Wednesday, August 20, 2025

चला तर मग लिहिते होऊया !


           

.      मोडी दर्पण या दिवाळी अंकाचे हे सोळावे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांत या अंकाने मराठ्यांच्या इतिहासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर कोकणातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीच्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रांचा मागोवा घेण्यात येणार असून कोकणाला लाभलेल्या फार मोठ्या संतपरंपरेचा अभ्यास एकाच ठिकाणी करण्याची संधी मिळणार.या संतांनी कोकणात लोकजागृती करण्याचे काम केले.त्यांचा पसारा मर्यादित स्वरूपात राहिला असला तरी त्या त्या भागात त्यांना फार मोठे आदराचे स्थान मिळाले आहे.उदाहरणार्थ माणगावचे टेंबे स्वामी,पावसचे स्वामी स्वरूपानंद,ठाण्याचे गजानन महाराज पट्टेकर,तर नाणीजचे नरेंद्र महाराज, गगनबावड्याचे गगनगिरी महाराज तर तुंगारेश्वरचे बालयोगी सदानंद महाराज यांनी त्या त्या भागात अध्यात्म प्रसाराचे काम केले आहे याचा तेथील जनमानसात मोठा परिणाम झाला म्हणूनच या आणि अनेक थोर संत पुरुषांची चरित्रे यावेळच्या मोडी दर्पण दिवाळी अंकात वाचावयास मिळतील.


      कोकणचा भूगोल कोकणची संस्कृती आणि कोकणचे लोकजीवन हा नेहमीच कुतूहलाच विषय राहिलेला आहे. त्याच्यावरती जेवढे कौतुकाने बोलले जाते तेवढे लिहिले गेले नाही. कारण लिहिते हात सुद्धा कमीच आहेत. म्हणूनच मोडी दर्पण मध्ये प्रथीत यश लेखकांबरोबरच नवोदित लेखकांना संधी देण्यासाठी आम्ही कोकणातील नागर व ग्रामीण जीवनावरती कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेतही सर्व स्तरातील लेखकांनी सहभाग घेऊन उत्तमोत्तम साहित्य देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.


नेहमीप्रमाणे मोडी शिकणाऱ्यांसाठी आवश्यक ते साहित्य असलेल्या या अंकात ललित आणि कवितांची ही मेजवानी असणार आहे.

चला तर मग लिहिते होऊया !

सुभाष लाड

संपादक

मोडी दर्पण २०२५

Saturday, August 16, 2025

गावच्या दुकानदाराला फोन करायचाय !



आला आला वारा

संगे पावसाच्या धारा

पाठवणी करा

सया निघाल्या सासुरा ll

        मला माझ्या बालपणाची आठवण करून देणार हे गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत असतो. ':हा खेळ सावल्यांचा '


हा मराठी चित्रपट १९७५ मध्ये  प्रसारित झाला त्याकाळात आपल्या गाव खेड्यात पुरेसे रस्ते नव्हते,वीज नव्हती, गावात भरपूर गुरे होती, त्यांचे गोठे भरलेले होते. बैलांच्या मानेवर ज्यू दिलेली ज्योते शेतात फिरत होती. गावभर रानोमाळ शेतंच  शेतं होती आणि तिथे काम करणारा शेतकरी दिवसभर राबत असताना दिसत होता. मातीत राबणारा हा शेतकरी प्रत्येक दिवशी नवा उत्साह घेऊन येत होता आणि म्हणूनच प्रत्येक कामाच्या वेळी शेतातून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळत होती.

       आगोटीची कामं आटोपून सासरवासीनी आपापल्या माहेरास मोकळा श्वास घ्यायला जात असत. तिथे त्यांना माहेरवाशींनी म्हणत. या बालपणीच्या मैत्रिणी लग्नानंतर वेगवेगळ्या गावात विखुरल्या जातात. पण आगोटीची काम आटोपून माहेरास आल्या की एकत्र येऊन बालपणीच्या सुखद आठवणी काढत गप्पागोष्टी करीत. असेच एक दिवस ढग भरून येतात. ढगांच्या गडगडांटांनी आभाळ दणाणून जातं आणि प्रत्येक सयेला आपल्या सासरच्या संसाराची आठवण होते. माहेर सोडताना डोळ्यांतून आलेला आसवांचा पूर पावसाच्या धारेत दिसेनासा होतो. हृदयातली कालवा कालव आतल्या आत दाबून चेहऱ्यावर खोटे हासू आणून सया सासरच्या पायवाटेने चालू लागतात.

          या सिनेमाचे चित्रण कोकणातलेच असल्याने चित्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला दृष्टीस पडत नाहीत. गीतकार सुधीर मोघे हे कोकणातल्या कोलधे गावचे असून गीताची रचना ही कोकणातील बोलीभाषेशी जवळची असल्याने त्या गीताबद्दल आपुलकी अधिक वाटते. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि आशा भोसले व अनुराधा पौडवाल यांचा सुरेल गळा लाभला आहे. हा सिनेमात डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांची मध्यवर्ती भूमिका आहे. आपणही हे गीत ऐकावे किंवा पहावे आपल्याला गावची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही.

        गेल्या पन्नास वर्षात कोकणात हळूहळू विकासाची पावले पडू लागली. तस तसे कोकणाचे कोकणपण हरवत असल्याची जाणीव होऊ लागली. कोकण रेल्वे आली आणि कोकण झपाट्याने रिकामा होऊ लागला. कोकणात व्यापार उदीम येईल, इथे व्यवसायांची निर्मिती होऊन कोकणातील इथला तरुण इथेच राहील उलट गाव सोडून गेलेले तरुणही गावाकडे येतील अशी धारणा कोकण रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या त्या काळातील धुरीणांची होती. पण झाले उलटेच. इथे रोजगार निर्मिती झाली नाही. रेशनिंग वरती फुकट धान्य मिळू लागल्याने शेतीत राबण्याची कुणाला गरज वाटू लागली नाही म्हणून शेतीही पडली. तरुण वर्ग गाव सोडून बाहेर गेला. आता गावात राहिली आहेत वृद्ध माणसे. प्रत्येक गावातील निम्म्यापेक्षा जास्त घरे बंद पडलीत. रस्ता आहे पण भारमान नाही म्हणून एसटीच्या फेऱ्या कमी होत चालल्या आहेत. जिथे चार-पाच शिक्षक कमी पडायचे तिथे शाळांचा पट कमी झाला म्हणून  एखाद्या शिक्षकावरती शाळा चालू राहिल्या आहेत भविष्यात त्या शाळाही बंद पडतील अशी भीती वाटू लागली आहे. दिवसभराचा रोज भरेल एवढे सुद्धा पेशंट येणार नसतील तर डॉक्टर सुद्धा गावात राहायचं की नाही असा विचार करू लागले आहेत. गावात घरोघरी वीज गेली आहे.पाण्याचे नळ गेले आहेत. लाखो रुपये खर्च केलेल्या या विकास योजना. शिमगा आणि गणपती उत्सवात त्या योजनांचा फायदा घेतला जातोय. एकेकाळी गावात माणसं होती पण विकास नव्हता आता विकास झाला आहे पण विकासाचा फायदा घेणारी माणसेच नाहीत.

          गावातल्या दुकानदारांची सुद्धा तीच अवस्था आहे. गावात दोन दोन तीन दुकाने असून सुद्धा दुकानदार आनंदित होते. काही गावात तर वाडीवार दुकाने होती. या दुकानांवरती संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला गर्दी होत असे. दिवसभर रानात काम करून आल्यानंतर दुकानावर फेरी मारण्याची पद्धत होती. विशेषता पूर्वी घासलेटचे दिवे असल्याने गिऱ्हाईकाच्या हातात घासलेट करीता काचेची बाटली( या बाटलीच्या तोंडाजवळ हातात धरण्यासाठी दोरी बांधलेली असे व नारळाच्या किडनीचे बूच असे )किंवा प्लास्टिक कॅन असे. साखरेचा गोडवा सर्वश्रूत होईपर्यंत दुकानात गुळाच्या ढेपा असत. त्या फोडण्यासाठी लाकडी पाचेरू आणि हातोडा असे. दुकानदार गुळाचा खडा कागदात बांधून देई. घरी गेल्या गेल्या तो कागद बाजूला करून गुळ डब्यात ठेवला जाई. दाणेदार चहाची पावडर येण्या अगोदर चहाची बुक्की वापरली जायची. त्यावेळच्या स्त्रियांना गुळाच्या चहात दूध कसे टाकावे याचे तंत्र अवगत होते त्यामुळे चहा फुटण्याची शक्यता कमी असे.

          गावातलं दुकान हे जसं गरजेचा जिन्नस घेण्याची मुख्य जागा असली तरी काही वयस्कर लोक वेळ घालवण्यासाठी तिथे येऊन बसत. दुकानदार सुद्धा या लोकांसाठी पान सुपारीचं ताट भरून ठेवत असे.सुपारी कातरता कातरता गावातील एखाद्या बातमीची पुडी सुटली जायची.कधी त्या बातमीला कात टाकून रंग भरला जायचा किंवा एखादी बातमी ओठावरल्या  दोन बोटांच्या मधून दूर  पिचकारुन तिचं महत्त्व सांगितलं जायचं. दुकानदाराला त्यामुळे जाग्यावरच गावाची भ्रमंती करता यायची. गिऱ्हाईक नसेल तेव्हा तो ही त्या चर्चेत आपला मत नोंदवायचा. एवढेच काय तर गावच्या नाटकात कोणाला कोणती भूमिका द्यायला हवी याचे आडाखे सुद्धा दुकानाच्या बाकड्यावर बांधले जायचे.

           मुलांसाठी तर गावचे दुकान एक पर्यटन स्थळ वाटायचं. दुकानाची आडवी फळी त्यांच्या उंचीपेक्षा वरती असल्याने फळीवर ठेवलेल्या पेपरमिंटाच्या चौकोनी गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या,श्रींखंडाच्या फिकट गुलाबी रंगाच्या गोळ्यांच्या काचेच्या बरणीच्या पलीकडचे काही दिसत नसे. खरेदी झाल्यानंतर मूठ बांधलेला हात वर सरकवला की त्या मुठीच्या मागच्या पृष्ठभागावर सुपारी एवढा पातळ गूळ चिकटवायचा. हा मुलांचा पहिला खाऊ. त्याचबरोबर गुळ चणे, गुळ शेंगदाणे किंवा हळदीत माखलेले वाटाणे कडकड करीत चावत जाणे यात स्वर्गीय आनंद होता.उभ्या लाकडी फळ्यांनी बंद केली जाणारी ही दुकाने आजही काही गावात चालू असलेली दिसत असली तरी एकट्या दुकानदाराशिवाय आणखीन कोणाला तिथे काम करायला ठेवणे हे परवडण्यासारखे राहिलेले नाही.

           आज कदाचित या दुकानदारांना सामान्यात गणले जात असले तरी त्या काळात हे दुकानदार गावाच्या सामाजिक अभिसरणाच्या केंद्रस्थानी होते.तसं पाहिलं तर दुकानदार हा गावातला सावकार नसला तरी पैसे राखून असे.त्यामुळे सणासुदीला मनीऑर्डर नाही आली तर उधारीवर जिन्नस देऊन सण साजरे करायला दुकानदारच मदत करीत असे तशी कुठे पैशाची मदत लागली तरी दुकानदार तशी मदत करीत असे त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ दुकानदाराची सलोख्यानेच वागत असे. दुकानदाराला हिशोब करणे जसे गरजेचे होते तशी लिखापढी करणे सुद्धा आवश्यक होते. तेवढे ज्ञान दुकानदाराकडे असल्याने दुकानदारा गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणला जायचा. स्वातंत्र्यानंतर गावात प्राथमिक शाळा, आल्या ग्रामपंचायती आल्या, माध्यमिक  शाळा आल्या या विकास कामात गावच्या धुरीणांमध्ये दुकानदाराची स्थान असे. गावात जेव्हा बैठका होत तेव्हा चहा करायची ठरल्यानंतर दुकानदार आपल्या दुकानातून गुळ चहा पावडर यांची व्यवस्था करीत असे. बऱ्याच वेळेला हा खर्च तोच सोसत असे. त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्यत्व केव्हा सरपंच पद हे हसत हसत दुकानदाराला बहाल केले जायचे.

         काही दिवसापूर्वी आहे गावच्या माध्यमिक शाळेतील सौ.साधना बावधनकर या मुख्याध्यापिकेने आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात गावच्या दुकानदारांना बोलावून त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.त्यावेळी सर्वांच्या डोळ्यांत पाणी तरारले. कोकणात जेव्हा नव्याने शाळा उभारल्या गेल्या त्या वेळेला त्याला सरकारी अनुदान मिळत नसे किंवा शिक्षकांचे पगारही सरकार देत नसे. बऱ्याच ठिकाणी गावकरी वर्गणी काढून शिक्षकांना तुटपुंज मानधन देत असत. तेही वेळेवर नसे. त्या काळात कोकणात शिक्षकांची कमतरता असल्याने देशावरूनच शिक्षक आपल्या कोकणात आले. दऱ्या डोंगरातल्या वाटांनी हे शिक्षक गावात उतरले. गावात कोणाच्यातरी घरातल्या पडवीत किंवा एखाद्या खोलीत हे राहत असत. गावच्या दुकानदाराला ही परिस्थिती चांगली माहीत असल्यामुळे

या शिक्षकांना दररोज लागणारा जिन्नस तो उधारीवर देत असे. शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असल्यामुळे त्याच्या उधारी बद्दल तो दुकानदार कधी जाहीर वाच्यता करत नसे. त्याच परिस्थितीत गावातल्या शाळेत शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन मोठ मोठ्या हुद्याच्या नोकऱ्या करू लागले. अशाच परिस्थितीचा सामना केलेल्या एका शिक्षिकेने दुकानदारांचा केलेला गौरव हा कोकणातील समस्त दुकानदारांचा प्रातिनिधिक गौरव म्हणायला हवा. शिक्षकाने दाखवलेली ही कृतज्ञता गावात शिकून गेलेले विद्यार्थ्यांना आपल्याच गावातल्या दुकानदाराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असल्यास ते जेव्हा गावी येतात तेव्हा त्यानी त्या दुकानांतून दैनंदिन  जिन्नस खरेदी करावा हीच आमची अपेक्षा आहे

       पूर्वी मच्छी मटणाचा बाजार करण्यासाठी आठवडी बाजाराला जाणारा ग्रामस्थ गावात रस्ते - गाड्या आल्यानंतर ऊठसूठ बाजाराच्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागला आणि चार पैसे वाचतात म्हणून तिथूनच बाजारहाट करू लागला. मात्र उधारी पाधारीसाठी गावचा दुकानदार आपल्याला समजून घेतो म्हणून काहीसा माल गावात घ्यायचा ही ग्रामस्थांची मखलाशी दुकानदारांच्या पोटावर बेतली आहे. त्यात पुणे मुंबई कडून येणारे चाकरमानी आज-काल स्वतःच्या चारचाकी वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने प्रवास करू लागल्याने गौरी गणपतीच्या वेळेला लागणारा जिन्नस शहरातच खरेदी करून गाडीत टाकून गावाला येऊ  लागले आहेत. गौरी गणपतीच्या सणाला चांगली विक्री होईल या अंदाजाने दुकानदार मोठा साठा करून ठेवतो मात्र गिऱ्हाईकांची कमी झाल्याने त्याचा तो व्यवहार आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. हे जर असेच चालले तर दुकानदारी करून त्यांच्या उदरनिर्वाह पुरतेही काही मिळणार नसेल तर हेही दुकानदार आपली दुकाने बंद करून कुठेतरी व्यवसाय करायला जातील. आणि मग गावातल्या वृद्ध माणसांना गावातच मिळणारी सोय ही दूर होणार आहे. आणि म्हणून हा लेख लिहिताना माझी समस्त चाकरमान्यांना विनंती आहे की गाव आता सगळ्या समस्येने त्रस्त झालेला आहे. इथे व्यवसाय मिळाला नाही म्हणून आपण व्यवसायाच्या शोधात शहरात गेलो आणि चाकरमानी झालो. चार पैसे आपल्या गाठीस जमा झाले. पण या गावात आपण जन्मलो, आपलं शिक्षण झालं, आपल्या वरती संस्कार केले तोच गाव आता बंद घरांच्या ओझ्याने वाकू लागला आहे याकडे  दुर्लक्ष करीत आहोत.गावातली घरं माणसांनी भरून जातील तेव्हा तो उत्साहाने ताट कण्याने उभा राहिल. गावात माणसं असतील तर एसटीच्या फेऱ्या वाढतील. विकासाचा फायदा घेतला जाईल.शेती फुलेल. हे सगळं बोलायला जरी सोप असलं तरी ते खरं ठरवायला किती काळ लागेल देव जाणे. पण गावातला दुकानदार जगवण्याचे काम तर आपण करू शकतो. गावात न मिळणाऱ्या शोभेच्या किंवा सजावटीच्या वस्तू आपण जरूर शहरातून आणा पण दैनंदिन जीवनातील आवश्यक जिन्नस - वस्तू हे मात्र आपण गावच्या दुकानात घेतले तर गावचा दुकानदार आनंदित राहील. त्याचा फायदा गावात राहणाऱ्या आपल्या वृद्ध नातेवाईकांसाठी होईल. अमुक एक चाकरमानी मुंबईत भरपूर पैसा कमवतो पण गावी आल्यावर माझ्याच दुकानात जिन्नस घेतो हे तो सर्वांना आनंदाने सांगेल. आपलं अनुकरण इतर चाकरमानी करतील. एकेकाळी गावाला आधार ठरलेल्या या दुकानदारांना आपणच आधार द्यायला हवा.गाव वाचवण्याच्या मोहिमेत आपण एवढे योगदान कराल याची मला आशा वाटते.

       चला आजच गावच्या दुकानदाराला फोन करून " मी गणपती करता अमुक दिवशी येतोय, मी सामानाची यादी देतोय त्याप्रमाणे सामान बांधून ठेवा मी ते  घ्यायला येतोय."

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

  

प्रविण पांचाळ दुकानदार -+919403769987
रिंगणे 

अभिप्राय ------🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१) गोविंद जाधव -शिपोशी, नाशिक. 
हो नक्कीच , मुंबईकर मंडळींमध्ये तशी जागृती व्हायला पाहिजे. गावची अर्थव्यवस्था टिकून रहाण्यासाठी थोडंसं मन मोठं करायला हरकत नाही. वह्या वाटप करणाऱ्या लोकांना गावातूनच खरेदी करून वाटप कराव्यात अशी गळ घातली आहे. तसेच शिपोशी येथील मेडिकल स्टोअर मधून मुंबई व इतर भागात औषधे देऊ शकतो का, यासाठी मी श्री मुकुंद बाईंग याला तसे गणित जमत असल्यास मी पुढाकार घेतो असे कळवले आहे. बघुया कसे जमते ते.

२) विश्वंभर पांचाळ- रिंगणे, मुंबई 

 दुकानदाराला फोन करून ........👌👍
 मी पण इथून जास्त समान नेत नाही.कारण सगळ काही दुकानावर मिळत,मग एवढ ओझ का न्यायचं .

३) गणपत शिर्के, साखरपा 

खुप सुंदर मनाला भावणारा लेख.सर्वांनी जर अनुकरण केले तर खरोखर दुकानदार आनंदी होईल.👌👌👍🙏🙏🙏

४) आनंद धाक्रस- नाटे, डोंबिवली
सध्याचे गावचे वास्तव चित्र मांडले आहात. 👍

५) दीपेश बारस्कर - कोंडगे, डोंबिवली 

दादा नमस्कार , मी गावचे दुकानदार आयरे दादा ना लागणाऱ्या जिन्नसाची चीट्टी पाठवतो मग ते सगळे सामान भरून ठेवतात व आम्ही जाताना हे आमच्या घरी नेतो🙏🏻🙏🏻

६) अनिल कारेकर-  आडवली, मुंबई 

बरोबर आहे आम्ही पण गावाकडे फोन केला कीवा गावाहून मुंबईला फोन केला तर दुकानदार सांगत असे की अमुक अमुक सेकंद झाली एवढे द्या त्यावेळी गावात इंडिकेटर नसल्याने दुकानदार सागेल ती रक्कम द्यावी लागत असे पण खुशाली कळत असे

७) विजय बाराथे - वाडा, पालघर 

दुकानदारांना घरी पाहुणे आले आहेत असं सांगितलं तरी कुटुंबाला हवं ते देत असत.
खुप छान योगदान देत असे.

८) जयेश दळवी - येरडव, स्थानिक दुकानदार.
काका, काय लेख आहे... अप्रतिम... आत्ताच आई, बाबा आणि बंधूंना वाचुन दाखवला... अगदी जशास तशी परिस्थिती मांडली आहेत तुम्ही... आमचे स्वतःचे गावात एक दुकान आहे, पूर्वी अणुस्कुरा घाट सुरू व्हायच्या अगोदर दुकानात 3-3 दुकानदार लागत असत. परंतु आज तशी परिस्थिती नाही राहिली. जेव्हापासून गावात डिझेल वर चालणारी डूगडुगी रिक्षा सुरू झाली लोक नेहमी पाचल ये जा करू लागले आणि तिकडूनच लागणारा जिन्नस घेऊन येऊ लागले आणि त्यातूनच पाचलसारख्या गावात गुजराती/मारवाडी दुकानदार उदयास आले...

९) प्रशांत गो.जाधव,कोंडगे, रत्नागिरी 
खूप सुंदर आठवणी 
आमच्या दादांचा पगार झाला की आम्हा मुलांना दप्तराच्या पिशव्या घेउन विश्वासराव यांच्या दुकानात घेउन जायचे. उधारीची वही घेऊन यादी बनवायचे मागील हिशोब पूर्ण करायचे व पुढील जिन्नस घेऊन जायचे. यादीनुसार जिन्नस बांधून होईपर्यंत विठोबा काका आम्हाला गुळ शेंगदाणे किंवा खोबरे खायला द्यायचे. ही आपुलकी आणि गरिबीतही मनाची श्रीमंती आता लोक पावत असताना. आपण आपल्या लेखणीतून पुन्हा जागृत करुन देत आहात धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🌹🌹🌹

,१०) संदीप बारस्कर,कोंडगे, मुंबई 
दादा नमस्कार मी गावचे दुकानदार आयरे दादा ना लागणाऱ्या जिन्नसाची चीट्टी पाठवतो मग ते सगळे सामान भरून ठेवतात व आम्ही जाताना हे आमच्या घरी नेतो🙏🏻🙏🏻

११) अस्मिता मांडवकर,मासाळ, मुंबई 
श्री सुभाषजी लाड सर आपण लेख खरंच खूप छान लिहीला आहात माहेरवाशीण लहान मुलं दुकानाच्या बाकावर येऊन बसणारी वरीष्ठ मंडळी त्यांची विचारसरणी आणि महत्वाचे म्हणजे गावातील दुकानदार दादा त्यांची महत्वाची भूमिका असतें आपल्या गावातील आजीआजोबा यांना त्यांचाच आधार असतों म्हणून खरंच थोडं का होईना जिन्नस गावच्या दुकानातून खरेदी करणं योग्य ठरेल तेवढाच आनंद माल विकला गेल्याचा दुकानदार दादांना होईल कारणं मुंबईत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी धंदा करण्यासाठी येण्याअगोदर याचं दुकानातून आपणं जिन्नस खरेदी करून वेळ  चालवलेली असतें जर चाकरमानी गावी येऊन माल खरेदी करत असेल तर दुकानदार दादांना होणारा आनंद सुखावणाराच असेल खूप छान लेख लिहिला आहात धन्यवाद सर 🙏👌💐

Friday, August 8, 2025

महाबळेश्वरची आठवण करून देणारा अणुस्कुरा घाट

           ३ ऑगस्टच्या २०१६च्या पहाटे पहाटे मुंबईसह महाराष्ट्रातल्या घराघरातल्या दूरदर्शन समोर चिंताग्रस्त चेहऱ्याने सगळे बसले होते. दोन ऑगस्ट च्या रात्री महाड मधील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल तुटून अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. बसंतकुमार नावाच्या वर्कशॉप मधील कामगाराच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला नाही तर आणखी कितीतरी गाड्या त्या पुरात वाहून गेल्या असत्या.ती घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य आठवले की आजही अंगावर रोमांच उभे करते. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले. वाहने व मृतदेह शोधण्याचे काम तब्बल १५ दिवस सुरु होते. नेव्ही, कोस्टल, एनडिआरएफ, स्थानिक पोलिस, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत होती. पूल वाहून गेला पण माणूसकीचे अनेक पूल येथे उभे राहिले. सामाजिक संस्थांनी अन्नधान्य पाणी पुरवले.
         सावित्री नदी वरचा पूल हा मुंबई गोवा मार्गावरील मुंबई आणि महाडच्या पलीकडील कोकण गोवा यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. त्याचे महत्त्व जाणून महामार्ग विभागाने पुढील पुढील सहा महिन्यात हा पूल नव्याने बनविला.या दिवसांत प्रवाशांनी कोकण रेल्वे मार्गावर गर्दी केली असली तरी पर्यायी रस्ते मार्ग म्हणून  पुणे- कोल्हापुर मार्गे जाऊन सह्याद्रीतल्या वरंध घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट, भुईबावडा, करुळ, फोंडा, आंबोली अशा घाटातून कोकणात उतरणे हा पर्याय स्वीकारला.सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर लवकरच आलेल्या गणपती उत्सवात कोकणात वाहणारा चाकरमान्यांचा ओढा प्रथमच पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात उतरला. यावेळी कोकणातील गाड्यांसाठी सरकारने टोल माफ करून कोकणी माणसांच्या उद्रेकाला आवर घातला. परंतु त्यावेळी कोकणी माणसांची पुणे कोल्हापूर मार्गे होणारी वाहतूक सावित्री नदीचा पूल पूर्ण झाला तरीआज पर्यंत तशीच सुरू आहे  कारण मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाचे तीन तेरा वाजून तो रस्ता वाहतुकीस निकृष्ट ठरला तो आज मितीस तसाच आहे. 
           २०१६ च्या गणपती उत्सवात आम्ही सुद्धा आमची गाडी घेऊन पुणे - कोल्हापूर - मलकापूर मार्गे आंबा घाटातून रिंगण्याला आलो.मग कोणी म्हणू लागले आंबा घाटापेक्षा अणुस्कुरा घाट आपल्याला जवळ आहे. कोणी म्हणाले अणुस्कुरा घाट थोडा जिकिरीचा आहे. आमच्याकडच्या शाळांमध्ये कोल्हापूरकडचे शिक्षक बरेच आहेत.मी त्यांच्यापैकी अनेकांकडे चौकशी केल्यानंतर मला समजले अणुस्कुरा घाट हा वाहतुकीस चांगला आहे. आम्ही परतीचा प्रवास अणुस्कुरा घाटातून केला. येरडवच्या तिठ्याजवळ अणुस्कुरा घाट सुरू झाल्याचा बोर्ड वाचला. का कोण जाणे. हा घाट हा रस्ता हा आपला आहे याचा आनंद दाटून आला. मग मी या रस्त्याचा इतिहास गाडी चालवत असलेल्या पंकजला ( माझा मुलगा) कथन केला.
       "राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था मुंबईतल्या चाकरमान्यांनी राजापूर व लांजा तालुक्यातील गाव खेड्यांच्या विकासाकरिता १९५३ रोजी मुंबईमध्ये स्थापन केली. गाव खेड्यात प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्याकरिता त्या-त्या गावातील चाकरमान्यांना व गावकऱ्यांना एकत्रित करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन अनेक गावांमध्ये प्राथमिक शाळा सुरू केल्या गेल्या.यासाठी कोणी आपल्या जमिनी दान केल्या, कोणी आपली झाडे दिली, कोणी आपल्या पदरचे पैसे दिले तर कोणी श्रमदान करून शाळा उभारणीच्या कामात मदत केली. त्याकाळी गावात एखादीच मध्यवर्ती शाळा सुरू झाली असेल मात्र आज त्या त्या गावांकडे पाहिल्यानंतर गावांच्या वाडीवस्तीपर्यंत शाळा निर्माण झालेल्या आपल्या दिसून येतात. आज या प्राथमिक शाळा मुलांच्या संख्ये अभावी बंद पडत आहेत हे कोकणचे दुर्दैव आहे. मधल्या काळात या दगडी मातीच्या बांधकामाच्या जागी पक्या इमारती बांधल्या गेल्या. त्यांचा आवार सजवला गेला.इमारतींना रंगरंगोटी करून मुलांना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले पण आज हे सगळं मुलांविना भकास झालेलं पाहताना डोळ्यांत अश्रू येतात.
      आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सोडल्यास तालुका पातळीवर सुद्धा आरोग्य केंद्रे उपलब्ध नव्हती. पण संघाच्या प्रयत्नामुळे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज इस्पितळे उभी राहिलीच तशी पंचक्रोशी किंवा दशक्रोशीत सुद्धा एसएमपी सेंटर सुरू करून गाव खेड्यातल्या लोकांना नजीकच्या क्षेत्रात आरोग्याच्या सोयी उपलब्ध झाल्या.
         १९५६ ला आरगाव,ता. लांजा येथे झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करावा यासाठी ठराव करून आंदोलन उभारले गेले त्यात संघ यशस्वी झाला. शेतकऱ्यांचा शेतसारा कायमचा  माफ झाला.त्या अधिवेशनातच कोकणात रेल्वे आणावी असा ठराव करण्यात आला. त्या काळात गावागावात रस्ते पोहचले नव्हते तरीपण संघाच्या दूरदृष्टीच्या पदाधिकाऱ्यांंनी राजापूर आणि कोल्हापूर यांना जोडण्यासाठी अणुस्कुरा घाटातून मार्ग काढावा अशा प्रकारची मागणी या अधिवेशनातून सरकारकडे करण्यात आली. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर कार्यवाही सुरू झाली.वेळ बराच गेला तरी सन २००२ मध्ये अणुस्कुरा घाटातील रस्ता पूर्णत्वास गेला. पूर्वी आंबा घाट किंवा फोंडा घाटातून कोल्हापूर गाठावे लागत असे.अणुस्कुरा घाट सुरु झाल्याने वेळेची व पैशांची बचत झाली. " 
      यानंतर बऱ्याच वेळा या घाटातून माझे जाणे-येणे सुरू झाले. अणुस्कुरा गावात जिथे गाडी थांबते तिथे एक हॉटेल आहे. मी तिथे चहा पिण्यासाठी गेलो. मला चहा घेऊन आलेला मालक माझ्याकडे पाहतच राहिला. मलाही त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. पण या गावात माझा कधीच संबंध आलेला नसल्याने मी चहा प्यायला लागलो. मालक पुन्हा माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला "आपलं नाव कसं?"
" सुभाष लाड "
" रिंगणे गाव ना ! "
मी " होय " म्हटलं. 
" अरे मी चंद्रकांत ,चंद्रकांत पाटील,पुनाजी पेडणेकरांचा भाचा."
 मी चहाचा कप तसाच खाली ठेवत उठलो आणि चंद्रकांतला कडक मिठी मारली. हा चंद्रकांत माझ्या वर्गात पाचवी सहावीत आमच्या गावच्या शाळेत शिकत होता. अभ्यासात खूपच मागे होता पण फार गंमत्या होता. तू शाळा सोडून गेला तो पुन्हा कधी भेटला नाही तो आज भेटला. आम्हाला दोघांनाही फार आनंद झाला. गप्पा झाल्या. मी खिशातून पाकीट काढले.त्याने ते पुन्हा खिशात टाकण्यास भाग पाडले आणि " इकडे कधी आलास तर हक्काने चहा पिऊन जा". असे सांगितले.मी निरोप घेतला.
  
       सन २०२० घ्या शिमग्यात मी पालखीसाठी गावी गेलो असताना माझे वाडी बंधु रवींद्र शेलार माझ्या घरी आले. ते त्यावेळी येरडव गावी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते ते मला म्हणाले " तुला जुन्या गोष्टींची माहिती जाणून घेण्याची आवड आहे म्हणून तुला सांगतो.मला येरवडा गावात जुने देऊळ पाहायला मिळाले. उगवाई देवीचे मंदिर म्हणतात. त्याची पडझड झाली आहे.तू ते पाहिलेस तर तुला इतिहास शोधता येईल."  उगवाई मंदिर हे नव्यानेच मी नाव ऐकत असल्याने माझी उत्सुकता वाढली. मी अधिकची माहिती घेतली तर येरडव पाजेच्या तोंडावरती घाटमाथ्यावर ते मंदिर असल्याचे मला कळले. दुपारचे चार वाजले असल्याने आपण संध्याकाळपर्यंत जाऊन येऊ शकतो याचा अंदाज घेऊन मी रवींद्र शेलारांना आपण आजच जाऊया असे सांगितले. आम्ही त्याच दिवशी अणुस्कुरा  घाटातून वरती जाऊन उगवाई मंदिराला भेट दिली. मला रात्री मुंबईला निघायचे असल्यामुळे काळोख पडायच्या आत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेतच मुंबईवरून पंकजचा मला फोन आला. " कोरोनामुळे मुंबईतील वातावरण भीतीदायक झालेले असून सरकार लवकरच प्रवासावरती बंदी आणणार आहे तेव्हा आपण ताबडतोब मुंबईला निघा." 
     आम्ही मुंबईला आलो आणि कोरोनात घरात बंदिस्त झालो. मात्र उगवाई मंदिर आणि तो परिसर मला पुन्हा एकदा पाहण्यासाठी खुणावत राहिला. नंतरच्या काळात मी अनेक जणांना त्या भागात घेऊन गेलो त्या भागाची माहिती देत राहिलो. त्याच्यावरती ब्लॉग लिहिला तो अनेक लोकांनी वाचला. येरडव गावचे लोक त्यामुळेच माझ्या संपर्कात आले. त्यातून आपण या प्राचीन उगवाई मंदिराच्या आणि पाजेच्या प्रसिद्धीसाठी, जतनासाठी काहीतरी करायला हवं या विषयावरती चर्चा होऊ लागली. 
          गर्द झाडीत असलेल्या अणुस्कुरा घाटातून पावसाळी किंवा हिवाळ्यात प्रवास करणे हे फारच आनंददायी असते.मात्र एकदा दिवसाचा प्रवास करताना रस्त्यात कुठेच सावलीसाठी एखादे झाड नाही याची उणीव जाणवली. राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ गेली दहा वर्षे वेगवेगळ्या गावात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरण जनजागृती निर्माण करीत आहे.गतवर्षी वाटूळ - दाभोळ रस्त्यावर व्हेळ व वाघणगाव परिसरात वड, पिंपळ, चिंच,करंज व ताम्हण असे कोकणातील मातीत जगणारे ५०० वृक्ष लावण्यात आले.यासाठीच्या जाळ्या ' इंडियन ऑईल ' कंपनीच्या सहकार्यातून लावण्यात आल्या.कोकण मिडिया साप्ताहिकाने प्रसिद्धी सहकार्य केले. रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ,ता. लांजाने आयोजनात सहकार्य केले तर वाघणगाव ,व्हेळ, शिरवली विलवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उस्फुर्त सहभाग दाखवला. वृक्षमित्र अमर खामकर यांनी ५०० झाडांना वर्षभर पाणी देण्याचे, परिसर स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करून लावलेली सर्वच्या सर्व झाडे जगविण्याचे काम केले. यावर्षी वरील सर्व शाळांच्या सहभागातून दि.१८ जुलै २०२५ रोजी त्याच रस्त्यावर विलवडे भागात १०० झाडे लावण्यात आली.तसेच रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी अणुस्कुरा घाट रस्त्यावर झाडे लावण्यात आली. या रस्त्यापासून जवळच घाटमाथ्यावर असलेल्या शिवकालीन उगवाई मंदिर परिसरात फुल झाडे लावून तो परिसर सजवण्याचे काम करण्यात आले.
           उगवाई मंदिर हे शिवकालात बांधले असावे. मात्र या मंदिराच्या बाजूने येरडव गावात उतरणारी पाज ही काळ्या दगडात बांधलेली असून हे बांधकाम सातवाहन काळात झाले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. याच वाटेच्या वरच्या तोंडावर एक भला मोठा दगड असून त्याच्या पृष्ठभागावर शिलालेख आहे. तो मराठीतील शिलालेख स्वतंत्र अक्षरात असल्याने त्या अक्षरांची जुळवा जुळव करून वाचल्यास त्याचा अर्थ बोध होण्याची शक्यता आहे. त्या शिलालेखाच्या दगडापासून खाली २५ फुटावर आल्यानंतर बारमाही पाण्याचा झरा असून तो दगडांनी बांधण्यात आलेला आहे. त्याला ढोपर बाव म्हणतात. आपल्याकडे एखाद्या मंदिराचा इतिहास माहिती नसेल, त्याची निर्मिती केव्हा झाली हे माहीत नसेल तर ते पांडवकालीन आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हणताना या झऱ्याची निर्मिती पांडवानी ढोपर मारून केली असल्याची दंतकथा असून त्याचे नाव ढोपरबाव असे प्रचलित आहे. अणुस्कुरा घाट फोडून रस्ता झाल्यानंतर या पाजेवरची रहदारी बंद झाली. पाजेचा काहीसा भाग रस्त्यात गेल्याने पाज पूर्णतः बंद झाली आहे.
         उगवाई मंदिर आणि परिसर हा घाटमाथ्यावर असल्यामुळे तो भाग कोल्हापूर जिल्ह्यात येत असावा असा समज होतो मात्र पायथ्याशी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील येरडव गावाच्या हद्दीमध्ये तो मोडतो. घाटमाथ्यावरती उगवाई मंदिराच्या समोरच अणुस्कुरा ह गाव असून येथील ग्रामस्थ या देवतांची पूजा - अर्चा करत असतात. तिथे होळी उभारली जाते. शिवरात्रीच्या वेळेला येथे यात्रा भरते तर शिमग्यात या मंदिरात  अणुस्कुरा गावच्या ग्रामदैवताची पालखी आणली जाते. याच गावातील तरुण मंडळी या मंदिराच्या आणि मंदिर परिसराच्या देखभालीसाठी कार्यरत आहेत. मात्र वन खात्याचे अधिकारी त्यांना मुक्तपणे काम करू देत नाहीत. खरे तर इथले शाश्वत पर्यावरण जपताना धार्मिक अधिष्ठान असलेले उगवाई मंदीर परिसर जतनीकरण करण्यासाठी येरडव, अणुस्कुरा गावातील तरुणाईला वनविभागाने,शासनाने पुढाकार घेऊन प्रशिक्षित करायला हवे. मात्र हे होताना दिसत नाही.
         येरडवची हद्द या मंदिर परिसरात संपते. इथून पुढे मुख्य रस्त्यावर येईपर्यंत त्या काळात बांधलेला बारा फुटाचा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळे दगड रस्त्याची बाह्य सीमा म्हणून जमिनीत गाडलले आहेत. मध्येच एक पावसाळ्यातील पावसाचे पाणी वाहून नेणारी वहाळी आहे. या वहाळीचा पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून आज-काल रस्त्यात सिमेंटचे पाईप टाकून मोरी बांधली जाते तशा तऱ्हेने दगडांचे बांधकाम करून त्यावरून रस्ता नेला आहे. ते बांधकाम अभ्यासण्यासारखे आहे. असा अरुंद रस्ता आणि मोरीचे दगडी बांधकाम पाहिले की इथे बैलगाड्यांची बारमाही ये- जा होत असावी. पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत हे पाच उपयोगात येत होती. या पाजेची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी केली गेली असून सातवाहन काळात या पाजेचे दळणवळणासाठी असलेले महत्त्व जाणून ती दगडाने बांधण्यात आली असावी. शिवकाळात या वाटेचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात झाला असावा. सिद्धी जोहारने पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याच्या मदतीसाठी इंग्रजांनी तोफा पुरवल्या होत्या त्या तोफा राजापूरच्या वखारीतून आणल्या असून याच पाजेने त्या वरती चढवल्या गेल्या असाव्यात. कारण इतर कोणत्याही पाजांपेक्षा ही पाज पन्हाळगडाला जवळ असून ती बांधीव असल्याने या वाटेने तोफा चढवणे सोपे गेले असावे. 
          मुसा काजी बंदरात मोठमोठी जहाजे थांबत असत. तिथल्या जहाजावरचा माल किंवा प्रवासी हे पडावाने राजापूरच्या खाडीत आणले जात असे. त्यामुळे राजापूरच्या वखारीला मोठे महत्त्व आले होते. या वखारीतील माल देशावर नेणे व कोल्हापुरातील माल राजापुरातील वखारीत नेण्यासाठी येरडवची पाज ही महत्त्वपूर्ण ठरते. आस्मादिकांनी नुकतेच राजापूर जवळच्या पांगरी बुद्रुक या गावाला भेट दिली. त्या गावात असलेल्या हरीहरेश्वर मंदिराच्या प्रांगणात सातवाहन काळातील एक शिलालेख पाहायला मिळाला. सातवाहन काळातील असे अनेक दस्तऐवज कोकणात उपलब्ध असल्याने तसेच सातवाहनकालात कोकणात मंदिराची उभारणी झाली असावी त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे येरडवच्या पाजेलाही ऐतिहासिक दाखला म्हणून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. मंदिराच्या आसपास बैलगाड्यांचा तळ होता असेल. इथे जकातीचे नाका होता का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जर इथे जकातीचा नाका असल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण तिथे असण्याची शक्यता आहे. येथे आर्थिक व्यवहार सुद्धा होत असल्याने आजूबाजूच्या परिसरात ऐतिहासिक काळातील त्या त्या राजसत्तांची नाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. कालौघात इथे मोठ्या प्रमाणात झाडे निर्माण झाल्यामुळे या सर्वाचा शोध घेणे हे धाडसाचे काम असले तरी इतिहास संशोधकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.
         राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ हा गाव खेड्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अग्रेसर असतो, त्याचबरोबर संघाने कोकणाचे ऐतिहासिक महत्त्व जगापुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा या हेतूने संघाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षात या पाजेचा वापर होत नसल्याने या वाटेवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. ऐतिहासिक वाट मोकळी करण्यासाठी ती झाडी दूर करणे आवश्यक असून जिथे पाज तोडून रस्ता करण्यात आला आहे तिथून नव्याने जुन्या पाजेला जोडण्यासाठी नवी पायवाट शोधणे आवश्यक आहे. येथील मंदिराची पडझड झाली असून मंदिराच्या भिंती लगत रान माजले आहे. ते काढून टाकून मंदिराचा जिर्णोद्धार करणे गरजेचे आहे. 
आज या परिसरात आयोजित केलेला वृक्षारोपण समारंभ हा अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केलेला कार्यक्रम होता.
         संघाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जाहीर केला. श्री. मनोहर हरी खापणे या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विकास पाटील यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे ठरवले. अनुस्कुरा घाट परिसरात जवळपास जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे वृक्षारोपणात सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले.खापणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यात मोलाचे सहकार्य लाभले यासाठी राजू पत्की उत्साहाने सहभागी झाले होते. तळवड्याच्या सरपंच श्रीमती गायत्री साळवी यांनी पुजनाची व्यवस्था केली तर सामाजिक कार्यकर्ते किशोर नारकर यांनी  प्रगतशील शेतकरी दादा नारकर  यांच्या सहकार्याने फुलझाडांची व्यवस्था केली.वृक्षमित्र अमर खामकर  यांनी वड,आंबा व कडूलिंबाची झाडे आणली. आप्पा साळवी, प्रा.डाॅ.विकास पाटील आणि लांजा येथून माझ्यासोबत आलेले महेंद्र साळवी सर, विजय हटकर सर, मंगेश चव्हाण सर , महादेव पाटील सर आदी मंडळीनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले.येरडव गावचे उमेश दळवी, जयेश दळवी, विद्या शेलार आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.संघाशी जोडले गेलेले ग्रामविस्तार अधिकारी संदीप दळवी, अभिजित कोरे ,संजय चव्हाण व मंगेश पांचाळ यांनी खड्डे काढून झाडे लावण्याचा आनंद घेतला. मुंबईहून संघाचे सहचिटणीस गणेश चव्हाण, रमेश काटकर,विराज चव्हाण, दीपक आमकर, ह. भ. प. बाळकृष्ण चव्हाण, इतिहास अभ्यासक सुनील कदम आले होतेच तसे विख्यात चित्रकार विजयराज बोधनकर कोकणातील पावसाळा अनुभवण्यासाठी अगत्याने आले होते. 
        आम्ही पहिलेच वडाचे झाड लावले त्या घाटाच्या वळणात ' इंडियन फूड हब ' या फिरत्या उपहारगृहाच्या मालक सरिफा नाईक या तरुणीने घाटात लावल्या जाणाऱ्या सर्व झाडांना पाणी टाकण्याची जबाबदारी आपण घेत आहोत असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे वृक्ष लागवड करण्यासाठी आलेल्या सर्व वृक्षप्रेमींच्या आनंदाला उधाण आले. त्याने दिलेल्या गरमागरम चहाचे भुरके मारत आम्ही पुढे झाडे लावत लावत उगवाई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या तिठ्यावर आलो.संघाकडून इथे दिशादर्शक फलक लावण्यात आला या कामे जयेश दळवी यांचे मोठे सहकार्य मिळाले.
         आता सर्वांचे लक्ष उगवाई मंदिराकडे लागले होते.गर्द झाडीतून ऐतिहासिक वाटेवरून चालत जाताना धुकं,पाऊस यांच्या खेळाची मजा अनुभवत उगवाई मंदिराच्या पाठीमागच्या टेकडीवर उभे राहिल्यानंतर दिसणारे नजरेत न मावणारे नयनरम्य निसर्गचित्र पाहून इथे महाबळेश्वरची आठवण झाली. आमच्याच गावात असलेल्या कल्पनेच्याही पलीकडे असलेले निसर्गसौंदर्याला आज पर्यंत आपण पारखे राहिलो याची खंत वाटली. पण आता आपल्या इष्ट मित्रांना या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा आग्रह करून त्यांनाही सातवाहन कालीन अणुस्कुरा घाट माथ्यावरील पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आग्रह करणार जोडीने या पवित्र कार्यात सहभागी करून घेणार हा निश्चय माझ्यासोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने वनभोजनाच्या वेळी झालेला विचार मंथन बैठकीत केला.बरोबर सुग्रास वन भोजनाचा आनंद ही लुटला. परतीचा प्रवास करताना कोकणातील सिद्ध हस्त लेखक दीपक नागवेकर यांचे ' मोरपंखी ' हे पुस्तक या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने खरेदी केले. तेव्हा पुस्तक खरेदीची ही झुंबड वाचक चळवळीचा आता उभारी देणार याची खात्री मला पटली. माझ्यासोबत असलेली ही मंडळी ग्रंथस्नेही आहे हे पाहून आनंद वाटला.
        राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या स्थापनेतील धुरीणांच्या मागणीमुळे अणुस्कुरा घाट फोडल्याने केवळ कोल्हापूर जवळ आले नसून मुंबई-गोवा मार्गाला तो पर्यायही ठरला आहे.तसेच त्या घाटातील सातवाहनकालीन पाज, उगवाई मंदिर आणि शिलालेखामुळे कोकणच्या इतिहासाचे दस्तऐवज पाहण्याची संधी आणि निसर्ग सौंदर्य लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.संघाच्या धुरिणांना शत शत प्रणाम !

सुभाष लाड
९८६९१०५७३४
अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

          
         


    अभिप्राय :-----------

दीपेश बारस्कर ,कोंडगे     
         सुंदर अभ्यास पुर्वक माहिती माझ्या आजीचं माहेर येरडव खामकर, त्या काळी आजी तिच्या माहेरचे याच पाजेतून
दळणवळण करायचे.
बालपणी आजी आजोबांसोबत आम्ही येरडव ला एसटीने जायचो.मला सुद्धा प्रवासात दिसणारी गावे,डोंगर,झाडे,मंदिरे यांची माहिती सांगायचे.
पाजेतून घाटमाथ्यावरचे व्यापारी कोकणात यायचे.
उगवाई,पाज आजोबांकडून ऐकिवात होते 
त्या शब्दांचा उलगडा आज झाला.वरवर ऐकलेल्या माहितीला 
एवढा मोठा इतिहास असेल 
हे आपल्यामुळे समजले.
**"*************""""

Monday, August 4, 2025

रायगडाचे तटसरनोबत जावजी लाड यांचे स्मारक जतन करूया !


          १९८० च्या पूर्वी जे प्राथमिक शाळेत गेलेत त्यांच्या ओठांवर त्या काळातल्या पाठ्यपुस्तकातल्या गेयता पूर्ण, तालासुरात म्हणता येतील अशा आणि अर्थवाही कविता आजही रेंगाळत असतात. त्या काळात कविता पाठांतरावरती जोर दिला जायचा. शिक्षक छानशा चालीवरती त्या कविता वारंवार म्हणत तसेच घरी पाठांतर करून येण्यासाठी सुद्धा सांगत. मुलं घरी जेवा कवितांची घोकमपट्टी करत तेव्हा आपसूक काही पालकांना सुद्धा त्या कवितांची ओढ लागे. माझी आई पहाटे पहाटे जात्यावर ती बसून ' शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ ' ही कविता म्हणायची. आमच्या अगोदरच्या पिढीतल्या अभ्यासक्रमातली ती कविता आई वारंवार म्हणत असल्यामुळे मलाही ती कविता पाठ झाली होती.गेल्या वर्षी पार पडलेल्या वाटुळ येथील दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वाटून गावच्या  गं.भा. सुनंदा श्रीधर चव्हाण ( यायी ) या ९४ वर्षाच्या आजीबाईंनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या बालवयात त्यांनी पाठ केलेली कविता म्हणून दाखवली. एका अर्थाने ग्रामीण साहित्य संमेलनाचा फायदा काय हे म्हणणाऱ्यांना या आजीबाईंनी चपराक दिली.


        मी सातवी इयत्तेत असताना एक कविता मनात घर करून गेली.  कवी कुसुमाग्रज यांची ' अनामिकास ' ही ती कविता. रणांगणावर  धारातीर्थी पडलेल्या एका वीराचं चित्र कवितसोबत होतं.

  ' अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात ! '

अशा पहिल्या ओळी असलेल्या या कवितेत युद्धात

मृत्यू पावलेल्या अनेक वीरांचं आपल्याला नाव माहित नसतं, अशांच्या मृत्यू स्थळी कुणी स्मारक बांधलेलं नसतं, स्मारक बांधलेलं असला तरी त्या ठिकाणी कोणी दिवा लावत नाही. याचा अर्थ अशा वीरांचं स्मरण कुणी करत नाही त्यांचा इतिहास कोणाला माहिती असत नाही. तरीही अनेक जवान आपल्या सैन्यांमध्ये तळहातावर शीर घेऊन लढत असतात. देशभक्तीनं भारावून गेलेल्या या वीरांना केवळ देशाचा संरक्षण करणे हेच माहिती असतं.अशा अनाम विरांच स्मरण आणि त्यांचा जयजयकार करणारी ही कविता.महाराष्ट्राच्या इतिहासात शिवराज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी चेतवलेल्या स्वराज्याच्या यज्ञात अनेकांनी आहुत्या दिल्या त्यापैकी काही ठरावीकांची नोंद इतिहासाने घेतली. नरवीर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी पुढे पेशवाईत धनाजी संताजी बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा अशी काही नाव चटकन सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर उभे राहतात कारण त्यांचा इतिहास सर्वश्रुत झालेला आहे. पण जेव्हा इतिहासाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला यांच्याबरोबर अनेकांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्याच्या नोंदी आपल्याला बघायला मिळतात. अशा नोंदी पाहताना एखादी व्यक्ती आपल्या गावाकडची आपल्या परिसरातील आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी किंवा आपल्या आडनावा पैकी असेल तर आपली छाती अधिक रुंदावते. गेल्या महिन्याभरात मी भारावल्या अवस्थेत रायगडाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. इतिहास अभ्यासकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला कारण होतं युट्युब वरती आलेली


       दुर्ग रक्षक फोर्स या दुर्गप्रेमी मंडळीकडून आलेली रायगडाच्या काळकाई खिंडीत धारातीर्थी पडलेल्या रायगडाचे तटसरनौबत जावजी लाड यांच्या दुर्लक्षित असलेल्या स्मारकाबद्दलची गोष्ट.

           हा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर प्रथम इतिहासकार स्वर्गस्थ रवींद्र लाड उभे राहिले. मला त्याने लाड यांना नावाचा इतिहास सांगितला होता. राजस्थान कडे उंटावरून प्राण्यांचा व्यापार करणाऱ्यांना लाड असे म्हणत. ते लाड व्यापार करीत करीत महाराष्ट्रात उतरले ते लाड आपण आहोत असं त्यांचं ठाम मत होतं. लाड आडनावाचे कोणत्याही जाती जमातीत असले तरी ते राजस्थानातूनच आलेले असून ते एकाच जात कुळीचे आहे असं माझं मत आहे. लाडांचे घराणेही राजस्थानातील शिसोदिया घराण्यापैकीच आहे. त्यामुळे दुर्ग रक्षक फोर्सने टाकलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि त्याने या स्मारकाकडे लाड परिवाराने लक्ष द्यावा असे आव्हान ऐकल्यानंतर माझी अस्वस्थता वाढली. एका दृष्टीने आपल्याच लाड घराण्यातील एक वीर पुरुष स्वराज्याच्या कामी आलेला आहे याचा अभिमान दाटला असतानाच त्याचा पुरावा त्यांनी दिलेला पाहून , त्यांच्या स्मारकाची जागा त्याने शोधून काढल्याचे पाहून आपण त्या स्मारकासाठी काहीतरी करायला हवे यासाठीची माझी तगमग वाढली.


काळकाईची खिंड आणि तटसरनौबत जावजी लाड ( रायगड ) या नावाच्या व्हिडिओत

पेशवे दप्तर ३३ मधील लेख क्रमांक १६८ - हनुमानोड्डाण मारुतीरायासारखे उड्डाण करून लढले.......

शीर कटू नही देह रणांगणी लढले.......हा त्यांनी दिलेला ऐतिहासिक नोंदीचा दाखला आहे. तो देताना पुढे ते

' रायगडाच्या कुशीत घडलेला हा रणभैरव रणझुंजार वीर अभिमन्यू रणसंग्राम तुम्ही पाहिला आहे का ? ' रायगडावरती चार वेळा जाऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या प्रत्येक दगडाला पुन्हा पुन्हा नमस्कार करावा एवढीच भावना मनामध्ये असते. आपण पूर्ण रायगड जाणून घेतलाच नाही याचे सल मनाला टोचू लागले. स्वराज्य रक्षणास्तव मारुतीरायासारखे उड्डाण करून शत्रूवर चाल करून जाणारे तटसरनौबत जावजी लाड  यांची माहिती आपण करून घेतली नाही याचे दुःख अधिक वाटू लागले. किमान त्यांचे स्मारक तरी आपण पाहायला हवे हे मनात पक्के ठसले.

           तट सरनोबत जाऊदे लाड यांच्यात बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इतिहास अभ्यासक सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला अधिक माहिती दिली.

        *शाहूंची जिद्द आणि मराठ्यांचे तांडव - सिद्दीचे मुंडके छाटून रायगडवर पुन्हा भगवा फडकवला*.

रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली.मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली, रायगड मोहिमे व्यतिरिक्त फक्त पानिपतातच इतके मोठे सरदार आणि सेनापती एकत्र उतरले असावेत.

राजपुत्र फत्तेसिंह भोसले, बाजीराव पेशवे,छत्रपतींची हुजुरातीची फौज,पिलाजी जाधवराव,सरखेल सेखोजी आंगरे,सरलष्कर दावलजी सोमवंशी,सेनापती दाभाडे, येसाजी गायकवाड, हिम्मतबहाद्दर उदाजी चव्हाण,श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी आप्पा, भुईंजकर जाधवराव,कृष्णाजी खटावकर,उदाजी पवार,महाडिक,घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे रूप आले.१५-२० आघाड्यांवर युध्द सुरु झाले

मे महिन्याच्या आतच मोठे यश मराठ्यांना प्राप्त झाले बिरवाडी,अवचितगड, घोसाळगड, सुरगड, मदनगड,मंडणगड,विजयगड आणि बाणकोट हे किल्ले ताब्यात आले. फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते.

प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. गड मराठ्यांनी जिंकल्याने सिद्दी चवताळला सिद्दी अंबर ने रायगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, अनेक महिने चकमकी चालली, शेवटी १० जानेवारीला सिद्दी अंबर शी निकराचे युद्ध झाले. छत्रीनिजामपूर, पाचाड येथून रेटत मराठ्यांनी सिद्दी ला रायगड जवळ आणले, गडावरून खाशा फौज आली दोन्हीच्या मध्ये सापडून सिद्दी अंबर आणि त्याचे हजार भर सैन्य या युद्धात ठार झाले. शाहू छत्रपतींनी सिद्दी अंबर चे डोके कापून सातार्याला मागवले आणि जिवंत सापडेल त्या सिद्दी सैनिकांची डोकी कापावी,पाचाड व रायगड वाडी येथील सिद्धीचे वाडे तोफांनी उडवून टाकावे असे आदेश दिले.

सरदार कृष्णाजी खटावकर ,*किल्लेदार जावजी लाड* यांच्यासह अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून रायगड पुन्हा स्वतंत्र केला. शाहू छत्रपतींनी फत्तेसिंहबावा,बाजीराव,प्रतिनिधी यांचा मानाची वस्त्रे आणि मोठी बक्षिसे देऊन गौरव केला. अनेक मातब्बर मोहिमेत पहिल्यांदाच एकमेकांच्या बरोबरीने काम करत असल्याने चुरस निर्माण झाली त्यामुळे प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली.

(संदर्भ -शांताराम विष्णूआवळसकर - रायगडाची जीवन कथा.आपा परब -रायगड स्थलदर्शन आणि रायगड कथा पंचविशी. )

         आता मला रायगडाचे वेध लागले. त्या अभ्यासात सुनील कदम यांची याची वेळ घेऊन आम्ही रायगडाकडे निघालो. सुनील बुवा जाधव आणि जीवन पाटील यांना सोबत घेऊन प्रथम रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोके ठेवले. रायगडावरुन खाली उतरल्यावर हिरकणीचे वंशज असलेले आणि 'सह्याद्री हॉटेल ' चालवत असलेले पप्पू अवकिरीकर हे आम्हाला काळकाईच्या खिंडीत घेऊन गेले. लोहरज्जूपासून दोन किलोमीटरवर असलेल्या अरुंद पण पक्क्या रस्त्याच्या बाजूला डावीकडे झाडीत आम्ही शिरलो. सगळीकडे रान माजले होते. हाताने काढणे जेवढे शक्य होते तेवढे रान काढून स्मारक शिळा मोकळी केली. शिळेच्या दर्शनी भागावर हनुमानोड्डासारखे  हातात तलवार घेतलेले ते शिल्प पाहिले आणि डोळे अश्रूने डबडबले. इतके वर्ष अनाम राहिलेल्या त्या स्मारकाची निश्चिती झाली होती. पण ते स्मारक अजूनही ऊन पावसात आहे, गवत झाडीत लपले आहे याबाबत अपराधी भावना हृदय चिरून गेली. त्या शिळेला गंध पुष्प वाहून नमन केले. तट सरनोबत जावजी लाड यांच्या नावाने जयघोष केला. ते गवत आणि ती झाडी काढून स्मारकाला मोकळे करण्याची व्यवस्था लावून आम्ही माघारी फिरलो.



          राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि हितचिंतकांची दरवर्षी पावसाळी सहली निघत असते. यावर्षी रायगडावरती जाण्याचे आम्ही ठरवले. मुंबई आणि बाजूच्या भागातून सत्तर जण, लांजा तालुक्यातून स्थानिक कार्यकर्ते आणि महाड मधून साहित्यिक अवि जंगम आणि तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील डॉ. शितल मालुसरे याही आम्हाला येऊन मिळाल्या. याही वेळेला रायगड दर्शन झाल्यानंतर आम्ही  तटसरनौबत जावजी लाड यांच्या स्मारकाला भेट दिली. सर्वांच्या उपस्थितीत श्री. मारुती लाड व मी स्वतः सपत्नीक स्मारकाची पूजा केली. या वेळेला स्मारकाची साफसफाई केल्याचे पाहून मनाला समाधान वाटले. आता या लेखाच्या निमित्ताने मी समस्त लाड परिवाराला तसेच शिवभक्तांना आवाहन करीत आहे की " लाड घराण्यातील एक वीर पुरुष रायगडाचे तटसरनौबत जावजी लाड हे १० जानेवारी १७३३ रोजी स्वराज्याचे रक्षण करताना रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या काळकाई खिंडीत  धारातीर्थी पडले. त्यांच्या स्मारकाचे जतन करून त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या स्मारकाला चांगले स्वरूप आणू या. तिथे कायमचा एक कृतज्ञतेचा दिवा तेवत राहील याची काळजी घेऊया."

सुभाष लाड

९८६९१०५७३४

अध्यक्ष

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

विशेष सूचना रायगडला घेऊन सदर स्मारकाचा शोध घ्यायचा असल्यास आपल्या सहकार्य करील अशा मावळ्याचा मी आपल्यास फोन नंबर देतोय.

श्री. प्पू अवकीरकर 80805 71543 सह्याद्री हॉटेल , लोहरज्जू जवळ, रायगडाच्या पायथ्याशी

  Mr. Pappu Avkirkar 80805 71543. Sahyadri Hotel, near Loharju, at the foot of Raigad.