Sunday, January 18, 2026

संमेलनापूर्वीच्या गाठी भेटी !


       

            (मा.कुमार केतकर यांची भेट )
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात केली त्याला आज बारा वर्षे होत आहेत आणि या वेळेचे साहित्य संमेलन हे अकरावे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे एक वर्ष सर्व दुनिया थांबली होती त्यामुळे आपले साहित्य संमेलनही होऊ शकले नाही.

    ( लालबागच्या राजामुळे रिंगणे गावाला प्रसिद्धी देणारे मा.सुधीर साळवी यांची भेट )

   संघाचे ग्रामीण साहित्य संमेलन हे केवळ लेखक आणि कवी यांची गर्दी आणि भाषणे एवढ्या पुरता मर्यादित नसून सामाजिक प्रबोधनाचा वसा घेऊन विविध उपक्रमांची मांदियाळी असलेले हे संमेलन असते. मान्यवर साहित्यिकांपासून वाचक आणि प्रेक्षक यांच्यापर्यंत संघाच्या कार्यकर्त्यांना तसेच संमेलन आयोजकांना जावे लागते. आपल्या घरातला एखादा विवाह समारंभ पार पडताना यजमानांची जी धावपळ असते ती धावपळ संघाच्या कार्यकर्त्यांची त्याचबरोबर आयोजक ग्रामस्थांची होत असते. अनेक उपक्रम संमेलनाशी जोडले गेले असल्यामुळे त्या त्या क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा करून आमंत्रित केले जाते तसेच संमेलनाचा आर्थिक भार सोसण्यासाठी समाजातील दात्यांनाही भेटी द्याव्या लागतात.

.       (कोंडगे ग्रामस्थांची संमेलन पूर्व तयारी सभा)

         अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेळ आरगाव रिंगणे कोंडगे कुरंग झर्ये या सर्व गावातील अनेक लोकांशी संपर्क साधण्यात आला त्यामध्ये काही परिचित होते तर काही नव्याने ओळखीचे झाले. मात्र एक सांगायला आनंद वाटतो की या पुढारलेल्या परिसरात ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना उचलून धरण्यात आली. 'आपण हे संमेलन यशस्वी करूया.' अशी ग्वाही प्रत्येक भेटीत तसेच प्रत्येक सभेत मिळाली. त्यातून संघाच्या कार्यकर्त्यांना आणि आयोजक मंडळीला प्रोत्साहन मिळाले आहे त्यामुळेच रिंगणे येथील अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनही गेल्या दहा वर्षातील संमेलना सारखे संस्मरणीय ठरेल याची खात्री वाटते.

. ( सुप्रसिद्ध सतारवादक विदूर महाजन यांची तळेगाव येथे भेट घेण्यात आली)

        रिंगणे गावचे सुपुत्र राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेले नाटककार ला.कृ.आयरे यांचे नाव संमेलनाच्या साहित्य नगरीला देण्यात येणार असून संघाचे बावीस वर्षे सरचिटणीस पद यशस्वीरित्या सांभाळणारे आत्माराम महिपत तथा आ.म. हांदे यांचे नाव व्यासपीठाला देण्यात येणार आहे. या ठिकाणी अनेक कमानी उभारण्यात येणार असून अनेकदा त्याने त्यासाठी आपली योगदान दिले आहे. साहित्य संमेलनाच्या वेळेला स्मरणिका प्रकाशित केली जाते तिचे नाव पत्रिका असून त्यामध्ये प्रतीत यश लेखकांच्या बरोबर रिंगणे परिसरातील अनेक नवोदित लेखकांनी आपले लेख दिले आहेत. अर्थात त्यासाठी सुद्धा अनेकदा त्याने आपल्या जाहिराती देऊन आपला सहकार्याचा वाटा उचललेला आहे.

( रिंगणे हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक)

       या परिसरात तीन माध्यमिक विद्यालये आहेत. तेथील विद्यार्थी एकांकिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे मुलांची जोरदार तयारी करून घेण्याचे काम शिक्षक करीत आहेत. रांगोळी स्पर्धा कथाकथन यासाठी निवडलेली मुले आपला सराव करत आहेत. ३० जानेवारीच्या रात्री आठ वाजता यशवंत माणके लिखित तीन अंकी नाटक चौथा सादर केले जाणार आहे. रेल्व परिसरातील सर्व गावातील हौशी कलाकार त्यात भूमिका सादर करणार आहेत त्याच्या तालमी सुरू आहेत. आपल्याकडच्या बचत गटातील महिला संमेलन स्थळी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लावणार आहेत त्याच्या तयारीत त्या महिला व्यग्र आहेत.

.               (ग्रामपंचायत येथील सभा )

       अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी छोटी प्रतिकृती वाटावी अशा प्रकारचे हे संमेलन विविध प्रदर्शनाने सजणार आहे. त्यामध्ये कोंडक गावचे सुपुत्र इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन असेल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर व चित्रकार लेखक कवी यांचे चित्रपट. कणकवलीचे अनिकेत पावस्कर यांचे 'अक्षरोत्सव 'हे प्रदर्शन असेल. स्थानिक शाळकरी मुलांचे चित्र प्रदर्शन, अनेक पुस्तकांचे स्टॉल्स इथे गर्दी करणार आहेत.

( सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांच्या घरी )

        इथल्याच मातीतील डॉ. सायली दळवी आयरे यांची मोफत दंतचिकित्सा, डॉ. श्रीधर ठाकूर देसाई यांच्यातर्फे मोफत नेत्रचिकित्सा तसेच डॉ. नितीन तावडे यांचे मधुमेह व रक्तदाब याबाबतचा मोफत सल्ला देणारी सुविधा संमेलनात उपलब्ध होणार आहे.

( कोंडगे हायस्कूलच्या मुलांसमोर बोलतानाश्रीम. स्नेहल आयरे)

           नदी जलपूजन हा कार्यक्रम नावेरी नदीच्या काठावर दोन ठिकाणी होणार आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी सायं ५ वा.कोंडगे येथे तर ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रिंगणे येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी 'माझी झाशी देणार नाही' अशा प्रकारचा नारा देऊन इंग्रजी सैनिकांशी लढताना वीरमरण पत्करले त्या राणी लक्ष्मीबाई ने झाशी बरोबर लांजा तालुक्यातील कोट गावचे हे नाव अजरामर केले त्या राणी लक्ष्मीबाईंचा जय घोष करत ग्रामीण साहित्य संमेलनाचे जाहीर आमंत्रण देत  २६ जानेवारीला सकाळी १० वा क्रांतीज्योत फेरी सुरू होईल आणि लांजा-वाटूळ-व्हेळ- आरगाव- रिंगणे कोंड-पाचल-झर्ये-कुरंग-कोंडगे अशी फिरून सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय रिंगणे येथे विसर्जित होईल.

.              (रत्नागिरी येथील पत्रकार परिषद)

          ३१ जानेवारीला ग्रंथ दिंडी, संमेलन अध्यक्षांचे भाषण, व्याख्याने, परिसंवाद काव्य संमेलने आणि सतार वादन असे भरगच्च कार्यक्रम असतील तर १फेब्रुवारीला विविध पुरस्कार तसेच जीवन गौरव कोकण भूषण हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्याचबरोबर कोकणातल्या स्थानिक मुलांच्या बरोबर लग्न करणाऱ्या नववधूंना आहेर दिला जाईल. वयाची नव्वदी  पार करणाऱ्या वृद्धांचा सत्कार करण्यात येईल. हे असे विविध उपक्रम असलेले ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठी भाषेचे सुपुत्र धडपडत आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !

( रिंगणे परिसरातील मुंबई ग्रामस्थांची दादर येथील सभा)

         मराठी भाषेच्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी आयोजिलेल्या संमेलनात आपणही सहभागी व्हावे ही नम्र विनंती !

जय मराठी !!

सुभाष लाड                                                  अध्यक्ष                                                          राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

( ह.भ.प. सखाराम बुवा आयरे यांच्या निवासस्थानी)



No comments:

Post a Comment