Monday, October 23, 2023

चंदुभाई देशपांडे आणि संघ

 

                   ओणी मार्गे पाचलकडे जाताना येळवण गाव लागतं.सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजेश  देशपांडे यांचे हे गाव ही आजची ओळख असली तरी गेली सहा दशके एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता,व्रतस्थ शिक्षक, दूरदृष्टीचा शिक्षणतज्ञ आणि अन्याविरूध्द लढण्यासाठीचे हत्यार म्हणून राजकारणाचा वापर करणारे,दिलदार वृत्तीला गोड वाणीची साथ मिळाल्याने अनेकांचा मित्र,मार्गदर्शक या नात्याने आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून उभ्या रत्नागिरीला सुपरिचीत असलेले *मा.चंदुभाई देशपांडे* यांचे गाव म्हणून ओळखले जाते.

            अनेक दिवसांपासून त्यांना भेटायची इच्छा होती.नेमके मिळंदचे सुहासभाई आयरे यांच्याबरोबर गप्पा मारतांना चंदुभाईंचा विषय निघाला आणि आजच आपण भेटायचे असा बेत ठरला.मग सोबतीला पाचलचे किशोरभाई नारकर आणि  मनोहर खापणे काॅलेजचे प्रा.डॉ.विकास पाटील होतेच.

            किशोरभाईंनी ओळख करून देतांनाच त्यांना थांबवत "सुभाष लाड  हे नाव बरेच दिवस ऐकून आहे "असे चंदुभाई म्हणाले आणि  " राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नाव मी लहानपासून जाणत असतांना संघाचे १९५४ सालातील अधिवेशन करक या गावी असतांना त्या वेळचे मुंबई राज्याचे आरोग्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण आले होते त्यावेळी त्यांच्या स्वागताला आम्हा मुलांना रायपाटण इथल्या रस्त्यावर उभे केले होते.मी तेव्हा सहावीत शिकत होतो." ही आठवण सांगतांना अणुस्कुरा घाट फोडून राजापूर - कोल्हापूर रस्ता करावा ही मागणी त्या वेळच्या अधिवेशनात केल्याचे त्यांनी नमूद केले.

            संघाच्या स्थापनेच्या काळातील अॅड.सदानंद शेट्ये हे आजही वयाच्या ९१ व्या वर्षातही संघाच्या कार्याची माहिती जाणून घेत असतात.आज मला संघाच्या दुस-या वर्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले ८१ व्या वर्षीही तरूणाईच्या उत्साहात आठवणी सांगत असतांना संघाला तेवढ्याच ताकदीने इथपर्यंत आणणा-या कार्यकर्त्यांपैकी मी ही एक असल्याचा अभिमान वाटला.

             गप्पा संपत नव्हत्या पण कुणीतरी त्यांचा जवळचा मित्र आजारी असून त्याला तात्काळ रत्नागिरीला हलवायचं आहे असा निरोप आणला.त्याला आपली गाडी घेऊन जा असं सांगून चावी त्याच्या हातात दिली व पाकिटातील पैसेही घेऊन जा असे सांगितले.त्याने त्यांचे पाकिट उघडले, हवे तेवढे पैसे घेतले आणि घाई गडबडीत निघून गेला."माझा अत्यंत जवळचा माणूस " असे म्हणताना मित्रत्वाच्या  ओलाव्याने आलेली चमक लपली नाही.

              काळोखाची झालर पुसटशी दिसतांना सगळ्यानीच निघण्याची हालचाल केली पण मी एक फोटो पाहिजे म्हणून चंदुभाईंच्या शेजारी बसलो.

*सुभाष लाड*

४ आक्टोबर २०२३








संघाच्या शिपोशी येथील ९ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


अभिप्राय -🍁🍁🍁🍁🍁🍁

१) लाड सर आपण खरंच एक वेगळे रसायन आहात.सर आपल्या जुन्या जाणत्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार करून त्यांना आपल्या "सुभाष पर्व" या स्तंभातून आपल्या भागातील लोकांना त्यांचा परिचय करून देता.आपण जे सामाजिक भान असलेलं कार्य करत आहात ते अनमोल असं आहे. अशा ह्या तुमच्या व्यक्तिमत्वाला माझा शतशः प्रणाम.

श्री.सुरेश हांडे,जुन्नर  


२)शुभाष भाई,आपले सहृदय मनःपुर्वक अभिनंदन! आपण असेच कायमच लिहित रहावे,आणि विधात्याने आपल्या हाताला धरून सतत लिहिते ठेवावे ! सर्वच केवळ अप्रतिमच !

विश्वनाथ चव्हाण,कोंडगे

३) लाड साहेब आपणास आदरयुक्त प्रणाम🙏

इतरांबद्दल अचूक वर्णन करता साहेब.👌👍

रमेश गुरव,वापी,

No comments:

Post a Comment