Sunday, June 30, 2024

प्राचीनत्वाची साक्ष देणारे उगवाई मंदिर व येरडवची पाज





    "सावकाश उतरा ! घसराल ! " असे म्हणत उभे राहिलेले आप्पा साळवी समोरच्या दरीत उतरणारी दगडी पायवाट आम्ही उतरायला लागलो तेव्हा त्यांना काहीतरी आठवल्यासारखे म्हणाले " अहो याच वाटेवरून माझे चुलते मलकापूरच्या बाजाराला जायचे. माझ्या चुलत्यांचे दुकान तळवड्यात होतं. ते तळवडे गावातून येरडवला स्वतःच्या बैलगाडीने येऊन रात्रीच थांबायचे. सकाळी साडेचार वाजता सोबत कंदील घेऊन या वाटेने वरती यायचे हीच ती पाज." 

         राजापूर तालुक्यातील तळवडे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. आप्पा साळवी,अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य पाचल गावचे माजी उपसरपंच  किशोरभाई नारकर , खापणे कॉलेजचे प्रा. विकास पाटील व लांज्यातल्या कल्पना कॉलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण यांना सोबत घेऊन आज आम्ही अणुस्कुरा घाटातील उगवाई मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. खरं तर याच घाटात राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने या पावसाळ्यात वडाची व पिंपळाची झाडे लावण्याचा बेत असल्याने झाडे कुठे कुठे लावायची याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आलो असताना ऎतिहासिक उगवाई मंदिरालाही भेट द्यावी असे आम्ही सर्वांनी ठरवले.परतीच्या प्रवासात वाटेवरच असलेल्या राजू पत्की यांच्या घरी गेल्यानंतर त्यानी केलेले आदरातिथ्य आम्ही कधीही विसरू शकत नाही.

         मुख्य रस्त्यापासून पाऊण कि.मी. वर असलेल्या या उगवाई मंदिराच्या अगोदर गर्द झाडी लागते. गाडी जाऊ शकेल असा चांगला रस्ता असल्याने त्या शितल छायेतून विविध पक्षांचे आवाज ऐकत चालायला तर मजाच येते. आम्ही उगवाई  मंदिरात जाऊन दर्शन घेतलं,आजूबाजूचा परिसर फिरलो आणि उजवीकडे असलेल्या पाजेकडे वळलो.
         पाज म्हणजे घाटातून जाणारी पायवाट. वर्षा ऋतुत ती चढतांना जेवढी पायवाटेवर आलेल्या हिरवट बुरशीवरुन तोल सांभाळत जीव कंठाशी येतो तर सरळसोट जागेवरून वरती चढतांना छातीला माती दगड घासतच मातीच्या, दगडांच्या खोबणीत पावलं घट्ट रोवून व हातास मिळेल त्या वर आलेल्या दगडांचा, झाडांच्या मुळांचा किंवा कारवीच्या  फांदीचा आधार घ्यावा लागतो.उतरतांना तर बुड जमिनीला घासतच उतरावं लागतं. इतकी कठिण असलेली वाट हे चित्र पाज हा शब्द उच्चारल्यावर लक्षात येते. 
            सह्याद्रीचा माथ्यावरचा भूभाग म्हणजे देश आणि सह्याद्रीचा पायथा म्हणजे कोकण.श्री परशुराम या स्वर्गीयसुंदर भूमीचा निर्माता.पूर्वी या माथ्यालगत समुद्र होता तो परशुरामाने हटवला आणि कोकण किंवा अपरांत निर्माण झाला अशी कोकणच्या निर्मितीची कहाणी आहे.समुद्र जसजसा कमी होत गेला तसतशी लाटांची नक्षी सह्याद्रीवर ठेवून गेला ते सह्याद्रीकडे पाहिले कि सहज लक्षात येते.इथे लोकवस्ती व्हावी या हेतूनेच कोकणची निर्मिती झाली.तशी ती वस्ती हळूहळू अवघ्या कोकण भूमीत पसरली.हा काळ लाखो वर्षे मागे जातो.ज्याकाळात माणूस व त्याचं बोलणं हे लिपीबद्ध झाले नव्हते त्याकाळात आपल्याला काय म्हणावयाचे आहे हे सांगण्यासाठी,संवाद साधण्यासाठी तो चित्रांचा उपयोग करीत होता. अश्मयुगातही कोकणात लोक राहात होते ,मानवी संस्कृती नांदत होती हे सांगणारी कातळखोद शिल्पे आता प्रकाशात आली आहेत.
          कोकण प्रांत निर्माण झाल्यानंतर या कोकणात आलेली माणसं ही देशावरूनच खाली आली.अर्थात आजच्या पाजा ज्या  आपल्याला दिसत आहेत त्या त्या काळापासूनच्या आहेत. प्राचीन काळी, शिवकाळात व अलीकडे ६०-७० वर्षांपूर्वी ज्या वेळेला पक्क्या रस्त्यांची निर्मिती झालेली नव्हती तेव्हा देशाचा आणि कोकणचा अंतर्गत व्यापार हा अशा घाटातील पाजेच्या वाटेवरून होत असे. काही पाजांतून हत्ती ,घोडे जात तर काही पाजांवर गाढव, बैल यांचा वापर करून व्यापार केला जात असे. ज्या पाजांवरून माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्या वेळेला त्या पाजांवर दगडाने पायऱ्या बांधण्यात आल्या. तशी ही बांधलेली पाज कोकणातील येरडव व देशावरील अणुस्कुरा या गावाला जोडलेली आहे.तिला येरडवची पाज म्हणतात.
     
  
          सह्याद्रीच्या पायथ्याला सह्याद्रीच्या उपरांगा किंवा छोटे छोटे पर्वत जोडले गेलेले आहेत. दोन डोंगरांच्या मध्ये वस्ती असून तेवढ्याशा खोऱ्यांत पाच दहा पाच  वसलेली आहेत. विशाळगडावरून पश्चिमेला देवडे भोवड्यात उतरणारी पाज आहे. देवडे- भोवडेच्या परिसरात भडकंबा, कोंडगाव, साखरपा, पुर्ये अशी गावे आहेत. पुढे विशाळगडावरून माचाळ मार्गे कोचरीत उतरल्यावर सालपे, शिपोशी तर त्याच्या पलीकडे  विशाळगडावरून दक्षिणेकडून उत्तरेकडे खाली उतरल्यावर खोरनिनको,प्रभानवल्ली, कोर्ले ही गावे वसली आहेत.त्यापुढे देशावरच्या गावडी या गावातून हर्दखळ्यात उतरणारी पाज आहे त्या पाजेला जोडलेली हर्दखळे, कोळेवाडी भांबेड अशी गावे आहेत. कुरंगची पाज आणि झर्येची पाज कुरंग आणि झर्ये गावात उतरते. या गावांच्या पुढे पश्चिमेकडे कोंडगे रिंगणे ही गावे लागतात.या खोऱ्याला नावेरीचं खोरं म्हणतात. कारण याच खोऱ्यातून नावेरी नदी वाहत असते.येरडवच्या पाजेतून खाली उतरल्यावर येरडव, पांगरी, करक, कारवली व खाली  पाचल अशी गावे लागतात तर काजिर्डा पाजेतून खाली उतरल्यावर काजीर्डा, कोळंब,मूर ,सावडाव, मिळंद, हातदे अशी गावे लागतात. या भागाला जामदा खोरं म्हणतात.सह्याद्रीच्या या उप रांगांच्या अशा खोऱ्यातून  पंचक्रोशी वसलेल्या आहेत.या प्रत्येक खोऱ्यातून  पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत.ही सगळी गावे वलाटीत मोडतात.या गावापासून समुद्र किनारा बराच लांब असल्यामुळे या सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांचा बाजारहाट देशावरच्या बाजारपेठांतून व्हायचा.कोकण किनाऱ्यावर वसणाऱ्या लोकजीवनापेक्षा वलाटीचे लोकजीवन वेगळे असून किनारपट्टीवरील लोक ताजे मासे व भात खातात तर वलाटीतील माणसे भात,नाचणीची भाकरी आणि रानभाज्यां खात असतात. खलाटीच्या लोकांच्या जीवनात ओला नारळ असतो तर वलाटीच्या लोकांच्या जेवणात सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो अर्थात किनारपट्टीवर नारळीच्या व सुपारीच्या मोठमोठ्या बागा असतात त्या बागा वलाटीत दिसत नाहीत. वलाटीला काळा दगड जास्त प्रमाणात आढळतो तर खलाटीला जांभा दगड असतो. वलाटीत साग, खैर अशा झाडांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात असतं. वलाटीला भरपूर पाऊस पडत असला तरी ते पाणी लवकरच वाहून जाते. उन्हाळ्यात या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते परंतु खलाटीत सह्याद्री कडून आलेल्या नद्या संथ होतात आणि बारमाही वाहू लागतात. आज-काल हापूस आंब्याच्या बागा सगळीकडे दिसत असल्या तरी वलाटीच्या बागांपेक्षा खलाटीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळधारणा होते. एकूणच वलाटीचा भाग संपन्नतेच्या दृष्टीने हा काहीसा मागे आहे. खलाटी आणि वलाटी हा भाग समजून घ्यायचा असेल तर ढोबळ मानाने मुंबई गोवा रोडच्या डावीकडे सह्याद्रीचा भाग दिसतो तो वलाटी समजावा आणि रस्त्याच्या उजवीकडे समुद्र किनाऱ्याकडे जाणारा भाग हा खलाटी समजावा. 
         सत्तर वर्षांपूर्वी आस्मादिकांच्या आजोबांचे दुकान वलाटीतील रिंगणे गावी होते त्या दुकानात येणारा किराणा माल हा कुरंगच्या पाजेतून बैलांच्या पाठीवरून आणला जात असे याच्या अनेक कथा आस्मादिकांना बालपणी ऐकायला मिळाल्या. त्या काळात देशावरून गुरांची खरेदी विक्री करण्यासाठी येणारे हेडे पाहिलेले आहेत. त्यांची व्यापार करण्याची भाषा काहीशी सांकेतिक होती याचाही अनुभव घेतलेला आहे. ते हेडे देशावरून येताना मोठमोठी खिल्लारे घेऊन यायचे व कोकणातून वृद्ध आणि बिनकामाची जनावरे घेऊन जात असत. ते ती जनावरे कोल्हापुरातील कत्तलखान्यात नेऊन विकतात हे ऐकून आम्हाला त्यांचा भरपूर राग येत असे आणि त्यांच्या मागे जबरदस्तीने हाकल्या जाणाऱ्या जनावरांची दया येत असे.
         सह्याद्रीच्या माथ्यावर असलेले अनेक गाव कोकणाशी इतके जोडलेले होते की त्यांची सोयरीक होत असे. याच पाजांतून अनेकांच्या लग्नाच्या वराती गेल्या आहेत तसेच आल्या आहेत. अवघे आयुष्यच पायी चालण्यात जात असल्याने या प्रवासाचाही त्यावेळी कंटाळा येत नसे. माहेरच्या ओढीनं माहेरवासिनींना हसत हसत पाजेच्या वाटा मळल्या असतील. मात्र वृद्धापकाळात आपल्याला हा चढणी उतरणीचा प्रवास होऊ शकणार नाही याची खंत ही त्यांना लागून राहिली असेल. त्या कल्पनेने डोळ्यांत पाणी जमा होते. 
        अणुस्कुरा घाटातून वर गेल्यानंतर अणुस्कुरा गाव लागतो. त्या गावात ज्या ठिकाणी एसटी वस्ती करते त्या मुख्य थांब्यावर चंद्रकांत पाटील यांचे उपाहारगृह आहे. त्यांची आई ही कोकणातल्या रिंगणे गावातल्या गोविंद पेडणेकर यांची मुलगी. चंद्रकांत पाटील इयत्ता पाचवी सहावी साठी आमच्या रिंगणे गावातील प्राथमिक शाळा नंबर १ या शाळेत आमच्या सोबत शिक्षण घेत होते. त्यांनी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या गावात जाऊन उपहारगृह सुरू केले. आजही मी तिकडचा प्रवास करत असताना त्यांच्या उपहायगृहात  जाऊन चहा घेतो व मित्राची विचारपूस  करतो.
         कोकणात उत्पन्न होणारे नारळ,सुपारी, सुकी मच्छी, भात अशा प्रकारच्या वस्तू देशावरती जायच्या तर देशावरून घोंगडी,साड्या, धोतर, कांदे,बटाटे, गूळ अशा वस्तू कोकणात यायच्या.पूर्वी तर रस्ते नव्हते आणि बैलगाडी किंवा बैल, गाढव याच्या व्यतिरिक्त मालाचे ने- आण करण्यासाठी अन्य साधने नव्हती . बैलगाडी तर देशावरून कोकणात किंवा कोकणातून देशावर जाऊ शकत नव्हती मात्र बैलाच्या पाठीवरून किंवा गाढवाच्या पाठीवरून किंवा मनुष्यांच्या डोक्यावरून मालाची ने-आण होत असे. त्याच्यासाठी सह्याद्रीतल्या पाजा हा एकमेव  पर्याय उपलब्ध होता. राजापूर किंवा लांज्यात उतरणाऱ्या पाजांपैकी एरडवची पाज ही विशेष  रहदारीची असावी. राजापूरच्या वखारीतून येणारा माल हा त्या काळात विशाळगडाकडे व पन्हाळा किल्ल्यावर  नेण्यासाठी येरडवच्या पाजेचा उपयोग होत असे आणि म्हणून ही पाज दगडाने बांधून घेतलेली आहे. तसेच सह्याद्री चढून वरती गेल्यानंतर सदरचा माल पुढे बैलगाडीतून नेण्यासाठी बैलगाडीचा रस्ता ही तयार करण्यात आलेला होता.त्या रस्त्याच्या सीमा दाखवणाऱ्या दोन्ही बाजूला बसवलेले दगड इथे आजही बघायला मिळतात. याच रस्त्याखालून एक छोटीशी वहाळ वाहते.पावसाळ्यात त्या वहाळीचा त्रास होऊ नये म्हणून त्या वहाळीवर काळ्या दगडानी बांधून घेतलेले आज कालच्या बंदिस्त गटारासारखं जे काम आहे ते विशेष बघण्यासारखं आहे. जिथे उगवाई मंदिर आहे त्या मंदिराच्या आसपास गोदामे असण्याची शक्यता आहे. व्यापारी लोकांची राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली गेली असली पाहिजे. मोठ्या प्रमाणात चलनाचा वापर येथे होत असल्याने इथल्या आजूबाजूच्या परिसरात जुने नाणी मिळण्याचीही शक्यता आहे. आज या दोन्ही बाजूला प्रचंड झाडे वाढलेली असल्यामुळे या जुन्या वास्तूंचे बांधकाम दिसून येत नाही मात्र त्याचे संशोधन होण्याची गरज आहे.या पाजेत पाण्याची व्यवस्था आहे. उगवाई मंदिराच्या थोडं खाली उजवीकडे गेल्यास पाज जिथून सुरू होते तिथे एक मोठी शिळा आहे त्या शिळेच्या वरच्या सपाट पृष्ठभागावर देवनागरी लिपीतील मसुदा आहे. तो कदाचित व्यापाऱ्यांना किंवा प्रवाशांना काही संदेश असेल किंवा एखाद्या राजघराण्याची सनद असू शकते. हा दगड जिर्ण होत चाललेला असल्याने त्यावरची अक्षरे काही वर्षानं पुसट होतील त्यामुळे इतिहास संशोधकानी लवकरात लवकर त्या शिळेवरच्या अक्षरांचा अर्थ बोध करून घेणे आवश्यक आहे. त्यातून कोकणच्या इतिहासावरती प्रकाश पडण्याची शक्यता आहे.



          या उगवाई मंदिरात शंकराची पिंडी असून पाठीमागच्या भागात सुळक्यासारखे दगड देव म्हणून ओळीने ठेवण्यात आलेले आहेत. त्या काळात त्यांची काही विशिष्ट नावे असू शकतील. या मंदिराला पांडवकालीन मंदिर म्हटलं जातं परंतु मंदिराच्या बांधकामात घडीव काळे दगड व व घुमटाकरिता छोटे दगड व चुना यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर शिवकाळात बांधले गेले असावे. असे खात्रीने वाटते.हे मंदिर वरच्या भागात घाटमाथ्यावर जरी असले तरी कोकणातल्या येरडव गावाच्या हद्दीत आहे. येरडव गावाच्या पूर्वेला अर्थात उगवतीला हे मंदिर असल्याने त्या मंदिराला उगवाई मंदिर म्हटले जात असावे.अणुस्कुरा गावात चौकेवाडीत असलेले पत्की हे ब्राह्मण पुरोहित सणासुदीला  मंदिराची पूजा करीत असतात. मंदिरासमोर होळी उभारली जाते,अणुस्कुरा गावाची पालखी  शिमग्यात या मंदिराला भेटत असते.
(हा थंडगार पाण्याचा झरा आहे.आजही तो पाणी साठवून आहे.)

           या टेकडीवर उभे राहून पश्चिमेकडे पाहिल्यास कोकणचा हिरवागार नजारा दृष्टीस पडतो. डाव्या बाजूला पायथ्याशी असलेले धरण या सृष्टी सौंदर्यात अधिकच भर घालत असते. संध्याकाळचा बुडणारा सूर्य हे इथले पर्यटकांचे आकर्षण होऊ शकते.अणुस्कुरा गावातील काही तरुण मंडळी एकत्रित येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करू इच्छित आहेत, मात्र हे वनखात्याच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना वन खाते परवानगी देत नाही. वन खात्याने सदर मंदिर जतन करून ठेवण्यासाठी स्वतः जीर्णोद्धार करावा किंवा जे ग्रामस्थ येथे पुढाकार घेत आहेत त्यांना परवानगी द्यावी अशी या लेखाद्वारे विनंती करण्यात येत आहे.
 ( हीच ती शिळा ज्यावर लेख कोरला आहे.हे वाचणाऱ्यास या दगडाखालील धन मिळेल अशी दंतकथा ही आहे) 

         हे उगवाई मंदिर कोणत्याही गावात असो किंवा कोणत्याही सरकारी खात्याच्या अखत्यारीत असो मात्र तो मराठ्याच्या इतिहासाचा एक भाग आहे. कोकणचा देशाशी चालणारा व्यापार कसा असायचा याचा तो एक दस्तऐवज आहे. तो पुढील पिढीला माहीत होणं गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील या भागाचे लोकजीवन कसे होते हे दाखवणारा तो एक पुरावा आहे. म्हणून ती पाज सुरक्षित ठेवणे, मंदिर पुन्हा उभारणे  यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.या मंदिराला पुन्हा सुस्थितीत आणून एक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.

सुभाष लाड 
अध्यक्ष 
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

रस्त्याची सीमारेषा दाखवणारे दगड स्पष्ट दिसत आहेत.

रस्त्यात येणाऱ्या वहाळीवरती कायमस्वरूपी केलेले दगडी बांधकाम

येथे असणाऱ्या झाडांचे हे सुंदर फळ.

मंदिराच्या गाभाऱ्याला असणाऱ्या दरवाजाची दगडी चौकट
टेकडीवरून डावीकडे खाली पाहिल्यास पांगरी चे धरण पाहायला मिळते.

मंदिराच्या तुटलेल्या भिंतीच्या फटीतून अशी सूर्यकिरणे येत असतात.

इथे होळी उभारली जाते.

मंदिराच्या भिंती सुटत चालल्या आहेत. भिंतींमधून उगवलेल्या झाडांच्या मुळांनी हे काम केले आहे


मंदिराचे पिढीजात पुजारी श्री.राजू पत्की यांच्यासोबत

अणुस्कुरा घाटातील विहंगम दृश्ये....

********** अभिप्राय ********
१)
लाड सर एव्हढा सखोल अभ्यास आपला आहे खरोखर अचंबित झालो आहे मी, आपण दिलेल्या माहितीमुळे आम्हाला आपल्या परीसराची एक नव्याने ओळख करून दिली आहे आपण , बारीक बारीक तपशील आणि तेथील चित्रीकरण यामुळे आम्ही आपल्या बरोबर प्रवास करत आहे असं जाणवत राहतं होतं खरोखर पुन्हा धन्यवाद 🙏
संजय चोगुले, प्रभानवल्ली 

२)
साहेब सुंदर अशी माहिती दिली त्या बदल तुमचे मनापासून अभिनंदन साहेब 
श्री दिपक वसंत आमकर 
गाव येरडव हनुमान वाडी 
भाजप कोकण विकास आघाडी महामंत्री शीवडी विधानसभा श्री समर्थ युवा परिवार अध्यक्ष
दीपक आमकर,येरडव 
३)
वरील लेख वाचला
खूप उपयुक्त आणि इतिहास उलगडून दाखवणारी माहिती दिली आहे.
तुम्ही तुमच्या लेखात ज्या गडावरच्या देवनागरी मसुद्याचा उल्लेख केलेला आहे, त्याचा फोटो असल्यास लेखात टाकावा. कारण हा उल्लेखच मुळी जिज्ञासा वाढविणारा आहे.

विनोद,शिक्षक सभा,

४)

घरबसल्या संपूर्ण सह्याद्रीची माहिती मिळाली.येरडव गावाचं नाव लांजा स्टॅण्डवर वाचलं होतं एवढंच.परंतू तुमच्या लेखातून तिथलं लोकजीवन उलगडलं
तुमच्या प्रयत्नांना यश येऊ दे.सर, तुम्ही आणि तुमच्या टीमने स्वतः ची आणि एकमेकांची काळजी घ्या.
प्रेमा सुवारे,फापे, देवरुख 
५)
घरबसल्या संपूर्ण सह्याद्रीची माहिती मिळाली.येरडव गावाचं नाव लांजा स्टॅण्डवर वाचलं होतं एवढंच.परंतू तुमच्या लेखातून तिथलं लोकजीवन उलगडलं
तुमच्या प्रयत्नांना यश येऊ दे.सर, तुम्ही आणि तुमच्या टीमने स्वतः ची आणि एकमेकांची काळजी घ्या.
विनोद साळुंखे,कोर्ले 
६)
सर, आपल्या व्यक्तिमत्वात जणू प्रचंड ज्ञानसागराचा संचय आहे, असे हा लेख वाचून म्हणावेसे वाटते. जुन्या-नव्याची सांगड घालून जुने टिकून त्यातून वर्तमान पिढयांबरोबरच भावी पिढ्यांसाठी त्यांची जपणूक व्हावी यासाठीची सहका-यांसोबतची आपली आंतरिक ओढ मनाला विशेष भावते! 
       या लेखाद्वारे आपण  कोकण आणि देश यांच्यातील विभिन्नता असूनही एकरूपतेसाठीच्या आसुसलेल्या लोक जीवनाविषयी केलेले भाष्य निसर्गाबरोबरच मानव संबंधांविषयी ज्ञानमार्ग ठरून आपली वाटाडयाची भूमिका अधिक ठळक होऊन जाते आणि आपल्याबद्दलचा आदर आणखी वृद्धिंगत होतो. आपल्या अखंड, अविरत प्रयत्नांसाठी शुभेच्छा!..........
 🙏🙏
विठ्ठल कुसाळे
सेवानिवृत्त शिक्षक,मालाड
७)
आपली ✍️✍️ अप्रतिम...
   पाजेचे वर्णन खूप छान,या लेखाच्या माध्यमातून सर्वांना नक्कीच गावाची आठवण होईल...
यशवंत जड्यार,गोठणेदोनिवडे 

    
         
           

Friday, June 28, 2024

विलवडे रेल्वे स्टेशन सुविधा युक्त होणार!

          कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे रेल्वे स्टेशन हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन नंतर जास्त प्रवासी वाहतूक करणारे स्टेशन ठरू शकते. कारण या स्टेशनच्या आसपास असलेल्या जवळजवळ ७५ गावातील प्रवासी रेल्वे स्टेशनचा फायदा घेतात. सध्या या स्टेशन वरती दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकण कन्या आणि तुतारी या तीन गाड्या थांबतात. या व्यतिरिक्त ज्यावेळेला कोकणात गणेशोत्सव दिवाळी आणि शिमगा या सणांच्या वेळेला विशेष गाड्या सोडल्या जातात. सणांच्या वेळेला आपल्या विलवडे स्टेशन वरून जाणाऱ्यांची व येणाऱ्या प्रवासाची संख्या चांगली असून कोकण रेल्वेला बऱ्यापैकी भारमान मिळते मात्र कायमस्वरूपी असलेल्या गाड्यातून स्टेशनला स्टेशन वरून जेवढे भारमान मिळायला हवे तेवढे मिळत नाहीये. ही माहिती संगणकाद्वारे मिळत असल्यामुळे यात सत्यता आहे असे असूनही जर विलवडे स्टेशनला आणखी एखादी एक्सप्रेस दिली तर याच्या मध्ये चांगला फरक पडू शकतो हे रेल्वे प्रशासनाला समजावून सांगण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी आज बेलापूर येथील रायगड भवन मध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक माननीय श्री. डी. एस. लिंगराजू व उप मुख्य वाणिज्य प्रबंधक सन्मा.श्री. राजेंद्र दिनकर घोलप यांची भेट घेतली.
          विलवडे रेल्वे प्रवासी संघ या संघटनेची स्थापना सन २००० च्या आसपास स्थानिक पातळीवरती झाली. त्या काळातल्या मंडळींनी त्या त्यावेळी आवश्यक असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात एक दिवा पॅसेंजर सोडल्यानंतर कुठलीही गाडी येथे थांबत नव्हती. हळूहळू कोकण कन्या आणि तुतारी अशा दोन गाड्या थांबू लागल्या आणि प्रवाशांची वर्दळ सुरू झाली. त्याचवेळी विलवडे रेल्वे प्रवासी संघ स्टेशनवरच्या सोयी सुविधा प्रवाशांना मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिला. मात्र गेल्या वर्षी स्थानिक कार्यकर्त्यात शिथिलता जाणवू लागल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री. अमोल रेडीज यांच्याकडून कळले.
         राजापूर आणि लांजा तालुक्यातील खेडेगावांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने विलवडे रेल्वे स्टेशनवरच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या विलवडे प्रवासी संघाला मुंबईतून पाठबळ देण्याचे ठरवले. ल*** रेल्वे स्टेशनच्या फायदा घेणाऱ्या मुंबईतील प्रवाशांसाठी मुंबईत मेळावा घेण्याचे ठरले whatsapp ग्रुप निर्माण केला गेला त्या ग्रुप वर हजारो लोकांनी आपले विचार प्रकट केले मात्र प्रत्यक्ष मेळाव्याला पस्तीस प्रवासी उपस्थित राहिले. जे उपस्थित होते त्यांना विलवडे स्टेशन साठी काहीतरी करायचे होते. वेळ द्यायचा होता आणि म्हणूनच त्याच मेळाव्यात विलवडे रेल्वे प्रवासी मुंबईची समिती तयार करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष पद पुढारीचे पत्रकार संजय कदम यांच्याकडे देण्यात आले तर सरचिटणीस पद शांत, संयमी व एखादी गोष्ट मनावर घेतली तर तिचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची जिद्द असलेला तरुण श्री. राज गणपत हांदे याज कडे देण्यात आले. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि विलवडे रेल्वे प्रवासी संघ  ग्रामीण व मुंबई यांनी एकत्रित येऊन गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्याकडून विलवडे रेल्वे स्टेशनच्या बाबतीतल्या विविध मागणी पत्रकांवरती सह्या करून घेतल्या तसेच त्यांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. याबाबतीत विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेने मोलाचे सहकार्य केले. रेल्वे प्रवाशांना दूरदूरच्या गावात सुखरूप पणे पोहोचवणाऱ्या तेथील रिक्षा चालकांचा संघाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.पुढे ती सर्व निवेदने व प्रवाशांच्या सह्यांचे कागद रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय व बेलापूर येथील मुख्य कार्यालयात सुपूर्त करण्यात आली. पुढे दिलेल्या पत्रांची कार्यवाही काय होते आहे याचीही माहिती घेण्यात आली.
          विलवडे रेल्वे प्रवासी संघ, मुंबई ला या ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात संघटनेचे सरचिटणीस राज हांदे यांनी अनेकदा विलवडे स्टेशनला भेट देऊन तिथल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याचं काम केलं. आवश्यक वाटले त्या त्या वेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन विविध कार्यालयात एकत्रीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याशी चर्चा करून बेलापूर कार्यालयातील मुख्य वाणिज्य प्रबंधकांची भेट घेण्याचे ठरवले आहे असे सांगितले. नेहमीप्रमाणे मी सोबत येईन असे त्यांना सांगितले व आवश्यक ती निवेदन पत्रे तयार करून घेतली. गुरुवार दिनांक २७ जून २०२४ ला मी आणि सुहास खामकर बेलापूर स्टेशन गाठले.त्या ठिकाणी सदानंद खामकर, दीपक जानस्कर भेटले.कोकण भवन जवळून झेरॉक्स घेऊन रायगड भवन पोहोचेपर्यंत सुनिल लोणकर, रमेश गुरव, सुहास लिंगायत, हितेश कानागळ,प्रशांत पालकर,रमेश बेर्डे, विश्वनाथ आयरे,सौ.गीता हांदे ही मंडळी आलीच होती.राजने मागील कागदपत्रांची जाडजूड फाईल आणली होती ती सांभाळत "आपणांस चौथ्या मजल्यावर जायचे आहे" असे सांगून तो लिफ्टच्या दिशेने वळला.
       आमची भेटण्याची वेळ नियोजित होती परंतु आमची मोठी संख्या पाहिल्यानंतर बैठक व्यवस्था अधिकची करावी लागली.यात थोडा वेळ गेला.मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी उपमुख्य प्रबंधकांनाही बोलावून घेतले होते.लिंगराजू सरांनी आमच्या निवेदनातील प्रत्येक बाबींवर त्यांनी चर्चा केली.विलवडे स्टेशनवर जाण्याकरीता वृद्ध व विकलांग व्यक्तींसाठी फलाटाला समतल असलेल्या जागेवरून मोकळी वाट करून देणार,वेटिंग रूम करता सर्व्हे करून पुढील कार्यवाही करणार.  मुख्य रस्त्यापासून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची दूर्दशा निदर्शनास आणून देण्यात आली. 
(उपमुख्य वाणिज्य प्रबंधक मा.राजेंद्र घोलप यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.)

कोकण रेल्वे कडे पुरेसा फंड नसल्यामुळे आपण अनेक एनजीओंच्या मार्फत सोयी सुविधांची कामे करत असल्याची माहिती देऊन आपण विलवडे स्टेशनसाठी ही तसे प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. फलाटावरती प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या शेड बाबत आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपणही देणगीदार मिळवून शेड उभारण्याच्या प्रयत्नास हातभार लावू असे सांगितले. विलवडे स्टेशनवर जनशताब्दी किंवा मांडवी यापैकी एखाद्या गाडीला थांबा द्यावा याबाबत विस्तृत स्वरूपात चर्चा झाली. शेवटी प्रयोगा दाखल एखादी गाडी सुरू करण्याची त्यांनी विनंती मान्य करून जर प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळाल्यास ती गाडी कायमस्वरूपाची करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सणांकरता सोडण्यात येणाऱ्या विशेष सर्व गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याचे त्यांनी मान्य केले. अशाप्रकारे आजची भेट समाधानकारक  झाली.

          जवळजवळ तासभर झालेल्या या  चर्चेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचेही समाधान झाले. कोकण रेल्वेच्या कारभारासंदर्भात बरीचशी माहिती मिळवता आली. आज मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले त्यातून संघटनेच्या पुढील वाटचाली बद्दलही चर्चा करण्यात आली. लवकरच आपण मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी विलवडे रेल्वे प्रवाशांची सभा घेण्याचे ठरविण्यात आले. विशेषतः विलवडे स्टेशनच्या समस्यांबाबत नेहमीच जागरूकता दाखवून वेळोवेळी पत्रव्यवहार करणारे, वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना भेटणारे सरचिटणीस राज हांदे यांच्या चेहऱ्यावरती नवीन उत्साह पाहायला मिळाला. आपली नोकरी प्रामाणिकपणाने करून मिळालेला मोकळा वेळ सामाजिक कार्यात व्यतीत करणारे कार्यकर्ते आज दुर्मिळ होत असताना राज हांदे यांच्याकडे पाहिले की अजूनही आशेचा किरण बाकी आहे. त्यांना अधिक ताकद देण्यासाठी त्यांच्यासारखेच तरुण गोळा होतील. आणि सामाजिक कार्याचा हा जगन्नाथाचा रथ हळूहळू पुढे जात राहील.

सुभाष लाड
सल्लागार 
विलवडे रेल्वे प्रवासी संघ मुंबई/ग्रामीण 

         
********** युवा कार्यकर्ता *********
राज हांदे 
सरचिटणीस ,
विलवडे रेल्वे प्रवासी संघ मुंबई / ग्रामीण