मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रूजू झालो.भायखळ्याच्या बापूराव जगताप मार्ग मनपा मराठी शाळेत असतांना लोंढे नावाचे स्काऊट शिक्षक मला स्काऊट गाईड चळवळीबद्दल सतत काही काही सांगायचे आणि एक दिवस म्हणाले "तुम्ही या चळवळीतील प्राथमिक प्रशिक्षण घ्यावं असं मला वाटतं.मी तुमचं नाव कळवले आहे."
मुख्याध्यापक कोकोटे गुरूजींनीही त्याला दुजोरा दिल्याने मी ते प्रशिक्षण घेतले.मला त्या चळवळीची आवड निर्माण झालीच पण ज्या शिबीर स्थळी हे प्रशिक्षण पार पडले ते पवई हायलेव्हल स्काऊट गाईड शिबीर स्थळ मनात घर करून राहिले.पुढे अनेक शिबीरे व कार्यक्रम या शिबीर स्थळी करतांना हे ठिकाण अधिक निसर्गरम्य करता येईल याचे आडाखे मनात व्हायचे. आणि नेमकी २००५ साली तेथील छावणीपाल या पदावरती माझी निवड झाली.
मी कर्मचा-यांना विश्वासात घेतले.त्यांना आपण काय काम करायचे आहे ते सांगितले.त्याच वर्षीच्या २६ जुलै च्या अतीवृष्टीत शिबीर स्थळाच्या दिवाळाची भिंत कोसळली आणि त्याच्या दुरूस्तीसाठीचा पाठपुरावा करतांनी महानगरपालिकेत किती खेटा घालाव्या लागतात हे कळून चुकले.त्यामुळे इथल्या शिबीरस्थळाच्या विकास कामात सुरूवातीला आहे त्या परिस्थितीत चांगले काम करून ते संबंधीत अधिका-यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडूनच काय करायला हवंय हे वदवून घ्यायचं आणि त्यांच्याच सहभागातून अर्ज पुढे पाठवायचा असं करीत गेलो त्यामुळे कामे होऊ लागली.
इथे पाणी मुबलक होते पण अंतर्गत पाईप नादुरूस्त झाले होते तर काही ठिकाणी नवीन जोडणी आवश्यक होती.पण नवीन पाईप जोडणी करण्याची फाईल दोन वर्षे पाठपुरावा करूनही पुढे सरकत नव्हती.एकदा अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी सकाळी राजा वराडकर माझ्या कार्यालयात आले " साहेब आपलं नवीन पाईप लाईनच काम ब-यापैकी होण्यासारखं आहे.फक्त तुम्ही जेईंना फोन करा व सांगा आम्हाला दहा पाईप पाहिजेत." असं म्हणाले.
नेमक काय करायच व पाईप कुठून येणार आहेत हे त्यांनी मला समजावून सांगितले." गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती पाईप लाईन टाकून पाणी आणले जाते व त्यानंतर ते पाईप पुन्हा काढून परत नेले जातात.पवई तलावाच्या गणेश घाटावरील पाईप काढण्यासाठी आम्ही उद्या येणार आहोत.जेईंना मी इथली अवस्था बोललो आहे."
मी तात्काळ जेईंना फोन केला.त्यांनी आजच एक अर्ज द्यायला सांगितला.मी लगेच अर्ज एस विभाग कार्यालयात पोहोचविला.
तिस-या दिवशी दुपारच्या दरम्यान पाईप व कामगार घेऊन गाडी शिबीरस्थळीआली.माझ्यापेक्षा अधिक आनंद राजा वराडकरांना झालेला दिसत होता.तुकाराम वराडकर हे ज्येष्ठ व हुशार कामगार सोबत होते.राजा व तुकाराम दोघांनी फिरून किती पाईप लागतील यांचा अंदाज घेतला.राजा वराडकर म्हणाले "आम्ही सगळे पाईप इथेच उतरत आहोत.मी साहेबांना तसं सांगतो,मी तुम्हाला फोन दिला की आम्ही सर्व साहित्य व पाईप सुरक्षीतरित्या ठेवतो एवढंच सांगा."
तशी फोनाफोनी झाली आणि पन्नास एक पाईप व इतर साहित्य उतरलं गेलं.पुढील दोन महिन्यात कधी सलग दोन दिवस तर कधी सलग चार दिवस करून शिबीरस्थळावर ब-यापैकी पाईप लाईन नव्याने फिरवली गेली.जे काम फाईल फिरवून झाले नाही ते काम कामगारांनी आपल्या बुद्धीचातुर्याने जागच्या जागी केले.त्याकामी दुरूस्ती विभागातील बन्सी,चाळके, तांडेल, नामये हे सर्वजण आपले शिबीर स्थळ फुलवायचे आहे या भावनेने काम करीत होते.त्यांच्या कामाची ती लगबग,एकमेकांची चाललेली चेष्टा मस्करी आजही नजरेसमोर आहे .
शिबीरस्थळावरील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी फिरवण्यासाठी बांध बांधलेले आहेत ती कल्पना आणि ते पुर्णत्वास नेण्याचे काम या दुरूस्त विभागातील कर्मचा-यांचे आहे.त्यासाठी लागणारे सिमेंट वाळू ते येतांना गाडीत टाकून आणायचे.विभाग कार्यालय व शिबीरस्थळ यामध्ये दहा किमीचे अंतर असल्याने हे सर्वजण खात्याच्या गाडीने यायचे.आल्यावर प्रथम मी छप्पर टाकून बांधलेल्या अंगणात एकत्र बसून डबा खायचे.त्यांच्यातला तो मैत्रभाव बघून मी सुद्धा त्यांच्यात बसून नाश्ता करीत असे.यातील प्रत्येकजण बाॅस होता आणि प्रत्येकजण दुस-याचे निमूटपणे ऐकत होता.कोणाला कोणतं काम चांगलं जमतं त्याप्रमाणे ते काम करीत असत. सुतारकाम करणा-याने मी का नळ जोडायला येऊ असं कधी म्हणत नसे किंवा नळ जोडणा-याने मी सिमेंटमाल कालवणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही त्यामुळे हे सगळेजण एकमेकांच्या सुख दु:खात जवळच्या नातेवाईकांसारखे वागतांना मी पाहिले.खरी माणुसकी मला त्यांच्यात दिसली.
त्यांच्यातील एकेकजण सेवानिवृत्त होताहेत. रिकाम्या जागा न भरल्याने उद्या हे खाते बंद करून खाजगीकरण येईल.आज राजेंद्र वराडकर सेवानिवृत्त होतांना ही खंत अनेकांनी बोलून दाखवली.वराडकरांनी आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या सेवेत प्रामाणिकपणे काम करतांना माणसेही जोडली. एक नळ जोडणी करणा-या कामगाराला सेवापूर्तीचा निरोप देताना विभाग अधिकारीही उपस्थित राहतात तसेच इस्पितळात दिलेल्या सेवेची जाण ठेवून तिथल्या वैद्यकीय अधिकारीही येऊन त्यांना सन्मानीत करून शुभेच्छा देतात.यापेक्षा वेगळा सन्मान काय असतो?आयुष्यात किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं जोडलीत यावरून तुमची खरी श्रीमंती ठरते.निरोप समारंभातील शुभेच्छुकांची गर्दी पाहून श्रीयुत राजेंद्र म्हणण्यापेक्षा श्रीमंत राजेंद्र वराडकर इसेच म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते.
राजेंद्र वराडकर (८९७६६६६१६६)यांना परमेश्वर आयुरारोग्य प्रदान करो यासाठी प्रार्थना करतो.
सुभाष लाड












No comments:
Post a Comment