Wednesday, December 20, 2023

आणखी एक ग्रह निखळला !


               'माझी दिनदर्शिका' पोस्टात टाकण्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोस्टात जात होतो.चालत जायला मला आवडते पण दोन दिवस लोणावळ्यात घालवल्यानंतर थोडा शिण जाणवत होता तरीही मी चालतच होतो.सकाळचे अकरा वाजता ऊनही जाणवत होते.मोबाईल वाजला.बाळा चव्हाण नाव होते.नेहमीसारखेच कुठे आहेस या प्रश्नाचं उत्तर दिलं.तुला काही कळलं का ? हा पुढचा प्रश्न कधीतरी कुणीही विचारल्यावर ऐकणारा थोडा थबकतो तसा मी ही थबकलो ,जाग्यावर उभा राहिलो.मी नाही म्हटल्यावर " अरे आपला सुरेश गेला "
"कोण सुरेश ? "
" सुरेश परशुराम "
" काय ? कसं शक्य आहे ? परवाच आमचं  बोलण झालं,एकोणीस तारखेला त्याचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे आणि मी वीस तारखेला भेटायला जाणार आहे."
वस्तुस्थिती खरी असल्याचं मनाला पटत नव्हतं आणि शरीराला ते असह्य वाटत होतं.मी उन्हातच उभा राहून बोलत होतो याचेही भान नव्हते.पळत जावं आणि सुरेशला विचारावं 'हे सगळं तुला माहित असताना मला का खोटं बोललास ?' असा जाब विचारावा ,निदान शेवटचं दर्शन घ्यावं हे ही आता आपल्या हातात नव्हतं. त्याच वेळेला त्यानेच गोळा केलेल्या असंख्य प्रिय जनांच्या खांद्यावरून अखेरचा प्रवास सुरू झाला होता.किमान दोन तास अगोदर कळलं असतं तरीही पोहोचता आलं असतं.नशिबाला दोष देण्याशिवाय हाती काहीच नव्हतं.माझ्या सारखी अनेकांची तीच गत झाली.
             गेल्या तीस वर्षातले आम्ही काही दोस्त आहोत.आता सगळेच सेवानिवृत्त झालो आहोत.सगळेच राहायला दूर आहोत पण मनाने मात्र अगदी जवळ.आम्ही आमच्या तरूणपणात एकत्र आलो असलो तरी तेव्हाही आणि आताही शाळकरी मुलांसारखी निरागस आणि खेळकर मैत्री जगत आलो.अधाटे सरांनी पंच्याहत्तरी केलीय,सुरेश बहात्तरीचा  बाकीचे आम्ही चार आठच्या फरकाने लहान असलो तरी आवश्यक तो आदर ठेवून एकाच वयाचे होऊन जातो.गेल्या तीस वर्षांत अनेकांच्या वाट्याला दु:खद प्रसंग आले त्या त्यावेळी हातातले काम टाकून धावत जाणारे नऊ जण आम्ही एका मताचे होतो. सुखात जाणे हे होतच होते  जेव्हा आधाराची गरज असे तेव्हा प्रत्येकजण कोण पुढे पळे तो अशी भावना जपत आलो.
           आमची प्रत्येकाची वैयक्तिक जीवन जगण्याची रित वेगळी आहे.छंद वेगळे आहेत.पण मित्र म्हणून जगताना त्याचा अडसर कधी आला नाही किंवा माणूसपणाच्या वागण्यात कसूर जाणवली नाही. त्याला कारण आम्ही आमच्यातल्या माणसाचा जय करीत गेलो.यातला कोण कोणाच्या आयुष्यात कधी कसा आला हा वेगळा विषय होऊ शकेल.पण जेव्हा केव्हा आला तो जणू फार  वर्षांपासूनचा असल्यासारखा मिसळुन गेला. शेवटी आम्ही नऊ जण नवग्रहांसारखे वेगवेगळया राशींचे गुणधर्म घेऊन स्वतःभोवती फिरणारे पण निरागस मैत्रीच्या सूर्याभोवती फिरणारे.त्यातला एक ग्रह कोरोनाच्या काळात त्याच्या दुर्धर आजाराने निखळला.बारीक शरीर यष्टीचा प्रकाश अन्यायाविरुद्ध पेटून उठताना पहाडालाही टक्कर देण्याची हिंमत ठेवायचा हे त्याचे वैशिष्ट्य त्याने अंगातल्या कर्करोगाशी सामोरं जातानाही जपले होते.म्हणायचा " मरण कोणाला चुकलंय पण जगायचं ते वाघासारखे ". आणि तसंच जगला.मी शेवटचा भेटायला गेलो तेव्हा मलाच धीर देत म्हणाला " काही होत नाही रे मला." मी माघारी फिरून तासभरही  झाला नसेल आणि त्याने मान टाकली ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची पण जिथे अवघे विश्वच झुकते त्या नियंत्याच्या चरणाशी.
          आम्ही बृहन्मुंबई महापालिकेतील सेवा करून नियत वयोमानानुसार एकेक जण सेवानिवृत्त झालो.पहिले अधाटे सर. त्यांचा निरोपाचा कार्यक्रम पुढील सर्वांच्या साठी तो रिवाज ठरला.काही जणांच्यासाठी त्यांच्या शाळेतल्या मित्रांनी पुढाकार घेतला असेल तर आम्ही त्यात सहभागी झालो तर कुणाला आम्ही आमच्यापुरता स्वतंत्र कार्यक्रम करून त्याला मित्रत्वाची सलामी दिली.तसा स्काऊट गाईड  विभागात कार्यक्रम करून निरोप देण्याची प्रथा आम्हीच सुरू केली.त्याचे पहिले मानकरी डि.स्का.मा.श्री.नर हे ठरले.मग पुढे आमच्या सहवासात अल्पकाळ आला असेल पण आम्हा सर्वांना तो किंवा ती भावलेली असेल तर त्यांच्यासाठीही तो कार्यक्रम व्हायचा जणू मग ती प्रथाच पडून गेली.एक पुष्प गुच्छ किंवा प्रेमाची शाल देऊन त्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायला आमचे सुरेश पाटील बोईसरहून सकाळची गाडी पकडायचे..नलावडे बार्शीहून आदल्या दिवशी निघत.जीवन पाटलांच्या नात्यातलं कुणी दगावलेलं नसलं म्हणजे ते ही " मला लवकर निघायचंय " असा घोष करीत येणार.सुरेश पाटलांचं काही वेळा परखड मत असणार. " मला तो न पटलेला आहे ,मी येणार नाही पण तुम्ही जात असाल तर माझीही वर्गणी  घ्या." असं म्हणून विषय बंद करायचा.
        सुरेश मैत्रीसाठी विशाल सागर होता तर चुकीच्या माणसासाठी आग होता. तो प्रामाणिकपणाचा हिमालय होता तर आदरातिथ्यासाठी कपिला होता.होय त्याच्याकडे हे चार गुण होते आणि ते कमालीचे होते. या गुणांचं संवर्धन करताना त्याचे आर्थिक नुकसान झाले, मानसिक त्रास झाला पण सुरेश पाटलांनी आत्मसन्मानाच्या बाबतीत तडजोड केली नाही. हीच तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.पैशाच्या मागे धावता धावता सामाजिक भान विसरून स्वतःपुरता जगण्यात मश्गुल असलेल्या दुनियेत  दसऱ्याला लुटण्यासाठी आपट्याची पाने पसरून ठेवतात तसे ससमाजासाठी, मित्रांसाठी एवढेच काय गरजवंतासाठीही स्वतःला समर्पित करणारे सुरेश पाटील कदाचित कुणा अनोळखीसाठी ही अतिशयोक्ती वाटेल पण जो जो त्यांच्या सहवासात आला असेल तो तो ही उक्ती कमीच आहे असेच म्हणेल.
        ज्या काळात बोईसर मुंबई या रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या मर्यादित असतांना या परिसरातील शिक्षकांना शाळेतील मुलांना न्याय देतांना मोठी कसरत करावी लागे.सकाळच्या सत्रासाठी साडेचारला घर  सोडावे लागत असे.संध्याकाळच्या सत्रात काम  करणाऱ्यांना पाच वाजता शाळा सोडावी लागे.म्हणून ते शिक्षक मुख्य स्टेशनच्या जवळच्या शाळांची मागणी करीत. त्यांना मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागे.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुरेश पाटलांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे एखादा अधिकारी उद्दामपणाची भाषा करू लागल्यास ताठ मानेने जगणारा हा मावळा त्याला तात्काळ जमिनीवर आणायचा.
आदराची भाषा सुद्धा मग अरे तुरवर यायची.सुरेशचे ते रूप ज्याने अनुभवले ते कधी सुरेशच्या वाटेस आले नाहीत पण इतरांनाही ते सावध करायचे. पण तेवढाच हा दिलदार माणूस आपणाकडून काही चुकीचे झाले असल्यास त्यावेळी बिनशर्त माफी मागण्यास मागेपुढे पाहात नसे.असं नितळ स्वच्छ पाण्यासारखं त्याचं जगणं होतं.
        तो उत्तम गृहस्थी होता.कुटुंब वत्सल होता. नोकरीत असतांना त्याला कुटुंबाकडे मनासारखे लक्ष देता आले नाही. पत्नीही शिक्षिकाच असल्याने तिच्या सेवानिवृत्तीनंतर आपण ती कसर भरून काढू अशी आशा बाळगून असलेल्या सुरेशच्या नशिबाने इथे धक्का दिला. न समजलेल्या आजाराने परिसीमा गाठली.सुरेश ठाम उभा राहिला पण वैद्यांनी हात टेकले.वहिनी शांतपणे निघून गेल्या.उभं घर गारठून गेलं.सुरेशने अश्रूंचा अख्खा डोह आपल्या डोळ्यांत आटवला.मुलांना कवेत घेतलं " नियतीचा न्याय स्विकारायचा,आईचा संसार पुढे न्यायचा.नका रडू ".असं म्हणत मुलांना त्यांचा बांध फोडू दिला.स्वतः मात्र आई होऊन त्यांना जपत राहिला. आपल्या भंगलेल्या स्वप्नांचे  तुकडे केविलवाण्या नजरेत दिसू नयेत म्हणून  चेहर्‍यावर हास्य दर्शवू लागला.पण सुजाण मुलं आणि समजदार सुनांनी आपल्या घराच्या मुख्य खांबाला आधार दिला.त्याचं मजबूत राहणं किती आवश्यक आहे याचं भान त्यांना होतं. संस्कारांचं देणं योग्यवेळी परत करण्याचे ज्यांला कळलं तो श्रावणबाळ अन्यथा निसर्ग नियमानुसार जन्मास आलेली अपत्ये एवढीच ओळख.
           खचलेल्याला बाकीच्यांनी कितीही आधार दिला तरी तो हातात दिलेल्या काठीसारखा असतो पण जगण्याची उमेद आणि ताकद घरातल्या आपुलकीच्या वागण्यातून मिळते.वहिनी गेल्यानंतर सुरेश उभा होता तो मुले,सुना आणि नातवंडांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे. त्याच्या मनावर साधा ओरखडाही पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.असं सुख आजच्या जगात दुर्मिळ आहे याची जाणीव अनेक लोकांचे संसार पाहिलेल्या सुरेशला होती.त्यामुळे या गोष्टीसाठी आपण भाग्यवान असल्याचे तो मोकळेपणे बोलून दाखवी. त्यामुळेच त्याचे मित्रांना बोलावून त्यांना पाहिजे तसा पाहूणचार देण्याच्या त्याच्या सवयीत बदल झाला नाही. लोकांना त्यांना स्वतःला पाहिजे ते खायला मिळाले की समाधान मिळते .पण सुरेशचे समाधान दुसर्‍यांना मनसोक्त खाऊ घालण्यात होते.त्याच्या सूनांनी तो आनंद त्याला दिला म्हणून सुरेश जगत होता. त्याच्या सुनांचे कौतुक आहे आणि समाजासाठी आदर्श आहे.
          माझ्या व्यक्तिगत जीवनात माझ्या कलेवर व स्वभावावर ज्यांनी प्रेम केले, मला मोठं करण्यासाठी माझ्या सार्वजनिक उपक्रमात ज्यांनी निरलसपणे सहकार्य केलं त्यात सुरेश एक होता.माझा जसा तो सच्चा हितचिंतक होता तसा तो परखड समीक्षक होता. पहिल्या वेळी त्याने स्काऊट विभाग सोडल्यानंतर माझ्या विनंतीवरून परत आला. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या आदेशापेक्षा सुरेशचा सल्ला मानणारे लोक माझ्या विभागात होते आणि हे जेव्हा मारुती कांबळेनी मला सांगितले तेव्हा मी तडक त्याच्या शाळेत गेलो.काळ्या दगडावर रेघ मारून बाहेर पडलेल्या सुरेशच्या नसानसात स्काऊटींग होतं. मी त्याला त्याच्या आत्मसन्मानासाठी आश्वस्त केलं नी गडी तयार झाला.माझ्या डिस्ट्रिक्ट स्काऊट मास्टर पदाच्या कारकिर्दीत विभागाचे अनेक उत्तमोत्तम उपक्रम करू शकलो त्याला कारण मी सांगेन ती वस्तू  पुरवण्याचे काम तत्कालीन क्षेत्रसंघटक अधाटे साहेबांनी  केले तर कठिणातील कठिण प्रकल्प यशस्वी करण्याचे काम सुरेश पाटलांसारखे सहकारी करीत होते. माझ्यासारख्या नवख्या माणसाला कैक पावसाळे पाहिलेला  सुरेश पुढे नेण्याचे काम करतांना  स्वतःचे आभारही मानून घेत नसे. माझी गाणी त्याला फार आवडत.माझं वृक्षारोपणाचं गाणं तो मला त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत बोलवायचा. मी ही जायचो.  तिथेही काहीतरी खाऊ घेतल्यावरच आपण प्रेम दिले असा त्याचा समज असायचा.
         सुरेश ज्या शाळेत गेला त्या शाळेचा तो मुख्य शिक्षक ठरायचा. खात्याच्या नियमांचा चांगला अभ्यास,दप्तरी कामात हातखंडा, शिकविण्याच्या कामातला प्रामाणिकपणा, शिस्तीचा भोक्ता, त्यामुळे मुख्याध्यापकापेक्षा याचंच वजन शाळेत असायचं. एवढंच काय तर शाळेची ओळख याच्या नावाने व्हायची त्यामुळे काही जण चरफडायचे .पण सुरेश कुणाला भिक घालत नव्हता कारण तो स्वतः  एक खणखणीत नाणं होता.आणि हो तो श्रेयाला कधी पुढे आला नाही  हे ही त्याचं एक वैशिष्ट्य होतं.
          त्या दिवशी आमच्या पर्यंत निरोप आला नाही त्यामुळे शेवटच्या दिवशी सुरेश सोबत चालायचं राहून गेलं.आता फुरसतीनं सगळ्यांनीच जायचे ठरलं.अधाटे साहेबांच्या गुडघ्याचे दुखणे वाढल्याने त्यांना येणे शक्य नव्हते . अठरा डिसेंबरला सकाळी राजेंद्र नलावडे बार्शीहून ,जीवन पाटील पेणहून माझ्याकडे पवईला आले.पुढे कांदीवलीला बाळा चव्हाण गाडीत बसले. भालीवलीत प्रदीप भोईर व विलास भोईर  यांना घेऊन आम्ही सालवडला पोहोचलो.घर माणसांनी भरलं होतं.पडवीतल्या खुर्च्या भरत होत्या रिकामी होत होत्या. कसं झालं याशिवाय दुसरा प्रश्नच नव्हता.वैभव नेमकं काय झालं हे सांगत होता.काल होतं तेच घर पण कालचं चैतन्य आज नव्हतं.
          आम्ही तसे बरेचदा सुरेशच्या घरी गेलो पण आज आमच्यात प्रकाश नव्हता आणि तिथून माघारी फिरतांना " पुन्हा लवकर या रे " असे सांगत निरोप देणारा सुरेश नव्हता. आम्ही ही आता वयस्कर होत चाललो आहोत याचे भान आले. आमची गाडी परतीचा प्रवास करू लागली.गाडीचा वेग मंदावल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. आम्ही सुरेशच्या आठवणी जागवत होतो.

सुभाष लाड
9869105734
         


 

Sunday, December 3, 2023

गोष्ट एका एकत्र कुटुंबाची *

 


           महाराष्ट्रात सध्या काका पुतण्याच्या नात्याची जोरदार चर्चा आहे.त्यांचे भांडण आहे असे म्हणण्याची घाई करणे चुकीचे ठरेल परंतु प्रकरण कोर्टात गेल्याने रंग अधिक गडद झाले आहेत.असो पण त्यांनाच का दोष द्यावा ? विभक्त कुटुंब पद्धतीवर आम्ही प्रेम करू लागल्याने चार सदस्यीय कुटुंबावर आपण थांबलेलो आहोत.
त्यामुळे मुलाच्या जन्माच्या अगोदरच काका दुस-या घरात असल्याने काका पुतण्यांचे नाते काय असणार? असलेच तर प्रेम किती असणार ? मग नातेच नसेल तर भांडण कसे असेल? एवढे असले तरी अजुनही काही एकत्रीत कुटुंबे आपल्याला पाहायला मिळतात.काही कुटुंबातील सदस्य नोकरीनिमित्त पुण्या मुंबईत असल्याने आपसूकच वेगळ्या चुली होतात.परंतु ते जेव्हा गावी येतात तेव्हा गावच्या एकाच चुलीवरचे जेवतात तेव्हा ते एकत्र कुटुंब असे आपण  म्हणतो. अशात काही कुटुंबे फक्त चार दिवस कसेतरी ढकलायचे म्हणुन सुद्धा एकत्र येतात तर काही पिढ्यानपिढ्या हसत खेळत एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी होतात तिथे एक जिताजागता स्वर्ग बघावयास मिळतो.असेच एक आनंदी कुटुंब आज मला एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्याने बघावयास मिळाले.



          विद्यार्थीदशेत पाठांतराच्या निमित्ताने कवितेशी नाते जुळले आणि मनातल्या कल्पनांना शब्दबद्ध करण्याची सवय जडत गेली पण ती कविता वहीवर उतरावी ती कुणाला वाचून दाखवावी.अभिव्यक्त झाल्यानंतर उणेबरे ऐकावे,आनंदाने कधी मोहरून जावे असं कधी वाटलं नाही पण कवितेनं मात्र पाठ सोडली नाही.पुढे संसाराच्या वाटेवर नोकरी आणि गृहिणी ही तारेवरची कसरत करतांना कर्तव्याला झुकते माप देतांना बालपणी जडलेल्या अक्षर वाचनाचा छंद फुरसतीच्या वेळपुरता जपण्याच्या सवयीमुळे शब्दसंपदा वाढत गेली.प्रवासातल्या मोकळ्या वेळेत मनातल्या मनात आपसूक रूजणा-या काव्यपंक्तींनी फुलवलेला पिसारा क्षणिक सुखाच्यापुढे गेला नाही.वय वाढत राहिलं.कामाचा ताण शरीराला पेलवेनासा ठरत होता.जगण्यात नैराश्य येतंय की काय अशीही भिती जाणवू लागली.आपल्या पत्नीची ही कुतरओढ तिच्यातील कर्तृत्वाची पूर्ण माहिती असलेल्या पतीच्या नजरेतून सुटली नाही.काठ्या काड्या जमवून उभारलेल्या संसाराला जेव्हा चांगले दिवस दिसू लागले, जेव्हा एकट्याच्या कमाईतसुद्धा सर्वकाही भागवता येईल असा आशावाद आणि आत्मविश्वास दृढ झाला तेव्हा  पतीने पत्नीला तिच्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडले.तिचे वाचन आणि  तिचे आशयघन संभाषण पाहून तिने आपला छंद जोपासत मनसोक्त जीवन जगावे यासाठी आकाश मोकळे करून दिले.

         ज्या गावाकडच्या घरात अनेक पिढ्यातील मुले खेळली बागडली,अनेकांचे संसार फुलले,अनेकांच्या आयुष्यांचे छत्र बनून राहतांना स्वत:चे असे संस्कार दिले ते घर जिर्ण अवस्थेत आल्याने त्यास नवे रूप देण्याचे सर्वानुमते ठरले.एक दिवस ते कोसळण्याचे काम सुरू झाले.कुणीतरी अर्धवट पाडलेल्या घराला कॅमे-यात कैद केले.छप्पर नसलेल्या त्या उघड्या भिंतीचा फोटो ती पाहते आणि तिच्या मनात कविता जन्म घेते.यावेळेला मात्र ती कविता कागदावर उतरवते.मुलांनी वाचली त्यांनी वडिलांना वाचायला दिली,त्यांनी घरच्या इतरांना दिली.त्या कवितेचा सहज प्रवास सुरू झाला.ती फेसबुकवर फिरती झाली.अनेकांकडून कौतुक झाले.घर पुन्हा उभे राहिले.जुन्या घराचा प्रत्येक सभासद नव्या घरातही तेवढ्याच आनंदात राहू लागला.जुन्या घराची आठवण ज्या कवितेने जपली त्या कवितेला साजशृंगार करून सिंहासनावर दिमाखात विराजमान व्हावी तशी भिंतीवरच्या फोटोफ्रेममध्ये बसविण्यात आली.खरे पाहता त्या कवितेचा आणि  कवयित्रीचा तो राज्याभिषेक ठरला.वाटूळ गावच्या बांबरकर घराण्याच्या नव्याने डौलाने उभ्या राहिलेल्या नव्या घरात पाऊल ठेवताच कुणाचेही लक्ष ती फ्रेम आकर्षून घेते.ही कविता वाचली जाते.त्या कवितेच्या खाली नाव झळकतंय कवयित्री सौ.वीणा विश्वास चव्हाण.

          या एका कवितेने गेल्या अनेक वर्षात रूजू न शकलेल्या अनेक कवितांना पुढच्या दोन वर्षात नवसंजिवनी दिली.एक नाही दोन नाही तर साठ सत्तर कविता मोबाईलच्या नोटपॅडवर नाचू लागल्या.आम्हाला मुक्त करा म्हणून साद घालू लागल्या. कवयित्री मात्र आपल्या आनंदाकरीता लिहिलेल्या कविता इतरांना आवडतील का अशा साशंक अवस्थेत.किंबहूना कशासाठी त्या पुस्तकरूपात आणायच्या ? याच प्रश्नाभोवती फेर धरून होत्या.शेवटी एखाद्या जाणकार साहित्यिकाला दाखवून खरंच त्या पुस्तक रूपात आणण्यासाठी योग्य आहेत का हे जाणून घ्यायचे ठरले.अत्यंत साधेपणाने राहणा-या,भिडस्त स्वभाव असलेल्या कवयित्रीला पाहून प्रथम दर्शनी या कविता काय करणार असेच वाटेल.ज्येष्ठ कवयित्री योगिनी राऊळ यांनी कवितांचे हस्तलिखित हातात घेतले तेव्हा त्यांचाही भाव तोच होता परंतु जेव्हा एकेक कविता नजरे खालून जाते तेव्हा  हे काही वेगळंच पाणी आहे याची त्यांना प्रचिती येते.हे काव्यधन लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे याचा त्यांनी आग्रह धरला आणि  कवितेचा पुढचा प्रवास सुरू झाला.


          विराज चव्हाण हा एक तरूण सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासणारा नव्या पिढीचा शिलेदार.कोकणच्या मातीत बालपण शिक्षण झालेले असल्याने त्या मातीचे अनेक संस्कार त्याच्या बालमनावर कोरले गेले.मुंबईत नोकरीस आल्यानंतर त्या मातीपासून दूर राहतांना मनात उमटणा-या भावनांचा कल्लोळ त्याला स्वस्थ बसू देत नाही.त्या भावनांना कधी कवितेत तर कधी कथारूपात मांडून तो स्वत:ला मोकळे करतो.उद्याचा मोठा साहित्यिक आज त्याच्या लेखणीत दिसतो आहे.सौ.वीणा या त्याच्या सख्ख्या काकू कविता करताहेत हे जगाला सांगतांना त्याच्या डोळ्यात जी चमक उभी राहते ती नात्याचे गहिरेपण सांगते.त्याचे साहित्यातील मित्र मंडळ फार मोठे आहे.नुसते मोठे नाही तर एकमेकाला हात देऊन इतरांना मोठं करण्याची दानत त्यांच्याकडे आहे हे विशेष नमूद करतो आहे.त्याच मित्र परिवारातील नव्या दमाचा कवी आणि  प्रकाशक म्हणून सध्या साहित्य वर्तुळात सध्या चर्चेत असलेला गितेश शिंदे त्याच्या नवसृजन प्रकाशनामार्फत चांगल्या पुस्तकाचे सगळे निकष पार पाडून एक सुंदर पुस्तक तयार करतो.त्याचे नाव आहे ' अजुनही काही भावतं तिला '

         विराजचा मित्र परिवार पुन्हा आज एकत्र आला तो बोरीवलीतल्या प्रबाेधनकार नाट्य संकुलातील एका छोट्या सभागृहात.औचित्य होतं सौ.वीणा विश्वास चव्हाण यांच्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे.ज्येष्ठ कवी आणि  विशेषत:  आनंदयात्री ' या कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्रात सातशेच्यावर प्रयोग करणारे प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक राजेश देशपांडे,मोडीदर्पण दिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड,सुप्रसिद्ध लेखक-कवी अशोक लोटणकर, कवयित्री योगिनी राऊळ,प्रकाशक गितेश शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
           दिनेश मोरे यांच्या खुमासदार निवेदनाने रंगत चाललेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेणा-या रसिकांनी सभागृह भरून गेले होते.एकंदरीत हा कार्यक्रम एखाद्या घरचा लग्नविधी असावा अशा त-हेने चव्हाण कुटुंबातील आबालवृद्ध नटून थटून वावरत होते.किती काका किती काकू आणि किती पुतणे पुतण्या. आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती तिच्या अर्ध्या आयुष्यानंतर आपले मौलिक विचार घेऊन जगासमोर येते आहे.तिला कवियित्री हे संबोधन आजपासून मिळणार आहे या  सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे व त्यासाठी उपस्थित राहणारी सर्वच पाहुणेमंडळीचे योग्य ते आदरातिथ्य करावे यासाठी लगबग दाखवणारी चव्हाण कुटुंबीय मंडळी पाहून या एकत्रीत कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
     


         'अजूनही काही भावतं मला ' हे पुस्तक का वाचावं याबाबत सगळेच बोलले किंबहुना आज तोच बोलण्याचा विषय होता.परंतु या कार्यक्रमातून जे शिकायला मिळाले,बघायला मिळाले त्याचाही सहजपणे ऊहापोह झाला.आपल्या मातीतल्या माणसाला आपणच मोठे करायचे हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणा-या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या मुशीत घडलेले  विराज चव्हाण हे त्यांच्या काकीच्या पुस्तक प्रकाशनासाठी तळमळीने काम करतात हे अनेकांच्या भाषणातून अधोरेखीत होत होते याचाच अर्थ आज नात्यांची वीण सैल होत असतांना दिसते आहे अशावेळी सौ.वीणा विश्वास चव्हाण यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेला एकोपा भरकटलेल्या समाजापुढे आदर्श आहे.सौ.वीणाताईंना पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा देतांना त्यांच्या कुटुंबीयांतील एकमेकांबद्दलचे प्रेम ,आदरभाव वाढत जावा यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

सुभाष लाड 










*आपल्या जीवनाचे शिल्पकार गुरूवर्य शिर्केसर*

    


          हल्लीच कुणीतरी मला सहज विचारलं"आजकाल 
शिर्केसर वाॅटसअपवर दिसत नाहीत." मी मनात म्हटलं 'सर इतके बिन कामाचे आहेत का ऊठसूठ गुड माॅर्निंग लिहायला आणि देवांचे फोटो पाठवून लोकांचे मोबाईल भरून काढायला ?' पण समोरच्याचा रोख माझ्या लक्षात आल्याने सर कोणत्या कामात गुंतले आहेत याची त्याला माहिती दिली.
         लांजातल्या प्रसिद्ध न्य इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रशील आणि कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांनी आपल्या साखरप्या जवळच्या भडकंबा या गावी जास्त लक्ष घालतील याची आम्हांस जाणीव होती.अत्यंत गरीबीतून आलेल्या शिर्केसरांचा बालपणीचा व नोकरी लागे पर्यंतचा काळ कठिण होता पण कंबर कसून लाथ मारीन तिथे पाणी काढीन,खाईन तर कष्टाची भाकरी या बाण्यानं जगणारी त्यांची आई जोपर्यंत होती तोपर्यंत आईनं जी जमीन कसवली त्या जमिनीत शिर्केसरांनीही नांगर धरला.शनिवार रविवारची सुट्टी आणि इतर मोकळ्या दिवसांत सर दुचाकीवर टांग टाकून दिवसातून दोन दोन फे-याही मारत असत.पत्नीचा आणि  स्वत:चा चांगला पगार असूनही सर जांतीवंत शेतक-यासारखे शेतीची कामे करीत होते?.कारण एकतर कष्ट करण्यात ते लाजत नव्हते, स्वत: पिकवलेले अ़न्न खाण्यातला स्वर्गीय आनंद काय असतो हे त्यांनी अनुभवलेले होते.त्याचबरोबर ज्या शेतीने त्यांच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवले त्या शेतीकडे तू पाठ फिरवू नकोस हा आईचा संदेश आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत कसोशीने पाळला.त्यानंतरही त्यांनी शेती केली असती पण आजुबाजूच्या सर्वच शेतक-यांनी शेती टाकली.सरांनी एका हातात लेखणी आणि एका हातात नांगर धरला होता तो एका हातातला नांगर सुटला हे सांगतांना सर विवश होतात.
             सरांच्या आईचा  संसार तिच्या वडिलांनी आपल्या घरात उभारून दिला होता.पण मुंबईत श्रीमंतीत जगणा-या पतीचे अकाली झाल्याने वडिलांच्या निधनाने तिच्या संसाराचे छप्परच उडून गेल्यासारखे झाले.तिने वडिलांच्या घरासमोर स्वत:चे झोपडे उभारले आणि  गावात मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ केला,शिक्षण केलं,मुलींची लग्नं केली. बी ए बीएड झाल्यानंतर सरांना वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळेत नोकरी मिळाली पण लांजातल्या या हायस्कूलमध्ये कायम झाल्यानंतर आईसाठी स्वत:च आणि छानसं घर बांधून दिलं.आईला जसं पाहिजे तसं जगण्याचे दिवस आले परंतु आईनं तुझ्या पगारामुळे मी शेतात राबण्याच्या आनंदाला पारखी होणार नाही असं ठणकावून सांगितलं आणि शरीर साथ देईपर्यंत ही माऊली मातीशी मैत्री करून राहिली.
           आईने वास केलेल्या त्या टुमदार घरात सरांच्या सेवानिवृत्तीच्या अगोदर जाण्याची संधी मिळाली.पुढील पन्नास वर्षे तरी तर घर टिकून राहिले असते म्हणून मी सरामना म्हटले "थोडी डागडुजी करून घर तसेच ठेवा " पण घरातली चूल गेली ,पिरसा गेला आणि  घराला वाळवीनं पोखरलंय त्यामुळे नव्या पद्धतीनं घर बांधायचं असं ठरवलंय असे सरांनी सांगितलं.



          सरांच्या नंतर वर्षभरांनं बाईही सेवानिवृत्त झाल्या आणि सरांनी आपल्या नव्या घराच्या स्वप्नाला आकार देण्यास सुरूवात केली.सर संघाच्या कामात नेहमी पुढे असतात,त्यांची उपस्थिती लक्षवेधक असते परंतु 'घर बघावं बांधून 'हा अनुभव काय असतो याची जाणीव घर बांधणा-यालाच असते तरीही संघाच्या मुख्य कार्यक्रमात सर वेळ काढून उपस्थित असतात.
              महिन्याभरापूर्वी साळवीसर,हटकरसर व हर्चेकर सर असे आम्ही चौघेजण काही कामानिमित्त साखरप्याला गेलो असतांना आगंतुकपणे रात्री ९ वा.भडखंब्याला सरांच्या घरी गेलो.घर जवळजवळ पूर्णत्वास गेल्याचे दिसले.एक वेगळ्या त-हेने केलेली उभारणी बघतच राहावे अशी आहे.एका वेळच्या भाकरीला मौताद असलेला एक मुलगा आपल्या कष्टाने,आयुष्यभर ' जगाला प्रेम अर्पावे ' या साने गुरूजींच्या उपदेशाची प्रामाणिकपणे जोपासणी करीत भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक जागून उभ्या रत्नागिरीतील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत व नामवंत व्यक्ती असा प्रवास करणारे शिर्केसर आता दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्या नवीन घरातल्या साकारलेल्या स्वप्नातल्या झुल्यावर
'असे हे सारं सत्याचे' असे म्हणत सुखाचे झोके घेत असतील.
         आमच्या पिढीला स्वत:च्या वाढदिवसाचे एवढे कौतुक नाही.गेल्या तीस वर्षात त्याचे स्तोम वाढले आहे.सरांच्या नवीन घरात त्यांचा आज पहिला वाढदिवस आहे.आपण स्वत:च स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार ठरलो आहोत याचा सुखद आनंद त्यांनी आयुष्याचे शतक पार करूनही घेत राहावा यासाठी त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत त्यांच्या आयुरारोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.

सुभाष लाड