आलेला आहे त्याचबरोबर त्या त्या क्षेत्रातल्या उत्तमोत्तम साहित्यिकांचे विचारधन वाचण्याची संधी देत असतो. कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश असला तरी त्या प्रदेशाला ज्या प्रमाणात प्रसिद्धी मिळायला हवी होती ही मिळाली नाही त्यामुळे कोकणातला ज्ञानाचा खजिना सुद्धा वाचकांच्या पासून दूर राहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी या प्रदेशात कातळ शिल्पांचा शोध लागला त्यामुळे कोकण फार काही लाख वर्षांपूर्वी वसलेला आहे हे आपल्याला कळून चुकले. कोकणातल्या आज सुकत चाललेल्या नद्या काही वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत बोटी वाहून नेत होत्या यांची आज दंतकथा होऊन गेलेली आहे. या आणि अशा अनेक विषयांची माहिती मिळवायची असेल तर नवनवीन साहित्यिक, संशोधक आपल्याच मातीत तयार व्हायला हवेत. मोडी दर्पण दिवाळी अंक हा त्या दिशेने काम करतो आहे.
यावर्षीच्या दिवाळी अंकात लुप्त होऊ पाहणाऱ्या बोलीभाषांचा मागोवा घेण्यात आला आहे तसंच ज्या तलावांनी इथल्या काही घडामोडी पाहिल्या आहेत त्या कोकणातल्या तलावांनाही बोलतं केलेलं आहे. अशा काही विविध विषयांवर लिहिणारे लेखक आणि काव्य करणारे बरेचसे कवी या मातीतील आहेत. म्हणूनच आम्ही म्हणतो कोकणच्या मातीतील दरवळ असणारा मोडी दर्पण आहे.
येत्या रविवारी याचे दिमाखदार प्रकाशन आहे. मान्यवर मंडळी या समयी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर कोकणच्या मातीतील दिवाळी मेनू इथे तिथे उपलब्ध होणार आहेत. आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आम्ही आपणास आवाहन करीत आहोत.
सुभाष लाड
संपादक
मोडी दर्पण
( विशेष सूचना- प्रकाशन स्थळे मोडी दर्पण दिवाळी अंक खरेदी करणाऱ्यास मोती साबण मोफत दिला जाईल. )
No comments:
Post a Comment