Thursday, January 22, 2026

नाट्य पंढरीतला नवा वारकरी ' अनिरुद्ध पेडणेकर '

         सव्वाशे वर्षाहून अधिक काळ नाटकांची परंपरा जपणारा आमचा रिंगणे गाव आजही हे नाट्य परंपरा तितक्याच उत्साहात सुरू आहे. वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने किंवा वाडीच्या सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने गावात वर्षाकाठी चार-पाच वेळा तरी नाटकाचे खेळ होतात. इथल्या मुलांना शाळेची घंटा ऐकण्या अगोदर नाटकाची घंटा ऐकायला मिळते आणि त्या घंटेच्या नांदाने आपसूकच त्यांच्यात एका छंदाची रुजवण होते. त्यामुळे कदाचित शाळेची घंटा ऐकून ती दूर पळतील पण नाटकाची घंटा ऐकण्यासाठी  रात्रीच्या नाट्यप्रयोगाला ती आतुरतेने जत्रेत धावतील. नाटक बघताना नटाने संवादात घेतलेला पाॅझ हा अभिनयाचा भाग आहे की पाठांतर नसल्याचा परिणाम आहे याच्यातला फरक इथल्या पहिली दुसरीत शिकणाऱ्या मुलाला आपसूक कळतो आणि टाळी वाजवायची की नाही हे तो ठरवतो. नाटकाबद्दलची इतकी निरीक्षण शक्ती इथल्या मुलांच्या मध्ये आलेली आहे. त्यामुळे रिंगणे गावातल्या कुठल्याही रंगमंचावर उभ्या राहणाऱ्या कलाकाराला पाठांतर करावेच लागते त्याचबरोबर सकस अभिनय सुद्धा दाखवावा लागतो. आपण सुद्धा एक दिवस असेच रंगभूमी वरती येऊ आणि अवघ्यांच्या टाळ्या घेऊ हे स्वप्न घेऊनच इथली मुले मोठी होत असतात. असेच स्वप्न घेऊन नाटककार ला.कृ. आयरे मुंबईत आले. इथे त्यांना विस्तीर्ण अवकाश मिळाले आणि एक दिवस ते कामगार अंक म्हणून रंगभूमीवरील शेक्सपियर म्हणून नावारुपास आले. त्यांच्या पुढच्या काळात नाटककार द.सी. चव्हाण, नाटककार महादेवराव हांदे, नाटककार भि.स.पेडणेकर अशी लेखक मंडळी या मातीत जन्मास आली. या मंडळींचे नाट्य खेळ आमच्या पिढीला बघता आले. आमच्या पिढीतील नाटककार डॉ. मंगेश हांदे यांनी लेखक दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्व भूमिका लिलया पार पाडून आपणही रिंगणे गावचेच आहोत हे जगासमोर मांडले. हा असा लेखाजोखा  रिंगणे गावी होणाऱ्या ११व्या ग्रामीण मराठी  साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मांडत असतानाच माझ्या व्हाट्सअप वरती अनिरुद्ध ने पाठवलेली गोड बातमी वाचली आणि माझ्या मनात सहज एक वाक्य येऊन गेलं " नाट्य पंढरीत एक नवा वारकरी मार्गस्थ होत आहे "

   ‌.        आमच्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना नाट्य अभिनय करण्याची संधी मिळाली. इथल्या प्रत्येक पिढीला इथल्या रंगभूमी वरती येण्याची संधी मिळत गेली. १९२७ साली सुरू झालेली ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने चालू असल्याचे समाधान मिळते. येथे अनिरुद्ध पेडणेकर गेल्या चार-पाच वर्षात आपल्या लेखन कलेची दिग्दर्शनाचे आणि अभिनयाची सुद्धा झलक दाखवली आहे ती बघून हा मुलगा नाट्य क्षेत्रात काही करेल अशी खात्री वाटत गेली. गेल्या वर्षी बापाची भूमिका मी करावी यासाठी त्याने माझ्याकडे विचारणा केली. तोच दिग्दर्शन करणार हे मला माहिती होते आमच्या दोघात एका पिढीचे अंतर आहे त्यामुळे आपल्याला हे जमवून घ्यायला लागणार हेही मला माहीत होते. मी त्याला होकार दिला आणि नाटक रुळावर आले. एक छोटासा विषय त्यांनी कल्पकतेने फुलवला होता आणि त्याच्या डोक्यात दिग्दर्शनही पक्के होते त्यामुळे पहिल्या तालमींपासून त्याने दिलेल्या सर्व सूचना मी पाळण्याचा प्रयत्न केला. तो कधीतरी सहज बोलून जायचा " काका तुम्हाला जमतय हां , आता असं करून बघा ." असं म्हणून तू मला बरोबर मार्गावर आणायचा.एकदाचं नाटक झालं.कसं झालं हे जाणून घेण्याअगोदरच " छान झाले हो तुमची भूमिका " असे शब्द कानावर आले आणि आम्ही धन्य झालो.

 

           या तालमीच्या वेळेला आमच्या बऱ्याच गप्पा चालायच्या त्या वेळेला अनिरुद्ध ठाण्यातल्या  सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, शाळेत मुलांना अभिनयाचे धडे देत असतो हे कळले. तो नाट्यलेखन ही करीत असतो याचे कौतुक वाटले. कधी कधी माझ्या मुलांचा अमुक दिवशी कार्यक्रम आहे असेही सांगायचा. त्यातून नाटकच याचा श्वास आहे याची मला जाणीव झाली. काल परवा त्याने मला दिलेल्या  बातमीने सुखावून गेलो. मी त्याला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या.

          

साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त) व मराठी वाग्मय मंडळ आणि विनय आपटे प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य एकांकिका स्पर्धा- २०२६

             अंतिम फेरी निकाल-

सर्वोत्कृष्ट बालनाट्य एकांकिका प्रथम 🥇सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, ठाणेची 🎭आकाशाच्या पलीकडे-🎭

लेखक/ दिग्दर्शक- अनिरुद्ध सुनिल पेडणेकर.

सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम 🥇 - अनिरुद्ध सुनिल पेडणेकर

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम 🥇 - डॅनियल प्रणव ब्रह्मभट्ट.

         अनिरुद्धने त्या बालनाट्य स्पर्धेतील मानाची असलेली सर्वच बक्षिसे खिशात घातली.

          अनिरुद्धची ही नाट्यक्षेत्रातील कामगिरी अधिक विस्तारत जाणार आहे आणि एक यशस्वी नाटककार म्हणून त्याचा नावलौकिक होणार आहे याची मला खात्री आहे.त्याच्या त्या वाटचाली साठी माझ्या आभाळभर शुभेच्छा त्याच्यापाठीशी आहेत.

                     यशस्वी भव !

सुभाष लाड.                                                अध्यक्ष.                                                        राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई


अनिरुद्ध सुनिल पेडणेकर                                     77380 93059

************************₹

काळाच्या ओघानं मानवी जीवनाचे, नात्यांचे बदललेले संदर्भबिंदू लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीच्या ग्रामीण प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीची 'रंगभाषा' बदलू पाहणारा हा तरुण रंगकर्मी........ 

अनिरुद्ध हा रंगभूमीच भविष्य आहे.                               रंगभूमीच्या (हौशी) त्या साचेबद्ध रक्तरंजित, बटबटीत, भावकीच्या कंदालात्मक नाटकांतून पेक्षकांना बाहेर काढून, त्यांना प्रायोगिक, सर्जनशील नाट्यप्रयोग देण्याचा अनिरुध्दचा प्रयत्न असतो. तो वाखानन्याजोगा आहे.     लेखकांने लिहिलेली तीच संहिता, तीच कविता, तेच संवाद मात्र दिग्दर्शकाच्या आपल्या frame मधून पाहताना  त्याचा वेगळा आणि स्वतंत्र अन्वयार्थ शोधण्याच्या ध्यासातून, त्याच सादरीकरण बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तें फारच आव्हानात्मक असतं.  काल त्यांना मिळालेला 'गौरव' ही त्यांच्या रचनात्मक कर्तृत्वाचीच पावती आहे............ 

अनिरुद्ध तुमच्या उज्वल नाट्य कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!


- किशोर आयरे.


            

Sunday, January 18, 2026

संमेलनापूर्वीच्या गाठी भेटी !


       

            (मा.कुमार केतकर यांची भेट )
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात केली त्याला आज बारा वर्षे होत आहेत आणि या वेळेचे साहित्य संमेलन हे अकरावे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे एक वर्ष सर्व दुनिया थांबली होती त्यामुळे आपले साहित्य संमेलनही होऊ शकले नाही.

    ( लालबागच्या राजामुळे रिंगणे गावाला प्रसिद्धी देणारे मा.सुधीर साळवी यांची भेट )

   संघाचे ग्रामीण साहित्य संमेलन हे केवळ लेखक आणि कवी यांची गर्दी आणि भाषणे एवढ्या पुरता मर्यादित नसून सामाजिक प्रबोधनाचा वसा घेऊन विविध उपक्रमांची मांदियाळी असलेले हे संमेलन असते. मान्यवर साहित्यिकांपासून वाचक आणि प्रेक्षक यांच्यापर्यंत संघाच्या कार्यकर्त्यांना तसेच संमेलन आयोजकांना जावे लागते. आपल्या घरातला एखादा विवाह समारंभ पार पडताना यजमानांची जी धावपळ असते ती धावपळ संघाच्या कार्यकर्त्यांची त्याचबरोबर आयोजक ग्रामस्थांची होत असते. अनेक उपक्रम संमेलनाशी जोडले गेले असल्यामुळे त्या त्या क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा करून आमंत्रित केले जाते तसेच संमेलनाचा आर्थिक भार सोसण्यासाठी समाजातील दात्यांनाही भेटी द्याव्या लागतात.

.       (कोंडगे ग्रामस्थांची संमेलन पूर्व तयारी सभा)

         अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेळ आरगाव रिंगणे कोंडगे कुरंग झर्ये या सर्व गावातील अनेक लोकांशी संपर्क साधण्यात आला त्यामध्ये काही परिचित होते तर काही नव्याने ओळखीचे झाले. मात्र एक सांगायला आनंद वाटतो की या पुढारलेल्या परिसरात ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना उचलून धरण्यात आली. 'आपण हे संमेलन यशस्वी करूया.' अशी ग्वाही प्रत्येक भेटीत तसेच प्रत्येक सभेत मिळाली. त्यातून संघाच्या कार्यकर्त्यांना आणि आयोजक मंडळीला प्रोत्साहन मिळाले आहे त्यामुळेच रिंगणे येथील अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनही गेल्या दहा वर्षातील संमेलना सारखे संस्मरणीय ठरेल याची खात्री वाटते.

. ( सुप्रसिद्ध सतारवादक विदूर महाजन यांची तळेगाव येथे भेट घेण्यात आली)

        रिंगणे गावचे सुपुत्र राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेले नाटककार ला.कृ.आयरे यांचे नाव संमेलनाच्या साहित्य नगरीला देण्यात येणार असून संघाचे बावीस वर्षे सरचिटणीस पद यशस्वीरित्या सांभाळणारे आत्माराम महिपत तथा आ.म. हांदे यांचे नाव व्यासपीठाला देण्यात येणार आहे. या ठिकाणी अनेक कमानी उभारण्यात येणार असून अनेकदा त्याने त्यासाठी आपली योगदान दिले आहे. साहित्य संमेलनाच्या वेळेला स्मरणिका प्रकाशित केली जाते तिचे नाव पत्रिका असून त्यामध्ये प्रतीत यश लेखकांच्या बरोबर रिंगणे परिसरातील अनेक नवोदित लेखकांनी आपले लेख दिले आहेत. अर्थात त्यासाठी सुद्धा अनेकदा त्याने आपल्या जाहिराती देऊन आपला सहकार्याचा वाटा उचललेला आहे.

( रिंगणे हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक)

       या परिसरात तीन माध्यमिक विद्यालये आहेत. तेथील विद्यार्थी एकांकिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे मुलांची जोरदार तयारी करून घेण्याचे काम शिक्षक करीत आहेत. रांगोळी स्पर्धा कथाकथन यासाठी निवडलेली मुले आपला सराव करत आहेत. ३० जानेवारीच्या रात्री आठ वाजता यशवंत माणके लिखित तीन अंकी नाटक चौथा सादर केले जाणार आहे. रेल्व परिसरातील सर्व गावातील हौशी कलाकार त्यात भूमिका सादर करणार आहेत त्याच्या तालमी सुरू आहेत. आपल्याकडच्या बचत गटातील महिला संमेलन स्थळी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लावणार आहेत त्याच्या तयारीत त्या महिला व्यग्र आहेत.

.               (ग्रामपंचायत येथील सभा )

       अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी छोटी प्रतिकृती वाटावी अशा प्रकारचे हे संमेलन विविध प्रदर्शनाने सजणार आहे. त्यामध्ये कोंडक गावचे सुपुत्र इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन असेल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर व चित्रकार लेखक कवी यांचे चित्रपट. कणकवलीचे अनिकेत पावस्कर यांचे 'अक्षरोत्सव 'हे प्रदर्शन असेल. स्थानिक शाळकरी मुलांचे चित्र प्रदर्शन, अनेक पुस्तकांचे स्टॉल्स इथे गर्दी करणार आहेत.

( सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांच्या घरी )

        इथल्याच मातीतील डॉ. सायली दळवी आयरे यांची मोफत दंतचिकित्सा, डॉ. श्रीधर ठाकूर देसाई यांच्यातर्फे मोफत नेत्रचिकित्सा तसेच डॉ. नितीन तावडे यांचे मधुमेह व रक्तदाब याबाबतचा मोफत सल्ला देणारी सुविधा संमेलनात उपलब्ध होणार आहे.

( कोंडगे हायस्कूलच्या मुलांसमोर बोलतानाश्रीम. स्नेहल आयरे)

           नदी जलपूजन हा कार्यक्रम नावेरी नदीच्या काठावर दोन ठिकाणी होणार आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी सायं ५ वा.कोंडगे येथे तर ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रिंगणे येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी 'माझी झाशी देणार नाही' अशा प्रकारचा नारा देऊन इंग्रजी सैनिकांशी लढताना वीरमरण पत्करले त्या राणी लक्ष्मीबाई ने झाशी बरोबर लांजा तालुक्यातील कोट गावचे हे नाव अजरामर केले त्या राणी लक्ष्मीबाईंचा जय घोष करत ग्रामीण साहित्य संमेलनाचे जाहीर आमंत्रण देत  २६ जानेवारीला सकाळी १० वा क्रांतीज्योत फेरी सुरू होईल आणि लांजा-वाटूळ-व्हेळ- आरगाव- रिंगणे कोंड-पाचल-झर्ये-कुरंग-कोंडगे अशी फिरून सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय रिंगणे येथे विसर्जित होईल.

.              (रत्नागिरी येथील पत्रकार परिषद)

          ३१ जानेवारीला ग्रंथ दिंडी, संमेलन अध्यक्षांचे भाषण, व्याख्याने, परिसंवाद काव्य संमेलने आणि सतार वादन असे भरगच्च कार्यक्रम असतील तर १फेब्रुवारीला विविध पुरस्कार तसेच जीवन गौरव कोकण भूषण हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्याचबरोबर कोकणातल्या स्थानिक मुलांच्या बरोबर लग्न करणाऱ्या नववधूंना आहेर दिला जाईल. वयाची नव्वदी  पार करणाऱ्या वृद्धांचा सत्कार करण्यात येईल. हे असे विविध उपक्रम असलेले ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठी भाषेचे सुपुत्र धडपडत आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !

( रिंगणे परिसरातील मुंबई ग्रामस्थांची दादर येथील सभा)

         मराठी भाषेच्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी आयोजिलेल्या संमेलनात आपणही सहभागी व्हावे ही नम्र विनंती !

जय मराठी !!

सुभाष लाड                                                  अध्यक्ष                                                          राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

( ह.भ.प. सखाराम बुवा आयरे यांच्या निवासस्थानी)



Friday, January 16, 2026

नव्वदी पार व्यक्तींचा सन्मान!


         

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई गेली बारा वर्षे  ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आले आहे. हे संमेलन दरवर्षी कोकणातल्या वेगळ्या खेड्यामध्ये केले जाते. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्याचा संदर्भ मराठी साहित्याशी लावणे योग्यच आहे परंतु केली पंच्याहतर वर्ष राजापूर लांजा तालुक्यातील खेड्यांचा विकास साधण्यासाठी कार्यरत असलेला संघ केवळ मराठी साहित्याचा जागर म्हणून हे संमेलन आखत नाही तर हे संमेलन सामाजिक प्रबोधनाचे व्यासपीठ बनावे हा त्याचा उद्देश आहे.

          इथला रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कोकणातल्या सर्व काळातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही आणि म्हणून इथला शिकला सोडलेला करून हाताला काम मिळावं म्हणून मुंबई पुण्यातील वाट घरे लागला. जो बाहेर गेला तो तिथे स्थायिक झाला आणि गावाकडचा मुलांचा जन्म जर घातला. त्याचा परिणाम शाळांच्या पटावरती होऊन शाळा बंद पडू लागल्या दुकानदार त्याचा व्यापार होईनासा झाल्याने दुकान बंद करून शहरात आला आज केवळ सणासुदीला गाव माणसांनी फुलून येतोय अन्यथा गावातली घर बंद पडलेली आहेत शेतजमीन रान माजवित आहे. त्याही परिस्थितीत म्हणून ज्या मुली गावाकडच्या मुलाबरोबर लग्न करून गावाकडे संसार थाटत आहेत हा एक आशेचा किरण आहे त्या मुलींच्या धाडसाचे कौतुक करावे म्हणून ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मंचावरती त्यांना बोलावून त्यांना आहेर दिला जातो.

         शेकडो वर्ष कोकणातल्या शेतकऱ्यांनी जपून ठेवलेली झाडे ज्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात वेगळीच भर पडलेली होती मात्र गेल्या काही वर्षात इथला शेतकरी पैशाच्या मोहा पायी झाडे विकू लागला. त्यामुळे डोंगर बोडके झाले. त्याचा परिणाम अवेळी पाऊस पडण्यावर झाला. जमीनी झाडांचं मूळ सोडून सुटू लागल्या आणि पावसाच्या पाण्याबरोबर या नदीतून वाहू लागल्या. नदीत आज जमलेले दगड गोटे हे झाडे तोडण्याचे परिणाम आहेत. एकेकाळच्या बारमाही पाणी भरून  वाहणाऱ्या नद्या आज वाळूच्या राशी मिरवत आहेत. त्यातच ग्रामस्थ आपल्या घरातलं किडूक मिडूक, टाकाऊ वस्तु कचराकुंडी समजून नदीत फेकत आहेत.आयुष्यभर स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवणाऱ्या या नद्यांची आजची अवस्था पाहिली आपल्याच डोळ्यांत वेदनेची नदी वाहते. हे चित्र बदलावे म्हणून नदीला पवित्र स्थानी आणून तिची भक्ती भावाने पूजा करण्याचा नवीन उपक्रम या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू केला गेला.संमेलनाच्या पूर्वसंध्येला गावातील आबालवृद्धांना एकत्र करून गाव कुसाला वाहणाऱ्या नदीच्या काठावर नदीजल पूजन करुन श्रद्धेच्या कुरवंड्या वाहिल्या जातात.सगळ्यांचे हात कृतज्ञतेने जोडले जातात आणि हृदयापासून शब्द निघतात. "आजपासून मी नदीच्या पात्रात कचरा टाकणार नाही."

        " लग्नानंतर मुलांचे आईवडील सोबत राहणार असतील तर मला हे स्थळ मान्य नाही." लग्नाच्या बाजारात आजकालच्या मुलींचे असे वक्तव्य येऊ लागल्यानंतर उद्याच्या मुलांच्या आई-वडिलांनी उतार वयात कोणाकडे बघायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काळ बदलतो काळाप्रमाणे आवश्यक असलेला विकास होतो मात्र मनुष्य जीवनाचे जगणे या संस्कारावर आधारित आहे ते संस्कार जर धुळीला मिळाले तर उद्या कोणत्याही कुटुंबात वृद्ध किंवा आजारी माणसांचं स्थान असणार नाही तर त्यांच्यासाठी प्रत्येक गावात, वाडीवर वृद्धाश्रम अनाथाश्रम उभारावे लागतील. घरातील आजी आजोबा हे पुढच्या पिढीचे संस्कारांचा स्त्रोत असतो. तूच जर नष्ट झाला सामाजिक बांधिलकी हा शब्दही नष्ट होईल आणि केवळ स्वतःपुरता जगणं हेच शिल्लक राहील. या जगण्यात सामूहिक जीवनातला निखळ आनंद असणार नाही.

       (श्रीमती सुमित्रा पुंडलिक पेडणेकर, वय ९६)

           संघाने ९० पार केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे ठरवले. खरं पाहिलं तर तो सन्मान त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांचा असतो. एखादी व्यक्ती तिची शरीर रचना सुदृढ असते तिच्या जेवणा खाण्याच्या काही आदर्श पद्धती असतात मात्र ही व्यक्ती जेव्हा दुसऱ्या वरती अवलंबून राहते त्यावेळेला त्या व्यक्तीला तिच्या जेवण्या खाण्याच्या आवडी पुरवणे, वेळेवर आणि सकस आहार देणे त्यांचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे

          ( श्री.शंकर शिवाजी आयरे ,वय ९२ )

 त्यांच्या आजारात योग्य व वेळीच उपचार करणे आणि विशेषता त्यांच्या जगण्याला पूरक ठरणारा आनंद हा कुटुंबात मिळेल याची काळजी घेणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. ज्या कुटुंबातून हे सगळं मिळतं त्यावेळेला ती व्यक्ती नव्वदी पार करते किंवा शंभरीलाही स्पर्श करून जाते. आणि म्हणूनच ज्या समाजात अशी कुटुंब असतात तो समाज निरोगी आनंदी असतो. हे समाजापुढे मांडण्यासाठी आणि भविष्यातील अनाथाश्रमांच्या, वृद्धाश्रमांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी संघाने केलेला हा एक उपक्रम आहे.अशा समाज प्रबोधनात्मक उपक्रमांना अक्षरयात्रेत स्थान मिळाल्याने त्या उपक्रमांचे ही कौतुक होते आहे.

     ( ह.भ.प.श्री.सखारामबुवा दामोदर आयरे वय ९६ )

              रिंगणे गावी होणाऱ्या ११व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रिंगणे,कोंडगे, कुरंग, झर्ये, व्हेळ, आरगाव या गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.दि.३०जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे आपणही अक्षर वारकरी होऊन सहभागी होऊ या !

सुभाष लाड                                                  अध्यक्ष.                                                         राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ मुंबई

.          ( श्री.अनाजी भिकाजी यद्रुक वय ९५ )

.                 (श्रीम.मालती सयाजी आयरे )

आपण आपली जाहिरात स्मरणिकेत देऊ शकता!



आपल्या सौजन्याने एखादा उपक्रम पुढे जाऊ शकतो.