Saturday, December 13, 2025

🔆🔆🔆 माझी दिनदर्शिका🔆🔆🔆


        मोडी लिपी मित्र मंडळाने नुकताच सोळावा मोडी दर्पण दिवाळी अंक प्रकाशित करून मोडी लिपीच्या वाचकांसाठी ,अभ्यासकांसाठी आणि त्याचबरोबर मराठी साहित्य वाचकांसाठी एक रुचकर व ज्ञान गर्भी दिवाळी भेट दिली. गेले सहा दिवाळी अंक मोडी लिपी मित्र मंडळाने प्रकाशित केले असले तरी त्याच्या प्रकाशना करता राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मदतीसाठी धावून आलेला आहे. त्यामुळेच मोडी दर्पण दिवाळी अंक हा अधिक आकर्षक ठरला असून त्याचे प्रकाशन वेळेवर होत असून त्याच्या वाचकांची संख्या ही वाढलेली आहे. त्यामुळे मोडी दर्पण हा जसा मोडी लिपी मित्र मंडळाचा अंक आहे तसा असतो राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या कार्यकर्त्यांना तो आपलाच वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.

      राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही पंचाहत्तरी कडे वाटचाल करणारी कोकणातील सर्वात मोठी आणि क्रियाशील संस्था आहे. गेल्या दहा-बारा वर्षात या संघाकडे तरुण पिढीचा कल वाढलेला आहे. या तरुण पिढीला संघाच्या विविध उपक्रमात त्यांच्या विचारांचा आदर करून काम करण्याची संधी मिळते आहे. या पिढीला एकत्रित येऊन काम करायला आवडते त्याचप्रमाणे आनंद साजरा करताना सुद्धा त्यांना तसाच समूह आवश्यक असतो आणि म्हणून संघाने गेल्या अनेक वर्षापासून पावसाळी सहलीचे आयोजन करून तरुणांबरोबर वयोवृद्धांना सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही तरुण मंडळी मुंबईहून एकत्र गाडीने प्रवास करतात तेव्हा जाताना तसेच मुंबईत परतत असताना वाटेतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद लुटतात. या तरुण मंडळीमुळे वयोवृद्धांना सुद्धा आपला वाढदिवस केव्हा आहे याची आठवण होत असते. संघातील ज्येष्ठांची षष्ठ्यब्दी किंवा पंचाहत्तरी साजरी करण्याचा अनोखा कार्यक्रम याच तरुण मंडळीमुळे शक्य झालेला आहे. संघातील किंवा मोडी लिपी मित्र मंडळातील या कार्यकर्त्यांच्या जन्मतारखा सर्वांच्या समोर राहाव्यात या हेतूने दिनदर्शिका प्रकाशित करण्याची कल्पना समोर आली. या कल्पनेला मूर्त स्वरूप देताना या दिनदर्शिका चे नाव 'माझी दिनदर्शिका' असे ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर या दिनदर्शिकेच्या पहिल्या पानावरती आपल्या मातीतल्या कर्तुत्वान व्यक्तींना स्थान देऊन या व्यक्तीच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न होऊ लागला. यावर्षीच्या माझी दिनदर्शििकेच्या मुख्य्यपृष्ठावरती कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचे विलोभनीय छायाचित्र झळकते आहे.आतील पानांवरती ग्रामीण साहित्य संमेलनातील विशेष छायाचित्रे तसेच साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला त्या त्या गावातील नदीचे जलपूजन समस्त ग्रामस्थांच्या साक्षीने होत असते त्याचीही क्षणचित्रे माझी दिनदर्शिका आकर्षक करायला मदत करताहेत.


  शिवकालीन मोडी लिपीला आम्ही दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याच मोडी लिपीतील मुळाक्षरे आणि बाराखडी प्रत्येकाच्या घराच्या भिंतीवर पुढच्या पिढीच्या नजरेसमोर राहील असा प्रयत्न केलेला आहे. त्याच पानाच्या पाठीमागच्या पृष्ठावरती शंभर वर्षांपूर्वी पुण्यातील पुस्तक भंडारात खरेदी केलेला संत ज्ञानेश्वर कालीन मोक्षपट देण्यात आलेला आहे. नुकतेच आम्ही राजापूर तालुक्यातील उपळे गावातील २६५ वर्षांपूर्वीच्या जुन्या घराला भेट दिली. इसवीसन १७६५ मध्ये बांधण्यात आलेल्या या वाड्यात सध्या चौदाव्या पिढीतील डॉ .पार्थ प्रकाश काळे हे आपल्या पत्नीसह राहतात. ऐंशी फूट रुंदी आणि ऐंशी फूट लांबी असलेला चौसोपी वाडा आजही उत्तम स्थितीत असल्याचे पाहून तसेच त्या काळातील पत्रव्यवहार ग्रंथसंपदा आणि व्यवहारातील विविध वस्तू आयदाने योग्य तऱ्हेने सांभाळणाऱ्या प्रत्येक पिढीचे मनापासून कौतुक. आणि आज सुद्धा एवढा प्रचंड वाडा सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या डॉ. काळे व त्यांच्या सुविद्य पत्नीचे मनापासून आभार. कोकणाचे पर्यटन मूल्य वाढवणाऱ्या या वाड्यातील पंतोजीच्या मेजाच्या पाठीमागे भिंतीवर लावलेल्या मोक्षपटाने आमचे लक्ष वेधून घेतले. ही अनोखी भेट आपण आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवावी यासाठी प्रकाशित करण्याकरिता डॉक्टर काळे यांनी आम्हास परवानगी दिली त्याबद्दलही त्यांचे आभार.


         हिंदू सणांची माहिती, विवाह शुभ दिवस, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा व सार्वजनिक सुट्ट्या अशी परिपूर्ण माहिती असलेली माझी दिनदर्शिकेची सप्त रंगातील आकर्षक मांडणी व चांगल्या प्रतीचा गुळगुळीत कागद वापरून केलेली छपाई यामुळे माझी दिनदर्शिका संग्राह्य ठरली आहे याचे श्रेय ठाणे येथील कोठावळे प्रेसला जाते हे आम्ही मनापासून मान्य करतो !


         आम्ही आनंद नेहमी वाटून साजरा करत असतो त्यामुळेच माझी दिनदर्शिका प्रकाशित होताना आम्हाला होत असलेला आनंद आपणासही द्यावा यासाठी माझी दिनदर्शिका आपल्या घराच्या भिंतीवरती स्थानापन्न होणे आवश्यक आहे . माझी दिनदर्शिकेच्या तीन प्रती पोस्टाच्या खर्चासह रुपये १५० मध्ये घरपोच होतील.

 (डॉ.पार्थ काळे  यांच्यासोबत )

    खाली दिलेल्या क्यू आर कोड वरती रुपये १५० भरल्यानंतर आपणास मोबाईल वरती पावती मिळेल. ती पावती व आपला पिन कोड सहित पूर्ण पत्ता व्यवस्थापन प्रमुख श्री सचिन तावडे +918424904556 यांच्या मोबाईल वरती पाठवणे.

अधिक माहितीसाठी ९८६९१०५७३४ यावर संपर्क साधणे.


सुभाष लाड 

संपादक

मोडी दर्पण 


डॉ .पार्थ काळे यांचा संपर्क नंबर -+919226647028

Thursday, December 11, 2025

🕉️🕉️🕉️🕉️🕉️ मूर गावचे कर्मयोगी आबा सुतार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️


      परवा पाचलहून किशोर भाई नारकरांचा फोन येऊन गेला. संघाचे हितचिंतक संजयजी सुतार यांच्या वडिलांचे निधन झाले हे सांगण्यासाठी त्यांचा फोन होता. राजापूर तळवडे येथे संपन्न झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने  संजय सुतार यांच्या मूर गावच्या घरी माझे वरचेवर जाणे येणे होत असे. नव्वदी पार केलेले संजय सुतार यांचे वडील घराच्या ओटीवरच्या आराम खुर्चीत पहुडलेले असत. हसतमुख चेहऱ्याने स्वागत करताना आपण कोण कुठून कशासाठी आलात याची ते आस्थेवाईकपणे चौकशी करता करता स्वयंपाक घराकडे आवाज देऊन पाहुण्यांच्या चहापाण्याच्या व्यवस्था लावत असत. हळूहळू परिचय वाढत गेला आणि आमच्या गप्पा ही वाढू लागल्या. त्यांच्या गप्पा म्हणजे गेल्या नव्वद वर्षांचा इतिहास त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असे त्यामुळे मिळंदला माझ्या मुलीकडे जाताना सुद्धा मी  थोडा वेळ काढून त्यांच्याकडे जात असे. गणपती उत्सवाच्या नंतर मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो मात्र रात्र फार झाली होती आणि त्यांची ही तब्येत थोडी नाजूक वाटत असल्याने ते आराम करत होते त्यामुळे ती भेट काही होऊ शकली नाही याची मनाला खंत लागून गेली.


       वयाची शंभरी पार करतील अशा प्रकारची प्रकृती असलेले मूर गावचे कर्मयोगी सीताराम कृष्णा सुतार यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज, स्पष्ट बोलणे यात बदल जाणवत नव्हता त्यामुळे २४ नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे चहापान करून ते जिथे बसले तिथेच त्यांनी समाधानाने अलगदपणे डोळे मिटले. त्यांचा मृत्यू कर्मयोग्याला साजेसा होता. वारकरी संप्रदायातील लोकांच्यासाठी प्रसिद्ध असलेले बुवा सुतार व उभ्या परिसरातील लोकांना आपले आबा सुतार  गेल्याचे दु:ख झाले.म्हणुनच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती.

         आबांचा जन्म सुतार घराण्यात झाला असल्याने उपजतच सुतारकला त्यांच्याकडे होती.ते जन्मले त्याकाळात सुतारांना गावातल्या शेतकऱ्यांना सुतार कामाची सेवा द्यावी लागत असे. त्याबद्दल सुतारांना शेतकऱ्यांकडून धान्य मिळत असे. ती कुळ पद्धती त्यावेळेला अस्तित्वात होती. आपण एका मोठ्या कुटुंबात जन्मलेलो असल्याने एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करताना आपण कुळांच्या कामावर अवलंबून राहिलो तर आपल्याला प्रगती साधता येणार नाही आणि म्हणून वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि स्वतंत्रपणे मुंबई,ठाणे, पालघर अशा दूर भागामध्ये सुतारकाम करायला सुरुवात केली. विश्वकर्माचा वरदस्त असलेल्या आबांच्या हातात लक्ष्मी आणि मुखात सरस्वती असल्याने आबांचा लोकसंग्रहही तितकाच दांडगा होता.पालघरचे तत्कालीन खासदार शांताराम घोलप यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते.  

(मूर गावातील श्री काळेश्वर विद्यालय या विद्यालयाच्या निर्मितीत आबा सुतार यचा मोठा सहभाग होता.)

        उमेदीची पन्नास वर्षे दूरच्या प्रदेशात राहिल्यामुळे आबांना बारा गावचे पाणी चाखता आले होते. ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीत बरीचशी भर पडली होती. बऱ्यापैकी पैसा कमावल्यामुळे घरची परिस्थितीतही आता बदल जाणवायला लागला होता. आबांना आता गावाकडचे वेध लागले. आबांनी गावाकडे काम करायला सुरुवात केली.आबांसोबत काम करणारे पाच पंचवीस कारागीर असल्याने ते मोठ मोठ्या घरांची आणि देवळांची कामे घेत. कामातील प्रामाणिकपणा, दर्जेदारपणा आणि दिलेल्या वायद्याचे भान ठेवून काम करणाऱ्या आबांना लांबलांबची कामे मिळत गेली.आजही वेगवेगळ्या ठिकाणच्या वास्तू आबांच्या कलात्मकतेची साक्ष देत उभ्या आहेत.

  

( सुतारवाडीतील मुलांच्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.५ च्या निर्मितीत आबांचा पुढाकार होता.)        

आधी प्रपंच करावा नेटका ।

मग द्यावे परमार्थ विवेका ।।

प्रपंच सोडून परमार्थ कराल ।

तेणे तुम्ही दुःखी व्हाल ।।

प्रपंच सांडून परमार्थ केला ।

तरी अन्न मिळेना खायला ।।

मग तया करंट्याला ।

परमार्थ कैसा ?

         आबांच्या जीवन शैलीचा विचार करतांना त्यांच्यावरची साधू संतांच्या विचारसरणीचा मोठा पगडा असलेला दिसतो. त्याकाळात घर भरून मुलांची संख्या असायची.आबांना तीन मुलगे आणि पाच मुली पण त्यांचा त्यांना कधी भार वाटला नाही. उलट गावातच राहिल्यामुळे त्यांच्या सर्व मुलांचे योग्य तऱ्हेने त्यांना शिक्षण करता आले.मुलींना आवश्यक ते संस्कार आणि जगण्याचे धडे देऊन योग्य वेळी त्यांना संसार मार्गावर सोडले.तीनही मुलांनी गावातच राहून त्यांचं त्यांनी आयुष्य जगावं या दृष्टीने त्यांना शिक्षण दिले, घरच्या व्यवसायाचे धडे देतांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळवून दिला, सामाजिक बांधिलकीचे बंधन दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून जगण्याचं बाळकडू कोळून दिल्याने त्यांची तीनही मुलं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तुत्वाने समाजात एक आदराचे स्थान निर्माण करू शकली एवढेच काय पण आबांनी त्यांच्याही मुलांना अर्थात नातवांना उच्च शिक्षण देऊन कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर कुणी व्यावसायिक होऊन तिसरी पिढी स्वावलंबी होऊन मार्गस्थ होताना पाहिली म्हणूनच एक यशस्वी बाप म्हणून तसेच एक कृतकृत्य आजोबा म्हणून जगताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती तेज झळकत होते.

 ( आबांनी गावातील वारकऱ्यांच्या साठी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बांधकामात पुढाकार घेतला. येथील मूर्ती पंढरपुराहून आणलेली आहे.)

         आबांनी त्यांच्या वाट्यास आलेल्या प्रत्येक नात्याला न्याय दिला.ते एक आदर्श पुत्र होते म्हणून ते आपल्या मुलांना आदर्श पुत्र बनवू शकले.ते आदर्श भाऊ होते म्हणुनच त्यांची मुले हृदयास हृदय देऊन एकत्र कुटुंबात आनंदाने राहात आहेत. त्यांनी पती होऊन आपल्या पत्नीला योग्य तो आदर सन्मान दिला. तोच संस्कार मुलांपर्यंत आला त्यामुळे त्यांच्या सुनांनी या घराला हसऱ्या खेळत्या गोकुळाचे स्वरूप दिले. कुटुंबप्रमुख होणे सोपी गोष्ट नाही. कुटुंबप्रमुखाला सर्वात प्रथम कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग प्रशस्त करावा लागतो. घरात भरून आणलेली पाण्याची घागर ही त्याच दिवशी रिकामी होते त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सुद्धा भरून आणावी लागते याचे भान कुटुंबप्रमुखाला असावे लागते आणि म्हणून प्रथम त्याने श्रम प्रतिष्ठेला महत्त्व द्यावे लागते तरच कुटुंबातील माणसं त्याला मदत करायला हाताशी येतात. कुटुंबप्रमुखाला प्रत्येकाचे श्रम कौशल्य माहीत असावे लागते. त्या श्रम कौशल्याला योग्य ते स्वातंत्र्य दिले तरच त्या श्रमाला आकार येतो. कुटुंबप्रमुख हा त्या कुटुंबाचा राजाच असतो परंतु ते राजेपण रयतेनं स्वतःहून दिलं पाहिजे त्यासाठी कुटुंबप्रमुखाला प्रत्येक सदस्याला प्रेम आदर देताना त्यांचीही करंगळी या संसाररुपी गोवर्धनाला उचलण्यासाठी आवश्यक आहे याची जाणीव ठेवून त्याचे महत्त्व अधोरेखित करावे लागते त्यावेळेला त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हे कुटुंब माझे आहे ही जाणीव प्रोत्साहित करते व तो कुटुंबाशी अधिक जोडला जातो.

( कर्त्या पुरुषाचा प्रेमळ धाक कुटुंबावर असेल तर कुटुंब गुण्या गोविंद्याने नांदते. आबांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबाने प्रेमच दिले.)

         एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्त्व कोकणा इतके जगाच्या पाठीवर कुणालाही कळले नाही.मात्र एकत्र कुटुंबाची मर्यादा कुठपर्यंत असावी याचे भान कोकणाला असल्याचे क्वचित ठिकाणी जाणवते. इथली संयुक्त कुटुंबे अचानक विभक्त होताना दिसतात तेव्हा वादविवाद आणि कटुता निर्माण झालेली दिसते. आबा सुद्धा अशा संयुक्त कुटुंबातून आपल्या कुटुंबाला घेऊन बाहेर आले मात्र ज्या कुटुंबात आपण वाढलो घडलो त्या कुटुंबाशी तेवढ्याच सलगीने, प्रेमाने आपण का विभक्त व्हायचे याची चर्चा करून कोणतीही कटूता न ठेवता सर्व संमतीने ते बाहेर पडले. व्यावहारिक दृष्टिकोनातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे आकाश त्याला देण्याची आवश्यकता असते. एकाच घरात दोन चुली मांडण्यापेक्षा स्वतंत्र घरात चूल मांडून त्यांचे त्यांना जगण्याची संधी दिली तर त्यांच्या कर्तृत्वाला ही जागा मिळते आणि दोन्ही घरातली ताकद ही अबाधित राहते. आपले पारंपारिक घर आबांनी आपल्या बंधूंना सपूर्द करून गुरांचा गोठा असलेल्या जागेत आपल्या कुटुंबासाठी नवे घर बांधले आणि त्या ठिकाणी एका नवीन सृष्टीची त्यांनी निर्मिती केली. चौतीस वर्षांपूर्वी एका टेकडीवर बांधलेल्या आबांच्या घरात केवळ आबांचीच मुले मोठी झाली नाही तर त्यांनी आपल्या भावांच्या मुलांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी या घरातून प्रेम आपुलकी दिली.

( मूरगाव ची ग्रामपंचायतीची इमारत)

           आबांची दोन मुलं दोन दोन वेळा मूरगावच्या ग्रामपंचायतीच्य सरपंच पदी बसली. त्यांच्या एका सुनेला  रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे जरी त्यांचे कर्तृत्व असले तरी एक पार्श्वभूमी म्हणून आबांनी केलेल्या गावातल्या विकास कामांचं मोठं योगदान कारणीभूत होतं. सुतार कुटुंबाची सामाजिक कार्याबद्दलची ओढ अधोरेखित करतांना १९५५-५६ च्या दरम्यान मूर खिंड तोडून तिथे श्रमदानातून रस्ता करण्याचे साने गुरुजींच्या प्रेरणे सुरू झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या श्रमसंस्कार शिबिरातून झाले.

ज्येष्ठ साहित्यिक ना.ग.गोरे यांच्यासारख्या महनीय व्यक्ती त्यात सहभागी होत्या. ह्या शिबिरार्थींच्या बरोबर गावातले काही हात त्या कामाला लागले त्यातील एक हात आबा सुतारांचा होता.

*' तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून

उद्या पिकेल सोन्याच रान

चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार

तुला नव्या जगाची आण '*

वसंत बापटांच्या या गाण्याचा जन्म याच खिंडीतल्या श्रमसंस्कार शिबिरात झालेला आहे.

         मूर गावात पोस्टाची सुविधा आणतांना आबांनी आपल्या घरातील जागा उपलब्ध करून दिली. आपल्या वाडीवस्तीवरील लहान मुलांना प्राथमिक शाळेत जाण्यासाठी फार दूरवर जावे लागते याची जाणीव ठेवून आबांनी आपल्या वाडीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.५ ची मागणी केली. शाळेला मंजुरी मिळाली परंतु इमारत बांधणं सहज शक्य नव्हतं त्यामुळे इमारत उभी राहीपर्यंत चार वर्षे आबांनी आपल्या घरात प्राथमिक शाळा भरवली. पुढे इमारत बांधल्यानंतर या शाळेची प्रगती गावाला नावलौकिक देऊन गेली त्या शाळेला आदर्श प्राथमिक शाळा असे संबोधण्यात येते. गावातल्या मुलांना सातवी नंतरच्या पुढच्या शिक्षणासाठी पाचल पर्यंत जावे लागे. त्याही पलीकडील काजीर्डा, वाळवड सारख्या गावातील मुलांना ते अधिक अंतर होते. मूर गावात हायस्कूलची निर्मिती करावी हा पहिला विचार मांडणाऱ्यांमध्ये आबा सुतार अग्रेसर होते. सर्व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने १९८०/८१ साली मूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल सुरू झाले आणि अनेक मुलांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबली. मूर व वाळवड येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मूर वाळवड सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. आबांनी त्या सोसायटीचे चेअरमन पद भुषवले आहे.सात्विक स्वभावाच्या आबांचा अध्यात्मिकतेकडे प्रचंड ओढा होता.संसाराच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होतांना आबां आता आपला वेळ वारकरी संप्रदायासाठी व्यतित करू लागले. गावातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना घेऊन पंढरीची वारी करू लागले आणि अशातूनच केशव गुरवांच्या आजोबांना घेऊन गावामध्ये श्री विठ्ठल रुखुमाई चे मंदिर बांधून पंढरपुरातून मुर्त्या आणून बसवल्या व त्याच वर्षापासून हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. आज मोठा वर्ग वारकरी संप्रदायात एकवटलेला आहे. मूर गावच्या परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने या मंदिरात येतात इथल्या हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. दूर दूर चे किर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, मृदुंगमणी, गायक, धरकरी अशी अनेक प्रकारची मंडळी इथल्या हरिनाम सप्ताहाचा आनंद घेत असतात. गावाला तेव्हा उत्सवाचे स्वरूप आलेले असते.

           पत्नी सुलोचना, मुले रामचंद्र, भास्कर व संजय, सुना ,नातवंडे, पणतवंडे तशीच भावाची मुले, सुना, नातवंडे, याचबरोबर मुली आणि त्यायोगाने जोडलेले अनेक नातेवाईक, मित्रपरिवार असे मोठे नांदते गोकुळ मागे ठेवून जाताना आबा थोडेही विचलित झाले नाहीत. या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर जे कर्म आणि कर्तव्य करावी लागतात ते सर्व काही आबांनी आनंदाने पूर्ण केले होते. माणूस म्हणून जगण्याचे दिलेले संस्कार  त्यांच्या पुढच्या पिढीत संस्कारीत झाले आहेत याची त्यांना खात्री झाली होती त्यामुळेच त्यांनी निश्चिंतपणे हे जग सोडले.

अवघीच तीर्थे घडली एक वेळा l

चंद्रभागा डोळा देखिलिया ll

अवघीच पापे गेली दिगंतरी l

वैकुंठ पंढरी देखिलिया ll

अवघिया संता एक वेळा भेटी l

पुंडलिक दृष्टी देखिलिया ll

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक l

विठ्ठलची एक देखिलिया ll

        त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात हाच अभंग रुंजी घालत होता. त्यांच्याच खांद्यावरुन जन्मा आल्याचे सार्थक प्रसन्न चेहऱ्यावर घेऊन कर्मयोगी आबा सुतार अर्थात ह.भ. प. सिताराम कृष्णा सुतार वैकुंठीचा प्रवास करत होते.

*सुभाष लाड*

अध्यक्ष

राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई


'कोकण मीडिया' या सुप्रसिद्ध साप्ताहिकाने अण्णांचा श्रद्धांजलीपर लेख प्रकाशित केला.


       

अभिप्राय ---------

डॉ.विजयालक्ष्मी देवगोजी,

आपण लिहिलेली श्रमजीवी काशिनाथ चव्हाण व कर्मयोगी आबा सुतार यांची व्यक्तिचित्रणे व हनुमान मंदिर विषयीच्या अत्यंत सुखद अशा आठवणी वाचल्या . या दोघा  व्यक्तींविषयी आपल्या मनात किती आदराची भावना आहे हे शब्दाशब्दातून प्रतीत होते. यांचे कार्यही तेवढेच महान आहे. आपल्या लेखनातून त्यांचे संपूर्ण उत्तुंग असे व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. अशा व्यक्ती समाजात असल्यामुळेच एखाद्या गावाचा किंवा समाजाचा विकास आणि भरभराट होत असते. काशिनाथ चव्हाण यांनी वाचनालयासाठी घेतलेल्या निर्णयावरूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण ओळख व्हावी. विद्यालय असो वा मंदिर किंवा गावाच्या प्रगतीसाठी 

आबांनी जे कार्य केले त्याला कुठेही तोड नाही. आपल्या शब्दसुमनाने या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाला आपण अत्यंत आदराची मानवंदना दिलीत, ब्लॉकच्या रूपात ही व्यक्तिमत्वे आपण सर्वदूर पोहोचवलीत हे आपलेही कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. 

        आपले गाव तेथील आमची मंदिरे हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मर्मबंधाची तील ठेवच असते हनुमान मंदिराच्या परिसरा भोवतीचा निसर्ग, इतिहास आणि अनेक आठवणी यामुळे स्मरणरंजन होऊन प्रत्येक वाचकाच्या मनात देखील त्याच्या आठवणीत दडलेल्या अनेक सुखद स्मृती जाग्या होतात.

         अत्यंत वाचनीय असे तीनही ब्लॉग.


विठ्ठल कुसाळे,

एका कर्मयोग्याचे दुसऱ्या कर्मयोग्याने शब्दबद्ध केलेले भावस्पर्शी, हृदयस्पर्शी शब्दांकन!....... 🙏🙏

Saturday, December 6, 2025

📚✒️📚✒️📚श्रमाची आवड असलेले काशिनाथ चव्हाण📚✒️📚✒️📚


       श्रमाची आवड असलेली माणसं सतत कामात असतात.काम करीत राहण्यातच त्यांना आनंद मिळत असतो. त्यामुळे ती माणसं कधी दुःखी असत नाहीत. शेती करणारी माणसं दिवस उगवायच्या आधी घराबाहेर पडतात आणि दिवस मावळेपर्यंत रानातच राबत असतात. कोकणात लावणीच्या वेळेला आणि ऐन सुगीच्या वेळेला इथल्या माणसांची तारांबळ बघण्यासारखी असते. भात लावणीच्या वेळेला पाऊस असेपर्यंत पाण्याची सोय होत असल्याने अधिक वेळ देऊन लावणी करायची असते. आणि सुगीच्या वेळेला पाऊस येण्याच्या आधी भात कापणी करून , त्याचे भारे बांधून ते सुरक्षित ठिकाणी हलवायचे असतात. दोन्ही वेळेला शेतकऱ्याला पळायला लावणारा पाऊसच असतो आणि म्हणून कोकणातील पावसाला ' आला तरी मेला आणि नाही आला तरी मेला ' असे ऐकून घेण्याची सवय झालेली आहे. हे असे वेळेबाहेर काम करणे शेतकऱ्याच्या आवडीचे असले तरी त्याच्याकडे कामास आलेल्या मजुरांना तेवढेसे देणे घेणे असत नाही आणि आठ तास कार्यालयात काम करणाऱ्या माणसाला याचे सोयर सुतकच असत नाही. भारतावर राज्य करून गेलेल्या इंग्रजांनी बऱ्याच काही गोष्टी भारताला दिल्या त्यातील आठ तासाची नोकरी हे इंग्रजांचे देणं आहे. एका दृष्टीने शरीर प्रकृतीसाठी ठीक असलं तरी या नियमाचा लाभ उठवताना कामाचं गांभीर्य आणि माणुसकी विसरणारे ही कर्मचारी आपल्याला दिसून येतात. पण वेळेच्या बाहेर जाऊन काम करणारे ही काही लोक आढळतात. पण त्या व्यक्ती अपवादात्मकच असल्यामुळे अशा लोकांना इतर लोक नावं ठेवत असतात किंवा टोचून बोलत असतात.


         कोंडग्याचे काशीनाथ चव्हाण रिंगणे हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असल्यापासूनचे आमचे मित्र पण त्याही अगोदर त्यांचे आई वडील आणि माझे आई-वडील हे वाट्याने शेती करीत असल्यामुळे कौटुंबिक घरोबा होता हे आजही आम्ही विसरलेलो नाही. त्यांचे वडील लवकर वारले आणि वाट्याने शेती करणे बंद झाले. पुढे आम्ही मुंबईला आलो आणि काशिनाथ चव्हाण हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्याच गावच्या रामेश्वर विद्यालयात विज्ञान परिचर या पदावर नोकरीस लागले. तिथे असलेले मुख्याध्यापक गो.ना चव्हाण सर हे आम्हा दोघांनाही रिंगणे हायस्कूलला शिक्षक असल्याने आणि विशेषता मुलांत मिसळून वागण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते नेहमीच आमचे आवडते राहिले. कोंडगे हायस्कूलला गेल्यानंतर चव्हाण सरांचीही भेट होई आणि काशिनाथ चव्हाण ही भेटत.


         काशिनाथ चव्हाण दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. पण त्या शाळेच्या पदावरून ते निवृत्त झाले असले तरी शाळेबाबत असलेली त्यांची ' माझी शाळा ' ही आपुलकीची भावना त्यांना नेहमीच शाळेकडे ओढत असते. काशिनाथ चव्हाण यांना तशी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे गावातल्या अनेक संस्थांमध्ये त्यांचा नेहमी वावर असतो. नोकरीमुळे त्यांना त्या काळात वेळ देता येत नव्हते म्हणून त्यांना जबाबदारीची पदेही स्वीकारता येत नव्हती. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पुरेसा वेळ आहे आणि मुळात श्रम करण्याची आवड आहे त्यामुळे आता ते सार्वजनिक संस्थांमध्ये अधिक सक्रिय झालेले असल्याचे दिसते.

         कोंडगे गावात १९९४ च्या दरम्यान ज्ञानगंगा वाचनालयाची निर्मिती झाली.पहिल्या अध्यक्षस्थानी गो.ना.चव्हाण होते. वाचनालयाच्या निर्मितीमुळे गावातील शिकल्या सवरलेल्या लोकांना वाचनाची आवड जोपासण्याची चांगली संधी मिळाली. शाळेत शिकणाऱ्या मुलांना अवांतर वाचनाची भूक भागवता आली आणि शाळेतील शिक्षकांना संदर्भ ग्रंथ किंवा अभ्यासक्रमास पूरक असलेली पुस्तके मिळू लागल्याने शिक्षकांना प्रकल्भतेकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला. संघाचे ११ वे ग्रामीण मराठी  साहित्य संमेलन रिंगणे गावी होत असून त्या संमेलनात कोंडगे, कुरंग , झर्ये या गावातील लोकांनाही जोडून घ्यायचे असल्यामुळे गेल्या महिन्यात कोंडगे गावी महेश विश्वासरावांच्या अंगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला ज्ञानगंगा वाचनालयाच्या संदर्भात चर्चा झाली. वाचनालयाचे अध्यक्ष श्रीधर विश्वासराव यांनी काही चांगल्या सूचना केल्या. पुढे जाऊन या वाचनालयात दिवाळी अंकांचं प्रदर्शन मांडून ते दिवाळी अंक सुरक्षित जपून ठेवण्याचा उपक्रम सुरू करावा या दृष्टीने वाचनालयाचे अध्यक्ष श्रीधर विश्वासराव यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी होकार दिला. त्या अगोदर मी वाचनालयाचे ग्रंथपाल गौतम जाधव यांच्याशी बोलणे केले होते त्यांना तो उपक्रम चांगला वाटला. त्यांनी मी अध्यक्षांशी बोलावं असं मला सांगितलं आणि म्हणून मी श्रीधर रावांशी बोललो. अध्यक्ष या पदावरून घेतलेला झटपट निर्णय मला कौतुकास्पद वाटला. श्रीधरराव हे सुद्धा रामेश्वर विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले त्यांचा सुद्धा येथील अनेक संस्थांमध्ये उत्स्फूर्त सहभाग मी पाहिलेला आहे. ही गावाकडे राहणारी मंडळी गावच्या संस्था अधिकाधिक पारदर्शी असाव्यात, संस्थांद्वारे जनतेला प्रामाणिक सेवा मिळावी यासाठी झटत असते. या मंडळींना पदाची गरज वाटत नाही मात्र काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असते कारण यांना श्रम करावेसे वाटतात. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर मराठी माणसाबद्दल ' आम्हाला पगार हवाय आम्हाला काम नकोय ' असे बोलतात त्यावेळेला ते खरेही वाटते मात्र त्यालाही काही अपवाद असतो हे काशिनाथ चव्हाण आणि श्रीधर विश्वासराव यांच्याकडे बघितल्यानंतर हे ठामपणे सांगता येते.


         त्यानंतर काही दिवसांनी मी श्रीधर विश्वासराव यांना फोन लावला पण तो लागला नाही म्हणून त्यांना निरोप द्यावा या हेतूने काशिनाथ चव्हाणांना फोन लावला. श्रीधर विश्वास रावांना काय निरोप द्यावा हे मी जे सगळं सांगितलं ते त्यांनी ऐकून घेतलं. शेवटी मला म्हणाले " मी हे सगळं श्रीधर रावांना सांगतो पण वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून आता माझी निवड झालेली आहे. तेव्हा आपल्या उपक्रमाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी पूर्ण करीन याची खात्री बाळगा. "

        एक सरकार बदलते त्यावेळेला मागच्या सरकारने घेतलेले निर्णय अंमलात आणायचे नाहीत अशा प्रकारचे नवीन पायंडे महाराष्ट्रात दिसून येतात. इथे मात्र मला वेगळेच चित्र दिसले. निर्णय चांगले असतील तर ते कोणीही घेतलेले असोत त्यांचा पाठपुरावा आम्ही करू असं जेव्हा ऐकायला मिळतं त्यावेळेला आजही साधन शुचिता शिल्लक आहे याचा आनंद वाटतो.

         असो. ज्ञानगंगा वाचनालय अधिकाधिक वाचकांकडे कसे जाईल यासाठी आपण प्रयत्न करूच पण सध्या या वाचनालयाच्या बदललेल्या कार्यकारणीचे अभिनंदन करताना वाचनालयाचे अध्यक्ष श्री काशिनाथ विनायक चव्हाण यांचेही मनापासून अभिनंदन करतो.आणि शेवटी एवढंच म्हणतो,

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपु: l

नास्त्युद्यमसमो बन्धु: कृत्वा यं नावसीदती ll


सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई


अभिप्राय*********

नमस्कार,

श्री. काशिनाथ चव्हाण यांच्या कार्याबद्दल आपण लिहिलेले गावात राहणाऱ्या तरुण पिढीसाठी  प्रेरणादाई होईल. आज ते कोंडगे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. फारच आनंद वाटला.

  श्री काशिनाथ चव्हाण हे माझ्या भाचीचे चुलत सासरे. तिच्या लग्नाच्यावेळी कोंडग्याला अचानक भेटले. अचानक एवढ्यासाठी की ते माझे एकेकाळचे मित्र ! आजही भेटी होत नाहीत . लांज्याला केंव्हातरी चुकून भेट होते. माझी मावस बहिण कोंडग्याला चव्हाणांकडे दिलेली , तिची मुलगी जून मध्ये पुनस येथे काजळी नदीत बुडून वारली. तिचे सांत्वन करण्यासाठी कोंडग्याला गेलो होतो; पण ही वेळ वेगळी असल्यामुळे काशिनाथ यांना भेटता आले नाही. 

 काशिनाथ हे सहृदयी आणि मितभाषी. त्यांच्या इतर कार्याबद्दल आपण लिहिले आहे . त्याशिवाय त्यांचं हस्ताक्षर फारच सुंदर! ती त्यांची आवड अजूनही जोपासत असावेत. 

धन्यवाद🙏