मूरचे उद्योजक श्री.संजय सुतारांचा फोन आला. "
येत्या सोमवारी आपणांस तळवड्यात जायचं आहे.तिथे आप्पा साळवी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालीय.त्यांनी तयारी दर्शविली आहे.तुम्ही एकदा सविस्तर समजून सांगितलत की नेमकं काय करायचय हे त्यांच्या लक्षात येईल." मी त्यांना सोमवारी येत असल्याचं सांगितलं तसं आमचे लांजातून साळवी सर,हटकर सर,मांडवकर सर , ओणीचे पाटील सर असे सारे मिळून तळवडे गाठले.पाचलातून किशोरजी नारकर व सिद्धार्थ जाधव सर आले होते. संजय सुतारांनी सर्वांचा परिचय करून दिला आणि विषयाकडे वळले. संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाबाबतची सर्व चर्चा ऐकल्यानंतर आप्पांनी तळवडे गावातून काही ठराविक लोकांना बोलावून घेतले होते त्यांचा कौल घेतला. त्यांचा होकार येताच आप्पा म्हणाले " एक चांगला कार्यक्रम आमच्या गावात होत असेल तर तो यशस्वी करण्याची जबाबदारी आम्ही घेतो.मात्र या महिन्याभरात आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतरच आपण तयारीला लागू.संमेलन यशस्वी झालं असंच समजा."आम्ही महिन्याभरात बाकीच्या तयारीत गुंतलो आणि पुन्हा संजय सुतारांचा फोन आला."आप्पांच्या सूनबाई बिनविरोध सरपंच पदी निवडून आल्या आहेत."
सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने आम्ही नवनिर्वाचित सरपंच सौ.गायत्री अमित साळवी यांचा सन्मान समारोह आयोजित केला.विजयी ग्रामसेवक सदस्य आणि तळवडे ग्रामवासिय मोठ्या संख्येनं जमलेले असल्याने आप्पानी संमेलनाचा विषय छेडला. ग्रामस्थांनी संमेलन पार पाडण्याची जबाबदारी घेतली. सौ.गायत्री साळवी यांनी सरपंच या नात्याने नेतृत्व करण्याचे मान्य करून संमेलन यशस्वी करण्याचा शब्द दिला.तसा पूर्वतयारीला वेळ कमीच होता.पण आप्पांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कामास सुरूवात केली.
कोणता माणूस कोणते काम अधिक चांगले करू शकतो याची माहिती आप्पांनी दिली व त्या लोकांची व्यवस्थापन समिती तयार केली.मग आमच्या बैठकांना जोर आला.जसजसे दिवस मागे सरकत होते तसतशी आप्पांची धावपळ वाढत चालली होती. कोणत्याही गोष्टीवर अनाठायी चर्चा न करता नेमकं काय करायचंय हे समजले की आप्पा म्हणायचे " ते काम होईल पुढे सांगा."
कमी कालावधी मिळत असल्याने ' कसं होणार ?' ही सुरूवातीची विवंचना मागे पडून ' आता चिंता नको ,होईल चांगलं ' या आशावादानं जोर धरला.माझ्याकडून फोन जाण्याऐवजी आता आप्पांकडून फोन यायला लागले.विशेषत: आप्पांनी जमेचे गणित मांडले होते ते त्यांच्या मनासारखे जुळत असल्याने ते खूष होते. बर्याच वेळेला संमेलन आमच्यासाठी नवीन आहे असं म्हणून बरेच जण संभ्रमीत असतात पण ज्याने सार्वजनिक कार्यक्रम स्वत: राबविलेले असतात त्यांना एकदा रूपरेषा सांगितली की ते कामाला लागतात.उदा.दीपप्रज्वलन करायचे आहे म्हटल्यावर समई लागणार हे वेगळं सांगायला नको.पण कोणती समई हवी अशी जेव्हा विचारणा होते तेव्हा समजायचे की ही व्यक्ती मांडवाखालून गेलेली आहे.आप्पांनी तर त्याही पुढे जाऊन अनेकांची लग्नं पार पाडून दिलेली आहेत हे लक्षात आले.
आप्पानी एक दिवस जवळ बसवून "आपण निमंत्रण कोणाकोणाला द्यायची ?" असा प्रश्न केला. आप्पा एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे मला ठाऊक होते तसेच त्यांचे संबंध सगळ्याच व्यक्तींशी होते हे ही मला माहित होते. आमचा संघ कोणताही राजकीय झेंडा खांद्यावर घेत नाही पण कोणाचा द्वेष करीत नाही.
"आप्पा आपल्या कार्यक्रमात कोणत्याही पाहुण्याची वाट पाहून वेळ वाया घालवायचा हे आपण टाळत असतो.राजकीय पुढारी वेळचे महत्व जाणत असूनही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना वेळेचे गणित जुळविता येत नाही.म्हणून त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे केव्हाही यावे.त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल."
आप्पानीही पसंतीची मोहोर चेहेऱ्यावर आणली.
मग आप्पांनी तशी निमंत्रण धाडली.सगळ्याच बाबतीत आप्पा संघाच्या विचारसरणीत तंतोतंत बसत असल्याने एवढ्या मोठ्या संमेलनात जराही राग रूसवा नाही किंवा गैरसमजही नाही.उलट तुमच्या संघात सुनील गुरवला घ्या,संदीप गुरव पण चांगला मुलगा आहे.अशा सूचना आप्पांकडून येतांना संघाबद्दलचा आपलेपणा दिसत होता.
आप्पा फार कमी बोलतात तसे पुढे पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तर जाणत्या धुरिणांसारखे नेमकं बोलून विषय कसा संपवायचा तसेच कोणत्या कामाचं कोणाला श्रेय द्यायचं हे त्यांच्या बरोबर लक्षात असतं.त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचना टाळाव्यात असे कधीच वाटले नाही.उलट उभ्या संमेलनातून आप्पांची उंची काय आहे याचा अंदाज आला. उभ्या परिसरात आप्पांच्या शब्दाला का किंमत आहे हे कळून आले.हात अनेकांचे लागले.पण त्या हातांना एकत्र आणणे,त्यांच्या कला सांभाळून त्यांना कार्यप्रवण करणे हे सगळं काम आप्पांनी केलं म्हणून संघाच्या ८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे हिरो आप्पा होते हे आम्ही प्रांजळपणे मान्य केले आहे.
वास्तविक संमेलन झाल्यानंतर आप्पांनी संघाशी जोडून राहण्याचं त्याच वेळेला जाहीरपणे सांगितलं होतं.बर्याच वेळेला आपण अमुक करू तमूक करू असं सांगून टाळ्या मिळवण्याचं काम अनकजण करतात. पण आप्पांचा स्वभाव पाहिल्यानंतर आप्पांनी किती जाणीवपूर्वक हे उद्गार काढले होते हे माहित असल्यानं नंतर संघानं घेतलेला माचाळ महोत्सव असेल किंवा रायपाटण येथील नदीजलपूजन कार्यक्रम असेल या प्रत्येक वेळी आप्पांच्या सहभागाची मी जी अपेक्षा बाळगली होती त्या ही पलिकडे जाऊन आप्पांनी हे कार्यक्रम कमालीचे यशस्वी करून मी संघाचा केवळ हितचिंतक नाही तर जबाबदार घटक असल्याचं दाखवून दिलं आहे.आप्पांसारखी सामाजिक कार्याला परमेश्वरी कार्य समजून झोकून काम करणारी माणसं ज्या संस्थेसोबत असतात त्या संस्थेकडून लोककल्याणकारी काम घडतच राहून संस्थेचा नावलौकिक व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
काही दिवसांपूर्वी संघाचे हितचिंतक व प्रसिद्ध उद्योजक श्री.संजय सुतार यांच्या आजिवली येथील साॅ मिलला आग लागली.आप्पांनी तात्काळ तिथे धाव घेऊन त्यांना मानसिक बळ दिले.काही दिवसांनी संघाचे कार्यकर्ते तिथे जाणार आहेत हे कळल्यावर आप्पाही त्यांच्यासोबत आले.पन्नास लाखाच्या नुकसानीनंतर एखाद्याला मानसिक आधार किती महत्वाचा असतो हे प्रत्यक्ष धंद्यातले चढउतार पाहिलेल्या आप्पांपेक्षा आणि कोण जाणू शकेल ? त्या बैठकीत आप्पांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सहज कथन केल्या तेव्हा आप्पांच्या पिकलेल्या केसांचे रहस्य समजले आणि ' पाय टाकूनी जळात बसल्या औदुंबराने ' आपलं मन मोकळं केलं पाहिजे असं वाटू लागलं.
काही दिवसांपूर्वी संघाचे हितचिंतक व प्रसिद्ध उद्योजक श्री.संजय सुतार यांच्या आजिवली येथील साॅ मिलला आग लागली.आप्पांनी तात्काळ तिथे धाव घेऊन त्यांना मानसिक बळ दिले.काही दिवसांनी संघाचे कार्यकर्ते तिथे जाणार आहेत हे कळल्यावर आप्पाही त्यांच्यासोबत आले.पन्नास लाखाच्या नुकसानीनंतर एखाद्याला मानसिक आधार किती महत्वाचा असतो हे प्रत्यक्ष धंद्यातले चढउतार पाहिलेल्या आप्पांपेक्षा आणि कोण जाणू शकेल ? त्या बैठकीत आप्पांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सहज कथन केल्या तेव्हा आप्पांच्या पिकलेल्या केसांचे रहस्य समजले आणि ' पाय टाकूनी जळात बसल्या औदुंबराने ' आपलं मन मोकळं केलं पाहिजे असं वाटू लागलं.
संघाचं नववं साहित्य संमेलन शिपोशी इथं संपन्न झालं. या संमेलनात आप्पा एका वेगळ्या भुमिकेतून संघाच्या व्यासपीठावर आल्याने संमेलनाची उंची वाढल्याचे आम्हांस समाधान मिळाले.संघ दरवर्षी काही पुरस्कार देत असतो.त्यासाठी संघाची पुरस्कार निवड समिती असते.त्यांनी निवड केलेल्या यादीत फारसा बदल करावा असे संघाच्या मुख्य समितीला वाटत नाही कारण या समितीने आवश्यक त्या निकषावर ही निवड केलेली असते.बॅ.नाथ पै हे कोकणी माणसाचे दैवत आणि त्यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्त्याला दिला जाणारा पुरस्कार हा आप्पांना दिला गेला.त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने आमच्याकडे अनेकांनी समाधान व्यक्त केलेच तसेच त्या कार्यक्रमाला अनेक लोकांनी हजेरीही लावली.
दोन दिवसांपूर्वी सहज गप्पा मारतांना ' आपण आयुष्यातील सुखी क्षण अनुभवीत आहोत.कारण माझा मुलगा जीव ओतून आपला व्यवसाय करतो आहे तर सुनेच्या रूपाने आमच्या घरी लक्ष्मी आली आहे." हिमाचलयाच्या उंच शिखरावर आपण निशाण गाडत आहोत अशी विजयी मुद्रा आप्पाच्या चेहर्यावर झळकत होती. आज अनेक पालक आपली मुले आम्हांस विचारत नाही किंवा सुन आली नी घर मोडलं अशी नाराजी घेऊन अनेक पालक आजुबाजुला दिसत असतांना आप्पांच्या सकारात्मक विधानाला मोठे महत्व आहे पण आपण आजही आपल्या ९४ वर्षांच्या वडिलांपुढे जातांना आज्ञाधारक मुलगा म्हणूनच जात आहोत हे सांगत नाहीत. कोणत्याही वयात बापाला बापासारखेच वागवायचे ही आपली संस्कृती आहे त्यात काय आहे वेगळेपण ? असं समजणारे बाप जिथे असतात तिथे ते संस्कार घेऊन मुलेही जन्मतात. हे भाग्य नसून हे कर्तृत्व आहे असे हे मान्य करून सर्वांनीच याचा बोध घ्यावयास हवा.
कष्टातच जगण्याचा आनंद शोधणाऱ्या , राजकारणात राहूनही सामाजिक साधन शुचितेला अधिक महत्व देतांना चिरकाल समाधानाची अपेक्षा करीत जगणाऱ्या सन्माननीय सुसंस्कृत आप्पा साळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना त्यांना आयुरारोग्य प्रदान करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
सुभाष लाड
अध्यक्ष
रा.लां.ता.ना.संघ,मुंबई
श्री.आप्पा साळवी - संपर्क ९४२११४०८२९
जन्मदिवस ३० मार्च



No comments:
Post a Comment