घरात अठराविश्व दारिद्र्य असले तरी घरी आलेल्या पाहुण्याला त्याच्या पाहूणचारात कुठेही उणीव भासणार नाही ही कोकणची संस्कृती. असेच एकदा घरी पाहुणे आले.घरच्या स्त्रीने त्यांना गोड शिरा करून देण्याचा बेत ठरविला. घरात काही नव्हतेच.तिने मुलाच्या हातात पिशवी व जिन्नस लिहिलेली चिठ्ठी देऊन नेहमीच्या वाण्याकडे पाठवले.वाण्याने वस्तू पिशवीत भरल्या.मुलाकडे पिशवी देता देता तो म्हणाला " पैसे ? "
" तुम्ही लिहून ठेवा,आई नंतर देईल"
मुलाचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच
" दोन महिने झाले अजुन एकही पैसा दिलेला नाहीय. आता उधारी मिळणार नाही."
असं बोलून दुकानदाराने भरलेल्या वस्तू काढून घेतल्या,रिकामी पिशवी त्या मुलाच्या हातात दिली.मुलाच्या डोळ्यांत टचकन पाणी जमले.खाली मान घालून तो घरी गेला.मुलाच्या हातातली रिकामी पिशवी पाहून आई काय समजायचे ते समजून गेली. बालवयात अनुभवलेल्या प्रसंगाने आपली आर्थिक परिस्थिती बदलायची असा विचार त्या मुलाच्या मनात दृढ झाला.घरी आलेल्या पाहुण्याला आपण मनासारखं देऊ शकलो नाही हे त्या कुटूंबाला अपमानजनक होते.
त्या दिवशी ठाण्यातल्या एका कार्यालयात पोहोचलो. साहेबांना भेटायचं आहे असं सांगितलं."साहेबांशी बोलणं झालंय का ?" हसर्या चेहर्यानं आलेल्या समोरच्या प्रश्नाला
" होय "
असं उत्तर देताच
" बसा ना सर ! "
असं आपलेपणाचं बोलणं ऐकून तिथल्या मऊशार सोफ्यावर बसलो.तीन मजले चढून आल्यानं जरा दमल्यासारखं वाटलं होतं. पाणी हवं असल्याचं जाणवलं.तेवढ्यात
" बाहेर एक ग्लास पाणी आण." असा फोनवर आवाज आला. पुढच्या काही मिनीटात शुभ्र ग्लास ट्रे मधून पुढे आला. पाणी पिऊन ग्लास खाली ठेवला.
" सर काॅफी घेणार की चहा ?"
मी काॅफी म्हटलं आणि समोरच्या तिपाईवर ठेवलेल्या पुस्तकात रमलो.
"सर नाव काय सांगू सरांना?"
" सुभाष लाड"
हा फोन साहेबांसाठी असणार असं समजून मी पुन्हा पुस्तकात शिरलो.तेवढ्यात काॅफी आली. काॅफीचे घोट घेतांना डोळ्यांसमोर ' आईच्या आज्ञेचं पालन करीत चिठ्ठी व पिशवी घेऊन वाण्याकडे जाणारा तो अधीर मुलगा,उधारी थकल्याने भरलेला जिन्नस परत काढून घेणारा व्यावहारिक वाणी , पुन्हा रिकामी पिशवी घेऊन माघारी जाणारा तो अपमानीत मुलगा,घरी आलेल्याचा योग्य पाहुणचार करता आला नाही याची बोच सहन करणाऱ्यां घरंदाज व संस्कारी आईचा निराश चेहरा हे सगळं मला आठवत होतं.कारण त्याच मुलानं त्यावेळेला कष्ट करून आपली आर्थिक परिस्थिती बदलायची असा दृढ निश्चय केला होता.आणि पुढे त्याने तो पूर्णत्वास नेलेला होता.मराठी उद्योग समूहात त्यांचं नाव गेली कित्येक वर्षे आदरानं घेतलं जातंय. शून्यातून सुरूवात केली नी आज करोडोंची ऊलाढाल करताहेत. हजारो लोकांचे संसार फूलवण्याचं काम करताहेत. स्वतः मात्र सामान्य माणूस राहून जगतांना घरी आलेल्या प्रत्येकाचा आदरपूर्वक पाहूणचार करतातच पण त्यांच्या कार्यालयातही त्या पाहुणचारात कुठे कमी राहणार नाही याची काळजी घेतात हे पाहून त्यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढतो. त्या काॅफीने मी सुखावलो.
तसं पाहिलं तर त्यांची नी माझी ही पहिली भेट नव्हती.गेल्या वर्षभरात गावाकडे आम्ही दोन तीनदा गप्पा मारल्या.गावचं घरपण जपणाऱ्या त्यांच्या घरातही सुखद सहवास लाभला पण पहिली भेट शिवाजी मंदिरच्या मॅजेस्टिक मध्ये झाली ती २०१८मध्ये. नेहमीप्रमाणे मी काही पुस्तके निवडताना एका पुस्तकावरच्या हसर्या चेहऱ्यानं लक्ष वेधलं. पुस्तकाचं नाव
' मी कोण ?'
.त्याच चंदेरी रंगात चरित्र नायकाचं नाव होतं श्री.रवींद्र प्रभुदेसाई. कोपर्यात असलेल्या पितांबरी या नावानं मात्र मला भुरळ घातली कारण पितांबरीवाले आमच्या जवळच्याच तळवडे गावचे हे मी ऐकून होतो.घरी जेव्हा केव्हा पितांबरी आणली जायची तेव्हा मी अभिमानाने बायकोला सांगायचो.ही आमच्या गावच्या माणसाच्या कारखान्यात तयार होते.मला माझ्या गावाकडच्या माणसांबद्दलचे अप्रूप नेहमीच वाटत असल्यानं मी ते पुस्तक घेतलं.त्या रात्री वाचून काढलं. आपल्या मातीतला एक उद्योजक जाणून घ्यावा एवढ्याच अपेक्षेनं मी पुस्तक घेतलं पण पुस्तक वाचल्यानंतर केवळ उद्योजक नाही तर माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक ठरावं अस हे चरित्र आहे असं मला वाटलं.मला आवडलेलं पुस्तक माझे मित्र विजय हटकर यांना वाचावयास सांगत असतो.यावेळेला मी पुस्तकच त्यांना दिलं आणि पुन्हा मॅजेस्टिक मधून आणखी एक पुस्तक खरेदी केलं.त्याच्यावरचे वेस्टन न काढताच कधीतरी साहेबांची भेट होईल तेव्हा त्यावर त्यांची सही घेताना ते वेस्टन काढायचे असं ठरवून ते पुस्तक ठेवलं होतं.
या वर्षी संघाचं नववं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन शिपोशीला होणार आहे.त्यावेळेस निघणाऱ्या ग्रंथदिंडीतल्या पालखीत स्थानिक लेखकांची पुस्तके ठेवण्याच्या रिवाजाप्रमाणे ते ठेवले जाईल.साहेब तर संमेलनाचे उद्घाटक आहेत.म्हणून पुस्तकावर सही घेण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या कार्यालयात गेलो. थोड्या वेळानंतर गणेश चव्हाण आले.गावाकडच्या गप्पांनी वेळेचे भानही राहिले नाही.आजच्या भेटीने तर साहेबांचे जन्मभूमीवर किती निरलस प्रेम आहे हे दिसून आले.
वयाच्या एकविसाव्या वर्षी व्यवसायातील चढउतार गाठीशी घेऊन पुन्हा नव्या दमात उभे राहून तांब्या पितळेची भांडी लख्ख करणारी पावडर सुरूवातीला आपल्या परिचितांस मोफत देऊन त्यांचा सकारात्मक अभिप्राय मिळाल्या नंतर त्या पावडरचे नाव त्याच बरोबर उद्योगाचे नाव 'पितांबरी ' ठेवले.डाॅक्टर जशी गोळ्यांची पुडी बांधतो तशा कागदाच्या पुडीतून सुरू झालेला 'पितांबरीचा ' प्रवास पुढे आकर्षक आवरणातून ठाणे मुंबईत लौकिक प्राप्त करता झाला.पण देश विदेशातही पितांबरीची मागणी वाढली.हे कसं घडलं हे जाणून घ्यायलाच हवंय पण पुढे स्वत:च्याच उत्पादनांचे डिपार्टमेंटल दुकान थाटण्याइतक्या दर्जेदार उत्पादनांचं गूपीत काय ? शेती व पर्यटन क्षेत्रात मुशाफिरी करतांना आपल्या ' तळवडे ' या जन्मभूमीला जगाच्या नकाशावर आणतांना इथल्या हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध करून लाखोंचा पोशिंदा होऊनही त्याच गावच्या सामान्य महिलेच्या चवदार हातून तयार झालेली 'पातोळी ' खातांना स्वर्ग सुखाची अनुभूती घेणारे पितांबरीकार एवढे जमिनीवर कसे वावरतात याचा शोध घ्यायचा असल्यास सौ.श्वेता गानू यांनी लिहिलेले ' मी कोण ' हे पुस्तक आवर्जून वाचायला हवंय.
तूर्तास साहेबांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देतांना
त्यांचे आवडते सुभाषित म्हणतो.
सूतो वा सूत पुत्रो वा यावा कोsवा भवाम्यहम्
दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषमं
सुभाष लाड
४/२/२०२४
९८६९१०५७३४