कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे रेल्वे स्टेशन हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन नंतर जास्त प्रवासी वाहतूक करणारे स्टेशन ठरू शकते. कारण या स्टेशनच्या आसपास असलेल्या जवळजवळ ७५ गावातील प्रवासी रेल्वे स्टेशनचा फायदा घेतात. सध्या या स्टेशन वरती दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकण कन्या आणि तुतारी या तीन गाड्या थांबतात. या व्यतिरिक्त ज्यावेळेला कोकणात गणेशोत्सव दिवाळी आणि शिमगा या सणांच्या वेळेला विशेष गाड्या सोडल्या जातात. सणांच्या वेळेला आपल्या विलवडे स्टेशन वरून जाणाऱ्यांची व येणाऱ्या प्रवासाची संख्या चांगली असून कोकण रेल्वेला बऱ्यापैकी भारमान मिळते मात्र कायमस्वरूपी असलेल्या गाड्यातून स्टेशनला स्टेशन वरून जेवढे भारमान मिळायला हवे तेवढे मिळत नाहीये. ही माहिती संगणकाद्वारे मिळत असल्यामुळे यात सत्यता आहे असे असूनही जर विलवडे स्टेशनला आणखी एखादी एक्सप्रेस दिली तर याच्या मध्ये चांगला फरक पडू शकतो हे रेल्वे प्रशासनाला समजावून सांगण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी आज बेलापूर येथील रायगड भवन मध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक माननीय श्री. डी. एस. लिंगराजू व उप मुख्य वाणिज्य प्रबंधक सन्मा.श्री. राजेंद्र दिनकर घोलप यांची भेट घेतली.
विलवडे रेल्वे प्रवासी संघ या संघटनेची स्थापना सन २००० च्या आसपास स्थानिक पातळीवरती झाली. त्या काळातल्या मंडळींनी त्या त्यावेळी आवश्यक असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात एक दिवा पॅसेंजर सोडल्यानंतर कुठलीही गाडी येथे थांबत नव्हती. हळूहळू कोकण कन्या आणि तुतारी अशा दोन गाड्या थांबू लागल्या आणि प्रवाशांची वर्दळ सुरू झाली. त्याचवेळी विलवडे रेल्वे प्रवासी संघ स्टेशनवरच्या सोयी सुविधा प्रवाशांना मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिला. मात्र गेल्या वर्षी स्थानिक कार्यकर्त्यात शिथिलता जाणवू लागल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री. अमोल रेडीज यांच्याकडून कळले.
राजापूर आणि लांजा तालुक्यातील खेडेगावांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने विलवडे रेल्वे स्टेशनवरच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या विलवडे प्रवासी संघाला मुंबईतून पाठबळ देण्याचे ठरवले. ल*** रेल्वे स्टेशनच्या फायदा घेणाऱ्या मुंबईतील प्रवाशांसाठी मुंबईत मेळावा घेण्याचे ठरले whatsapp ग्रुप निर्माण केला गेला त्या ग्रुप वर हजारो लोकांनी आपले विचार प्रकट केले मात्र प्रत्यक्ष मेळाव्याला पस्तीस प्रवासी उपस्थित राहिले. जे उपस्थित होते त्यांना विलवडे स्टेशन साठी काहीतरी करायचे होते. वेळ द्यायचा होता आणि म्हणूनच त्याच मेळाव्यात विलवडे रेल्वे प्रवासी मुंबईची समिती तयार करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष पद पुढारीचे पत्रकार संजय कदम यांच्याकडे देण्यात आले तर सरचिटणीस पद शांत, संयमी व एखादी गोष्ट मनावर घेतली तर तिचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची जिद्द असलेला तरुण श्री. राज गणपत हांदे याज कडे देण्यात आले. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि विलवडे रेल्वे प्रवासी संघ ग्रामीण व मुंबई यांनी एकत्रित येऊन गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्याकडून विलवडे रेल्वे स्टेशनच्या बाबतीतल्या विविध मागणी पत्रकांवरती सह्या करून घेतल्या तसेच त्यांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. याबाबतीत विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेने मोलाचे सहकार्य केले. रेल्वे प्रवाशांना दूरदूरच्या गावात सुखरूप पणे पोहोचवणाऱ्या तेथील रिक्षा चालकांचा संघाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.पुढे ती सर्व निवेदने व प्रवाशांच्या सह्यांचे कागद रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय व बेलापूर येथील मुख्य कार्यालयात सुपूर्त करण्यात आली. पुढे दिलेल्या पत्रांची कार्यवाही काय होते आहे याचीही माहिती घेण्यात आली.
विलवडे रेल्वे प्रवासी संघ, मुंबई ला या ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात संघटनेचे सरचिटणीस राज हांदे यांनी अनेकदा विलवडे स्टेशनला भेट देऊन तिथल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याचं काम केलं. आवश्यक वाटले त्या त्या वेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन विविध कार्यालयात एकत्रीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याशी चर्चा करून बेलापूर कार्यालयातील मुख्य वाणिज्य प्रबंधकांची भेट घेण्याचे ठरवले आहे असे सांगितले. नेहमीप्रमाणे मी सोबत येईन असे त्यांना सांगितले व आवश्यक ती निवेदन पत्रे तयार करून घेतली. गुरुवार दिनांक २७ जून २०२४ ला मी आणि सुहास खामकर बेलापूर स्टेशन गाठले.त्या ठिकाणी सदानंद खामकर, दीपक जानस्कर भेटले.कोकण भवन जवळून झेरॉक्स घेऊन रायगड भवन पोहोचेपर्यंत सुनिल लोणकर, रमेश गुरव, सुहास लिंगायत, हितेश कानागळ,प्रशांत पालकर,रमेश बेर्डे, विश्वनाथ आयरे,सौ.गीता हांदे ही मंडळी आलीच होती.राजने मागील कागदपत्रांची जाडजूड फाईल आणली होती ती सांभाळत "आपणांस चौथ्या मजल्यावर जायचे आहे" असे सांगून तो लिफ्टच्या दिशेने वळला.
आमची भेटण्याची वेळ नियोजित होती परंतु आमची मोठी संख्या पाहिल्यानंतर बैठक व्यवस्था अधिकची करावी लागली.यात थोडा वेळ गेला.मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी उपमुख्य प्रबंधकांनाही बोलावून घेतले होते.लिंगराजू सरांनी आमच्या निवेदनातील प्रत्येक बाबींवर त्यांनी चर्चा केली.विलवडे स्टेशनवर जाण्याकरीता वृद्ध व विकलांग व्यक्तींसाठी फलाटाला समतल असलेल्या जागेवरून मोकळी वाट करून देणार,वेटिंग रूम करता सर्व्हे करून पुढील कार्यवाही करणार. मुख्य रस्त्यापासून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची दूर्दशा निदर्शनास आणून देण्यात आली.
कोकण रेल्वे कडे पुरेसा फंड नसल्यामुळे आपण अनेक एनजीओंच्या मार्फत सोयी सुविधांची कामे करत असल्याची माहिती देऊन आपण विलवडे स्टेशनसाठी ही तसे प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. फलाटावरती प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या शेड बाबत आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपणही देणगीदार मिळवून शेड उभारण्याच्या प्रयत्नास हातभार लावू असे सांगितले. विलवडे स्टेशनवर जनशताब्दी किंवा मांडवी यापैकी एखाद्या गाडीला थांबा द्यावा याबाबत विस्तृत स्वरूपात चर्चा झाली. शेवटी प्रयोगा दाखल एखादी गाडी सुरू करण्याची त्यांनी विनंती मान्य करून जर प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळाल्यास ती गाडी कायमस्वरूपाची करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सणांकरता सोडण्यात येणाऱ्या विशेष सर्व गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याचे त्यांनी मान्य केले. अशाप्रकारे आजची भेट समाधानकारक झाली.
जवळजवळ तासभर झालेल्या या चर्चेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचेही समाधान झाले. कोकण रेल्वेच्या कारभारासंदर्भात बरीचशी माहिती मिळवता आली. आज मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले त्यातून संघटनेच्या पुढील वाटचाली बद्दलही चर्चा करण्यात आली. लवकरच आपण मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी विलवडे रेल्वे प्रवाशांची सभा घेण्याचे ठरविण्यात आले. विशेषतः विलवडे स्टेशनच्या समस्यांबाबत नेहमीच जागरूकता दाखवून वेळोवेळी पत्रव्यवहार करणारे, वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना भेटणारे सरचिटणीस राज हांदे यांच्या चेहऱ्यावरती नवीन उत्साह पाहायला मिळाला. आपली नोकरी प्रामाणिकपणाने करून मिळालेला मोकळा वेळ सामाजिक कार्यात व्यतीत करणारे कार्यकर्ते आज दुर्मिळ होत असताना राज हांदे यांच्याकडे पाहिले की अजूनही आशेचा किरण बाकी आहे. त्यांना अधिक ताकद देण्यासाठी त्यांच्यासारखेच तरुण गोळा होतील. आणि सामाजिक कार्याचा हा जगन्नाथाचा रथ हळूहळू पुढे जात राहील.
सुभाष लाड
सल्लागार
विलवडे रेल्वे प्रवासी संघ मुंबई/ग्रामीण
राज हांदे
सरचिटणीस ,
विलवडे रेल्वे प्रवासी संघ मुंबई / ग्रामीण
विलवडे सुविधा युक्त व्हावेच, हिरव्यागार हरित क्रांती, जगावेगळ , इंटेरियर प्रकल्पाने सुसज्ज व्हावे हीच सदिच्छा 🙏💐
ReplyDelete