महाराष्ट्र समाज सुधारकांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, क्रांतिकारकांची भूमी आहे. इथल्या प्रत्येक हृदयात देश भक्तीचा यज्ञ अखंडित पेटत असतो तसाच तो महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी सर्वस्व वाहण्यासाठी तयार असतो.या अस्मितेची पायाभरणी काल परवाची नसून तिला हजारो वर्षांचा इतिहास कारणीभूत आहे.मग ते कोणतेही क्षेत्र असो.प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाचे दैदिप्यमान कर्तृत्व हे जगासमोर आले आहे. या अस्मितेचे अनेक मानबिंदू आहेत.जशी लेणी, गडकिल्ले,संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरासारखे विश्ववंदनीय महापुरुष, पंढरपूरची वारी पासून किर्तन ,नाटक,लावणी,पोवाड्यासारख्या इथंच रुजलेल्या लोककला आणि या सर्वांना आणि मराठी माणसाला जोडून ठेवणारी मराठी भाषा. रामायण, महाभारत ही भारतवर्षाची महाकाव्ये तशीच महाराष्ट्रदेशी संतांच्या अभंग गाथांना स्थान आहे. ' जय शिवाजी जय भवानी 'असे म्हटल्याबरोबर मराठी रक्त सळसळू लागते तसेच 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ' असे म्हणताच मराठी माणसातील सात्विकता जागरूक होते.तो नाद चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच लईत घुमतो त्याला कारण आमची मराठी भाषा आहे.
मराठी भाषेत संत साहित्याबरोबर मोठी ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे.त्यातून आपला इतिहास जगासमोर आला, जगण्यातील संस्कारांबरोबर त्या त्या पिढीला नवीन स्वप्न बघण्याचे भान आणि ज्ञान ही मिळाले. याच भाषेने नाविन्याची ओढ निर्माण केल्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून मराठा वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. केशवसुतांनी नवकवितेला जन्म दिला. पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथालय चळवळ सुरू करून सामान्य जनतेला ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण केली. लोकहितवादी आणि रानडे यांनी मिळून ग्रंथोत्तेजक मंडळ सुरू केले आणि त्यातूनच ११ मे १८७८ मध्ये पुण्यातील हिराबाग येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साकार झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हेच होते. महाराष्ट्रात नेहमीच चांगली गोष्ट डोक्यावर घेतली जाते तसंच या साहित्य संमेलनाचं झालं आणि त्याची परंपरा निर्माण झाली. या परंपरेतीलच शंभरावे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीच आकारास येईल.
या साहित्य संमेलनांमुळे मराठी सारस्वत विश्वातील नामवंत साहित्यिकांना अध्यक्षपदासारखा बहुमान मिळाला. अनेक साहित्यिकांना नवीन ओळख मिळाली. अनेक विषयांची या व्यासपीठावरती चर्चा होऊ लागली. वारीची वाट पाहणारा महाराष्ट्रीयन माणूस तसा मराठी साहित्यात रमलेला मराठी माणूस संमेलनाची वाट पाहू लागला. एका संमेलनातूनच सर्वांनाच वाव मिळणे अवघड झाल्याने विषयवार साहित्य संमेलने निर्माण होऊ लागली,तशी प्रादेशिक साहित्य संमेलने निर्माण झाली. दलित साहित्य, विद्रोही साहित्य अशी साहित्याची विभागणी होऊन त्यांचीही साहित्य संमेलने होऊ लागली. जगभरात मराठी माणूस विखुरलेला असल्याने जगाच्या पाठीवरील साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन अशी संमेलने गाजू लागली.ही सगळी संमेलने गजबजलेल्या शहरांमध्ये होत असतात. त्यामध्ये कोकणाला फारच कमी वेळा संधी मिळाली. इथे अधिकाधिक साहित्य संमेलने व्हावीत या हेतुने कोकण मराठी साहित्य परिषदेचे निर्मिती होऊन त्याद्वारे कोकणातील विविध भागात संमेलने होऊ लागली. तरीही कोकणातील विशेषत: राजापूर लांजा तालुक्यातील गाव खेड्यात या साहित्य संमेलनाचं लोन पोचवून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याकरता ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची जवळ अकरा वर्षांपूर्वी रुजली आणि सातत्याने वेगवेगळ्या गावात साहित्य संमेलने आकारास येऊ लागली.
मात्र या साहित्य संमेलनांमध्ये कथा कादंबरी आणि कविता अशाच विषयाची चर्चा होत असल्याने कृषी आणि सहकार यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्य असून त्याचीही चर्चा कुठेतरी व्हायला हवी या हेतूने कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारीच्या १३,१४ व १५ या तारखांना चिपळूण मधील मांडकी-पालवन या खेडेगावातील कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संकुलात ग्रामीण,कृषी,सहकार मराठी साहित्य संमेलन दिमाखात पार पडले. स्वतः तानाजीराव चोरगे यांनी क्रीडा,कृषी, साहित्य ,नाट्य या सर्व क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली असल्याने एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा या साहित्य संमेलनावरती असल्याचा दिसून येत होते.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माननीय शरदजी पवार हे उपस्थित राहणार होते. त्यांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे ते येऊ शकले नाही. मात्र मा.नामदार उदयजी सामंत प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने या साहित्य संमेलनाची उंची वाढली. त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात मराठी भाषेच्या प्रचार प्रसार यविषयी त्यांची असलेली ध्येय धोरणे मांडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यापासून ते महाराष्ट्राच्या विविध भागात विविधतेची साहित्य संमेलने आयोजित करून मराठीचा जागर करण्याचे त्यांनी व्रतच घेतल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. त्यांच्यासारखा सकारात्मक मंत्री मराठी भाषेला मिळाल्याचे समाधान प्रेक्षक वर्गाकडून पहावयास मिळाले.
चिपळूण ही साहित्य आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन चिपळूण मध्ये करण्यात आले त्याची जबाबदारी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने समर्थपणे पार पडली. त्याचे प्रमुख माननीय प्रकाश देशपांडे हे या साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या सोबत अरुण इंगवले, धीरज वाटेकर, संतोष गोणबरे ही साहित्य चळवळीतील कृतीशील मंडळी होती.मा. तानाजीराव चोरगे यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असल्याने त्या संस्थातील विद्यार्थ्यांना या साहित्य संमेलनाचा पुरेपूर लाभ घेता आला त्याचबरोबर या संस्थांमधील संस्थाचालक प्राध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी या संमेलनाच्या आयोजनात हिरीरीने भाग घेताना दिसून आले.
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण संस्था जणू एखाद्या विद्यापिठासारखी विस्तीर्ण आणि विविध इमारतींनी सजलेली आहे.येथील स्वातंत्र्यसैनिक ह.भ.प.लक्ष्मणराव चोरगे क्रीडा संकुल सुद्धा विशाल परिसर व्यापून आहे.पक्क्या स्वरुपातील ३० x ३० फुटांच्या भव्य व्यासपीठाला जोडून बांधलेल्या हजार लोक आरामशीर बसू शकतील असे पुरेशी उंची देऊन सभागृह बांधण्यात आले होते. सभागृहात छपराला लटकते जागोजागी पुरेसे पंखे बसविल्यामुळे गारवा जाणवत होता.सभागृहाला जोडूनच सभागृहाच्या उजव्या बाजूला दोन भागात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्यिक आणि पाहुणे यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केले गेल्यामुळे तिथे फारशी गर्दी न होता वेळेतच सर्वांना जेवण किंवा चहापाणी करता येत होते. प्रेक्षकांसाठीच्या भोजनकक्षात सुद्धा नीटसपणा होता. पुरेसे वाढपी आणि बसण्याची व्यवस्था आणि विशेषत: मजबूत पत्रावळ्या असल्याने हातावर घेऊन खाणे सुद्धा शक्य होत होते. कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता ही तिथे दिल्या गेलेल्या जेवणावरून अर्थात आदर सत्कारावरून ठरते. एकूण कार्यक्रमात चार वेळा जेवणाची व्यवस्था करावी लागली मात्र प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भाज्या,चपात्या/भाकऱ्या/पुऱ्या आणि गोड पदार्थ असल्याने जेवणाची रुचकरता अधिक वाढली.तिथे असणारे विद्यार्थी स्वयंसेवक हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स करून आले होते की काय असे वाटावे इतक्या अगदी आपलेपणाने आणि तत्परतेने सेवा देत होते.
मा.डाॅ. तानाजीराव चोरगे सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.क्रीडा,कृषि,सहकार,नाट्य, साहित्य आणि राजकारणात सुध्दा लिलया वावर करून आणि भारत देशाबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यटन करुन सर्वच क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या या ग्रामीण,कृषि,सहकार साहित्य संमेलनात पदोपदी त्याचे प्रत्यंतर मिळत होते.१३ फेब्रुवारीला उतरत्या दुपारी ध्वजारोहण करून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली.या दिंडीत त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना पुरेपूर वाव मिळाला.भालतातील विविध भागातील सांस्कृतिक नृत्य परंपरा, वेशभूषा बघायला मिळाल्या.निवळी बाजारातील रस्त्यावर एका ठिकाणी नृत्य आविष्कार करुन एक एक गट पुढे जात होता.लेझिम, ढोलपथक, वारकरी, चित्र रथ त्याचबरोबर नमनातील कलाकारांनी ही आपल्या कलेची इथे झलक दाखवली.शिस्तीने मनोरंजन करीत जाणारी दिंडी पाहायला गर्दी केलेल्या ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले.
ग्रंथदिंडी साहित्य नगरीत विसावल्यानंतर ग्रंथदालनांचे, चित्र प्रदर्शन आणि इतर दालनांचे उद्घाटन झाले.सायंकाळी सहा वाजता स्थानिक कवींचे काव्य संमेलन पार पडले.ज्येष्ठ कवी संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात अनेक स्थानिक कवींनी आपल्या कविता वाचनाचा आनंद लुटला.विशेषत: कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या पहाडी आवाजातील कवितांनी सभागृह दणाणून सोडले.जणू काही साहित्य संमेलनाची नांदी गायल्याचा भास झाला.दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता.राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं नियोजन होते परंतु त्यांची चार दिवसांपूर्वीच प्रकृती बरी नसल्याचे विविध माध्यमातून कळून आले होते. त्यामुळे साहेब येणार नाही याची आयोजकांना खात्री होती मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या पुढाकाराने हे साहित्य संमेलन उभे राहिले होते ते नामदार उदयजी सामंत हे रत्नागिरीतील एका कार्यक्रमात उपस्थित राहून येणार असल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम दोन एक तासाने उशिराने होणार होता. एवढा उशीर साहित्य संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांवरती मोठाच परिणाम करणार होता. मात्र अनुभवी संयोजकांनी संमेलनाच्या ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेत थोडा बदल झाला तरी चालेल मात्र वेळेअभावी एखादा कार्यक्रम होणार नाही अशी नामुष्की पत्करायला ते तयार नव्हते. उद्घाटनानंतरचे सत्र म्हणजे ग्रामीण साहित्यातील कोकण हा परिसंवाद होता. तो परिसंवाद उद्घाटनाच्या सत्रातच घ्यावा असे नियोजन संयोजकानी आदल्याच दिवशी ठरविले.त्याप्रमाणे परिसंवादात सहभाग घेणाऱ्या सर्वच साहित्यिकांना त्याची कल्पना दिली. हा घेतलेला धाडसी निर्णय म्हणजे संयोजकानी संमेलनातील प्रत्येक कार्यक्रमाला न्याय देण्याचा घेतलेला योग्य निर्णय होता त्याबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. आपल्या ग्रामीण परंपरेप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्याकडून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केल्याचे जाहीर करून ग्रामीण साहित्यातील कोकण या परिसंवादाला मोकळी वाट करून दिली. सूत्रसंचालक धीरज वाटेकर यांनी परिसंवादाची प्रस्तावना करून परिसंवादाचे अध्यक्ष मा. सागर देशपांडे परिसंवादात सहभाग देणाऱ्या अलिबागचे श्री .एल. बी. पाटील, रानमाणूस प्रसाद गावडे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड, सुप्रसिद्ध निवेदक श्री विजय हटकर व त्याचबरोबर रत्नागिरीचे प्रा. डाॅ. गोपाळे यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला. परिसंवदाचे अध्यक्ष सन्माननीय सागर देशपांडे यांनी वेळेचे नियोजन सांगून परिसंवादाला सुरुवात केली. सूत्रसंचालकाने प्रत्येक वाक्याचा थोडक्यात परिचय करून त्यांना आपले विचार प्रकट करायला सांगितले. कोकणचे साहित्य, कोकणचे मौखिक साहित्य, कोकणे माणसाचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा सर्वच विषयांचा परामर्श घेणाऱ्या परिसंवादाने साहित्य रसिकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.
नियोजित वेळेत उद्घाटन पार पडेल या अपेक्षेने आमदार माननीय भास्करराव जाधव हे वेळेत उपस्थित झाले होते. मात्र पहिल्या परिसंवादाचा आस्वाद घेऊन ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमाकरिता निघून गेले. दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदयजी सामंत यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार शेखरजी निकम,दापोली कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय भावे,मा.तानाजीराव चोरगे व मा.प्रकाश देशपांडे हे उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. मा. तानाजीराव चोरगे यांचे कौतुक करतांना चोरगे यांनी ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन घेऊन मराठी साहित्यात एक नवीन पायंडा महाराष्ट्राला दिला आहे.त्यामुळे अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात होतील.असे सांगितले. मराठी साहित्य आणि संस्कृती ही अधिक बळकट होण्यासाठी अशा संमेलनांचा उपयोग होतो. मराठी वर किती जरी आक्रमणा आली तरी मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे तिचं जतन करण्याचे कामात महाराष्ट्र सरकार नेहमीच अग्रेसर राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाईल याबाबत सरकार ठाम आहे असेही सांगितले..तानाजीराव चोरगे यांनी ग्रामीण,कृषि, सहकार अशा तिन्ही विषयांना एकत्रित गुंफीत साकारलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच संमेलन आहे असे मंत्री महोदयांनी म्हणताच प्रेक्षागृह उस्फूर्त टाळ्यांनी दुमदुमून गेले.
आज दिवसभराचे छान नियोजन होते. प्रत्येक दीड ताशांचा बौद्धिकानंतर अर्धा तास विश्रांती असल्यामुळे रसिकांनी प्रत्येक बौद्धिक किंवा परिसंवादास चांगली उपस्थिती दर्शविली.दुसरे सत्र 'ग्रामीण साहित्य काल आणि आज' या सत्राचे अध्यक्ष मा. डाॅ.राजन गवस होते,तिसरे सत्र ' ग्रामीण कथाकथन ' हे प्रख्यात कथाकार मा.प्रा. अप्पासाहेब खोत अध्यक्ष होते. कथाकथनाचा तास हा नेहमीच मनोरंजन करणारा असतो तसा तो इथेही रसिकांची दाद मिळवून गेला.चौथ्या सत्रात ' सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी ' यावर विचार मंथन झाले.या सत्राचे अध्यक्ष स्थान मा.श्री. प्रमोद कर्नाड यांनी भूषविले.पाचवे सत्र काव्य संमेलनाचे होते.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या ' कृषि साहित्य व शेती सुधारणा ' या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी मा.डाॅ.बाळासाहेब जमदग्नी होते तर 'आता आत्महत्या थांबवूया ' या परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे कृतिशील विचार ऐकण्याची संधी मिळाली. या संमेलनात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकावयास मिळाल्या. शेतीकडे व्यापारी दृष्टीने बघण्याचे आवाहन येथील शेतकऱ्यांनी स्वीकारल्यास शेतकरी समृद्धीकडे जाऊ शकतात ही आशा पल्लवित झाल्याचे जाणवले.
दुपारच्या सत्रात कृषिभूषण तानाजीराव चोरगे यांची सकाळचे माजी संपादक मा.यमाजी मालकर यांनी घेतलेली मुलाखत ही एका ज्येष्ठ साहित्यिकाला दिलेली कृतज्ञता भेटच म्हणावयास हवी. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणारे तानाजीराव चोरगे साहेबांची क्रीडा क्षेत्रात ही तेवढीच चमकदार कामगिरी आहे तर मराठी साहित्य कथा कादंबरी व नाट्य अशी अठ्ठेचाळीस दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करतात हे कौतुकास्पद आहेच तसेच त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख या मुलाखतीतून सर्वांनाच झाली. त्यांची मुलाखत आटोपशीर पण विविधांगी क्षेत्रांचा परामर्श घेण्याचा श्री.यमाजी मालकर यांचेही कौतुक.
एकंदरीत या यशस्वी झालेल्या साहित्य संमेलनासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. माननीय तानाजीराव चोरगे यांच्या शैक्षणिक संस्थातील अनेक प्राचार्य, प्राध्यापक, अनेक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी येथे तत्परतेने वावरताना दिसत होते. माननीय चोरगे साहेब कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहून पहिल्या रांगेतल्या मान्यवरांच्या सोबत वावरत असताना एकंदरीत संमेलनाच्या नियोजनात कुठे कमतरता किंवा कुठे अडसर जाणवत नाही ना यावरती बारीक नजर ठेवून होते. प्रत्येक कर्त्या पुरुषाची मुले कर्त्या पुरुषांच्या स्वप्नाला पुढे घेऊन जातातच असे नाही. मात्र त्यांचे सुपुत्र डॉ. निखिल चोरगे यांच्या संमेलनातील वावरावरून पित्याने निर्माण केलेल्या सृष्टीचे चालकत्व आपण यशस्वीरीत्या पार पाडू त्याची ग्वाही देत होते.
या संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहिल्यामुळे दूरदूरहून आलेल्या अनेक साहित्यिक मित्रांची ओळख झाली.कविमित्र दादा मडकईकर यांचा सहवास संपूच नये असे वाटत होते. गप्पांच्या ओघात त्यांची महत्वाची पिशवी आम्ही बसलेल्या खुर्चीच्या शेजारी राहिली.माझ्या सोबत असलेल्या विजय हटकर यांच्या लक्षात आले पण तो पर्यंत ते त्यांच्या खोलीवर अरुण इंगवले यांचे बरोबर निघून गेले होते.आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ओयासीस हाॅटेल जवळ ते येतो म्हणाले. आमच्या खोलीवर येणार म्हणजे त्यांना चहा तर द्यायला हवी असे मनापासून वाटले. रात्री अकरा वाजता चहाचा शोध घेताना बहादुर शेख नाक्यावर मिळेल असे समजले. हा छोटा प्रवास आणि चहा तयार होईपर्यंतचा वेळ दादा मडकईकरांची भन्नाट मालवणी साठच्या दशकातील कविता यांची सुंदर मैफील जमली.एक उत्तम कवी आपल्या कवितांवर प्रेम करतोच पण ज्या कवितांनी आपले बालपण समृद्ध ,संस्मरणीय केले त्या कविता आणि त्या कवींच्या बद्दल आदर दाखवतो आणि त्याच कविता प्रत्येक पिढीने ऐकाव्यात यासाठी जिथे बोलावतील तिथे जाऊन 'आठवणीतल्या कविता 'हा कार्यक्रम करतो हे ऐकून दादा मडकईकरांच्या बद्दलचा अभिमान दाटून आलाच पण ती रस्त्याच्या कडेला रंगलेली काव्यमैफील ही चिपळूणच्या ग्रामीण कृषि सहकार साहित्य संमेलनाची एक आठवण म्हणून कायमची लक्षात राहिल.
सुभाष लाड
९८६९१०५७३४
' कोकण मिडिया ' या विख्यात साप्ताहिकाने प्रसिद्ध केलेला लेख......
No comments:
Post a Comment