Wednesday, January 24, 2024

संघांचा एक स्तुत्य उपक्रम !

 


         आपल्या आजुबाजुला अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. काही संस्थांचं नाव ऐकल्याचं आठवतंय पण त्या कार्यरत नाहीत. तरूण कार्यकर्ते मिळत नाहीत ही सगळीकडेच बोंब असतांना आपला राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ पंच्याहत्तर वर्षाकडे वाटचाल करताना नवा उत्साह घेऊन काम करतो आहे हे कौतुकास्पद आहे.संघात काही सर्वच तरूण आहेत असे नाही. जे तरूण आहेत ते जुन्या जाणत्या सभासदांचा योग्य तो आदर राखून,त्यांची काळजी घेत असतात. तसेच अनुभवी लोक तरूण रक्ताला पुढे जाण्याची संधी देत त्यांचा तोल ढळणार नाही याची घरच्या वडिलधाऱ्यांसारखी काळजी घेतात त्यामुळे संघ एक परिवार असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
        गेल्या काही वर्षांत संघाचे उपक्रम वाढल्याचे जाणवते.उपक्रम म्हटला की खर्च आला.प्रत्येकवेळी बाहेरून देणग्या मिळतातच असे होत नाही.संघाच्या फार मोठ्या नाही पण बर्‍यापैकी ठेवी आहेत.पण व्याजदर कमी झाल्याने ती रक्कम कमी पडते अशावेळी संघाचा उपक्रम पडणार नाही याची काळजी हेच पदाधिकारी घेत असतात.संघाचा छोटासा कार्यक्रम सुद्धा नजरेत भरावा असा केला जातो  तेव्हा समोरच्याला संघाकडे बरेच पैसे आहेत असा समज होतो. मात्र एक सांगताना मला अभिमान वाटतो संघाकडे मनाने श्रीमंत असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आहे.त्या श्रीमंतीचा एक अनुभव काल बघायला मिळाला.
         काल कार्यकारिणीची सभा होती.येत्या साहित्य संमेलनाबाबत चर्चा करतांना संघाच्या आर्थिक ताकदीचाही विचार झाला.एका सदस्याने संघाचे वेगवेगळे उपक्रम राबविताना हाताशी काही रक्कम असावी म्हणून प्रत्येकाने प्रतिवर्षी दोन हजार रूपये देणगी द्यावी असा विचार मांडला आणि सर्वांनी उचलून धरला.का ? कशासाठी ? अशी कोणतीही शंका नाही किंवा तटस्थताही नाही. सगळ्यांच्या चेहर्‍यावर हे हवेच आहे असा भाव उमटला आणि हात वर गेला.ठराव संमत झाला.
        गेली पस्तीस वर्षे मी संघात आहे.संघाच्या स्थापनेपासूनच्या काही दिग्गजांचा सहवास मिळाला.त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. अनेकांशी घरोब्याचे संबंध जुळले,मैत्री झाली त्यामुळेच ती हिमालयाएवढी माणसं वाचता आली.
       माझं गाव म्हणून ते करीत असलेले प्रेम,माझ्या मायभूमीचा विकास हा ध्यास घेऊन करीत असलेली धडपड,पत्रव्यवहार,सरकारी कचेरीतल्या फेऱ्या, देणगीदारांकडे मिळून जाणे, सर्वांशी अदबीनं वागणं, बोलणं,लोकांच्या पैशाचा योग्य ठिकाणी वापर होतो आहे की नाही याबाबत सजग राहणं हे सगळं जवळून अनुभवतांना पुढे एक दिवस माझ्याही खांद्यावर ते जोखड आले.काही दिवस ते वडिलधारे हात माझ्या पाठीवर होते तोपर्यंत मी निश्चिंत होतो.निसर्ग नियमानुसार एक एक हात कमी होत गेला.काही स्वर्गलोकी गेले,कुणी वार्धक्यामुळे घरातच थांबले. वास्तविक मला एकाकीपण अनुभवावे लागले असते पण संघाला प्रत्येक पिढीचे कार्यकर्ते भेटत गेले तसे माझ्यावेळीसुद्धा असेच नव्या दमाचे आणि विशेषत: सामाजिक भान असलेले कार्यकर्ते सोबत आहेत याचा मला आनंद आहे आणि अध्यक्षपद भूषवितांना ते अभिमानास्पद वाटते आहे.कारण पंच्याहत्तर वर्षांचा संघ तरूणपण जागतो आहे.



संघाचे सर्वांत ज्येष्ठ  कार्यकर्ते व सल्लागार अॅड.सदानंद शेट्ये


         कितीतरी लोक पाहिले संघासाठी मेहनत करतांना.पण संघाने त्यांना काय दिले? कुणाची तरी पंचाहत्तरी पुढाकार घेऊन केली तर कुणाचा कुणीतरी आयोजीत केलेल्या सन्मान समारोहात संघाकडून शाल किंवा हार देण्यापलीकडे संघाकडे देण्यासारखे होते तरी काय ? निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या एकेका कार्यकर्त्याला 2016 पासून संघाकडून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात  पुरस्कार देऊन गौरविण्यात येते ही एक समाधानाची गोष्ट असली तरी त्याही पुढे जाऊन संघ कार्यकर्त्याच्या आजारपणात संघांकडून  आपलेपणाची आर्थिक मदत झाली तर ती त्या कार्यकर्त्याला मायेची पाखर वाटेल.त्याला नवी उमेद मिळेल.  तसेच सामाजिक कार्यात येऊ पाहणाऱ्या नवोदितांसाठी ते प्रोत्साहन ठरेल.
          संघाने आपल्या  पदाधिकाऱ्यांकरीता हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे.संघाचा तो स्तुत्य उपक्रम असे मी मानतो. त्याकरीता संघ पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो.

सुभाष लाड
अध्यक्ष 
25/01/2024

Saturday, January 20, 2024

समाजहितासाठीच जगणारा लोकप्रतिनिधी,* *प्रा.मधु दंडवते*

 


         1990 च्या लोकसभा निवडणुकीत प्रा. मधु दण्डवते यांचा हमखास विजय होणार हे सर्वजण गृहीत धरून होते.कोकणी लोकांच्या कोकण रेल्वेच्या कामाला मार्गी लावण्याचे काम प्रा. मधु दण्डवते यांनी केले असल्याने कोकणी माणूस मताद्वारे व्यक्त करील अशी अपेक्षा होती. मी काही दिवसांची रजा घेऊन प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी गेलो होतो.कोंडगे गावात काळंबादेवी मंदिराच्या आवारात सभा संपल्यानंतर माझ्या घरी न्याहरीची व्यवस्था असल्याने कार्यकर्ते अंगणात पंक्तीत बसले. दण्डवते साहेब आल्या आल्या म्हणाले " अरे व्वा वाचनालय आहे."मी पुढे जाऊन माहिती दिली." जन्मठेप आहे का?"
कपाट  लाकडी असल्याने उघडून बघणे गरजेचं होतं.नेमकं पुस्तक मिळालं.साहेब पुस्तक वाचेपर्यंत सगळेजण शांत बसले.अर्ध्या तासानंतर साहेबांचा शीण गेल्यासारख वाटलं."मी गाडीत बसून न्याहरी करीन." असं म्हणत पुढच्या प्रचारस्थळाकडे चालू लागले.
          या वेळची निवडणुक वेगळी होती.कार्यकर्त्यांना वडापाव ,संध्याकाळी काहीतरी वेगळं पेय देण्याची परंपरा आली होती.आयुष्यभर लोकशाहीचा पुजारी होऊन लोकांच्या हक्कासाठी लढणारे दण्डवते साहेब लोकांच्या मताला शिरोधार्य मानत आले.इथेतर मते विकत घेण्याची परंपरा निर्माण होतांना साहेबांना पराभव पत्करावा लागला.ज्यांना साहेबांच्या कर्तृत्वाची उंची माहिती होती,त्यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील निष्कलंक चारित्र्याची माहिती होती त्यांना जे अनेकवर्षे साहेबांसोबत होते,ज्याची लोकशाहीवर श्रद्धा होती त्यांच्या दृष्टीने साहेबांचा पराभव म्हणजे सार्वजनिक नैतिकतेची पिछेहाट होती म्हणून ते नाराज झाले.देशपातळीवर दण्डवतेचे सभागृहात असणे गरजेचे आहे असे वाटणार्‍यांनी साहेबांना राज्यसभेवर येण्याची विनंती केली.पण जेव्हा समोरच्या दरवाज्याने जाण्यास अनुकूलता दर्शविली नाही तिथे मागच्या दरवाजाने जाणे मनाला पटत नाही.जनतेचा कौल मी आनंदाने स्विकारला आहे असे सांगून साहेबांनी विषयच संपविला.
         बोफोर्स तोफा शत्रु  बरसण्या आधी त्यांच्या खरेदी व्यवहारातला भ्रष्टाचारावरील अनेक अभ्यासू संसदपटूंच्या भाषणामुळे त्या केंद्रातील सत्तेवरच धडाडल्या आणि पुढच्या निवडणुकीत त्या सत्तेला पायउतार व्हावे लागले.त्या संसदपटूंमध्ये एक बिनीचे नाव होते प्रा.मधु दंडवते यांचे.आपले सरकार असले तरी,त्या सरकारात आपण मंत्री असलो तरी जर सरकार चुकत असेल तर ती चुक दाखवून देण्याची हिंमत दाखवतांना मंत्रीपदाचा त्याग करणारे देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळातील सी.डी.देशमुख यांनी मुंबई महाराष्ट्राची आहे हे बाणेदारपणे सांगताना लोकशाहीच्या रक्षकांची भूमिका कशी हवी याचा वस्तुपाठ घालून दिला.तोच आदर्श  बोफोर्स भ्रष्टाचार विरोधात घेऊन अर्थमंत्र्यांची वस्त्रेही भिरकावून दिली.त्यांच्या या नि:स्पृह वृत्तीला सलाम करीत जनतेने त्यांना पंतप्रधानपदावर विराजमान केले.राजापूर लोकसभा मतदारसंघातून  प्रा.दण्डवतेही निवडून आले आणि त्यांना व्ही.पीठ.सिंगांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.
         कोकणातील लोकप्रिय खासदार बॅ.नाथ पै यांचे निधन 1971 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच झाली.त्यावेळी मधु दण्डवतेंनी हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत जेमतेम एक वर्ष पूर्ण केले होते. दण्डवतेना पक्षाकडून राजापूर  लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगण्यात आली पण त्यावेळी त्यांची मानसिक तयारी नव्हती. परंतु ज्येष्ठ समाजवादी नेते ना.ग.गोरे यांनी आवश्यकता पटवून दिल्यानंतर ते तयार झाले.अवघा एक महिना हाताशी होता.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांनी स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करतांना पाकिस्तानचा दारूण पराभव केल्याने त्याच्या लोकप्रियतेच्या लाटेवर अनेक विरोधी उमेदवार पराभूत झाले होते.मात्र कोकणी माणसाच्या घर करून बसलेला त्यांचा ' माझा नाथ ' गेल्याची सहानभूतीची लाट त्यांचा वारसा पुढे न्यायला आलेल्या सुसंस्कृत, सुविद्य असलेल्या समाजवादी मुशीत तयार झालेल्या प्रा. मधु दण्डवते यांना विजयी करून गेली.विद्वत्तापूर्ण  ओजस्वीपणे सरकारला आरसा दाखवणारे भाषण ऐकण्याचा मोह पंतप्रधान नेहरूंना आवरता येत नव्हता.तसेच लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण करण्याचा नाथचा वसा दण्डवतेंनी पुढे चालविला आणि प्रखर विरोध असूनही पंतप्रधान इंदिरा गांधीकडून कौतुकाचे शब्द मिळवले.
          स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस कोकणात रेल्वे यावी हे स्वप्न बाळगून ञ किंवा अन्य पक्षाच्या नेत्यांनी तो चेष्टेचा विषय केला होता.पण नाथ कोकणी माणसाचं स्वप्न साकार करण्यासाठी काॅग्रेस सरकारला पोटतिडिकीने सांगत होते.म्हणूनच कोकणी माणूस नाथला ' माझा आपला माणूस ' मानत होता.त्याच एका स्वप्नाच्या पुर्ततेसाठी 1971 च्या निवडणुकीत  मधु दण्डवतेना पाहिलं नसतांना पुरेसं ऐकलं नसतांना निवडून दिलं होतं.दुसर्‍या निवडूणुकीला आणिबाणीची पार्श्वभूमी होती. लोकशाहीच्या रक्षणार्थ  उभ्या ठाकलेल्या पुढाऱ्यांना तुरूंगाची हवा दाखवण्यात आली होती त्यात मधु दण्डवते होतेच पण त्यांची पत्नी प्रमिला दण्डवते याही होत्या.थोर नेते जयप्रकाश नारायण यांच्या संकल्पनेतून तयार झालेला जनता पक्ष सत्तेवर आला.यावेळची निवडणूक ही दण्डवतेंच्या संसदेतल्या कामाची पावती देणारी होती. लोकांनी त्यांना निवडून दिलेच पण सत्तेवर आलेल्या पक्षालाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यास भाग पाडले.कोकण रेल्वेचा प्रश्न मांडणाऱ्या नेत्याला रेल्वे मंत्रीपद देऊन एका तर्‍हेने वचनपूर्तीच्या वाटेवर जाण्याची संधी प्राप्त करून दिली. या सरकारला कार्यकाळ कमीच मिळाला पण रेल्वेमंत्री मधु दण्डवते यांनी झपाटल्यागत काम केले.कोकण रेल्वेच्या आपटा ते रोहा या मार्गाची सुरूवात करतांना संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम केले.रेल्वेतील आसन व्यवस्था आरामदायी केली. 1974 च्या संपात घरी पाठवलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.प्रथमच डबलडेकर रेल्वेची संकल्पना यशस्वी करण्यात आली.काही नवीन रेल्वेगाड्या सोडून अनेकांचा प्रवास सुकर केला.त्यांनी सुरू केलेल्या हैदराबाद-मुंबई या  मिनार एक्स्प्रेसला लोक दण्डवते एक्स्प्रेस म्हणत असत. यावरून त्यांनी केलेले काम किती लोकाभिमुख होते याची प्रचिती येते.मात्र त्यांनी गती दिलेल्या कोकण रेल्वेच्या कामाला त्यांचे सरकार गेल्यानंतर इंचभरही पुढे नेण्याचे पुण्य पुढील सरकारने केले नाही त्यासाठी पुन्हा दहावर्षे थांबावे लागले.
             व्ही.पी.सिंगाच्या सरकारात मधु दण्डवतेंना अर्थ खाते मिळाले.आपल्याला मंत्रीपद मिळायला हवे अशीही मागणी ज्यांच्या तत्वात बसत नाही.ते अमुक एक खाते मिळावे असे सांगणे सुतराम शक्य नाही.मात्र मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचे ज्ञान अनुभव आणि कल्पकताही ठासून भरलेल्या दण्डवते साहेबांना आपल्याला अर्थ खाते का दिले हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. संधी मिळताच त्यांनी पंतप्रधानांना विचारले." मी काॅग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री असतांना तुमची संसदेतील कामगिरी न्याहाळत होतो.प्रत्येक आर्थिक मुद्द्यावर तुमचा विशिष्ट दृष्टिकोन, बांधिलकी आणि सापेक्षता असायची.तेव्हा मला जाणवले की या सभागृहात असा एक माणूस आहे,ज्याने आर्थिक प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि तो सर्व बाजूनी समजून घेत आहे.भूतकाळातील तुमच्या विरोधी पक्षातील कामगिरीच्या जोरावर ही अर्थ मंत्रालयाची जबाबदारी तुम्ही पेलू शकाल, असे मला वाटते." हे व्ही. पीठ.सिंगाचे उत्तर होते.
          अर्थमंत्री म्हणून केलेली कामगिरी प्रशंसनीय आहेच पण आपल्या मंत्रिपदाचा फायदा कोकण रेल्वेला झाला पाहिजे यावर त्यांचा अधिक जोर होता.नियतीने चांगलेच फासे टाकले होते.कर्नाटकात जन्मलेले पण मुंबईतल्या कामगार चळवळीतून नावारूपास आलेले जॉर्ज फर्नाडिस रेल्वेमंत्री होते.कर्नाटकचे रामकृष्ण हेगडे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते.या दोघांना घेऊन कोकण रेल्वेच्या आराखडय़ास अंतिम रूप देण्यात आले.केंद्राने एकूण खर्चाच्या एकावन्न टक्के भार उचलण्याचे निश्चित करून राज्यांना त्यांचा सहभाग निश्चित करून दिला.कोकण रेल्वे एक स्वतंत्र महामंडळ   तयार करून  जनतेकडून  भाग गोळा करून निधी   उभारण्याचे स्वातंत्र्य महामंडळाला देण्यात आले.सरकार कोणतेही आले तरी. पैशासाठी प्रकल्प रखडला असे होऊ नये यासाठीचे हे नियोजन होते. एका वर्षानंतर हे सरकार पडले पण कोकण रेल्वे आपला मार्ग आखतच होती.ई.श्रीधरन यांची मुख्य अभियंता म्हणून केलेली नियुक्ती हा ही भाग दूरदृष्टीचा होता हे ही लक्षात घेतले पाहिजे.त्याचबरोबर अनेक पक्षांचे कडबोळे ठरलेले जनता सरकार अचानक पडले तशी नामुष्की याही सरकारवर आली तर कोकण रेल्वेचे स्वप्न पुन्हा होऊ नये म्हणून जलद गतीने निर्णय घेण्याची किमया यशस्वी ठरली.
         आज कोकण रेल्वे डौलाने चालत असतांना कोकणी माणूस मात्र उपरा ठरला आहे.दण्डवते साहेबांनी कोकणात जी रेल्वे स्टेशने निर्माण केली त्या स्टेशनवर कुठे एक तर कुठे दोन गाड्या थांबवून कोकणी माणसावर उपकार केल्याची भावना रेल्वे मंत्रालयाकडून मिळते.कोकणातील अधिकाधिक गावातल्याच लोकांना रेल्वेचा लाभ व्हावा या हेतूने मधु दण्डवतेंचे वारसदार असलेले सुरेश प्रभुनी त्यांच्या रेल्वेमंत्री पदाच्या कार्यकाळात आणखी काही स्टेशनांना मंजुरी दिली.मात्र त्यांची पाठ फिरली नी स्टेशनला नावाचा फलक लावण्या पलिकडे काही काम केले नाहीच पण दिवा पॅसेंजर व्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याही गाडीचं तिथं तोंड दिसत नाही.
            निरलस भावनेने सामाजिक जीवनात वावरणाऱ्या मधु दण्डवतेंनी आपले कोणतेही स्मारक बनवू नका असे सांगितलेच पण मृत्युनंतर आपला देहसुद्धा वैद्यकीय अभ्यासासाठी द्यावा असे सांगणारा नेता पुन्हा बघायला मिळेल काय? या  नेत्याचं स्मारक कोकणी माणसाच्या ह्रुदयात असेल पण त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक स्टेशनवर लोकांच्या मागणीप्रमाणे गाड्या थांबविणे,कोकणी माणसाचा प्रवास आरामदायी करावा हा त्यांच्या विचारांचा आदर ठरेल.एवढं तरी रेल्वे मंत्रालयाने करावं ही त्यांच्या शंभराव्या जन्मदिना निमित्त अपेक्षा.

सुभाष लाड
9869105734

.