Thursday, October 16, 2025

सुलेखनकार पद्मश्रीअच्युत पालवांना ऐकायला जाऊ या !



नमस्कार !

        आपण मोडी परिवाराशी जोडलेले आहात. कुणी लेखक आहे, कुणी कवी आहे, कोणी मोडी अभ्यासक आहे तर कोणी इतिहासकार आहे. कुणी देणगीदार आहे कोणी जाहिरातदार आहे. कोणी हितचिंतक आहे तर कोणी वाचक आहे. कुणीतरी मोडी परिवारातील मित्रांचे मित्र आहे असा हा मोठा परिवार आहे. त्यातील कुणी गेल्या ३५ वर्षापासून जोडले आहे तर कोणी गेल्या सहा वर्षात जोडले आहे. प्रत्येक वर्षी हा कारवा वाढत चाललेला आहे आणि म्हणून मी प्रथमच आपणा सर्वांना मोडी परिवारात जोडल्याबद्दल धन्यवाद देतो आणि येत्या दिवाळीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.

        मित्रहो, यावर्षीचा सोळावा दिवाळी अंक शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर पश्चिमेतील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील धुरु सभागृहामध्ये प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन समारंभ नेहमीपेक्षा काहीसा वेगळा आहे. कारण गेली अनेक वर्ष मोडी दर्पण दिवाळी अंकाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ सजविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युतजी पालव यांना यावर्षी भारत सरकारने ' पद्म श्री ' पुरस्कार देऊन गौरवित केले. गेली ३३ वर्षे ते मोडी परिवाराशी जोडलेले आहेत.

 त्यामुळे त्यांना मिळालेला भारत सरकारचा 'पद्म श्री' पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या मोडी परिवारातर्फे त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी या प्रकाशन समारंभाचे औचित्य साधण्यात आलेले आहे. लालबागच्या चाळीत जन्मलेला हा कोकणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून सुद्धा निगर्वीपणे जमिनीवर येऊन आमच्यासारख्या साध्या माणसांमध्ये साधा माणूस म्हणून वावरतो ही एक कौतुकाची बाब आहे. या माणसाचा जीवनपट तर पुढच्या पिढीला आदर्श असणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आपण या समयी आयोजित केलेला आहे. मुलाखत घेणारे पण कलाक्षेत्रातील दिग्गज आहेत. चित्रकार लेखक कवी विजयराज बोधनकर आणि कला अभ्यासक निकिता भागवत या अच्युत पालव यांना बोलते करणार आहेत.


         प्रकाशन समारंभ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ता चे माजी प्रमुख संपादक तसेच माजी खासदार सन्माननीय कुमारजी केतकर हे उपस्थित राहणार आहेत. अर्थात त्यांचेही विचार ऐकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे.

असा हा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात दादर येथे ठेवला आहे. दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु ट्रस्टच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झाले आहे. सभागृह वातानुकूलित असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ते आरामदायी ठरणार आहे. कार्यक्रम आटोपशीर असणार आहे. दूरवरून आलेल्या लोकांना घरी वेळेत जाण्याची चिंता करण्याची गरज नाही. कार्यक्रमानंतर दादर परळ भागात प्रसिद्ध असलेल्या मयूर कॅटर्रसच्या जेवणाचा आस्वाद घेऊन आपण लगेचच पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या व मध्य उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे कडे जाऊ शकता.

विशेष म्हणजे याचवेळी कोकणातून प्रसिद्ध होणाऱ्या 'कोकण मीडिया' साप्ताहिकाचा कोकणातील खाद्य संस्कृतीवर प्रकाश टाकणारा कोकण मीडिया हा दिवाळी अंक प्रकाशित होणार असल्यामुळे तोही अंक आपल्याला उपलब्ध असेल. कोकणातील गृहिणींचे अर्थात बचत गटात काम करणाऱ्या महिलांनी बनवलेला साजूक तुपातला दिवाळीचा फराळ 'कोकण अमृत' या संस्थेतर्फे इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

         मोडी परिवाराशी जोडलेल्या सर्व आमच्या बंधू-भगिनींना आमची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करूया. आपला मोडी परिवार आता मोठ्ठा झाला आहे हे दाखवून देऊया.

आपला

सुभाष लाड

संपादक

मोडी दर्पण


Monday, October 13, 2025

चला अक्षरयात्रेचा आस्वाद घेऊ !

       

       मोडी दर्पण दिवाळी अंक २०२५ च्या प्रकाशन समारंभाच्या पूर्वतयारीसाठी आज दादरला दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये गेलो होतो. आज माझ्यासोबत थोडा वेळ विवेक मयेकर ही होते. यतीन कामथे यांच्याशी चर्चा झाली. आमचे प्रमोद मेस्त्री उद्या सकाळी बॅनर लावण्यासाठी च फ्रेम घेऊन येतील. त्या प्रेम टेम्पो मधून उतरवण्यासाठी त्यांना मदत करण्याची व्यवस्था करा अशी सूचना देऊन मी वाचनालया बाहेर पडलो. आणि पंढरीच्या वारी प्रमाणे मी शिवाजी मंदिर मधील मॅजेस्टिक बुक डेपोकडची वाट धरली. दरवर्षी दिवाळीत दिवाळी अंकांची योजना मॅजेस्टिक बुक डेपो मार्फत राबवली जाते. दर्जेदार पाच दिवाळी अंक आणि त्याबरोबर एक मोफत पुस्तक अशा त्या योजनेसाठी प्रत्येक वर्षी वाढत्या महागाई प्रमाणे त्या योजनेचे ही दर बदलत असतात. गेली अनेक वर्ष न चुकता माझा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी किमान पाच दिवाळी अंक माझ्या घरात येतात. मोडी दर्पण हा गेले कित्येक वर्षे घरात ठाण मांडूनच आहे त्यालाही त्यालाही इतर अंकांची सोबत मिळते. या योजनेचे चौदाशे रुपये आहे आणि घरपोच करण्यासाठी दीडशे रुपये अधिकशे भरावे लागतात. मध्य रेल्वेची वाढती गर्दी पाहता दिवाळीच्या दरम्यान दादरला येऊन अंक घेऊन जाण्यापेक्षा या वेळेला मी पोस्टाचे पैसे धरुन १५५० रु.भरले. गोविंद तळवळकरांचे 'व्यक्ती आणि वाङमय'हे पुस्तक ताब्यात घेतले आणि मी माझा पवईच्या घरचा पत्ता लिहून दिला. अजून बरेच दिवाळी अंक दाखल व्हायचे आहेत हे चित्र माझ्या नजरेने हेरले. आमचा मोडी दर्पण सुद्धा एक-दोन दिवसात येईल असे त्यांना सांगून मी मॅजेस्टिकच्या बाहेर पडलो. बाहेरच मला सुनील देवळेकर भेटले. त्याने मोडी दर्पण ची चौकशी करतात.येत्या शनिवारी १८ ऑक्टोबर ला संध्याकाळी साडेपाच वाजता दुरु सभागृहामध्ये या असे त्यांना निमंत्रण दिले.

           शिवाजीमंदिरच्या दारातच रस्त्याच्या बाजूला आकाश कंदीलांचे प्रदर्शन मांडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे असलेले अनेक कंदील मी तिथे पाहिले त्यातला एक कंदील मला फारच आवडला. चौकशी करता तो एकच राहिलेला आहे हे समजताच तो माझ्यासाठीच आहे असे सांगून मी पाचशे रुपये जी पे च्या माध्यमातून दिले. माझ्याकडचा कंदील बघून इतर कोणी चौकशी केली तर माहिती असावी म्हणून काही कंदिलचे मी फोटो घेतले. रुपये तीनशे ते पाचशे पन्नास अशा किंमतीचे हे सुंदर कंदील विकण्याच्या कामात एक कॉलेज तरुणी मदत करतेय हे पाहून समाधान वाटले. मराठी माणसाला उद्योगाची आवड नाही अशी ओरड असताना काही मुलं उद्योगाकडे वळत आहेत हे चित्र आशादायी आहे.' थांबा काका मी तुम्हाला फोटो काढून देते असे म्हणत काही क्षणात माझ्या चलभाषमध्ये काही  कंदीलाना बंदिस्त केले. पुढे दिलेले फोटो हे त्या मुलीने काढलेले आहेत.

          आपण दादरला जातो आहोत असे घरी सांगितल्यानंतर पटकन एक यादी आपल्या घरातून आपल्याला मिळते. मला त्या यादीची आठवण झाली आणि मी त्याच फुटपाथने मागे आलो. पाटील मारुती मंदिराच्या गल्ली जवळच एक वृद्ध स्त्री पणत्या आणि रांगोळी घेऊन बसलेली पाहिली. बायकोने मला पाच पणत्या आणायला सांगितल्या होत्या. पण मी बारा घेऊन आलो. बायकोला खुश ठेवण्याचा मंत्र आपण कधी विसरून चालत नाही. मात्र आपण दिलेली किंमत चुकून सुद्धा घरी सांगायचे नाही.' तुम्हाला भाव करताच येत नाही ' असे म्हणून आपल्या बाजार खरेदीतल्या ज्ञानाला ' ढ ' शेरा मिळतो. सहा पणत्यांचं एक पॅकेट पन्नास रुपयाला म्हणजे अगदी स्वस्त आहे असे मला वाटले म्हणून मी दोन पाकिटे घेतली. आजकाल खिशात पैसे न वागवण्याची सवय झाल्यामुळे बऱ्याच वेळेला अडचण होते. आजीबाई मला पैसे द्या म्हणाले तर अडचणच होईल. पण आजीबाईंनी तात्काळ क्यू आर कोड चा कागद माझ्यासमोर ठेवला आणि माझा पैसे देण्याचा प्रश्न मिटला.

 आज-काल दादर पश्चिमेला रेल्वेतून बाहेर पडल्यानंतर तुफान गर्दी असते पण रेल्वेने दादरचे प्लॅटफॉर्म टिळकरीच्या रस्त्यावर पादचारी पुलांनी जोडल्यामुळे गर्दी टाळून आपण पटकन दादर सार्वजनिक वाचनालयाकडे येऊ शकतो. कोतवाल मैदानाच्या समोरच्या बाजुला आयडीएलकडे उतरणाऱ्या पायऱ्या दादर सार्वजनिक वाचनालय, छबीलदास हायस्कूल कडे जाण्यासाठी हा बाहेरचा मार्ग सोयीचा ठरलेला आहे. मी त्याच मार्गावरून जात असताना माझ्या मोबाईल वरती मेसेज आल्याचा मला आवाज आला. बराच वेळ मोबाईल हातात घेतला नसल्यामुळे मोह आवरला नाही. पाहिले तर प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण डिझाईन वाल्याने पाठवले होते. सगळं काही बरोबर आहे की खात्री करून पहिले अच्युत पालवसाहेबांकडे पाठवले.तसाच मग बोलत बोलत आठ नंबरच्या फलाटावरील गर्दीत घुसलो.

         आता हे निमंत्रण मोडी दर्पण च्या सर्व वाचकांसाठी पाठवत आहे. यावर्षी दादर सार्वजनिक वाचनालयाने आमच्या सोबत कार्यक्रम करण्याचे मान्य केल्याने आम्हाला एक मध्यवर्ती जागा उपलब्ध झाली. त्यामुळे शनिवारच्या कार्यक्रमाला आपणास वेळेवर उपस्थित राहण्यास अडचण असणार नाही. आपण शक्यतो साडेपाच वाजताच कार्यक्रम सुरू करणार आहोत. सुरुवातीलाच प्रकाशनाचा कार्यक्रम असेल.

आमचा प्रसिद्धी सहकारी कोकण मिडिया सुद्धा त्याचवेळी प्रकाशित होउल.यावेळी जेष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी प्रमुख संपादक,माजी खासदार माननीय कुमार केतकर यांचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला मिळेल. त्यानंतर ' पालव ते पद्म श्री ' हा मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे. लालबागच्या मध्यमवर्गी कुटुंबात जन्मलेले, पोरवयातच अक्षरात सौंदर्य आहे याचा शोध घेणारे, त्यासाठी एका हातात रंगाचा डबा आणि दुसऱ्या हातात ब्रश अशा अवतारात मुंबईतल्या पुलांचे कठडे, चाळींच्या भिंतीवरती अक्षरे रंगवताना रंगारी म्हणून परिचित झालेले कोकणचे सुपुत्र अच्युत पालव अक्षरांचेच वेड घेऊन पुढे जे.जे.कला महाविद्यालया मध्ये शिक्षण घेतात. मोडी अक्षरांवरती प्रबंध लिहितात, हळूहळू ते सुलेखनकार म्हणून प्रसिद्धीस येतात. आणि जगातल्या प्रतिष्ठित चित्रकारांमध्ये जाऊन बसतात. उभ्या आयुष्यभरात एक सुलेखनकार म्हणून कलेच्या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवतात तेव्हा भारत सरकार त्यांना पद्मश्री ही पदवी देऊन गौरवित करते. त्यांचा हा गौरव मोडी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणूनच त्यांचा यथोचित सन्मान करताना त्यांचा हा सुलेखन प्रवास जगापुढे ठेवावा म्हणून हा मुलाखतीचा अट्टाहास.

         आमच्याच परिवारातील ज्येष्ठ चित्रकार, लेखक कवी आणि विशेषता कोकण भूमी वरती प्रेम करणारे विजयराज बोधनकर संवादक म्हणून काम करणार आहेत त्यांना साथ देणार आहेत त्याला अभ्यासक निकिता भागवत. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर लेखक, आमचे जाहिरातदार, हितचिंतक आणि मोडीवाचक उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थाने अक्षर मेजवानी ठरावा असा हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रम आटोपशीर असला तरी इथून लांबवर जाणाऱ्या लोकांना घरी पोहोचेपर्यंत पोटात कावळे गर्दी करू शकतात याची आम्हास कल्पना असल्यामुळे आम्ही आपणास तसेच पाठवणार नाही. कारण हा कार्यक्रम एक स्नेहमिलन कार्यक्रम आहे. मोडीवाचक म्हणून वर्षातून एकदाच आपण एकत्र येतो तो आनंद पुरेसा लुटता यावा याची आम्ही काळजी घेणार आहोत.

         दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ गुरु ट्रस्टस आणि मोडी लिपी मित्र मंडळ आपली येत्या शनिवारी अर्थात १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अक्षर यात्रेचा आस्वाद घेण्यासाठी धुरू सभागृहामध्ये वाट पाहत आहेत.

आपला

सुभाष लाड

संपादक

मोडी दर्पण 

 ****** विशेष सूचना :-********

## दिवाळी फराळ 

कार्यक्रम स्थळी कोकणातील महिलांनी बनवलेले साजूक तुपातील दिवाळी फराळातील विविध पदार्थ असलेला विक्री कक्ष कोकण अमृत या संस्थेतर्फे मांडण्यात येणार आहे. त्यांना फोन करून आपण आपली मागणी नोंदवू शकता.संपर्क:

सौ प्रांजल कोलते 

८६५२२०४५९९

८४२२०८४९९९




Sunday, October 12, 2025

📕✒️📕✒️दिवाळीसाठी अक्षर खजिना.📕✒️📕✒️📕✒️


      ही दिवाळी आपणास सुख समृद्धी देऊन जावो अशी प्रार्थना करतांना मोडीदर्पण दिवाळी अंक आपणास कोकणातील साधू संतांची माहिती देणारी आहे त्याच बरोबर ललित,कथा आणि कविता ही सदरे सुध्दा आपणास वेगळेपण देतील.नेहमीप्रमाणे आकर्षक मुखपृष्ठ असणार आहेच पण यावर्षी सदर चित्रकारांना भारत सरकारने पद्मश्री या बहुमानाने गौरविले असल्याने मोडी दर्पण चे सजावट मूल्य खचितच वाढले.अर्थात  पद्मश्री अच्युत पालव यांची कलाकृती आपल्या संग्रहात असणार आहे.
          आपण आजच अंक नोंदणी करावी ही विनंती.

सुभाष लाड 
संपादक 
मोडीदर्पण २०२५

Thursday, October 9, 2025

🌷👏🏿🌷संवेदनशील. शिवाजी सयाजी पेडणेकर 🌷👏🏿🌷

               


          कधी नव्हे तो महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात चांगला पाऊस पडतोय याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खुललेल्या शेतकऱ्यांचा काही क्षणातच कोमेजून गेला नव्हे त्याच्या डोळ्यांतून ओघळू पाहणाऱ्या अश्रूमुळे त्याचा चेहरा काळवंडून गेला. ' जगाचा पोशिंदा ' या एकाच नामाभिदानामुळे अस्मानी संकटाचीही पर्वा न करता, उत्पादनाचा बाजारभाव पडला तरी फारशी खळखळ न करता पुन्हा मातीत नांगर धरुन हे ही दिवस जातील या एकाच आशेवर कष्ट करीत राहणारा शेतकरी यावेळी मात्र हतबल झालेला दिसला. दूरदर्शन वरील महापुरांने भरून वाहून जाणारी उभी पिके पाहताना, स्वर्गीय सुख देणारी त्यांची चंद्रमौळी पाण्यात मिसळून जातांना ज्यांने पाहिले त्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून गेले. माझ्या शेतकरी राजाच्या मदतीसाठी जाणे ज्याला गरजेचे आहे असे वाटले तो तो पुढे धावला.काही संस्था पुढे आल्या आणि सरकारने सुद्धा आपण सक्षमपणे पाठीशा उभे आहोत असे सांगून सरकारी यंत्रणा काम करु लागली.

                नुकताच कुणीतरी वाॅटस अप वर टाकलेला फोटो पाहिला.फोटोमध्ये चिपळूणचे उपविभागीय अधिकारी असून शिवाजी सयाजी पेडणेकर त्यांच्या मित्रांसोबत त्या अधिकाऱ्यांकडे धनादेश देत असल्याचे दिसले.मी शिवाजी पेडणेकरांना फोन करून सविस्तर माहिती विचारली.मी त्यांचे मनापासून कौतुक केले.


           मध्यमवर्गीय कुटुंबातील शिवाजी पेडणेकर यांचा अनेक सामाजिक संस्थात वावरत आहे. जमेल तितका वेळ आणि  पैसा देण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने ते जिथे वावरतात तिथे स्वतःचे अस्तित्व जाणवेल इतका प्रभाव  टाकला आहे.हे करीत असतांना मी कसा आहे किंवा मी हे केले हे सांगण्यासाठी ते वेळ खर्च करीत नाहीत.किंवा कुठल्या पदाची वा प्रसिद्धीची हाव धरीत नाहीत.त्यामुळे त्यांच्या सहवासातील लोकांनाही शिवाजी पेडणेकर यांच्या दातृत्वाची माहिती असणे शक्य नाही.ते राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे हितचिंतक संघास असल्याचा अभिमान वाटतो 

          गेल्या महिन्यात दोन महिन्यात महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे आपातग्रस्त लोकांचा आक्रोश ऐकून ते हेलावून गेले.कोलमडून गेलेल्या हजारो लोकांचे अश्रू पुसावे एवढा आपला हात मोठा नाही पण दिलासा देण्याची तरी आपली ओंजळ रिकामी करण्याचे औदार्य असणाऱ्या शिवाजी पेडणेकर आणि धनादेश पुस्तिका बाहेर काढली आणि एका धनादेशावरती लिहिले मुख्यमंत्री सहायता निधी, महाराष्ट्र राज्य आणि खाली रक्कम लिहिली दोन लाख बारा हजार. ते तसेच उठले आणि चिपळूण मधील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जाऊन तो धनादेश सुपूर्द केला. अशी परिस्थिती आणि कोणावर येऊ नये अशी प्रार्थना परमेश्वराकडे मनात करून आपण काही केलेच नाही अशा अविर्भावात ते कार्यालयातून बाहेर पडले.

         शिवाजी पेडणेकर यांच्या संवेदनशीलतेला आम्सही सलाम करतो.

       सुभाष लाड 

          अध्यक्ष 

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 


शिवाजी सयाजी पेडणेकर (09765856992)