सरलेल्या दिवसांच्या आठवणी पुन्हा जगता येत नाहीत पण पुस्तक रूपाने , चित्राद्वारे किंवा सिनेमाद्वारे त्या आठवणी जाग्या होतात. ते पुस्तक ते चित्र किंवा तो सिनेमा तेवढ्याच ताकदीचा असेल तर आपण त्या ठिकाणी आहोत याचा भास होतो तो मनाला आनंद देणारा असतो.
असंच काहीतरी एप्रिल मे ९९ हा सिनेमा पाहून अनुभवायला मिळालं.
कोकणचा किनारा, कोकणच्या नारळी आणि कोकणातील स्मरणात राहणारी विविध वैशिष्ट्य जपून जगलेली माणसं पुन्हा डोळ्यांसमोर आली की आपल्या आनंदाला पारावर राहात नाही. हा आनंद देण्याचे काम' एप्रिल मे ९९' हा सिनेमा शत प्रतिशत करतो.
ही सिनेमा ची जाहिरात नाही. कोकणातल्या कलाकारांनी एक उत्तम कलाकृती सादर केलेली असताना आपण त्याचा प्रचार करू नये हे मनाला पटत नव्हते म्हणूनच हा लेखप्रपंच.
बंद घरांचा आजार कोकणात बळावत चाललेला असताना साठ सत्तरच्या दशकात जन्मलेल्या पिढीला मुला माणसांनी गुराढोरानी भरलेली घरे पुन्हा पाहता येतील की नाही याबाबत शंका वाटते. म्हणून त्या पिढीने हा सिनेमा जरूर पहावा. त्या पिढीचं बालपण कसं गेलं हे कथन करून पुढच्या पिढीला सांगत बसण्यापेक्षा पुढच्या पिढीला घेऊनच हा सिनेमा बघावा.
एकत्रित कुटुंबात राहताना माणूस बनून कसं राहावं, समाजात कसं वागावं याचा संस्कार आपसूकच पुढच्या पिढीकडे जात होता.म्हणूनच घर समाज गाव होतं खेळतं वाटत होतं. सुबह का भुला शाम को लौट के आता था.
तसं पाहिलं तर किशोर वयातल्या मुलांच्या भावभावनांचे सुंदर चित्रण पाहताना कधी खळखळून हसू येतं तर कधी अलगद डोळे ओले होतात.ते सगळे आपल्या आयुष्यातील आहेत असं वाटतं ते क्षण माझ्या कोकणातच म्हणतात याचा आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.
अवघ्या गावा वरती आईच्या मायेने प्रेम करणाऱ्या भटीन काकूने केलेला उपदेश ऐकायला या सिनेमाचं तिकिट काढाच.
समुद्रात घुसलेल्या खडकाच्या सरीवर बसून अर्ध्या वाटेवर सोडून गेलेल्या आपल्या आईला हाक मारणाऱ्या जाईची बघायला, अस्सल कोकणी उनाड मुलांचं कुठेही तडमडणं कसं निरागस असतं हे पाहायला एकटं नाही तर सर्व कुटुंबासहीत या.
हा सिनेमा पडदवरच बघणे आवश्यक आहे. म्हणून लवकर घाई करा. जवळच्या सिनेमागृहाचं तिकिट आरक्षित करा.
सर्व यशस्वी कलाकारांसह सर्व टिमचं मनापासून कौतुक
सुभाष लाड
माझ्या नातवंडांनीही सिनेमाचा आनंद घेतला.
No comments:
Post a Comment