Wednesday, July 10, 2024

संकटातही संधी शोधणारा महायोद्धा !

         युद्ध केवळ रणांगणावरच खेळले जाते असे नाही तर माणसाचं आयुष्य हे सुद्धा एक रणांगण आहे. या रणांगणावरही क्षणाक्षणाला छोटी मोठी युद्धे लढावी लागतात. जो या युद्धांकडे पाठ फिरवून पळू लागतो तो जीवन जगण्यासाठी लायक असत नाही तर या छोट्या मोठ्या संकटांना छातीवर झेलून त्यांच्याशी युक्तीने-शक्तीने दोन हात करत त्यांना परतवून लावतात. त्यात ते स्वतः विजयी होतात पण त्या विजयातूनही अनेकांना संघर्षात जमिनीवर पाय रोवून कसे लढावे याचे धडे देतात, त्यातून जगण्याची नवीन आशा पल्लवीत करण्याची हिम्मत देतात ती माणसे इतरांसाठी महायोद्धे ठरतात. असे अनेक महायोद्धे आपल्या आजूबाजूला असतात परंतु आपण आपल्या स्वतःभोवती टाकून घेतलेल्या वलया बाहेर डोकावून बघत नाही. मग आपल्याला अशा योद्धांची माहिती कशी मिळणार? वास्तविक ज्यांच्या परिघात अशी वेगवेगळी अनुभव संपन्न माणसं असतात तीच माणसं आपलं आणि समाजाचे जीवन फुलवतात.' मागच्यास ठेच पुढचा शहाणा ' ही म्हण अशावेळी सार्थ होते.
         मी मुंबईला पहिला आलो तो १९७७ ला. ठाण्याच्या एसटी स्थानकात आमचा प्रवास संपला. तिथून मी रेल्वेने सायनला आलो. कोंडग्यातील बळीराम बारस्कर हे  त्या वेळेला सोबत होते. त्यांचे वास्तव्य मुंबईतच असल्याने त्यांना मुंबईची सर्व माहिती होती. त्यानंतर अनेक वेळा ठाण्यामध्ये जाण्याचा राहण्याचा प्रसंग आला परंतु मी ज्या वेळेला ' ध्येयसाधना ' हे पुस्तक वाचलं तेव्हापासून ठाणे हे माझं आहे, ठाण्याच्या विकासात माझ्या मातीतल्या माणसाचा मोठा हातभार आहे याचा मला अभिमान वाटत आलेला आहे.
 ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर रिक्षा थांबा असून शेकडो रिक्षा तिथे रांगेने सेवा देण्यासाठी उभ्या असतात. मी सुद्धा रांगेत उभा राहिलेला आहे आता मात्र मला ठाण्यातली रिक्षा दिसली की, आठवतं ते १९६८ चे वर्ष. याच वर्षी ठाण्यामध्ये प्रथमत:च दहा रिक्षांना परमिट देण्याची ठाणे आर. टी. ओ. ची योजना निघाली. तोपर्यंत आज जिथे रिक्षा उभ्या राहतात त्या ठिकाणी टांग्यांची गर्दी असायची.रेल्वेतली चांगल्या पगाराची व सन्मानाची नोकरी असूनही आपण स्वतंत्र व्यवसाय करावा या विचाराने पछाडलेले श्री.वामन अनंत प्रभूदेसाई यांनी ते परमिट मिळवले. भांडुप मध्ये  आज जिथे ड्रीम मॉल बंद अवस्थेत आहे त्या जागी ए.पी.आय कंपनी होती. त्यामध्ये तीन चाकी रिक्षांची निर्मिती व्हायची.  त्या कंपनीचे मुख्य वितरक मि.दादाजी धाकजी आणि कंपनी.हे गिरगावात ऑपेरा हाऊस जवळ होते. कंपनीतून मिळणाऱ्या इंजिनाच्या सांगाड्याला सुसज्ज रिक्षाचे स्वरूप देण्याचे काम पुण्यामध्ये होत असे. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा पुण्यालाच उपलब्ध होते.रिक्षाची किंमत त्यावेळी ६५०० रु. होती.रेल्वेची सतरा वर्षांची नोकरी सोडल्यानंतर  ग्रॅच्युइटी, भविष्य निधी  मिळून मिळालेल्या नऊ हजारातून देणी देऊन सहा हजार रुपये शिल्लक होते. प्रत्यक्ष रिक्षा रस्त्यावर येईपर्यंत अनेक समस्यांतून प्रवास करावा लागला परंतु संकटाला संधीच्या रुपात पाहणारे प्रभूदेसाई आपल्या ध्येय निश्चितीपासून दूर जात नाहीत किंवा त्यांच्या मनाची स्थिती ढळू देत नाहीत हे व्यवसायात उतरु पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे.
         ठाण्यात प्रवासी ऑटोरिक्षा प्रथम आणणाऱ्या प्रभूदेसाईनी मालवाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा सुद्धा ठाण्यात प्रथम आणली. तसे मोटारगाडी ही धक्का मारूनच चालवावी लागते असा समज असलेल्या प्रभूदेसाईंनी वीस वर्षाची जुनी गाडी घेऊन परमिट काढण्यासाठी आरटीओ चा रस्ता धरला. आपल्याला एखाद्या क्षेत्रातील ज्ञान नाही याचं व्यंग बाळगून न बसता ते ज्ञान मिळवून त्या क्षेत्रात पुढे जाण्याची हिंमत ठेवणारे प्रभुदेसाई यांनी  पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या चार चाकी प्रवासासाठी वापरल्या, टेम्पो घेतले एवढेच काय तर रेल्वेच्या माल उचलणाऱ्या क्लिअरिंग क्षेत्रात दहा पंधरा ट्रक लावून एक चांगला व्यवसायिक म्हणून जम बसविला.
         मुंबईला चुलत मामांच्या आसऱ्याने दादर येथे वास्तव्य करताना वामनरावांना गॅलरीतल्या सार्वजनिक संडास बाथरूमच्या ओट्यावरती पथारी टाकून रात्र काढावी लागत होती. पुढे ठाण्याला आल्यानंतर भाड्यांच्या खोल्यात राहून त्यांनी दिवस काढले. रेल्वेतली महिना १२०० रुपयाची नोकरी करून काटकसर करून जमलेल्या पैशातून कदाचित त्यांना दहा बाय दहाची खोली घेता आली असती परंतु वामन प्रभुदेसाई यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाच्या जोरावर १९८० मध्ये ठाण्यातल्या धोबी आळीत दोन हजार दोनशे स्क्वेअर फुटाचे स्वतःच्या मालकीचे घर बांधलं.
          देशातल्या पहिल्या पाच मध्ये गणल्या जाणाऱ्या सहकारी बँकांमध्ये ठाणे जनता सहकारी बँकेचा नंबर आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा राज्यातून१४१ शाखांमध्ये विस्तारलेल्या या सहकारी बँकेच्या संस्थापक सदस्यांमध्ये वामनराव प्रभूदेसाई हे अग्रभागी होते. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेला सुरुवातीपासून काही अलिखित नियम करून तिचा कारभार नेहमीच पारदर्शी राहील असा प्रयत्न केला गेला. संचालक मंडळाने कर्मचारी पदे भरताना केवळ गुणवत्ता हा आधार धरूनच भरती करावी, संचालकाने आपण बँकेचे मालक नसून विश्वस्त आहोत असा विचारून काम करणे आवश्यक आहे हे नियम काटेकोरपणे पाळले गेले त्यामुळे या बँकेचा लवकरच नावलौकिक निर्माण झाला.आपल्याल कोणते तरी पद मिळाले पाहिजे म्हणून वामनरावांनी कधीही  काम केले नाही.तसेच संचालक पदाच्या शर्यतीमध्येही ते कधीच नव्हते. त्याबाबत "कुठलेही पद सर्वमान्य भूमिकेतून मिळाले तर त्याची उंची वाढते. हव्यासातून मिळवलेले पद फार काळ टिकत नाही शिवाय अनेकांशी शत्रुत्व पत्करावे लागते आणि तो पिंड माझा नाही पदाची अपेक्षा न करता काम करण्यात मला जास्त आनंद मिळतो." हे विचार वामनरावांचे होते.  कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या वामनरावांना १९८१ पासून पुढील १३ वर्ष  संचालक पद आणि अध्यक्षपद ही भूषवायला मिळाले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्या बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला पाहिजे हे वामनरावांचे स्वप्न होते. मात्र एकतीस कोटींची ठेव असलेल्या या बँकेला ५० कोटी पर्यंत ठेवी वाढवणे आवश्यक होतं. उपक्रम हाती घेतल्यापासून पुढील नऊ महिन्यात बँकेच्या ठेवी ५५ कोटी मध्ये पर्यंत नेण्याचं काम सर्वांच्या मदतीने करण्यात आलं. त्यासाठी पुढाकार घेतला तो वामनराव प्रभुदेसाई यांनी. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असा शिक्का आपल्यावर लागू नये म्हणून प्रभूदेसाई यांनी स्वतःच कोटी मध्ये ठेवी आणण्यावर भर दिला. १९९० ला ठाणे जनता सहकारी बँकेला शेड्युल्ड बँक म्हणून दर्जा  मिळाला.केवळ मॅट्रिक पर्यंत शिक्षण असलेल्या वामनरावांची बँकेतील कामगिरी कौतुकास्पद नाही काय?
( उत्तन येथील केशव सृष्टीचे विहंगम दृश्य)

        एखाद्या संस्थेचे अध्यक्ष पद भूषवताना त्या पदाला गरिमा प्राप्त करून देण्यासाठी त्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याचा वस्तूपाठ वामनराव प्रभूदेसाई यांनी उत्तन येथील केशवसृष्टीचं अध्यक्षपद भुषवल्यानंतर त्या ठिकाणी केलेल्या कामातून दाखवून दिला आहे. एखादा विकासात्मक उपक्रम राबवायचा ठरवल्यास त्याची सुरुवात आपल्याच खिशात हात घालून करावी लागते तेव्हाच अनेक दाते पुढे येतात याचा चांगला अनुभव वामनरावांच्या गाठीशी असल्यामुळे त्यांनी लाखो रुपये केशवसृष्टीच्या विकासासाठी खर्च केलेले दिसून येते. त्याचबरोबर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देताना वेळ, काळ आणि धन हे खर्च करावे लागते हे त्यांच्याच संकल्पनेतून सुरू झालेल्या मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या कामातून त्यांनी दाखवले. त्यांच्याकडे असलेल्या संघटनचातुर्यामुळे अल्पावधीतच मध्य रेल्वे कर्मचारी संघ हा राष्ट्रव्यापी होऊन त्या संघाचे जनरल सेक्रेटरी होण्याचा मान सुद्धा वामनराव प्रभूदेसाईंना मिळाला. 
         सतत कार्यमग्न राहणारी व्यक्ती कधी रिकामी राहू शकत नाही. त्याचे रिकामेपण हे वेगळा कामाचे चिंतन असू शकते. वामनरावांनी पाणी शुद्ध करणाऱ्या पावडरची निर्मिती केली. त्या पावडरचा व्यापार एअर इंडियात होत होता. शिजवलेले अन्न पदार्थ गरम राहण्यासाठी भांड्याखाली सतत जळत असणारी ब्ल्यू फेमची निर्मिती  केली. त्याचा व्यापार ताजमहाल सारख्या बड्या हॉटेलमध्ये केला जात होता.अशातच तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी स्त्रियांचे होणारे कष्ट कमी करावे यासाठी पितांबरीची निर्मिती झाली. ही पावडर उपयुक्त आहे हे अनेक लोकांच्याकडून टेस्ट करून आले. परंतु ती पावडर कोणी दुकानदार आपल्या दुकानात ठेवू इच्छित नव्हता पण म्हणून वामनराव हताश झाले नाहीत. विक्रीसाठीच्या नवनवीन कल्पना राबवून अल्पावधीतच मुंबई पुण्यासारख्या शहरात त्यांनी  पितांबरी ला विश्वसनीय ब्रॅन्ड बनविला. वामनरावांच्या सगळ्याच उद्योगात त्यांच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य होते. त्यांची धडपड त्यांचा मुलगाही पाहत होता. १९८३ ला त्यांचा मुलगा पदवीधर झाला. त्यालाही एखादी नोकरी चांगली मिळाली असती परंतु व्यवसाय करण्याचे संस्कार घराण्यातून आलेले असल्याने त्यांनीही वडिलांच्या उद्योगात सहभागी होण्याचे ठरवले. विशेषत: पितांबरीची जबाबदारी स्वीकारली.त्यांनी पितांबरीला व्यावसायिक बैठक मिळवून देतानाच प्रसार माध्यमांचा खुबीने उपयोग करीत ती सर्वश्रुत केली.वामनरावांनी या उद्योगातून स्वतः निवृत्ती घेताना २००१ साली पितांबरीची वार्षिक उलाढाल तीन कोटीची होती. त्यांच्या मुलाने ती लवकरच तीस कोटीवर नेऊन ठेवली याचा आनंद व्यक्त करताना वामन रावांनी आपल्या मुलाचं कौतुक करताना तो केवळ सक्षम नाही तर कर्तबगारही आहे हे प्रांजळपणे मान्य केले. एखादा बाप आपल्या मुलाबद्दल मी समाधानी आहे हे उद्गार काढतो त्या वेळेला तो खऱ्या अर्थाने सुखी असतो, आनंदी असतो. 
( एकेकाळी कोकणातील शिक्षण पंढरी असलेले राजापूर हायस्कूल)
           राजापुरातल्या तळवडे गावी स्वातंत्र्यपूर्वकालात जन्मलेले वामनराव इयत्ता चौथी पर्यंत गावात शिकले. पुढील शिक्षणासाठी त्यांना राजापुरात जावं लागले. तिथेच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या शाखांमध्ये राष्ट्र प्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या चौदाव्या वर्षी राजापूर ते पुणे व्हाया कोल्हापूर असा एकट्याने प्रवास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला त्यांनी हजेरी लावली. राजापुरात मॅट्रिकची परीक्षा देऊन ते मुंबईत आपल्या मोठ्या भावाकडे आले. कोकणातील माणूस मुंबईत येतो तो चाकरमानी होण्यासाठीच. परंतु वामनरावांना नोकरी करणारा चाकरमानी बनायचं नव्हतं तर एक व्यावसायिक उद्योगपती बनायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. जे ध्येय मनाशी बाळगले होते त्या ध्येयाकडे जाण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करीत राहिले. वडिलांकडून घेतलेले कष्टाचे संस्कार त्यांना स्वतःचे जीवन घडवताना उपयोगी आलेच परंतु ते संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास सुद्धा ते यशस्वी ठरले. ज्या मातीत आपण जन्मास आलो त्या मातीचे ऋण कधीही फेडू शकत नाही परंतु ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला त्या मातीत जाऊन त्या मातीशी एकरूप होण्याची संधी सोडायची नाही या विचाराने भारावलेले वामनराव शेवटचा श्वास घेईपर्यंत  प्रत्येक वर्षी गावातल्या दत्त जयंतीच्या उत्सवात उपस्थित राहिले. आनंद देत घेत राहिले. तोच संस्कार आज
 त्यांच्या मुलाकडे अर्थात मा. रविंद्रजी वामनराव प्रभूदेसाई यांच्याकडे आलेला आहे. पितांबरी हा उद्योग केवळ भारतातच नाही तर जगातल्या सतरा देशांमध्ये पसरलेला आहे त्या वटवृक्षाची फळे हजारो कुटुंबे चाखताहेत. अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांना आज त्यांचा हातभार मिळतो आहे. 
( तळवडे येथील श्री दत्त मंदिर, इथे पाच दिवस उत्सव असतो.)
        आज कोकण भकास होत असताना, कोकणातील घरे बंद होत असताना, कोकणातील तरुणाने उद्योजक बनलं पाहिजे, व्यावसायिक बनलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे. हे कसं शक्य आहे ? याचे उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर  आपल्याच मातीतल्या, आपल्या मातीवरती प्रेम करणाऱ्या व यशस्वी उद्योजक म्हणून लौकिक प्राप्त झालेल्या स्व.श्री. वामनराव अनंत प्रभूदेसाई यांचे ध्येय साधना हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तकाचे शब्दांकन सौ.श्वेता गानू यांचं असून सुश्रेय प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे..
        मला जिंकायचं आहे या ध्येयाने पछाडलेला वीर योद्धा रणांगणावर उभा राहतो, त्यावेळेला चारही दिशेने होणाऱ्या माऱ्याचा त्याला तेवढ्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने  सामना करायचा असतो. एक समर्थ उद्योजक म्हणून उभे राहताना असेच बरे वाईट प्रसंगांना सामोरे जातांना आपली इच्छाशक्ती तसूभरही ढळू न देता तसेच चार पैसे हातात आले म्हणून आनंदाच्या भरात उधळून न लावता त्याचे योग्य नियोजन करावे लागते.आपला व्यवसाय अधिक पुढे कसा वाढेल याचे आडाखे बांधून उद्योजकांना पुढे जायचं असतं. वामनरावांचे ' ध्येयसाधना ' हे पुस्तक तरुण उद्योजकांना त्यांच्या ध्येयाप्रती वाटचाल करण्यासाठी  दीप होऊन प्रकाश देईल याची खात्री वाटते.
धन्यवाद.


सुभाष लाड 
अध्यक्ष 
राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
(याच इमारतीत वामनरावांनी सतरा वर्षे सेवा केली व इथेच मध्य रेल्वे कर्मचारी संघाची स्थापना केली.)
( तळवडे येथील लाकडी बनावटीच्या दत्त मंदिराचा आतील भाग )
()
          
        
        
        
           
         

No comments:

Post a Comment