गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेला आहे.एकवेळ महाराष्ट्रव्यापी असलेले आंदोलन आता जालन्यातील अंतरवाली सराटी येथे स्थिरावले असून त्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील नावाचे एक सामान्य शेतकरी करताहेत.कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ न घेता किंवा राजकीय अभिलाषा न ठेवता केवळ नी केवळ मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवल्याने शिक्षण आणि सरकारी नोक-यांना मुकावे लागलेल्या युवापिढीला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्यही पणास लावून ठामपणे मैदानात उभा ठाकलेला हा यौद्धा सरकारलाही त्याच्या दाराशी आणतो आणि उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतो आहे.
मुळात जमीन कसवणारा तो कुणबी.जेव्हा गावातल्या गावात शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात या अपेक्षेने गाव वसवतांना अ़ठरा व्यवसाय करणारी कुटुंबेही गावात आणली गेली.यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने असायचा कारण शेती हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते.हा शेतकरी स्वत:च्या कुटुंबाला किती लागेल यांचा अंदाज करतांना जे लोक आपल्या गरजा भागवितात त्यांनाही द्याव्या लागणा-या धान्याचा अंदाज घेऊन शेतीचा पसारा आखत असे त्यामध्ये सुतार, कुंभार,न्हावी,तेली,साळी,महार असे सगळेजण सुगीच्या दिवसात आपाआपल्या शेतकरी कुळांच्या घरी जाऊन धान्य गाेळा करीत.ही शेती मराठेही करीत आणि कुणबीही करीत होते.मग प्रश्न उरतो मराठा आणि कुणबी ही वेगळी नावे कशी पडली.
या पृथ्वीतलावरील माणूसच नाहीतर प्राणीही आपण इतरांपेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. याच्यातूनच जगण्याची शर्यत निर्माण झाली.त्या शर्यतीत जो वरचढ ठरला तो तो स्वत:ला श्रेष्ठ आणि इतरांना कमी लेखू लागला.त्यांची कुटुंबे पुढे त्याच विचारात वाढली विस्तारली. ज्यांनी गावाचे नेतृत्व केले त्यांचा इतिहास त्यांच्या पुढील पिढ्या पुढे घेऊन आल्या तसेच ज्याला गावाची सेवा करण्यासाठी नेमले त्याच्या पुढच्या पिढ्यांनीही तेच काम करावे असे गृहीत धरण्यात आले किंवा लादण्यात आले.त्यांच व्यवसायावरून त्यांची जात ठरली.परंतु या जातीत उतरंड नव्हती तर प्रत्येक व्यवसायाची गरज आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे हे प्रत्येकजण जाणून होता किंबहुना प्रत्येक जण एक दुस-यावर अवलंबून होता. आमच्या शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या चळवळीत या सगळ्यांच्या कलागुणांचा वापर करून घेतला म्हणूनच शिवाजी राजांना प्रत्येकाच्या हृदयमंदडलावर आदराचे स्थान होते.
या देशात व्यापाराचे निमित्त करून आलेल्या इंग्रजांनी आमची ताकद कमकुवत करण्यासाठी अठरापगड जातींची एकत्रीत मोळी मोकळी केली.प्रत्येकाला त्यांच्या जातीची अस्मिता वेगळी असल्याचे भासवून माळेतून मणी मोकळे करावेत तसे जातींचे गट वेगळे केले गेले.एकात्मतेचा दागिना नष्ट झाला आणि जाती जातीत अहमिका सुरू झाली.पुढे पेशवाईत त्या द्वेषाचा कडेलोट झाला.ते लोण गावागावात पोहोचले.जातीच्या उतरंडीत गावात कमी संख्येने असलेले आणि पुर्वीपार शेतीपुरक किंवा शेतक-यांच्या गरजा भागविण्याचे काम करतांना शेतक-याच्या धान्यावर अवलंबून असणारे खाली खाली ढकलले गेले.त्यात सर्वच समाज देवाधर्मावर अगाढ निष्ठा बाळगणारा असल्याने त्याने गावाची जगण्याची दैनंदिन रित बिघडविण्याचे किंवा काम थांबवण्याचे धारिष्ट्य केले नाही.
महाराष्ट्र राज्य म्हणून १९६० ला काही सीमा आखून दिल्या गेल्या त्यातील भूमी हा आजचा महाराष्ट्र आहे.मात्र शिवकाळात हा महाराष्ट्र फार विस्तीर्ण हाेता.पेशवाईत गुजरात,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश, आणि कर्नाटकातील अनेक प्रदेशावर मराठ्यांचे वर्चस्व होते म्हणजे तिथपर्यंत महाराष्ट्र होता आणि तिथला राज्यकर्ता ,त्याचे प्रशासक व सैन्य हे मराठा होते.त्यावेळी इंग्रजांप्रमाणे महार बटालियन किंवा मराठा रेजिमेंट अशी सैन्याची विभागणी केली नव्हती तर प्रत्येकजण स्वत:ला प्रथम मराठा संबाेधत होता.हे युद्धावर जाणारे,राज्यकारभारात नोकरी करणारे सर्वचकाही पिढ्यान पिढ्याच्या सरदार घराण्यातून आलेले नव्हते तर ते शेतकरी कुटुंबातून आलेले,कुणी मेंढपाळ होता,कुणी व्यापारात चमकदार कामगिरी करणारा होता ,कुणी त्याच्या वाक्चातुर्यामुळे नजरेत भरलेला होता,कुणी कुस्तीचा आखाडा गाजवणारा होता तर कुणी बहुरूप्याच काम वठवणारा होता पण तो मुळात शेतकरीच होता.शिवराय जेव्हा एखाद्या गावात जायचे तेव्हा त्या गावातील घडामोडींची माहिती त्यांच्या कानावर यायची मग त्यातूनच आपल्या सैन्य भरतीसाठी एखाद्या शेतक-यांच्या अनेक मुलांपैकी चारदोन मुलांना स्वराज्याच्या कामी पाठव असे सांगताच आपली शेती चालू राहावी यासाठीचा विचार करून काही मुलांची तो शेतकरी हसत हसत सैन्यात रवानगी करायचा.ही सैन्यात गेलेली बरीच मंडळी अनेक जिंकलेल्या प्रदेशात वेगवेगळ्या हुद्यानुसार स्थायिक झाली.आज आय ए एस अधिका-याला जसा समाजात मान असतो तसा त्या काळात हातात तलवार घेऊन लढणा-यास मान होता.अशा तरूणांची लग्ने सुद्धा अशा तलवारबाजी करणा-या कुटुंबातील मुलींशी व्हायचा.तो एक खानदानी दाखवण्याचा एक रिवाज बनली असला तरी एकाच व्यवसायातील सुखदु:खे समजून घेण्याचा समंजसपणा त्यात होता.त्यातूनच पुढे ९६ कुळी मराठा ही संकल्पना दृढ होत गेली.आज एकाच बापाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मुंबई पुण्यात जातो.तो पैसे कमवितो व चाकरमानी होतो.दुसरा मुलगा गावातली शेती करतो व मिळेल त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो.लग्नाच्या बाजारात चाकरमान्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि शेतक-याला मात्र अनेक उंबरे झिजवावे लागतात. मराठा आणि कुणबी हे एकाच घरातले असून परिस्थितीमुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली आणि मनुष्य स्वभावाप्रमाणे ज्याला मिरवायचे आहे,आपण वेगळे आहोत हे सांगण्याने त्याला काकणभर मांस अधिक चढल्यासारखे वाटते तो गरीबाला आपल्या बरोबर बसवत नाही.तसे तलवारबाजी करणारा शेतक-यास कमी लेखू लागला.
मराठ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत तशा अनेक कुणबी कुटुंबाकडे जमिनी आहेत.जसे मराठे खोत आहेत तसे काही गावात कुणबीही खोत आहेत. एकेकाळी अस्पृश्य समाजाला हीन पद्धतीची वागणूक मिळते तशी कुणबी लोकांनाही मिळत होती.स्पृश्य अस्पृश्यता स्पर्शात नव्हती,रोटीत टोकाची नव्हती मात्र बेटी व्यवहारात कटाक्षानं पाळली जात होती.गाव रहाटीत त्याला सेवक म्हणूनच राबविले जायचे तर मराठ्यांच्या लग्नात झाडू मारणे व जेवल्यानंतर पत्रावळी उचलून खरकटे साफ करणे अशी कामे करावी लागत.मुलींचे माहेरपण किंवा सासरी जातांना सोबत म्हणून त्याला सक्तीने जावे लागत असे.बरे मराठा व कुणबी यांच्या खाण्याच्या पद्धती,सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती सारख्याच आहेत.हिंदू धर्मातील सर्व संस्कार व रिती रिवाज हे पाळीत असले तरी मराठ्यांनी बांधलेल्या देवळातल्या देवांची यांनी पूजा करायची नाही किंवा मराठ्यांच्या बरोबर याने वागावयाचे नाही अशा अमानवी पद्धतीने यांना वागविण्यात आले.पण आज कुणबी समाजातील मुले शिकली आहेत.मोठ्या अधिकाराच्या पदांवर आहेत.त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आदराचे स्थान मिळते आहे.पण ते जेव्हा आपल्या गावच्या सिमेच्या आत जातात तेव्हा त्यांच्याकडे पुर्वीच्याच नजरेने पाहिले जाते.आपल्या जन्मदाती मातीचे ऋण मानतात म्हणून ते उफाळून येत नाहीत या त्यांच्या सोशिकतेला सलाम करायला हवाय.
हिंदु धर्मातील किंवा जगभरातल्या सर्वच धर्मातल्या जातीच्या उतरंडीतील लोक आपआपल्या जातीला चिकटून आहेत.हिंदू धर्मात ब्राह्मणांचे,श्रेष्ठत्त्व क्षत्रीय मान्य करतात.वैश्य समाज ब्राह्मण व त्यानंतर क्षत्रीयांचे श्रेष्ठत्व मान्य करतात तसे शुद्र वरील तिघांचेही श्रेष्ठत्व मान्य करतात म्हणुनच जाती टिकून आहेत.जाती जातीत वरिष्ठ व कनिष्ठ अशा दर्जांची उतरंड मान्य केलेली आहे म्हणुन लग्नाच्या बाजारात आपल्या जातीतीलच स्थळे शोधण्याचा अट्टाहास आजही आहे.
आज जग जवळ आले आहे.आपली परदेशात गेलेली मुले तिथलेच स्थळ बघून तिथेच स्थायिक होऊ लागली आहेत.त्यांची जात किंवा धर्म नाईलाजाने का होईना पण आपण स्विकारायला लागलो आहोत. मग आपल्याच मातीतल्या आपल्याच प्रमाणे ज्याची जीवन जगण्याची पद्धती आहे त्याला आपण का स्विकारत नाही याचे आश्चर्य वाटते.बरे आपल्या राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क,कर्तव्य,अधिकार देतांना धर्माची किंवा जातीची अट घातली नाही त्यामुळे प्रत्येकजण आपले आकाश मुठीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे.कधी कधी शंभर एकर जमिनीचा मालक असलेल्या शेतक-याचा मुलगा दहावीपर्यंत घुटमळतो आणि आयुष्यभर धुणी भांडी करणारीचा मुलगा डॉक्टर -इंजिनिअर होतो तेव्हा त्याला त्याची जात किंवा धर्म मदत करीत नाही तर जीवन जगण्याच्या मार्गावर तुमचे कष्ट आणि जिद्द कामी येते हे जरी लक्षात आले तरी आपण जातीच्या कचाट्यातून मुक्त होऊ.
आपला महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो पण तो देशातील इतर राज्यांपेक्षा अधिक पुरोगामी आहे असं म्हणावयास हवे कारण तो पूर्णतया पुरोगामी झालेला नाही.या मातीत होऊन गेलेल्या अनेक समाज सुधारकांच्या कामामुळे व स्वातंत्र्यानंतर झालेल्या शिक्षणाच्या प्रसारामुळे आपण पूर्ण पुरोगामित्वाकडे वळत असतांनाच निवडणुकीच्या राजकारणाने घात केला. जातींचा अभ्यास करून उमेदवाराची निवड करायची आणि जातींची एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी
जाती जातीत विष कालवायचे हे प्रयोग यशस्वी केले गेले आणि पुढे जातीनिहाय पक्षांचा उदय झाला.यामुळे उच्च शिक्षीत विज्ञानवादी युवकसुद्धा जातींमध्ये घट्ट बसण्याला अधिक प्राधान्य देऊ लागला आहे हे लोकशाहीला घातक आहेच तसेच गावागावातील शांती सलोखा बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे.
आपण थोरामोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करण्याचे आता बंद करून त्या दिवशी त्यांच्या विचारांची पारायणे करून त्यांचे विचार आचरणात आणण्याचे उपक्रम हाती घ्यायला हवेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा रथ हाकतांना उभ्या महाराष्ट्रीयनांना केवळ मराठा या नावाने संबोधले व त्यांना आपल्या जवळ बसविले , एका झेंड्याखाली आणले तसे महाराष्ट्रात पुन्हा घडून येण्यासाठी
या वचनाप्रमाणे चालणे ही काळाची गरज आहे.
सुभाष लाड
९८६९१०५७३४


















































