" मित्र हो, एकाच शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेलो आपण न्या.व्ही.व्ही.आठल्ये विद्यामंदिर शिपोशी या शाळेच्या कृतज्ञतेपोटी त्या शाळेला काही सहकार्य करावे या हेतूने आपण एकत्र आलो आणि माजी विद्यार्थी विचार मंच स्थापन केला.सगळेच आपल्या विचारांचा आदर करतील असे कधी होत नाही पण जे कुणी आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जायचे हा दृढ निश्चय आपला आहे.आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या पाहता मी तरी समाधानी आहे.
आता प्रश्न आला शाळेसाठी आपण काय करु शकतो ? महाराष्ट्रातील सर्वच खेड्यांचा विचार करता मुळात प्रत्येक खेड्यातील सरासरी ६० टक्के घरे बंद आहेत. उघड्या घरात 80 टक्के वयोवृद्ध राहतात २० टक्क्यांमध्ये काही घरांमध्ये एक दोन माणसं अधिकची असल्यामुळे ते लोक शेती करत आहेत. लग्न झालेल्या तरुण मुलांचे लग्न होत नाही म्हणून ते निराश आहेत. लग्न करून गावात संसार करणारे त्या त्या गावात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी सुद्धा दांपत्य गावात असल्याने गावातील मुलांचा जन्मदर अशा परिस्थितीमुळे घटलेला आहे. एकेकाळी तुकड्या करणे इतकी प्रत्येक वर्गाची पटसंख्या असल्याने त्या काळात शाळेत खोल्यांची संख्या वाढवण्यात आली. पण आज शाळेची पटसंख्या बघितल्यानंतर एखाद दुसऱ्या वर्गात सहज मावू शकतील एवढेच पटसंख्या शिल्लक राहिलेली आहे भविष्यात ती शून्यावर यायला वेळ लागणार नाही.
अशा परिस्थितीत शाळांना भौतिक विकासाची किंवा मुलांच्या सेकंड शैक्षणिक वस्तूंसाठी मदत करण्याची आज तरी आवश्यकता नाही. आज आवश्यकता आहे ती शाळांचा पट कसा वाढेल यासाठी काही उपक्रम करण्याची. तो पट वाढण्यासाठी गावातील मुलांचा जन्मदर वाढला पाहिजे. जन्मदर वाढवण्यासाठी लग्न करून तरुण-तरुणी गावाकडे राहणे गरजेचे आहे. गावाकडे राहण्यासाठी त्या तरुण हातांना काम मिळणे गरजेचे आहे त्याचबरोबर मातीत हात घालण्याचा, शेणात हात घालण्याचा आणि कष्ट करण्याचा संस्कार हा पुन्हा नव्याने रुजवला पाहिजे.
वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने प्रथम गावाकडे लक्ष द्यायला हवे होते. महात्मा गांधीजींनी भारताचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला आणि त्याने तरुणांना ' खेड्याकडे चला ' हा संदेश दिला. याचा अर्थ त्यावेळी खेडी हळूहळू रिकामी होत असल्याची जाणीव गांधीजींना त्या अभ्यास दौऱ्यात झाली होती. गांधीजींच्या त्या संदेशानंतर आज आम्ही शंभरी पार केली पण त्या संदेशाला गांभीर्याने कुणीही घेतले नाही. या शंभर वर्षात प्रत्येक गावातील ७५ टक्के वस्ती ही शहरात जाऊन स्थायिक झालेली आहे. शहरात वाढणाऱ्या लोकांना सुविधा देण्यात तेथील स्थानिक संस्था तत्पर आहेत त्यांना त्या त्या सरकारचा वरदहस्त आहे मात्र शहरात आलेली ही लोकं एखादं गाव संपवत आहेत ते गाव पुन्हा उभारण्यासाठी काही करावं यासाठी कोणीही काही प्रयत्न करत नाही. ही खरी शोकांतिका आहे.
गावातून शहराकडे जाणारी संख्या दिवसेंदिवस का वाढते आहे याचे उत्तर फार खोलवर जाऊन शोधणे गरजेचे आहे. गावागावात शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि काही ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. भरलेल्या गावातील मुलांनी त्या शाळा गजबजुन टाकल्या परंतु शिक्षणाचं प्रमाणपत्र हातात आल्यानंतर ती मुले मातीशी फटकून वागू लागली आणि मुंबईत किंवा इतर शहरातील चकाचक कार्यालयातील नोकरीसाठी खटपट करू लागली. जो गावाबाहेर पडला तो पुन्हा गावाकडे वळला नाही कारण त्याला शहरातल्या जीवनशैलीने मोहवून टाकले. मुंबई सारख्या शहरात आपण आपले आयुष्य व्यतीत करावे हे जागतिक स्तरावरील स्वप्न आहे तर मुंबईच्या परिघात राहणारे लोक तर आपला हक्क समजून मुंबईत येतात व राहतात.जर मुंबईपासून लोकांना लांब ठेवायचे असेल तर मुंबई सारख्या जरी नसल्यातरी रोजगाराच्या किमान संधी तरी तालुका पातळीवर उपलब्ध व्हायला हव्यात.पण ते झालेले नाही.पुढे होतील अशी मानसिकता सरकारची दिसत नाही.आणि लोकप्रतिनिधींबाबत तर न बोलणेच बरे.आजचा लोकप्रतिनिधी हा लोकांच्यासाठी असतो हे म्हणणे धाडसाचे ठरेल आणि लोकांनाही त्याचे काही पडलेले आहे असे दिसून येत नाही.
मग आता करायचे काय ? खेड्यात जन्मलेल्या, खेड्यातील जीवनशैलीचे महत्त्व जाणणाऱ्या व प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन काही उपक्रम हाती घेऊन खेडी वाचविण्याचा प्रयत्न करायला हवाय. या मातीतले परंतु दूरदेशी जाऊन उद्योग करताहेत त्यांना इथल्या पर्यावरणाशी पूरक उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करुया.अशा अनेक प्रयत्नांतून प्रत्येक गावात एखाद दुसरे कुटुंब इथे स्थावर झाले तरी आपण बरेच यशस्वी झालो असे म्हणता येईल.
हे करतांना इथली पडीक झालेली जागा पुन्हा लागवडीखाली कशी येईल यासाठी उपाययोजना करावी लागेल.गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून डोंगरावरील शेती बंद पडल्यामुळे भरमसाठ खुरटे जंगल वाढले आहे.वास्तविक पाहता इथे मोठ मोठे वृक्ष दिसायला हवे होते पण डोंगरावर शेतीसाठी जायला कंटाळलेला इथला ग्रामस्थ आपले वडिलोपार्जित वृक्ष विकून मोकळा झालाच पण त्यांनंतर ही थोडे वर आलेले वृक्ष सुद्धा तो व्यापाऱ्यांना देऊन चार दिवसांची मजा करण्यात धन्यता मानू लागला आहे.सरकारने मोफत रेशन देऊन कष्टापासून सगळ्यांची मुक्तता केल्याने या मातीची वैशिष्ट्ये असलेली हरिक,बरग,कांग आणि आता नाचणी सुद्धा नेस्तनाबूत झाली आहेत.ज्याच्याकडे घरची राबणारे एखाददुसरे माणूस असलेला शेतकरी घराशेजाक्षची भात शेती करतोय.ती डुक्कर,माकडे यांच्यापासून वाचली तर इथला बदललेला निसर्ग हाताशी आलेली शेती कधी नासधूस करील याचा भरोसा राहिलेला नाही.त्यात मोजकीच शेती करीत असल्याने होणारे नुकसान लगेच लक्षात येते व ते जिव्हारी लागते. त्यामुळे कुणी शेती करीत नाही असा दोषारोप करणेसुद्धा चुकीचे आहे."
दोन दिवसांपूर्वी शिपोशी गावचे माजी विद्यार्थी एकत्र आलेलो असतांना शाळांच्या घसरत्या पटसंख्येवर चर्चा करतांना गावच बंद पडत आहेत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. वर उद्धृत केलेले लिखाण हे त्या चर्चेतून आलेले आहे.पण आपण केवळ चिंता व्यक्त करुन शांत न बसता आपल्याला जमेल तेवढी सहकार शेती करायची असे निश्चित केले गेले.
" गेल्या पावसाळ्यात कोर्ले गावचे चाकरमानी विनोद साळुंके यांनी मला त्यांच्या गावी पावसाळ्यात येण्याचे आमंत्रण दिले.ते आणि त्यांचे शेजारी मिळून भात शेती करीत असतात हे मी पाहावे असा हेतू होता.नेमका लावणी सुरू असताना मी आणि प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर त्यांच्या शेताकडे जाऊन पोहोचलो.आमच्यासाठी त्यांनी न्याहरी आणली होती.तिथल्याच कुड्याच्या पानांवरती भाजी भाकरी घेतली आणि पावसाची धार सुरू झाली.आम्ही छत्र्या उघडल्या.मला बालपणातले ते सोनेरी दिवस आठवले.रानात शेतावर काम करतांना तेव्हा पाऊस आला की घोंगडीची खोळ डोक्यावर घेऊन पावसापासून सुरक्षीत करून भाकर तुकडा खात असू. आज माझ्याजवळ छत्री होती तरी त्या घोंगडीची आणि ईरल्याची किमया काही वेगळीच असल्याने ती उणीव लक्षात आली.
विनोद साळुंके आणि त्यांच्या बरोबरचे चाकरमानी यांच्याशी गप्पा मारल्या.ते सर्वजण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.ते सर्वजण सेवानिवृत्त आहेत.लहाणपणी शेतीत राबण्याचा आनंददायी अनुभव असल्याने पडलेली शेती पाहून त्यांना बोचत राहायचे.मग त्यांनी गावाला जाऊन शेती करायची असे ठरवले. शेतजमीन लागूनच असल्याने ते अधिक फायदेशीर ठरले. भातशेती साठी काही ठराविक वेळ द्यायचा असतो.१) दिवाळीनंतर कवळ तोडणे, २) गुढीपाडव्या नंतर तरवा जाळणे,३) मृग नक्षत्रात तरवा पेरणी आणि उकळ करणे,४) पुढे एकवीस दिवसांच्या दरम्यान लावणी, ५)पुढे पंधरा वीस दिवसांत भांगलणी आणि ६) दसऱ्या नंतर भात कापणी आणि झोडपणी अशी कामाची विभागणी असते त्याप्रमाणे ते प्रवासाचे नियोजन करतात.आणि स्वत: पिकलेले भात घिरटून आलेला आपल्या मातीतला आणि आपल्या कष्टाचा आणि हो रसायन विरहीत शुद्ध तांदूळ आपल्या मुबईतला कुटुंबाला खायला देतात.
कोकणी माणूस सणांच्या निमित्ताने नेमकी सुट्टी करून गावाला येतो.पण शेतीत जात नाही. वाड वडिलांपासून चालत आलेली जमीन कोठे आहे,तिची हद्द कुठे आहे याबाबत त्याला कुतूहलही नाही.पण तुझ्या जमिनीत खैर वाढले आहेत ते विकू का? असा शेजार्राचा किंवा व्यापाऱ्यांचा फोन येतो तेव्हा तो पैसे किती मिळतील याची चौकशी करून निर्णय देतो एवढाच काय तो संबंध राहिलेला आहे. मग कोकणातील शेती पडेल नाहीतर काय होईल ! स्वातंत्र्य सैनिक स्व. भगवानराव साळुंके हे आमच्या परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व. निस्पृहभावनेने सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या या समाज धुरीणाने स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी मिळणारी पेन्शन सुद्धा नाकारली. आयुष्यभर प्रामाणिकपणे शेती करून आपल्या मुलांना शिकवलं योग्य संस्कार दिले. श्री विनोद साळुंखे हे त्यांचे चिरंजीव. आपल्या वडिलांच्या स्मृती जागवताना तेवढ्याच निष्क्रिय भावनेने समाजकार्यात भाग येतात. आज त्यांच्या बांधावर बसून त्यांच्या मुलाने शेती करण्याचा त्यांचा वसा पुढे चालवलेला पाहून अभिमान वाटला. आदरणीय स्व.श्री.भगवानराव साळुंकेच्या सहवासात घालवलेले दिवस आठवले. मी त्यांना नमन केले.
चिपळूण मधील मांडकी पालवन येथील कृषी भूषण डॉ.तानाजीराव चोरगे शैक्षणिक संकुलात राज्यस्तरीय ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन पार पडले. त्या संमेलनात मला एका परिसंवादात बोलण्यासाठी निमंत्रित केले असल्याने मी त्या संमेलनात तीनही दिवस उपस्थित होतो. एका सुंदर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा मला आनंद झाला. डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं नाव रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला चांगले दिवस आणणारा चेअरमन म्हणून सर्वश्रुत असलेले नाव एवढाच मला परिचय होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांनी उभारलेल्या विस्तीर्ण आणि नियोजनबद्ध शैक्षणिक संस्थांच्या इमारती पाहून मी भारावून गेलो. तरीही त्यांना कृषी भूषण का म्हणतात याबद्दल मला माहिती जाणून घ्यायची होती. त्यात संमेलनात झालेल्या त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओझरती ओळख झाली. मला अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. पण त्याच वेळेला निमंत्रित पाहुण्यांना डॉक्टर चोरगे यांनी लिहिलेली पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. दिलीप राज प्रकाशनचे नाव असलेल्या छानशा पिशवीतल्या पुस्तकांत डॉ. तानाजीराव चोरगे यांचे ' झेप ' हेही पुस्तक होते. ते त्यांच्या आत्मचरित्र आहे. ८१६ पानांचे ते पुस्तक चार रात्र जागून वाचले. कोल्हापुरातल्या गारगोटी जवळच्या एका छोट्या गावात बालपण आणि शिक्षण घेतलेला हा खेडूत विद्यार्थी वडिलांच्या आग्रहाखातर कृषी विद्यापीठात डॉक्टरेट पर्यंत शिक्षण घेतो. जिथे स्वतंत्र विचारांचे कोंब खुडले जातात त्या नोकऱ्या सोडून कोकणातल्या शेतीत राजासारखे जगण्याचे ठरवतो.अडथळे अनेक येतात पण त्यांना आव्हान समजून सामोरे जाऊन त्यात यशस्वी होतो.त्यांचा आदर्श कोकणी माणसांनी घ्यायला हवा.हे मी माजी विद्यार्थ्यां समोर मांडले. हे सर्वजण आपल्या जन्म भूमीवर नितांत प्रेम करणारे आहेत.काहीजण गावाकडच्या शेतीत राबतही आहेत. त्यामुळे सहकार शेतीचा उपक्रम तडीस जाईल याची खात्री आहे.
मित्र हो,चाळीस वर्षांपूर्वी जो कोकण आम्ही पाहिला तो राबणारा, शेतात घाम गाळणारा, वाड्यात चार जनावरे पाळणारा, शेतीतून वेळ काढून सण साजरे करणारा, भोगवादापेक्षा व्यवहारवादाला किंमत देणारा, स्वतः: बरोबर अडलेल्याला हात वर आणणारा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा होता त्यामुळे गाव आनंदी आणि वस्तीभरून होता.शाळा भरुन होता.आज गावच संपत चाललाय तर शाळा कुठून भरणार. म्हणून गाव पहिले वसवूया बाकी मग भरेलच की. सहकार शेतीचा प्रयोग यशस्वी करून एका नव्या पर्वाची सुरुवात करु या !
सुभाष लाड अध्यक्ष. राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
कोकण मिडियात प्रसिद्ध झालेला लेख
No comments:
Post a Comment