Sunday, March 31, 2024

भगिरथाचा पुत्र श्री वासुदेव घाग!

 


            ओणी मार्गे पाचलला जाताना सौंदळला घागवाडीत थोडी वाट वाकडी करणे हे आता आमच्यासाठी नित्याचेच झालंय. माजी सैनिक श्री वासुदेव घाग हे नाव आता लांजा राजापूर परिसरात सर्वश्रुत झाले आहे ते एक प्रगतीशील शेतकरी म्हणून. तसं पाहिलं असता सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यावर सर्वजण सरकारी कोट्यातील नोकरी मिळवून शक्यतो मुंबईत स्थावर होतात.घागांच्या बरोबर ज्यांना सेवानिवृत्ती मिळाली त्या सर्वांनी तोच मार्ग निवडला पण घाग सेवानिवृत्त झाले आणि मुंबईतल्या खोलीला गिर्‍हाईक मिळवले.खोली विक्री होताच ते आपल्या सौंदळ गावी आले.आपली वडिलोपार्जित जमीन कसू लागले.जमिनीत काही पिकत नाही.पिकलं तर जनावरं ठेवत नाही म्हणून शेती मोडून रेशनिंगवरच्या धान्यावर जगणारे घागांना वेड्यात काढू लागले.कुचेष्टाही करू लागले.पण घागसुद्धा याच मातीत जन्मलेले असल्याने लोकांच्या वृत्ती प्रवृत्तींचा त्यांनाही चांगलाच अभ्यास होता.पाऊस पडेल मग मी शेती करीन अशा मार्गाने घागांना मुळात जायचेच नव्हते.पण काही दिवस अभ्यास करण्यात त्यांनी घालवले.चारदोन वर्षातील निरीक्षणाचा त्याचबरोबर ते करीत असलेल्या प्रयोगांचा त्यांना चांगलाच फायदा झाला.मुळात याचं मातीत आपण लाखाचे धनी ठरू शकतो हा त्याचा आत्मविश्वास दृढ झाला आणि पुढचे आडाखेही पक्के झाले.
           त्यांच्या इतकीच शेतात मेहनत घेणारी त्यांची पत्नी त्यांच्या निर्णयात डोळसपणे साथ देत असल्याने
त्यांनी मोठ्या शेतीचे गणित पक्के केले.जवळच असलेल्या डोंगरावरील दहा एकर जमीन त्यांच्या स्वप्नाला खुणावू लागली.मनासारखा व्यवहार ठरला.एक मोठी रक्कम उभी करायची होती.एक प्रकारचा पट लावायचा होता.घरात होतं नव्हतं ते गहाण ठेवून, विकून वेळेत सौदा केला.विकत घेतलेला सरळ उभा डोंगर बघून वेडे म्हणणारे चेकाळले.आपण म्हणत होतो ते खरं होणार म्हणून नाक्यावरच्या टपरीवर बसून फुकट चहा पाजत होते आणि टाळी मागत दिवस ढकलत होते.आणि इथे हा जवान तहानभूक हरून घेतलेल्या जमिनीवर आनंदवन फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगून घाम गाळीत होता.घेतलेल्या जमिनीच्या सीमा निश्चित करून सगळी रानटी झाडे झुडपे काढून डोंगर मोकळा केला.पुढच्या उन्हाळ्यात पानाड्याला आणून पाणी पाहिले आणि विहिर खोदून घेतली.त्याच पावसाळ्यात अडीच एकर जमिनीवर बांबूची लागवड केली. बांबूनी जोर धरताच साळंद्रीनी मुळे उकरायला सुरूवात केली.एवढी मोठी लागवड पाण्यात जातेय की काय अशी स्थिती असतानांच भर पावसात त्या डोंगरावर समतल होऊ शकेल अशा दोन अडिच गुंठ्याच्या जागेत झोपडी बांधून सारा संसारच त्या डोंगरात आणला.





           तिसर्‍या वर्षात बांबू उत्पादन देऊ लागला.अधे मधे दलाल न ठेवता सरळ कोल्हापुरात माल विकून अर्ध्या कर्जातून गडी मोकळा झाला.आता आपल्या विचाराचे व प्रयोगशील तसेच मेहनती शेतकऱ्यांचा शोध घेऊन चर्चा आणि कृषीभेटी सुरू केल्या.अशाच शेतकर्‍यांची संस्था निर्माण केली.अशाच वाटचालीत फणस लागवडीचा प्रयोग केला.तिसऱ्या वर्षी फणसाचं चांगलं उत्पन्न मिळतय याची खात्री पटली.मग गेल्यावर्षी तर कोकणाच्या भुमीत क्रांतिकारक ठरावा असा रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी केला.मला फोन करून बघायला बोलावलं.ती तुतीची शेती,रेशीम किंड्यांच्या अळ्या वाढविण्याचे तंत्र, कोषनिर्मीतीकरीता उभारलेली विशिष्ट झोपडी हे सगळं बघून २०१७ मध्ये त्यांना संघाचा बळीराजा पुरस्कार किती योग्य जागी दिला गेला याचं समाधान मिळालं.





                काल माझ्यासोबत साळवीसर,हटकरसर व ओणीचे पाटील सर होते.आम्ही मूरच्या संजय सुतारांना शुभेच्छा जात होतो.सौंदळच्या हद्दीत गाडी शिरताच मी म्हटलं " इथे सौंदळमध्ये तुम्हाला भगिरथाच्या पुत्राचे दर्शन घडवितो. " त्यांचा शेतीतला प्रवास सांगताच त्यांनाही त्यांना भेटण्याची उत्कंठा वाढली.सौंदळच्या बाजारपेठेत रस्त्यावरच उजव्या बाजूस ग्रामदैवत असून पिंपळ वृक्ष आहे तिथे डाव्या बाजुला बारीक रस्ता जातो.तीनएक किमी गेल्यावर घागांचा डोंगर लागतो.त्या डोंगरातील बागेतून कच्चा रस्ता त्यांच्या घरापर्यंत जातो.पुरूष दीड पुरूष उंचीच्या फणसांच्या झाडांमधून जाणारा रस्ता स्वत:ला धन्य मानत असेल कारण गेल्या चार वर्षात अनेक शेतकरी,कृषीतज्ज्ञ , पर्यावरण अभ्यासक  ,विद्यार्थी,अधिकारी आणि पर्यटकही त्याने पाहिले आहेत.
            त्या उंच टेकडीवरच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या वार्‍याने स्वर्ग सुखाचा आनंद दिला आणि अंगणातून बाहेर पाहताच समोरच्या हिरवाईने आच्छादलेल्या टेकड्यांच्या सुरूवातीलाच दिसणारा मंदिराचा कळस नजर खिळवून ठेवतो.रगारगात भरलेलं देशप्रेम,जमीन कष्टवून चेहर्‍यावर आलेले तेज, मुलगा सैन्यात आहे आणि सूनबाई शेतीच्या प्रयोगात मग्न आहे हे सांगताना आपण किती आनंदी आहोत हे सांगताना वासुदेव घाग त्यांच्या दुनियेत किती रमले आहेत याचा अंदाज येतो.एका हातात खेळकर नातवाला धरून दुसर्‍या हातात चहाचा कप घेऊन येणारी त्यांची पत्नी सुखी समाधानी कुटुंबाचं वर्तुळ पूर्ण करतेय असंच वाटतं. पूर्वी कोकणात मोठ्ये प्रमाणात शेती केली जायची याचं कारण त्यावेळी अख्खं कुटुंब शेतीत राबत होतं याची आठवण घाग कुटुंब करून देतंय.अर्थात तो शेती करू पाहणाऱ्यांना एक सल्लाच आहे.


सुभाष लाड
९८६९१०५७३४


माजी सैनिक- वासुदेव घाग-सौंदळ
8459437499




             



Friday, March 29, 2024

सुसंस्कृत आप्पा साळवी








         मूरचे उद्योजक श्री.संजय सुतारांचा फोन आला. "
येत्या सोमवारी आपणांस तळवड्यात जायचं आहे.तिथे आप्पा साळवी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालीय.त्यांनी तयारी दर्शविली आहे.तुम्ही एकदा सविस्तर समजून सांगितलत की नेमकं काय करायचय हे त्यांच्या लक्षात येईल." मी त्यांना सोमवारी येत असल्याचं सांगितलं तसं आमचे लांजातून साळवी सर,हटकर सर,मांडवकर सर , ओणीचे पाटील सर असे सारे मिळून तळवडे गाठले.पाचलातून किशोरजी नारकर व सिद्धार्थ जाधव सर आले होते. संजय सुतारांनी सर्वांचा परिचय करून दिला आणि विषयाकडे वळले. संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाबाबतची सर्व चर्चा ऐकल्यानंतर  आप्पांनी तळवडे गावातून काही ठराविक लोकांना बोलावून घेतले होते त्यांचा कौल घेतला. त्यांचा होकार येताच आप्पा म्हणाले " एक चांगला कार्यक्रम आमच्या गावात होत असेल तर तो यशस्वी करण्याची जबाबदारी आम्ही घेतो.मात्र या महिन्याभरात आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतरच आपण तयारीला लागू.संमेलन यशस्वी झालं असंच समजा."
            आम्ही महिन्याभरात बाकीच्या तयारीत गुंतलो आणि पुन्हा संजय सुतारांचा फोन आला."आप्पांच्या सूनबाई  बिनविरोध सरपंच पदी निवडून आल्या आहेत."
सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने आम्ही नवनिर्वाचित सरपंच सौ.गायत्री अमित साळवी यांचा सन्मान समारोह आयोजित केला.विजयी ग्रामसेवक सदस्य आणि तळवडे ग्रामवासिय मोठ्या संख्येनं जमलेले असल्याने आप्पानी संमेलनाचा विषय छेडला. ग्रामस्थांनी संमेलन पार पाडण्याची जबाबदारी घेतली. सौ.गायत्री साळवी यांनी सरपंच या नात्याने नेतृत्व करण्याचे मान्य करून संमेलन यशस्वी करण्याचा शब्द दिला.तसा पूर्वतयारीला वेळ कमीच होता.पण आप्पांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कामास सुरूवात केली.
           कोणता माणूस कोणते काम अधिक चांगले करू शकतो याची माहिती आप्पांनी दिली व त्या लोकांची व्यवस्थापन समिती तयार केली.मग आमच्या बैठकांना जोर आला.जसजसे दिवस मागे सरकत होते तसतशी आप्पांची धावपळ वाढत चालली होती. कोणत्याही गोष्टीवर अनाठायी चर्चा न करता नेमकं काय करायचंय हे समजले की आप्पा म्हणायचे " ते काम होईल पुढे सांगा."
           कमी कालावधी मिळत असल्याने ' कसं होणार ?' ही सुरूवातीची विवंचना मागे पडून ' आता चिंता नको ,होईल चांगलं ' या आशावादानं जोर धरला.माझ्याकडून फोन जाण्याऐवजी आता आप्पांकडून फोन यायला लागले.विशेषत: आप्पांनी जमेचे गणित मांडले होते ते त्यांच्या मनासारखे जुळत असल्याने ते खूष होते. बर्‍याच वेळेला संमेलन आमच्यासाठी नवीन आहे असं म्हणून बरेच जण संभ्रमीत असतात पण ज्याने सार्वजनिक कार्यक्रम स्वत: राबविलेले असतात त्यांना एकदा रूपरेषा सांगितली की ते कामाला लागतात.उदा.दीपप्रज्वलन करायचे आहे म्हटल्यावर समई लागणार हे वेगळं सांगायला नको.पण कोणती समई हवी अशी जेव्हा विचारणा होते तेव्हा समजायचे की ही व्यक्ती मांडवाखालून गेलेली आहे.आप्पांनी तर त्याही पुढे जाऊन अनेकांची लग्नं पार पाडून दिलेली आहेत हे लक्षात आले.
          आप्पानी एक दिवस जवळ बसवून "आपण निमंत्रण कोणाकोणाला द्यायची ?" असा प्रश्न केला. आप्पा एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे मला ठाऊक होते तसेच त्यांचे संबंध सगळ्याच व्यक्तींशी होते हे ही मला माहित होते. आमचा संघ कोणताही राजकीय झेंडा खांद्यावर घेत नाही पण कोणाचा द्वेष करीत नाही.
"आप्पा आपल्या कार्यक्रमात कोणत्याही पाहुण्याची वाट पाहून वेळ वाया घालवायचा हे आपण टाळत असतो.राजकीय पुढारी वेळचे महत्व जाणत असूनही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना वेळेचे गणित जुळविता येत नाही.म्हणून त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे केव्हाही यावे.त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल."
       आप्पानीही पसंतीची मोहोर चेहेऱ्यावर आणली.
मग आप्पांनी तशी निमंत्रण धाडली.सगळ्याच बाबतीत आप्पा संघाच्या विचारसरणीत तंतोतंत बसत असल्याने एवढ्या मोठ्या संमेलनात जराही राग रूसवा नाही किंवा गैरसमजही नाही.उलट तुमच्या संघात सुनील गुरवला घ्या,संदीप गुरव पण चांगला मुलगा आहे.अशा सूचना आप्पांकडून येतांना संघाबद्दलचा आपलेपणा दिसत होता.



         आप्पा फार कमी बोलतात तसे पुढे पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तर जाणत्या धुरिणांसारखे नेमकं बोलून विषय कसा संपवायचा तसेच कोणत्या कामाचं कोणाला श्रेय द्यायचं हे त्यांच्या बरोबर लक्षात असतं.त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचना टाळाव्यात असे कधीच वाटले नाही.उलट उभ्या संमेलनातून आप्पांची उंची काय आहे याचा अंदाज आला. उभ्या परिसरात आप्पांच्या शब्दाला  का किंमत आहे हे कळून आले.हात अनेकांचे लागले.पण त्या हातांना एकत्र आणणे,त्यांच्या कला सांभाळून त्यांना कार्यप्रवण करणे हे सगळं  काम आप्पांनी केलं म्हणून संघाच्या ८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे हिरो आप्पा होते हे आम्ही प्रांजळपणे मान्य केले आहे.
           वास्तविक संमेलन झाल्यानंतर आप्पांनी संघाशी जोडून राहण्याचं त्याच वेळेला जाहीरपणे सांगितलं होतं.बर्‍याच वेळेला आपण अमुक करू तमूक करू असं सांगून टाळ्या मिळवण्याचं काम अनकजण करतात. पण आप्पांचा स्वभाव पाहिल्यानंतर आप्पांनी किती जाणीवपूर्वक हे उद्गार काढले होते हे माहित असल्यानं  नंतर संघानं घेतलेला माचाळ महोत्सव असेल किंवा रायपाटण येथील नदीजलपूजन कार्यक्रम असेल या प्रत्येक वेळी आप्पांच्या सहभागाची मी जी अपेक्षा बाळगली होती त्या ही पलिकडे जाऊन आप्पांनी हे कार्यक्रम कमालीचे यशस्वी करून मी संघाचा केवळ हितचिंतक नाही तर जबाबदार घटक असल्याचं दाखवून दिलं आहे.आप्पांसारखी सामाजिक कार्याला परमेश्वरी कार्य समजून झोकून काम करणारी माणसं ज्या संस्थेसोबत असतात त्या  संस्थेकडून लोककल्याणकारी काम घडतच राहून संस्थेचा नावलौकिक व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
              काही  दिवसांपूर्वी संघाचे हितचिंतक व प्रसिद्ध उद्योजक श्री.संजय सुतार यांच्या आजिवली येथील साॅ मिलला आग लागली.आप्पांनी तात्काळ तिथे धाव घेऊन त्यांना मानसिक बळ दिले.काही दिवसांनी संघाचे कार्यकर्ते तिथे जाणार आहेत हे कळल्यावर आप्पाही त्यांच्यासोबत आले.पन्नास लाखाच्या नुकसानीनंतर एखाद्याला मानसिक आधार किती महत्वाचा असतो हे प्रत्यक्ष धंद्यातले चढउतार पाहिलेल्या आप्पांपेक्षा आणि कोण जाणू शकेल ? त्या बैठकीत आप्पांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सहज कथन केल्या तेव्हा आप्पांच्या पिकलेल्या केसांचे रहस्य समजले आणि ' पाय टाकूनी जळात बसल्या औदुंबराने ' आपलं मन मोकळं केलं पाहिजे असं वाटू लागलं.



            संघाचं नववं साहित्य संमेलन शिपोशी इथं संपन्न झालं. या संमेलनात आप्पा एका वेगळ्या भुमिकेतून संघाच्या व्यासपीठावर आल्याने संमेलनाची उंची वाढल्याचे आम्हांस समाधान मिळाले.संघ दरवर्षी काही पुरस्कार देत असतो.त्यासाठी संघाची पुरस्कार निवड समिती असते.त्यांनी निवड केलेल्या यादीत फारसा बदल करावा असे संघाच्या मुख्य समितीला वाटत नाही कारण या समितीने आवश्यक त्या निकषावर ही निवड केलेली असते.बॅ.नाथ पै हे कोकणी माणसाचे दैवत आणि त्यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्त्याला दिला जाणारा पुरस्कार हा आप्पांना दिला गेला.त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने आमच्याकडे अनेकांनी समाधान व्यक्त केलेच तसेच त्या कार्यक्रमाला अनेक लोकांनी हजेरीही लावली.
           दोन दिवसांपूर्वी सहज गप्पा मारतांना ' आपण आयुष्यातील सुखी क्षण अनुभवीत आहोत.कारण माझा मुलगा जीव ओतून आपला व्यवसाय करतो आहे तर सुनेच्या रूपाने आमच्या घरी लक्ष्मी आली आहे." हिमाचलयाच्या उंच शिखरावर आपण निशाण गाडत आहोत अशी विजयी मुद्रा आप्पाच्या चेहर्‍यावर झळकत होती. आज अनेक पालक आपली मुले आम्हांस विचारत नाही किंवा सुन आली नी घर मोडलं अशी नाराजी घेऊन अनेक पालक आजुबाजुला दिसत असतांना आप्पांच्या सकारात्मक विधानाला मोठे महत्व आहे पण आपण आजही आपल्या ९४ वर्षांच्या वडिलांपुढे जातांना आज्ञाधारक मुलगा म्हणूनच जात आहोत हे सांगत नाहीत. कोणत्याही वयात बापाला बापासारखेच वागवायचे ही आपली संस्कृती आहे त्यात काय आहे  वेगळेपण ? असं समजणारे बाप जिथे असतात तिथे ते संस्कार घेऊन मुलेही जन्मतात. हे भाग्य नसून हे कर्तृत्व आहे असे हे मान्य करून सर्वांनीच याचा बोध घ्यावयास हवा.
           कष्टातच जगण्याचा आनंद शोधणाऱ्या , राजकारणात राहूनही सामाजिक साधन शुचितेला अधिक महत्व देतांना चिरकाल समाधानाची अपेक्षा करीत जगणाऱ्या सन्माननीय सुसंस्कृत आप्पा साळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना त्यांना आयुरारोग्य प्रदान करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

सुभाष लाड
अध्यक्ष
रा.लां.ता.ना.संघ,मुंबई

श्री.आप्पा साळवी - संपर्क ९४२११४०८२९
जन्मदिवस  ३० मार्च 


         

Friday, March 22, 2024

नदी आक्रसली आहे.

            



    जागतिक जल  दिनाच्या निमित्ताने दैनिकांत तसेच नियतकालिकात अनेकजण पाण्याच्या समस्या आणि तदनुषंगिक उपक्रमांवर चर्चा होईल.शहरात कुठल्यातरी सभागृहात चर्चासत्र होतील.सरकारकडून या दिवसासाठी ठेवलेला निधी खर्च होईल.दुसऱ्या दिवशी दुसरा जागतिक दिनाचे लगबग सुरू होईल.एक व्हॅलेंटाइन डे सोडल्यास कोणत्याही जागतिक दिनाचे महत्व हे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न यापलिकडे असत नाही.त्यामुळे समस्या जाग्यावरच आहेत.जल दिनाचे औचित्य साधून एखाद्या पात्रात उतरून नद्यांचे गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला असता तर अनेकांना जलाशयाचे महत्व लक्षात आले असते.

  •               नुकतेच लांजा तालुक्यातील शिपोशी या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावात  राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे ९वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले.त्या गावातून वाहणाऱ्या व सध्या वाळूने भरून गेलेल्या नदीकडे शासनाचे लक्ष जावे म्हणून  तसेच ग्रामस्थांनी नदीला देवस्वरूप मानून नदीत कचरा टाकू नये हा संदेश देण्यासाठी संमेलनाच्या पूर्व संध्येला समस्त
  • ग्रामस्थांनी नदीचे शास्त्रोक्त पूजन केले.

 






  •  
  • राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ हा गेली सत्तर वर्षे  लांजा व राजापूर या दोन्ही तालुक्यात सामाजिक उपक्रम करीत असतो. सन २०१४ पासून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतो.सन २०१५ पासून गावखेड्यातल्या नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आहे.सन २०२३ मध्ये राजापूर तळवडे येथे पार पडलेल्या संमेलनाच्या पूर्व संध्येला अर्जुना नदीच्या पात्रात जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचे अनेकांकडून महत्व अधोरेखित केले गेले. जलपूजनाचा दुसरा कार्यक्रम सर्वपित्री अमावास्येचा मुहूर्त साधून रायपाटण येथे अर्जुना व निवाचा नदीच्या संगमावर पार पडला.पाचल , तळवडे व रायपाटण येथील आबालवृद्धांनी यात सहभाग  देऊन त्यास उत्सवाचे स्वरूप दिले.
  • जलपूजनाचा तिसरा कार्यक्रम शिपोशी ग्रामपंचायतीत असलेल्या बोरिवले या ग्रामस्थांनी काजळी नदीच्या पात्रात २९ फेब्रुवारी २०२४ च्या दिवेलागणीच्या मुहूर्तावर पार पडला.या गावाने तर तो आपल्या गावचा महत्वाचा सण असल्यागत तो साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच.तसेच त्याच गावातील नवोदित शाहिर प्रशांत खांदारे याचा प्रथमच शाहिरीचा कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली.
  •              पूर्वी सारा गाव नदीवर अवलंबून होता. प्रत्येक जण प्रत्यक्ष नदीत उतरत होता.पुढे घरोघरी नळ योजना आली आणि नदीवरचा वावर संपला.त्यामुळे कोंडीत पाणी आहे की दगड भरलेत हे कुणी पाहिलेच नाही. जेव्हा नदी वाहायची थांबली तेव्हा लक्षात आले नदी संकटात सापडली आहे.
  •               शहरवस्तीकडे आकर्षिला गेलेला माणूस गावाकडे परत येत नाही कारण कष्ट करणे आवडेनासे झाले आहे तसे ते लाजिरवाणे वाटू लागले आहे.खुर्चीवर बसून नोकरी करणाऱ्यांने स्वत: उठून पाणी घ्यायचे नाही,कोणीतरी त्याला ते जाग्यावर मिळायला हवे.हे काही वेळा आवश्यक ठरत असले तरी तो इज्जतीचा विषय असत नाही. पण आपण तो केला आहे.
मोठमोठ्या  बंगल्यात राहणारे लोक स्वत:चीन बाग स्वत: फुलवितात व आनंद घेतात.दहा हजाराचा पगार घेणारा तरूण फावल्या वेळात कडक इस्त्रीचे कपडे करून गप्पांचा फड रंगवतो. आजकाल मोबाईल हे चांगले खेळणे त्यांच्या हातात आल्याने तो सर्वकाळ व्यस्त आहे.मग नदीवरच पाणी आणणं सोडा घरातील घागर सुद्धा तो झाडात ओतायला पुढे येत नाही.त्यामुळे नदी सध्या एकांतवासात आहेत.तिचे वाहणेच  थांबल्याने ती आक्रसली आहे.
             
सुभाष लाड
२२।०३।२०२४
         


शिपोशी .......







बोरीवले , काजळी नदी पात्रात .......

           जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा देतांना सर्वजण नदीवर प्रेम करू लागतील अशी अपेक्षा करतो.



.           



             

         

Sunday, March 17, 2024

किमयाची किमया !

 


         गेल्या अनेक शतकात सामाजिक आणि कौटुंबिक नकाराचा सामना करीत स्रियांना जीवन जगावे लागत होते.पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्या शक्तीला वजा केलेले असल्याने अबला म्हणून संबोधून चूल आणि मूल या दोन कामापुरताच त्यांचे जगणे मर्यादित करून टाकले होते.खरे पाहता वैदिक काळात पुढारलेल्या स्त्रिया होत्या याचे दाखले असूनही केव्हातरी मनू संस्कृतीचा पगडा आपण स्विकारला.सुखाचा संसार या स्वप्नाला आकार देण्याच्या भावनेपोटी सहनशील स्त्रीने पराभुताच्या मानसिकतेतही चेहर्‍यावर हासू आणत अनेक शतके घालवली आणि तीच स्त्रीची ओळख ठरली.

          परंतु त्याही परिस्थितीत काही स्त्रियांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली.राजमाता जिजाबाई यांनी आपल्या पुत्राला शिक्षण आणि संस्कार दिल्याने तो हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकला.छत्रपती शिवाजीमहाराज म्हणताच करोडो लोकांची छाती अभिमानाने फुगते तेव्हा डोळ्यासमोर जिजाबाई सुद्धा असतात.पुढे राणी ताराबाई,राणी अहिल्याबाई,राणी 

लक्ष्मीबाई याच बरोबर साध्वी सावित्रीबाई अशा अनेकांनी  पुरूषांच्याही पुढे जाऊन काम केले असले तरी सार्वजनिक जीवनातच त्यांचे कौतुक केले जाते. त्यांचा दाखला  देऊन आपल्या मुलींनी तसे कर्तृत्व करावे  ही अपेक्षा सोडा पण    वैयक्तिक जीवनात सातच्या आत घरातचा पाठ गिरवताना पुरूषांबरोबर स्त्रियाच पुढे दिसतात.किंबहुना घरंदाजपणा दाखविण्यासाठी अशा अनेक बंधनांचे काटेकोरपणे पालन केले जाते. घराचा वंश हा मुलगाच पुढे नेतो या विचारांचा पगडा हा स्त्रियांवरती अधिक असल्याचे जाणवते.

                                 
                                  कु.किमया आयरे

            अशाच परिस्थितीत जन्मलेल्या   सायली व किमया आयरे या दोन मुलींचे स्नेहल आणि विजय आयरे हे आई वडील मात्र नव्या विचारांचे असल्याने ( ते सुशिक्षित आहेतच पण सगळेच सुशिक्षित नव्या विचाराचे असतात असे म्हणता येत नाही ) त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना योग्य ते शिक्षण दिलेच पण व्यवसाय वा नोकरीकरीता पूर्ण स्वातंत्र्य दिले. मोठी मुलगी सायली डाॅक्टर असून दंत वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा दवाखाना चालवून नाव कमविते आहे.तर किमयाने मात्र अगदी वेगळेच क्षेत्र निवडले आहे.तिला चित्रकलेची आवड असल्याने स्त्रियांच्या दागिन्यांचे नवनवीन प्रकार ती बाजारात आणते आहे.सुरूवातीला तिने सुप्रसिध्द जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मध्ये अनुभवासाठी इंटर्नशिप केली.वामन हरी पेठे मध्ये मर्चन्टडायझर म्हणून काम पाहिले. त्यानंतर तिने पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय  सुरू केला, असून सोन्या-चांदीपासून ते रियल डायमंड दागिन्यांपर्यत नवनवीन प्रकार ती तयार करते.आताच्या तरूणींना त्यांच्या लग्नात किंवा सणसमारंभात दागिन्यांच्या सहाय्याने  नव्या पद्धतीने सजता यावे यासाठी नवनवीन डिझाईन तयार करून दागिने बनवण्याचेही काम करून देते..मराठी युवा युवतींना नोकरीतच स्वारस्य असते हा विचार खोडून काढण्याचे काम या दोघी बहिणीनी केले आहे.


                                 डाॅ.सायली आयरे दळवी

        नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिका  महिला व बाल कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या " आकांक्षीत महिला सक्षमीकरण " योजनेचे पाठबळ देऊन ज्वेलरी व्यवसायातील उत्तम कामगिरीबद्दल कु.किमया हिस मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे किमयाच्या कल्पकतेचे व जिद्दीचे पंख अधिक बळकट झाले असून या क्षेत्रातील अवकाशात उंच भरारी घेण्यासाठीचा आत्मविश्‍वास दुणावला आहे.तिच्या पालकांना आपण आपल्या मुलीला दिलेल्या व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्याचे कौतुक आहे पण समाजातील पालकांसाठी तसेच तरूणींसाठी हा एक आदर्श नाही का ? मुलींना अथवा महिलांना एका विशिष्ट चौकटीत जगण्याचे सल्ले देणार्‍यांना ही चपराक नाही का ?

          एक माणूस म्हणून या कुटुंबाकडे पाहतांना हे कुटुंब मला नेहमीच आदर्श वाटले आहे. या मुलींचे आजोबा आणि आजी यांच्यासोबत होते.त्यांच्या वार्धक्यात आपले आईवडील नोकरी सांभाळून त्यांची योग्य ती काळजी घेतात, त्यांची सेवा करतात हे त्यांनी जवळून पाहिले. आणि या मुलीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या आईवडिलांचा कित्ता गिरवत असल्याचे पाहून  अस्मादिकाने अनेकदा त्यांचे कौतुक केले आहे. हे एवढ्यासाठी इथे नमूद करावेसे वाटते कारण स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतांना माणूस म्हणून जगताना आवश्यक ते संस्कारही देण्याचे काम प्रत्येक घरात झाले तर सायली आणि किमया प्रत्येक कुटुंबात निर्माण होतील.मुलीसुद्धा कुटुंबाच्या आधार ठरू शकतात याची प्रचिती येईल. तूर्तास किमयाच्या किमयागिरीला सलाम करून थांबतो.


सुभाष लाड


                          श्री.विजय आयरे- गायक

                       सौ.स्नेहल आयरे - आदर्श  शिक्षिका


              मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते

                     प्रमाणपत्र स्विकारताना किमया आयरे.

पालकमंत्री मान.मंगलप्रभात लोढा, शिक्षणमंत्री मान. दिपक केसरकर,महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल,डाॅ सुधाकर शिंदे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त , आमदार यामिनी जाधव यांच्या उपस्थिती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Thursday, March 14, 2024

आजही शिपोशी शिखरावर !

 


       राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच इतिहास प्रस्थापित करीत पार पडले.त्या निमित्ताने शिपोशीचा ऐतिहासिक वारसा लोकांच्या पुढे मांडण्यात आला.पुरातन गांगो मंदिराबरोबर पेशवाई काळात देवळे येथून आलेल्या आठल्ये बंधुनी उभारलेले हरिहरेश्वर मंदिर,भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांना बाॅम्ब बनविण्याची कला शिकविणारे गणेश गोपाळ आठल्ये या मातीतले,केरळकोकीळचे संपादक कृष्णाजी आठल्ये,रत्नागिरीत पहिला छापखाना काढणारे जनूभाऊ आठल्ये हे ही शिपोशीचेच तर रत्नागिरीतील सहावी प्राथमिक शाळा शिपोशीत 1855मध्ये सुरू झाली तर त्या शाळेत शिकलेले गो.स.सरदेसाई हे रियासतकार म्हणून देशभर प्रसिद्धीस  पावले.ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनाही काही बुकं याच शाळेत शिकता आली.स्वातंत्र्यानंतर पडता काळ अनुभवणार्या शाहिरी कलेला ऊर्जितावस्थेत आणणारे शाहीर राजाभाऊ खामकरही याच मातीचं देणं.हा आणखी बराच इतिहास संमेलनाच्या माध्यमातून पुढे आला.या मातीचं मोठेपण या पिढीतही बघायला मिळतंय मात्र ते मांडण्याची संधी मिळाली नाही हे मनाला चटका लागून गेलं.
          ज्यांनी नवव्या साहित्य संमेलनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली ते श्री. हरेशजी जाधव काल पवईला माझ्या घरी  येऊन गेले.ते त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याकरीता मुंबईत आल्याचे कळले.पुतणी काय करते असे विचारताच त्यानी दक्षिणेकडील सिनेमात ती काम करते असे सांगत परवा अभिनेता सिद्धार्थ जाधव  घरी येऊन शुभेच्छा देऊन गेल्याचा फोटोही मला पाठवला.
' आपल्या मातीतील माणसांना आम्हीच मोठं करणार ' हा संदेश देणाऱ्या साहित्य संमेलनात आपण या मुलीला व्यासपीठ देऊन तिच्या जन्मगावच्या मातीकडून तिचा गौरव करण्याचे क्षण गमावल्याचे शल्य बोलून दाखवतांना "तुम्ही हे आम्हांला का सांगितले नाही ?" या माझ्या प्रश्नावर कोकणी माणसासारखे ठरलेले उत्तर दिले.
" माझ्याच पुतणीचं मीच कौतुक करावं हे उचित वाटलं नाही."
" पण कुणीतरी सांगितल्याशिवाय इतरांना कळावं कसं ? हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा नाही का ?"


       'आता वेळ निघून गेली,पुढच्यावेळी जरूर विचार करू या ' यावरती चर्चा थांबली.बोलता बोलता मी माध्यमावर ' तेजश्री जाधव ' शोधलं.दक्षिणेकडील चित्रपटात नाव कमवून प्रथमत:च ' बलोच ' या मराठी चित्रपटात काम करणारी तेजश्री जाधव हिच्याबाबत आलेले वृत्त वाचायला मिळाले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि अनेक रत्नांना जन्म देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून,भारतीय मुद्रण क्षेत्र,न्यायसंस्था ते कला - सांस्कृतिक इतिहास मांडायचा असेल तर शिपोशी गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.त्या मालिकेत आजच्या पिढीतील अभिनेत्री तेजश्री जाधव आपले स्थान पक्के करते आहे हे शिपोशीकरांना अभिमानास्पद आहे तसे संघालाही आहे.
        तेजश्रीला पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा !

सुभाष लाड 



तेजश्रीचा साखरपुडा नुकताच शिपोशीकरांच्या पद्धतीने पार पडला.






Sunday, March 10, 2024

आठवणी संग्रहीत करा .

 



       9 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची प्रसिद्धी संमेलनापूर्वीच विविध दैनिकातून आणि माध्यमाद्वारे होत आहे.कोकण मिडियाने आपल्या साप्ताहिकातून वेळोवेळी ते काम चोख बजावले आहे.नुकताच त्यांनी संमेलनाकरीताच एक प्रकाशित केला.तो वाचल्यानंतर संपूर्ण संमेलन डोळ्यासमोर उभे राहते.जे संमेलनात उपस्थित होते त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. ज्यांना उपस्थित राहता आले नाही त्यांना ' आपण एक पर्वणी चुकवली ' असेच वाटते.
         संमेलनात मान्यवरांची पुन्हा पुन्हा ऐकत राहावी अशी भाषणे झाली ती सुद्धा आपणास ऐकता यावीत याकरीता कोकण मिडीयाने एकाच ठिकाणी उपलब्ध केली आहेत.त्यासाठी आपल्याकडे स्कॅन क्यु आर कोड हे अॅप असणे आवश्यक आहे.आम्ही सोबत देत असलेल्या क्यु आरकोडवरून ही भाषणे ऐकता येतील







शिपोशीकरांचे मनापासून आभार !

 

        


         आज राजापूर तळवडे येथे एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता.काल सायंकाळी सात वाजेपर्यंत मी घरीच होतो.रेल्वेगाडीने  प्रवास करण्याची कोणतीही संधी नव्हती.मला आरक्षीत जागा मिळाली तरच मी प्रवास करतो.कारण सकाळी उठून मला कुठल्यातरी कामाला किंवा कार्यक्रमाला जाताना उत्साहात जायचं असतं.आणि आता तर 9 व्या साहित्य संमेलनात एवढी धावपळ झाली होती त्याचा शीण अजुनही  जाणवत असल्यानं मुलानं खाजगी गोवा बस मध्ये शयनकक्ष असलेली तिकीट काढली आणि रात्री 9 वा.चेंबूरला गाडीत बसलो.चांगली झोप मिळाली. म्हणूनच ताजातवाना चेहरा घेऊन सभा स्थळी पोहोचलो.निवेदक मला ओळखत होते.एरव्ही संघाचे अध्यक्ष म्हणून ओळख करणारे त्यांनी शिपोशी येथे संपन्न झालेल्या 9 व्या साहित्य संमेलनाचे सर्वेसर्वा म्हणून ओळख केली.सहज मला अपराधी वाटलं.कितिक हात इथे राबले.अनेकांच्या सूचनाही उपयुक्त ठरलेल्या असतात. मग संमेलनाचे श्रेय एकट्याला कसे देऊ शकतात? त्याशिवाय त्यांनी संमेलनात हजेरी लावली होती का ?बरे आठवे संमेलन यशस्वी करण्यात त्यांचाही सहभाग होता.ते ही संमेलन नेत्रदीपक झाले होते.या सर्व प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमानंतर निवेदकाकडून जाणून घ्यायची असे मी ठरविले.
           कार्यक्रम पुढे सरकत होता.माझ्या भाषणात मी पुस्तकाबाबत व लेखकाबाबतच बोललो कारण ते समयोचित होते. मात्र संपूर्ण कार्यक्रम शिपोशी आणि तिथे उपस्थित असलेल्या 9व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्याभोवती घुटमळला होता.पाहुण्यांमध्ये श्री. चंदूभाई देशपांडे होते. त्यांना संघाने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर सुरेश गुडेकर व आप्पा साळवी यांना अनुक्रमे अक्षर रत्न व बॅ.नाथ पै पुरस्कार दिला आहे.या तिघांचाही तिथे तळवडे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला गेला. त्यांनी केलेल्या भाषणात पुन्हा शिपोशीचा उल्लेख अपरिहार्यच होता.बरे गेल्यावर्षी याच गावाने याच कार्यकर्त्यांनी 8 वे साहित्य संमेलन यशस्वी केलं होतं.त्यांना पूर्व तयारीला वेळ कमी मिळाला होता तरीही त्यांनी जय्यत तयारी केली होती.शिपोशीतही मोठ्या संख्येने ही मंडळी आली होती.शिपोशीने भव्यता दाखवत सगळ्याच बाबतीत उत्तम कामगिरी केल्याचं कौतुक करून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता.
मी माझ्या अध्यक्षीय भाषणात " संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली तशी ती नेहमीच घेत असतात त्यांचे आभार मानण्याची गरज नाही कारण त्यांच्या उपक्रमात त्यांचे राबणे अपरिहार्य आहे परंतु ज्या गावात आपण संमेलन घेत असतो त्या गावातील वा परिसरातील लोकांनी हे संमेलन आमचे आहे असे समजून मैदानात उतरणे गरजेचे असते ते शिपोशी व परिसरातील लोकांनी अधिक उठावदार केल्याने 9 वे संमेलन अधिक लक्षणीय ठरले आहे.त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच ठरतील."असे म्हटले होते.पुढे जाऊन मी कौतुक करणे ही गरजच आहे पण जेव्हा कुठल्यातरी दुरच्या गावात गेल्यानंतर त्या संमेलनाचे कौतुक होते याचा अर्थ ते कौतुक शिपोशी व परिसरातील लोकांचे कौतुक असते आणि ते मी प्रत्यक्ष ऐकतो तेव्हा संघाचा अध्यक्ष म्हणून   मला आनंद होतोच त्यापेक्षा शिपोशी गावचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने ऊर भरून येतो.कालच्या श्री. रंगनाथ सप्रे यांच्या 'विंरगुळा' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मला तो आनंद लुटता आला म्हणूनही मी शिपोशीकरांचा आभारी आहे.




        त्याच दिवशी कोकण मिडीयाचाही अंक माझ्या हाती आला.कोकण मिडियाचा आमच्यावर वरदहस्त आहेच पण या 9 व्या साहित्य संमेलनाला त्यांनी डोक्यावर घेऊन नाचवले आहे कारण गेली आठ वर्षे  संघ जे पेरीत आला ते खऱ्या अर्थाने रूजले आहे याचा दाखलाच जणू शिपोशीकरानी दिला आहे हे कोकण मिडियाने ओळखून नेहमीपेक्षा जास्त पाने खर्च केली आहेत त्यामुळे कोकण मिडियाचेही आम्ही आभारी आहोत.



          फार काय आता दुसर्‍या आठवड्यातील या संमेलनाची चर्चा थांबत नाही.9 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची चर्चा यापुढेही होत राहिल आणि त्याचे श्रेय हे शिपोशीकर व परिसरातील लोकांनाच असणार आहे.पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद  
सर्वांना !