Friday, February 20, 2026

इतरांनाही मदतीचा हात देणारे रमेश काटकर


       माझ्या शाळेत जाणाऱ्या रस्त्यावरती मोठी देवराई आहे. त्याकाळी सकाळी सात ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच अशा वेळात शाळा भरायची. शाळेतून घरी येताना आणि दुपारी घरून शाळेत जाताना उन्हातूनच प्रवास करावा लागे. पायात चप्पल नव्हती. तापलेल्या जमिनीवरती भराभर चालत राईमध्ये आलो की जरा बरं वाटायचं. वृक्षवल्लीने गच्च असलेल्या त्या राई मधलं एक उंच झाड लक्ष वेधून घ्यायचं. त्याचा बुंधा दहा लोकांच्याही कवेत येणार नाही एवढा मोठा होता. आणि त्याची उंची देवराईचा कळस ठरावी इतकी वर गेली होती. त्या झाडावरती मधाची पोळी होती पण माकडांचाही अधिवास तिथे असायचा त्यामुळे त्या उंच झाडाकडे आवर्जून लक्ष जायचं. त्या गर्द सावलीत सुखाशीन जीवन जगायचं सोडून हे झाड राईच्या वर आल्याने त्याला ऊन पावसाचा तडाखा सहन करावा लागत होता. परंतु तेच त्याचे वैशिष्ट्य होते. त्याने जर इतर झाडांच्या सावलीत राहण्याचे ठरवले असते तर ते कोणाच्या नजरेत उठून दिसले नसते कारण ते सर्वसामान्य ठरले असते. आज ते झाड तिथे नाहीये परंतु माझ्या आठवणीच्या पटलावरती ते कायमचे कोरले गेले आहे. ते झाड माझा आदर्श आहे.


मनुष्य जीवनाचे हे असेच आहे. जी कर्तृत्ववान माणसं असतात त्यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळून येतं की त्यांचे जगणे सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते, खडतर असते आणि त्याच्यातच त्यांना आनंद असतो. खरंतर त्यांच्या त्या आगळ्यावेगळ्या जगण्यामुळेच ती जनमाणसांत उठून दिसतात.समाजाचा आदर्श ठरतात.


प्रत्येक काळातील वयोवृद्ध पिढी आपल्या मागून येणाऱ्या तरुण पिढी वरती नाराज असते. या तरुणांचं काही खरं नाही असं म्हणून आता यापुढे समाजाचं कसं होईल अशी चिंता वाहणारी ही वयोवृद्ध पिढी तरुणांना समजूनच घेत नाही. पण प्रत्येक काळातील ही तरुण पिढी ज्या वेळेला त्यांच्यावरती जबाबदारी येते त्या वेळेला चांगल्या विचारांची कास धरून समाजामध्ये वावरताना दिसते किंबहुना मागील पिढीपेक्षा काकणभर सरस काम करताना दिसते मात्र त्यांची वाटचाल आपल्याला वेळीच ओळखता आली पाहिजे तसंच या तरुणांना आवश्यक तेव्हा स्वातंत्र्यही दिले पाहिजे.


आज-काल कसाही पैसा कमवायचा आणि मिळालेला पैसा स्वतःच्या अमर्यादित व अनावश्यक गरजांसाठी खर्च करायचा त्यातून आपण कोणीतरी वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करणारी तरुण मंडळी दिसते. वैयक्तिक जीवनाकडे अधिक लक्ष देणारी ही तरुण मंडळी सामाजिक कार्यापासून फार दूर असलेली आढळते याचा परिणाम वेगवेगळ्या सामाजिक संस्था वरती झाला असून अनेक सामाजिक संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक समाज धुरिण आता आपला समाज कोणत्या दिशेला जाईल या चिंतेत वावरताना दिसतात. असं हे वरवरच चित्र असलं तरी आजही अनेक संस्था बदलत्या दुनियेप्रमाणे विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून काम करताना दिसतात त्यापैकी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही एक संस्था आहे याचा मला अभिमान वाटतो.

सन १९५३ मध्ये गावच्या विकासाचा ध्यास घेऊन मुंबईत निर्माण झालेली ही संस्था पंच्याहत्तरीकडे वाटचाल करीत आहे. ही वाटचाल नुसतं वय सांगणारी नसून तर गेल्या पंधरा वर्षात या संस्थेने राजापूर आणि लांजा तालुक्यात शिक्षण, पर्यावरण, साहित्य या क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केल्यामुळे आपला नावलौकिक रत्नागिरी जिल्ह्या बाहेरही पोहोचवलेला आहे. त्याला कारण या संस्थेकडे असलेली निस्वार्थ भावनेने काम करणारी तरुण कार्यकर्त्यांची फळी. हे सर्व कार्यकर्ते मुंबईत किंवा गाव खेड्यात आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिकपणे मेहनत करत असतात. आणि रिकाम्या वेळेत सामाजिक कार्याचा वाहून घेतात. या संस्थेत सर्वानुमते एखाद्या उपक्रमाच्या बद्दलची चर्चा केली जाते त्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामाचा आराखडा तयार केला जातो. प्रत्येकाच्या वेळेचे नियोजन करून जबाबदारी दिली जाते. प्रत्यक्ष उपक्रम करताना हत्तीची ताकद आणि वाघाची चपळाई घेऊन हे कोणतेही काम करताना दिसतात. जात धर्म पंथ यांच्या सीमा ओलांडून हे मानव्याचा जप करीत कोणत्याही कामाला प्रतिष्ठा देत राबताना दिसतात. स्वतःचं शिक्षण आणि कामातील हुद्दा हे विसरून जातात आणि मला हे काम करायचे आहे, हा उपक्रम मला सिद्धीस न्यायचा आहे एवढाच ध्यास घेऊन हे वावरत असतात. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही सर्व मंडळी ज्या वेळेला साहित्य नगरी सजवण्यासाठी एकजुटीने एकत्र येतात त्यावेळेला खरेखुरे भगीरथाचे पुत्र इथे वावरताना दिसतात.


त्यातील एक भगिरथाचा पुत्र कोंडगे गावचा सुपुत्र श्री रमेश रघुनाथ काटकर. या कोंडगे गावात अनेक समाज धुरीण होऊन गेले ज्यांनी गावाचा विकास करणसाठी आपले आयुष्य वेचले. मला ज्यांचा सहवास लाभला ते पा.भि. चव्हाण, आप्पा बारस्कर, गणपतराव कदम, दादा विश्वासराव, गो.ह.जाधव गुरुजी ,गो.ना. चव्हाणसर, एकनाथ विश्वासराव, विश्वनाथ चव्हाण आणि अशी अनेक व्यक्तिमत्त्व माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात. याच कर्तृत्ववान व्यक्तींनी निर्माण केलेल्या श्री रामेश्वर विद्यालयात शिक्षण घेऊन रमेश काटकर मुंबईला आले. मुंबई महानगरपालिकेत वेगवेगळ्या हुद्द्यांवर प्रामाणिकपणे काम करताना आपण काही समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून ते गावातील विविध संस्थांमध्ये काम करतात. काही वर्षांपूर्वी ते राजापूर लांजा तालुका नागरिक संघाशी जोडले गेले. इथे त्यांना सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या तरुणांची जोड मिळाली आणि आज ते संघातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आले आहेत.

नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. टिटवाळा जवळील म्हसकळ गावात जीवन संवर्धन फाउंडेशनच्या बेघर मुलांच्या आश्रमात ते आपल्या कुटुंबीयांसमवेत व मित्रमंडळी समवेत गेले. तिथल्या मुलांना त्यांनी गोडधोड पदार्थ असलेले रुचकर जेवण दिले. त्यांच्याच पंक्तीला बसून सर्वांनी जेवण केल्यानंतर त्या मुलांना टी-शर्ट व खाऊ वाटप केले. आपल्या ताटातला एक घास गरजूंना देण्याचा मानवतेचा संस्कार जोपासणारे रमेश काटकर गेली चार वर्ष या आश्रमास मदत करत असतात. आपण जगत असताना इतरांनाही जगण्यासाठी हात द्यावा ही भावना जेव्हा सर्वथैव रुजेल तेव्हा कुणीही दुःखी असणार नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सुख शांतीचे जीवन जगतो आहोत असे म्हणता येईल.

रमेश काटकर यांच्यासारखी माणसं जेव्हा मला दिसतात त्यावेळेला मला माझ्या देवराईतील त्या उंच गेलेल्या झाडाची आठवण होते.

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापुर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई


अभिप्राय --------

आजच्या दिवसाचे उत्सव मुर्ती श्री रमेशजी काटकर सर ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांनी अगदी भरभरून दीर्घायुष्याची प्रार्थना केली ज्यांना अनेकांनी शुभेच्छा बहाल केल्या आहेत त्यांनी आपल्या कुटुंबापासून ते समाजातील विविध घटकां पर्यंत असलेली नाळ जोपासली वृध्दिंगत व समर्पित केली. एकाहुन एक माणसें आयुष्यात जोडत असतात मानवता धर्म अखंडपणे जोपासत आहेत म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे .

                मी त्यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघा मध्ये सहभागी असल्यामुळे मलाही त्यांच्या कामकाजाची थोडीफार ओळख आहे. सुभाषजी लाड सरांनी गेल्यावर्षी एक लेख लिहिला होता त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीची माहीत मिळाली खरंच जर आपल्या समाजाला अश्या होतकरू निर्भीड पणे एक हात मदतीचा म्हणून हवाच असतो आज समाजासाठी गोरगरिबांसाठी मोलाची मदत करतं असताना दिसून येतात  आपला अमूल्य वेळ ते सत्कारणी लागेल अशी धारणा मनात आणुन सामाजिक बांधिलकी जपत आहेत  आज मोठ्या पदावर कार्यरत असुनही आपलं साधेपण जपत आपल्या माणसांना जपताना दिसतात  देवराई तील उंच झाडा प्रमाणे त्यांचे जीवन आहे तरीही सुख  सोयींमध्ये मग्न न राहता ते समाजात सहकार्य करताना दिसून येतात आजकाल आपल्याला अशी कमी माणसं पहायला मिळतात आजही काही माणसं पद मान सन्मान मलाही हवा म्हणून अडून बसतात. आपल्या हातून होत असलेली समाजाप्रती कामांमध्ये हात ही आणि साथही देत नाहीत .आज ते समाज आपला आणि आपणं समाजाचे अशा प्रकारे आपले जीवन व्यथीत करुन एक समाजाचा सुजाण नागरिक म्हणून उदयास येत आहेत . अशा व्यक्तीमत्वाची जेव्हा दखल घेतली जाते तेव्हा त्यांनी केलेल्या कामकाची पोचपावती समाजापर्यंत नक्कीच पोहचते  ते आपल्या कामाचा कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने सहभाग दर्शवताना दिसुन येतात. समाजात अशी काही माणसे असतात त्यांना त्यांची ओळख सांगवी लागतं नाही   त्यांचें असलेले समाजाप्रती आर्थिक मदत शैक्षणिक क्षेत्रात केलेली मदत एक कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून वरीष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत.  आज एक श्री सुभाषजी लाड सरांनी लेख लिहिला आहे तो वाचून त्यांच्या बद्दल अजुनच आदर वाढला आहे एक प्रेरणा प्रोत्साहन देणार व्यक्तिमत्व म्हणून श्री रमेशजी काटकर सर आहेत. त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे आजही त्यांना त्यांच्या गावाचा आदर आणि  तो जपणं म्हणून सतत कार्यशील असणं खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे  आज सर्वांकडून त्यांच्या वर अभिष्टचिंतनाचा वर्षाव होत आहे म्हणून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद सर 🙏🌹🖊️

अस्मिता मांडवकर,माचाळ