. मोडी दर्पण या दिवाळी अंकाचे हे सोळावे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांत या अंकाने मराठ्यांच्या इतिहासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर कोकणातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीच्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रांचा मागोवा घेण्यात येणार असून कोकणाला लाभलेल्या फार मोठ्या संतपरंपरेचा अभ्यास एकाच ठिकाणी करण्याची संधी मिळणार.या संतांनी कोकणात लोकजागृती करण्याचे काम केले.त्यांचा पसारा मर्यादित स्वरूपात राहिला असला तरी त्या त्या भागात त्यांना फार मोठे आदराचे स्थान मिळाले आहे.उदाहरणार्थ माणगावचे टेंबे स्वामी,पावसचे स्वामी स्वरूपानंद,ठाण्याचे गजानन महाराज पट्टेकर,तर नाणीजचे नरेंद्र महाराज, गगनबावड्याचे गगनगिरी महाराज तर तुंगारेश्वरचे बालयोगी सदानंद महाराज यांनी त्या त्या भागात अध्यात्म प्रसाराचे काम केले आहे याचा तेथील जनमानसात मोठा परिणाम झाला म्हणूनच या आणि अनेक थोर संत पुरुषांची चरित्रे यावेळच्या मोडी दर्पण दिवाळी अंकात वाचावयास मिळतील.
कोकणचा भूगोल कोकणची संस्कृती आणि कोकणचे लोकजीवन हा नेहमीच कुतूहलाच विषय राहिलेला आहे. त्याच्यावरती जेवढे कौतुकाने बोलले जाते तेवढे लिहिले गेले नाही. कारण लिहिते हात सुद्धा कमीच आहेत. म्हणूनच मोडी दर्पण मध्ये प्रथीत यश लेखकांबरोबरच नवोदित लेखकांना संधी देण्यासाठी आम्ही कोकणातील नागर व ग्रामीण जीवनावरती कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेतही सर्व स्तरातील लेखकांनी सहभाग घेऊन उत्तमोत्तम साहित्य देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.
नेहमीप्रमाणे मोडी शिकणाऱ्यांसाठी आवश्यक ते साहित्य असलेल्या या अंकात ललित आणि कवितांची ही मेजवानी असणार आहे.
चला तर मग लिहिते होऊया !
सुभाष लाड
संपादक
मोडी दर्पण २०२५
No comments:
Post a Comment