Sunday, November 19, 2023

चतुरस्त्र व्यक्तिमत्व विजय हटकर

 


      लांजा तालुका भौगोलिक आकाराने लहान असला तरी कोकणातला शैक्षणिक व सांस्कृतिक लौकिक वाढविण्याचा प्रयत्न या तालुक्याने केला आहे.त्यात लांजा शहर हे वडिलकीच्या नात्याने सर्वासांठी दिशादर्शक ठरले आहे.इथल्या ग्रामदेवतांच्या जत्रांच्या निमित्ताने आपली ग्रामीण परंपरा साभाळण्याचे काम आजही तितक्याच श्रद्धेने व एकीने केले जाते तसे नव्या जमान्यातील नवनवीन उपक्रमातही ते दिसून येते.
        इथे मुलांना विविध खेळातून मनोरंजन देणा-या जत्रा भरतात तसे नवरात्रीत गरबा नृत्याच्या निमित्ताने चित्ररथांद्वारे प्रबोधन केले जाते.दिवाळीच्या पहिल्याच रात्री महाकाय रांगोळी टाकून त्यावर हजारो पणत्या पेटवून उत्साहाचा प्रकाश देण्याचा संस्कार देण्याचा उपक्रम अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत असतो. आणि  या सर्व उपक्रमांत कुठे आयाेजक तर कुठे निवेदक म्हणून एक नाव नेहमीच आघाडीवर असते ते म्हणजे लांजा हायस्कूलचे शिक्षक श्री विजय हटकर यांचे.
        हा एक हौशी माणूस आहे त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात यांना बोलावल्यास ते वेळ काढून येतीलच परंतु तो कार्यक्रम आपलाच आहे असं समजून त्यात अधिक रंग कसा भरता येईल याबाबत ते प्रयत्न करतील त्यासाठी रात्र दिवस न पाहता तन मन आणि  धनही देतील. 'आमच्या लांजाचे नाव झाले पाहिजे व नव्या पिढीला काहीतरी मिळाले पाहिजे ' एवढ्या माफक अपेक्षेकरीता गेली कित्येक वर्षे त्यांची धडपड मी बघत आलो आहे.त्यात इतिहासाची आवड त्यामुळे हे ज्या गावात जातील तिथल्या बारीक सारीक गोष्टींची माहिती करून घेणार त्यांचा संबंध कुठल्या काळाशी जोडला जातो याची मिमांशा करणार त्याचे टिपण करणार आणि  जिथे वेळ येईल तेव्हा त्या विषयावर सखोल अभ्यास करून त्याला प्रसिद्धी देणार.माझी रत्नागिरी किंवा माझा कोकण किती समृद्ध आहे त्याची ऐतिहासिक परंपरा काय आहे हे सांगतांना हा माणूस तहान भूक विसरून जातो.अफाट वाचन , तल्लख स्मृती व जोडीला वाक्चातुर्य असल्याने हे जेव्हा निवेदक म्हणून उभे राहतात तेव्हा प्रेक्षकांची हटकून दाद घेतात.हटकर आडनाव तेव्हा त्यांना शोभून दिसते.
         राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ग्रामीण मराठी संमेलनाचे व्यासपीठ त्यांच्या निवेदनामुळे अधिक लोकप्रिय झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.मोडी लिपी मित्र मंडळाच्या मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या संपादनात त्यांचा मोठा वाटा असतो.अनेक नामवंत लेखक मंडळींमुळे दर्जेदार साहित्य व माहिती लोकांपर्यत पोहोचवली जाते.विषयांची निश्चिती ,त्यांची मांडणी व सजावट यासाठी अनेकांचा हातभार असतोच परंतु कार्यकारी संपादक या नात्याने विजय हटकर काम पाहात असल्यामुळे मी थोडा निर्धास्त असतो.इथेही त्यांनी आपल्या कल्पकतेचा ठसा उमटविला आहे.
         कोकणातले पर्यटन वाढावे व इथल्या तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीची त्यांची धडपडही वाखाणण्यासारखी आहे.त्याबाबतीतही त्यांचा अभ्यास आणि  फिरणे सतत चालू असते  म्हणूनच त्यांना चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणावे असे वाटते.
           आज १९ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आहे.त्यांना शुभेच्छा देतांना त्यांचा अभ्यास,त्यांचे चिंतन हे लवकरच पुस्तक रूपाने लोकांच्या पर्यत जावे यासाठी परमेश्वराने त्यांना सर्वतोपरी सहाय्यभूत व्हावे अशी प्रार्थना करतो.
सुभाष लाड






























No comments:

Post a Comment