गेल्या काही वर्षांत संघाचे उपक्रम वाढल्याचे जाणवते.उपक्रम म्हटला की खर्च आला.प्रत्येकवेळी बाहेरून देणग्या मिळतातच असे होत नाही.संघाच्या फार मोठ्या नाही पण बर्यापैकी ठेवी आहेत.पण व्याजदर कमी झाल्याने ती रक्कम कमी पडते अशावेळी संघाचा उपक्रम पडणार नाही याची काळजी हेच पदाधिकारी घेत असतात.संघाचा छोटासा कार्यक्रम सुद्धा नजरेत भरावा असा केला जातो तेव्हा समोरच्याला संघाकडे बरेच पैसे आहेत असा समज होतो. मात्र एक सांगताना मला अभिमान वाटतो संघाकडे मनाने श्रीमंत असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आहे.त्या श्रीमंतीचा एक अनुभव काल बघायला मिळाला.
काल कार्यकारिणीची सभा होती.येत्या साहित्य संमेलनाबाबत चर्चा करतांना संघाच्या आर्थिक ताकदीचाही विचार झाला.एका सदस्याने संघाचे वेगवेगळे उपक्रम राबविताना हाताशी काही रक्कम असावी म्हणून प्रत्येकाने प्रतिवर्षी दोन हजार रूपये देणगी द्यावी असा विचार मांडला आणि सर्वांनी उचलून धरला.का ? कशासाठी ? अशी कोणतीही शंका नाही किंवा तटस्थताही नाही. सगळ्यांच्या चेहर्यावर हे हवेच आहे असा भाव उमटला आणि हात वर गेला.ठराव संमत झाला.
गेली पस्तीस वर्षे मी संघात आहे.संघाच्या स्थापनेपासूनच्या काही दिग्गजांचा सहवास मिळाला.त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. अनेकांशी घरोब्याचे संबंध जुळले,मैत्री झाली त्यामुळेच ती हिमालयाएवढी माणसं वाचता आली.
माझं गाव म्हणून ते करीत असलेले प्रेम,माझ्या मायभूमीचा विकास हा ध्यास घेऊन करीत असलेली धडपड,पत्रव्यवहार,सरकारी कचेरीतल्या फेऱ्या, देणगीदारांकडे मिळून जाणे, सर्वांशी अदबीनं वागणं, बोलणं,लोकांच्या पैशाचा योग्य ठिकाणी वापर होतो आहे की नाही याबाबत सजग राहणं हे सगळं जवळून अनुभवतांना पुढे एक दिवस माझ्याही खांद्यावर ते जोखड आले.काही दिवस ते वडिलधारे हात माझ्या पाठीवर होते तोपर्यंत मी निश्चिंत होतो.निसर्ग नियमानुसार एक एक हात कमी होत गेला.काही स्वर्गलोकी गेले,कुणी वार्धक्यामुळे घरातच थांबले. वास्तविक मला एकाकीपण अनुभवावे लागले असते पण संघाला प्रत्येक पिढीचे कार्यकर्ते भेटत गेले तसे माझ्यावेळीसुद्धा असेच नव्या दमाचे आणि विशेषत: सामाजिक भान असलेले कार्यकर्ते सोबत आहेत याचा मला आनंद आहे आणि अध्यक्षपद भूषवितांना ते अभिमानास्पद वाटते आहे.कारण पंच्याहत्तर वर्षांचा संघ तरूणपण जागतो आहे.
कितीतरी लोक पाहिले संघासाठी मेहनत करतांना.पण संघाने त्यांना काय दिले? कुणाची तरी पंचाहत्तरी पुढाकार घेऊन केली तर कुणाचा कुणीतरी आयोजीत केलेल्या सन्मान समारोहात संघाकडून शाल किंवा हार देण्यापलीकडे संघाकडे देण्यासारखे होते तरी काय ? निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या एकेका कार्यकर्त्याला 2016 पासून संघाकडून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन गौरविण्यात येते ही एक समाधानाची गोष्ट असली तरी त्याही पुढे जाऊन संघ कार्यकर्त्याच्या आजारपणात संघांकडून आपलेपणाची आर्थिक मदत झाली तर ती त्या कार्यकर्त्याला मायेची पाखर वाटेल.त्याला नवी उमेद मिळेल. तसेच सामाजिक कार्यात येऊ पाहणाऱ्या नवोदितांसाठी ते प्रोत्साहन ठरेल.
संघाने आपल्या पदाधिकाऱ्यांकरीता हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे.संघाचा तो स्तुत्य उपक्रम असे मी मानतो. त्याकरीता संघ पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो.
सुभाष लाड
अध्यक्ष
सुभाष लाड
अध्यक्ष
25/01/2024



No comments:
Post a Comment