Sunday, November 9, 2025

🏋️‍♀️🌷🏋️‍♀️ 🌷🏋️‍♀️ राष्ट्रीय पातळीवर रिंगणे गावची मानसी हांदे🏋️‍♀️🌷🏋️‍♀️ 🌷🏋️‍♀️



२ नोव्हेंबर पासून जगभर भारतातल्या स्त्रियांच्या कर्तुत्वावर बोलण्याची अहंमिका लागली आहे. महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारतीय महिलावीरांनी केलेली अतुलनीय कामगिरी आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. भारतीय महिला टीमने कडवी झुंज देत विश्व कप जिंकून आणला आणि सगळीकडून त्यांचे कौतुक होऊ लागले.तसं पाहिलं तर जगभराचा इतिहास पाहिल्यानंतर जगात कोणत्याही देशातील महिला जेवढ्या पुढे गेल्या नाहीत तेवढ्या भारतीय महिला प्रत्येक काळात पुढे असलेल्या दिसतात. वैदिक काळापासून ते आताच्या स्वातंत्र्य युद्धापर्यंतच्या काळात महिलांनी कर्तृत्व सिद्ध केल्याचे दाखले आपल्याला सापडतात. मात्र मध्ये एक असा मोठा काळ होऊन गेला की त्या काळात स्त्रियांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होऊ लागल्या,  स्त्रियांच्या समाजात वावरण्यावर, स्त्रियांच्या  शिक्षणावर बंदी आणण्यात आली. त्याही काळात काही निवडक स्त्रियांनी सर्व बंधने झुगारून आपणही पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकतो हे दाखवून दिले. मात्र सामान्य स्त्री मात्र त्या बंधनाच्या जोकडाखाली स्वतःला बांधून घेऊ लागली स्वतःच्या अभिव्यक्तीला मारू लागली. महिला क्रिकेट सुद्धा त्याच बंधनांच बळी ठरला. त्यामुळेच जागतिक पातळीवरती पहिला विश्व कप स्पर्धा १९७३ मध्ये झाली तोपर्यंत आपल्या देशात महिला क्रिकेटचं नामो निशाण नव्हतं. अर्थात पहिल्या महिला विश्व कप स्पर्धेत भारत सहभागी नव्हता.


         पण आता भारतातील महिलांसाठींच सामाजिक वातावरण शत प्रतिशत जरी पुरक नसले तरी बर्यापैकी पोषक आहे म्हणुनच आज सर्वच क्षेत्रात महिलांचा वावर आहे.नुसता वावर नाही तर त्या जिथे जातात तिथे चमकदार कामगिरी बजावताहेत.परवा विश्वविजेत्या महिला क्रिकेटियरांचं कौतुक करण्यात आपण सगळे गुंतलो असताना हरियाना मध्ये महिला पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातून आलेल्या मुली एकाग्रतेने खेळत होत्या.५ नोव्हेंबर ला अंतिम निकाल जाहिर झाला तेव्हा एक नंबरवर महाराष्ट्र होता.महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी भारावलेले मुलगी हसतमुख चेहऱ्याने सुवर्ण पदक गळ्यात घेऊन उभी होती.पेड पत्रकारितेचा पांढरा हत्ती पाळण्याची शक्ती त्यांच्या असोसिएशनकडे नसल्याने आणि पत्रकारितेला साधन शुचितेच भान नसल्यामुळे तिचा गाजावाजा झाला नाही.पण त्या खेळाच्या क्षेत्रातील प्रत्येकाला त्या मुलीने एक महत्वाचं शिखर गाठल्याचा आनंद झाला.त्या मुलीने मुंबईत आपल्या पालकांना सांगून आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.त्या कुटुंबाशी मी जवळचा असल्याने तिच्या वडिलांनी मला सांगितली.मला त्या मुलीचं कौतुक वाटलंच पण वेगळ्या वाटेवर जाणाऱ्या मुलीला पुर्णपणे पाठिंबा देणाऱ्या तिच्या कुटुंबीयांचेही कौतुक वाटलेच.ती मुलगी माझ्या रिंगणे गावची सुकन्या असल्यामुळे माझा आनंद काहिसा गर्व मिश्रीतच होता.


       त्या मुलीच कौतुक आपण घरीच जाऊन करायचं असं ठरवलं.मी संजय हांदेना फोन करून मानसी मुंबईत कधी पोहोचतेय याची माहिती घेतली आणि मी गणेश चव्हाण, रमेश काटकर या संघाच्या पदाधिकाऱ्यांना आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शांतारामजी पाटकर यांना फोन केला." एक आनंदाची बातमी आहे. आमच्या गावातील मानसी संजय हांदे या मुलीने राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतांना सुवर्ण पदक मिळवले आहे.तिचं कौतुक करायला रविवारी सकाळी जोगेश्वरीला शामनगर येथे जायचे आहे."

" अरे व्वा छान कामगिरी ! आम्ही येतोय ." एवढ्या संभाषणाने आमचा फोन थांबला.

तसा मी चार वर्षांपूर्वी तिचंच कौतुक करायला शामनगरला गेलो होतो.त्यावेळी ती राज्य पातळीवर चमकली होती.ती राष्ट्रीय पातळीवर चमकली तेव्हा दुसरी भेट झाली.आता पुढच्या भेटी ती जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल तेव्हा वारंवार होतील याची खात्री तिच्या मुलाखतीतून झाली.

जोगेश्वरी च्या मराठी माध्यमाच्या श्रमिक विद्यालयातून ती दहावी झाली. घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयातून ती बी कॉम झाली. तिच्या कबड्डी हा आवडता खेळ. मुंबई संघातून ते अनेक वेळा खेळली आहे मात्र कोरोना काळामध्ये तिच्या या खेळात बदल झाला. कबड्डी खेळण्यासाठी ते घाटकोपरला यायची. कोरोनामुळे घाटकोपरला जाणे तिचे बंद झाले. परंतु नेहमीच व्यायाम करण्याच्या सवयीमुळे तिला व्यायामात सातत्य ठेवणे गरजेचे वाटत होते. तुम्ही जवळच व्यायाम शाळा पाहिले त्या व्यायाम शाळेत तिच्या सरावातील कसब आणि आत्मविश्वास पाहून तू पावर लिफ्टिंग मध्ये नाव कमवशील असं व्यायाम शाळेच्या व्यवस्थापक सांगू लागले. त्याही संधीला तिने स्वीकारायचं ठरवलं. आणि इथूनच तिचा नवा प्रवास सुरू झाला पाॅवर लिफ्टींग.

      आताची मुंबईत जन्मलेली पिढी ही स्वतःला मुंबईकर म्हणत असली तरी त्यांच्या पालकांचं मन आपल्या मायभूमीकडेच रेंगाळत असतं त्यामुळे गावाकडे होणाऱ्या सण उत्सवात पालकांचा हात धरून गावाकडे जाणं एवढाच त्यांचा गावाशी संबंध असतो. संजय हांदे यांचे वडील केशव हांदे हे जोगेश्वरीला पानाची गादी चालवत असत. पुढे ते जोगेश्वरीलाच स्थायिक झाले. केशव हांदे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी संजय यांच्या हांदे यांच्याकडे आली. संजय हांदे जोगेश्वरी मध्ये घरे बांधणे, दुरुस्ती करणे हा व्यवसाय करतात. सोबतच एक उत्तम वाहनचालक असल्याने अनेकजण त्यांच्यासोबत प्रवास करणे पसंत करतात. माणुसकी जपणं आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांचे अनेक घनिष्ठ मित्र आहेत. तशी परिस्थिती बेताची असून सुद्धा अवघ्या कुटुंबाचा भार स्वतः सांभाळताना ते कधी खचले नाहीत आणि गावाकडची ओढ असल्यामुळे गावाकडच्या मुख्य कार्यक्रमांना हजेरी लावणं त्यांचं कधी चुकलं नाही. त्यामुळे रिंगणे गावात सुद्धा त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

     आम्ही सकाळीच मानसीच्या घरी गेलो. तिचा सन्मान केला. तोंड भरून कौतुक केले. आणि मोकळेपणी गप्पा ही मारल्या. देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ती मेहनत घेते आहे. सोबतच चांगली नोकरी मिळाली तर आपल्या कुटुंबाची परिस्थितीही बदलता येईल त्यासाठी तिची लढाई आहे. आता मुली सुद्धा मुलांप्रमाणेच आपल्या कुटुंबाचा विचार करताहेत हा आश्वासक विचार भारतातील महिलांच्या सामाजिक विश्वाला बळकटी देईल हा सुखद आशावाद घेऊन आम्ही मानसी आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या प्रेमळ कुटुंबाचा निरोप घेतला.

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई


संपर्क - मानसी संजय हांदे +91 91671 75860


💐🌳🌹 अभिप्राय 💐 अभिप्राय 🌳🌹 

१)🌳🌹 *सन्माननीय श्री लाड साहेब,कु.मानसी हांदे विषयी खूप छान माहिती दिली आहे,तिचे कर्तृत्व वाचून ती आमच्या तालुक्यातील आहे याचा अभिमान वाटला*

*शिपोशी हितवर्धक मंडळाच्या वतीने कु.मानसी संजय हांदे हीचे मनःपूर्वक,अभिनंदन आणि सदैव सर्वत्र यशस्वी होवो, नामवंत किर्तीवंत होवो या हार्दिक शुभेच्छा*

शाहिर मधुकर खामकर,

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

२) मानसी हिचे राष्ट्रीय पावर लिफ्टिंग मधील यश कौतुकास्पद  👌  तिचे हार्दिक अभिनंदन  🌹👍🏼

शांताराम कोटकर,ठाणे🌹👍🏼 🌹👍🏼 🌹👍🏼 🌹👍🏼 🌹👍🏼 🌹👍🏼

३)सरस!! खरं आहे ,आज पत्रकारिता देशोधडीलाच लागली आहे. आवाका वाढला पण दर्जा पार रसातळाला गेला,

   मानसी हांदे साठी शुभेच्छा!! व त्रिवार अभिनंदन!!

शिरीष पाटील, पालघर 

४)छानच👌👌👍👍

कु. मानसी तुझे, तुझ्या आईवडिलांचे व  गुरुजनांचे खुप  हार्दीक हार्दीक अभिनंदन. 🌹🌹💐💐

अनिल घाग, नवीमुंबई 

५) कु.मानसी हांदे हिने राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्राचे आणि स्वतःच्या रिंगणे गावाचे नाव तसेच आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले.तिच्या या यशस्वी वाटचालीचे मनःपूर्वक अभिनंदन.

सुप्रिया मोरे,





.              मानसी तिच्या कुटुंबीयांसमवेत 

.              मानसी तिच्या प्रशिक्षकांना ओढत

.  स्पर्धेतील एक क्षण 

.        स्पर्धेतील एक क्षण 

.          गगनभरारी घेतल्यानंतर आनंदीत मानसी

No comments:

Post a Comment