Thursday, March 26, 2026

गाव पुन्हा एकदा वसवण्यासाठी !

        

       " मित्र हो, एकाच शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेलो आपण न्या.व्ही.व्ही.आठल्ये विद्यामंदिर शिपोशी या शाळेच्या कृतज्ञतेपोटी त्या शाळेला काही सहकार्य करावे या हेतूने आपण एकत्र आलो आणि माजी विद्यार्थी विचार मंच स्थापन केला.सगळेच आपल्या विचारांचा आदर करतील असे कधी होत नाही पण जे कुणी आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जायचे हा दृढ निश्चय आपला आहे.आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या पाहता मी तरी समाधानी आहे.

        आता प्रश्न आला शाळेसाठी आपण काय करु शकतो ? महाराष्ट्रातील सर्वच खेड्यांचा विचार करता मुळात प्रत्येक खेड्यातील सरासरी ६० टक्के घरे बंद आहेत. उघड्या घरात 80 टक्के वयोवृद्ध राहतात २० टक्क्यांमध्ये काही घरांमध्ये एक दोन माणसं अधिकची असल्यामुळे ते लोक शेती करत आहेत. लग्न झालेल्या तरुण मुलांचे लग्न होत नाही म्हणून ते निराश आहेत. लग्न करून गावात संसार करणारे त्या त्या गावात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी सुद्धा दांपत्य गावात असल्याने गावातील मुलांचा जन्मदर अशा परिस्थितीमुळे घटलेला आहे. एकेकाळी तुकड्या करणे इतकी प्रत्येक वर्गाची पटसंख्या असल्याने त्या काळात शाळेत खोल्यांची संख्या वाढवण्यात आली. पण आज शाळेची पटसंख्या बघितल्यानंतर एखाद दुसऱ्या वर्गात सहज मावू शकतील एवढेच पटसंख्या शिल्लक राहिलेली आहे भविष्यात ती शून्यावर यायला वेळ लागणार नाही.


          अशा परिस्थितीत शाळांना भौतिक विकासाची किंवा मुलांच्या सेकंड शैक्षणिक वस्तूंसाठी मदत करण्याची आज तरी आवश्यकता नाही. आज आवश्यकता आहे ती शाळांचा पट कसा वाढेल यासाठी काही उपक्रम करण्याची. तो पट वाढण्यासाठी गावातील मुलांचा जन्मदर वाढला पाहिजे. जन्मदर वाढवण्यासाठी लग्न करून तरुण-तरुणी गावाकडे राहणे गरजेचे आहे. गावाकडे राहण्यासाठी त्या तरुण हातांना काम मिळणे गरजेचे आहे त्याचबरोबर मातीत हात घालण्याचा, शेणात हात घालण्याचा आणि कष्ट करण्याचा संस्कार हा पुन्हा नव्याने रुजवला पाहिजे.


          वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने प्रथम गावाकडे लक्ष द्यायला हवे होते. महात्मा गांधीजींनी भारताचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला आणि त्याने तरुणांना ' खेड्याकडे चला ' हा संदेश दिला. याचा अर्थ त्यावेळी खेडी हळूहळू रिकामी होत असल्याची जाणीव गांधीजींना त्या अभ्यास दौऱ्यात झाली होती. गांधीजींच्या त्या संदेशानंतर आज आम्ही शंभरी पार केली पण त्या संदेशाला गांभीर्याने कुणीही घेतले नाही. या शंभर वर्षात प्रत्येक गावातील ७५ टक्के वस्ती ही शहरात जाऊन स्थायिक झालेली आहे. शहरात वाढणाऱ्या लोकांना सुविधा देण्यात तेथील स्थानिक संस्था तत्पर आहेत त्यांना त्या त्या सरकारचा वरदहस्त आहे मात्र शहरात आलेली ही लोकं एखादं गाव संपवत आहेत ते गाव पुन्हा उभारण्यासाठी काही करावं यासाठी कोणीही काही प्रयत्न करत नाही. ही खरी शोकांतिका आहे.


          गावातून शहराकडे जाणारी संख्या दिवसेंदिवस का वाढते आहे याचे उत्तर फार खोलवर जाऊन शोधणे गरजेचे आहे. गावागावात शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि काही ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. भरलेल्या गावातील मुलांनी त्या शाळा गजबजुन टाकल्या परंतु शिक्षणाचं प्रमाणपत्र हातात आल्यानंतर ती मुले मातीशी फटकून वागू लागली आणि मुंबईत किंवा इतर शहरातील चकाचक कार्यालयातील नोकरीसाठी खटपट करू लागली. जो गावाबाहेर पडला तो पुन्हा गावाकडे वळला नाही कारण त्याला शहरातल्या जीवनशैलीने मोहवून टाकले. मुंबई सारख्या शहरात आपण आपले आयुष्य व्यतीत करावे हे जागतिक स्तरावरील स्वप्न आहे तर मुंबईच्या परिघात राहणारे लोक तर आपला हक्क समजून मुंबईत येतात व राहतात.जर मुंबईपासून लोकांना लांब ठेवायचे असेल तर मुंबई सारख्या जरी नसल्यातरी रोजगाराच्या किमान संधी तरी तालुका पातळीवर उपलब्ध व्हायला हव्यात.पण ते झालेले नाही.पुढे होतील अशी मानसिकता सरकारची दिसत नाही.आणि लोकप्रतिनिधींबाबत तर न बोलणेच बरे.आजचा लोकप्रतिनिधी हा लोकांच्यासाठी असतो हे म्हणणे धाडसाचे ठरेल आणि लोकांनाही त्याचे काही पडलेले आहे असे दिसून येत नाही.

           मग आता करायचे काय ? खेड्यात जन्मलेल्या, खेड्यातील जीवनशैलीचे महत्त्व जाणणाऱ्या व प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन काही उपक्रम हाती घेऊन खेडी वाचविण्याचा प्रयत्न करायला हवाय. या मातीतले परंतु दूरदेशी जाऊन उद्योग करताहेत त्यांना इथल्या पर्यावरणाशी पूरक उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करुया.अशा अनेक प्रयत्नांतून प्रत्येक गावात एखाद दुसरे कुटुंब इथे स्थावर झाले तरी आपण बरेच यशस्वी झालो असे म्हणता येईल.

           हे करतांना इथली पडीक झालेली जागा पुन्हा लागवडीखाली कशी येईल यासाठी उपाययोजना करावी लागेल.गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून डोंगरावरील शेती बंद पडल्यामुळे भरमसाठ खुरटे जंगल वाढले आहे.वास्तविक पाहता इथे मोठ मोठे वृक्ष दिसायला हवे होते पण डोंगरावर शेतीसाठी जायला कंटाळलेला इथला ग्रामस्थ आपले वडिलोपार्जित वृक्ष विकून मोकळा झालाच पण त्यांनंतर ही थोडे वर आलेले वृक्ष सुद्धा तो व्यापाऱ्यांना देऊन चार दिवसांची मजा करण्यात धन्यता मानू लागला आहे.सरकारने मोफत रेशन देऊन कष्टापासून सगळ्यांची मुक्तता केल्याने या मातीची वैशिष्ट्ये असलेली हरिक,बरग,कांग आणि आता नाचणी सुद्धा नेस्तनाबूत झाली आहेत.ज्याच्याकडे घरची राबणारे एखाददुसरे माणूस असलेला शेतकरी घराशेजाक्षची भात  शेती करतोय.ती डुक्कर,माकडे यांच्यापासून वाचली तर इथला बदललेला निसर्ग हाताशी आलेली शेती कधी नासधूस करील याचा भरोसा राहिलेला नाही.त्यात मोजकीच शेती करीत असल्याने होणारे नुकसान लगेच लक्षात येते व ते जिव्हारी लागते. त्यामुळे कुणी शेती करीत नाही असा दोषारोप करणेसुद्धा चुकीचे आहे."

       दोन दिवसांपूर्वी शिपोशी गावचे माजी विद्यार्थी एकत्र आलेलो असतांना शाळांच्या घसरत्या पटसंख्येवर चर्चा करतांना गावच बंद पडत आहेत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. वर उद्धृत केलेले लिखाण हे त्या चर्चेतून आलेले आहे.पण आपण केवळ चिंता व्यक्त करुन शांत न बसता आपल्याला जमेल तेवढी सहकार शेती करायची असे निश्चित केले गेले.

         " गेल्या पावसाळ्यात कोर्ले गावचे चाकरमानी विनोद साळुंके यांनी मला त्यांच्या गावी पावसाळ्यात येण्याचे आमंत्रण दिले.ते आणि त्यांचे शेजारी मिळून भात शेती करीत असतात हे मी पाहावे असा हेतू होता.नेमका लावणी सुरू असताना मी आणि प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर त्यांच्या शेताकडे जाऊन पोहोचलो.आमच्यासाठी त्यांनी न्याहरी आणली होती.तिथल्याच कुड्याच्या पानांवरती भाजी भाकरी घेतली आणि पावसाची धार सुरू झाली.आम्ही छत्र्या उघडल्या.मला बालपणातले ते सोनेरी दिवस आठवले.रानात शेतावर काम करतांना तेव्हा पाऊस आला  की घोंगडीची खोळ डोक्यावर घेऊन पावसापासून सुरक्षीत करून भाकर तुकडा खात असू. आज माझ्याजवळ छत्री होती तरी त्या घोंगडीची आणि ईरल्याची किमया काही वेगळीच असल्याने ती उणीव लक्षात आली.

          विनोद साळुंके आणि त्यांच्या बरोबरचे चाकरमानी यांच्याशी गप्पा मारल्या.ते सर्वजण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.ते सर्वजण सेवानिवृत्त आहेत.लहाणपणी शेतीत राबण्याचा आनंददायी अनुभव असल्याने पडलेली शेती पाहून त्यांना बोचत राहायचे.मग त्यांनी गावाला जाऊन शेती करायची असे ठरवले. शेतजमीन लागूनच असल्याने ते अधिक फायदेशीर ठरले.  भातशेती साठी काही ठराविक वेळ द्यायचा असतो.१) दिवाळीनंतर कवळ तोडणे, २) गुढीपाडव्या नंतर तरवा जाळणे,३) मृग नक्षत्रात तरवा पेरणी आणि उकळ करणे,४) पुढे एकवीस दिवसांच्या दरम्यान लावणी, ५)पुढे पंधरा वीस दिवसांत भांगलणी आणि  ६) दसऱ्या नंतर भात कापणी आणि झोडपणी अशी कामाची विभागणी असते त्याप्रमाणे ते प्रवासाचे नियोजन करतात.आणि स्वत: पिकलेले भात घिरटून आलेला आपल्या मातीतला आणि आपल्या कष्टाचा आणि हो रसायन विरहीत शुद्ध तांदूळ आपल्या मुबईतला कुटुंबाला खायला देतात.

         कोकणी माणूस सणांच्या निमित्ताने नेमकी सुट्टी करून गावाला येतो.पण शेतीत जात नाही. वाड वडिलांपासून चालत आलेली जमीन कोठे आहे,तिची हद्द कुठे आहे याबाबत त्याला कुतूहलही नाही.पण तुझ्या जमिनीत खैर वाढले आहेत ते विकू का? असा शेजार्राचा किंवा व्यापाऱ्यांचा फोन येतो तेव्हा तो पैसे किती मिळतील याची चौकशी करून निर्णय देतो एवढाच काय तो संबंध राहिलेला आहे. मग कोकणातील शेती पडेल नाहीतर काय होईल ! स्वातंत्र्य सैनिक स्व. भगवानराव साळुंके हे आमच्या परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व. निस्पृहभावनेने सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या या समाज धुरीणाने स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी मिळणारी पेन्शन सुद्धा नाकारली. आयुष्यभर प्रामाणिकपणे शेती करून आपल्या मुलांना शिकवलं योग्य संस्कार दिले. श्री विनोद साळुंखे हे त्यांचे चिरंजीव. आपल्या वडिलांच्या स्मृती जागवताना तेवढ्याच निष्क्रिय भावनेने समाजकार्यात भाग येतात. आज त्यांच्या बांधावर बसून त्यांच्या मुलाने शेती करण्याचा त्यांचा  वसा पुढे चालवलेला पाहून अभिमान वाटला. आदरणीय स्व.श्री.भगवानराव साळुंकेच्या सहवासात घालवलेले दिवस आठवले. मी त्यांना नमन केले.

          चिपळूण मधील मांडकी पालवन येथील कृषी भूषण डॉ.तानाजीराव चोरगे शैक्षणिक संकुलात राज्यस्तरीय ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन पार पडले. त्या संमेलनात मला एका परिसंवादात बोलण्यासाठी निमंत्रित केले असल्याने मी त्या संमेलनात तीनही दिवस उपस्थित होतो. एका सुंदर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा मला आनंद झाला. डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं नाव रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला चांगले दिवस आणणारा चेअरमन म्हणून सर्वश्रुत असलेले नाव एवढाच मला परिचय होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांनी उभारलेल्या विस्तीर्ण आणि नियोजनबद्ध शैक्षणिक संस्थांच्या इमारती पाहून मी भारावून गेलो. तरीही त्यांना कृषी भूषण का म्हणतात याबद्दल मला माहिती जाणून घ्यायची होती. त्यात संमेलनात झालेल्या त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओझरती ओळख झाली. मला अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. पण त्याच वेळेला निमंत्रित पाहुण्यांना डॉक्टर चोरगे यांनी लिहिलेली पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. दिलीप राज प्रकाशनचे नाव असलेल्या छानशा पिशवीतल्या पुस्तकांत डॉ. तानाजीराव चोरगे यांचे ' झेप ' हेही पुस्तक होते. ते त्यांच्या आत्मचरित्र आहे. ८१६ पानांचे ते पुस्तक चार रात्र जागून वाचले. कोल्हापुरातल्या गारगोटी जवळच्या एका छोट्या गावात बालपण आणि शिक्षण घेतलेला हा खेडूत विद्यार्थी वडिलांच्या आग्रहाखातर कृषी विद्यापीठात डॉक्टरेट पर्यंत शिक्षण घेतो. जिथे स्वतंत्र विचारांचे कोंब खुडले जातात त्या नोकऱ्या सोडून कोकणातल्या शेतीत राजासारखे जगण्याचे ठरवतो.अडथळे अनेक येतात पण त्यांना आव्हान समजून सामोरे जाऊन त्यात यशस्वी होतो.त्यांचा आदर्श कोकणी माणसांनी घ्यायला हवा.हे मी माजी विद्यार्थ्यां समोर मांडले. हे सर्वजण आपल्या जन्म भूमीवर नितांत प्रेम करणारे आहेत.काहीजण गावाकडच्या शेतीत राबतही आहेत. त्यामुळे सहकार शेतीचा उपक्रम तडीस जाईल याची खात्री आहे.

          मित्र हो,चाळीस वर्षांपूर्वी जो कोकण आम्ही पाहिला तो राबणारा, शेतात घाम गाळणारा, वाड्यात चार जनावरे पाळणारा, शेतीतून वेळ काढून सण साजरे करणारा, भोगवादापेक्षा व्यवहारवादाला किंमत देणारा, स्वतः: बरोबर अडलेल्याला हात वर आणणारा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा होता त्यामुळे गाव आनंदी आणि वस्तीभरून होता.शाळा भरुन होता.आज गावच संपत चाललाय तर शाळा कुठून भरणार. म्हणून गाव पहिले वसवूया बाकी मग भरेलच की. सहकार शेतीचा प्रयोग यशस्वी करून एका नव्या पर्वाची सुरुवात करु या !

सुभाष लाड                                                   अध्यक्ष.                                                       राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 


कोकण मिडियात प्रसिद्ध झालेला लेख 


Sunday, March 22, 2026

आठवणीत राहिल असे संमेलन


        महाराष्ट्र समाज सुधारकांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, क्रांतिकारकांची भूमी आहे. इथल्या प्रत्येक हृदयात देश भक्तीचा यज्ञ अखंडित पेटत असतो तसाच तो महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी सर्वस्व वाहण्यासाठी तयार असतो.या अस्मितेची पायाभरणी काल परवाची नसून तिला हजारो वर्षांचा इतिहास कारणीभूत आहे.मग ते कोणतेही क्षेत्र असो.प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाचे दैदिप्यमान कर्तृत्व हे जगासमोर आले आहे. या अस्मितेचे अनेक मानबिंदू आहेत.जशी लेणी, गडकिल्ले,संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरासारखे विश्ववंदनीय महापुरुष, पंढरपूरची वारी पासून किर्तन ,नाटक,लावणी,पोवाड्यासारख्या इथंच रुजलेल्या लोककला आणि या सर्वांना आणि मराठी माणसाला जोडून ठेवणारी मराठी भाषा. रामायण, महाभारत ही भारतवर्षाची महाकाव्ये तशीच महाराष्ट्रदेशी संतांच्या अभंग गाथांना स्थान आहे. ' जय शिवाजी जय भवानी 'असे म्हटल्याबरोबर मराठी रक्त सळसळू लागते तसेच 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ' असे म्हणताच मराठी माणसातील सात्विकता जागरूक होते.तो नाद चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच लईत घुमतो त्याला कारण आमची मराठी भाषा आहे.

         मराठी भाषेत संत साहित्याबरोबर मोठी ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे.त्यातून आपला इतिहास जगासमोर आला, जगण्यातील संस्कारांबरोबर त्या त्या पिढीला नवीन स्वप्न बघण्याचे भान आणि ज्ञान ही मिळाले. याच भाषेने नाविन्याची ओढ निर्माण केल्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून मराठा वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. केशवसुतांनी नवकवितेला जन्म दिला. पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथालय चळवळ सुरू करून सामान्य जनतेला ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण केली. लोकहितवादी आणि रानडे यांनी मिळून ग्रंथोत्तेजक मंडळ सुरू केले आणि त्यातूनच ११ मे  १८७८ मध्ये पुण्यातील हिराबाग येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साकार झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हेच होते. महाराष्ट्रात नेहमीच चांगली गोष्ट डोक्यावर घेतली जाते तसंच या साहित्य संमेलनाचं झालं आणि त्याची परंपरा निर्माण झाली. या परंपरेतीलच शंभरावे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीच आकारास येईल.

           या साहित्य संमेलनांमुळे मराठी सारस्वत विश्वातील नामवंत साहित्यिकांना अध्यक्षपदासारखा बहुमान मिळाला. अनेक साहित्यिकांना नवीन ओळख मिळाली. अनेक विषयांची या व्यासपीठावरती चर्चा होऊ लागली. वारीची वाट पाहणारा महाराष्ट्रीयन माणूस तसा मराठी साहित्यात रमलेला मराठी माणूस संमेलनाची वाट पाहू लागला. एका संमेलनातूनच सर्वांनाच वाव मिळणे अवघड झाल्याने विषयवार साहित्य संमेलने निर्माण होऊ लागली,तशी प्रादेशिक साहित्य संमेलने निर्माण झाली. दलित साहित्य, विद्रोही साहित्य अशी साहित्याची विभागणी होऊन त्यांचीही साहित्य संमेलने होऊ लागली. जगभरात मराठी माणूस विखुरलेला असल्याने जगाच्या पाठीवरील साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन अशी संमेलने गाजू लागली.ही सगळी संमेलने गजबजलेल्या शहरांमध्ये होत असतात. त्यामध्ये कोकणाला फारच कमी वेळा संधी मिळाली. इथे अधिकाधिक साहित्य संमेलने व्हावीत या हेतुने कोकण मराठी साहित्य परिषदेचे निर्मिती होऊन त्याद्वारे कोकणातील विविध भागात संमेलने होऊ लागली. तरीही कोकणातील विशेषत: राजापूर लांजा तालुक्यातील गाव खेड्यात या साहित्य संमेलनाचं लोन पोचवून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याकरता ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची जवळ अकरा वर्षांपूर्वी रुजली आणि सातत्याने वेगवेगळ्या गावात साहित्य संमेलने आकारास येऊ लागली.

              मात्र या साहित्य संमेलनांमध्ये कथा कादंबरी आणि कविता अशाच विषयाची चर्चा होत असल्याने कृषी आणि सहकार यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्य असून त्याचीही चर्चा कुठेतरी व्हायला हवी या हेतूने कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारीच्या १३,१४ व १५ या तारखांना चिपळूण मधील मांडकी-पालवन या खेडेगावातील कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संकुलात ग्रामीण,कृषी,सहकार मराठी साहित्य संमेलन दिमाखात पार पडले. स्वतः तानाजीराव चोरगे यांनी क्रीडा,कृषी, साहित्य ,नाट्य या सर्व क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली असल्याने एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा या साहित्य संमेलनावरती असल्याचा दिसून येत होते.     

       महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री आणि  रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माननीय शरदजी पवार हे उपस्थित राहणार होते. त्यांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे ते येऊ शकले नाही. मात्र मा.नामदार उदयजी सामंत प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने या साहित्य संमेलनाची उंची वाढली. त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात मराठी भाषेच्या प्रचार प्रसार यविषयी त्यांची असलेली ध्येय धोरणे मांडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यापासून ते महाराष्ट्राच्या विविध भागात विविधतेची साहित्य संमेलने आयोजित करून मराठीचा जागर करण्याचे त्यांनी व्रतच घेतल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. त्यांच्यासारखा सकारात्मक मंत्री मराठी भाषेला मिळाल्याचे समाधान प्रेक्षक वर्गाकडून पहावयास मिळाले.

        चिपळूण ही साहित्य आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन चिपळूण मध्ये करण्यात आले त्याची जबाबदारी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने समर्थपणे पार पडली. त्याचे प्रमुख माननीय प्रकाश देशपांडे  हे या साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या सोबत अरुण इंगवले, धीरज वाटेकर, संतोष गोणबरे ही साहित्य चळवळीतील कृतीशील मंडळी होती.मा. तानाजीराव चोरगे यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असल्याने त्या संस्थातील विद्यार्थ्यांना या साहित्य संमेलनाचा पुरेपूर लाभ घेता आला त्याचबरोबर या संस्थांमधील संस्थाचालक प्राध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी या संमेलनाच्या आयोजनात हिरीरीने भाग घेताना दिसून आले.

          कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संस्था जणू एखाद्या विद्यापिठासारखी विस्तीर्ण आणि विविध इमारतींनी सजलेली आहे.येथील स्वातंत्र्यसैनिक ह.भ.प.लक्ष्मणराव चोरगे क्रीडा संकुल सुद्धा विशाल परिसर व्यापून आहे.पक्क्या स्वरुपातील ३० x ३० फुटांच्या भव्य व्यासपीठाला जोडून बांधलेल्या हजार लोक आरामशीर बसू शकतील असे पुरेशी उंची देऊन सभागृह बांधण्यात आले होते. सभागृहात छपराला लटकते जागोजागी पुरेसे पंखे बसविल्यामुळे गारवा जाणवत होता.सभागृहाला जोडूनच सभागृहाच्या उजव्या बाजूला दोन भागात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्यिक आणि पाहुणे यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केले गेल्यामुळे तिथे फारशी गर्दी न होता वेळेतच सर्वांना जेवण किंवा चहापाणी करता येत होते. प्रेक्षकांसाठीच्या भोजनकक्षात सुद्धा नीटसपणा होता. पुरेसे वाढपी आणि बसण्याची व्यवस्था आणि विशेषत: मजबूत पत्रावळ्या असल्याने हातावर घेऊन खाणे सुद्धा शक्य होत होते. कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता ही तिथे दिल्या गेलेल्या जेवणावरून अर्थात आदर सत्कारावरून ठरते. एकूण कार्यक्रमात चार वेळा जेवणाची व्यवस्था करावी लागली मात्र प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भाज्या,चपात्या/भाकऱ्या/पुऱ्या आणि गोड पदार्थ असल्याने जेवणाची रुचकरता अधिक वाढली.तिथे असणारे विद्यार्थी स्वयंसेवक हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स करून आले होते की काय असे वाटावे इतक्या अगदी आपलेपणाने आणि तत्परतेने सेवा देत होते.

         मा.डाॅ. तानाजीराव चोरगे सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.क्रीडा,कृषि,सहकार,नाट्य, साहित्य आणि राजकारणात सुध्दा लिलया वावर करून आणि भारत देशाबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यटन करुन सर्वच क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या या ग्रामीण,कृषि,सहकार साहित्य संमेलनात पदोपदी त्याचे प्रत्यंतर मिळत होते.१३ फेब्रुवारीला उतरत्या दुपारी ध्वजारोहण करून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली.या दिंडीत त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना पुरेपूर वाव मिळाला.भालतातील विविध भागातील सांस्कृतिक नृत्य परंपरा, वेशभूषा बघायला मिळाल्या.निवळी बाजारातील रस्त्यावर एका ठिकाणी नृत्य आविष्कार करुन एक एक गट पुढे जात होता.लेझिम, ढोलपथक, वारकरी, चित्र रथ त्याचबरोबर नमनातील कलाकारांनी ही आपल्या कलेची इथे झलक दाखवली.शिस्तीने मनोरंजन करीत जाणारी दिंडी पाहायला गर्दी केलेल्या ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले.

      ग्रंथदिंडी साहित्य नगरीत विसावल्यानंतर ग्रंथदालनांचे, चित्र प्रदर्शन आणि इतर दालनांचे उद्घाटन झाले.सायंकाळी सहा वाजता स्थानिक कवींचे काव्य संमेलन पार पडले.ज्येष्ठ कवी संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात अनेक स्थानिक कवींनी आपल्या कविता वाचनाचा आनंद लुटला.विशेषत: कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या पहाडी आवाजातील कवितांनी सभागृह दणाणून सोडले.जणू काही साहित्य संमेलनाची नांदी गायल्याचा भास झाला.

         दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता.राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं नियोजन होते परंतु त्यांची चार दिवसांपूर्वीच प्रकृती बरी नसल्याचे विविध माध्यमातून कळून आले होते. त्यामुळे साहेब येणार नाही याची आयोजकांना खात्री होती मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या पुढाकाराने हे साहित्य संमेलन उभे राहिले होते ते नामदार उदयजी सामंत हे रत्नागिरीतील एका कार्यक्रमात उपस्थित राहून येणार असल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम दोन एक तासाने उशिराने होणार होता. एवढा उशीर साहित्य संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांवरती मोठाच परिणाम करणार होता. मात्र अनुभवी संयोजकांनी संमेलनाच्या ठरलेल्या कार्यक्रम  पत्रिकेत थोडा बदल झाला तरी चालेल मात्र  वेळेअभावी एखादा कार्यक्रम  होणार नाही अशी नामुष्की पत्करायला ते तयार नव्हते. उद्घाटनानंतरचे सत्र म्हणजे ग्रामीण साहित्यातील कोकण हा परिसंवाद होता. तो परिसंवाद उद्घाटनाच्या सत्रातच घ्यावा असे नियोजन संयोजकानी आदल्याच दिवशी ठरविले.त्याप्रमाणे परिसंवादात सहभाग घेणाऱ्या सर्वच साहित्यिकांना त्याची कल्पना दिली. हा घेतलेला धाडसी निर्णय म्हणजे संयोजकानी संमेलनातील प्रत्येक कार्यक्रमाला न्याय देण्याचा घेतलेला योग्य निर्णय होता त्याबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. आपल्या ग्रामीण परंपरेप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्याकडून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केल्याचे जाहीर करून ग्रामीण साहित्यातील कोकण या परिसंवादाला मोकळी वाट करून दिली. सूत्रसंचालक धीरज वाटेकर यांनी परिसंवादाची प्रस्तावना करून परिसंवादाचे अध्यक्ष मा. सागर देशपांडे परिसंवादात सहभाग देणाऱ्या अलिबागचे श्री .एल. बी. पाटील, रानमाणूस प्रसाद गावडे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड, सुप्रसिद्ध निवेदक श्री विजय हटकर व त्याचबरोबर रत्नागिरीचे प्रा. डाॅ. गोपाळे यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला. परिसंवदाचे अध्यक्ष सन्माननीय सागर देशपांडे यांनी वेळेचे नियोजन सांगून परिसंवादाला सुरुवात केली. सूत्रसंचालकाने प्रत्येक वाक्याचा थोडक्यात परिचय करून त्यांना आपले विचार प्रकट करायला सांगितले. कोकणचे साहित्य, कोकणचे मौखिक साहित्य, कोकणे माणसाचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा सर्वच विषयांचा परामर्श घेणाऱ्या परिसंवादाने  साहित्य रसिकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.

        नियोजित वेळेत उद्घाटन पार पडेल या अपेक्षेने आमदार माननीय भास्करराव जाधव हे वेळेत उपस्थित झाले होते. मात्र पहिल्या परिसंवादाचा आस्वाद घेऊन ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमाकरिता निघून गेले. दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदयजी सामंत यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार शेखरजी निकम,दापोली कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय भावे,मा.तानाजीराव चोरगे व मा.प्रकाश देशपांडे हे उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. मा. तानाजीराव चोरगे यांचे कौतुक करतांना चोरगे यांनी ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन घेऊन मराठी साहित्यात एक नवीन पायंडा महाराष्ट्राला दिला आहे.त्यामुळे अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात होतील.असे सांगितले. मराठी साहित्य आणि संस्कृती ही अधिक बळकट होण्यासाठी अशा संमेलनांचा उपयोग होतो. मराठी वर किती जरी आक्रमणा आली तरी मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे तिचं जतन करण्याचे कामात महाराष्ट्र सरकार नेहमीच अग्रेसर राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाईल याबाबत सरकार ठाम आहे असेही सांगितले..तानाजीराव चोरगे यांनी ग्रामीण,कृषि, सहकार अशा तिन्ही विषयांना एकत्रित गुंफीत साकारलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच संमेलन आहे असे मंत्री महोदयांनी म्हणताच प्रेक्षागृह उस्फूर्त टाळ्यांनी दुमदुमून गेले.

       आज दिवसभराचे छान नियोजन होते. प्रत्येक दीड ताशांचा बौद्धिकानंतर अर्धा तास विश्रांती असल्यामुळे रसिकांनी प्रत्येक बौद्धिक किंवा परिसंवादास चांगली उपस्थिती दर्शविली.दुसरे सत्र 'ग्रामीण साहित्य काल आणि आज' या सत्राचे अध्यक्ष मा. डाॅ.राजन गवस होते,तिसरे सत्र ' ग्रामीण कथाकथन ' हे प्रख्यात कथाकार मा.प्रा. अप्पासाहेब खोत अध्यक्ष होते. कथाकथनाचा तास हा नेहमीच मनोरंजन करणारा असतो तसा तो इथेही रसिकांची दाद मिळवून गेला.चौथ्या सत्रात ' सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी ' यावर विचार मंथन झाले.या सत्राचे अध्यक्ष स्थान मा.श्री. प्रमोद कर्नाड यांनी भूषविले.पाचवे सत्र काव्य संमेलनाचे होते.

       दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या ' कृषि साहित्य व शेती सुधारणा ' या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी मा.डाॅ.बाळासाहेब जमदग्नी होते तर 'आता आत्महत्या थांबवूया ' या परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे कृतिशील विचार ऐकण्याची संधी मिळाली. या संमेलनात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकावयास मिळाल्या. शेतीकडे व्यापारी दृष्टीने बघण्याचे आवाहन येथील शेतकऱ्यांनी स्वीकारल्यास शेतकरी समृद्धीकडे जाऊ शकतात ही आशा पल्लवित झाल्याचे जाणवले.

      दुपारच्या सत्रात कृषिभूषण तानाजीराव चोरगे यांची सकाळचे माजी संपादक मा.यमाजी मालकर यांनी घेतलेली मुलाखत ही एका ज्येष्ठ साहित्यिकाला दिलेली कृतज्ञता भेटच म्हणावयास हवी. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणारे तानाजीराव चोरगे साहेबांची क्रीडा क्षेत्रात ही तेवढीच चमकदार कामगिरी आहे तर मराठी साहित्य कथा कादंबरी व नाट्य अशी अठ्ठेचाळीस दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करतात हे कौतुकास्पद आहेच तसेच त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख या मुलाखतीतून सर्वांनाच झाली. त्यांची मुलाखत आटोपशीर पण विविधांगी क्षेत्रांचा परामर्श घेण्याचा श्री.यमाजी मालकर यांचेही कौतुक.

        एकंदरीत या यशस्वी झालेल्या साहित्य संमेलनासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. माननीय तानाजीराव चोरगे यांच्या शैक्षणिक संस्थातील अनेक प्राचार्य, प्राध्यापक, अनेक शिक्षकेतर कर्मचारी  आणि विद्यार्थी येथे तत्परतेने वावरताना दिसत होते. माननीय चोरगे साहेब कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहून पहिल्या रांगेतल्या मान्यवरांच्या सोबत  वावरत असताना एकंदरीत संमेलनाच्या नियोजनात कुठे कमतरता किंवा कुठे अडसर जाणवत नाही ना यावरती बारीक नजर ठेवून होते. प्रत्येक कर्त्या पुरुषाची मुले कर्त्या पुरुषांच्या स्वप्नाला पुढे घेऊन जातातच असे नाही. मात्र त्यांचे सुपुत्र डॉ. निखिल चोरगे यांच्या संमेलनातील वावरावरून पित्याने निर्माण केलेल्या सृष्टीचे चालकत्व आपण यशस्वीरीत्या पार पाडू त्याची ग्वाही देत होते.

          या संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहिल्यामुळे दूरदूरहून आलेल्या अनेक साहित्यिक मित्रांची ओळख झाली.कविमित्र दादा मडकईकर यांचा सहवास संपूच नये असे वाटत होते. गप्पांच्या ओघात त्यांची महत्वाची पिशवी आम्ही बसलेल्या खुर्चीच्या शेजारी राहिली.माझ्या सोबत असलेल्या विजय हटकर यांच्या लक्षात आले पण तो पर्यंत ते त्यांच्या खोलीवर अरुण इंगवले यांचे बरोबर निघून गेले होते.आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ओयासीस हाॅटेल जवळ ते येतो म्हणाले. आमच्या खोलीवर येणार म्हणजे त्यांना चहा तर द्यायला हवी असे मनापासून वाटले. रात्री अकरा वाजता चहाचा शोध घेताना बहादुर शेख नाक्यावर मिळेल असे समजले. हा छोटा प्रवास आणि चहा तयार होईपर्यंतचा वेळ दादा मडकईकरांची भन्नाट मालवणी साठच्या दशकातील कविता यांची सुंदर मैफील जमली.एक उत्तम कवी आपल्या कवितांवर प्रेम करतोच पण ज्या कवितांनी आपले बालपण समृद्ध ,संस्मरणीय केले त्या कविता आणि त्या कवींच्या बद्दल आदर दाखवतो आणि त्याच कविता प्रत्येक पिढीने ऐकाव्यात यासाठी जिथे बोलावतील तिथे जाऊन 'आठवणीतल्या कविता 'हा कार्यक्रम करतो हे ऐकून दादा मडकईकरांच्या बद्दलचा अभिमान दाटून आलाच पण ती रस्त्याच्या कडेला रंगलेली काव्यमैफील ही चिपळूणच्या ग्रामीण कृषि सहकार साहित्य संमेलनाची एक आठवण म्हणून  कायमची लक्षात राहिल.

सुभाष लाड

९८६९१०५७३४

     ' कोकण मिडिया '   या विख्यात साप्ताहिकाने प्रसिद्ध केलेला लेख......


Monday, March 9, 2026

जनमानसातला लालबागचा राजा - सुधीर साळवी


*जनमानसातला लालबागचा राजा - सुधीर साळवी*

          लालबागचा राजा म्हणजे जगभरच्या भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती जो लालबागमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात अकरा दिवस विराजमान होतो.त्या अकरा दिवसांत लालबागच्या त्या वस्तीला छावणीचे स्वरूप आलेले असते.गणपतीच्या आगमनापासून एक वेगळाच उत्साह इथल्या कार्यकर्त्यांत संचारतो  तो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या पहाटे गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन होईपर्यंत त्यात कुठेही अंतर पडत नाही.कोणत्याही गणेश उत्सव मंडळात तिथल्या वस्तीतले लोक गर्दी करतात किंवा तिथलेच कार्यकर्ते

स्वयंसेवक म्हणून हजेरी लावतात.पण लालबागच्या राजाकडे जसे जगभरातील भाविक लाखोंनी येतात तसे इथे स्वयंसेवक म्हणून सेवा द्यायला मुंबईतल्या विविध भागातले हजारो लोक विशेषत: तरुण मंडळी इथे नावनोंदणी करुन सेवा देत असतात.जसे पंढरपुरात वारकरी न चुकता वारी करतात तसे लालबागच्या राजाला हजारो वारकरी भेटलेले आहेत.

         लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला .त्या निमित्ताने देशभक्ती निर्माण करणारे कार्यक्रम,मेळे आणि व्याख्याने होऊ लागली.त्याच उद्देशाने त्याच वेळी मुंबईत गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीतही पहिला गणेशोत्सव सुरू झाला.मात्र १९३४ मध्ये परळ लालबागचा बाजार बंद पडल्यानंतर येथील कोळी लोकांनी आपला मच्छीमारीचा व्यवसाय सुरू राहिल्यास गणपतीबाप्पा बसवू हा केलेला नवस पूर्ण झाल्याने सुरू झालेला हा उत्सव ९१ व्या वर्षात येतांना तो जगभरच्या भाविकांपर्यत पोहोचला आहे. लालबागचा राजा तर आता मुंबईची अस्मिता ठरलेला आहे.मुकेश अंबानी सारखा जगविख्यात उद्योगपती जेव्हा आस्थेने राजाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा सामान्य जनतेला ही भक्ती आपसूकच तिथे घेऊन जाते.

         लालबागचा राजा नवसाला पावतो या श्रद्धेला मिळालेली बळकटी हे जरी उत्सव वाढण्याचे कारण असले तरी सातत्याने मुर्तिकार श्री. कांबळी या एकाच कुटुंबाकडून मूर्ती बनवली जाणे, मूर्तीची ठेवण विलोभनीय आणि एकच असणे,इथला मंडप आणि बाह्य सजावट आकर्षक असणे, इथे येणाऱ्या लाखो भाविकांची दर्शनासाठी चोख व सुविधा युक्त व्यवस्था करणे आणि सर्वात लक्षणीय आणि प्रशंसनीय काम म्हणजे मंडळाकडे जमलेल्या निधीचा लोककल्याणार्थ उपयोग करणे. मग ते मोफत डायलेसीस असेल, युपीएससी - एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आणि वाचनकक्ष, आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन, नैसर्गिक आपत्तीत मोफत धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे मानवतेचा कळस गाठणारे उपक्रम राबविल्यात या मंडळाला समाजात आदराचे स्थान मिळाले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे याकरीता मोठे योगदान आहे हे मान्य करावे लागेल.तसेच गेली एकवीस वर्षे सचिवपदी असलेल्या सुधीर साळवी यांचे कर्तृत्वही तेवढेच महत्त्वाचे आहे.

             मी राजस्थान मध्ये पर्यटनासाठी गेलेलो असतांना एका हॉटेलमध्ये लालबागच्या राजाचा मोठा फोटो लावलेला पाहताच गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीकडे विचारणा केली.ते स्वतःच त्या हाॅटेलचे मालक असून ते दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात हे कळल्यावर मी त्यांना 'सुधीर साळवी' यांना ओळखता का? असे विचारताच " उनको कौन नही पहचानता, वो तो सर्वेसर्वा हैं. मै मिल चुका हूॅं उनको ". मग मी कशाला थांबू ? मी पण सुरू केलं. " वह हमारे गांव के हैं.और हमारे नजदिकी संबंध है." एका दूरच्या प्रदेशात आपल्या माणसांना ओळखणारं कुणी भेटतं तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीचे मोठेपण अधोरेखित होतं आणि आपली छातीही अभिमानाने फुगते.

           सुधीर साळवी यांची स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीतून जडण घडण झालेली असल्याने ते कट्टर शिवसैनिक समजले जातात.मधल्या काळात कट्टर या शब्दाचा अर्थ बदललाय काय असा संभ्रम वाटावा इतक्या राजकारणी लोकांनी उड्या मारल्या. स्वार्थ आणि सत्तालोलुपता यामुळे निष्ठा, एकनिष्ठता, कट्टरता हे शब्द विसरतात आणि तिथेच जनमानसातील विश्वासार्हता संपते.पण पैशाने विश्वास विकत घेऊ शकतो हे लोकांनीच सिद्ध करून दाखविले असल्याने लोकशाही आता कुठे चालली आहे याचा अंदाज शहाण्यांना आला असेलच.गेल्या विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवींना उमेदवारी मिळायला हवी होती.ती जनतेचीही मागणी होती आणि वरिष्ठांनाही तसेच वाटत असल्याने सगळं मनासारखं होईल असं वातावरण असतांना त्यांचे तिकिट कापले गेले.त्यांचे पाठीराखे संतापले.विरोधकांनी गळ टाकायला सुरुवात केली.राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा, लोकांच्या अडीअडचणींना धावणारा शिवसैनिक म्हणून मोठा लोक संग्रह असलेला नेता आपल्याकडे हवा हे प्रत्येकाला वाटतं पण निष्ठेलाही काही मोल आहे की नाही. कुटुंब चालवतांना प्रमुखालाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यांचीही अडचण कार्यकर्त्याने लक्षात घेतली व श्रद्धा - सबुरीलाही किंमत दिल्यास निष्ठावंत म्हणून मिरवता येते.त्यावेळी निष्ठेचा तराजू वजनदार ठरला.आपला उमेदवार विजयी झाला आणि सुधीर साळवी यांची उंची वाढली.वरिष्ठांकडून पुढील काही महिन्यांतच त्यांना पक्षाचे सचिवपद जाहीर करण्यात आले.ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले होते त्या मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहाचे सहा नगरसेवक उमेदवार निवडून आणून त्यांनी दाखवून दिले कि जनमाणसातील लालबागचा राजा सुधीर साळवीच आहेत.

          आज त्यांचा वाढदिवस.आज पूर्णवेळ ते पंढरपूर तीर्थक्षेत्री असणार आहेत.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई