Sunday, April 12, 2026

कोकणच्य उद्योजक सुपुत्राला सलाम !

         

     
       समोर ओल्या काजूच्या बियांचा कॅरेट भरलेला पाहून मी प्रश्न केला " हे काजू कुठून आणलेत ?" त्यांनी पटकन सांगितलं " हा सर्व माल आपल्या गावाकडून येतो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतून येतो." माझ्या डोळ्यांसमोर आपल्याकडच्या गावातील काजूच्या, आंब्याच्या बागा डोळ्यांसमोर आल्या. तिथला शेतकरी काजूच्या बिया तोडतोय, पिशव्यांमध्ये भरतोय, वजन करतोय आणि लगबगीने मुंबईला पाठवतोय हे चित्र माझ्या कोकणला समृद्धीकडे नेणारे असल्याने ते सुखावह वाटले.

          सह्याद्रीच्या पायथ्याशी सह्याद्रीला खेटूनच वसलेल्या कुरंग गावचे उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तोरसकर यांच्या मातोश्रींचं नुकतंच त्यांच्या वयाच्या ८७ व्य वर्षी दुःखद निधन झालं. शिमग्याच्या निमित्ताने मी गावाकडे असल्यामुळे मला ती वार्ता तात्काळ करू शकले नाही. मी मुंबईला आल्यानंतर गणेश चव्हाण आणि रमेश काटकर हे काही कामानिमित्ताने  माझ्याकडे आले असता त्यांच्याकडून प्रकाश पुरस्कारांची आई निवर्तल्याचे कळले. दोन दिवसांपूर्वी माझ्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असल्यामुळे माझ्या बाहेर फिरण्यावरती निर्बंध आले असल्याने संध्याकाळची वेळ साधून गणेश चव्हाण यांच्याबरोबर आम्ही जोगेश्वरीला पोहोचलो. रमेश काटकर यांचे कार्यालय अंधेरीला जवळच असल्याने तेही तिथे येऊन पोहोचलो.


           जोगेश्वरी पूर्वेला मजासवाडी भागातील गुंफा रोडवर शंकर मेस्त्री चाळीतील एका प्रशस्त खोलीत प्रकाश तोरस्कर यांचे कुटुंब राहते.याच चाळीत अजुनही एक खोली असल्याचे त्यांच्याकडून कळल्याने माझ्या भूवया वरती गेल्या आणि मी त्यांना बोलतं केलं. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई हातात आणण्याचे कसब असते असे नाही.त्यामुळे मुंबईत हयात घालवूनही अनेकांना आपल्या मालकीचा निवारा करता आलेला नाही.इथे तर १९५४ सालात प्रकाश यांचे वडील रामचंद्र तोरस्कर यांनी स्वतःची खोली घेतली आणि मुलगा कर्ता झाल्यानंतर त्यांने आपल्या हिंमतीवर आणखी एक खोली घेतली.आज तो भाग चांगल्या सुविधा युक्त असलातरी १९५४ सालात तो भाग म्हणजे आदिवासी पाड्यासारखा होता.त्या काळात तो मुंबईबाहेरचा प्रदेश होता.

     मुंबई महानगरपालिकेची स्थापना १८६५ मध्ये झाली आणि आर्थर क्रॉफर्ड ( क्राॅफर्ड मार्केट ही त्यांची आठवण करून देते )यांना पहिले महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीे. सुरुवातीला महानगरपालिका गिरगाव रोडच्या शेवटी असलेल्या एका साध्या इमारतीत होती. १८७० मध्ये ती एस्प्लानेड येथील वॉटसन हॉटेल आणि ससून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट दरम्यानच्या इमारतीत हलवण्यात आली, जिथे सध्या आर्मी अँड नेव्ही इमारत आहे​.सर फिरोजशहा मेहता यांनी मुंबई महानगर पालिकेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली​. १८७२ मध्ये त्यांनी बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार केला, ज्यामुळे त्यांना "बॉम्बे म्युनिसिपालिटीचे जनक" म्हटले जाते​. १८८८ मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्टने १८७२ च्या अधिनियमाची जागा घेतली​. मुंबई महानगरपालिकेचा जन्म झाला. त्यावेळेला मुंबई ही पूर्वेकडे शिव या गावापर्यंत तर पश्चिमेकडे माहीम या भागापर्यंत सीमित होती.


        मुंबईतील वस्ती वाढत असताना दिसते त्याला कारण इथे रोजगार उत्पन्न करणार्या कापड गिरण्या तयार झाल्या.७ जुलै १८५४ रोजी  मध्ये ताडदेव येथे बाॅम्बे स्पिनिंग ॲण्ड विव्हिंग मिल कावसजी नानाभाई दावर या उद्योगपतीने सुरू केली पुढे १९०० पर्यंत यांची संख्या १२५ पर्यंत पोहोचली.लालबाग,परळ,लोअर परळ या भागात सगळीकडे गिरण्यांच्या चिमण्या धूर सोडताना आणि कामगारांना प्रवेश देणारे भोंगे वाजवतांनां दिसत होत्या.एकेका मिल मध्ये हजारोंनी कामगार काम करीत होते त्यामुळे या भागाला गिरण गाव म्हणत होते.कोकणातल्या गाव खेड्यातल्या हाताशी आलेल्या तरुणांना या गिरण्यांचेच आकर्षण होते.तसेच कुरंग गावचे रामचंद्र तोरस्कर कुणाच्या तरी सोबतीने राजापूरच्या खाडीतून व मुसाकाजी बंदरातून मुंबैस आले.

एवढ्याशा मुंबईत दरदिवशी हजारोंनी येणाऱ्या बाहेरील लोकांना रोजगार मिळत होता पण राहण्यासाठी जागा कमी पडू लागली आणि आज जसे मुंबईतील मराठी माणूस कल्याण कर्जत आणि विरार पर्यंत पोहोचला तसा तसा मुंबईतला कामगार निवारा शोधत इकडे वांद्रे आणि तिकडे कुर्ल्याच्या दिशेने जाऊ लागला.१९०० च्या दरम्यान मुंबई बाहेर पडण्याची सुरुवात झाली आणि ठाणे जिल्ह्यातील साष्टी बेटावरील वांद्रे, अंधेरी, घाटकोपर कुर्ला या भागात बर्यापैकी वस्ती झाली.वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, मालाड, गोरेगाव, बोरिवली आणि घाटकोपर यांसारख्या भागांचा विकास १९२० ते १९३० च्या दशकात 'उपनगरे' (Suburbs) म्हणून होऊ लागला होता. १९३० च्या दशकापर्यंत या भागांमध्ये नगरपालिका स्थापन झाल्या होत्या. ( राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे प्रथम अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव चव्हाण हे कुर्ला नगरपालिकेमध्ये सुप्रीटेंडेंट या पदावरती होते पुढे ज्यावेळेला कुर्ला नगरपालिका मुंबईला जोडली गेली त्यावेळेला त्यांना मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्यात आले )१९५० मध्ये, मुंबई शहराची हद्द वाढवून त्यामध्ये उपनगरीय नगरपालिका आणि साष्टी (Salsette) बेटावरील काही गावांचा समावेश करून 'बृहन्मुंबई महानगरपालिका' (Greater Bombay Municipal Corporation) स्थापन करण्यात आली. १९५७ मध्ये अंधेरी आणि बोरिवली तालुके पूर्णपणे महापालिकेच्या अखत्यारीत आले.आणि मुंबईची बृहन्मुंबई असे नामकरण झाले.

         याच दरम्यान जोगेश्वरी येथे आलेल्या रामचंद्र तोरसकर यांनी मोकळ्या जागेवर झोपडी उभारली आणि सोबत गावच्या घरच्या परसदारी झाडे लावतात तशी सुंदर बागही तयार केली.पण त्यावेळच्या गावगुंडांनी त्या टेकडीवर जमेल तशा झोपड्या बांधल्या आणि त्यांची बाग गेली. आज तिथे इमारत होत आहेत त्यामुळे आता त्या नगराचा नक्शाही बदलेल.

         स्व.राम़चंद्र तोरस्कर एकत्रित शेतकरी कुटुंबात जन्मले.शेती हाच आपला खरा व्यवसाय असल्याने लहानपणापासून ते शेती करीत होते.खाणारी तोंडे जास्त आणि राबणारे हात कमी असतात तेव्हा शेती बरोबर कुणी तरी मुंबईत नोकरी करुन गावाला पैसे पाठवावे हा कोकणचा शिरस्ता तोपर्यंत पक्का झालेला असल्याने तरुण वयातच त्यांनी मुंबईचा खडतर प्रवास केला. मुंबईत गिरणी नोकरी करुन मुंबईत जम बसवला पण  वाडवडिलांकडून आलेली जमीन आपण कसवली पाहिजे म्हणून पत्नी आणि मुलांना गावातच ठेवले. त्यामुळे प्रकाश यांचे प्राथमिक शिक्षण कुरंग येथे व माध्यमिक शिक्षण कोंडगे गावात झाले.

          मुंबईत येऊन त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करून इंटेरियर डेकोरशन चा व्यवसाय सुरू केला.त्या व्यवसायात जम बसल्यावर  पाठच्या भावाचा विचार करून या  व्यवसायाला जोड म्हणून ट्रॅव्हल कंपनी सुरू केली.हा हा  म्हणता त्याही व्यवसायात प्रगती होत असताना प्रिय बंधूंचे अपघाती निधन झाले. पण दु:ख करून व्यवसाय चालवता येणार नव्हता आणि सिटी बॅकेचे इंटेरियरचे काम वेगवेगळ्या राज्यात करणे कठीण झाल्याने ट्रॅव्हल च्या व्यवसाय चालवणे गरजेचे झाल्याने पुन्हा नव्याने काम सुरू केले.पण कोरोनाच्या महामारीने कंबरडेच मोडले.चारचाकीसहीत बस असा चाळीस गाड्या आणि शंभराच्या आसपास कर्मचारी एवढा मोठा व्याप झपकन जाग्यावर बसला. वर्षभर एकाच ठिकाणी ठेवलेल्या गाड्या कुणी विकतही घेईंना त्यामुळे गाड्या भंगारात विकून आणि जवळचा पैसा पुढे करून बॅंकाची देणी भागवली.पण पुढे काय हा प्रश्न होताच.आतल्या रस्त्याला लागून असलेला एक गाळा भाड्याने घेतला आणि कोकणात मिळणारी फळे आणि फळ प्रक्रियेतून तयार केलेले पदार्थ विकायला सुरुवात केली.


          शेतीत आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मातोश्री सत्त्याऐंशी वर्षे निरोगीपणे जगल्या.शिमग्याची पालखी शिंपणं पडून देव देवळात शांतपणे विराजमान झाले. प्रकाश मुंबईत आले आणि मातोश्रींनी चालता बोलता अखेरचा श्वास घेतला.मरणाला काहीतरी कारण लागत तसा हृदयविकाराचा तिव्र झटका आला.उपचारालाही वेळ दिला नाही.त्याचा सल लागून राहिला.

         वहिनींनी दिलेला चहा घेऊन बाहेर पडलो.सोबत प्रकाशही बाहेर पडले." आता आला आहात तर दुकान ही बघून चला " असे म्हणाले म्हणून दुकानात आलो.इंजिनिअर होऊन नोकरी करणारा त्यांचा मुलगा मानस घरी आल्यावर दुकानात बसतो हे प्रत्यक्ष पाहिले आणि मला कौतुक वाटलं.फारसं शिक्षण नसतानाही वडिलांच्या व्यवसायात मदत करायला आजच्या तरुणाईला लाज वाटते.कष्टाचं काम असेल तर घरचा पोरगा भैय्याला कामाला बोलावेल पण आपण हात लावणार नाही हे मराठी माणसाचं दु:ख आहे.म्हणुनच रत्नागिरी आंब्यांच्या बागेत काम करणाऱ्या नेपाळी लोकांची संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे.मी मनापासून मानसचे कौतक केले. हा मुलगा भविष्यात गडगंज पैसा कमवेल याबद्दल मला शंका नाही.


       दुकानात कच्च्या काजू बीया आहेत. त्या रिंगणे ,कोंडगे, कुरंग ,आरगाव, परुळे अशा गावातून मुंबईला येतात. या काजू बिया दोनशे रुपये किलो या भावाने येथे विकल्या जातात. जवळची कुठे मागणी असेल तर ते घरपोचही करतात. प्रकाश तोरस्कर यांनी स्वतःचा व्यवसाय उभारताना आपल्या मातीतल्या माणसांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी केलेला हा जुमला त्यांचे आपल्या माय भूमीवर किती प्रेम आहे हेच दाखवतो. विशेषता कोकणी माणसाला रविवारच्या मांसाहारी जेवणानंतर सोलकढी आवडीने पिण्याची सवय आहे. यांच्या दुकानात ताजी ताजी रुचकर सोलकढी बनवून दिली जाते. कोकणी माणसाने कोकणी माणसाला हात द्यायला हवा. प्रकाश पुरस्कार आणि कोकणातल्या मातीतला माल मुंबईत आणलाआहे. मुंबईतल्या कोकणी माणसाने प्रकाश तोरस्करांच्या दुकानातला माल आपल्या घरी आणून कोकण भूमी वरचे प्रेम सिद्ध करावे यासाठीच डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन केलेले असल्याने मला मोबाईल जास्त वेळ बघण्याचा मज्जाव असतानाही कच्च्या काजू बियांचा मौसम संपण्या अगोदरच ( प्रकाश तोरस्करांना याबद्दल काहीच माहिती नाही ) त्यांची प्रसिद्धी करावी म्हणून हा मी केलेला अट्टाहास. संकटांचा सामना करूनही न डगमगणारा, कोरोना काळातही बँकांची देणी वेळेतच देऊन आपली पत सांभाळणाऱ्या आणि निष्ठेने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रकाश तोरस्कर यांना सलाम करावा या हेतूने हा अक्षर प्रपंच.


          चला हाताला हात देऊया l कोकणी माणसाला रोजगारात पुढे आणूया Il

आपला

सुभाष लाड.                                                  अध्यक्ष                                                          राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई.

Tuesday, April 7, 2026

*संविधान वाचले पाहिजे !*

 

           " जगातला सर्वात मोठा विद्वान कोण असेल ? अभ्यासक कोण असेल ? पंडित कोण असेल ? तत्वज्ञानी कोण असेल ? अध्यात्मिक कोण असेल ? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील." हे विधान नुकतेच एका व्हिडिओमध्ये श्री  श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेस्वरानंद सरस्वती महाराज प्रवचन करतानाचे ऐकले आणि मला समाधान वाटले.एकेकाळी याच हिंदू धर्मातल्या तथाकथित पंडितानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकण्यापासून दूर ठेवले. वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करून बाबासाहेबांना अस्पृश्य समजून त्यांना लहानपणी बिकट परिस्थितीशी सामना करावा लागला अवहेलना सहन करावी लागली. त्याच हिंदू धर्मातले एक संत महंत आपला अध्यात्मिक प्रवचन देताना विश्ववंदनीय परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण मान्य करतात, ते लोकांना मान्य करण्यास सांगतात हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे.

( श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज)

          धर्म कोणताही वाईट नसतो. मुळात कोणताही थर्म  जगण्याची पद्धत सांगत असतो. पण सर्वच धर्मात मीच माझ्या धर्माचा सर्वेसर्वा आहे, मलाच माझ्या धर्माची सूत्र संस्कार आणि त्याचा अभ्यास आहे असे सांगून त्याच धर्मातल्या सामान्य लोकांना लुबाडून स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या मनासारखा एखाद्या सूत्राचा अर्थ लावून म्हणजे समाजामध्ये फिरत असतात खऱ्या अर्थाने ते धर्माचे मारक असतात. परंतु सामान्य माणूस इतर धर्मांचा सोडाच पण स्वतःच्याही धर्माचा अभ्यास करीत नाहीत. उठ सूट धर्माच्या बाबतीतला संस्कार समजून घेण्यासाठी तथाकथित पंडितांच्या पाय जवळ जातात आणि ते सांगतात तीच पूर्व दिशा समजून स्वतःचे आचरण करतात. त्यामुळे खरा धर्म बाजूलाच राहतो आणि धर्म मार्तंडाने स्वतःच्या स्वार्थासाठी चालवलेली बजबज पुरी ही समाजात ठाण मांडून बसते आणि तोच खरा धर्म आहे असे आपण समजून जातो.

           जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा धर्म म्हणून हिंदू धर्माकडे बघितले जाते. हिंदू धर्मा इतका सहिष्णु धर्म जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही मात्र याचा अर्थ दुसरे धर्म वाईट आहेत असेही होत नाही. तसेच हिंदू धर्मातील सर्वच रूढी सर्वत्र व योग्य आहेत असेही म्हणता येणार नाही. जसा काळ बदलतो तशी माणसाची जगण्याची परिस्थिती जशी बदलते. उदाहरणार्थ एखादी पूजा करताना यजमानाने सोवळे  किंवा धोतर नेसून पूजा करावी हा प्रघात जेव्हा सर्वत्र धोतर वापरण्याची पद्धत होती तेव्हा तो ठीक होता. परंतु आज व्यवहारामध्ये धोतर आपण वापरतच नाही त्यामुळे अपवाद सोडल्यास पूजेला बसणारे पांढरा लेंगा किंवा मिळेल ती पॅन्ट घालून पूजा करतात. हा बदल आपण स्वीकारला कारण जगण्याची पद्धत बदलली आहे.

( कर्नाटकातील श्री सत्यनारायण महापूजा )

          महाराष्ट्रात सत्यनारायणाची पूजा करताना १००८ तुलसी पत्रे वाहिली जातात. चौरंगाला चार बाजूला केळीचे कोंब बांधले जातात  व दोन बाजूंना समया तेवत ठेवल्या जातात. भजनात असा एक गजरही आहे.' चार बाजूला चार केळी समई लावल्या दोन चौरंगावर मध्ये बैसले श्री सत्यनारायण '. मी नुकताच कर्नाटक प्रांतात माझ्या नातेवाईकांकडे जाऊन आलो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शाही सत्यनारायण मांडला. त्यामध्ये एका पाटावरती कलश ठेवून  नारळ ठेवला, पण चार केळीचे खांब लावले नाहीत,सत्यनारायणाचा फोटो ठेवला नाही.१००८ तुलसी पत्रे नाहीत  तर त्याऐवजी बेलपत्र भरपूर होती, मात्र फुलांची आरास केली होती. दोन बाजूला समया लावल्या होत्या. रव्याचा गोड शिऱ्याचा प्रसाद , सोबत चार-पाच ताटात सफरचंदाच्या फोडी, मोसंबीच्या फोडी, अंजिराचे दाणे आणि केळी असा सर्व नैवेद्य दाखवला. पंचारती धुपारती दाखवल्या. पण सुखकर्ता दुखहर्ता या सहित श्री सत्यनारायणाची आरतीही नाही. याचा अर्थ प्रत्येक भौगोलिक परिस्थितीप्रमाणे पूजा अर्चा केली जाते ती आपण मान्य करायला हवी. किंवा त्यात काही बदल झाला तर फार मोठा अनर्थ होईल अशा प्रकारची भीती बाळगण्याचेही कारण नाही.( मुळात श्री सत्यनारायण  या देवतेचा कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही. त्या पूजेचा जन्म शतकापूर्वी पश्चिम बंगाल मध्ये झालेला आहे. लोकांना त्यामुळे आनंद मिळतो आहे त्यामुळे त्याच्यावरती अधिक बोलणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही.)

          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. पण हिंदू धर्मात असलेल्या अनिष्ट चाली रुढी परंपरा यांचा ते विरोध करत होते. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा हेच केले. मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करणारे उपासतापास यांच्या विरोधात ते होते. मनुष्य सुखाचा शोध घेण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदू धर्म कांडाप्रमाणे उपासतापासही केले परंतु शरीरावर परिणाम करण्या व्यतिरिक्त त्यांना त्यातून काही साध्य झाले नाही आणि म्हणून त्यांनी घोर उपासना केली.जेव्हा त्यांना दिव्य प्रचिती झाली त्यातून त्यांना जो बोध झाला तो त्यांनी जगाला सांगितला. तो मार्ग आहे अहिंसेचा होता. ' अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्याअसंग्रह''

१.अहिंसा: मन, वचन आणि कर्म  यामुळे कोणालाही कष्ट न पोहचविणे।

२.सत्य: यथार्थ ज्ञान आणि सत्य बोलणे।

३.अस्तेय: चोरी न करणे (दुसऱ्याची वस्तु न घेणे)।

४.ब्रह्मचर्य: शारीरिक आणि मानसिक संयम राखणे।

५.अपरिग्रह: अनावश्यक वस्तूंचा संचय  न करणे किंवा त्याग करणे.

       हाच भारतीय धर्माचा गाभा आहे .हा जसा हिंदू धर्म सांगतो,तसा जैन धर्म सांगतो तसाच तो बौद्ध धर्मही सांगतो.मात्र प्रत्येक धर्मातील लोक याचे पठण करतात पण पालन करीत नाहीत. दुसऱ्याला समजावून सांगतात स्वतः मात्र तसे जगत नाहीत. तसे पाहिले असता धर्म ग्रंथांची शिकवण शंभर टक्के कधीच शक्य नाही आणि अहिंसेचे म्हणाल तर ते कोणालाही शक्य नाही.कारण जिवंत झाडांची होळी करून नाचणारे आम्ही, दारु विकून सरकार चालवणारे आम्ही, गोहत्या बंदीकरुनही पैशासाठी गायीच्या मांसाची परदेशी निर्यात करणारे आम्ही धर्माच्या केवळ बाता मारतो आहोत.

        आणि आता धर्माधर्मातील रोटीचा प्रश्न केव्हाच निकालात काढला तसा बेटीचा काढला आहे. धन दांडग्याच्या,राजकारण्याच्या आणि मोठ्या कलाकारांच्या घरात जरा डोकावून पहा ' सारे भारतीय माझे बांधव आहेत ' हे चित्र दिसेल मात्र सामान्य माणूस मात्र जुनं ते सोनं म्हणून कवटाळून बसला आहे. कारण त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समजून घेतलेलं नाही, त्यांचं चरित्र समजून घेतलेलं नाही, त्यांनी लिहिलेलं संविधान ही आम्ही पुरतं वाचलेलं नाही.

         जेव्हा पृथ्वीवर त माणसाचा जन्म झाला त्यावेळेला तो एक माणूस म्हणूनच जन्मला. पण जेव्हा स्वार्थ जन्मास आला. त्यावेळेलामाणसाने माणसाने दुबळ्या माणसाला अंकित करण्यासाठी जेवढ्या काही क्लुप्त्या करायच्या ठरवल्या त्यातून हा भेद जन्मास आला. त्यातूनच स्त्रियांना गुलामांसारखं वागवण्याची पद्धत आली. त्यातूनच देवाधिकांच्या नावाने भीती घालण्याची पद्धत सुरू झाली. ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास नाही तो माणूस अशा भीतींचा बळी पडला. तो आजही बळी पडतो आहे. या सर्वातून सामान्य माणसाची सुटका करण्यासाठी त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धुरंधर पणे चाणाक्षपणे हुशारीने संविधान निर्माण केले. पण दुर्दैव हे आहे की जसा आमच्या धर्मग्रंथांचा दुर्योपयोग करून सामान्य माणसांना नाडण्याचे काम केले गेले तसेच आज संविधानाचा दुर्योपयोग करून सामान्य माणसाला त्याच खाईत लोटण्याचे काम केले जात आहे.

         आज स्वामी सोमेश्वरांनंद सरस्वती महाराज यांच्यासारखे संत महंत ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व लोकांना विशद करून सांगत आहेत त्यामुळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान वाचतील अशी आशा करावयास हरकत नाही.

https://youtu.be/PtQULEjBVm0?si=Y1AaSWv9wHmvfxKt

हे गीत जरूर ऐकावे.

सुभाष लाड                                        ९८६९१०५७३४