आज मी वयाच्या पासष्टीचा प्रवास करतोय.माझा जन्म रिंगणे गावात एका कष्टकरी गरीब कुटुंबात झाला.आज इथून मागे वळून पाहतांना एवढा मोठा आयुष्याचा केलेला प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. बालपणाचा काळ हा निरागस असतो.या काळात झालेले संस्कार मन:पटलावर घट्ट चिकटून राहतात आणि त्यातून आयुष्याची दिशा ठरत जाते.माझे आणि माझ्या बरोबरच्या पिढीतल्या मुलांचे बालपण माझ्या घराजवळच असलेल्या हनुमान मंदिराच्या परिसरातच गेले.त्यावेळी आपसूक झालेले संस्कार माझे जीवन घडवीत गेले त्यामुळे आज मी जो कुणी आहे त्यातील चांगल्या गोष्टी मला तिथेच मिळाल्याने माझ्यासाठी हे मंदिर माझी छत्रछाया आहे असे मी समजतो.
सह्याद्रीच्या पायथ्याशी टेकड्यांनी रिंगण केलेल्या परिसरात माझ गाव वसलेलं आहे. आमच्या गावातून सह्याद्रीच्या रांगेतील एक मोठा डोंगर जो ताशीव कड्यासारखा आहे तो लक्ष वेधून घेतो. त्याला नावा कडा असे म्हणतात. याच 'नावा'कड्यातून उगम पावलेली नदी म्हणून त्या नदीचे नाव नावेरी नदी असे आहे. रिंगणे गावच्या लोक वस्तीला छेदून बरोबर मध्यातून ही नावेरी नदी बारमाही वाहत असते.पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीच्या काठावरती आमच्या पूर्वजांनी १९२७ ला श्री हनुमंताचे मंदिर बांधले. माझ्या माहितीप्रमाणे त्या काळात प्रत्येक गावात एक ग्रामदैवताचे किंवा एखादे पुराणकाळातील मंदिर सोडल्यास वाडी वस्तीवर देऊळ नव्हते.आमच्या रिंगणे गावात श्री राम मंदिर हे खासगी मालकीचे एक मंदिर सोडल्यास श्री धनी केदारलिंग मंदिरानंतर श्री हनुमान मंदिर हे पेडणेकर वाडीत पहिलेच मंदिर उभे राहिले.तसे पाहता श्री हनुमान सेवा मंडळ हे सुद्धा या परिसरातील पहिले सार्वजनिक मंडळ आहे.आज शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या मंडळाइतकी जुनी दुसरी संस्था माझ्या तरी ऐकिवात नाही.हे सांगण्याचा उद्देश एवढाच,आमचे त्या काळातले पूर्वज हे शिकलेले,समाज हिताचा विचार करणारे व दूरदृष्टीचे होते हे सांगताना अभिमान वाटतो.
मंदिर बांधले त्याच वर्षी श्री हनुमान जयंतीचा उत्सव सुरू करून त्या काळातल्या जवळजवळ दशक्रोशीतल्या आबाल वृद्धांसाठी मनोरंजनाचे एक साधन उपलब्ध करून दिलं. तेव्हाच नाट्यपरंपरेलाही सुरुवात झाली. त्यानंतर जन्मास आलेली प्रत्येक पिढी इथली नाटके पाहूनच मोठी झाली. मी ही कधीतरी असाच चेहऱ्याला रंग फासून अभिनय करीन अशी उर्मी बाळगत घडत गेलो आणि पुढे कधीतरी ती संधी माझ्या आयुष्यात चालून आली. असं करत करत पुढे आलेली नाट्य परंपरा आजही इथे दिमाखात चालू आहे.
. ( नव्याने बांधलेली प्राथमिक शाळा )आमची प्राथमिक शाळा हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूलाच होती.१० x ३० फुटाच्या दगडी मातीच्या भिंती व वरती कौलारू छप्पर असलेल्या बैठ्या इमारतीला चार खिडक्या व समोर दोन दरवाजे होते. आमच्या वाडीतील, नदी पलीकडील सुतार वाडीतील व कोंडग्याच्या सिमेवर असलेल्या कदमवाडीतील मुले या शाळेत यायची. चाळीस पन्नास मुलांचा तरी पट असायचा.आमच्या वेळी एकटे फाफे (शिवराम श्रीपत फापे,गाव आडवली)गुरुजी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग घ्यायचे. सुंदर हस्ताक्षर आणि विविध कलागुण असलेल्या गुरुजींनी प्रत्येक शारदोत्सवात आम्हा मुलांना रंग फासून आमच्याकडून नृत्य करुन घेतले.त्यात एखादे कोळी नृत्य असायचेच त्यामुळे आम्ही काठी आणि पुठ्ठा घेऊन रंगीत वल्हे बनवायचो. दसऱ्याच्या काळात पाऊस हमखास ठरलेला पण आमचा कार्यक्रम त्यामुळे कधी अडला नाही कारण आमचे हे कार्यक्रम मंदिरांच्या ओसरीच्या एका भागात व्हायचे व समोर सगळे प्रेक्षक बसायचे.माझ्या अगोदरच्या मोठ्या मुलांची 'जय जय रघुवीर समर्थ ' ही एकांकिका आणि त्यावेळी झाडावरून उडी घेणारा साधू हे दृश्य आजही डोळ्यांसमोर जिवंत वाटते. महारथी कर्ण ही एकांकिका मी चौथ्या इयत्तेत असताना देवळातच आम्ही सादर केली होती.पुढे १९७२मध्ये याच परिसरात नव्याने उभारलेल्या प्राथमिक शाळेच्या ओसरीत शंभूराजे ही एकांकिका आणि त्या शाळेच्या समोर उभारलेल्या रंगमंचावर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात. गावचे नाटक बसवले होते त्या 'वारणेचा वाघ ' नाटकात मला स्त्री पात्र करण्याची संधी मिळाली होती. मी शिपोशीत कॉलेजला असताना इथल्या शारदोत्सवात 'येथे बायका मिळतात ' ही एकांकिका मी दिग्दर्शित केली होती आणि त्या वेळेला बसवलेल्या अनेक नृत्यात अनेक मुलांनी भाग घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला होता.
( माझे आवडते शिक्षक स्व.श्री.शिवराम श्रीपत फापे गुरुजी)माझ्या लहानपणी नाटकाचा रंगमंच हा मंदिराच्या तुळशी वृंदावनाच्याच मागे मातीचा उभारा देऊन तयार करण्यात आलेला होता. या रंगमंचावर 'माझी जमीन ' या नाटकात रायपाटणचे पुरोहित किसन काका आठल्ये यांनी त्यांच्या तरुणपणी भूमिका केली होती. नाटकातल्या एका प्रसंगात टिकाव जमिनीवर मारायचे होते ते त्यांनी एवढ्या जोशात मारले की ते जमिनीत इतके घुसले की ते तात्काळ उचलता आले नाही. ही आठवण आम्हाला लहानपणी मोठी माणसं सांगत. देवळाच्या आवारातच त्यावेळेला जत्रेतील दुकाने बसायची. नाटक संपल्यानंतरच्या सकाळी आम्ही सगळी मुले तिथे एकत्र येऊन कासाराने भरताना फुटलेल्या बांगड्या इतस्ततः पडलेल्या असत त्या आम्ही गोळा करीत व ते काचेच्या बांगड्यांचे तुकडे टेंब्याच्या ज्योती वर तापवून झालेला गोल दुसऱ्या गोलात अडकवून त्याच्या माळा करत असू.तो एक खेळच होता.
माझ्या लहानपणी जत्रेला येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहिली आहे. त्या भाविकांना रुईच्या माळा तयार करून विकण्याचे काम माझ्यासहित अनेक मुले करत असत. त्यातून मिळालेले पैसे आम्ही जत्रेत खाऊ घेण्यासाठी वापरत असू.
(मुंबईत बॅंड पथकात काम करणारे श्री.केशव दिवाळे.)
आम्ही सातवीत, आठवीत आल्यानंतर उन्हाळ्यात दोन-तीन महिने एसटी गाडी सुरू व्हायची. हनुमान जयंतीला येणारे चाकरमानी त्या काळात मुंबई गाडीने लांजा स्थानकात उतरायचे व तिथून लांजा झर्ये गाडीने संध्याकाळी रिंगण्याला यायचे.( तो जुना रस्ता गांगुवाडीतून साळवे यच्या घराच्या मागून नावेरी नदीतून येत असे) धूळ उडवत येणाऱ्या व खडखड आवाज करणाऱ्या एसटीतून उतरणारा चाकरमानी एवढा धुळीने माखलेला असायचा की तो सहज ओळखून यायचा नाही. तो गाडीतून उतरला की प्रथम गाडीच्या टपा वरती चढायचा व तिथून आपला बोजा खाली सरकवायचा. खाली उतरल्यानंतर रुमालाने आपला चेहरा पुसायचा मग सगळे त्याचे घरचे त्याच्या गळ्यात पडायचे.आई, आजी त्याचे मुके घेत. कितीतरी दिवसांनी गावाकडे येणारा चाकरमानी हे त्यावेळी मोठं कौतुक असायचं.उतरणारा माणूस एक असला तरी त्याला घ्यायला दहा लोक असत आणि मग ही वरात त्याच्या घरापर्यंत जात असे. वाडीतला चाकरमानी हा आपल्याच घरचा चाकरमानी आहे अशी आपुलकीची भावना समाजात होती.
( सेानिवृत्त सैनिक स्व.जगन्नाथ पेडणेकर श्री मारुतीराया ची वेशभूषा करीत.)
मंदिराचा सुवर्ण महोत्सव पाहण्याचे भाग्य आम्हांस मिळाले.त्यावेळच्या मंदिर प्रदक्षिणेच्या मार्गावर लाकडाच्या भुशाला रंग देऊन त्यातून काढलेली भव्यदिव्य रांगोळी.उंच देहयष्टी लाभलेल्या जगन्नाथ पेडणेकरांनी केलेली मारुतीची रंगभूषा, केशव गोविंद दिवाळेंनी मुंबईहून आणलेले बॅंड पथक, जयराम दिवाळेंची मोराची वेशभूषा व ' नाच रे मोरा' या गाण्यावर चे त्यांनी केले नृत्य आणि व्यायामपटू रत्नाकर महादेव पेडणेकर यांनी एकवीस खुर्च्यांवर केलेली कसरत
( त्याकाळात कसरतपटू म्हणून नामांकित असलेले स्व. श्री रत्नाकर म.पेडणेकर )(खुर्च्या बॅलन्स करण्यासाठी खाली चिमणीच्या काचा ठेवण्यात आल्या होत्या.)आणि जोकर सारखा पेहराव करून दोन काठ्यावर उभे राहून चालणे हे आकर्षक चित्र बालमनावर गोंदले गेले.हा दोन काठ्यांवर चालण्याचा प्रकार आम्ही नंतर खेळ म्हणून खेळत होतो तशी पंचक्रोशीतील मुले सुद्धा वेड लागल्यागत ती कसरत करीत होती. या उत्सवात हळदीकुंकूच्या कार्यक्रम माझ्या शांताराम मामांची मुलगी अरुणा हिने " झूठ बोले कौआ काटे ' हे गाणे तिने गायीले.तिचा तो गोड आवाज आणि गाणे सादर करण्याचा आत्मविश्वास यामुळे ते गाणे सर्वांना आवडले. तिला आणखी गाणी म्हणण्याचा आग्रह झाला.एवढेच काय रात्री नाटक सुरू होण्याअगोदर तिला गाणे काम करयला लावले. तिने गायलेल्या "बोले रे पपीहा " या गाण्याला मिळालेल्या टाळ्या आजही कानात घुमताहेत असे वाटते.दुर्दैवाने अरुणा आज हयात नाही पण तिचे ते गाणे कायमचे सोबत आहे.
(हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले स्व.जयरामबुवा दिवाळे )
याच मंदिरात श्रावण महिन्यांतील सणांचा आनंद लुटता आला.स्त्रियांच्या रात्र गाजवणाऱ्या फुगड्या आणि नावेरी नदीचा खळखळ वाहणाऱ्या प्रवाहाचा नाद ऐकत रानातल्या गोष्टी एकमेकाला सांगता सांगता देवळाच्या कोपऱ्यातल्या पिरशावर पाठीचा कणा गरम करणारी वयोवृध्द माणसं , त्यांच्या बाजुला मेंढीकोटचा डाव मांडून बसलेली तरणी,मध्यम वयाची माणसं आणि चहा ढोसायला मिळते म्हणून जागी राहणारी आम्ही मुलं असं अख्खं देऊळ भरलेलं दृश्य डोळ्यांत साठवून मुंबईत आलो. मुंबईने पैसा - अडका सर्व काही दिलं पण माझ्या देवळाने दिलं त्याला जगात तोड नाही.याच श्रावणातला आमच्या देवळात चालणारा दही हंडीच्या कार्यक्रम ज्याने पाहिला किंवा जो त्यात सहभागी झाला तो भाग्यवान.आम्ही सगळी मुले सकाळी नऊ च्या दरम्यान एकत्र येऊन प्रत्येक घराच्या अंगणात नाचायचो " या घरात नाही पाणी, घागर उताणी रे वन माळी " असे तालावर म्हणायचो. प्रत्येक घरातून कळशा भरून पाणी आमच्यावर ओतलं जायचं. सगळे भिजून पुन्हा देवळाच्या परिसरात एकत्र यायचो. इथे तर प्रेक्षकांची तोबा गर्दी असायची. कारण जयराम बुवा दिवाळे यांचा कालिया आणि केश्यानानांच्या अनंद्याचा श्रीकृष्ण ही पात्रे कालिया मर्दन चे सादरीकरण करायचे.हरहून्नरी जयराम बुवा दिवाळ्यांचा कालिया चक्क चिखलात लोळायचा व त्यांच्या अंगावर छातीवर बसून अनंद्या बाळकृष्ण होऊन मुठ्ठी मारायचा. तो पाहिलेला जिवंत अभिनय मी जेव्हा नाटकात उभा राहतो तेव्हा मला आठवतो. तो अभिनय माझ्यासाठी आदर्श आहे.
( १९७१ साली प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड च्या उद्घाटन प्रसंगी आमच्या नाट्य मंडळांने 'दुरितांचे तिमीर जावो.'या नाटकाचा प्रयोग केला त्यावेळचे हे छायाचित्र)
मला चित्रकलेची किंवा शिल्पकलेची आवड निर्माण झाली त्याचे बीजही मारुती मंदिरातच आहे. सुतारवाडीतले नारायण पांचाळ यांना आम्ही जीजी म्हणत असू त्यांचा गणपतीचा कारखाना पावसाळ्यातील दोन अडीच महिने देवळातच असायचा. जमिनीतील माती आणण्यापासून तिच्यातील दगड काढून ती लाकडावरती चेचण्यापासून ते तिचा गोळा करी पर्यंतची सगळी कामे आम्ही लहान मुले करत होतो. जसे मोठे होत गेलो तस तसे मुर्तीला डोंगा मारणे, पाटाला रंग देणे, अशी सुरुवात करून पूर्ण मूर्ती बनविण्याचा, तिला पूर्ण रंगवून अगदी डोळ्यांची आखणी करण्याचा अनुभव आणि आत्मविश्वास मला इथेच मिळाला.
माझ्या वयाच्या व थोड्या मागे पुढे असलेल्या मुलांचं शाळेतून घरी आल्यानंतर चुलीजवळ काय असेल ते पोटात टाकायचे आणि चक्क देऊळ गाठायचं असं नित्याचं ठरलेलं.देवळात तेव्हा मोठा लाकडी पेटारा असायचा त्यावर काही जण आणि गाभाऱ्याचे मागे काही जण झोपायचो.कुठे नाटकाचा खेळ असेल तर संध्याकाळी लवकर जेवण उरकून रस्त्याने किंवा डोंगरवाटा तुडवत जायचो.नाटक संपलं की अर्ध्या झोपेतच तंगड ओढ करत पुन्हा देवळात येऊन ताणून द्यायचो.काहीजण दफ्तर देवळातच आणून ठेवत म्हणजे इथेच चूळ भरून सकाळच्या शाळेत हजर राहायला मोकळे.दुपारी पुन्हा नदीत आंघोळ करायला एकत्र यायचं.रात्री गॅसबत्ती लावून भात कापणी,नाचणी कापणी,भात झोडपणी करायला आम्ही हौसेने जात असू कारण त्यापैकी दोन-तीन मुलांनी नदीत मासे पकडण्याचे काम करायचं हे ठरलेलं असे.तेच मासे मग जेवणाला असायचे. नळे परतणीसाठी आम्हां मुलांना मोठी मागणी असायची ते काम सकाळी लवकर सुरू करावे लागायचे कारण एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कडाका असायचा, नळ्यांना लागलेल्या काजळीने अंगाची लाही लाही होत असे. ऊन जास्त चढू लागताच आम्ही सगळेजण नदीत येऊन तासभर डुंबायचो. ज्याच्या घरी नळे परतायचे त्याच्या घरी जेवायचं आणि ऊन उतरल्यावर पुन्हा कामाला सुरुवात करायची. आज नळेही नाहीत, गवताची उटीही नाही. तशी शेतीही संपली आहे.पण आम्ही मोठे भाग्यवान की बालपणीच शेतीच्या त्या कामातून घेतलेला आनंद आठवणीतून पुन्हा उपभोगतो आहोत.
( स्व.श्री. गणपतबुवा पेडणेकर यांनी मला नाटकातील गाणी शिकवली.)ते आमच्या आठवणीतील मंदिर बदलत्या काळाप्रमाणे आता बदलले आहे. आमच्या पूर्वजांनी बांधलेले मंदिर शंभर वर्षे टिकले. अर्थात त्यांनी त्या वेळेला लाकूड कामाचा पुरेपूर उपयोग करून घेतला म्हणूनच त्या मंदिराला मोठे आयुष्य मिळाले.
( वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले नव्याने बांधलेले मंदिर)आज आमच्या पिढीने मंदिराचा जिर्णोद्धर करताना पूर्वजांच्या विचारसरणीचा आदर राखून लाकूड कामाचाच पुरेपूर वापर केला आहे. त्या लाकुड कामाला अधिकाधिक सुशोभित करण्यासाठी नक्षीकामाची जोड दिलेली आहे त्यामुळे हे ही मंदिर शतकोत्तरीचा प्रवास करील याची खात्री वाटते. या मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने नेहमीच गर्दी उसळलेली आम्ही पाहिली. तशी ती यापुढेही असेल याबद्दलही दुमत असण्याचे कारण नाही. इथल्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा मंदिर प्रदक्षिणेच्या वेळी, भजनाच्या वेळी तत्कालीन सुप्रसिद्ध भजनी बुवा गणपत आप्पा एक आवर्जून गजर घेत तो आजही घेतला जातो
"या या जागेची महिमा
गोकुळ उतारले रामा"
तो याही पुढे तेवढ्याच श्रद्धेने घेतला जाईल आणि तेवढ्याच श्रद्धेने इथे भाविक गर्दी करतील. कारण प्रत्येक पिढीला संस्कारीत करणारे हे श्री हनुमान मंदिर आहेच.
🌱🌱🌱🌱🌱🌱
श्री. सुभाष लाड.रिंगणे, ता. लांजा(९८६९१०५७३४)
🚩🚩🚩🛕🛕🛕🚩🚩🚩🛕🛕🛕🚩🚩🚩
आपली देणगी इथे देऊ शकता.
*श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रिंगणे पेडणेकरवाडी*
*ब्रांच नेम = 1705 रिंगणे कोंड*
*कस्टमर id = 100676145*
*अकाउंट नंबर=* *1705006101313*
*IFSC code=* *IBKL0574RDC*
आपण बॅंकेत पैसे भरल्यास त्याची पावती व आपले नाव वरील वाॅटस अपवर पाठवा.आपणास रितसर पावती देता येईल.
🚩🚩🚩🛕🛕🛕🚩🚩🚩🛕🛕🛕🚩🚩🚩
अभिप्राय --
१) श्रीराम हांदे, खोरनिनको
*श्री. सुभाष महादेव लाड*
*पायांना चक्राकार गती लाभलेलं द्रुतगती लयीचं भारदस्त व्यक्तीमत्व* ❗🌹👏
या पासष्टीच्या पराक्रमी. . पांथस्थाचे पदभ्रमण
सामाजिक संवेदनांच्या
आध्यात्मिक अध्यापनाच्या
संतांच्या साहचर्याच्या
साहित्य शारदेच्या
संमेलनांच्या सौहार्दांच्या
राजमार्गावरुन अखंडित राहो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏