Thursday, January 22, 2026

नाट्य पंढरीतला नवा वारकरी ' अनिरुद्ध पेडणेकर '

         सव्वाशे वर्षाहून अधिक काळ नाटकांची परंपरा जपणारा आमचा रिंगणे गाव आजही हे नाट्य परंपरा तितक्याच उत्साहात सुरू आहे. वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने किंवा वाडीच्या सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने गावात वर्षाकाठी चार-पाच वेळा तरी नाटकाचे खेळ होतात. इथल्या मुलांना शाळेची घंटा ऐकण्या अगोदर नाटकाची घंटा ऐकायला मिळते आणि त्या घंटेच्या नांदाने आपसूकच त्यांच्यात एका छंदाची रुजवण होते. त्यामुळे कदाचित शाळेची घंटा ऐकून ती दूर पळतील पण नाटकाची घंटा ऐकण्यासाठी  रात्रीच्या नाट्यप्रयोगाला ती आतुरतेने जत्रेत धावतील. नाटक बघताना नटाने संवादात घेतलेला पाॅझ हा अभिनयाचा भाग आहे की पाठांतर नसल्याचा परिणाम आहे याच्यातला फरक इथल्या पहिली दुसरीत शिकणाऱ्या मुलाला आपसूक कळतो आणि टाळी वाजवायची की नाही हे तो ठरवतो. नाटकाबद्दलची इतकी निरीक्षण शक्ती इथल्या मुलांच्या मध्ये आलेली आहे. त्यामुळे रिंगणे गावातल्या कुठल्याही रंगमंचावर उभ्या राहणाऱ्या कलाकाराला पाठांतर करावेच लागते त्याचबरोबर सकस अभिनय सुद्धा दाखवावा लागतो. आपण सुद्धा एक दिवस असेच रंगभूमी वरती येऊ आणि अवघ्यांच्या टाळ्या घेऊ हे स्वप्न घेऊनच इथली मुले मोठी होत असतात. असेच स्वप्न घेऊन नाटककार ला.कृ. आयरे मुंबईत आले. इथे त्यांना विस्तीर्ण अवकाश मिळाले आणि एक दिवस ते कामगार अंक म्हणून रंगभूमीवरील शेक्सपियर म्हणून नावारुपास आले. त्यांच्या पुढच्या काळात नाटककार द.सी. चव्हाण, नाटककार महादेवराव हांदे, नाटककार भि.स.पेडणेकर अशी लेखक मंडळी या मातीत जन्मास आली. या मंडळींचे नाट्य खेळ आमच्या पिढीला बघता आले. आमच्या पिढीतील नाटककार डॉ. मंगेश हांदे यांनी लेखक दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्व भूमिका लिलया पार पाडून आपणही रिंगणे गावचेच आहोत हे जगासमोर मांडले. हा असा लेखाजोखा  रिंगणे गावी होणाऱ्या ११व्या ग्रामीण मराठी  साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मांडत असतानाच माझ्या व्हाट्सअप वरती अनिरुद्ध ने पाठवलेली गोड बातमी वाचली आणि माझ्या मनात सहज एक वाक्य येऊन गेलं " नाट्य पंढरीत एक नवा वारकरी मार्गस्थ होत आहे "

   ‌.        आमच्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने माझ्यासारख्या अनेकांना नाट्य अभिनय करण्याची संधी मिळाली. इथल्या प्रत्येक पिढीला इथल्या रंगभूमी वरती येण्याची संधी मिळत गेली. १९२७ साली सुरू झालेली ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने चालू असल्याचे समाधान मिळते. येथे अनिरुद्ध पेडणेकर गेल्या चार-पाच वर्षात आपल्या लेखन कलेची दिग्दर्शनाचे आणि अभिनयाची सुद्धा झलक दाखवली आहे ती बघून हा मुलगा नाट्य क्षेत्रात काही करेल अशी खात्री वाटत गेली. गेल्या वर्षी बापाची भूमिका मी करावी यासाठी त्याने माझ्याकडे विचारणा केली. तोच दिग्दर्शन करणार हे मला माहिती होते आमच्या दोघात एका पिढीचे अंतर आहे त्यामुळे आपल्याला हे जमवून घ्यायला लागणार हेही मला माहीत होते. मी त्याला होकार दिला आणि नाटक रुळावर आले. एक छोटासा विषय त्यांनी कल्पकतेने फुलवला होता आणि त्याच्या डोक्यात दिग्दर्शनही पक्के होते त्यामुळे पहिल्या तालमींपासून त्याने दिलेल्या सर्व सूचना मी पाळण्याचा प्रयत्न केला. तो कधीतरी सहज बोलून जायचा " काका तुम्हाला जमतय हां , आता असं करून बघा ." असं म्हणून तू मला बरोबर मार्गावर आणायचा.एकदाचं नाटक झालं.कसं झालं हे जाणून घेण्याअगोदरच " छान झाले हो तुमची भूमिका " असे शब्द कानावर आले आणि आम्ही धन्य झालो.

 

           या तालमीच्या वेळेला आमच्या बऱ्याच गप्पा चालायच्या त्या वेळेला अनिरुद्ध ठाण्यातल्या  सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, शाळेत मुलांना अभिनयाचे धडे देत असतो हे कळले. तो नाट्यलेखन ही करीत असतो याचे कौतुक वाटले. कधी कधी माझ्या मुलांचा अमुक दिवशी कार्यक्रम आहे असेही सांगायचा. त्यातून नाटकच याचा श्वास आहे याची मला जाणीव झाली. काल परवा त्याने मला दिलेल्या  बातमीने सुखावून गेलो. मी त्याला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या.

          

साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त) व मराठी वाग्मय मंडळ आणि विनय आपटे प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य एकांकिका स्पर्धा- २०२६

             अंतिम फेरी निकाल-

सर्वोत्कृष्ट बालनाट्य एकांकिका प्रथम 🥇सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, ठाणेची 🎭आकाशाच्या पलीकडे-🎭

लेखक/ दिग्दर्शक- अनिरुद्ध सुनिल पेडणेकर.

सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम 🥇 - अनिरुद्ध सुनिल पेडणेकर

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम 🥇 - डॅनियल प्रणव ब्रह्मभट्ट.

         अनिरुद्धने त्या बालनाट्य स्पर्धेतील मानाची असलेली सर्वच बक्षिसे खिशात घातली.

          अनिरुद्धची ही नाट्यक्षेत्रातील कामगिरी अधिक विस्तारत जाणार आहे आणि एक यशस्वी नाटककार म्हणून त्याचा नावलौकिक होणार आहे याची मला खात्री आहे.त्याच्या त्या वाटचाली साठी माझ्या आभाळभर शुभेच्छा त्याच्यापाठीशी आहेत.

                     यशस्वी भव !

सुभाष लाड.                                                अध्यक्ष.                                                        राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई


अनिरुद्ध सुनिल पेडणेकर                                     77380 93059

************************₹

काळाच्या ओघानं मानवी जीवनाचे, नात्यांचे बदललेले संदर्भबिंदू लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीच्या ग्रामीण प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीची 'रंगभाषा' बदलू पाहणारा हा तरुण रंगकर्मी........ 

अनिरुद्ध हा रंगभूमीच भविष्य आहे.                               रंगभूमीच्या (हौशी) त्या साचेबद्ध रक्तरंजित, बटबटीत, भावकीच्या कंदालात्मक नाटकांतून पेक्षकांना बाहेर काढून, त्यांना प्रायोगिक, सर्जनशील नाट्यप्रयोग देण्याचा अनिरुध्दचा प्रयत्न असतो. तो वाखानन्याजोगा आहे.     लेखकांने लिहिलेली तीच संहिता, तीच कविता, तेच संवाद मात्र दिग्दर्शकाच्या आपल्या frame मधून पाहताना  त्याचा वेगळा आणि स्वतंत्र अन्वयार्थ शोधण्याच्या ध्यासातून, त्याच सादरीकरण बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तें फारच आव्हानात्मक असतं.  काल त्यांना मिळालेला 'गौरव' ही त्यांच्या रचनात्मक कर्तृत्वाचीच पावती आहे............ 

अनिरुद्ध तुमच्या उज्वल नाट्य कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!


- किशोर आयरे.


            

1 comment:

  1. काळाच्या ओघानं मानवी जीवनाचे, नात्यांचे बदललेले संदर्भबिंदू लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीच्या ग्रामीण प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन, हौशी रंगभूमीची 'रंगभाषा' बदलू पाहणारा हा तरुण रंगकर्मी........ अनिरुद्ध हा रंगभूमीच भविष्य आहे. रंगभूमीच्या (हौशी) त्या साचेबद्ध रक्तरंजित, बटबटीत, भावकीच्या कंदालात्मक नाटकांतून पेक्षकांना बाहेर काढून, त्यांना प्रायोगिक, सर्जनशील नाट्यप्रयोग देण्याचा अनिरुध्दचा प्रयत्न असतो. तो वाखानन्याजोगा आहे. लेखकांने लिहिलेली तीच संहिता, तीच कविता, तेच संवाद मात्र दिग्दर्शकाच्या आपल्या frame मधून पाहताना त्याचा वेगळा आणि स्वतंत्र अन्वयार्थ शोधण्याच्या ध्यासातून, त्याच सादरीकरण बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तें फारच आव्हानात्मक असतं. काल त्यांना मिळालेला 'गौरव' ही त्यांच्या रचनात्मक कर्तृत्वाचीच पावती आहे............ अनिरुद्ध तुमच्या उज्वल नाट्य कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

    ReplyDelete