Thursday, October 19, 2023

व्हेळ हायस्कूलच्या मुलांचे कौतुक !

 

विलवडे रेल्वे स्थानक स्वच्छता !

         संघाचे स्थानिक पातळीवर नेतृत्व करणारे महेंद्र साळवी सरांसी वरचेवर आमचे बोलणे असते.काल मी सहज त्यांना फोन केला तेव्हा ते मला म्हणाले " सर आता आमची मुले विलवडे रेल्वे स्थानक परिसरातील  रेल्वे मार्गावर कचरा गोळा करण्याचे काम करताहेत ,मी ही त्यांच्या सोबत आहे ,नंतर मी फोन करतो तुम्हाला " असं बोलून फोन ठेवला.
           मी रात्री निवांतपणे फोन केल्यानंतर मला त्या सेवाकार्याची माहिती मिळाली आणि मी त्या मुलांना सॅल्युट केला.
             रेल्वे ही भारतीय संपत्ती आहे.रेल्वे सेवा आपल्यासाठीच असते त्याबदल्यात आपण काही रक्कम रेल्वेला देत असतो म्हणुनच आपण रेल्वेने आपल्याला अधिकच्या सुविधा द्याव्यात याची अपेक्षा करीत असतो हे रास्तच आहे पण या संपत्तीचं जतन करणं किंवा तिची सुरक्षा करण्याचं व स्वच्छता ठेवण्याचं कर्तव्यही आपलंच आहे हे आपण ब-याच वेळा विसरतो.
          काल विलवडे रेल्वे स्थानकात,रेल्वे रूळांवर कितीतरी कचरा पडला होता.कुणी केला होता तो ? रेल्वे प्रवाशांनी चटपटीत मसालेदार कुरकुरे,चिप्स खाऊन त्याची आवरणं फेकून दिली होती.प्लॅस्टीक बाटलीतून पाणी पिणे हे उच्च संस्कृतीचं लक्षण समजलं जातंय पण पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाटली रेल्वे गाडीत असलेल्या कचरा डब्यात टाकणे हे सुद्धा उच्च राहणीचं द्योतक आहे हे दाखवायला आपण का पुढे येत नाही ?
           विलवडे रेल्वे स्टेशनच्या जवळच ' रूक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ ' हे गेली सतरा वर्षे दहावीचा १०० टक्के निकाल देणारी शाळा.शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांना माणूस म्हणून जगण्याचे संस्कारही या शाळेत मिळतात.काल त्या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी विलवडे स्टेशनात आले आणि  त्या सर्वांनी स्थानक परिसरात व रेल्वे मार्गावर पडलेला मानव निर्मित कचरा गोळा करून तो परिसर सुंदर बनविला.स्वच्छतेनंतर  त्या परिसराने स्वच्छ हवेचा आस्वाद घेतला व त्या राबणा-या हातांना दुवा दिल्या असतील.
           व्हेळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक व शिक्षक व कर्मचा-यांना धन्यवाद !

सुभाष लाड
संघाध्यक्ष
९८६९१०५७३४








No comments:

Post a Comment