आज गुरुपौर्णिमा ! या दिवसानिमित्त मी माझ्या गुरुजनांना भेटण्याचे व त्यांना नमस्कार करण्याचे ठरवले होते परंतु गेले दोन-तीन दिवस मुंबईमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यामुळे तो कार्यक्रम काय होऊ शकला नाही.
माझे पहिलीपासून ते चौथीपर्यंत चे शिक्षक ज्यांनी मला त्यानंतर सुद्धा माझ्या शिक्षणासाठी मदत केली ते माझे फापे गुरुजी दोन वर्षांपूर्वी सोडून गेले. माझे माध्यमिक शिक्षणातील मुख्याध्यापक व मराठी हिंदीचे शिक्षक एम आर ढेकळे सर गेल्यावर्षीच निवर्तले. त्या अगोदर काही दिवस डावरे सर ही निघून गेले. या सर्वांच्या मी संपर्कात होतो शक्य होईल त्यावेळेला निपाणीला जाऊन डावरे सर ढेकळे सरांना भेटायचो.
फापे गुरुजींचं गाव आडवली माझ्या रिंगणे गावापासून दूर असले तरी लांजा पासून जवळ असल्याने गावी गेल्यानंतर एखादी फेरी फापे गुरुजींच्याकडे असायची. फापे गुरुजींनी माझ्या आयुष्यातल्या अनेक पायऱ्यांवर मला शाब्दिक आधार दिल्याने ते माझे गुरुजी अधिक पालक म्हणून मला जास्त जवळचे वाटायचे. ते जाण्याच्या अगोदर एक वर्ष मी त्यांच्याच घरी जाऊन गुरुपौर्णिमेचा साग्र संगीत कार्यक्रम आयोजित केला मला फार बरे वाटले. त्यांच्या मुलींनी आणि आडवली गावच्या ग्रामस्थांनी, तेथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगले योगदान दिले. मी त्यांचा नेहमीच ऋणी आहे.
मी गावाकडचे शिक्षण पूर्ण करून मुंबईला आल्यानंतर क्षात्र कुलोत्पन्न मराठा समाज अध्यापक विद्यालय परेल अर्थात शिरोडकर कॉलेजला डीएड साठी प्रवेश घेतला. या कॉलेजने भरपूर काही दिले. शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या कलांचा आस्वाद लुटण्याची संधी मिळाली. एक वेगळाच आत्मविश्वास या कॉलेजने दिल्याने माझ्या शिक्षकी पेशात या कॉलेजचे महत्त्वाचं योगदान आहे असं मी मानतो. या कॉलेजचे चिटणीस सर जे चित्रकला शिकवायचे त्यांनी माझं फळ्यावरचे लेखन पाहून मला इलेमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी तयारी करून घेतली. मी या परीक्षांमध्ये अनुक्रमे ए+ आणि बी+ अशा श्रेणी मिळवल्या. परिस्थितीमुळे मला चित्रकलेमध्ये काही करता आले नाही परंतु माझ्या एकूण आयुष्यात चित्रकलेने रंग भरले. तो आत्मविश्वास मला चिटणीस सरांकडून मिळाला. प्राचार्य अ.ना.जोशी, शिरोडकर सर, गावडे सर, खरे मॅडम, जाधव मॅडम, झांट्ये मॅडम, ओटवणेकर मॅडम याचबरोबर व्ही. व्ही. पाटील सर आणि बोराडे सर ही सर्व मंडळी लक्षात राहिली.
कॉलेज सुटल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात मी अनेक शिक्षकांशी भेटत होतो .मात्र त्यानंतर कामाच्या धगडग्यात या भेटी कमी होत गेल्या मात्र व्ही.व्ही. पाटील सर यांच्या विठ्ठलवाडीतल्या शाळेमुळे माझा त्यांच्याशी संपर्क कायमचा राहिला. माझा एक जिवलग मित्र बाळा चव्हाण हा वासिंद येथे राहत असल्याने वासिंदलाच राहणारे बोराडे सर हे संपर्कात राहिले. बोराडे सर तर माझ्या घरगुती कार्यक्रमातही सहभागी होत आले आहेत.
बोराडे सरांची सध्याची शारीरिक स्थिती ही बिकट आहे. त्यांना ऐकण्याचा तसेच चालण्याचाही त्रास होतो. मात्र पाटील सर आजही आपल्या शाळेच्या दैनंदिन कारभारात लक्ष देत असतात. आज संध्याकाळी मी त्यांना आणि बोराडे सरांना फोन केला आणि त्यांना नमस्कार केला. बोराडे सरांच्या बद्दलची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केले त्या पुस्तकासाठी मी प्रस्तावना लिहिली ती प्रस्तावना मी आपल्यासमोर वाचायला देत आहे, शक्य झाल्यास सरांचे पुस्तक मागून घ्या आणि सरांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वतःला घडवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वाचण्यासारखा आहे.
*********
माझ्या प्राथमिक शिक्षणापासून पुढील सर्व पायऱ्यांवरील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांशी संपर्क ठेवताना कधी भ्रमणध्वनीवरून बोलणे किंवा प्रत्यक्ष भेटण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणत्याही वयात आई-वडिलांसमोर जाताना आपण लहानच असतो ही भावना जशी घट्ट असते तसेच शिक्षकांच्याही समोर जाताना आपण आजही त्यांचे विद्यार्थी आहोत ही भावना सुखद आणि आनंददायी असते. त्या एका क्षणासाठी मी माझ्या अनेक शिक्षकांच्या साठी वेळ काढून त्यांच्या सहवासात जात असतो. ते शिक्षक जेव्हा आठवणीने माझी चौकशी करतात तेव्हा मला मोहरून गेल्यासारखे वाटते.
परेल येथील क्षा.म.स. अध्यापक विद्यालयाचे व्ही.व्ही. पाटील सर आणि बोराडे सर हे माझे शिक्षक , माझे प्रशंसकही असल्याने मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आस्तेवाईकपणे चौकशी करीत असतात. पाटील सर सेवानिवृत्तीनंतर त्यानीच सुरू केलेल्या विठ्ठलवाडी येथील शाळेत व्यस्त असताना शाळेच्या कार्यक्रमात मला पाहुणा म्हणून बोलावतात तेव्हा त्यांच्यात आईचं ममत्व आढळतं म्हणूनच तर त्यांचं बोलावणं आलं की मी आत्मीयतेन पळतो. तसंच काहीसं बोराडे सरांच्या बाबतीतही असल्यानं माझे मित्र वासिंदला राहणारे बाळा चव्हाण यांच्याकडे जायचो तेव्हा वासिंदच्या पश्चिमेला बोराडे सरांकडे वाकडी वाट करायचो पुढे त्यांनी पूर्वेलाच मेडिकल स्टोअर्स सुरू केल्यावर ते वाटेवरच भेटायचे.
सहा महिन्यांपूर्वी सरांचा मला फोन आला. त्यांच्या आवाजातला उत्साह कमी झाल्यासारखा वाटत होतं." सुभाष मी पुस्तक प्रकाशित करतोय त्याची प्रस्तावना तू लिहावीस असं मला वाटतं, मी ते छापखान्यात दिले पण माझ्याकडे मूळ प्रत आहे. मला आता प्रवास झेपत नाही तेव्हा तू इथे येऊन वाचलंस तर बरं होईल."
. स्वतःच पुस्तक प्रकाशित होणं यातला आनंद आणि त्यात पहिल्याच पुस्तकाचा आनंद म्हणजे बऱ्याच वर्षांनी आणि नवसाने गर्भधारणा झालेल्या बाईला होणाऱ्या आनंदासारखा असतो याची मला जाणीव असल्याने सरांच्या आनंदासाठी " मी येतो एक दिवस वेळ काढून" असं सांगितलं.
मी सरांकडे गेलो तेव्हा त्यांचे शरीर थकल्यासारखे वाटत होते. तसं पाहिलं तर ८६ च्या वयात आजकाल इतकं निरोगी जीवन म्हणजे कौतुकाचीच बाब आहे म्हणा. सरांची ठेंगणी शरीर एसटी आणि व्यायामाच्या सवयीन आलेला काटकपणा यामुळे काल-परवापर्यंत साठीच्या आसपास असल्यासारखे दिसणारे सर या वेळेला मात्र पुरुष वाटले गप्पागोष्टी करत चहापान झाले नव्याने काही केलेलं लहान मुलांना इतरांना दाखवण्यातला जो आनंद असतो तसाच काहीसा भाव चेहऱ्यावर आणून सरांनी पुस्तकाचं हस्तलिखित माझ्या हातात ठेवलं मला समोर मोडी लिपीतला दस्तऐवज असल्यासारखंच वाटलं काही पान चाळली घोटी मोखाडा मुंबई वासिंद हा प्रवास अधिक विस्तारलेला असणार याची जाणीव झाली सर एखाद्या उपक्रमाचा वृत्तांत आणि उपक्रमातल्या अनुभूतीसहित केलेलं वर्णन यात फरक असतो हे तर तुमचं आत्मवृत्त असेल तर त्यात वाक्यरचने बरोबर ते प्रवाही करण्यासाठी त्यावर संस्कार करणे गरजेचे आहे एखाद्या जाणकार लेखकाचे सहकार्य घ्यावे लागेल.
मी माझ्या पद्धतीने लिहिले तू काय तो बदल कर त्याला प्रस्तावना लिही आणि लवकर प्रकाशित करायचे आहे हे लक्षात ठेव.
मी अडचणीत सापडलो होतो पण काहीतरी करू असे ठामपणे सांगितले प्रकाशकाचा नंबर घेऊन त्याला पीडीएफ मला पाठवून द्यायला सांगून मी निघून आलो बरेच दिवस झाले तरी माझ्या हातात काही न आल्यामुळे मी काही करू शकलो नाही पुस्तकाचे साहित्य माझ्या हातात आल्यावर सरांच्या हातात पुस्तक पडले पाहिजे हे एकच महत्त्वाचे काम समजून एका रात्रीत जेवढे शक्य झाले तेवढ्या शुद्धलेखन दुरुस्त्या केल्या त्याचे जवळजवळ ऐसे ऐंशी फोटोग्राफ्स काढून पाठवले काही तोंडी सूचना दिल्या सोबत प्रस्तावना पाठवतो असंही सांगितलं.
आज-काल सरकारी फायदा मिळवण्यासाठीच जातीच्या प्रमाणपत्राची मागणी आणि मतांचा बाजार मांडणारे राजकारण याशिवाय कोणी एकमेकाला जात विचारत नाही आणि कुणाचं अडतही नाही त्यामुळे सरांची जात त्यांची हा प्रश्न सरांच्या कडे शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पडलेला नव्हता मला तर आज कळले की सर लोहार समाजाचे आहेत पण त्यामुळे माझी भूवरी सुद्धा खालीवर झाली नाही.
सरांचे बालपण आई-वडिलांना सोडून रयत शिक्षण संस्थेच्या वस्तीगृहात गेल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जगण्यावर आहे पण वस्तीगृहातल्या मुलात भावंडांचे प्रेम आणि शिक्षकांत मायेचा ओलावा जेवढा मिळाला तेवढ्यावरच कुटुंब म्हणजे काय असते याचे संस्कार त्यांच्यावर झाले जगण्याचा परिघही तेवढाच मर्यादित राहिला त्यामुळे त्यांच्या लिखाणात कुटुंबातील व्यक्तीसाठी एखादं पान देऊन ते मोकळे झाले बालवयात वस्तीगृहातील मुलाने ज्या मुलाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवले तेच त्यांच्या आयुष्यात कामास आलेले दिसतात ज्या वस्तीग्रहाने त्यांना दुनियेत वावरण्यासाठी प्रकाश वाटा दिल्या त्याच वस्तीग्रहणे त्यांची चूक पदरात घेऊन त्यांच्या मर्जीने जगण्यास सताड दार उघड उघडून दिले नाही तर ते तिथेच राहून आपल्या वाट्याला आलेल्या वरिष्ठांच्या असुयांचे तीक्ष्णबाण टोचून घेत दिवस काढावे लागले असते.
सरांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचा मूळ गाव मोखाडा जन्म नाशिक मधल्या घोटी मधला लेखकाला लहान वयात हा आदिवासी बहुल भाग कसा होता याबाबत विस्तृत लिहिता आले असते पण या मातीने त्यांना तिथेच जास्त वेळ रांगो दिले नाही तर तिच्याबद्दलचे ममत्व कसे असावे शिकवण्याची ताकद नसल्यामुळे वस्तीगृहात प्रवेश मिळवण्यासाठी मुलांचा सांभाळ करायला कोणी नाही असे वडिलांनी सांगणे म्हणजे मुल आईशिवाय पोरके आहे हे सांगताना वडिलांचे काळीज हल्ले नसेल का? लेखकाच्या बालमनावर ओरखडा पडला नसेल का पण लेखक साहित्य लेखनापासून कोसो मैल दूर असल्याने ते प्रसंग रंगवण्याची जागा होती हे त्यांच्या गावीच नव्हते.
एक मात्र आहे पुस्तकात रयत शिक्षण संस्थेची बरीच माहिती मिळते शिक्षक या नात्याने कोणकोणते उपक्रम राबविले कुठे कुठे सहली काढिल्या यांची संख्या कळते त्यांच्या लोकल प्रवासातील मित्रांच्या सोबतीने सेवानिवृत्तीनंतर देश विदेशात कुठे कुठे फिरले याचा पाढा वाचायला मिळतो जगण्याचा आनंद कसा घ्यावा हेही त्यातून कळते.
लेखकाला शेवटी जगण्याच्या आनंदात किमान आपली पत्नी तरी असावी याची जाणीव होऊन काही सहली पत्नीसोबत केल्याचा उल्लेख करतात तर आईची पंच्यात्तरी व वडिलांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न करून मुलांनी व्यक्त केलेली आई वडिलांच्या बाबतीतील कृतज्ञता सुसंस्कारी परिवार सर्वांच्या आजरास पात्र ठरला आहे तीच मुले वडिलांचे पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत यावरून खडकावरचा अंकुर स्वतःच्या हिमतीवर वृक्ष झाला आणि मुलांच्या रूपाने सुगंधित फुले मिळवू लागला आहे हे पुस्तक आपणास आवडेल अशी खात्री बाळगतो.
सुभाष लाड
No comments:
Post a Comment