Tuesday, February 20, 2024

पुढच्या पिढीपर्यंत शिवराय पोहोचवायला हवेत!

          


         अवघ्या मराठ्यांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज नाव घेतल्याशिवाय आपल्या मराठीपणाला साज चढत नाही.त्यांच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय छातीचा बहारदारपणा खूलून येत नाही.शिवरायांच्या शौर्यकथा सांगितल्याबिगर शाहीरपण बहरत नाही. मराठी मातांना आपण जिजाऊच्या लेकी आहोत हे सांगतांना आपल्या मुलानं शिवाजीमहाराज छत्रपतींच पाईक होऊनच जगावं हे स्वप्न पडल्याशिवाय गोष्ट संपत नाही.गेली साडेतीनशे या देशावर एकच गारूड आहे "जय शिवाजी" आणि देशाभिमान दाखवणारी एकच आरोळी आहे " हर हर महादेव ".
           विविध कलांची निर्मिती करणाऱ्या या महाराष्ट्र भूमीत  ज्या कलेत शिवाजीराजांचं अस्तित्व आहे ती कला फोफावतांना दिसते.तो कलाकार नावारूपास येतो.त्याच्या आयुष्याचं सोनं होतं.मराठी नाटक तर यात अग्रणी आहे असंच म्हणावं लागेल.नुकताच पवई मध्ये  ऐतिहासिक खेळ झाला.नाटकाची वेळ रात्री आठची होती.चार फूट उंचीचा तीस नी तीस लांबी रूंदीचा रंगमंच उभारला गेला.बंद पडद्यामागे नेपथ्य मांडून झाले. शिवजयंतीच्या समितीचे कार्यकर्ते  पुढे शंभर खुर्च्या मांडून गप्प बसले होते. एवढेतरी प्रेक्षक आले तरी ऐतिहासिक नाटक लावल्याचा आनंद होईल असे म्हणत  रचंन ठेवलेल्या खुर्च्यांच्या ढिगारे बघत बसले.पहिली घंटा झाली. शंभर खुर्च्या भरल्या आता पुन्हा खुर्च्या मांडण्याची  लगबग सुरू झाली. तिसऱ्या घंटेचा आवाज आणि पाचशे खुर्च्यांच्या मागे उभ्या असलेल्या प्रेक्षकांचा गलका एकत्रित झाला.कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि मध्येच एखाद्या समजून घेणाऱ्यास उठायला लावून वृद्धांची महिलांची सोय करू लागले.महालक्ष्मी कलामंचचे कलाकार रंगमंचावर चढलेच होते.कुणीतरी कानात बोलले "मोठी गर्दी आहे".हा उत्साहवर्धक पण दबका आवाज एकेक सगळ्या कलाकारांचे कान तृप्त करता झाला.पेटीवर सूर वाजला आणि पूर्ण माहोल शांत झाला.
  "बहु असोत सुंदर संपन्न की महा" या भुतकाळातील नाट्य सृष्टीचे वैभव पाहिलेल्या नांदीने सगळ्यांचा ठाव घेतला.नांदीचे शब्द विरत जातांना प्रत्येक रंगकर्मीनी नटवर्य वंदन करून जणू काय ' सिमोल्लंघन ' करण्यास परत यायचे आहे अशा उत्साहात आनंदात विंगेत गेले.
          " सहर्ष सादर करीत आहोत  विद्याधर शिवणकर  लिखित आणि  प्रकाश लाड दिग्दर्शित दोन अंकी ऐतिहासिक नाटक ' वीर रत्न बाजीप्रभू ".नाटकाच्या नावाचा पुर्नउच्चार करतां करता पडदा वर गेला.ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ऐतिहासिक पात्रांचा प्रवेश होताच सगळा प्रेक्षक ऐतिहासिक कालात गेला पण तरूणाईच्या तोंडातील शीळ त्यांना दाबून ठेवता आली नाही.कधी शांत तर कधी टाळ्या तर कधी यवनी भुमीकेबद्दलचा तिरस्कार चेहर्‍यावर व्यक्त करीत प्रेक्षक रंगून गेले.सव्वा नऊच्या दरम्यान मध्यांतरात प्रेक्षक घरी जातील.परत येतील की नाही शाश्वती नव्हती.पाच मिनिटात दुसर्‍या अंकाचा पडदा वर गेला.सगळा प्रेक्षक जाग्यावर होता.पहिल्या अंकात  माझी विठोजीची भूमिका असलेला प्रवेश पार पडतांना मला पहिल्याच टाळ्या मिळाल्या पण त्यात अडकलो नाही आणि लांब दूरवर काळोखात नजर टाकणे शक्य झालं नाही पण  आता विंगेतून पाहिलं तर बसलेल्या इतके प्रेक्षक उभे असल्याचं पाहिलं आणि मी नि:शब्द झालो.दुसर्‍या अंकांच्या शेवटच्या दृश्यात बाजीप्रभूंना घोडखिंडीत लढता लढता वीर मरण येते.त्यावेळचे त्याचे रौद्र रूप,रंगमंचावर त्वेषाने लढणं,शत्रूचे वार झेलून महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याच्या तोफांच्या आवाज येईपर्यंत मृत्युलाही थांबायला लावणारी स्वामी निष्ठा विजयी ठरते.

           अवघा प्रेक्षक धन्य तो शिवाजी धन्य ते मावळे म्हणत डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देताना पडदा पडला तरी उठण्याचे भान विसरून जातो तो आभाराचे दोन शब्द बोलण्यासाठी पुन्हा पडदा उघडला तरी बसूनच असतो.डोळे पुसतच कुणी खिशातले पाचशे,हजार,दोन हजार रुपये बक्षीस म्हणून पुढे करतो.पैसे, आभाराचे शब्द,मानाचा नारळ आणि अंगावर आलेली शाल जणू काही महाजांनी पाठवलेला नजरांना समजून तितक्याच अदबीनं तो मान स्विकारताना नाटकाचे सूत्रधार संजय मांडवकर कृतकृत्य झाल्याची अनुभूती घेत होते.ऐतिहासिक नाटकाची ताकद पवई च्या प्रेक्षकांनी दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतांना प्रदीप रेवाळे भांबावून गेले.मी तरी काय बोलणार होतो.

          मी अकरावीत शिपोशी गावी असतांना 'शंभू राजे ' या एकांकिकेत औरंगजेबाची भुमिका केली होती. तेव्हा शिपोशीत ऐतिहासिक नाटकाचा कपडेपट नव्हता. आमच्या रिंगणे गाव नाटकात वेडे आहे. आमच्या वाडीत श्री हनुमान सेवा मंडळ  रिंगणे हे ऐतिहासिक नाटके त्याकाळात करीत असे.  मंडळाचा कपडेपटही होता. मी नाटकात असल्यामुळे कपडे,तलवारी असे पंचवीस - तीस किलो वजनाचा पेटारा माझा भाऊ पंढरी,विजय आत्माराम पेडणेकर व सुधाकर जयराम पेडणेकर या तिघांनी  डोक्यावर घेऊन डोलारखिंडीतील पायवाटेने तीस किमीचे अंतर पायी चालत आणला व नाटक संपल्यावर पुन्हा एवढे अंतर चालून परत नेला. आज चाळीस  वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याच्या आनंदात होतो.तिथले मित्र मला भेटतात तेव्हा माझी ती आठवण सांगतात तेव्हा सुखावह वाटते.पवईत मी अडतीस वर्षे राहतो. त्यांना शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता किंवा लेखक-चित्रकार एवढीच माझी ओळख होती.आज या नाटकानं नाट्यकलाकार ही ओळख करून दिली.माझ्या मुलानं ( अॅड पंकज लाड )व मंडळातल्या त्याच्या मित्रांनी ऐतिहासिक नाटकाचा घाट घातला.संजय मांडवकरांनी प्रयोग घेतांना एक कलाकार रजेवर असल्यानं ती भूमिका मी करावी असा हट्ट धरला.माझ्या अडचणीमुळे माझ्या तालमीसाठी माझ्या सगळे कलाकार घरी आले.आणि इथल्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं कौतुक केलं.त्या सगळ्यांचाच मी ऋणी आहे.केवळ शिवाजी महाराज की जय करून चालणार नाही.तर शिवाजी जगायलाही हवंय.पुढच्या पिढीकडे शिवराय पोहोचवायलाही हवेत याची जाणीव झाली.
       "जय शिवराय "

सुभाष लाड
9869105734









1 comment:

  1. आपल्या लेखणीला व.कलेला सलाम.

    ReplyDelete