Saturday, August 16, 2025

गावच्या दुकानदाराला फोन करायचाय !



आला आला वारा

संगे पावसाच्या धारा

पाठवणी करा

सया निघाल्या सासुरा ll

        मला माझ्या बालपणाची आठवण करून देणार हे गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत असतो. ':हा खेळ सावल्यांचा '


हा मराठी चित्रपट १९७५ मध्ये  प्रसारित झाला त्याकाळात आपल्या गाव खेड्यात पुरेसे रस्ते नव्हते,वीज नव्हती, गावात भरपूर गुरे होती, त्यांचे गोठे भरलेले होते. बैलांच्या मानेवर ज्यू दिलेली ज्योते शेतात फिरत होती. गावभर रानोमाळ शेतंच  शेतं होती आणि तिथे काम करणारा शेतकरी दिवसभर राबत असताना दिसत होता. मातीत राबणारा हा शेतकरी प्रत्येक दिवशी नवा उत्साह घेऊन येत होता आणि म्हणूनच प्रत्येक कामाच्या वेळी शेतातून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळत होती.

       आगोटीची कामं आटोपून सासरवासीनी आपापल्या माहेरास मोकळा श्वास घ्यायला जात असत. तिथे त्यांना माहेरवाशींनी म्हणत. या बालपणीच्या मैत्रिणी लग्नानंतर वेगवेगळ्या गावात विखुरल्या जातात. पण आगोटीची काम आटोपून माहेरास आल्या की एकत्र येऊन बालपणीच्या सुखद आठवणी काढत गप्पागोष्टी करीत. असेच एक दिवस ढग भरून येतात. ढगांच्या गडगडांटांनी आभाळ दणाणून जातं आणि प्रत्येक सयेला आपल्या सासरच्या संसाराची आठवण होते. माहेर सोडताना डोळ्यांतून आलेला आसवांचा पूर पावसाच्या धारेत दिसेनासा होतो. हृदयातली कालवा कालव आतल्या आत दाबून चेहऱ्यावर खोटे हासू आणून सया सासरच्या पायवाटेने चालू लागतात.

          या सिनेमाचे चित्रण कोकणातलेच असल्याने चित्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला दृष्टीस पडत नाहीत. गीतकार सुधीर मोघे हे कोकणातल्या कोलधे गावचे असून गीताची रचना ही कोकणातील बोलीभाषेशी जवळची असल्याने त्या गीताबद्दल आपुलकी अधिक वाटते. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि आशा भोसले व अनुराधा पौडवाल यांचा सुरेल गळा लाभला आहे. हा सिनेमात डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांची मध्यवर्ती भूमिका आहे. आपणही हे गीत ऐकावे किंवा पहावे आपल्याला गावची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही.

        गेल्या पन्नास वर्षात कोकणात हळूहळू विकासाची पावले पडू लागली. तस तसे कोकणाचे कोकणपण हरवत असल्याची जाणीव होऊ लागली. कोकण रेल्वे आली आणि कोकण झपाट्याने रिकामा होऊ लागला. कोकणात व्यापार उदीम येईल, इथे व्यवसायांची निर्मिती होऊन कोकणातील इथला तरुण इथेच राहील उलट गाव सोडून गेलेले तरुणही गावाकडे येतील अशी धारणा कोकण रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या त्या काळातील धुरीणांची होती. पण झाले उलटेच. इथे रोजगार निर्मिती झाली नाही. रेशनिंग वरती फुकट धान्य मिळू लागल्याने शेतीत राबण्याची कुणाला गरज वाटू लागली नाही म्हणून शेतीही पडली. तरुण वर्ग गाव सोडून बाहेर गेला. आता गावात राहिली आहेत वृद्ध माणसे. प्रत्येक गावातील निम्म्यापेक्षा जास्त घरे बंद पडलीत. रस्ता आहे पण भारमान नाही म्हणून एसटीच्या फेऱ्या कमी होत चालल्या आहेत. जिथे चार-पाच शिक्षक कमी पडायचे तिथे शाळांचा पट कमी झाला म्हणून  एखाद्या शिक्षकावरती शाळा चालू राहिल्या आहेत भविष्यात त्या शाळाही बंद पडतील अशी भीती वाटू लागली आहे. दिवसभराचा रोज भरेल एवढे सुद्धा पेशंट येणार नसतील तर डॉक्टर सुद्धा गावात राहायचं की नाही असा विचार करू लागले आहेत. गावात घरोघरी वीज गेली आहे.पाण्याचे नळ गेले आहेत. लाखो रुपये खर्च केलेल्या या विकास योजना. शिमगा आणि गणपती उत्सवात त्या योजनांचा फायदा घेतला जातोय. एकेकाळी गावात माणसं होती पण विकास नव्हता आता विकास झाला आहे पण विकासाचा फायदा घेणारी माणसेच नाहीत.

          गावातल्या दुकानदारांची सुद्धा तीच अवस्था आहे. गावात दोन दोन तीन दुकाने असून सुद्धा दुकानदार आनंदित होते. काही गावात तर वाडीवार दुकाने होती. या दुकानांवरती संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला गर्दी होत असे. दिवसभर रानात काम करून आल्यानंतर दुकानावर फेरी मारण्याची पद्धत होती. विशेषता पूर्वी घासलेटचे दिवे असल्याने गिऱ्हाईकाच्या हातात घासलेट करीता काचेची बाटली( या बाटलीच्या तोंडाजवळ हातात धरण्यासाठी दोरी बांधलेली असे व नारळाच्या किडनीचे बूच असे )किंवा प्लास्टिक कॅन असे. साखरेचा गोडवा सर्वश्रूत होईपर्यंत दुकानात गुळाच्या ढेपा असत. त्या फोडण्यासाठी लाकडी पाचेरू आणि हातोडा असे. दुकानदार गुळाचा खडा कागदात बांधून देई. घरी गेल्या गेल्या तो कागद बाजूला करून गुळ डब्यात ठेवला जाई. दाणेदार चहाची पावडर येण्या अगोदर चहाची बुक्की वापरली जायची. त्यावेळच्या स्त्रियांना गुळाच्या चहात दूध कसे टाकावे याचे तंत्र अवगत होते त्यामुळे चहा फुटण्याची शक्यता कमी असे.

          गावातलं दुकान हे जसं गरजेचा जिन्नस घेण्याची मुख्य जागा असली तरी काही वयस्कर लोक वेळ घालवण्यासाठी तिथे येऊन बसत. दुकानदार सुद्धा या लोकांसाठी पान सुपारीचं ताट भरून ठेवत असे.सुपारी कातरता कातरता गावातील एखाद्या बातमीची पुडी सुटली जायची.कधी त्या बातमीला कात टाकून रंग भरला जायचा किंवा एखादी बातमी ओठावरल्या  दोन बोटांच्या मधून दूर  पिचकारुन तिचं महत्त्व सांगितलं जायचं. दुकानदाराला त्यामुळे जाग्यावरच गावाची भ्रमंती करता यायची. गिऱ्हाईक नसेल तेव्हा तो ही त्या चर्चेत आपला मत नोंदवायचा. एवढेच काय तर गावच्या नाटकात कोणाला कोणती भूमिका द्यायला हवी याचे आडाखे सुद्धा दुकानाच्या बाकड्यावर बांधले जायचे.

           मुलांसाठी तर गावचे दुकान एक पर्यटन स्थळ वाटायचं. दुकानाची आडवी फळी त्यांच्या उंचीपेक्षा वरती असल्याने फळीवर ठेवलेल्या पेपरमिंटाच्या चौकोनी गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या,श्रींखंडाच्या फिकट गुलाबी रंगाच्या गोळ्यांच्या काचेच्या बरणीच्या पलीकडचे काही दिसत नसे. खरेदी झाल्यानंतर मूठ बांधलेला हात वर सरकवला की त्या मुठीच्या मागच्या पृष्ठभागावर सुपारी एवढा पातळ गूळ चिकटवायचा. हा मुलांचा पहिला खाऊ. त्याचबरोबर गुळ चणे, गुळ शेंगदाणे किंवा हळदीत माखलेले वाटाणे कडकड करीत चावत जाणे यात स्वर्गीय आनंद होता.उभ्या लाकडी फळ्यांनी बंद केली जाणारी ही दुकाने आजही काही गावात चालू असलेली दिसत असली तरी एकट्या दुकानदाराशिवाय आणखीन कोणाला तिथे काम करायला ठेवणे हे परवडण्यासारखे राहिलेले नाही.

           आज कदाचित या दुकानदारांना सामान्यात गणले जात असले तरी त्या काळात हे दुकानदार गावाच्या सामाजिक अभिसरणाच्या केंद्रस्थानी होते.तसं पाहिलं तर दुकानदार हा गावातला सावकार नसला तरी पैसे राखून असे.त्यामुळे सणासुदीला मनीऑर्डर नाही आली तर उधारीवर जिन्नस देऊन सण साजरे करायला दुकानदारच मदत करीत असे तशी कुठे पैशाची मदत लागली तरी दुकानदार तशी मदत करीत असे त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ दुकानदाराची सलोख्यानेच वागत असे. दुकानदाराला हिशोब करणे जसे गरजेचे होते तशी लिखापढी करणे सुद्धा आवश्यक होते. तेवढे ज्ञान दुकानदाराकडे असल्याने दुकानदारा गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणला जायचा. स्वातंत्र्यानंतर गावात प्राथमिक शाळा, आल्या ग्रामपंचायती आल्या, माध्यमिक  शाळा आल्या या विकास कामात गावच्या धुरीणांमध्ये दुकानदाराची स्थान असे. गावात जेव्हा बैठका होत तेव्हा चहा करायची ठरल्यानंतर दुकानदार आपल्या दुकानातून गुळ चहा पावडर यांची व्यवस्था करीत असे. बऱ्याच वेळेला हा खर्च तोच सोसत असे. त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्यत्व केव्हा सरपंच पद हे हसत हसत दुकानदाराला बहाल केले जायचे.

         काही दिवसापूर्वी आहे गावच्या माध्यमिक शाळेतील सौ.साधना बावधनकर या मुख्याध्यापिकेने आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात गावच्या दुकानदारांना बोलावून त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.त्यावेळी सर्वांच्या डोळ्यांत पाणी तरारले. कोकणात जेव्हा नव्याने शाळा उभारल्या गेल्या त्या वेळेला त्याला सरकारी अनुदान मिळत नसे किंवा शिक्षकांचे पगारही सरकार देत नसे. बऱ्याच ठिकाणी गावकरी वर्गणी काढून शिक्षकांना तुटपुंज मानधन देत असत. तेही वेळेवर नसे. त्या काळात कोकणात शिक्षकांची कमतरता असल्याने देशावरूनच शिक्षक आपल्या कोकणात आले. दऱ्या डोंगरातल्या वाटांनी हे शिक्षक गावात उतरले. गावात कोणाच्यातरी घरातल्या पडवीत किंवा एखाद्या खोलीत हे राहत असत. गावच्या दुकानदाराला ही परिस्थिती चांगली माहीत असल्यामुळे

या शिक्षकांना दररोज लागणारा जिन्नस तो उधारीवर देत असे. शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असल्यामुळे त्याच्या उधारी बद्दल तो दुकानदार कधी जाहीर वाच्यता करत नसे. त्याच परिस्थितीत गावातल्या शाळेत शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन मोठ मोठ्या हुद्याच्या नोकऱ्या करू लागले. अशाच परिस्थितीचा सामना केलेल्या एका शिक्षिकेने दुकानदारांचा केलेला गौरव हा कोकणातील समस्त दुकानदारांचा प्रातिनिधिक गौरव म्हणायला हवा. शिक्षकाने दाखवलेली ही कृतज्ञता गावात शिकून गेलेले विद्यार्थ्यांना आपल्याच गावातल्या दुकानदाराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असल्यास ते जेव्हा गावी येतात तेव्हा त्यानी त्या दुकानांतून दैनंदिन  जिन्नस खरेदी करावा हीच आमची अपेक्षा आहे

       पूर्वी मच्छी मटणाचा बाजार करण्यासाठी आठवडी बाजाराला जाणारा ग्रामस्थ गावात रस्ते - गाड्या आल्यानंतर ऊठसूठ बाजाराच्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागला आणि चार पैसे वाचतात म्हणून तिथूनच बाजारहाट करू लागला. मात्र उधारी पाधारीसाठी गावचा दुकानदार आपल्याला समजून घेतो म्हणून काहीसा माल गावात घ्यायचा ही ग्रामस्थांची मखलाशी दुकानदारांच्या पोटावर बेतली आहे. त्यात पुणे मुंबई कडून येणारे चाकरमानी आज-काल स्वतःच्या चारचाकी वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने प्रवास करू लागल्याने गौरी गणपतीच्या वेळेला लागणारा जिन्नस शहरातच खरेदी करून गाडीत टाकून गावाला येऊ  लागले आहेत. गौरी गणपतीच्या सणाला चांगली विक्री होईल या अंदाजाने दुकानदार मोठा साठा करून ठेवतो मात्र गिऱ्हाईकांची कमी झाल्याने त्याचा तो व्यवहार आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. हे जर असेच चालले तर दुकानदारी करून त्यांच्या उदरनिर्वाह पुरतेही काही मिळणार नसेल तर हेही दुकानदार आपली दुकाने बंद करून कुठेतरी व्यवसाय करायला जातील. आणि मग गावातल्या वृद्ध माणसांना गावातच मिळणारी सोय ही दूर होणार आहे. आणि म्हणून हा लेख लिहिताना माझी समस्त चाकरमान्यांना विनंती आहे की गाव आता सगळ्या समस्येने त्रस्त झालेला आहे. इथे व्यवसाय मिळाला नाही म्हणून आपण व्यवसायाच्या शोधात शहरात गेलो आणि चाकरमानी झालो. चार पैसे आपल्या गाठीस जमा झाले. पण या गावात आपण जन्मलो, आपलं शिक्षण झालं, आपल्या वरती संस्कार केले तोच गाव आता बंद घरांच्या ओझ्याने वाकू लागला आहे याकडे  दुर्लक्ष करीत आहोत.गावातली घरं माणसांनी भरून जातील तेव्हा तो उत्साहाने ताट कण्याने उभा राहिल. गावात माणसं असतील तर एसटीच्या फेऱ्या वाढतील. विकासाचा फायदा घेतला जाईल.शेती फुलेल. हे सगळं बोलायला जरी सोप असलं तरी ते खरं ठरवायला किती काळ लागेल देव जाणे. पण गावातला दुकानदार जगवण्याचे काम तर आपण करू शकतो. गावात न मिळणाऱ्या शोभेच्या किंवा सजावटीच्या वस्तू आपण जरूर शहरातून आणा पण दैनंदिन जीवनातील आवश्यक जिन्नस - वस्तू हे मात्र आपण गावच्या दुकानात घेतले तर गावचा दुकानदार आनंदित राहील. त्याचा फायदा गावात राहणाऱ्या आपल्या वृद्ध नातेवाईकांसाठी होईल. अमुक एक चाकरमानी मुंबईत भरपूर पैसा कमवतो पण गावी आल्यावर माझ्याच दुकानात जिन्नस घेतो हे तो सर्वांना आनंदाने सांगेल. आपलं अनुकरण इतर चाकरमानी करतील. एकेकाळी गावाला आधार ठरलेल्या या दुकानदारांना आपणच आधार द्यायला हवा.गाव वाचवण्याच्या मोहिमेत आपण एवढे योगदान कराल याची मला आशा वाटते.

       चला आजच गावच्या दुकानदाराला फोन करून " मी गणपती करता अमुक दिवशी येतोय, मी सामानाची यादी देतोय त्याप्रमाणे सामान बांधून ठेवा मी ते  घ्यायला येतोय."

सुभाष लाड

अध्यक्ष

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

  

प्रविण पांचाळ दुकानदार -+919403769987
रिंगणे 

अभिप्राय ------🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१) गोविंद जाधव -शिपोशी, नाशिक. 
हो नक्कीच , मुंबईकर मंडळींमध्ये तशी जागृती व्हायला पाहिजे. गावची अर्थव्यवस्था टिकून रहाण्यासाठी थोडंसं मन मोठं करायला हरकत नाही. वह्या वाटप करणाऱ्या लोकांना गावातूनच खरेदी करून वाटप कराव्यात अशी गळ घातली आहे. तसेच शिपोशी येथील मेडिकल स्टोअर मधून मुंबई व इतर भागात औषधे देऊ शकतो का, यासाठी मी श्री मुकुंद बाईंग याला तसे गणित जमत असल्यास मी पुढाकार घेतो असे कळवले आहे. बघुया कसे जमते ते.

२) विश्वंभर पांचाळ- रिंगणे, मुंबई 

 दुकानदाराला फोन करून ........👌👍
 मी पण इथून जास्त समान नेत नाही.कारण सगळ काही दुकानावर मिळत,मग एवढ ओझ का न्यायचं .

३) गणपत शिर्के, साखरपा 

खुप सुंदर मनाला भावणारा लेख.सर्वांनी जर अनुकरण केले तर खरोखर दुकानदार आनंदी होईल.👌👌👍🙏🙏🙏

४) आनंद धाक्रस- नाटे, डोंबिवली
सध्याचे गावचे वास्तव चित्र मांडले आहात. 👍

५) दीपेश बारस्कर - कोंडगे, डोंबिवली 

दादा नमस्कार , मी गावचे दुकानदार आयरे दादा ना लागणाऱ्या जिन्नसाची चीट्टी पाठवतो मग ते सगळे सामान भरून ठेवतात व आम्ही जाताना हे आमच्या घरी नेतो🙏🏻🙏🏻

६) अनिल कारेकर-  आडवली, मुंबई 

बरोबर आहे आम्ही पण गावाकडे फोन केला कीवा गावाहून मुंबईला फोन केला तर दुकानदार सांगत असे की अमुक अमुक सेकंद झाली एवढे द्या त्यावेळी गावात इंडिकेटर नसल्याने दुकानदार सागेल ती रक्कम द्यावी लागत असे पण खुशाली कळत असे

७) विजय बाराथे - वाडा, पालघर 

दुकानदारांना घरी पाहुणे आले आहेत असं सांगितलं तरी कुटुंबाला हवं ते देत असत.
खुप छान योगदान देत असे.

८) जयेश दळवी - येरडव, स्थानिक दुकानदार.
काका, काय लेख आहे... अप्रतिम... आत्ताच आई, बाबा आणि बंधूंना वाचुन दाखवला... अगदी जशास तशी परिस्थिती मांडली आहेत तुम्ही... आमचे स्वतःचे गावात एक दुकान आहे, पूर्वी अणुस्कुरा घाट सुरू व्हायच्या अगोदर दुकानात 3-3 दुकानदार लागत असत. परंतु आज तशी परिस्थिती नाही राहिली. जेव्हापासून गावात डिझेल वर चालणारी डूगडुगी रिक्षा सुरू झाली लोक नेहमी पाचल ये जा करू लागले आणि तिकडूनच लागणारा जिन्नस घेऊन येऊ लागले आणि त्यातूनच पाचलसारख्या गावात गुजराती/मारवाडी दुकानदार उदयास आले...

९) प्रशांत गो.जाधव,कोंडगे, रत्नागिरी 
खूप सुंदर आठवणी 
आमच्या दादांचा पगार झाला की आम्हा मुलांना दप्तराच्या पिशव्या घेउन विश्वासराव यांच्या दुकानात घेउन जायचे. उधारीची वही घेऊन यादी बनवायचे मागील हिशोब पूर्ण करायचे व पुढील जिन्नस घेऊन जायचे. यादीनुसार जिन्नस बांधून होईपर्यंत विठोबा काका आम्हाला गुळ शेंगदाणे किंवा खोबरे खायला द्यायचे. ही आपुलकी आणि गरिबीतही मनाची श्रीमंती आता लोक पावत असताना. आपण आपल्या लेखणीतून पुन्हा जागृत करुन देत आहात धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🌹🌹🌹

,१०) संदीप बारस्कर,कोंडगे, मुंबई 
दादा नमस्कार मी गावचे दुकानदार आयरे दादा ना लागणाऱ्या जिन्नसाची चीट्टी पाठवतो मग ते सगळे सामान भरून ठेवतात व आम्ही जाताना हे आमच्या घरी नेतो🙏🏻🙏🏻

११) अस्मिता मांडवकर,मासाळ, मुंबई 
श्री सुभाषजी लाड सर आपण लेख खरंच खूप छान लिहीला आहात माहेरवाशीण लहान मुलं दुकानाच्या बाकावर येऊन बसणारी वरीष्ठ मंडळी त्यांची विचारसरणी आणि महत्वाचे म्हणजे गावातील दुकानदार दादा त्यांची महत्वाची भूमिका असतें आपल्या गावातील आजीआजोबा यांना त्यांचाच आधार असतों म्हणून खरंच थोडं का होईना जिन्नस गावच्या दुकानातून खरेदी करणं योग्य ठरेल तेवढाच आनंद माल विकला गेल्याचा दुकानदार दादांना होईल कारणं मुंबईत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी धंदा करण्यासाठी येण्याअगोदर याचं दुकानातून आपणं जिन्नस खरेदी करून वेळ  चालवलेली असतें जर चाकरमानी गावी येऊन माल खरेदी करत असेल तर दुकानदार दादांना होणारा आनंद सुखावणाराच असेल खूप छान लेख लिहिला आहात धन्यवाद सर 🙏👌💐

2 comments:

  1. सुरेख आणि प्रेरणादायी लेख

    ReplyDelete
  2. आमच्या खोरनिनको गावी श्री.फणसळकर यांचे 'भटाचे दुकान' नावाने प्रसिद्ध असलेल्या दुकानातून त्या काळी गावची खरेदी होत असे.. आणि या ठिकाणी लाड सरांनी नमूद केलेल्या सर्व बाबी जशाच्या तशा होत लागू होत आहेत. आज गावात दुकानांची वाढ झाली असली तरी या दुकानाची अवस्था मात्र बिकट आहे. गावात अनेक घरं बंद आहेत. शिमगा, मे महीना आणि गौरी -गणपती सणाच्या वेळी गांव बहरलेला असतो. इतर वेळी वेचक वेधक आणि वाट पहाणे..लाड सरांचं हे प्रासंगिक म्हणजे सध्याच्या कोकणातल्या गावांच्या वास्तवाचं यथार्त वर्णन आहे. फारच मनोवेधक आणि चिंतनीय..

    ReplyDelete