Monday, February 12, 2024

पुरस्कार पुलकित झाला.*

 


             आपलं कौतुक व्हावं ही प्रत्येक जीवाची आंतरिक अपेक्षा असते.लहान मुलानं नाच केल्यावर सर्वानी टाळ्या वाजविल्या की आपण काहीतरी वेगळं केलं आहे आणि ते सगळ्यांना आवडतंय हे त्या बालमनाला पुलकीत करते.मग आपण असंच काहीतरी काम करायला हवंय असं त्याला वाटतं राहातं.तो एक संस्कार असतो .पुढे त्या संस्कारातच ते मूल वाढत राहातं. निरागस मनाची झालेली ही मशागत मोठेपणी ती तशीच राहाते असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. जसजसे मूल वाढत जाते तसतसे गुण - अवगुण त्याच्याभोवती पिंगा घालत असतात.त्यातलं काय घ्यायचं आणि काय दूर फेकायचं याचं भान प्रत्येकालाच असतं असं नाही.यासाठी घर, परिसर आणि शाळा इथल्या वातावरणाची महत्वाची भूमिका असते.आणि वातावरण कोणतेही असले तरी मुलांना नेमकं कोणत्या दिशेनं जाणे आवश्यक आहे याचं दर्शन त्याला त्यांच्या शिक्षकात होतं.कोणत्याही काळात किंवा  प्रदेशात शिक्षकाचं महत्व अधोरेखीत झाले आहे.म्हणुनच आजही शिक्षकाला समाजातल्या इतर कोणत्याही घटकापेक्षा अधिक मान असतो.
           प्रत्येक काळात अगोदरची पिढी नंतरच्या पिढीला आपल्या काळात शिक्षकांना कसे महत्व होते,शिक्षक कसे वागत होते याचं गुणगान गाते आणि आता कशी वाताहात झाली आहे दाखवून देते.पण प्रत्येक काळाची जीवन जगण्याची पद्धत बदलत असते त्याप्रमाणे शिक्षकाला बदलावे लागते हे समजून घेतांना आपल्या समोर असलेल्या मुलांना माणूस म्हणून जगण्यासाठीच आवश्यक ते पैलू पाडायचे असतात याचे शिक्षकाला भान असते.विद्यार्थ्याला एखाद्या विषयात कमी गुण मिळतात तेव्हा त्या विषयाची त्याची तयारी झाली नाही असे म्हणता येईल  पण एखादा विद्यार्थी बेशिस्त वागतो तेव्हा "तुला हेच शिकवलं का रे " असा आपसूक प्रश्न केला जातो तो त्याच्या शिक्षकासाठी असतो.
           मी गेली पंधरा वर्षे महेंद्र साळवी सरांच्या सहवासात आहे.त्याही अगोदरपासून त्यांच्या रूक्मिणी भास्कर विद्यालयाच्या दहावीच्या शंभर टक्के निकालाची कौतुकास्पद  कामगिरीबद्दल ऐकून होतोच.त्यात साळवीसरांच्या विषयाचा निकाल शंभर टक्के असणारच पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी ते विशेष मेहनत घेत असतानाचे मी जवळून पाहिले आहे.ते इतरांसारखे एक विषय शिक्षक आहेत.त्यांना त्याचा चांगला पगारही मिळतो.पण ते पगारी शिक्षक नाहीत तर व्रतस्थी शिक्षक आहेत.त्यामुळेच हक्काच्या रजा आहेत त्या आपल्याला उपभोगण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी उगाच रजा कधी घेतल्या नाहीतच उलट सार्वजनिक सुट्टीतही त्यांनी मुलांना शाळेत बोलावून अधिकचे वर्गही ते स्वखुशीने घेत असतात. ते केवळ आपल्या विषयापुरते गंभीर नसून चित्रकलेत प्राविण्य दाखवणार्‍या मुलांसाठी चित्रकला शिक्षक होतात तर विज्ञान प्रदर्शनातही आपल्या मुलांच्या कल्पकतेला खतपाणी घालण्यासाठी आणि प्रदर्शनात त्यांना अव्वल बनविण्यासाठी ते जिवाचे रान करतात.एकदा तर त्यांनी मुलांच्या काव्य करण्याच्या कौशल्याला उत्तेजन देताना जवळ जवळ मुलांच्या दोनशे कवितांचे हस्तलिखित करून त्या मुलांना आनंद दिला होता.
           मला एकदा विचारण्यात आले होते की तुम्ही संघातर्फे आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देता त्याचे निकष काय?त्यांना ऊत्तर देताना मी म्हणालो "जो शिक्षक मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करतो,मुलांना विविध उपक्रमात सहभागी करून त्यांच्यातील विविध कौशल्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करतो,ज्या परिसरात त्याची शाळा असते त्या परिसरासाठी त्यांच्याकडील ज्ञानाचा उपयोग केला जातोय.ज्या शिक्षकांबद्दल समाजमनाचा कानोसा सकारात्मक असेल त्या शिक्षकाची निवड त्याच्या अपरोक्ष संघाची निवड समिती करीत असते."
नुकतेच आपण कोरोनाच्या संकटातून मुक्त झालो आहोत.त्याचा मुकाबला करतांना पोलीस,वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका यांच्याबरोबर शिक्षकही योद्धा बनून रणांगणात उतरले होते.साळवी सरांना ज्या गावाची जबाबदारी दिली होती ती पार पाडताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्यापुढे अनोखा आदर्श निर्माण केला, गावकऱ्यांना ते आपले मित्र वाटले आणि त्यामुळे त्यांना सर्वांकडून सहकार्य मिळाले त्याचा परिणाम म्हणून त्या गावात एकही कोरोनामुळे मृत्यु झाला नाही. आजही त्या गावात साळवी सरांबद्दल आदर दाखवला जातो तो त्यांच्यासाठी पुरस्कार आहे.



           सर ज्या कामात उतरतात तेव्हा तन मन धन देण्याच्या तयारीत असतात.त्या कामाचे  नेतृत्व कोणाकडेही असो पण जबाबदारी आपल्याकडे आहे अशीच भावना ते ठेवतात तेव्हा ते राबतांना पुढे दिसतात  श्रेयाच्या वेळी मात्र स्वत:ला लांब ठेवतात. सर राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाचे एक बिनीचे शिलेदार म्हणून काम पाहतात. त्यांच्या सारख्या अनेक प्रामाणिक व नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी संघासाठी उभी केली म्हणुनच अलिकडच्या काळात संघाकडून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जाताहेत त्यामुळेच संघ घराघरात पोहोचतो आहे.याचबरोबर ते त्यांच्या वेरळ गावच्या विकासासाठी झटत आहेत. शिक्षक संघटनेतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.जिथे जाईल तिथे माणसं जोडणारा हा माणूस आपल्या एकत्र कुटुंबातही तितक्याच आनंदात रमलेला आहे.ते त्यांच्या कुटुंबात मोठे आहेत की छोटे आहेत हे मला माहित नाही  पण त्या कुटुंबात अधिक प्रेमभाव वाढावा यासाठी ते करीत असलेला विचार आजच्या भरकटत चाललेल्या समाजव्यवस्थेत आदर्श ठरणारा आहे.
            सर्वांच्या मदतीसाठी सदैव तयार असणारा, नेहमीच हसतमुख चेहर्‍यानं वावरणारा,मोजकेच पण लाख पते की बात करणारा,काही केल्याचा बडेजावच काय पण प्रसिद्धीपासून चार हात दूर असलेला हा माणूस स्वत:ला शिक्षक म्हणवून घेण्यात आणि तसेच जगण्यास अधिक महत्व देतो म्हणूनच सार्वजनिक जीवनात भले त्यांचा वावर असेल पण प्रथम प्राधान्य आपल्या शाळेला अर्थात आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांनाच ते देत असतात.  शिमग्याच्या दिवसांत कोकणात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत असतो.मोठ्या संख्येनं चाकरमानी दारात येणाऱ्या पालखीची पुजा करण्यासाठी सुट्टी नाही मिळाली तर दांडी मारून येतात. अर्थात आबालवृद्ध ग्रामस्थही तेवढेच उत्साही असतात.साळवी सरही आपल्या मुलांना,पत्नीला घेऊन घरी जातात.सगळा बेत आखतात पण गेल्या कित्येक वर्षात सरांच्या घरी पालखी आलेली असते.सगळे कुटुंब त्या सोहळ्यात मग्न असते आणि साळवी सर मात्र दहावीच्या परीक्षेच्या वर्ग खोलीत पर्यवेक्षण करीत असतात. घरी आलेला देव घरच्यांसाठी शुभाशीर्वाद देत असताना साळवी सर विद्यार्थीरूपी देवाची सेवा करीत असतात आणि म्हणूनच कधी तरी अचानक एखादा आवाज येतो
" सर,ओळखलंत का मला?.मी अमूक अमूक,अमूक वर्षी दहावी झालो."
सर थांबतात,त्याची आस्थेने विचारपूस करतात. त्याचा नमस्कार घेतात आणि त्याचं छान चाललं आहे एवढ्या एका वाक्यानं भरून पावल्याचं समाधान घेऊन पुढे निघतात. खरं म्हटलं तर हाच शिक्षकाचा पुरस्कार असतो. अशा अनेक पुरस्कारांचे धनी असलेल्या महेंद्र साळवी सरांना आज हर्चे येथील आदर्श ठरलेल्या नाथ पै विद्यालयाच्या सभागृहात आज सरांना जेव्हा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्रदान केला गेला तेव्हा त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांना व सरांच्या हजारो चाहत्यांना आनंद झालाच पण पुरस्कारही योग्य माणसाकडे गेल्याने पुलकीत झाला.

सुभाष लाड
9869105734



           

1 comment: