Saturday, November 16, 2024

मला तुमच्याशी बोलायचं आहे !

   

         प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जोडला गेलेला असतो. त्या त्या विचारधारेची माणसं आपला समूह बनवत असतात जेणेकरून आपली विचारधारा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावी आणि लोकांनी त्या विचारधारेशी जोडलं जावं अशी प्रत्येक विचारधारेच्या माणसांची, संस्थापकाची इच्छा असते. मग ती विचारधारा एखाद्या धर्माशी निगडित असते, एखाद्या सामाजिक कार्याशी जोडलेली असते, देश कार्याशी जोडलेली असते. आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. त्या राजकीय पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. त्या प्रत्येकाला त्यांची विचारधारा प्रिय असून त्या विचारधारेच्या माध्यमातून देशावर राज्य करण्याचा किंवा राज्यात सत्तेवर येण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो.
(राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज नेते पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल)

          भारत हा जगात लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे.१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले.त्याचवेळी देशाचा राज्यशकट चालवण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी घटना समिती स्थापन करुन पुढील तीन वर्षांत ही घटना तयार करण्यात आली.याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचे योगदान दिलेच परंतु अगदी सामान्य माणसाला स्वांतत्र्य,हक्क आणि अधिकार मिळवून देणारी राज्य घटना त्यांनी मांडली. २६ जानेवारी १९५० ला आपण त्या घटनेचा स्विकार करून देशाच्या राज्यकारभाराला सुरुवात झाली.घटनेप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची सभागृहे असून लोकसभेत प्रत्यक्ष लोकांनी गुप्त मतदानकरुन तब्बल ४८९ सदस्य खासदार म्हणून पाठवायचे होते.विशाल भारतखंडाकरीता हा पहिलाच अनुभव होता.त्या निवडणुका योग्य पद्धतीने होण्याकरीता १९५१ ला निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.२५ आक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ एवढ्या प्रदीर्घ कालावधीत शांततेत व नियोजन पूर्वक निवडणुका पार पडल्या. १७ कोटी मतदारांनी सहभाग घेतलेल्या या पहिल्याच निवडणुकीतील सुत्रबद्धता पाहून जगभरात कौतुक झालेच भारतात लोकशाही रुजू शकणार नाही अशा वल्गना करणाऱ्यांची तोंडे गप्प झाली.

( प्रजा समाजवादी पक्षाचे नेते जयप्रकाश नारायण )

         त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेला पक्ष होता. त्यामुळे या पक्षाला ७५ टक्के जागा मिळाल्या तर कम्युनिस्ट यांना १६ जागा,प्रजा समाजवादी पक्षाला १२ तर ४९ उमेदवार रिंगणात असणाऱ्या जनसंघाला उभ्या देशभरात केवळ ३ जागा मिळवता आल्या होत्या. स्वातंत्र्य पूर्व काळापासून काँग्रेस पक्ष तळागाळात जाऊन प्रचाराचं काम करत असल्याने काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांच्या पर्यंत पोहोचली होती मात्र इतर पक्षांच्या विचारधारा त्याचे प्रचारक कमी पडल्याने लोकांच्या प्रयत्न पोचू शकली नाही आणि म्हणूनच काँग्रेसला पुढील सत्तर वर्षात या देशावरती राज्य करता आले.

( १९५१ मध्ये स्थापन झालेल्या जन  संघ पक्षाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी )
         या देशात टाचणी सुद्धा बनवली जात नव्हती त्या देशात विविध प्रकारच्या कारखानदारीला सुरुवात झाली सर्वच बाबतीत भारत स्वयंपूर्ण बनण्यासाठी सर्वच क्षेत्रात अमुलाग्र प्रगती करण्याच काम काँग्रेस पक्षानं केलं हे नाकारता येणार नाही. मात्र पुढे कधीतरी आपल्या मतांचा टक्का वाढवण्यासाठी अल्पसंख्यांकांचे नको तितके लाड करण्याचं काम काँग्रेसकडून होत गेलं आणि हिंदुत्ववादी नेत्यांना आपली विचारधारा पुढे रेटण्याची संधी मिळाली.
     या देशात असलेल्या प्रत्येकाला त्या त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले तरी दुसऱ्या धर्माला कमी लेखण्याचे तसेच राज्यघटनेला न मानण्याचे काम काही लोकांकडून होत गेले, आपला धर्म हा आपल्या प्रेषितालाच मानतो अन्य कुठल्याही घटनेला मानत नाही अशी  वक्तव्ये जेव्हा जाहीरपणे होऊ लागली त्या वेळेला सर्वधर्मसमभावाला मांडणारे लोक सुद्धा त्या विचारधारेच्या विरोधात जाऊ लागले आणि इथूनच भारतातल्या लोकशाहीला गालबोट लागण्याचे सत्र सुरू झाले.


        भारत देश हा संघराज्यांनी मिळून बनलेला देश आहे. भाषावर प्रांतरचना करून राज्ये निर्माण करण्यात आली मात्र अनेक प्रांतांवरती अन्याय केला गेला त्यामुळे प्रांतीय स्वाभिमान उफाळून आला आणि त्यातूनच प्रांतीय पक्ष निर्माण झाले. भारताच्या राज्यघटनेने भारतात कुठेही जाऊन राहण्याचा नोकरी करण्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिला त्याचा फायदा घेऊन अनेक लोक जिथे जास्त नोकऱ्या मिळतील अशा शहरांमध्ये जाऊ लागले त्यामुळे स्थानिक लोकांवरती अन्याय होऊ लागले. देशाची आर्थिक राजधानी ठरलेल्या मुंबई वरती तर याचा मोठाच परिणाम झाला. एकतर मुंबई महाराष्ट्राची असून सुद्धा प्रांत रचनेच्या वेळी मुंबईला महाराष्ट्राशी  जोडण्यासाठी महाराष्ट्रीयन लोकांना मोठा संघर्ष करावा लागला होता. आपल्या भूमीत आपल्याला नोकऱ्यांपासून दूर ठेवले जाते हे शल्य प्रत्येक मराठी माणसाला सलत होते.न्युज डे वृत्तपत्रातून राजीनामा देऊन १३ ऑगस्ट १९६० ला सुरू झालेल्या ' मार्मिक ' या व्यंगचित्र साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे याला वाचा फोडत होते. मराठी माणसाचा एक कैवारी कुणीतरी आहे या जाणीवेतून अनेक तरुण त्या काळात बाळासाहेबांच्या आसपास राहू लागले आणि त्यातूनच  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भूमिपुत्रांच्या साठी काहीतरी करावं यासाठी उभे राहावं लागलं आणि १९ जुलै १९६६ ला अस्तित्वात आली शिवसेना. चळवळीतून निर्माण केलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्या हातात सत्ता असावी लागते याची जाणीव लवकरच झाल्याने पुढील वर्षी ठाणे नगरपालिकेच्या निवडणुका लढवून घवघवीत यश मिळवले आणि इथूनच सुरू झाला शिवसेनेचा राजकीय झंजावात.पण मराठी अस्मितेची विचारधारा पुढे हिंदुत्ववादी विचारधारेशी जोडली गेली आणि कमी प्रमाणात का असेना पण एक  प्रादेशिक पक्ष हा राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यामुळे महाराष्ट्रात बीजेपीच्या साथीने आणि त्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्री पद आणि त्याचबरोबर अनेक मंत्री पदे भूषवताना राष्ट्रीय पातळीवरती लोकसभाध्यक्ष पद आणि केंद्रीय मंत्री पदे मिळत गेली.

         भारताचा पुराणकालापासूनचा आजपर्यंतचा सगळा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेला फुटीर वाद्यांमुळेच तोंडाजवळ आलेला घास दूर झालेला बघायला मिळतो. भारतातल्या सर्व राजकीय पक्षांमध्ये याची वारंवार उदाहरणे बघायला मिळतात असे असले तरी इतर पक्षांपेक्षा शिवसेना पक्षाची बैठक वेगळीच असल्यामुळे शिवसेनेला इतर पक्षांपेक्षा कमी त्रास झालेला दिसतो. मात्र अडीच वर्षांपूर्वी झालेली शिवसेनेतली फुट पक्ष नेतृत्वाच्या फारच जिव्हारी लागण्यासारखी होती. याच काळात इतर पक्षांमध्ये सुद्धा पक्ष फुटीची लागण मोठ्या प्रमाणात झाली ली. कोण? कशासाठी ? कुठे गेला ? हा एक वेगळा संशोधनाचा, अभ्यासाचा त्याचबरोबर काही पानांचा ग्रंथ होणारा विषय आहे.

        याच काळात  पुढे लोकसभेच्या निवडणुका आणि सध्या असलेल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी घेतलेल्या कोलांट्या उड्या हा मतदारांच्या चेष्टेचा विषय झाला. मात्र असे असूनही अनेकांनी बाणेदारपणा दाखवण्याचा, निष्ठा जपण्याचा आणि आपल्या पक्षाची विचारधारा न सोडण्याचा केलेला विचार मतदारांच्या आदरास पात्र ठरला.


            दिनांक २४ ऑक्टोबर च्या संध्याकाळी लालबाग मार्केट मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी गर्दी केली. लालबागच्या राजा या लोकप्रिय गणेशोत्सव मंडळाचे सचिव म्हणून भारतातच काय सातासमुद्रा पलीकडे ज्यांचे नाव प्रसिद्ध आहे ते सुधीर साळवी यांचे विधानसभेचे तिकीट कापले गेले यामुळे नाराज झालेले मतदार एकत्र आले होते. आयुष्याच्या बाल्यावस्थेपासून शिवसेना जिंदाबाद म्हणत तरुणपणात भगवा झेंडा खांद्यावर घेऊन प्रत्यक्ष पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. एवढ्या काळात कुठल्याच पदाची अपेक्षा त्यांनी पक्ष कार्यालयाकडे केली नाही मात्र पक्ष कार्यालयाने विभागप्रमुखापर्यंतची पदे देऊन सन्मान देण्याचा प्रयत्न केला. गेली चाळीस वर्षे या विभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये  समरसून भाग घेऊन शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला. विभागातील जनतेच्या सुखदुःखांमध्ये सहभागी झाले. त्यांच्या विकासाच्या समस्या सोडवण्यात आनंद मानला त्यामुळेच येथील जनता  त्यांना आमदार पदी बघण्याचे स्वप्न बाळगून आहे.

 मुळातच साळवी यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे परळ भागातील केईएम हॉस्पिटल मध्ये गाव खेड्यातून येणाऱ्या कोणत्याही आजारी माणसाला मदत हवी असल्यास सुधीर साळवींना फोन जातो. समोरचा माणूस कोण आहे याचा विचार न करता तो अडचणीत सापडलेला आहे ही एकच जाणीव ठेवून सुधीर साळवींनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे.

( लालबागचा राजा सार्वजनिक  वाचनालय)
         साळवी यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील रिंगणे हे आहे. आपल्या रिंगणे गावावरती त्यांचे अलोट प्रेम आहे. गावाच्या पारंपारिक सण उत्सवांमध्ये ते त्यांच्या परीने सहभागी होण्याचा प्रयत्न करतात.गावचे ग्रामदैवत धनी केदारलिंग या दैवतावर त्यांची असीम भक्ती आहे आणि म्हणूनच प्रत्येक शिमग्यातील पालखी महोत्सवात गावी जाऊन ते सहभागी होतात. आपल्या देवाला आपण चांदीच्या पालखीत बसवावे हे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी श्री केदारलिंग देवाला चांदीने मढवलेली पालखी अर्पण केली. लालबागच्या राजाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गावांना उभारी देण्याचे काम केले जाते त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी या परीक्षांच्या साठी मुलांना अभ्यासासाठी एकांत वासाची जागा आणि त्याचबरोबर सुसज्ज ग्रंथालय उभं करण्याचं काम केलं गेलं. गरजू रुग्णांना मोफत डायलिसिसची सेवा देण्याचं काम या संस्थेकडून केलं जातं. जगभरातल्या भक्तांनी भक्तीभावाने लालबागच्या राजाच्या तिजोरीत टाकलेले दान हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यासाठी वापरले जाते हे लालबागच्या राजाचे मोठेपण आहे. या संस्थेवरती काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते व येथील स्थानिक रहिवाशी यांना सुद्धा धन्यवाद द्यायला हवेत.
        त्यादिवशी सुधीर साळवींना निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे राहण्याचे सांगण्याकरता आलेल्या हजारो लोकांना सुधीर साळवींनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला आणि आपण योग्य वेळी आपल्यासमोर येऊ असे सांगितले. लोक माघारी फिरल्यानंतर त्याने शांतपणे विचार केला आणि माध्यमांवरती त्यांचा एक बॅनर फिरला त्यात फक्त दिनांक वेळ स्थळ आणि एकच वाक्य होतं 'मला तुमच्याशी बोलायचं आहे '. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून हजारोंनी लोक लालबागच्या मार्केट जवळ एकत्र येऊ लागले. त्याच वेळेला सुधीर साळवी यांना पक्ष कार्यालयाकडून बोलावणं आलं. सुधीर साळवी परत येईपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले तरीही दहा हजारांचा त्यांचा चाहता वर्ग त्यांची वाट पाहत नुसता उभा होता. सुधीर साळवी यांनी व्यासपीठावरती प्रवेश केला आणि ' सुधीर साळवी जिंदाबाद ' च्या घोषणा पूर्ण मार्केटमध्ये निनादून गेल्या. " आपण शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. पक्षप्रमुखांना सर्वांना न्याय द्यायचा असतो. त्यांच्या निर्णयाला आपण कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवून सहकार्य करतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण पक्ष म्हणून काम करू शकतो. त्याप्रमाणे आज पक्षप्रमुखांनी मला थांबायला सांगितलेलं आहे. मी पक्षप्रमुखांचा आदेश मानतो........
तुमच्या मनातील आमदार मी आहे, यापुढेही मी आपली सेवा करणार आहे त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये उद्यापासून आपण आपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे." 
          आज काल सकाळी गुलाल हातात घेऊन शपथ घेणारा संध्याकाळी आपल्या सगळ्या निष्ठा खुंटीला बांधून कोणाच्याही गोठ्यात दावणीला जाताना दिसतोय. निवडणुकीचे राजकारण इतकं भ्रष्ट झाला आहे लोकांचाच पैसा लोकांनाच देऊन त्यातून मते विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कींव यावी अशा प्रकारची 
अवस्था लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे उद्या लोकशाहीचं काय होईल ? हा प्रश्न आवासून पुढे उभा आहे.पुन्हा इथे लोकशाहीतूनच संस्थानिक झालेल्या लोकप्रतिनिधींची राजेशाही तर इथे येणार नाही ना अशा प्रकारची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे खरे पाहता सुधीर साळवी यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासोबत असलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना योग्य आहे असा वाटला. त्याचबरोबर आमच्या हृदयातली त्यांची प्रतिमा अधिक उंचावली. कारण कुठल्या ना कुठल्या लोभाच्या पायी, सत्तेच्या हव्यासापोटी अनेक लोक तत्वनिष्ठा गुंडाळून, नात्यांचीही कदर न करता कुठेही उड्या मारतात त्यापैकी रिंगणे गावचे सुपुत्र सुधीर साळवी नाहीत याची खात्री झाली.आम्हाला त्यांचा अभिमान वाटला.
 सुधीर साळवी तुम्हाला मनापासून सलाम !

सुभाष लाड 
९८६९१०५७३४

(ता.क.) २४ नोव्हेंबर २०२४
      सदर विधानसभेच्या निवडणुकीत याच शिवडी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अजय चौधरी यांना तिकीट देण्यात आले होते. त्यांच्यासमोर मनसेचे बाळ नांदगावकर व अपक्ष संजय आंबिले उभे होते. 
अजय चौधरी यांचा प्रचार सुधीर साळवी यांनी प्रामाणिकपणे केल्यामुळे अजय चौधरी यांना ७४८९० मते मिळवून ते विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाळा नांदगावकर( मनसे) यांना ६७ हजार ७५० मिळून मते मिळवून ते दुसऱ्या स्थानावरती आले तर अपक्ष संजय आंबोले यांना ५९२५ मते मिळाली. सुधीर साळवी यांनी पक्षनिष्ठा दाखवत आपली उमेदवारी मागे घेतल्याने व पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केल्याने त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे
     

    *** अभिप्राय +++++++++    
१)
          होय साळवी साहेबांचा निर्णय खूप छान होता त्यांनी आपल्या मनाचा मोठे पणा यात दाखवला त्या बद्दल त्यांचे जेवढे कौतुक करेल तेवढ्ये कमी आहे कधी ना कधी त्यांच्या या मोठ्या मनाची पोच पावती भेटल्या शिवाय राहणार नाही 🚩
*राहुल पतयाणे

२)
सर, अप्रतिम!! बदलत चाललेला राजकारणाचा पोत अचूक हेरून, आपल्या शब्दांना जेव्हा आपण तत्वज्ञानाच्या, निष्ठेच्या वातावरणात घेऊन जाता तेव्हा त्याचं घनत्व (Density) आपणास उलघडत जात.सुधीर सरांच्या जादुई व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्ववाचा एक- एक नाजूक पदर आपण लिलया उलघडून दाखवलाय.आपणामध्ये माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची शहाणीव प्रचंड आहे.
*किशोर आयरे 
३)
विजय हा सत्याचाच होतो तो दिवस फारसा लांब नाही आपण शिवडी विधानसभेत सुधीर भाऊ (मामा) यांना आमदार म्हणून प्रतिनिधी करताना बघू जय महाराष्ट्र 🚩
अक्षय घाग

४)
रिंगणे गावच्या या सुपुत्राला आमचाहि सलाम !  🌹🌹👍🏼
शांताराम कोटकर

५)
'मला तुमच्याशी बोलायचे आहे ' ... अशा आदर्शवत कोकणाची शान .. शब्दाशी इमान वाढविण्याऱ्या मी सदैव सोबत🙏🌹
महेंद्र साळवी 

६)
आदरणीय श्री सुधीर भाऊ आमदार होणारच....👍👍👍
रमेश तुपे, नाशिक 

८)
निष्ठावान माणुस भविष्यात साळवींना निश्चित मोठं पद मिळेल.सत्य पराजीत होत नाही
माळी सरांचा मुलगा,सांगली 

            
          

1 comment:

  1. रिंगणे गावचे सुपुत्र आणि समाजकारण, राजकारण यातून यशस्वी होत गेलेल्या ग्रामवासी बद्दलची आपली आत्मियता आणि आपुलकी प्रकर्षाने जाणवली. नेहमीप्रमाणे आपली माणसे मोठी झाली पाहिजेत या विचारांची प्रचिती आली. नक्कीच साळवी सरांना त्यांच्या लोकप्रिय कार्याबद्दल न्याय मिळेल अशी आशा बाळगूया.

    ReplyDelete