आपल्या मातीतल्या वृक्षमित्राचा यशस्वी प्रयोग. ते
कोकण भूमीला निसर्गाचं वरदान आहे. त्या निसर्गावरती आपण हजारो वर्ष डोळे मिटून प्रेम करत आलेलो आहोत. मनुष्यनिर्मित शेतीसाठी पावसाळ्यातील पाण्यावरती विसंबून राहात आलेलो आहोत. या भूमीला जाळल्याशिवाय पीक घेता येत नाही या अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणून जपत आलेलो आहोत. इथल्या परंपरा, श्रद्धा जपणे म्हणजेच या भूमीवर प्रेम करणे असा अर्थ घेऊन ' ठेविले अनंत तैसेची रहावे ' या उक्तीला जपत आलो आहोत. पण गेल्या चाळीस वर्षात हजारो वर्ष जंगली झाडांनी व्यापलेले डोंगर कोकणी माणसाने कलमी हापूस आंबा आणि कलम केलेल्या काजू वृक्षांच्या बागांनी भरून काढले आहेत. यासाठी दापोली कृषी विद्यापीठ आणि तालुका पातळीवर असलेल्या कृषी केंद्रांचं
महत्वाचं योगदान विसरता येणार नाही.
१९६९ च्या दरम्यान भात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी आग्रह धरण्यात आला. सुरुवातीला ही खते मोफत दिली जात असतानाही इथला शेतकरी त्याकडे पाठ फिरवून होता. पण ज्यांनी त्या खतांचा वापर केला त्यांच्या शेतात पारंपारिकतेपेक्षा अधिकचे पीक मिळाले हे पाहून पुढे इतरांनी रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात केली. पुढच्या दहा-पंधरा वर्षात या मातीने रासायनिक खतांचा मारा सहन केला मात्र हळूहळू त्या मातीचा पोत बदलायला लागला. मातीचा निसर्गतः असलेला कस निघून गेला. रासायनिक खतांच्या प्रचंड मागणीमुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या. पिकांवरची रोगराई वाढली आणि फवारणीशिवाय पिक घेणं कठीण झालं. त्यातून माणसांनाही आजार होऊ लागले. त्यातच सरकारने मोफत रेशनिंग सुरू केले.हळूहळू माणूस कष्टापासून दूर पळू लागला आणि माणसाने शेती करण्याचे सोडून दिले.
गेल्या दहा पंधरा वर्षात ऑरगॅनिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीच्या शेतीला महत्त्व आल्याचे दिसून येते. धान्य, फळे, दूध एवढेच काय तर होळीसाठी लागणारे रंग सुद्धा नैसर्गिक पद्धतीचे वापरण्यास सुरुवात झाली. कमी खाऊया पण चांगले खाऊया ही मागणी जोर धरू लागली. जशी शेतीबाबतची तशीच धारणा फळबागांबाबतही झाली. सुरुवातीला चांगला बहर देणारी, चांगली फळे देणारी झाडे रासायनिक खतांसाठी आणि फवारणीसाठी प्रत्येक वर्षी आग्रही राहिली. एवढे करूनही फळांची चव बिघडली आणि झाडांचे आयुर्मानही कमी झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अशा या परिस्थितीतून काजू बागायतदाराला एक आशेचा किरण दाखवणारा एक प्रयोग यशस्वी झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले म्हणून हा लेखन प्रपंच.
कोकणातल्या शिकल्या सवरलेल्या मुलांनी शहरात जाऊन नोकरी करावी ही पक्की मानसिकता असल्याने ऐन उमेदीतला तरुण गावात दिसतो त्यावेळेला आश्चर्य व्यक्त केलं जातं, तो तरुण उच्चशिक्षित आहे आणि गावाकडे आहे म्हणजे अधिक आश्चर्याची गोष्ट आणि मुंबईत जन्मलेला मुंबईतच शिकलेला एखादा तरुण जेव्हा गावाकडे शेतीत राबतो त्यावेळेला गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. या सर्व आश्चर्यांना व्यवहारात उतरवत गेली २५ वर्षे अमर खामकर लांजा तालुक्यातल्या आरगावात कायम स्थायिक होऊन आंब्याच्या आणि काजूच्या बागा फुलवत आहे. केवळ झाडे लावणे आणि उत्पादन घेणे हा त्याचा एकच दृष्टिकोन नसून आपण करीत असलेले प्रत्येक काम हे का करावे? कसे करावे? आणि त्यानंतर माझ्या बरोबर समाजाला त्याचा काय उपयोग होईल याचा तो अभ्यास करत असतो. तो विज्ञानवादी आहे, नव्याचा ध्यास घेऊन काम करणारा आहे मात्र जुन्या परंपरांना डोळे बंद करून नाकारत नाही तर जुन्या परंपरा किती चांगल्या आणि नव्या जमान्याला किती पोषक आहेत याचाही तो अभ्यास करतो. तरीही त्याला इथे पराकोटीचा विरोध होत असतानाही तो एकाकीपणे लढा देत आहे. त्याचा हेतू शुद्ध आहे. इथे श्रमाचा संस्कार रुजवताना इथल्याच माती जन्मलेल्या आणि मातीत राबण्याच्या संसारापासून दूर गेलेल्यांच्या कुत्सित नजरांचाही त्याला सामना करावा लागला. पण मनात रुजवलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, इच्छित ध्येयाकडे जाताना विचलित न होता, अहोरात्र मेहनत करून नवनवीन प्रयोग करून 'वृक्ष मित्र ' म्हणून जनमानसात त्याची ओळख निर्माण होते. अनेक सामाजिक संस्थांकडून त्याला आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कारीत केले जाते. आणि अमर खामकर एक अभ्यासाचा विषय होऊन जातो.
गेली आठ वर्ष अमर खामकर 'वेंगुर्ला 4 ' या जातीच्या काजूला पर्याय शोधत असताना त्यांनी गावठी काजूचाही विचार केला. गावठी काजूला आयुष्य मोठे असते मात्र त्याचा धर कमी असतो. वेंगुर्ला चार ला आयुष्य कमी पण धर चांगला असतो. गावठी काजू उशिरा धरते आणि अनेक वर्षे फळे देत जगत असते. त्याचा विस्तार जस जसा वाढत जातो तसे त्याचे खोड ही जाड होत जाते आणि ते मजबूतही असते.
सरकारी कोणत्या ही बियाण्याचा वृक्ष हा नेहमीच कोमल राहिलेला आहे त्याला अनेक औषधोपचारांची, फवारणीची गरज असते. त्यामुळे पीक जरी देत असते तरी त्या झाडांची डोळ्यात तेल घालून निगराणी करावी लागते. अमर खामकर यांनी यातून मध्यम मार्ग शोधून काढला. आठ वर्ष आपल्या बागेत केलेल्या प्रयोगातून निर्माण झालेली कलमे त्यांनी स्वतःच्या बागेबरोबर त्यांच्यावर विश्वास असलेल्या अनेक मित्रांनी आपल्या बागेत लावली. त्यांनी निर्माण केलेली ही जात हे त्यांचे स्वतःचे फलित आहे. बरोबर दोन वर्षांनी या हंगामा त्यांच्या बागेतील रोपांबरोबर मित्रांना दिलेल्या रोपांनाही फळे धरली.फळांचा आकारही चांगलाच असल्याने अमर खामकर यांच्या आनंदाला पूर आला. आनंदाची बातमी त्याने आपल्या अनेक मित्रांना सांगितली. या क्षेत्रातील तज्ञांनी या भागांना भेटी दिल्या आणि समाधान व्यक्त केले. अमर खामकर यांच्या वडिलांनी चांदेराई या गावातून आणलेल्या गावठी रोपाचा आता वृक्ष झाला आहे. आणि अमर खामकर यांनी लावलेल्या ' वेंगुर्ला 4 ' हे त्यांच्या प्रयोगातील मातृवृक्ष आहेत. गेल्या आठ वर्षाच्या प्रयोगात आणि पुढे कलमांचे रोपण केल्यानंतरच्या दोन वर्षात केवळ सेंद्रिय खतांवरती आणि कोणत्याही फवारणी शिवाय या झाडांची आश्चर्यकारक फलधारणा हे या नवीन प्रयोगाचे फलित आहे. या फळांमध्ये काजूगर हा सुद्धा आकाराने चांगला असून त्याची चवही कुठल्या अस्सल मातीतील चव आहे त्यामुळे या काजूगराला परदेशातही चांगली मागणी येऊ शकते असा आशावाद अमर खामकर यांच्या बरोबर इथे भेटी दिलेल्या प्रत्येक तज्ञांचे मत आहे.आणि म्हणूनच कोकणाच्या मातीशी साधर्म्य साधणारी, शेतकऱ्याचे कष्ट आणि चिंता कमी करणारी, शेतकऱ्याला अनेक वर्षे चांगले उत्पादन देणारी आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी अमर खामकर यांच्या प्रयोगातून निर्माण झालेल्या या काजूच्या नवीन जातीचे पेटंट त्यांना मिळणे आवश्यक आहे. कोकणातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांना, तज्ञांना , प्रसिद्धी माध्यमातील महानुभावना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या कोकणातला लांजा तालुक्यातील आरगाव या गावातील अमर खामकर या तरुणाच्या मेहनतीला दाद देण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करूया. आपल्या मातीतल्या वृक्ष मित्राला प्रोत्साहित करूया.
सुभाष लाड
९८६९१०५७३४