Friday, May 31, 2024

लांजातील आदर्श गाव वेरळ !

        शिपोशीतल्या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने महेंद्र साळवी सर आपल्या मोटारीतून मला घेऊन जात असत.बऱ्याचदा आमची चर्चा वेरळ गावाकडे सरकायची.आपल्या गावाचं कौतुक ऐकायला कुणाला आवडणार नाही.पण कौतुक करण्यासारखं काम असलं पाहिजे.अर्थात साळवी सर त्यांच्या गावात चाललेल्या उपक्रमांची माहिती द्यायचे आणि मी म्हणायचो " व्वा छानच उपक्रम आहे हो ! ".
           महेंद्र साळवी सर म्हटले म्हणजे प्रामाणिकपणा,नि:स्पृहवृत्ती आणि हाती घेतलेल्या कामात जीव ओतणे या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते त्यांच्या परिचितांत  ओळखले जातात.आम्ही गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्या सहवासात असल्याने व राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाच्या स्थानिक पातळीवर प्रत्येक उपक्रमांत त्यांचा लक्षणीय सहभाग असल्याने त्यांचे बोलण्यात  स्वस्तुती कधीच असतं नाही किंवा उगाच चुकीचे काही ते बोलणार नाहीत याची आम्हाला पूर्ण जाणीव असल्याने वेरूळ ग्रामस्थ करीत असलेल्या कामाचं ते जे वर्णन करीत होते त्यामुळे त्या ग्रामस्थांना भेटून त्यांचे कौतुक करावे असे वाटत होते. " मला एकदा तुमच्या शाळेला भेट द्यायची आहे." असं म्हणताच " या वर्षीच्या कार्यक्रमालाच तुम्हाला बोलवायचं असं ठरलंय." असं साळवी सरांनी मला निमंत्रणच देऊन टाकलं.
            संमेलनाची धामधुम संपली. कमालीची यशस्वीता शिपोशीकरांनी मिळवल्याने संघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आनंंदी होते.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साळवी सरांनी मला फोन करून 'एक नाटक आम्हाला हवंय.१२ मे च्या दरम्यान कार्यक्रम करावयाचे ठरले आहे 'असे सांगितले.महालक्ष्मी कला मंच मुंबई च्या 'वीर रत्न बाजीप्रभू ' या नाटकाबद्दल त्यांना माहिती मिळाली होती.ती कंपनी माझ्या संपर्कात आहे हे ही ते जाणून असल्याने तसेच त्यांचे प्रयोग खेड्यांपाड्यांत करुन शिव इतिहास घराघरात पोहोचवायचा मनोदय त्यांना माहित असल्याने त्यांनी माझ्याकडे काढलेला विषय हा त्याच अनुषंगाने आहे हे मी समजून गेलो.साळवी सरांबद्दल आम्हांस नितांत आदर असल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना वीर रत्न बाजीप्रभू चा एक खेळ देणे म्हणजे वेरळ ग्रामस्थांच्या ग्रामविकासाच्या उपक्रमात मदत करण्यासारखेच होते. मग याबाबत माझे मंथन सुरू झाले.
      मुंबईहून एखादे नाटक गावाकडे आणणे म्हणजे खर्चिक बाब.पण एक दोन अधिकचे खेळ मिळाले तर नाटक कंपनीची बिदागी कमी करता येते या अनुभवानुसार महालक्ष्मी कला मंच चे संजय मांडवकर यांचेशी चर्चा केली.शिव छत्रपती हा मराठी माणसाचा मानबिंदू पण शिव जयंती साजरी करणे किंवा बेंबीच्या देठापासून ओरडून जय शिवाजी म्हणण्यापर्यंतच आमच्या सीमा सिमित आहेत.परंतु महालक्ष्मी कला मंच ने ऐतिहासिक नाटकेच सादर करण्याचा निर्धार केला असल्याने त्यातील प्रत्येक कलाकार किंवा संबंधीत सर्व मंडळी शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवायचा असेल तर आपला वेळ खर्च होतोय यांचा विचार करीत नाही आणि पैसे किती मिळताहेत यांची चिंता करीत नाही या त्यांच्या व्रताचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.लवकरच संजय मांडवकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला होकार कळवला आणि १२मे धरुन वीररत्न बाजीप्रभूचा कोकण दौरा आयोजित केला गेला.
          मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत.त्यांना शिक्षणाचा व्यवसाय करून पैसा कमविण्याचा हुकुमी मार्ग मिळाला आहे. इथली संस्कृती आणि भाषा नेस्तनाबूत होत असली तरी त्याचे त्यांना सुख दु:ख नाही.कारण पैसा कमविणे यातच त्यांना आनंद आहे.राजकारण्यांना तर त्याचे सोयरसुतकच नाही.पण ते इंग्रजी चे लोण जेव्हा खेड्यापाड्यात पोहोचतेय आणि खेडवळ माणूस पेचात सापडतोय.आपला पाल्य माणूस झाला नाही तरी चालेल पण त्याला पैसा कमावता आला पाहिजे अशी भावना बळकट होऊ पाहात आहे.कोकणात मुळात कोणताही उद्योग धंदा नसल्याने इथे शिकलेली मुलं शहरात जातात. तिथल्या चंदेरी दुनियेत स्थायिक होतात त्यामुळे कोकणात मुलांच्या जन्माचे प्रमाण कमालीचे घटले आहे.त्याचा परिणाम शाळा कॉलेजवर होत आहेच.मुलांच्या पटसंख्येचा विचार करून शिक्षक संख्या निश्चित करण्याच्या सरकारी निर्णयानमुळे एकेका शिक्षकाला चार चार वर्ग शिकवण्याची कसरत करावी लागत आहे. सरकारी शाळांचे प्रशासकीय धोरण हे होतंय जातंय असे सुस्तावलेले आहे. त्याचा परिणाम मुलांच्या प्रगतीवर होत आहे.आणि इथला पालकवर्ग पाल्याच्या प्रगतीबाबत चिंताग्रस्त आहे.
        वेरळ गावच्या शाळेची स्थिती काही वेगळी नाही.मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरापासून अलीकडे सहा किमीवर वेरूळ गाव वसलेल्या गावात जि.प.प्राथ.शाळा वेरळ मराठी ही सातवी पर्यंतची शाळा. नव्वदच्या आसपास पटसंख्या असलेल्या शाळेत चार शिक्षक होते. एप्रिल २३मध्ये दोन शिक्षकांची बदली झाली.त्या शाळेतून शिकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांना ही माहिती मिळाली.रिकामी पदे लवकर भरतील यांची शास्वती नसते हे त्यांना माहित असल्याने शिकत असलेल्या मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल अशी रुखरुख त्यांना सतावू लागली. त्यामध्ये महेंद्र साळवी सर होते.त्यांनी शालेय सुधार समिती - ग्रामीण, मुंबई व पुणे ग्रामस्थ पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ मराठी आणि वेरळ ग्रामस्थ सामाजिक सेवा ट्रस्ट अशा समविचारी लोकांना एकत्र करून शाळा जगविण्याचा एक अनोखा मार्ग सर्वांसमोर ठेवला.आपल्या गावातील सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेत शिकवण्याची विनंती करायची.त्यांना नाममात्र मानधन द्यायचे.अर्थात गावातील अशा सेवानिवृत्त शिक्षकांशी साळवी सर , श्री . अनंत जाधव यांनी अगोदरच बोलून त्यांची तयारी असल्याची खात्री करून घेतली होतीच.
        आता प्रश्न होता शिक्षकांच्या मानधनाचा.जेव्हा योद्धा एखाद्या लढाईचा बेत आखतो त्यावेळी त्यांने सर्व बाजूने सज्जता केलेली असते किंवा त्याबाबतचा आराखडा त्याच्याकडे तयार असतो.साळवीसरांनी शालेय सुधार समिती -ग्रामीण, मुंबई व पुणे ग्रामस्य पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ मराठी , वेरळ ग्रामस्थ सामाजिक सेवा ट्रस्ट आणि माजी विद्यार्थ्यांकडे प्रस्ताव ठेवला.लोकांच्यासाठी लाॅटरीचा उपक्रम राबवायचा .आपल्याच ग्रामस्थांनी त्यांच्या पावत्या घ्यायच्या.मुंबई - पुण्यात राहणाऱ्या लोकांनी त्यात सहभागी होऊन निधी गोळा करायचा. पंचवीस टक्के रक्कम बक्षीसांसाठी व पंचवीस टक्के लोक रंजना करीता व उरलेली रक्कम शाळेसाठी खर्च करायची.जमलेल्या सर्वांनी या योजनेला हिरवा कंदील दिला.सदरचा उपक्रम हा ग्रामस्थांना समजून सांगण्यासाठी वाडीवार बैठका घेतल्या गेल्या.मुंबई पुण्याहून मान्यता मिळाली आणि काही दिवसातच गावभर पावती पुस्तकं फिरली.
            दोन तीन वर्षांपूर्वी जिर्णोद्धार केलेल्या रवळनाथ मंदिराचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने चाकरमानी गावात येतात त्यावेळी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित झाले.११ मे हा दिवस केवळ मंदिराचा वर्धापन दिवस . त्यानिमित्ताने चाकरमानी गावाला येतात .म्हणून त्या दिवसाच्या आसपासचा दिवस लाॅटरी निकाल जाहीर करणे,मनोरंजन कार्यक्रम करणे निश्चित करण्यात आले.
         एकंदरीत ग्रामस्थांनी आयोजकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे आयोजक खूष होतेच.कार्यक्रमाच्या अगोदर दहा दिवसांपर्वी त्याच ग्रामस्थांना एक सुखद धक्का दिला.त्याच दिवशी सकाळी दहा ते एक या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराची घोषणा केली गेली. नेत्रतपासणी, त्वचारोग,मधुमेह,ह्रुदय विकार आणि सर्वसामान्य अशा विभागातील लांजा शहरातील वैद्यकीय अधिकारी वेरळच्या शाळेत आणले गेले.ठरल्या वेळेत दिडशे रुग्णांची तपासणी झाली.सर्वांनी आयोजकांना आणि आलेल्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांना भरभरून दुवा दिल्या.रात्री " बाकी शुन्य " या नाटकाचा खेळ पाहून लोक सुखावून गेले.हिशेब झाला.
मनाजोगती रक्कम हाताशी आल्याने जून मध्ये शाळा भरण्याच्या पहिल्या दिवसापासून नियमीत शिक्षकांबरोबर सेवाभावी सेवानिवृत्त शिक्षकांनी हजेरी लावल्याने जि.प.प्राथमिक शाळा वेरळ मराठी खऱ्या अर्थाने परिपूर्ण भरली.
कुठलाही वर्ग शिक्षकाशिवाय नाही याचा आनंद विद्यार्थ्याबरोबर त्यांच्या पालकांनाही झाला.त्यांनी आपणहून प्रत्येक पाल्यामागे प्रतिमाहे रु पन्नास ची वर्गणी देण्याचे ठरवून माजी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला हातभारच दिला. आपल्यावरचे अधिकचे ओझे कमी झाल्याने नियमित शिक्षक ही अधिक उत्साहाने अध्यापनात रममाण झाले.
           वेरळचे हे माजी विद्यार्थी शाळेच्या बाबतीतला उपक्रम यशस्वी होत असल्याचे पाहून भारावून गेले. मागच्या शिबिरात नेत्र चिकित्सा केलेल्या रुग्णांपैकी पाच जणांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता.त्यांना तो खर्च करण्याइतपत तयारी नसल्याचे निदर्शनास येताच हे माजी विद्यार्थी पुढे झाले आणि त्या पाचही रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करुन दिल्या. यामध्ये श्री. उदय जाधव आणि वेरळ ग्रामस्थ सामाजिक सेवा ट्रस्ट यांचे मोलाचे योगदान आहे हे विसरून चालणार नाही .
         जिवाभावाच्या मित्राशी हितगुज करावं अशा प्रामाणिक हेतूने हा सगळा वृत्तांत साळवीसरांकडून माझ्याकडे आला.त्यांच्या त्या बोलण्यात मुंबई संस्थेचे अध्यक्ष -श्री संजय डाकवे, चिटणीस - श्री. गोपिनाथ पातेरे खजिनदार - श्री. प्रकाश साळवी आणि शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश गुणे  आणि सर्व त्यांचे पदाधिकारी अशी नावे असायची.कुणी मुस्लिम चाचा,बौध्द वाडीतील कुणीतरी दादा,कुणीतरी मेस्त्री दादा अशी गावातील अनेक मंडळीशी आदरपूर्वक फोनवरून बोलतांना साळवी सर गावातच वावरताहेत असं वाटायचं.
          यावर्षी अकरा मे च्या मोफत आरोग्य शिबीराकरीता लांज्याहून सुप्रसिद्ध डॉ. कुणाल जगताप  डॉ. प्रशांत पाटील डॉ. मनोज किंजळे 'डॉ.सुहास देसाई डॉ. दिक्षा चव्हाण आणि वेरळ ग्रामीण आरोग्य केंद्र लांजाचे डॉ. कांबळे आणि त्यांचा कर्मचारी वर्ग सेवा करीत होते.जणू काही गावात इस्पितळच उभारले आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं.जवळजवळ दिड - दोनशे रुग्णांनी या ठिकाणी आरोग्याची तपासणी करून घेतली. त्यासाठी त्वचारोग तज्ञ होते, मधुमेह तज्ञ, हृदयरोग तज्ञ ,डोळ्यांचे डॉक्टर ,दातांचे डॉक्टर आणि लहान मुलांचे डॉक्टर अशी सगळी मंडळी वेरळ गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत होते. सत्तर ते ऐंशी लोकांनी मोफत ईसीजी काढून घेऊन आपला वेळ आणि पैसा वाचविला. यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांचे मोलाचे योगदान आहे .त्यांनी आयोजकांचे कौतुक केल्यास नवल ते काय?
     ‌‌.     १२मे च्या रात्रौ ' वीररत्न बाजीप्रभू ' या नाटकाचा खेळ होता.रात्रौ ९ची वेळ दिलेली असल्याने सगळे कलाकार तयार झाले.मला नाटकपूर्व गौरव समारंभात उपस्थित राहायचं असल्यानं मी रंग फासला नव्हता.बाहेर प्रेक्षक दिसेनात.मी काळजीनं पत्रकार रवींद्र साळवींकडे पाहिले. ते म्हणाले " काय आहे गावात दोन ठिकाणी पुजा आहेत आणि एका ठिकाणी हळदीचं जेवण आहे.तिथं हजेरी लावून ग्रामस्थ येणार.गर्दी तुफान होणार हो." नाहीतरी गाव खेड्यातील लोक रात्रीचे जेवण उरकून दहा पर्यंत येतात हा माझा अनुभव खरा ठरला.अर्ध मैदान भरताच साळवी सर निवेदकाच्या भुमिकेत शिरले. मान्यवरांना पुढे बोलावून ग्रामविकासाच्या उपक्रमात ज्यांचे ज्यांचे योगदान होते त्या प्रत्येकाला पुढे बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतरही इथल्या शाळेत शिकवण्याचे काम करीत आहेत त्या श्रीमती पाध्ये, श्रीमती अंजलीताई गुणे, श्रीमती श्रावणी जाधव व स्काॅलरशिपचा वर्ग घेणाऱ्या श्री.प्रभाकर चव्हाणांचे नाव पुकारले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या त्यात कौतुकाची माझीही टाळी होती. माझ्या मनोगतात मी समस्त वेरळ वासियांचे मनापासून कौतुक केले कारण कोकणी माणूस नव्या वाटा चोखाळत नाही, दुसऱ्याचं कौतुक करीत नाही या वावड्या फोल ठरवीत आपल्या गावातील प्राथमिक शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारची वाट न पाहता आपणच पुढाकार घेऊन काम करायचे असते हा आदर्श उभ्या महाराष्ट्राला वेरळ ग्रामस्थांनी दिला आहे. त्याचा मी ही एक साक्षीदार आहे.हा विचार प्रत्येक गावात झाला तर प्रत्येक वर्गासाठी शिक्षक असावा लागतो ही ग्रामस्थांची धारणा आहे हे सरकारच्या लक्षात येऊ शकेल.सेवाभावी शिक्षकांचे मानधन अल्पसे का असेना त्यासाठी ग्रामस्थ आपल्या खिशात हात घालताहेत याची दखल सरकार घेईल.
एकूण काय तर मराठी शाळा जगविणे इथल्या जनतेच्या अस्मितेशी निगडीत प्रश्न आहे एवढं जरी सरकारला कळलं तरी तो वेरळ ग्रामस्थांचा विजय असेल.
           उशीरा सुरू झालेल्या नाट्यप्रयोगाला शाळा पटांगण भरून असलेला प्रेक्षक रात्री अडीच वाजेपर्यंत हलला नाही.ही किमया महालक्ष्मी कला मंचच्या कसलेल्या कलाकारांची होती. म्हणुनच कौतुकाचे शब्द ऐकवायला अनेक रसिकांनी रंगमंचावर येऊन कलाकारांना घातलेला गराडा कोकण दौऱ्यातील वीररत्न बाजीप्रभू या नाटकाचा शुभारंभ यशस्वी झाल्याची पोचपावती होती. शाळेच्या प्रगतीसाठी वेडे असलेले वेरळवासी आणि शिवचरित्र घराघरात पोहोचवीण्यासाठी वेडे असलेले महालक्ष्मी कला मंच चे कलाकार हे एकमेकांच्या वेडाचा आदर करतानाचे ते दृश्य मी ह्रुदयात  ठेवले आहे.

सुभाष लाड 
९८६९१०५७३४

**** वेरळ गावातील पर्यटन स्थळे -****
१) १७८० मध्ये पेशवाई काळात बांधलेला भवानीशंकर पाध्ये यांचा सत्तर खांब असलेला चौसोपी वाडा.
२) लक्ष्मी केशव मंदिर - स्थानिक सुतारांनी लाकडावर केलेले अप्रतिम कोरीव काम.
३) ग्रामस्थांच्या सहभागातून चालवलेली जि.प.प्राथमिक शाळा वेरूळ मराठी.
४) जांभा चिऱ्याचा उपयोग करून कलात्मक रित्या बांधलेले साई मंदिर.
५) आधुनिक पद्धतीने बांधलेले श्री देव रवळनाथ मंदिर.

*********** ग्रेट भेट **********
१) तात्यासाहेब गुणे - लेखक 
      नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले व संन्यस्त जीवन जगणारे उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व.
२) श्री.महेंद्र साळवी - आदर्श शिक्षक 
      आपले गाव आदर्श असावे यासाठी प्रत्येक ग्रामस्थांशी प्रेम भावनेने वागून त्यांचा ग्रामविकासात सहभाग घेतात.
संपर्क - 098903 06818

**********अभिप्राय *********
१)
       लाड साहेब.
नमस्कार 🙏
लांजा तालुक्यातील आदर्श वेरळ गावाविषयी आपली ओघवती भाषा शैली वापरून केलेले लिखाण वाचले मनाला फार आनंद झाला.शाळेसबधीआपली,असणारी तळमळ माझ्या अंगावर रोमांच उभे करून गेली.लांजा, तालुक्यांत भांबेड बीटमध्ये दोन वर्षे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करताना अनेक अनुभव मला आले.तुमची एक दोन वेळा कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट झाली मी तुम्हाला आठवणार नाही पण रिंगणे गावचे सुपुत्र आणि विद्यमान सरपंच संजय राव आयरे तसेच कोरले गावचे माझे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय बड्या हेगिष्टे यांनी मला प्रशासकीय सेवेत खुप मदत केली.दादा, आपल्या लिखाणातून सामाजिक शैक्षणिक प्रगती कशी करावी हे आपल्या समर्थ लेखणीतून समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची गरज मनाला भुरळ घालते.,वेरळचे पत्रकार रवींद्र साळवी साहेब व बौद्ध वाडीतील माझे मित्र भाई जाधव यांचा सहवास डोळ्यासमोरुन चटकन गेला आता असणाऱ्या विद्यमान सरपंच सौ. जाधव यांच्या निवडणूक काळात मीच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले या काळात संपूर्ण गावाने मला उत्तम सहकार्य केले.वेरळ गावात उत्तम शैक्षणिक काम करणारे चव्हाण सर हे मी खानू या केंद्रात केंद्रीय प्रमुख असताना खानू शाळेत उपशिक्षक या पदावर काम करत होते शिष्यवृत्ती परीक्षा उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांचा गौरव केलात मनाला फार समाधान झाले.,वीर बाजीप्रभू देशपांडे नाटकाचे पोस्टर बघूनच कलाकार किती उंचीचे आहेत याची जाणीव झाली.,लाड साहेब आपल्या अलौकिक कार्याला सलाम करून थांबतो.

प्रकाश कांबळे 
शिक्षण विस्तार अधिकारी,लांजा.
१/६/२०२४

२)
सर,
जो अनुभव मिळतो तो लेखणीतून आपण साकार करता, खरच एक वेगळीच उर्जा मिळते 
आणि काहीतरी करण्याची उमेद मिळते.

दीपक शिवाजी बारस्कर 
कवी

Thursday, May 30, 2024

कौतुक करु या ' अक्षर आयरे ' याचं

        
       आज पुन्हा एकदा अक्षय आयरे करीता ब्लॉग लिहित आहे.कारण त्याचा निखळ आनंद देणारा,अडीच तास आपल्याला बसल्या जागी खिळवून ठेवत  नृत्याची, अविट गाण्यांची मेजवानी देत रामायण काळात  घेऊन जातो तो  ' सुस्वागतम् रामराज्यम ' हा कार्यक्रम घेऊन   अक्षय आयरे  पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे.

        *********"  १४ जून रोजी सायंकाळी ७ वा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात,दादर पश्चिम व १६ जून रोजी सकाळी १०.३० वा.मीरा रोड येथील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे असे दोन खेळांचे नियोजन आहे.*****************
           अक्षय आयरे हा आमच्या रिंगणे गावचा सुपुत्र आहे.त्याचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरीनिमित्ताने मुंबईत आले.इथेच त्यांनी घर संसार थाटला.त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलांना घेऊन आपल्या रिंगणे गावी जाता आले नाही.त्यांच्या मुलांनी आपल्या मुलांना आपण रत्नागिरीतील रिंगणे गावचे आहोत हे सांगितले पण त्यांनाही आपल्या मुलांना आपल्या मूळगावी नेता आले नाही.दोन वर्षांपूर्वी अक्षयने माझ्या एका कलाकार मित्राकडे त्याने आपण रिंगणे गावचे आहोत हे सांगितले त्यावेळी त्याने माझ्याशी बोलणं करून दिलं आणि ते कुटुंब माझ्या संपर्कात आले.
        अक्षयच्या कार्यक्रमाबाबत अक्षयची आई श्रीमती रीमा आयरे माझ्याशी बोलत असते.असाच दादर येथे कार्यक्रम असतांना मी तो कार्यक्रम पाहिला. माझ्यासोबत सारे सभागृह स्वर्गीय सुख काय असते हे अनुभवत होते नव्हे त्या आनंदात न्हाऊन घेत होते.कार्यक्रम संपल्यानंतर अनेक मान्यवर रंगमंचावर जाऊन त्याचे कौतुक करीत होते .मी हे सगळं पाहात असताना माझी छाती अभिमानाने फुलून आली होती कारण हे बावनकशी सोनं माझ्या रिंगणे गावचं आहे हे मला माहित आहे.
         तमाम रिंगणे वासियांनाच नव्हे उभ्या रत्नागिरीला नव्हे तर अवघ्या कोकण वासियांना गर्व वाटावा अशा ताकदीचा कलाकार आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध आणि श्रीमंत करण्यासाठीं दिला आहे याचा अभिमान बाळगावयास हवा.सुप्रसिद्ध गीतकार ग.दी.माडगूळकर यांच्या समृद्ध लेखणीतून अवतरलेले व सुधीरजी फडके यांनी स्वरबद्ध करुन अजरामर केलेले रामायण हा मराठी सारस्वतांच्या लाभलेला हिरा आहे.तो हिरा मिरवण्याचे आव्हान धारिष्ट्य अक्षय आयरे याने स्विकारले व तेवढ्याच नम्रतापूर्वक ते जनता जनार्दनाच्या चरणी वाहण्याचे कौशल्य अक्षयकडे आहे. म्हणूनच भले भले त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.आणि जातांना तृप्त मनाने अक्षयचं कौतुक करुन आशीर्वाद देतात.
           अयोध्येला राम लीला विराजमान झाले आहेतच.कुणी अयोध्येला जाऊन दर्शन घेऊन आले असतील,कुणी त्या प्रतिक्षेत असतील.त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे.एक जीवंत रामायणाचा अनुभव घ्यायचा असेल तर एक वेळ अक्षय आयरे यांचं ' सुस्वागतम् रामराज्यम् 'बघाच आणि हो मुलांना आणलेत तर ती आनंदी होतीलच पण अक्षय आयरे आणि त्यांच्या कलाकारांसारख  नृत्य करावं असं त्यांना वाटू लागेल.नाहीतरी मुलांना मोबाइल पासून दूर कसे करावं हा प्रश्न तुम्हाला सतावतोय ना ?

सुभाष लाड 
९८६९१०५७३४

कार्यक्रमाची तिकिटे '' तिकिटालय '' या अॅपवर उपलब्ध आहेत.

तिकिटालय लिंक --------
https://www.ticketalay.com/event-details/suswagatam-ramarajyam/92


बोल कौतुकाचे
अक्षयच्या कर्तृत्वाचे---
https://youtu.be/sOVKqmh3caI?si=2KSN6F-zarRedeeX

काॅपी करून वाॅटसअप वर घ्या व पहा.
******* अभिप्राय ********
१)
शुभाषजी, माझ्या आईच्या माहेरच्या
गावचं हे नक्शीकान्त  बावनकशी 
सोनं आम्हा रिकोकुझ या परिसर 
वाशिय, तसेच  संपुर्ण महाराष्ट्र  आणि
हिन्दुस्थानभर  अक्षर  आयरे यान्चा जो आपण परिचय करून दिला आहात त्याबद्दल  आपले खूपखूप 
मनापासून  सहृदय अभिनंदन!
शुभाषजी, खरंच आपल्या हाती
एखादा लाल मातीचा कणही जरी
लागला ना, तर त्याचं परिशस्पर्शा
प्रमाणे सोनं करून  सोडता हो!
असंच आपलं प्रेम माया आपल्या
लाल मातीवर कायमच राहो !
ते आहेच म्हणा,ते वृद्धिंगत  राहो !
आपणास  खूपसारे धन्यवाद!

विश्वनाथ चव्हाण,कोंडगे
सामाजिक कार्यकर्ते 
२)
अक्षय आयरे...  
अभिनय करून कीर्तनकार आहेत . एक तरुण कीर्तनकार असल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते. 
आपल्या टीम मध्ये हे असे हिरे आहेत जे खऱ्या अर्थाने समाजासाठी चमकतात....मेहनत घेतात....
सर्वाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन.....👍

सुनील वागळे
चित्रकार,भांडूप