१९८० च्या पूर्वी जे प्राथमिक शाळेत गेलेत त्यांच्या ओठांवर त्या काळातल्या पाठ्यपुस्तकातल्या गेयता पूर्ण, तालासुरात म्हणता येतील अशा आणि अर्थवाही कविता आजही रेंगाळत असतात. त्या काळात कविता पाठांतरावरती जोर दिला जायचा. शिक्षक छानशा चालीवरती त्या कविता वारंवार म्हणत तसेच घरी पाठांतर करून येण्यासाठी सुद्धा सांगत. मुलं घरी जेवा कवितांची घोकमपट्टी करत तेव्हा आपसूक काही पालकांना सुद्धा त्या कवितांची ओढ लागे. माझी आई पहाटे पहाटे जात्यावर ती बसून ' शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ ' ही कविता म्हणायची. आमच्या अगोदरच्या पिढीतल्या अभ्यासक्रमातली ती कविता आई वारंवार म्हणत असल्यामुळे मलाही ती कविता पाठ झाली होती.गेल्या वर्षी पार पडलेल्या वाटुळ येथील दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वाटून गावच्या गं.भा. सुनंदा श्रीधर चव्हाण ( यायी ) या ९४ वर्षाच्या आजीबाईंनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या बालवयात त्यांनी पाठ केलेली कविता म्हणून दाखवली. एका अर्थाने ग्रामीण साहित्य संमेलनाचा फायदा काय हे म्हणणाऱ्यांना या आजीबाईंनी चपराक दिली.
मी सातवी इयत्तेत असताना एक कविता मनात घर करून गेली. कवी कुसुमाग्रज यांची ' अनामिकास ' ही ती कविता. रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या एका वीराचं चित्र कवितसोबत होतं.
' अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात ! '
अशा पहिल्या ओळी असलेल्या या कवितेत युद्धात
मृत्यू पावलेल्या अनेक वीरांचं आपल्याला नाव माहित नसतं, अशांच्या मृत्यू स्थळी कुणी स्मारक बांधलेलं नसतं, स्मारक बांधलेलं असला तरी त्या ठिकाणी कोणी दिवा लावत नाही. याचा अर्थ अशा वीरांचं स्मरण कुणी करत नाही त्यांचा इतिहास कोणाला माहिती असत नाही. तरीही अनेक जवान आपल्या सैन्यांमध्ये तळहातावर शीर घेऊन लढत असतात. देशभक्तीनं भारावून गेलेल्या या वीरांना केवळ देशाचा संरक्षण करणे हेच माहिती असतं.अशा अनाम विरांच स्मरण आणि त्यांचा जयजयकार करणारी ही कविता.महाराष्ट्राच्या इतिहासात शिवराज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी चेतवलेल्या स्वराज्याच्या यज्ञात अनेकांनी आहुत्या दिल्या त्यापैकी काही ठरावीकांची नोंद इतिहासाने घेतली. नरवीर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी पुढे पेशवाईत धनाजी संताजी बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा अशी काही नाव चटकन सामान्य माणसांच्या डोळ्यासमोर उभे राहतात कारण त्यांचा इतिहास सर्वश्रुत झालेला आहे. पण जेव्हा इतिहासाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला यांच्याबरोबर अनेकांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्याच्या नोंदी आपल्याला बघायला मिळतात. अशा नोंदी पाहताना एखादी व्यक्ती आपल्या गावाकडची आपल्या परिसरातील आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी किंवा आपल्या आडनावा पैकी असेल तर आपली छाती अधिक रुंदावते. गेल्या महिन्याभरात मी भारावल्या अवस्थेत रायगडाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. इतिहास अभ्यासकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला कारण होतं युट्युब वरती आलेली
दुर्ग रक्षक फोर्स या दुर्गप्रेमी मंडळीकडून आलेली रायगडाच्या काळकाई खिंडीत धारातीर्थी पडलेल्या रायगडाचे तटसरनौबत जावजी लाड यांच्या दुर्लक्षित असलेल्या स्मारकाबद्दलची गोष्ट.
हा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर प्रथम इतिहासकार स्वर्गस्थ रवींद्र लाड उभे राहिले. मला त्याने लाड यांना नावाचा इतिहास सांगितला होता. राजस्थान कडे उंटावरून प्राण्यांचा व्यापार करणाऱ्यांना लाड असे म्हणत. ते लाड व्यापार करीत करीत महाराष्ट्रात उतरले ते लाड आपण आहोत असं त्यांचं ठाम मत होतं. लाड आडनावाचे कोणत्याही जाती जमातीत असले तरी ते राजस्थानातूनच आलेले असून ते एकाच जात कुळीचे आहे असं माझं मत आहे. लाडांचे घराणेही राजस्थानातील शिसोदिया घराण्यापैकीच आहे. त्यामुळे दुर्ग रक्षक फोर्सने टाकलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि त्याने या स्मारकाकडे लाड परिवाराने लक्ष द्यावा असे आव्हान ऐकल्यानंतर माझी अस्वस्थता वाढली. एका दृष्टीने आपल्याच लाड घराण्यातील एक वीर पुरुष स्वराज्याच्या कामी आलेला आहे याचा अभिमान दाटला असतानाच त्याचा पुरावा त्यांनी दिलेला पाहून , त्यांच्या स्मारकाची जागा त्याने शोधून काढल्याचे पाहून आपण त्या स्मारकासाठी काहीतरी करायला हवे यासाठीची माझी तगमग वाढली.
काळकाईची खिंड आणि तटसरनौबत जावजी लाड ( रायगड ) या नावाच्या व्हिडिओत
पेशवे दप्तर ३३ मधील लेख क्रमांक १६८ - हनुमानोड्डाण मारुतीरायासारखे उड्डाण करून लढले.......
शीर कटू नही देह रणांगणी लढले.......हा त्यांनी दिलेला ऐतिहासिक नोंदीचा दाखला आहे. तो देताना पुढे ते
' रायगडाच्या कुशीत घडलेला हा रणभैरव रणझुंजार वीर अभिमन्यू रणसंग्राम तुम्ही पाहिला आहे का ? ' रायगडावरती चार वेळा जाऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या प्रत्येक दगडाला पुन्हा पुन्हा नमस्कार करावा एवढीच भावना मनामध्ये असते. आपण पूर्ण रायगड जाणून घेतलाच नाही याचे सल मनाला टोचू लागले. स्वराज्य रक्षणास्तव मारुतीरायासारखे उड्डाण करून शत्रूवर चाल करून जाणारे तटसरनौबत जावजी लाड यांची माहिती आपण करून घेतली नाही याचे दुःख अधिक वाटू लागले. किमान त्यांचे स्मारक तरी आपण पाहायला हवे हे मनात पक्के ठसले.
तट सरनोबत जाऊदे लाड यांच्यात बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इतिहास अभ्यासक सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला अधिक माहिती दिली.
*शाहूंची जिद्द आणि मराठ्यांचे तांडव - सिद्दीचे मुंडके छाटून रायगडवर पुन्हा भगवा फडकवला*.
रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली.मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली, रायगड मोहिमे व्यतिरिक्त फक्त पानिपतातच इतके मोठे सरदार आणि सेनापती एकत्र उतरले असावेत.
राजपुत्र फत्तेसिंह भोसले, बाजीराव पेशवे,छत्रपतींची हुजुरातीची फौज,पिलाजी जाधवराव,सरखेल सेखोजी आंगरे,सरलष्कर दावलजी सोमवंशी,सेनापती दाभाडे, येसाजी गायकवाड, हिम्मतबहाद्दर उदाजी चव्हाण,श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी आप्पा, भुईंजकर जाधवराव,कृष्णाजी खटावकर,उदाजी पवार,महाडिक,घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे रूप आले.१५-२० आघाड्यांवर युध्द सुरु झाले
मे महिन्याच्या आतच मोठे यश मराठ्यांना प्राप्त झाले बिरवाडी,अवचितगड, घोसाळगड, सुरगड, मदनगड,मंडणगड,विजयगड आणि बाणकोट हे किल्ले ताब्यात आले. फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते.
प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. गड मराठ्यांनी जिंकल्याने सिद्दी चवताळला सिद्दी अंबर ने रायगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, अनेक महिने चकमकी चालली, शेवटी १० जानेवारीला सिद्दी अंबर शी निकराचे युद्ध झाले. छत्रीनिजामपूर, पाचाड येथून रेटत मराठ्यांनी सिद्दी ला रायगड जवळ आणले, गडावरून खाशा फौज आली दोन्हीच्या मध्ये सापडून सिद्दी अंबर आणि त्याचे हजार भर सैन्य या युद्धात ठार झाले. शाहू छत्रपतींनी सिद्दी अंबर चे डोके कापून सातार्याला मागवले आणि जिवंत सापडेल त्या सिद्दी सैनिकांची डोकी कापावी,पाचाड व रायगड वाडी येथील सिद्धीचे वाडे तोफांनी उडवून टाकावे असे आदेश दिले.
सरदार कृष्णाजी खटावकर ,*किल्लेदार जावजी लाड* यांच्यासह अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून रायगड पुन्हा स्वतंत्र केला. शाहू छत्रपतींनी फत्तेसिंहबावा,बाजीराव,प्रतिनिधी यांचा मानाची वस्त्रे आणि मोठी बक्षिसे देऊन गौरव केला. अनेक मातब्बर मोहिमेत पहिल्यांदाच एकमेकांच्या बरोबरीने काम करत असल्याने चुरस निर्माण झाली त्यामुळे प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली.
(संदर्भ -शांताराम विष्णूआवळसकर - रायगडाची जीवन कथा.आपा परब -रायगड स्थलदर्शन आणि रायगड कथा पंचविशी. )
आता मला रायगडाचे वेध लागले. त्या अभ्यासात सुनील कदम यांची याची वेळ घेऊन आम्ही रायगडाकडे निघालो. सुनील बुवा जाधव आणि जीवन पाटील यांना सोबत घेऊन प्रथम रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोके ठेवले. रायगडावरुन खाली उतरल्यावर हिरकणीचे वंशज असलेले आणि 'सह्याद्री हॉटेल ' चालवत असलेले पप्पू अवकिरीकर हे आम्हाला काळकाईच्या खिंडीत घेऊन गेले. लोहरज्जूपासून दोन किलोमीटरवर असलेल्या अरुंद पण पक्क्या रस्त्याच्या बाजूला डावीकडे झाडीत आम्ही शिरलो. सगळीकडे रान माजले होते. हाताने काढणे जेवढे शक्य होते तेवढे रान काढून स्मारक शिळा मोकळी केली. शिळेच्या दर्शनी भागावर हनुमानोड्डासारखे हातात तलवार घेतलेले ते शिल्प पाहिले आणि डोळे अश्रूने डबडबले. इतके वर्ष अनाम राहिलेल्या त्या स्मारकाची निश्चिती झाली होती. पण ते स्मारक अजूनही ऊन पावसात आहे, गवत झाडीत लपले आहे याबाबत अपराधी भावना हृदय चिरून गेली. त्या शिळेला गंध पुष्प वाहून नमन केले. तट सरनोबत जावजी लाड यांच्या नावाने जयघोष केला. ते गवत आणि ती झाडी काढून स्मारकाला मोकळे करण्याची व्यवस्था लावून आम्ही माघारी फिरलो.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि हितचिंतकांची दरवर्षी पावसाळी सहली निघत असते. यावर्षी रायगडावरती जाण्याचे आम्ही ठरवले. मुंबई आणि बाजूच्या भागातून सत्तर जण, लांजा तालुक्यातून स्थानिक कार्यकर्ते आणि महाड मधून साहित्यिक अवि जंगम आणि तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील डॉ. शितल मालुसरे याही आम्हाला येऊन मिळाल्या. याही वेळेला रायगड दर्शन झाल्यानंतर आम्ही तटसरनौबत जावजी लाड यांच्या स्मारकाला भेट दिली. सर्वांच्या उपस्थितीत श्री. मारुती लाड व मी स्वतः सपत्नीक स्मारकाची पूजा केली. या वेळेला स्मारकाची साफसफाई केल्याचे पाहून मनाला समाधान वाटले. आता या लेखाच्या निमित्ताने मी समस्त लाड परिवाराला तसेच शिवभक्तांना आवाहन करीत आहे की " लाड घराण्यातील एक वीर पुरुष रायगडाचे तटसरनौबत जावजी लाड हे १० जानेवारी १७३३ रोजी स्वराज्याचे रक्षण करताना रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या काळकाई खिंडीत धारातीर्थी पडले. त्यांच्या स्मारकाचे जतन करून त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या स्मारकाला चांगले स्वरूप आणू या. तिथे कायमचा एक कृतज्ञतेचा दिवा तेवत राहील याची काळजी घेऊया."
सुभाष लाड
९८६९१०५७३४
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
विशेष सूचना रायगडला घेऊन सदर स्मारकाचा शोध घ्यायचा असल्यास आपल्या सहकार्य करील अशा मावळ्याचा मी आपल्यास फोन नंबर देतोय.
श्री. प्पू अवकीरकर 80805 71543 सह्याद्री हॉटेल , लोहरज्जू जवळ, रायगडाच्या पायथ्याशी
Mr. Pappu Avkirkar 80805 71543. Sahyadri Hotel, near Loharju, at the foot of Raigad.
No comments:
Post a Comment