Thursday, October 19, 2023

कोकणातील संस्कारीत तरूणाई !




       काल परवा मुंबईतील तरूणांने गळफास लावून स्वत:ला संपविले.अधिक माहिती घेतांना कळले की मोबाईलवरून खेळ खेळण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला.मग धमक्यांचे सत्र सुरू झाले त्यात त्याला आत्महत्येशिवाय पर्याय सापडला नाही.तसंच ड्रगच्या आहारी गेलेली कित्येक मुलं आज स्वत:चं आयुष्य बरबाद करून  जात आहेत.एखाद्या सजग पालकाच्या घरात हे चुकून आले असेल पण नव्वद टक्के पालकांनी आवश्यक तेवढे लक्ष मुलांकडे दिलेले नसते,मुलाच्या कमालीच्या कोडकौतुकामुळे चुकीच्या क्षणी रागे भरण्याचे आणि योग्य अयोग्य काय हे समजावण्याचे काम केलेले नसते किंवा त्याबाबत उशीर झालेला असेल आणि मूल हाताबाहेर जाते.अशी अनेक कारणे यामागे असू शकतील मात्र लहानपणापासून मुलाला इतर मुलांच्यात खेळण्याची,बागडण्याची संधी निर्माण करून देणे आवश्यक असते.तेच मूल किशोरवयात असतांना ते कोणत्या मित्रांच्या सहवासात वावरतेय हे पाहून त्याला चूक काय बरोबर काय हे सांगणे महत्वाचे ठरते.असे जे पालक करतात त्यांची मुले सुजाण नागरिक बनण्याच्या मार्गावर असतात ती मुले समाजास हवीहवीसी वाटतात.

         अशा जागरूक पालकांची मुले गेली सात वर्षे स्वत:चे जगणे समृद्ध करतांना ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाच्या संस्कृतीचे वहन करण्याचे नव्हे संवर्धन करण्याचे काम करताहेत.सातत्याने एकोप्याने डोंबिवलीतील मराठा हितसंवर्धक मंडळाच्या मराठा मंदिरात श्रावण महिन्यात येणा-या शनिवार रविवार पाहून भजन स्पर्धांचे आयोजन केले जाते.सतत दोन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमात सहभागी होणारी भजन मंडळे आणि  श्रोतृ वर्गाला सुखद अनुभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांची धावपळ,लगबग पाहिल्यानंतर गावाकडच्या लग्नविधीत घरच्यांची होणारी तारांबळ नजरेसमोर येते.तिथे जसा घरातला प्रत्येक सदस्य मीच यजमान आहे या जाणिवेने येणा-या प्रत्येकाचे स्वागत,विचारपूस करून चहापान,जेवण यांचा आग्रह करण्यातली आपुलकी ओसंडून वाहत असते तद्वत या मंडळाचे कार्यकर्ते वावरतांना दिसतात तेव्हा ते सुरांनी भरलेले सभागृह स्वर्गासम वाटू लागते. इथे येणारा स्पर्धक,श्रोता, सन्मानार्थी किंवा पाहुणा क्षणभर स्वत:चे आयुष्य विसरून त्या आनंदात न्हाऊन घेतो वाटतं हा कार्यक्रम आणखी लांबतच जावा.
              डोंबिवली म्हणजे आता दुसरी मुंबई म्हणून ओळखली जाते.न शिकता किंवा अर्धवट शिक्षण घेऊन आलेल्या बागकाम,घरकाम किंवा शिपाई अशा नोकरीत समाधान मानणा-या कोकणी माणसांमुळे एके काळी मुंबई भरून गेली परंतु पुरेसे शिक्षण घेऊन आलेल्या परप्रांतीयांनी कोणतेही काम करण्याच्या वृत्तीमुळे छोट्या व्यवसायापासून मोठ्या हुद्दाच्या मोठ्या पगाराच्या नोक-या बळकावून बसल्याने व जीवघेण्या महागाईने कोकणी माणसाला मुंबईत राहणे परवडेनासे झाले व तो ठाणे ते कल्याण, मीरा रोड ते विरार अशा उपनगरात कोकणी माणूस फेकला गेला.कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तिथे तो आपल्या संस्कृतीचे रोपटे लावतोच.त्यामुळे आजुबाजूची मराठी माणसं एकत्रीत येतात व निर्माण होणा-या संघटनाद्वारे सुरू होतो संस्कृतीचा जागर.डोंबिवलीत असेच काहिसे झाले. सात वर्षापूर्वी एक मंडळ तयार झाले त्याचे नाव आहे ' कोकण युवा प्रतिष्ठाण ' .आता नावातच युवा असल्याने ते युवकांचेच आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे.तीशी चाळीशीतले हे तरूण आपल्या प्रिय कोकणातल्या संस्कृतीचा इथे जागर करीत असतात.
          एकेकाळी रात्रभर जागून भजनाच्या बा-या ऐकणारा कोकणी माणूस केवळ एक धार्मिक विधी म्हणून भजनाकडे पाहू लागलाय.करमणुकीच्या इतर माध्यमात जीव अडकल्यानं त्याच्या लेखी भजनाचं महत्त्व कमी झालंय.पण हेच भजन आयुष्यातील निराशेच्या काळात जगण्याचे बळ देते.हेच भजन अनेक नामवंत गायक,वादक यांच्यासाठी धूळपाठी ठरलेले आहे.रेल्वेतला दोन अडीच तासांचा गर्दीचा कंटाळवाणा प्रवास आनंदी करण्यासाठी हेच भजन अनेक तरूणांच्या आवडीचा विषय ठरले आहे.गाव खेड्यात माणसांचीच वाणवा तर भजन होणार कसे? अशा गर्तेत सापडलेल्या भजनाला लागलेली उतरती कळा आताच थांबवली पाहिजे हे कोकण युवा प्रतिष्ठाणच्या तरूणांच्या लक्षात येते आणि  त्यातूनच महिलांच्या व पुरूषांच्या भजन स्पर्धांचं आयोजन केलं जातं.स्पर्धेच्या दोन दिवसात सावंतवाडी ते अलिबाग,मुंबईतील भजनी मंडळे भाग घेतात.वेळेच्या मर्यादेमुळे प्रथम प्रवेश घेणा-या बावीस ते चोवीस मंडळांनाच संधी मिळते.विशेषत: तरूण मुलं मुली त्यामध्ये असतात ही कौतुकाची बाब आहे.
         भजनांच्या बक्षीस समारंभाच्या वेळी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे समाज विकासात विविध क्षेत्रातील ज्या लोकांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने हातभार लावलेला असतो अशांचा शोध घेऊन त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.कृतज्ञतेची भावना जपणारी ही युवा मंडळी आजच्या समाजासाठी कौतुकास्पद नाहीत काय? त्यांचे विचार,त्यांचे काम आणि सगळ्यांकडून होणारे त्यांचे कौतुक त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणतात.आज सहज वाट चुकून चुकीच्या मार्गाकडे मुले कधी वळतील हे सांगता येत नाही अशा वातावरणात कोकण युवा प्रतिष्ठाण ची ही मुले म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा अखंड आनंद देणारी जगातली सर्वात मोठी श्रीमंती
आहे.ही संस्कारी तरूणाई ज्या समाजात आहे तो समाज नेहमीच आनंदी आणि  भयमूक्त असेल.अशी मुले प्रत्येकाला हवी असल्यास प्रत्येक पालकाने आपल्या मुलाने प्रथम माणूस बनले पाहिजे या दृष्टीनेच त्याला वाढवले पाहिजे,शिकविले पाहिजे.मी या तरूणाईचे कौतुक करतांना त्यांच्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार करतो.

सुभाष लाड
९८६९१०७५३४




No comments:

Post a Comment