मोडी दर्पण दिवाळी अंक २०२५ च्या प्रकाशन समारंभाच्या पूर्वतयारीसाठी आज दादरला दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये गेलो होतो. आज माझ्यासोबत थोडा वेळ विवेक मयेकर ही होते. यतीन कामथे यांच्याशी चर्चा झाली. आमचे प्रमोद मेस्त्री उद्या सकाळी बॅनर लावण्यासाठी च फ्रेम घेऊन येतील. त्या प्रेम टेम्पो मधून उतरवण्यासाठी त्यांना मदत करण्याची व्यवस्था करा अशी सूचना देऊन मी वाचनालया बाहेर पडलो. आणि पंढरीच्या वारी प्रमाणे मी शिवाजी मंदिर मधील मॅजेस्टिक बुक डेपोकडची वाट धरली. दरवर्षी दिवाळीत दिवाळी अंकांची योजना मॅजेस्टिक बुक डेपो मार्फत राबवली जाते. दर्जेदार पाच दिवाळी अंक आणि त्याबरोबर एक मोफत पुस्तक अशा त्या योजनेसाठी प्रत्येक वर्षी वाढत्या महागाई प्रमाणे त्या योजनेचे ही दर बदलत असतात. गेली अनेक वर्ष न चुकता माझा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी किमान पाच दिवाळी अंक माझ्या घरात येतात. मोडी दर्पण हा गेले कित्येक वर्षे घरात ठाण मांडूनच आहे त्यालाही त्यालाही इतर अंकांची सोबत मिळते. या योजनेचे चौदाशे रुपये आहे आणि घरपोच करण्यासाठी दीडशे रुपये अधिकशे भरावे लागतात. मध्य रेल्वेची वाढती गर्दी पाहता दिवाळीच्या दरम्यान दादरला येऊन अंक घेऊन जाण्यापेक्षा या वेळेला मी पोस्टाचे पैसे धरुन १५५० रु.भरले. गोविंद तळवळकरांचे 'व्यक्ती आणि वाङमय'हे पुस्तक ताब्यात घेतले आणि मी माझा पवईच्या घरचा पत्ता लिहून दिला. अजून बरेच दिवाळी अंक दाखल व्हायचे आहेत हे चित्र माझ्या नजरेने हेरले. आमचा मोडी दर्पण सुद्धा एक-दोन दिवसात येईल असे त्यांना सांगून मी मॅजेस्टिकच्या बाहेर पडलो. बाहेरच मला सुनील देवळेकर भेटले. त्याने मोडी दर्पण ची चौकशी करतात.येत्या शनिवारी १८ ऑक्टोबर ला संध्याकाळी साडेपाच वाजता दुरु सभागृहामध्ये या असे त्यांना निमंत्रण दिले.
शिवाजीमंदिरच्या दारातच रस्त्याच्या बाजूला आकाश कंदीलांचे प्रदर्शन मांडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे असलेले अनेक कंदील मी तिथे पाहिले त्यातला एक कंदील मला फारच आवडला. चौकशी करता तो एकच राहिलेला आहे हे समजताच तो माझ्यासाठीच आहे असे सांगून मी पाचशे रुपये जी पे च्या माध्यमातून दिले. माझ्याकडचा कंदील बघून इतर कोणी चौकशी केली तर माहिती असावी म्हणून काही कंदिलचे मी फोटो घेतले. रुपये तीनशे ते पाचशे पन्नास अशा किंमतीचे हे सुंदर कंदील विकण्याच्या कामात एक कॉलेज तरुणी मदत करतेय हे पाहून समाधान वाटले. मराठी माणसाला उद्योगाची आवड नाही अशी ओरड असताना काही मुलं उद्योगाकडे वळत आहेत हे चित्र आशादायी आहे.' थांबा काका मी तुम्हाला फोटो काढून देते असे म्हणत काही क्षणात माझ्या चलभाषमध्ये काही कंदीलाना बंदिस्त केले. पुढे दिलेले फोटो हे त्या मुलीने काढलेले आहेत.
आपण दादरला जातो आहोत असे घरी सांगितल्यानंतर पटकन एक यादी आपल्या घरातून आपल्याला मिळते. मला त्या यादीची आठवण झाली आणि मी त्याच फुटपाथने मागे आलो. पाटील मारुती मंदिराच्या गल्ली जवळच एक वृद्ध स्त्री पणत्या आणि रांगोळी घेऊन बसलेली पाहिली. बायकोने मला पाच पणत्या आणायला सांगितल्या होत्या. पण मी बारा घेऊन आलो. बायकोला खुश ठेवण्याचा मंत्र आपण कधी विसरून चालत नाही. मात्र आपण दिलेली किंमत चुकून सुद्धा घरी सांगायचे नाही.' तुम्हाला भाव करताच येत नाही ' असे म्हणून आपल्या बाजार खरेदीतल्या ज्ञानाला ' ढ ' शेरा मिळतो. सहा पणत्यांचं एक पॅकेट पन्नास रुपयाला म्हणजे अगदी स्वस्त आहे असे मला वाटले म्हणून मी दोन पाकिटे घेतली. आजकाल खिशात पैसे न वागवण्याची सवय झाल्यामुळे बऱ्याच वेळेला अडचण होते. आजीबाई मला पैसे द्या म्हणाले तर अडचणच होईल. पण आजीबाईंनी तात्काळ क्यू आर कोड चा कागद माझ्यासमोर ठेवला आणि माझा पैसे देण्याचा प्रश्न मिटला.
आता हे निमंत्रण मोडी दर्पण च्या सर्व वाचकांसाठी पाठवत आहे. यावर्षी दादर सार्वजनिक वाचनालयाने आमच्या सोबत कार्यक्रम करण्याचे मान्य केल्याने आम्हाला एक मध्यवर्ती जागा उपलब्ध झाली. त्यामुळे शनिवारच्या कार्यक्रमाला आपणास वेळेवर उपस्थित राहण्यास अडचण असणार नाही. आपण शक्यतो साडेपाच वाजताच कार्यक्रम सुरू करणार आहोत. सुरुवातीलाच प्रकाशनाचा कार्यक्रम असेल.
आमचा प्रसिद्धी सहकारी कोकण मिडिया सुद्धा त्याचवेळी प्रकाशित होउल.यावेळी जेष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी प्रमुख संपादक,माजी खासदार माननीय कुमार केतकर यांचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला मिळेल. त्यानंतर ' पालव ते पद्म श्री ' हा मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे. लालबागच्या मध्यमवर्गी कुटुंबात जन्मलेले, पोरवयातच अक्षरात सौंदर्य आहे याचा शोध घेणारे, त्यासाठी एका हातात रंगाचा डबा आणि दुसऱ्या हातात ब्रश अशा अवतारात मुंबईतल्या पुलांचे कठडे, चाळींच्या भिंतीवरती अक्षरे रंगवताना रंगारी म्हणून परिचित झालेले कोकणचे सुपुत्र अच्युत पालव अक्षरांचेच वेड घेऊन पुढे जे.जे.कला महाविद्यालया मध्ये शिक्षण घेतात. मोडी अक्षरांवरती प्रबंध लिहितात, हळूहळू ते सुलेखनकार म्हणून प्रसिद्धीस येतात. आणि जगातल्या प्रतिष्ठित चित्रकारांमध्ये जाऊन बसतात. उभ्या आयुष्यभरात एक सुलेखनकार म्हणून कलेच्या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवतात तेव्हा भारत सरकार त्यांना पद्मश्री ही पदवी देऊन गौरवित करते. त्यांचा हा गौरव मोडी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणूनच त्यांचा यथोचित सन्मान करताना त्यांचा हा सुलेखन प्रवास जगापुढे ठेवावा म्हणून हा मुलाखतीचा अट्टाहास.
आमच्याच परिवारातील ज्येष्ठ चित्रकार, लेखक कवी आणि विशेषता कोकण भूमी वरती प्रेम करणारे विजयराज बोधनकर संवादक म्हणून काम करणार आहेत त्यांना साथ देणार आहेत त्याला अभ्यासक निकिता भागवत. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर लेखक, आमचे जाहिरातदार, हितचिंतक आणि मोडीवाचक उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थाने अक्षर मेजवानी ठरावा असा हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रम आटोपशीर असला तरी इथून लांबवर जाणाऱ्या लोकांना घरी पोहोचेपर्यंत पोटात कावळे गर्दी करू शकतात याची आम्हास कल्पना असल्यामुळे आम्ही आपणास तसेच पाठवणार नाही. कारण हा कार्यक्रम एक स्नेहमिलन कार्यक्रम आहे. मोडीवाचक म्हणून वर्षातून एकदाच आपण एकत्र येतो तो आनंद पुरेसा लुटता यावा याची आम्ही काळजी घेणार आहोत.
दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ गुरु ट्रस्टस आणि मोडी लिपी मित्र मंडळ आपली येत्या शनिवारी अर्थात १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अक्षर यात्रेचा आस्वाद घेण्यासाठी धुरू सभागृहामध्ये वाट पाहत आहेत.
आपला
सुभाष लाड
संपादक
मोडी दर्पण
****** विशेष सूचना :-********
## दिवाळी फराळ
कार्यक्रम स्थळी कोकणातील महिलांनी बनवलेले साजूक तुपातील दिवाळी फराळातील विविध पदार्थ असलेला विक्री कक्ष कोकण अमृत या संस्थेतर्फे मांडण्यात येणार आहे. त्यांना फोन करून आपण आपली मागणी नोंदवू शकता.संपर्क:
सौ प्रांजल कोलते
८६५२२०४५९९
८४२२०८४९९९
No comments:
Post a Comment