लांजा तालुका भौगोलिक आकाराने लहान असला तरी कोकणातला शैक्षणिक व सांस्कृतिक लौकिक वाढविण्याचा प्रयत्न या तालुक्याने केला आहे.त्यात लांजा शहर हे वडिलकीच्या नात्याने सर्वासांठी दिशादर्शक ठरले आहे.इथल्या ग्रामदेवतांच्या जत्रांच्या निमित्ताने आपली ग्रामीण परंपरा साभाळण्याचे काम आजही तितक्याच श्रद्धेने व एकीने केले जाते तसे नव्या जमान्यातील नवनवीन उपक्रमातही ते दिसून येते.
इथे मुलांना विविध खेळातून मनोरंजन देणा-या जत्रा भरतात तसे नवरात्रीत गरबा नृत्याच्या निमित्ताने चित्ररथांद्वारे प्रबोधन केले जाते.दिवाळीच्या पहिल्याच रात्री महाकाय रांगोळी टाकून त्यावर हजारो पणत्या पेटवून उत्साहाचा प्रकाश देण्याचा संस्कार देण्याचा उपक्रम अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत असतो. आणि या सर्व उपक्रमांत कुठे आयाेजक तर कुठे निवेदक म्हणून एक नाव नेहमीच आघाडीवर असते ते म्हणजे लांजा हायस्कूलचे शिक्षक श्री विजय हटकर यांचे.
हा एक हौशी माणूस आहे त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात यांना बोलावल्यास ते वेळ काढून येतीलच परंतु तो कार्यक्रम आपलाच आहे असं समजून त्यात अधिक रंग कसा भरता येईल याबाबत ते प्रयत्न करतील त्यासाठी रात्र दिवस न पाहता तन मन आणि धनही देतील. 'आमच्या लांजाचे नाव झाले पाहिजे व नव्या पिढीला काहीतरी मिळाले पाहिजे ' एवढ्या माफक अपेक्षेकरीता गेली कित्येक वर्षे त्यांची धडपड मी बघत आलो आहे.त्यात इतिहासाची आवड त्यामुळे हे ज्या गावात जातील तिथल्या बारीक सारीक गोष्टींची माहिती करून घेणार त्यांचा संबंध कुठल्या काळाशी जोडला जातो याची मिमांशा करणार त्याचे टिपण करणार आणि जिथे वेळ येईल तेव्हा त्या विषयावर सखोल अभ्यास करून त्याला प्रसिद्धी देणार.माझी रत्नागिरी किंवा माझा कोकण किती समृद्ध आहे त्याची ऐतिहासिक परंपरा काय आहे हे सांगतांना हा माणूस तहान भूक विसरून जातो.अफाट वाचन , तल्लख स्मृती व जोडीला वाक्चातुर्य असल्याने हे जेव्हा निवेदक म्हणून उभे राहतात तेव्हा प्रेक्षकांची हटकून दाद घेतात.हटकर आडनाव तेव्हा त्यांना शोभून दिसते.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ग्रामीण मराठी संमेलनाचे व्यासपीठ त्यांच्या निवेदनामुळे अधिक लोकप्रिय झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.मोडी लिपी मित्र मंडळाच्या मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या संपादनात त्यांचा मोठा वाटा असतो.अनेक नामवंत लेखक मंडळींमुळे दर्जेदार साहित्य व माहिती लोकांपर्यत पोहोचवली जाते.विषयांची निश्चिती ,त्यांची मांडणी व सजावट यासाठी अनेकांचा हातभार असतोच परंतु कार्यकारी संपादक या नात्याने विजय हटकर काम पाहात असल्यामुळे मी थोडा निर्धास्त असतो.इथेही त्यांनी आपल्या कल्पकतेचा ठसा उमटविला आहे.
कोकणातले पर्यटन वाढावे व इथल्या तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीची त्यांची धडपडही वाखाणण्यासारखी आहे.त्याबाबतीतही त्यांचा अभ्यास आणि फिरणे सतत चालू असते म्हणूनच त्यांना चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणावे असे वाटते.
आज १९ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आहे.त्यांना शुभेच्छा देतांना त्यांचा अभ्यास,त्यांचे चिंतन हे लवकरच पुस्तक रूपाने लोकांच्या पर्यत जावे यासाठी परमेश्वराने त्यांना सर्वतोपरी सहाय्यभूत व्हावे अशी प्रार्थना करतो.
सुभाष लाड
शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसारार्थ काम करणा-या मोडी लिपी मित्र मंडळाचा ' मोडीदर्पण ' हा चौदावा दिवाळी अंक पवई येथील पवई इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आला.संपादक सुभाष लाड यांच्या अध्यशक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात लेखक कवी व चित्रकार म्हणून ख्यातनाम असलेले विजयराज बोधनकर व सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर नाटककार डॉ .मंगेश हांदे,चित्रकार सुरेश डुंबरे,लेखक सुरेश हांडे,संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार,मोडी जाणकार सुनील कदम,इतिहासकार प्रविण कदम ,पत्रकार सुनील आवटी,प्रकाश हरचेकर,वाजय बाराथे,आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसंपादक दीपक नागवेकर यांच्या प्रास्ताविकानंतर सर्वांचे यथोचित स्वागत करण्यात आले.मोडी सहीत भारतीय लिप्यांचा अभ्यास करणा-या नाशिकच्या सौ पूजा गायधनी यांना यंदाचा ' मोडीमित्र ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यकारी संपादक विजय हटकर यांनी यावर्षीच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य अधोरेखीत केले.त्यानंतर कोकणच्या शिवकालीन सरदार घराण्यांचा इतिहास मांडणा-या,शिवरायांच्या आज्ञापत्रांना मोडीसहीत लिप्यांतर करून अभ्यासकांना खजिना देणा-या 'मोडीदर्पण दिवाळी अंक २०२३' चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच व्यासपीठावर प्रमोद कोनकर संपादीत ' कोकण मिडिया ' या रत्नागिरीच्या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन,तरूण उद्येजक गणेश चव्हाण यांच्या सिद्धी ट्रॅव्हलच्या चिन्हाचे प्रकाशन तसेच कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी उत्पादन कंपनीच्या सौ.प्रांजल व दत्तप्रसाद कोलते यांचा सन्मान करून मोडी परिवार सगळ्यांसाठी सहाय्यभूत असल्याचे प्रतीत झाले.
मा.अच्युत पालव यांनी " मोडी लिपी मित्र मंडळ अनेक वर्षे मोडी प्रसाराचं काम करते आहे त्या कामाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतो.लवकरच त्यांनी मोडी अभ्यासकांना एकत्रीत आणण्यासाठी मोडी संमेलनाचे आयोजन करावे " असे सांगितले.
मोडीदर्पण दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पाहून,जमलेले शिवप्रेमी पाहून आपण आज श्रीमंत झालो आहोत असे कौतुकाचे शब्द मांडताना मा.विजयराज बोधनकर यांनी मोबाईलमध्ये अडकलेल्या तरूण पिढीला बाहेर काढण्यासाठी वाचन संस्कृतीच कामी येईल असा आशावाद व्यक्त केला.
मोडी अभ्यासक मा.सुनिल कदम यांनी मोडीचा संक्षिप्त इतिहास मांडून छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रांचे विशद केले.
संपादक सुभाष लाड यांनी मोडीदर्पण प्रकाशनाकरीता अनेकांचे हात सोबत असल्याचा आनंद व्यक्त करतांना लवकरच महाराष्ट्रातील सर्व मोडी जाणकार,अभ्यासक,इतिहासकार व शिवप्रेमींना एकत्र आणून मोडीच्या भविष्यातील वाटचालीचा उहापोह करण्यासाठी संमेलन आयोजीत करावे लागेल त्यावेळी आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
श्री.महेंद्र साळवी यांनी खुमासदार आभारप्रदर्शन केले.आर के कॅटरर्सच्या रूचकर जेवणाचा आस्वादाने कार्यक्रम अधिक दिमाखदार झाला.
मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रूजू झालो.भायखळ्याच्या बापूराव जगताप मार्ग मनपा मराठी शाळेत असतांना लोंढे नावाचे स्काऊट शिक्षक मला स्काऊट गाईड चळवळीबद्दल सतत काही काही सांगायचे आणि एक दिवस म्हणाले "तुम्ही या चळवळीतील प्राथमिक प्रशिक्षण घ्यावं असं मला वाटतं.मी तुमचं नाव कळवले आहे."
मुख्याध्यापक कोकोटे गुरूजींनीही त्याला दुजोरा दिल्याने मी ते प्रशिक्षण घेतले.मला त्या चळवळीची आवड निर्माण झालीच पण ज्या शिबीर स्थळी हे प्रशिक्षण पार पडले ते पवई हायलेव्हल स्काऊट गाईड शिबीर स्थळ मनात घर करून राहिले.पुढे अनेक शिबीरे व कार्यक्रम या शिबीर स्थळी करतांना हे ठिकाण अधिक निसर्गरम्य करता येईल याचे आडाखे मनात व्हायचे. आणि नेमकी २००५ साली तेथील छावणीपाल या पदावरती माझी निवड झाली.
मी कर्मचा-यांना विश्वासात घेतले.त्यांना आपण काय काम करायचे आहे ते सांगितले.त्याच वर्षीच्या २६ जुलै च्या अतीवृष्टीत शिबीर स्थळाच्या दिवाळाची भिंत कोसळली आणि त्याच्या दुरूस्तीसाठीचा पाठपुरावा करतांनी महानगरपालिकेत किती खेटा घालाव्या लागतात हे कळून चुकले.त्यामुळे इथल्या शिबीरस्थळाच्या विकास कामात सुरूवातीला आहे त्या परिस्थितीत चांगले काम करून ते संबंधीत अधिका-यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडूनच काय करायला हवंय हे वदवून घ्यायचं आणि त्यांच्याच सहभागातून अर्ज पुढे पाठवायचा असं करीत गेलो त्यामुळे कामे होऊ लागली.
इथे पाणी मुबलक होते पण अंतर्गत पाईप नादुरूस्त झाले होते तर काही ठिकाणी नवीन जोडणी आवश्यक होती.पण नवीन पाईप जोडणी करण्याची फाईल दोन वर्षे पाठपुरावा करूनही पुढे सरकत नव्हती.एकदा अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी सकाळी राजा वराडकर माझ्या कार्यालयात आले " साहेब आपलं नवीन पाईप लाईनच काम ब-यापैकी होण्यासारखं आहे.फक्त तुम्ही जेईंना फोन करा व सांगा आम्हाला दहा पाईप पाहिजेत." असं म्हणाले.
नेमक काय करायच व पाईप कुठून येणार आहेत हे त्यांनी मला समजावून सांगितले." गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती पाईप लाईन टाकून पाणी आणले जाते व त्यानंतर ते पाईप पुन्हा काढून परत नेले जातात.पवई तलावाच्या गणेश घाटावरील पाईप काढण्यासाठी आम्ही उद्या येणार आहोत.जेईंना मी इथली अवस्था बोललो आहे."
मी तात्काळ जेईंना फोन केला.त्यांनी आजच एक अर्ज द्यायला सांगितला.मी लगेच अर्ज एस विभाग कार्यालयात पोहोचविला.
तिस-या दिवशी दुपारच्या दरम्यान पाईप व कामगार घेऊन गाडी शिबीरस्थळीआली.माझ्यापेक्षा अधिक आनंद राजा वराडकरांना झालेला दिसत होता.तुकाराम वराडकर हे ज्येष्ठ व हुशार कामगार सोबत होते.राजा व तुकाराम दोघांनी फिरून किती पाईप लागतील यांचा अंदाज घेतला.राजा वराडकर म्हणाले "आम्ही सगळे पाईप इथेच उतरत आहोत.मी साहेबांना तसं सांगतो,मी तुम्हाला फोन दिला की आम्ही सर्व साहित्य व पाईप सुरक्षीतरित्या ठेवतो एवढंच सांगा."
तशी फोनाफोनी झाली आणि पन्नास एक पाईप व इतर साहित्य उतरलं गेलं.पुढील दोन महिन्यात कधी सलग दोन दिवस तर कधी सलग चार दिवस करून शिबीरस्थळावर ब-यापैकी पाईप लाईन नव्याने फिरवली गेली.जे काम फाईल फिरवून झाले नाही ते काम कामगारांनी आपल्या बुद्धीचातुर्याने जागच्या जागी केले.त्याकामी दुरूस्ती विभागातील बन्सी,चाळके, तांडेल, नामये हे सर्वजण आपले शिबीर स्थळ फुलवायचे आहे या भावनेने काम करीत होते.त्यांच्या कामाची ती लगबग,एकमेकांची चाललेली चेष्टा मस्करी आजही नजरेसमोर आहे .
शिबीरस्थळावरील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी फिरवण्यासाठी बांध बांधलेले आहेत ती कल्पना आणि ते पुर्णत्वास नेण्याचे काम या दुरूस्त विभागातील कर्मचा-यांचे आहे.त्यासाठी लागणारे सिमेंट वाळू ते येतांना गाडीत टाकून आणायचे.विभाग कार्यालय व शिबीरस्थळ यामध्ये दहा किमीचे अंतर असल्याने हे सर्वजण खात्याच्या गाडीने यायचे.आल्यावर प्रथम मी छप्पर टाकून बांधलेल्या अंगणात एकत्र बसून डबा खायचे.त्यांच्यातला तो मैत्रभाव बघून मी सुद्धा त्यांच्यात बसून नाश्ता करीत असे.यातील प्रत्येकजण बाॅस होता आणि प्रत्येकजण दुस-याचे निमूटपणे ऐकत होता.कोणाला कोणतं काम चांगलं जमतं त्याप्रमाणे ते काम करीत असत. सुतारकाम करणा-याने मी का नळ जोडायला येऊ असं कधी म्हणत नसे किंवा नळ जोडणा-याने मी सिमेंटमाल कालवणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही त्यामुळे हे सगळेजण एकमेकांच्या सुख दु:खात जवळच्या नातेवाईकांसारखे वागतांना मी पाहिले.खरी माणुसकी मला त्यांच्यात दिसली.
त्यांच्यातील एकेकजण सेवानिवृत्त होताहेत. रिकाम्या जागा न भरल्याने उद्या हे खाते बंद करून खाजगीकरण येईल.आज राजेंद्र वराडकर सेवानिवृत्त होतांना ही खंत अनेकांनी बोलून दाखवली.वराडकरांनी आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या सेवेत प्रामाणिकपणे काम करतांना माणसेही जोडली. एक नळ जोडणी करणा-या कामगाराला सेवापूर्तीचा निरोप देताना विभाग अधिकारीही उपस्थित राहतात तसेच इस्पितळात दिलेल्या सेवेची जाण ठेवून तिथल्या वैद्यकीय अधिकारीही येऊन त्यांना सन्मानीत करून शुभेच्छा देतात.यापेक्षा वेगळा सन्मान काय असतो?आयुष्यात किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं जोडलीत यावरून तुमची खरी श्रीमंती ठरते.निरोप समारंभातील शुभेच्छुकांची गर्दी पाहून श्रीयुत राजेंद्र म्हणण्यापेक्षा श्रीमंत राजेंद्र वराडकर इसेच म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते.
राजेंद्र वराडकर (८९७६६६६१६६)यांना परमेश्वर आयुरारोग्य प्रदान करो यासाठी प्रार्थना करतो.
सुभाष लाड
अवघ्या महाराष्ट्राचे डोळे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांकडे लागले आहेत.मराठा समाजातील गुणवान मुलं केवळ आरक्षणाच्या काटेरी कुंपणात अडकून आयुष्याचं गणित सोडवायचं कसं या विवंचनेत आहेत.त्यांना प्रकाश वाटांवर आणायचं असेल तर त्यांना आरक्षण मिळवून द्यायलाच हवे या एकाच हट्टानं पेटून उठलेले मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाल बसलेले आहेत.आज सातव्या दिवशी त्यांची तब्बेत खालावली आहे.त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पवईतील सकल मराठा समाज आज आय आय टी मेन गेट जवळ एकत्र आला.मुंबईतील हा पहिलेच आंदोलन आहे.यावेळी अनेक मराठी बांधवांनी आरक्षणाबाबत आपले विचार मांडतांना मनोज जरांगे पाटलांना जाहिर पांठिबा दर्शविला.पवईतील सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.