मुळातच साळवी यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे परळ भागातील केईएम हॉस्पिटल मध्ये गाव खेड्यातून येणाऱ्या कोणत्याही आजारी माणसाला मदत हवी असल्यास सुधीर साळवींना फोन जातो. समोरचा माणूस कोण आहे याचा विचार न करता तो अडचणीत सापडलेला आहे ही एकच जाणीव ठेवून सुधीर साळवींनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे.
साळवी यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील रिंगणे हे आहे. आपल्या रिंगणे गावावरती त्यांचे अलोट प्रेम आहे. गावाच्या पारंपारिक सण उत्सवांमध्ये ते त्यांच्या परीने सहभागी होण्याचा प्रयत्न करतात.गावचे ग्रामदैवत धनी केदारलिंग या दैवतावर त्यांची असीम भक्ती आहे आणि म्हणूनच प्रत्येक शिमग्यातील पालखी महोत्सवात गावी जाऊन ते सहभागी होतात. आपल्या देवाला आपण चांदीच्या पालखीत बसवावे हे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी श्री केदारलिंग देवाला चांदीने मढवलेली पालखी अर्पण केली. लालबागच्या राजाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गावांना उभारी देण्याचे काम केले जाते त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांच्या साठी मुलांना अभ्यासासाठी एकांत वासाची जागा आणि त्याचबरोबर सुसज्ज ग्रंथालय उभं करण्याचं काम केलं गेलं. गरजू रुग्णांना मोफत डायलिसिसची सेवा देण्याचं काम या संस्थेकडून केलं जातं. जगभरातल्या भक्तांनी भक्तीभावाने लालबागच्या राजाच्या तिजोरीत टाकलेले दान हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यासाठी वापरले जाते हे लालबागच्या राजाचे मोठेपण आहे. या संस्थेवरती काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते व येथील स्थानिक रहिवाशी यांना सुद्धा धन्यवाद द्यायला हवेत.
त्यादिवशी सुधीर साळवींना निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे राहण्याचे सांगण्याकरता आलेल्या हजारो लोकांना सुधीर साळवींनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला आणि आपण योग्य वेळी आपल्यासमोर येऊ असे सांगितले. लोक माघारी फिरल्यानंतर त्यांनी शांतपणे विचार केला आणि माध्यमांवरती त्यांचा एक बॅनर फिरला त्यात फक्त दिनांक वेळ स्थळ आणि एकच वाक्य होतं 'मला तुमच्याशी बोलायचं आहे' दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्या पासून हजारोंनी लोक लालबागच्या मार्केट जवळ एकत्र येऊ लागले. त्याच वेळेला सुधीर साळवी यांना पक्ष कार्यालयाकडून बोलावणं आलं. सुधीर साळवी परत येईपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले तरीही दहा हजारांचा त्यांचा चाहता वर्ग त्यांची वाट पाहत नुसता उभा होता. सुधीर साळवी यांनी व्यासपीठावरती प्रवेश केला आणि ' सुधीर साळवी जिंदाबाद ' च्या घोषणा पूर्ण मार्केटमध्ये निनादून गेल्या. " आपण शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. पक्षप्रमुखांना सर्वांना न्याय द्यायचा असतो. त्यांच्या निर्णयाला आपण कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवून सहकार्य केले तरच खऱ्या अर्थाने आपण पक्ष म्हणून काम करू शकतो. त्याप्रमाणे आज पक्षप्रमुखांनी मला थांबायला सांगितलेलं आहे. मी पक्षप्रमुखांचा आदेश मानतो......
" तुमच्या मनातील आमदार मी आहे, यापुढेही मी आपली सेवा करणार आहे त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये उद्यापासून आपण आपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे."
आज काल सकाळी गुलाल हातात घेऊन शपथ घेणारा संध्याकाळी आपल्या सगळ्या निष्ठा खुंटीला बांधून कोणाच्याही गोठ्यात दावणीला जाताना दिसतोय. निवडणुकीचे राजकारण इतकं भ्रष्ट झालं आहे की लोकांचाच पैसा लोकांनाच देऊन त्यातून मते विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कींव यावी अशा प्रकारची
अवस्था लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे उद्या लोकशाहीचं काय होईल ? हा प्रश्न आवासून पुढे उभा आहे.पुन्हा इथे लोकशाहीतूनच संस्थानिक झालेल्या लोकप्रतिनिधींचीच राजेशाही तर इथे रूजणार नाही ना अशा प्रकारची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे खरे पाहता सुधीर साळवी यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासोबत असलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना योग्य आहे असा वाटला. त्याचबरोबर आमच्या हृदयातली त्यांची प्रतिमा अधिक उंचावली. कारण कुठल्या ना कुठल्या लोभाच्या पायी, सत्तेच्या हव्यासापोटी अनेक लोक तत्वनिष्ठा गुंडाळून, नात्यांचीही कदर न करता कुठेही उड्या मारतात त्यापैकी रिंगणे गावचे सुपुत्र सुधीर साळवी नाहीत याची खात्री झाली.आम्हाला त्यांचा अभिमान वाटला.
मा. सुधीर साळवी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करणे त्यातून स्वतःला मिरवणे मुळीच आवडत नाही. आज ते पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी दिवसभर पंढरपूरला वास्तव्य करतील. पांडुरंगाकडे सर्वांसाठी सुख शांतीची मागणी करतील. पांडुरंगही ' तथास्तु ' म्हणेल. तो आशीर्वाद आणि उर्जा म्हणजे त्यांच्यासाठी वाढदिवसाची भेट असेल.
सुधीरभाऊ परमेश्वर आपणास आयुरारोग्य प्रदान करो ही आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करिता आहोत.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
९८६९१०५७३४
. वाढदिवसाच्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर ते परतीचा प्रवास करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुंबईत पोहोचतात. दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळी सहा वाजता ते नेहमीप्रमाणे एमडी कॉलेजच्या एका बैठकीच्या खोलीमध्ये बसतात. आज मात्र त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढलेली असते.
मी आज सायंकाळी ८ वा. संघातील सहकाऱ्यांना घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एमडी कॉलेजमध्ये पोहोचलो. तर तिथे जत्रेचं स्वरूप आल्याचे दिसले. सुधीर साळवी यांचे आणि माझेही परममित्र प्रदीप अपंडकर उर्फ बावा प्रवेशद्वारावर भेटले. महालक्ष्मी कला मंच या नाटक कंपनीतील वीर रत्न बाजीप्रभू या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे प्रणय धाडवे भेटले. तोपर्यंत काशिनाथ पावसकर आणि श्रीकांत कडणे येऊन दाखल झाले. रात्रीचे नऊ वाजले होते. पण हातात केक आणि पुष्पगुच्छ घेऊन येणाऱ्या चाहत्यांची गर्दी कमी झाली नव्हती. मला पवईला निघायचं असल्याने आम्ही त्या गर्दीत घुसलो. बैठकीच्या खोलीत पाहतो तर रांग लावली होती. आम्ही त्या रांगेत उभे राहिल्याने ती राग अधिक मोठी झाली पण माझ्या गावच्या एका व्यक्तीसाठी एवढ्या संख्येने लोक येतात हे पाहून ऊर भरून आला. त्याच रांगेत राहून सुधीर साळवींना शुभेच्छा देणं आम्ही अधिक पसंत केले. न बोलावता एवढी मंडळी जमा होते तर कार्यक्रमाचं आयोजन केलं तर किती तरी दूर दूरहून लोक येऊन गर्दी करतील या बद्दल शंकाच नाही. येथे जमलेला ना रक्ताचा ना नात्याचा फक्त एक भाव होता तो जिवास जीव देणाऱ्या मित्राचा.
ll गणपती बाप्पा मोरया ll
🌿🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🚩🍁🌿